Saturday, June 16, 2018

थांबा, पहा आणि मग पुढे जा!

मध्यंतरी एक मुलगा मला भेटला. सोयीपुरतं त्याला रोहन म्हणूया. तर हा रोहन सांगत होता की त्याने एका विवाहसंस्थेच्या वेबसाईटवरच्या तब्बल दोनशे मुलींच्या प्रोफाईल्स बघून त्यांना नापसंत केलंय. तो मोठा चिंतेत दिसत होता. अजून थोडी चर्चा केल्यावर माझ्या लक्षात आलं की खरंतर त्याने ज्या अपेक्षा लिहिल्या होत्या त्यानुसारच शोधलेल्या या सगळ्या मुली होत्या. आणि हा सगळा नापसंतीचा पराक्रम त्याने जेमतेम आठवड्याभरातच केला होता. एकुणात माझ्या लक्षात आलं की, सोशल मिडियावर न्यायाधीशाचा हातोडा घेऊन निवाडे देण्याचा जो आजार फोफावलाय त्याचीच लागण आता विवाहसंस्थेच्या वेबसाईटपर्यंत झाली आहे. गेल्या दहा-पंधरा वर्षात झालेल्या सोशल मिडियाच्या उदयाने माहितीची मुक्त देवाणघेवाण व्हायला लागली, अनेक जण व्यक्त होऊ लागले, चर्चा होऊ लागली वगैरे वगैरे गोष्टी घडल्याच. या सगळ्या छान छान गोष्टींबरोबर अजून एक गोष्ट घडली ती म्हणजे सोशल मिडिया हे एक न्यायाधीश बनवण्याचा कारखानाच बनला जणू. आपली मतं किती पटकन तयार होऊ लागली. एखाद्या व्यक्तीला, किंवा घटनेलाही पटकन काहीतरी लेबल चिकटवून मोकळं होऊ लागलो. याचा वेग दिवसेंदिवस वाढवतच गेलोय आपण. काय घडतंय नेमकं?

काही उदाहरणं देतो. 
(१) बऱ्याच वर्षांपूर्वी फेसबुकवर नोट्स नावाचा एक प्रकार आला होता. सुरुवातीला वापरलाही अनेकांनी. पण तो कधीच फार प्रसिद्ध झाला नाही. हळूहळू त्याचं अस्तित्व जवळजवळ संपलंच. असं का झालं? कारण नोट्स मध्ये लिहिला जाणारा मजकूर हा बहुतेक वेळा बराच जास्त असायचा. (कमी मजकूर लिहायला स्वतःची वॉल होतीच की!) आणि मोठ्या मजकुराचा खप कमी झाला आणि त्याबरोबर नोट्सचा सुद्धा! 
(२) फेसबुकवरच एखाद्या फोटोला मिळणारा प्रतिसाद आणि एखाद्या लिखित गोष्टीला मिळणारा प्रतिसाद याची तुलना करून बघितलं तर लक्षात येतं की फोटोला तुडुंब प्रतिसाद मिळतो. वाचत बसण्यापेक्षा फोटो बघणं सोपं आणि पटकन होणारं आहे ना! 
(३) इन शॉर्ट्स नावाचं एक मोबाईल अॅप आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या बातम्यांचा अगदी थोडक्यात सारांश दिला जातो. या अॅपची लोकप्रियता जबरदस्त आहे. कारण पूर्ण बातमी वाचायला वेळ आहेच कोणाकडे? हेडलाईन आणि त्या अनुषंगाने दोन-तीन शब्द, संज्ञा कळल्या म्हणजे झालं.

या उदाहरणांमधून एक गोष्ट स्पष्ट होते आणि ती म्हणजे, आपला लक्ष देण्याचा कालावधी म्हणजेच ज्याला इंग्रजीत अटेन्शन स्पॅन म्हणलं जातं तो कमी झाला आहे. आणि त्याचवेळी अजून एक गोष्ट घडली ती म्हणजे मला शक्यतो प्रत्येक गोष्टीवर मत व्यक्त केलं पाहिजे, नाहीतर मी मागे पडेन ही भीती. इंग्रजीत ज्याला फिअर ऑफ मिसिंग आउट किंवा फोमो (FoMO) असं म्हणतात, तशातलाच हा प्रकार. सगळेजण काही ना काही व्यक्त होत आहेत तेव्हा, ‘आपणही व्यक्त व्हायलाच पाहिजे, निकाल द्यायला पाहिजे ही स्वतःकडून असणारी मागणी आणि व्यक्त होण्यासाठी, निकाल देण्यासाठी जो विचार करावा लागेल, जो अभ्यास करावा लागेल त्यासाठी आवश्यक कालावधी देण्याची मात्र तयारी नाही अशा दोन्ही गोष्टी एकाच वेळी घडल्याने फारच गंमत झालीये आपली सगळ्यांची. मी याला झटपट निकाल वागणूक म्हणतो. अगदी सुरुवातीला दिलेल्या प्रसंगातल्या रोहनचं हेच झालं होतं. आपण काहीतरी निकाल द्यायचाच आहे आणि तोही तत्काळ अशी त्याची स्वतःकडून मागणी आहे. त्यामुळे त्याने बघितलेल्या दोनशे प्रोफाईल्सपैकी बहुतांश प्रोफाईल्स त्याने नीट न वाचता, नीट विचार न करता थेट नापसंत करून टाकल्या होत्या. काहीतरी निकाल द्यायचाच आहे तर केवळ नापसंती कशी काय व्यक्त केली असा प्रश्न कदाचित मनात येऊ शकतो. तत्काळ निकाल द्यायचा तर एखादीला होकार देऊन मोकळा का बरं नाही झाला? याचं उत्तर आहे ते म्हणजे या प्रसंगात होकार किंवा पसंती यापेक्षा नापसंती अधिक सोयीस्कर आहे. नापसंती व्यक्त केली की विषय संपतो. होकार मात्र विषय वाढवतो. आणि विषय वाढला म्हणजे प्रत्येक टप्प्यावर स्वतःकडून आपण तत्काळ निकालाची अपेक्षा करणार याची कुठेतरी आपल्याला जाणीव असते. त्यापेक्षा नापसंत करा आणि पुढे व्हा असा सोपा विचार आपण करतो.

या आत्तापर्यंतच्या चर्चेनंतर पटकन “ही आजकालची पिढी...”, असं म्हणत, लेबल चिकटवण्याच्या मोहाने सरसावू बघाल पण थोडे थांबा. याचं कारण असं की हा जो गोंधळ चालू आहे तो फक्त आमच्या पिढीचा आहे असं नाही. आमच्या पालकांची पिढीसुद्धा ज्या पद्धतीने सोशल मिडिया आणि त्यातही विशेषतः व्हॉट्सअॅप मध्ये अडकली आहे ते बघता, हा अगदी सार्वत्रिक गोंधळ आहे असं म्हणायला हरकत नाही. आमच्या नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात एका पालकांनी प्रश्न केला की, मुलंमुली सतत मोबाईलमध्ये असतात त्यांच्याशी संवाद कसा होणार?’ त्यावर वक्ते म्हणून उपस्थित असणाऱ्या ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ डॉ आनंद नाडकर्णी यांनी सभागृहातल्या सगळ्याच पालकांना प्रश्न केला, “किती पालक इथे आहेत जे व्हॉट्सअॅप वापरत नाहीत?”. एकही हात वर आला नाही. एक हशा तेवढा पिकला! कुठलाही मागचा पुढचा विचार न करता, कसलीही शहानिशा न करता आलेले मेसेजेस पुढे धाडून देण्याचं प्रमाण सर्वच वयोगटातल्या मंडळींमध्ये प्रचंड आहे. आणि म्हणूनच ते लग्न ठरवण्याच्या प्रक्रियेत असणाऱ्या पालकांमध्ये देखील दिसतं. अर्थातच या प्रक्रियेत पालकांची ही झटपट निकाल वागणूकथोडी कमी प्रमाणात दिसते हे खरं आहे कारण तिथे काळजीचं प्राबल्य आहे अजून. पण ते मुला-मुलींपेक्षा फार कमी नाही, हेही वास्तव आहे. 

मग यावर उपाय काय? सोशल मिडिया आणि आजूबाजूला एकुणात होत जाणारे बदल ही काय आपल्या हातातली गोष्ट नाही. आपण करू शकतो अशी गोष्ट म्हणजे एक पॉझ म्हणजेच स्वल्पविराम घेण्याची. समोर येणाऱ्या गोष्टी बघणे, निरखणे, त्यावर सर्वांगाने विचार करणे, त्यावर आपले विवेकनिष्ठ, तर्कशुद्ध मत बनवणे आणि या सगळ्यासाठी काही काळ थांबत स्वतःला वेळ देऊन मगच पुढे जाणे, म्हणजे हा स्वल्पविराम. एवढी सवलत आपण स्वतःला द्यायला शिकलं पाहिजे. आपण यातून अनावश्यक घाई गडबडीने चुकीचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता कमी करू शकतो. कधीकधी चौकात सिग्नल नसेल तर एक फलक लावलेला असतो- थांबा, पहा आणि मग पुढे जा. सामान्यतः प्रगत देशांत फार जास्त काटेकोरपणे पाळल्या जाणाऱ्या या पाटीला आपल्या देशात खुद्द वाहतूक पोलीसही गांभीर्याने घेत नाहीत आणि मग टाळता येण्यासारखेही असंख्य अपघात घडतात. नातेसंबंध, लग्न, जोडीदार निवड हे आणि यासारखे प्रत्येक महत्त्वाचे निर्णय घेताना थांबा, पहा आणि मग पुढे जा अशी एक अदृश्य पाटी लावलेली आहे हे लक्षात ठेवलं तर बरेच अपघात टाळता येईल हे नक्की.


(दि. १६ जून २०१८ रोजी प्रकाशित झालेल्या महाराष्ट्र टाईम्सच्या मैफल या पुरवणीत प्रसिद्ध)

Saturday, May 19, 2018

माझ्या हातातल्या गोष्टी


शिप ऑफ थिसिअसया नितांत सुंदर सिनेमात एक प्रसंग होता. शेअर ब्रोकर असणारा नवीन नावाचा एक तिशीच्या आसपासचा मुलगा एका गरीब माणसाला न्याय देण्यासाठी प्रचंड झटतो. त्याच्या परीने त्याला शक्य ते सारं करतो. पण सगळं शक्य होत नाही. शेवटी थकून, काहीसा निराश होत तो त्याच्या आजीशेजारी बसतो. आजीने अनेक वर्ष सामाजिक काम केलंय. तिला हे सगळे अनुभव, त्यावेळची निराशेची भावना हे अगदी नीट माहित्ये. ती त्याला फक्त एवढंच म्हणते- इतना ही होता है|” बस्स. त्यापुढे काही संवाद नाही. पण त्या वाक्यात सगळं काही आलं.

माझ्या हातात असणाऱ्या गोष्टी मी केल्या आणि माझ्या हातात नसणाऱ्या गोष्टी मी स्वीकारल्या यात समाधान आहे हेच एक प्रकारे ती आजी आपल्या नातवाला सांगते. एका अमेरिकन विचारवंताने बनवलेली एक प्रार्थना आहे. सेरेनिटी प्रेयर- मनःशांतीची प्रार्थना. त्या प्रार्थनेचं मराठी रूप मी प्रसिद्ध लेखक डॉ अनिल अवचट यांच्या तोंडून पहिल्यांदा ऐकलं होतं-

जे टाळणे अशक्य, दे शक्ती ते सहाया. 
जे शक्य साध्य आहे निर्धार दे कराया
मज काय शक्य आहे, आहे अशक्य काय,
माझे मला कळाया, दे बुद्धी देवराया

मला ही प्रार्थना विलक्षण आवडते. माझ्या हातातल्या आणि हातात नसणाऱ्या गोष्टी अशी विभागणी यात आहे. हातात नसणाऱ्या गोष्टी स्वीकारायच्या आहेत. ते महत्त्वाचं आहेच पण एवढंच स्वतःला सांगून ही प्रार्थना संपत नाही तर हातात असणाऱ्या गोष्टी मी निर्धाराने करायच्या आहेत हेही यामध्ये आहे. पुढे जाऊन कोणत्या गोष्टी माझ्या हातातल्या आहेत आणि कोणत्या नाहीत हे माझं मलाच समजायला हवं असंही या प्रार्थनेत आपण स्वतःला सांगतो. दुसरं-तिसरं कोणी येऊन सांगणार नाही, माझं मलाच ते शोधायचं आहे.


 मागे एका मित्राशी मी हे बोलत असताना तो म्हणाला “एखादी गोष्ट आपल्या हातात नाही हा विचार करून डोकं शांत कसं राहील? उलट आपल्याला त्रास होणारी गोष्ट आपल्या हातात नाही हे जाणवून जास्तच त्रास होतो आपल्याला”. एक क्षण विचार करता मला पटलं त्याचं. पण दुसऱ्याच क्षणी जाणवलं की ज्या गृहितकावर/ समजुतीवर आधारित तो हे बोलतोय तिथेच बहुधा गडबड आहे. इतरांचं वागणं, बोलणं हे मला त्रास होण्यामागचं कारण आहे असं त्याचं गृहीतक होतं. “हे असं घडलं म्हणून मी चिडलो”, “तमुक व्यक्ती अशी वागली म्हणून मी असा वागलो”, “अमका असं काहीतरी वागला जे त्याने वागायला नको होतं म्हणून मी निराश झालो.” “तमक्या तमक्याने या या विषयावर सिनेमा बनवला म्हणून मला राग आला”, “अमकं पद्धतीचं चित्र काढलं म्हणून मला चित्रकाराबाबत तिरस्कार वाटू लागला”, अशा पद्धतीची वाक्य अनेकदा आपण बोलतो. आपल्या आजूबाजूच्या मंडळींना बोलताना ऐकतो. किती सोपं आणि साधं आहे ना! माझ्या भावनांची जबाबदारी मी सहजपणे झटकून मोकळा. जे काही घडलं ते दुसऱ्या माणसामुळे, त्याच्या वागण्यामुळे, निर्माण झालेल्या प्रसंगामुळे.’, असं ठरवून मोकळा!

मला वाटतं तीन टप्प्यात ही सगळी प्रक्रिया घडते. पहिला टप्पा म्हणजे प्रत्यक्ष एखादा प्रसंग घडणे. मग समोरच्या व्यक्तीचं एखादं वागणं किंवा बोलणं असेल. दुसरा टप्पा येतो त्या प्रसंगाचा मी माझ्या परीने अर्थ लावणे. आणि तिसरा भाग म्हणजे त्या अर्थ लावण्यानुसार काढलेल्या निष्कर्षाला मी माझी शा‍ब्दिक किंवा कृतीतून प्रतिक्रिया देणे.

प्रसंग à अर्थ लावत निष्कर्ष काढणे à त्या निष्कर्षांना प्रतिक्रिया देणे.

आता यात जर कोणी प्रश्न केला की तू अमुक अमुक पद्धतीनेच का बरं प्रतिक्रिया दिलीस तर सहजपणे आपण म्हणतो की मूळापाशी गेलो तर लक्षात येईल की टप्पा क्र १ मध्ये जो काही प्रसंग घडला आहे त्यामुळे असं झालं. वरवर बघता ते योग्यही वाटतं. तिथून तर खरी सुरुवात झाली की असं म्हणत आपण स्वतःला पटवतो की खरा दोष त्या प्रसंगाचाच किंवा त्यात असणाऱ्या व्यक्तीचा आहे. पण खरी गंमत अशी की, सगळी गडबड दुसऱ्या टप्प्यावर आहे, एखाद्या प्रसंगाचा अर्थ लावत निष्कर्ष काढण्यामध्ये आहे. आपण आपली प्रतिक्रिया प्रसंगाला देत नसतोच मुळी. आपण ती निष्कर्षाला देत असतो, जो निष्कर्ष आपण आपल्या पद्धतीने अर्थ लावून काढलेला असतो.

निष्कर्ष काढण्यासाठी आपण आपले अनुभव, ज्ञान आणि समजुती यांचा आधार घेतो. पण इथेच थोडीशी गडबड असेल तर? जसं कामाच्या ठिकाणी एखादा महत्त्वाचा निर्णय घेण्याआधी उपलब्ध असणारी माहिती आणि ज्ञान तपासून बघतो आणि मग निर्णय घेतो, तसं व्यक्तिगत पातळीवर एखादा निष्कर्ष काढताना आपण आपली माहिती, ज्ञान आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे आपल्या समजुती आपल्याला वारंवार तपासून बघायला हव्यात. आपल्याच समजुतींना प्रश्न केले पाहिजेत. माझ्या काही समजुती तर्कविसंगत (Irrational) असतील तर त्या मला बदलायलाही हव्यात. जसं इतरांबद्दलच्या तर्कविसंगत समजुती असू शकतात तशा त्या माझ्या स्वतःबद्दलच्या देखील असू शकतात. माझ्या समजुतींमध्ये मी आवश्यक ते बदल केले तर आपोआप अंतिम निष्कर्षही बदलेल- आणि तेसुद्धा पहिल्या टप्प्यातला प्रत्यक्ष प्रसंग न बदलता! अरेच्चा, किती सोपं झालं ना सगळं!? पहिल्या टप्प्यामध्ये असणारा प्रसंग माझ्या हातातला नाही. पण तरीही मला मानसिक त्रास होत असेल तर दुसऱ्या टप्प्यावर मला तर्कशुद्ध समजुती बाळगल्या पाहिजेत. म्हणजे मग तिसऱ्या टप्प्यावर माझा मलाच होणारा त्रास मला टाळता येतो.

अरेंज्ड मॅरेजबाबत तर चांगलाच गोंधळ मनात असतो अनेकांच्या. मध्ये आमच्या एका गप्पांच्या कार्यक्रमाच्या वेळी एक मुलगी म्हणाली, “केवढी भयानक आहे ही प्रक्रिया. मला तर वेबसाईट उघडावी असंच वाटत नाही. आणि आई-बाबा तर सतत मागे लागलेत मुलं बघ, मुलं बघ म्हणत.”, त्यावर मी म्हणलं की मुलांना भेट तरी. बघ भेटून काय वाटतंय. आताच्या काळात एकदा भेट झाली की लगेच लग्न, असं नसतं. तुम्ही अनेकदा भेटू शकता, एकमेकांना थोडं जाणून घेण्याची संधी घेऊ शकता. त्यावेळी ती हो म्हणाली खरी, पण मनातून काय तिला पटलं नव्हतं. आणि मग जरा वेळाने म्हणाली, “सगळा दोष आपल्या सिस्टीमचा आहे. आपल्याकडेपण डेटिंग कल्चर वगैरे असतं तर या फंदातच पडावं लागलं नसतं मला”. पुढे जाऊन ही आता पंतप्रधानांनापण दोषी ठरवणार की काय असा गंमतीदार विचार माझ्या मनात येऊन गेला! विनोदाचा भाग जाऊ द्या, पण काय घडलं इथे? ‘अरेंज्ड मॅरेज ही पद्धत भयानक आहे, डेटिंग वगैरे पद्धतच खरी योग्य या आशयाचं गृहीतक तिच्या मनात होतं.  या भयानक अवस्थेतून जावं लागतंय मला, कारण म्हणजे ही सिस्टीम, असा निष्कर्ष तिने काढला देखील! लग्न ठरवण्याच्या प्रक्रियेत असणारे पालक आणि त्यांची मुलं-मुली यांच्याशी बोलताना मला जाणवतं की ते सतत खूप साऱ्या भावनिक आंदोलनांमधून जात असतात. रोलर कोस्टर राईडच असते ती एक. नकार न येणे, उत्तरं न मिळणे, हवा तसा प्रतिसाद न मिळणे, लग्न ठरण्याच्या प्रक्रियेला अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागणे वगैरे वगैरे. परंतु अशा प्रसंगांमध्ये आपल्याच मनातल्या समजुतींच्या आधारे भलतेच निष्कर्ष काढून घेऊन स्वतःची मनःशांती ढळेल, असं वागणं काय शहाणपणाचं नाही म्हणता येणार. माझ्या भावना, माझा आनंद, माझी मनःशांती ही माझ्याच हातात आहे, दुसऱ्या कोणाच्याही नाही, हे समजून घेत सुरुवात केली तर गोष्टी बऱ्याच सोप्या आणि आनंददायी होतील. मग, करूयात प्रयत्न?!

(दि. १९ मे २०१८ रोजी प्रकाशित महाराष्ट्र टाईम्सच्या मैफल पुरवणीत प्रसिद्ध) 

Saturday, May 5, 2018

अहंगंडाचं करायचं तरी काय?मध्यंतरी एका लग्नाला उभ्या असणाऱ्या मुलीचे वडील मला भेटायला आले होते. मला म्हणाले, “कानिटकर, तुम्हाला सांगतो, एकदम भुक्कड लोक आम्हाला अप्रोच करतात. म्हणजे ज्यांच्याकडे माझी मुलगी ढुंकूनही बघणार नाही अशी मुलं इंटरेस्ट रिक्वेस्ट पाठवतात.”, त्यांच्या बोलण्याच्या स्वरांतून,चेहऱ्यावरच्याहावभावातून,देहबोलीतून इतरांबद्दलची तुच्छता आणि स्वतःबद्दलची, विशेषतः आपल्या मुलीबद्दलची, श्रेष्ठ असण्याची भावना ओसंडून वाहात होती. लग्नासाठी जोडीदार निवडीच्या प्रवासात आपल्याला अनुरूप असा जोडीदार निवडण्याचा विचार करणं यात काहीच गैर नाही. माझ्या अपेक्षा अमुक अमुक आहेत, आणि त्यात न बसणारीस्थळं मला येत आहेत अशा आशयाचं बोललं गेलं असतं तर ते समजण्यासारखं होतं. कारण ते झालं परिस्थितीनुसार आणि गरजेनुसार केलं गेलेलं विश्लेषण (analysis). पण आम्ही काही निकष आम्ही ठरवले आहेत आणि त्यात न बसणारी सगळी मंडळी भुक्कड आहेत या न्यायाधीश बनून निवाडा द्यायच्या (judgemental) मानसिकतेचं करायचं काय? एवढा पराकोटीचा अहंगंड नेमका येतो कुठून?

लग्नासाठी जोडीदार निवडण्याच्या प्रक्रियेत स्थळ/घराणं तोलामोलाचं असावं असं म्हणण्याची एक मध्ययुगीन पद्धत आहे. मध्ययुगात उत्पन्नमानमरातब, घराणं (म्हणजे बहुतांशवेळा जातीनुसार असणारी उच्चनीचता), जमीनजुमला एवढ्या काही मोजक्या गोष्टी बघितल्या म्हणजे एखादं स्थळ तोलामोलाचं आहे किंवा नाही याचा फैसला होत असे.  गंमतीचा भाग असा की यात फार फरक पडलाय असं मला वाटत नाही. काळानुसार त्यात शिक्षणासारख्या गोष्टीची भर पडली आहे, पण मूलभूत मानसिकता बदललेली नाही. ठरलेल्या निकषांमध्ये न बसणारी मंडळी ही हीन दर्जाची आहेत,तुच्छ आहेत, आणि मी या निकषांमध्ये बसणारी व्यक्ती असल्याने अर्थातच श्रेष्ठ आहे, जगातल्या सर्वोत्तम गोष्टी मिळण्यासाठी पात्र आहे (I deserve the best) आणि म्हणूनच इतर तुच्छ जगाने माझं ऐकावं- त्यातच जगाचं भलं आहे’, अशी सगळी विचारांची साखळी निर्माण होते. आणि अशी सगळी विचारधारा असेल तर जोडीदार मिळणं तर कठीण आहेच, पण मिळाल्यावर ते नातं टिकवणं आणि फुलवणं अजूनच कठीण आहे. कारण अशावेळी,नात्यांत गरजेची असणारी अत्यंत महत्त्वाची गोष्ट हरवलेली असू शकते आणि ती म्हणजे परस्परांबद्दलचा आदर.

अमिताभ बच्चन किंवा सचिन तेंडूलकर या मंडळींबद्दल आपल्याला अनेकदा ऐकायला मिळतं की, हे आपापल्या क्षेत्रात इतके महान असले तरी, एखाद्या नवख्या अभिनेत्याला किंवा खेळाडूला अतिशय आदराने आणि आपुलकीने वागवतात. समाजाच्या दृष्टीने ठरलेल्या निकषांनुसार अतिशय श्रेष्ठ असणाऱ्या अशा मंडळींकडूनही प्रत्येक माणसाला माणूस म्हणून आदराने वागवण्याची उदाहरणं दिसतात तेव्हा इतरांकडून असं का बरं होत नाही हा प्रश्न पडतोच पडतो.मला वाटतं या सगळ्यामागे कदाचित, एक फार महत्त्वाचा स्वभावगुण कुठेतरी मागे पडलेला असणं हे कारण असावं. आणि तो स्वभावगुण म्हणजे कुतूहल. या कुतूहल नावाच्या किड्याला आपण आपल्या मनात विकसितच होऊ देत नाही की काय असा मला प्रश्न पडतो. पु.लं.च्या एका लेखनात त्यांनी याला गप्प बसा संस्कृती म्हणलंय. इतर माणसांबद्दल, त्यांच्या जगण्याबद्दल, त्यांच्या विचारांबद्दल, त्यांच्या भावनांबद्दल, त्यांना आलेल्या अनुभवांबद्दल जाणून घ्यावं हे कुतूहल असलं पाहिजे. जगाच्या एका कोपऱ्यात आयुष्यातला बहुतांश काळ काढत, अगदी मोजक्या मंडळींशी नेमाने संवाद साधत, ठराविक परिघातल्या प्रसिद्धी माध्यमांचा आस्वाद घेत आपल्या इंद्रियांच्या क्षमतेनुसार आपण अनंत प्रकारची माहिती गोळा करत असतो. आणि आपल्या मेंदूच्या क्षमतेनुसार त्याचा अर्थ लावत असतो. आणि हे जे काही आपण आपलं मत तयार करायला वापरतो, ते जगातल्या एकूण माहिती, अनुभव, घटना, ज्ञान या सगळ्याच्या समुद्रातला एखादा थेंब आहे फक्त. अशावेळी कोणतीही आवश्यकता नसताना, हातात न्यायाधीशाचा हातोडा घेऊन समोर येणाऱ्या व्यक्ती आणि घटनांचा निवाडा करण्याचं ओझं आपण स्वतःहूनच कशासाठी घेतो? एकदा ते ओझं घेतलं की मी श्रेष्ठ आहे ही भावना फुलू लागते, एखाद्या अधिकाराच्या पदाच्या खुर्चीत बसलेल्या माणसाचा अहंभाव फुलावा तशी. न्यायाधीशाच्या भूमिकेत गेल्यावर कशाला चूक-बरोबर म्हणायचं याचे नेमके निकष ठरवणं गरजेचं असतं. आणि मग आपण ज्या निकषांवर सर्वोत्तम ठरू असे निकष तेवढे योग्य असं म्हणत आपण निवाडे द्यायला सुरुवात करतो. आणि त्यातून भुक्कड माणसं आम्हाला अप्रोच करतात यासारखी वक्तव्य बाहेर येतात.

लग्नाकडे, जोडीदार निवडण्याकडे खरंतर खूप वेगळ्या पद्धतीने बघायची गरज आहे. लग्न ही गोष्ट दोन्ही व्यक्तींनी, दोन्ही कुटुंबांनी एकमेकांना विचार आणि अनुभव यांनी समृद्ध करणारी बनायला हवी. आणि त्यासाठी किमान कुतूहलाने एकमेकांकडे बघण्याची गरज आहे. मी माझ्या क्षमतेनुसार जे श्रेष्ठत्वाचे निकष ठरवले आहेत त्या पलीकडे जाऊनही समोरच्या मंडळींमध्ये देण्यासारखं बरंच काही असू शकतं याची जाणीव ठेवून तसा शोध घेतला पाहिजे. जगात सातशे कोटीपेक्षा जास्त लोक आहेत. या प्रत्येकाचे अनुभव, विचार, त्यांना बघायला-ऐकायला मिळणाऱ्या गोष्टी (exposure), आणि या सगळ्यावरचं त्यांचं स्वतःचं अर्थ लावणं (interpretation), विश्लेषण (analysis) हे केवढं वेगवेगळं आणि अक्षरशः अद्भुत असू शकतं. प्रत्येकाचं म्हणणं आपल्याला पटेलच असं नाही, आवडेल असंही नाही. पण किमान; ते अस्तित्वात आहे, त्यामागे एक विचार आणि अनुभवांची साखळी आहे, या गोष्टी विचारांत घेत त्या व्यक्तींना आदर तर देऊ शकतो ना आपण? आणि आदर द्यायचा म्हणजे सांष्टांग नमस्कार घाला असं नव्हे. तशा दिखाव्याची गरजही नाही. पण संवादात आणि वागणुकीत किमान आवश्यक सौजन्य देखील आपल्या वागण्यात का असू नयेसुसंस्कृत समाजात सौजन्य ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. ती नसेल तर मध्ययुगीन जगातच आपण अडकलो आहोत हे समजून घ्यायला हरकत नाही.

या अहंगंडाचा एक भयानक दुष्परिणाम दिसतो जेव्हा नकार स्वीकारावे लागतात. आपण एवढे श्रेष्ठ, आपण एवढे महान आणि समोरची यःकश्चित व्यक्ती मला नाकारते म्हणजे काय?’ असा विचार करत आधी राग, मग दुसऱ्याला कमी लेखणं आणि मग नैराश्य असा प्रवास होतो. अरेंज्ड मॅरेजच्या प्रक्रियेत नकार पचवता न आल्याने नैराश्य आलेली उदाहरणं कमी नाहीत. उलट दिवसागणिक वाढतच चालली आहेत. आपल्याला हे हवंय का याचा एक समाज म्हणून विचार करायला हवा. न्यायाधीशाच्या भूमिकेत न जाता स्वच्छ मनाने, खुल्या मेंदूने व्यक्तींकडे बघायला हवं. कोणत्याही निर्णयप्रक्रियेत घ्यावी लागणारी विश्लेषक ही भूमिका आणि निवाडा देणाऱ्या न्यायाधीशाची भूमिका यातली पुसट रेषा समजून घ्यायला हवी. एका सौजन्यपूर्ण समाजासाठी हे आवश्यक आहे. जमेल ना आपल्याला?!

या सगळ्या चर्चेच्या निमित्ताने गॉडफादरमधलं एक वाक्य आठवलं-कॉन्फिडन्स इज सायलेंटइन्सिक्युरीटी इज लाऊड. माझ्या अहंगडाच्या मागे कुठेतरी मनात असणारी असुरक्षितता आहे का?

(दि. ५ मे २०१८ रोजी प्रकाशित महाराष्ट्र टाईम्सच्या मैफल पुरवणीत प्रसिद्ध)

Saturday, April 21, 2018

एकमेव विरुद्ध अद्वितीय


अगदी परवाच आमच्या मुंबईच्या गप्पांच्या कार्यक्रमांत मी मुलामुलींशी बोलत होतो. तेव्हा एक मुलगी म्हणाली, “आजकालची मुलं फार पझेसिव्ह आहेत”, त्यावर दुसरा मुलगा म्हणाला, “मुली काय कमी पझेसिव्ह आहेत असं नाहीये”. पुढे मग चर्चा वेगवेगळ्या विषयांवर गेली पण हा मुद्दा कुठेतरी माझ्या डोक्यात राहिला. “ती अमुक आहे तिचा बॉयफ्रेंड फार पझेसिव्ह आहे, तिने इतर कोणत्याही मुलाशी जरा जास्त बोललेलं त्याला अजिबात चालत नाही”, “त्या तमुक तमुकची गर्लफ्रेंड इतकी पझेसिव्ह आहे की ती त्याचा मोबाईल चेक करते नेहमी.” वगैरे वगैरे पद्धतीचे संवाद नेहमी ऐकायला मिळतात. एकुणात समोरची व्यक्ती ही सर्वार्थाने फक्त माझी असली पाहिजे, असा अट्टाहास असतो. रोमँटिक अर्थाने प्रेमाच्या नात्यांत असणारी मंडळी एकमेकांकडून आपण एकमेकांसाठी एक्स्क्लुझिव’ , म्हणजे एकमेव असलं पाहिजे अशी अपेक्षा ठेवतात. ही एक्स्क्लुझिव्हिटी, मराठीत याला एकमेवता म्हणूया, नेमकी कोणत्या पातळीपर्यंत ताणायची आणि ते कोणी ठरवायचं, हा खरा गंमतीचा मुद्दा आहे.

बौद्धिक, भावनिक, शारीरिक आणि भौतिक अशा कोणत्या बाबतीत कोणत्या पातळीपर्यंत एकमेकांबरोबर एकमेव असणं हवं आहे आणि कोणत्या बाबतीत नसेल तरी चालेल याची नेमकी यादी करायला सांगितली तर चांगलीच गडबड उडेल बहुतेकांची. आणि जसजसं आपण यात खोलात जायला लागू, तसतसं चक्रव्युहात अडकल्यासारखं व्हायला लागेल. याचं कारण असं की आपली एकमेवतेची मागणी ही आपली सहजप्रवृत्ती नसून, वेगवेगळ्या सामाजिक बंधनांतून, समजुतींमधून आली आहे. काळ आणि परिस्थितीनुसार यात बदलही होत जातात. ढोबळपणे बोलता, शारीरिक बाबतीत या एकमेव असण्याला आपल्या समाजात सर्वात जास्त महत्त्व आहे. पण त्याही विषयात एकमेकांसाठी एकमेव असण्याची मर्यादा कशी ठरवावी हा गोंधळाचाच मुद्दा आहे. उदाहरणच द्यायचं तर काही लोकसमूहांमध्ये, स्त्रियांनी स्वतःचा चेहरा आणि सर्वांग झाकून ठेवलं पाहिजे अशी मागणी होते. याचाच अर्थ तिचं शरीर नुसतं दिसण्याच्या बाबतीत सुद्धा फक्त तिच्या पतीसाठी आहे. एकमेवतेची पातळी बदलत जाते ती अशी. कदाचित वेगवेगळ्या गावांत-शहरांत ती वेगळी असेल. वेगवेगळ्या आर्थिक-सामाजिक वर्गांत ती वेगळी असेल. अर्थातच ती नैसर्गिक नाही, माणसाची सहजप्रवृत्ती नाही, तर उलट आपणच बनवलेली गोष्ट आहे. आणि आपण बनवलेली गोष्ट गरजेनुसार बदलता येते, बदलायला हवी.

माणसा-माणसांतल्या संबंधांमध्ये आणि एकूणच समाजाच्या दृष्टीकोनात आलेली मोकळीक बघता कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यात अनेक सम किंवा भिन्नलिंगी व्यक्ती महत्त्वाच्या किंवा जवळच्या असणं अशक्य नाही, अयोग्य तर नाहीच नाही. या वास्तवाच्या पार्श्वभूमीवर एकमेवतेची संकल्पना तपासून बघायला हवी. रोमँटिक अर्थाने असणाऱ्या प्रेमाच्या नात्यात आपण आपल्या जोडीदाराच्या दृष्टीने एकमेव असावं आणि जे काही उपलब्ध असतील ते सगळे स्त्रोत (वेळ, पैसा, ऊर्जा वगैरे) एकमेकांसाठीच खर्च करावेत अशी एक संकल्पना रूढ आहे. यामुळे होतं इतकंच की एकमेवता ही गोष्ट नकारात्मक बनते. कुठलीतरी बंधनं घालणारी बनते, सीमा रेषा ठरवणारी बनते. हळूहळू ते लोढणं बनू लागतं. आणि वर उल्लेखलेल्या बदललेल्या वास्तवाच्या पार्श्वभूमीवर ते अधिकच प्रकर्षाने जाणवतं. घटस्फोट, नात्यांत घुसमटल्यासारखं वाटणं, लपून छपून विवाहबाह्य संबंध या सगळ्या गोष्टी वाढल्या आहेत असं सांगणारी अनेक सर्वेक्षणं आणि अहवाल वाचायला मिळतात. याच्या कारणमीमांसेत गेल्यास, इतर कारणांबरोबर जुन्या जगातला आणि आजही अस्तित्वात असणारा एकमेवतेचा कालबाह्य आग्रह हे कारणही ठसठशीतपणे समोर येईल.

ज्या अर्थी एकमेवतेचं माणसाला एवढं सहज आकर्षण वाटतं त्या अर्थी त्यात काहीतरी असं असणार जे माणसाला हवंहवंसं वाटतं. काय असेल ते? मला वाटतं, ‘समोरच्याच्या आयुष्यात मी कोणीतरी महत्त्वाची व्यक्ती आहे आणि त्यामुळे माझ्या जगण्याला असणाऱ्या अर्थात भर पडते आहे हा विचार माणसाला उत्कटतेने जगायची ऊर्जा देत असावा. आपण सातत्याने आपल्या जगण्याला काय अर्थ आहे हे शोधत असतो. हजारो वर्ष आपण हे शब्दात बांधायचा प्रयत्न करतोय. वेगवेगळ्या धर्मांनी, विचारवंतांनी आपापल्या परीने माणसाच्या जगण्याला अर्थ द्यायचा प्रयत्न केलाय. आपण आपल्या पातळीवरसुद्धा वेगवेगळे अर्थ शोधत असतो. त्याच प्रयत्नांतून नात्यांमध्ये समोरच्याच्या आयुष्यातली महत्त्वाची असणारी भूमिका मी पार पाडत असल्याने माझ्या जगण्याला काही एक अर्थ आहे या निष्कर्षाला आपण येऊन पोचतो बहुतेक. आणि समोरच्याच्या आयुष्यात आपल्याला महत्त्व आहे किंवा नाही हे बघण्यासाठी आपण अगदी सोपा मार्ग निवडला- एकमेवता. या मार्गाला आपण आजवर अवास्तव महत्त्व दिलंय. त्यामुळे डीअर जिंदगी मधला कौन्सेलर असणारा शाहरुख खान वेगवेगळ्या गरजा वेगवेगळ्या व्यक्तींकडून आपण पूर्ण करून घेण्यात चूक नाही अशा आशयाचं बोलतो तेव्हा मनातून आपल्याला ते पटलं तरी, प्रत्यक्षात ते अंमलात आणायला आपण कचरतो. नैतिक फुटपट्टी आड येते. एकमेवतेच्या तत्त्वाला सोडायचं कसं, असं वाटतं.

नात्यांमध्ये, एकमेकांच्या आयुष्यात असणारं महत्त्व तपासण्यासाठी त्यातली एकमेवता (एक्स्क्लुझिव्हिटी) बघण्यापेक्षा मला वाटतं अद्वितीयता (युनिकनेस) बघणं, हा जास्त योग्य मार्ग आहे. कदाचित तो अवघड आहे आणि म्हणूनच दुर्लक्षित असावा. या लेखमालेतल्या अगदी पहिल्या लेखांत आपण नातं म्हणजे काय याची चर्चा केली होती. नातं म्हणजे सामायिक अनुभव (शेअर्ड एक्स्पीरियंस). दोन व्यक्ती एकमेकांबरोबर जसजसे सामायिक अनुभव निर्माण करत जातील तितकं त्यांच्यातलं नातं घट्ट आणि अद्वितीय होत जाईल. हे अनुभव फक्त त्या दोघांचे असतील. यात व्यक्तीबद्दलचा एकमेवतेचा आग्रह नसून, ‘अनुभवांच्या एकमेवतेतून नातं अद्वितीय बनतं. आणि यातूनच अर्थात दुसऱ्याच्या आयुष्यात मी महत्त्वाची व्यक्ती आहे हा विश्वास आपण आपल्या मनात निर्माण करू शकतो, जो आपल्या जगण्याच्या अर्थामध्ये भर टाकतो. आणि हे सगळं फक्त रोमँटिक अर्थ लावलेल्या नात्यांतच लागू होतं असं नव्हे तर कोणत्याही नात्यांत होतं. काही वेळा सुरुवातीला आपण एकमेवतेपेक्षा आपोआप अद्वितीयतेला महत्त्व देतो. पण तिथेही एकमेवतेचा आग्रह येऊ लागला तर गडबड होतेच. उदाहरणार्थ जसजशी आपली मैत्री एखाद्या व्यक्तीबरोबर घट्ट होऊ लागते तसतसं आपल्या मित्र/मैत्रिणीच्या आयुष्यात माझ्या असण्याचं महत्त्व काय आहे हा प्रश्न आपल्याच मनात टोकदार बनू लागतो. आणि मग आपण नकळतच एकमेवतेचा आग्रह धरू लागतो. हे फक्त भिन्नलिंगी व्यक्तींमध्येच घडतं असं मुळीच नव्हे. ते मैत्रीत घडतं, तसं पालक-मुलांमध्येही घडतं. कित्येक पालकांना आपल्या मुला-मुलींच्या लग्नानंतर त्यांच्या आयुष्यात एक नवीन व्यक्ती पालकांइतकीच किंवा त्यांच्याहून जास्त महत्त्वाची आहे हे वास्तव स्वीकारणं कठीण जातं.

या एकमेवतेच्या नादात, एकमेवतेतून येणाऱ्या बंधनांमुळे नाती खराब होतात. खरंतर प्रेमाच्या माणसांच्या बाबतीत होतं असं की, आपल्या आयुष्यात असणाऱ्या त्यांच्या असणाऱ्या वेगळ्या भूमिकेमुळे, वेगळ्या योगदानामुळे आणि अर्थातच वेगळ्या सामायिक अनुभवांमुळे, त्या प्रत्येकाबरोबर आपण अद्वितीय- युनिक नातं निर्माण करत असतो. त्याकडे दुर्लक्ष करून, एक प्रकारे त्या अद्वितीयतेचा अनादर करून, एकमेवतेचा हट्ट करणं नक्कीच फारसं शहाणपणाचं नाही!

(दि. २१ एप्रिल २०१८ रोजी प्रकाशित महाराष्ट्र टाईम्सच्या मैफल पुरवणीत प्रसिद्ध)