Saturday, April 21, 2018

एकमेव विरुद्ध अद्वितीय


अगदी परवाच आमच्या मुंबईच्या गप्पांच्या कार्यक्रमांत मी मुलामुलींशी बोलत होतो. तेव्हा एक मुलगी म्हणाली, “आजकालची मुलं फार पझेसिव्ह आहेत”, त्यावर दुसरा मुलगा म्हणाला, “मुली काय कमी पझेसिव्ह आहेत असं नाहीये”. पुढे मग चर्चा वेगवेगळ्या विषयांवर गेली पण हा मुद्दा कुठेतरी माझ्या डोक्यात राहिला. “ती अमुक आहे तिचा बॉयफ्रेंड फार पझेसिव्ह आहे, तिने इतर कोणत्याही मुलाशी जरा जास्त बोललेलं त्याला अजिबात चालत नाही”, “त्या तमुक तमुकची गर्लफ्रेंड इतकी पझेसिव्ह आहे की ती त्याचा मोबाईल चेक करते नेहमी.” वगैरे वगैरे पद्धतीचे संवाद नेहमी ऐकायला मिळतात. एकुणात समोरची व्यक्ती ही सर्वार्थाने फक्त माझी असली पाहिजे, असा अट्टाहास असतो. रोमँटिक अर्थाने प्रेमाच्या नात्यांत असणारी मंडळी एकमेकांकडून आपण एकमेकांसाठी एक्स्क्लुझिव’ , म्हणजे एकमेव असलं पाहिजे अशी अपेक्षा ठेवतात. ही एक्स्क्लुझिव्हिटी, मराठीत याला एकमेवता म्हणूया, नेमकी कोणत्या पातळीपर्यंत ताणायची आणि ते कोणी ठरवायचं, हा खरा गंमतीचा मुद्दा आहे.

बौद्धिक, भावनिक, शारीरिक आणि भौतिक अशा कोणत्या बाबतीत कोणत्या पातळीपर्यंत एकमेकांबरोबर एकमेव असणं हवं आहे आणि कोणत्या बाबतीत नसेल तरी चालेल याची नेमकी यादी करायला सांगितली तर चांगलीच गडबड उडेल बहुतेकांची. आणि जसजसं आपण यात खोलात जायला लागू, तसतसं चक्रव्युहात अडकल्यासारखं व्हायला लागेल. याचं कारण असं की आपली एकमेवतेची मागणी ही आपली सहजप्रवृत्ती नसून, वेगवेगळ्या सामाजिक बंधनांतून, समजुतींमधून आली आहे. काळ आणि परिस्थितीनुसार यात बदलही होत जातात. ढोबळपणे बोलता, शारीरिक बाबतीत या एकमेव असण्याला आपल्या समाजात सर्वात जास्त महत्त्व आहे. पण त्याही विषयात एकमेकांसाठी एकमेव असण्याची मर्यादा कशी ठरवावी हा गोंधळाचाच मुद्दा आहे. उदाहरणच द्यायचं तर काही लोकसमूहांमध्ये, स्त्रियांनी स्वतःचा चेहरा आणि सर्वांग झाकून ठेवलं पाहिजे अशी मागणी होते. याचाच अर्थ तिचं शरीर नुसतं दिसण्याच्या बाबतीत सुद्धा फक्त तिच्या पतीसाठी आहे. एकमेवतेची पातळी बदलत जाते ती अशी. कदाचित वेगवेगळ्या गावांत-शहरांत ती वेगळी असेल. वेगवेगळ्या आर्थिक-सामाजिक वर्गांत ती वेगळी असेल. अर्थातच ती नैसर्गिक नाही, माणसाची सहजप्रवृत्ती नाही, तर उलट आपणच बनवलेली गोष्ट आहे. आणि आपण बनवलेली गोष्ट गरजेनुसार बदलता येते, बदलायला हवी.

माणसा-माणसांतल्या संबंधांमध्ये आणि एकूणच समाजाच्या दृष्टीकोनात आलेली मोकळीक बघता कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यात अनेक सम किंवा भिन्नलिंगी व्यक्ती महत्त्वाच्या किंवा जवळच्या असणं अशक्य नाही, अयोग्य तर नाहीच नाही. या वास्तवाच्या पार्श्वभूमीवर एकमेवतेची संकल्पना तपासून बघायला हवी. रोमँटिक अर्थाने असणाऱ्या प्रेमाच्या नात्यात आपण आपल्या जोडीदाराच्या दृष्टीने एकमेव असावं आणि जे काही उपलब्ध असतील ते सगळे स्त्रोत (वेळ, पैसा, ऊर्जा वगैरे) एकमेकांसाठीच खर्च करावेत अशी एक संकल्पना रूढ आहे. यामुळे होतं इतकंच की एकमेवता ही गोष्ट नकारात्मक बनते. कुठलीतरी बंधनं घालणारी बनते, सीमा रेषा ठरवणारी बनते. हळूहळू ते लोढणं बनू लागतं. आणि वर उल्लेखलेल्या बदललेल्या वास्तवाच्या पार्श्वभूमीवर ते अधिकच प्रकर्षाने जाणवतं. घटस्फोट, नात्यांत घुसमटल्यासारखं वाटणं, लपून छपून विवाहबाह्य संबंध या सगळ्या गोष्टी वाढल्या आहेत असं सांगणारी अनेक सर्वेक्षणं आणि अहवाल वाचायला मिळतात. याच्या कारणमीमांसेत गेल्यास, इतर कारणांबरोबर जुन्या जगातला आणि आजही अस्तित्वात असणारा एकमेवतेचा कालबाह्य आग्रह हे कारणही ठसठशीतपणे समोर येईल.

ज्या अर्थी एकमेवतेचं माणसाला एवढं सहज आकर्षण वाटतं त्या अर्थी त्यात काहीतरी असं असणार जे माणसाला हवंहवंसं वाटतं. काय असेल ते? मला वाटतं, ‘समोरच्याच्या आयुष्यात मी कोणीतरी महत्त्वाची व्यक्ती आहे आणि त्यामुळे माझ्या जगण्याला असणाऱ्या अर्थात भर पडते आहे हा विचार माणसाला उत्कटतेने जगायची ऊर्जा देत असावा. आपण सातत्याने आपल्या जगण्याला काय अर्थ आहे हे शोधत असतो. हजारो वर्ष आपण हे शब्दात बांधायचा प्रयत्न करतोय. वेगवेगळ्या धर्मांनी, विचारवंतांनी आपापल्या परीने माणसाच्या जगण्याला अर्थ द्यायचा प्रयत्न केलाय. आपण आपल्या पातळीवरसुद्धा वेगवेगळे अर्थ शोधत असतो. त्याच प्रयत्नांतून नात्यांमध्ये समोरच्याच्या आयुष्यातली महत्त्वाची असणारी भूमिका मी पार पाडत असल्याने माझ्या जगण्याला काही एक अर्थ आहे या निष्कर्षाला आपण येऊन पोचतो बहुतेक. आणि समोरच्याच्या आयुष्यात आपल्याला महत्त्व आहे किंवा नाही हे बघण्यासाठी आपण अगदी सोपा मार्ग निवडला- एकमेवता. या मार्गाला आपण आजवर अवास्तव महत्त्व दिलंय. त्यामुळे डीअर जिंदगी मधला कौन्सेलर असणारा शाहरुख खान वेगवेगळ्या गरजा वेगवेगळ्या व्यक्तींकडून आपण पूर्ण करून घेण्यात चूक नाही अशा आशयाचं बोलतो तेव्हा मनातून आपल्याला ते पटलं तरी, प्रत्यक्षात ते अंमलात आणायला आपण कचरतो. नैतिक फुटपट्टी आड येते. एकमेवतेच्या तत्त्वाला सोडायचं कसं, असं वाटतं.

नात्यांमध्ये, एकमेकांच्या आयुष्यात असणारं महत्त्व तपासण्यासाठी त्यातली एकमेवता (एक्स्क्लुझिव्हिटी) बघण्यापेक्षा मला वाटतं अद्वितीयता (युनिकनेस) बघणं, हा जास्त योग्य मार्ग आहे. कदाचित तो अवघड आहे आणि म्हणूनच दुर्लक्षित असावा. या लेखमालेतल्या अगदी पहिल्या लेखांत आपण नातं म्हणजे काय याची चर्चा केली होती. नातं म्हणजे सामायिक अनुभव (शेअर्ड एक्स्पीरियंस). दोन व्यक्ती एकमेकांबरोबर जसजसे सामायिक अनुभव निर्माण करत जातील तितकं त्यांच्यातलं नातं घट्ट आणि अद्वितीय होत जाईल. हे अनुभव फक्त त्या दोघांचे असतील. यात व्यक्तीबद्दलचा एकमेवतेचा आग्रह नसून, ‘अनुभवांच्या एकमेवतेतून नातं अद्वितीय बनतं. आणि यातूनच अर्थात दुसऱ्याच्या आयुष्यात मी महत्त्वाची व्यक्ती आहे हा विश्वास आपण आपल्या मनात निर्माण करू शकतो, जो आपल्या जगण्याच्या अर्थामध्ये भर टाकतो. आणि हे सगळं फक्त रोमँटिक अर्थ लावलेल्या नात्यांतच लागू होतं असं नव्हे तर कोणत्याही नात्यांत होतं. काही वेळा सुरुवातीला आपण एकमेवतेपेक्षा आपोआप अद्वितीयतेला महत्त्व देतो. पण तिथेही एकमेवतेचा आग्रह येऊ लागला तर गडबड होतेच. उदाहरणार्थ जसजशी आपली मैत्री एखाद्या व्यक्तीबरोबर घट्ट होऊ लागते तसतसं आपल्या मित्र/मैत्रिणीच्या आयुष्यात माझ्या असण्याचं महत्त्व काय आहे हा प्रश्न आपल्याच मनात टोकदार बनू लागतो. आणि मग आपण नकळतच एकमेवतेचा आग्रह धरू लागतो. हे फक्त भिन्नलिंगी व्यक्तींमध्येच घडतं असं मुळीच नव्हे. ते मैत्रीत घडतं, तसं पालक-मुलांमध्येही घडतं. कित्येक पालकांना आपल्या मुला-मुलींच्या लग्नानंतर त्यांच्या आयुष्यात एक नवीन व्यक्ती पालकांइतकीच किंवा त्यांच्याहून जास्त महत्त्वाची आहे हे वास्तव स्वीकारणं कठीण जातं.

या एकमेवतेच्या नादात, एकमेवतेतून येणाऱ्या बंधनांमुळे नाती खराब होतात. खरंतर प्रेमाच्या माणसांच्या बाबतीत होतं असं की, आपल्या आयुष्यात असणाऱ्या त्यांच्या असणाऱ्या वेगळ्या भूमिकेमुळे, वेगळ्या योगदानामुळे आणि अर्थातच वेगळ्या सामायिक अनुभवांमुळे, त्या प्रत्येकाबरोबर आपण अद्वितीय- युनिक नातं निर्माण करत असतो. त्याकडे दुर्लक्ष करून, एक प्रकारे त्या अद्वितीयतेचा अनादर करून, एकमेवतेचा हट्ट करणं नक्कीच फारसं शहाणपणाचं नाही!

(दि. २१ एप्रिल २०१८ रोजी प्रकाशित महाराष्ट्र टाईम्सच्या मैफल पुरवणीत प्रसिद्ध)

Saturday, April 7, 2018

गरज, सोय, चैन इत्यादी.

मी लहान असताना, बालभवनमध्ये शोभाताईंनी (भागवत) एक उपक्रम घेतला होता. गंमत जत्रा का असं काहीतरी नाव होतं बहुतेक. नेमकं आठवत नाही. त्या जत्रेत खोटे पैसे आणि खोट्या गोष्टी मांडल्या होत्या. आम्हा लहान मुलांमधील काही मंडळी दुकानदार होती, तर काही माझ्यासारखी गिऱ्हाईक. प्रत्येक गिऱ्हाईकाला एक टोपली आणि ठराविक रक्कम दिली होती. आणि त्या जत्रेत गिऱ्हाईकाने आपल्या घरासाठी खरेदी करायची होती. सगळे पैसे संपवलेच पाहिजेत असं बंधन नव्हतं. मी मात्र झटपट माझी सगळी खरेदी करून हातातले पैसे संपवले. सगळ्या विकत घेतलेल्या गोष्टी टोपलीत ठेवून आता पुढे काय याची वाट बघू लागलो. सगळ्यांची खरेदी संपल्यावर मग आम्हाला एक यादी दिली गेली. कुठल्या वस्तू गरज या वर्गात मोडतात, कुठल्या सोय या वर्गात आणि कुठल्या चैन या प्रकारात मोडतात ते त्या यादीत लिहिलं होतं. आणि मग आम्ही विकत घेतलेल्या वस्तू त्यानुसार बघायच्या होत्या. त्यावर किती पैसे खर्च केले हे बघायचं होतं. मी घेतलेल्या ८-१० गोष्टींपैकी केवळ एकच गोष्ट गरज मधली होती. एखाद-दोन सोय म्हणता येईल अशा गोष्टी होत्या आणि बाकी सगळ्या गोष्टी या चैनीच्या होत्या. बहुतांश पैसे मी त्यावरच खर्च केले होते. प्रत्येक गिऱ्हाईकाने आपापली खरेदीची यादी अशी गरज-सोय-चैनमध्ये विभागून वाचून दाखवली. काहींनी तर केवळ सोयीच्या गोष्टी खरेदी केल्या होत्या, काहींनी बऱ्यापैकी समतोल साधला होता, काहींनी पैसे वाचवले होते तर सोयीला अनेकांनी प्राधान्य दिलं होतं. इथे तो खेळ संपला. आम्हाला कोणीही तुम्ही काय करायला हवं होतं या आशयाचं भाषण दिलं नाही. पण या खेळाचा माझ्यावर खूप परिणाम झाला. आजही आहे. कोणती गोष्ट ही आपली गरज आहे, सोय आहे आणि चैन आहे याचा विचार नकळतच माझ्या मनात येऊन जातोच जातो.

हे सगळं आठवण्याचं कारण म्हणजे आपला जोडीदार निवडताना ज्या अवास्तव अपेक्षा ठेवल्या जातात त्यामुळे होणारे घोळ. आपल्या नेमक्या गरजा कोणत्या, कोणत्या गोष्टी असल्याने सोय होणार आहे आणि कोणत्या गोष्टी म्हणजे चैन आहेत याचा विचार करायलाच हवा. मध्यंतरी एक मुलगी आमच्या ऑफिसला मला भेटायला आली होती. तिला असा मुलगा जोडीदार म्हणून हवा होता की जो कल्याणीनगर-कोरेगावपार्क इथेच राहणारा असेल. मी ही अपेक्षा ऐकून थोडासा चक्रावलो. या अपेक्षेमागेचं काय कारण असं विचारल्यावर ती म्हणाली की ती राहते कल्याणीनगरला, तिचं ऑफिस नगर रोडला. त्यामुळे ऑफिसला जायला दहा मिनिटांपेक्षा जास्त वेळ तिला लागत नाही. आणि हेच लग्नानंतरही व्हायला हवंय. मला या उत्तरानंतर खरंतर हसू आलं. मी तिला विचारलं, “असं मानूया की तुझ्या अपेक्षेनुसार तुला नवरा मिळाला, आणि नंतर मग तुझ्या कंपनीने तुझं ऑफिस हिंजवडीला नेलं, तर मग तू काय करणार? नोकरी बदलणार, घर बदलणार की नवरा बदलणार?”. त्यावर ती चांगलीच विचारांत पडली, आणि म्हणाली, “मी या गोष्टीचा कधी विचारच नव्हता केला!”. हे उदाहरण अपवाद वाटेल. पण अशी कितीतरी उदाहरणं बघण्यात येतात. मुंबईत लोकलच्या वेस्टर्न लाईनवर राहणारी मुलगी सेन्ट्रल लाईनवरच्या ठिकाणी लग्न करून जायला तयार नसते या विषयावर एका टीव्ही चॅनेलने कार्यक्रम केला होता! हे केवळ मुलींच्याच नव्हे तर मुलांच्या बाबतीतही लागू होतंच. आपल्या आईने ज्या पद्धतीने कुटुंब-नोकरी-स्वयंपाक असं सगळं सांभाळलं तसंच आपल्या बायकोनेही करावं अशी नव्वदीच्या दशकातली मानसिकता अनेक मुलांची आजही आहे, ही मला त्यांच्याशीच बोलून बोलून समजलेली गोष्ट आहे.

या आणि अशा अनेक अपेक्षांच्या मागे कारण आहे ते म्हणजे स्वतःचा कम्फर्ट झोन कधीही न सोडण्याची इच्छा. आपल्या सगळ्यांचे आपापले कम्फर्ट झोन तयार होत असतात. घरात, ऑफिसमध्ये, मित्र-मंडळींमध्ये वगैरे. हळूहळू या कम्फर्ट झोन मध्ये असणाऱ्या चैनीच्या गोष्टी पटकन सोयवाल्या कॉलममध्ये उड्या मारतात आणि सोय मधल्या गोष्टी गरजेमध्ये सरकतात. अशाप्रकारे सगळ्या गोष्टी गरजेच्या कॉलममध्ये गेल्या की आपल्याला ची बाधा होते. म्हणजे आपल्या सगळ्या अपेक्षांना लावणे. “माझा होणारा नवरा महिन्याला एक लाख रुपये कमावणारा असला पाहिजे.”, “माझ्या बायकोने घरात स्वयंपाक केला पाहिजे.”, वगैरे वगैरे. अपेक्षांना लागू लागला की त्या अपेक्षा न राहता मागण्या बनू लागतात. मागण्यांचे डोंगर वाढले की जोडीदार शोधणं कठीण बनू लागतं. आणि साहजिकच आहे ना, आपला कम्फर्ट झोन जसाच्या तसा ठेवून कसं बरं नवीन नातं निर्माण करता येईल? अगदी मैत्रीतसुद्धा ते होत नाही.
जोडीदार निवडताना, अपेक्षा ठरवताना, आपण काय बोलतो ते ऐकलं पाहिजे. आणि आपल्या बोलण्याकडे कान देऊन, आणि मेंदूचे दरवाजे उघडे ठेवून ऐकलं तर गरज-सोय-चैन याची वर्गवारी करणं खूप सुटसुटीत होईल. गरज-सोय-चैन नुसार आपलं बोलणं कसं बदलेल याचं हे एक उदाहरण-
·         गरज – या गोष्टी अगदी आवश्यक आहेत.
·         सोय – या गोष्टी असतील तर जरा बरं पडेल.
·         चैन- या गोष्टी असतील तर किती छान!/ किती मस्त!


जोडीदार निवडीबाबत आपल्या अपेक्षांचं असं वस्तुनिष्ठपणे विश्लेषण करत गेलो तर लागतील अशा गोष्टी फार थोड्या आहेत हे आपलं आपल्यालाच कळत जातं. जरा बरं पडेल या सोयीकडे नेणाऱ्या शब्दांमध्ये तडजोडीची संधी असते. उदाहरणार्थ अमुक अमुक असेल तर जरा बरं पडेल, पण नसेल तरीही हरकत नाही, कारण इतर या या गोष्टी आहेत की!. चैनीच्या गोष्टी तर बोनस असतात. बाकी सगळं जुळतंय, जमतंय आणि त्यात हे पण आहे तर किती मस्त!. या गरजा-सोयी-चैन कोणत्या आहेत आणि त्या का आहेत याचा आपण विचार करत गेलो की यातल्या कोणत्या गरजा-सोयी-चैन या पूर्ण करण्यासाठी आपण स्वतः समर्थ आहोत आणि कोणत्यासाठी इतर व्यक्तींवर आपण अवलंबून आहोत हेही उलगडत जातं. खरंतर प्रेमात पडून लग्न करणारे हे सगळं त्यांच्याही नकळत मनातल्या मनात करतच असतात. अरेंज्ड मॅरेजच्या बाबतीत मात्र सगळ्या गोष्टी गरजेच्या कॉलममध्ये ढकलण्याची आपल्याला घाई होते. हे टाळलं पाहिजे. वस्तुनिष्ठपणे (rationally) विचार करत हे टाळलं तर मुला-मुलींचा आणि त्याहून जास्त त्यांच्या पालकांचा लग्न ठरवण्याच्या प्रक्रियेतला ताण बऱ्याच प्रमाणात कमी होईल. एक महत्त्वाची गोष्ट अशी की आजची एखादी गरजेची गोष्ट उद्या चैन या कॉलममध्ये किंवा उलटं, असा प्रवास असू शकतो. त्यामुळे कोणतीच यादी ही कोणाच्याच आयुष्यात अपरिवर्तनीय नाही. म्हणून वर उल्लेख केलेला वस्तुनिष्ठ विचार एकदाच करून सोडून द्यायचा नाही, तर दर काही काळाने तो करत राहायचा. ही यादी वारंवार तपासून बघायची.

हे केवळ लग्न ठरवण्याच्या बाबतीतच लागू होतं असं नव्हे, आपल्या रोजच्या आयुष्यातल्या इतरही बाबतीत गरज, सोय आणि चैन याबाबत सजगपणे विचार करण्याची सवय आपण स्वतःला लावून घेतली तर, आपलं आयुष्य अधिक आनंददायी बनू शकेल, असा माझा विश्वास आहे. अवघड वाटत असेल तर ही सवय लावून घेणं हे आधी आपण सोय या कॉलममध्ये टाकूया आणि हळूहळू गरजेमध्ये सरकवूया, काय वाटतं?! करून तर बघूया!

(दि. ७ एप्रिल २०१८ रोजी प्रकाशित महाराष्ट्र टाईम्सच्या मैफल या पुरवणीत प्रसिद्ध)