Saturday, August 25, 2018

...प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.


दरवर्षी आम्ही शाळेचे माजी विद्यार्थी आमच्या शाळेत स्वातंत्र्य दिनाला झेंडा वंदनासाठी जातो. याही वर्षी गेलो होतो. शाळेत असताना अक्षरश: हजारो वेळा म्हणलेली आपली प्रतिज्ञा पुन्हा म्हणली. त्यातलं हे एक वाक्य मला खूप आवडतं- प्रत्येकाशी सौजन्याने वागेन. त्याही दिवशी हे डोक्यात राहिलं. प्रत्येकाशी प्रेमाने वागेन’, चांगला वागेन’, नम्रतेने वागेन’, आदराने वागेन असं काहीही म्हणता आलं असतं खरं तर. पण आपली प्रतिज्ञा ज्यांनी लिहिली त्या पी. व्ही. सुब्बाराव यांनी सौजन्य हा चपखल बसणारा शब्द निवडला. इंग्रजीत सौजन्याला असणारा पर्यायी शब्द म्हणजे कर्टसी. याचं मूळ कोर्ट, म्हणजे दरबार या शब्दात आहे. दरबारातली मंडळी एकमेकांना ज्या पद्धतीने आदर देत वागवतील तशी भावना मनात ठेवून वागणं म्हणजे सौजन्याने वागणं. सौजन्यामध्ये समोरच्या व्यक्तीला एक माणूस म्हणून आदर देणं तर आहेच, पण त्याबरोबर नम्रताही आहे. सौजन्य हा शब्दच मुळी सु-जन म्हणजे चांगला माणूस इथून आला असल्याने या शब्दाच्या अर्थात चांगुलपणाही आहे. आणि एवढं सगळं असूनही स्वतःच्या भूमिकेवर ठाम राहण्याची मुभा देखील यात आहे. इंग्रजीत ज्याला असर्टिव्ह म्हणलं जातं तसं असण्याला सौजन्य आड येत नाही. सौजन्य या एकाच शब्दात केवढ्या गोष्टी एकदम साध्य होतात!

सेपियन्स या आपल्या पुस्तकात लेखक युवाल नोआह हरारी लिहितो की, एखाद्या टोळीत सामान्यत: सगळ्यात ताकदवान व्यक्ती टोळीचं प्रमुख पद भूषवत असेल अशी अनेकदा आपली समजूत असते. पण आपल्या इतिहासात हे असं असल्याचं दिसून येत नाही. वैयक्तिक ताकदीपेक्षा जी व्यक्ती टोळी मधल्या इतर सदस्यांशी सौजन्याने वागते, त्यांच्याशी चांगले संबंध प्रस्थापित करते अशी व्यक्ती टोळीप्रमुख बनण्यासाठी जास्त लायक ठरते. लेखक हरारी आपला मुद्दा मांडताना मानवाशी जवळीक असणाऱ्या बोनोबो आणि अन्य माकडांचंही उदाहरण देतो. या माकडांमध्ये सुद्धा इतरांपेक्षा अधिक चांगली सामाजिक कौशल्ये (सोशल स्किल्स) असणारे माकड त्या टोळीचे प्रमुख होण्याची शक्यता जास्त असते. या सामाजिक कौशल्यामध्ये अतिशय महत्त्वाचं ते म्हणजे- सौजन्य. काय गंमत आहे बघा, सौजन्य हा काही केवळ माणसाच्या बुद्धीतून उपजलेला प्रगत समाजातला गुण आहे असं नव्हे, तर अस्तित्वासाठी आपल्यात असणारा हा एक नैसर्गिक आणि आदिम गुण आहे. सौजन्याने वागण्याचे फायदे माणसाने टोळ्यांमध्ये राहत असल्यापासून अनुभवले, शिकले आणि आत्मसातही केले.

आज हे सगळं आठवण्याचं कारण म्हणजे लग्न ठरवण्याच्या, जोडीदार निवडीच्या प्रक्रियेत आपल्यामधून हरवलेलं सौजन्य. हे आत्मसात केलेलं आपल्यातलं सौजन्य गेलं कुठे असा प्रश्न मला कधीकधी पडतो. अरेंज्ड मॅरेजच्या बाबतीत परिस्थिती गंभीरच आहे. “अहो आम्ही इतक्या लोकांना वेबसाईटवरून रिक्वेस्ट पाठवली, पण समोरून काही उत्तरच येत नाही. होकार/नकार काहीतरी कळवावा की...”, आपल्या मुलीसाठी जोडीदार शोधणारे एक वैतागलेले काका मला सांगत होते. गंमत म्हणजे, मुलीकडच्या मंडळींना वाटतं की २०१८ साल उजाडलं तरीही मुलाकडची मंडळी आम्हाला अशी कमी कशी काय लेखतात? आणि मुलाकडच्या अशा परिस्थितीतल्या पालकांना वाटतं की मुलीकडची बाजू आता डोईजडच होऊ लागली आहे. खरा भाग असा की मुलीकडचे असोत किंवा मुलाकडचे, समोरच्या बाजूकडून सौजन्याची वागणूक न मिळण्याचा अनुभव सगळ्यांना येतो आहे. आपल्याला संपर्क साधणार्‍या मंडळींशी आपण किमान आवश्यक सौजन्याने वागणं का बरं शक्य होत नसेल? आजच्या जगात आपला संदेश, आपलं म्हणणं समोरच्यापर्यंत पोहचवायला ना फारसा वेळ लागतो, ना खर्च. पण तरीही आपल्याला संपर्क साधणारे म्हणजे कोणी याचक आहेत आणि त्यांना उत्तर द्यायला बांधील नाही असा आविर्भाव बाळगणाऱ्या मंडळींचे काय करावे? मी तर नेहमी सांगतो, की ज्यांच्याकडे साधे उत्तर कळवण्याचेही सौजन्य नाही अशा कुटुंबाशी नातं निर्माण नाही झालं हे एका दृष्टीने बरंच झालं की! माणसाला माणूस म्हणून आदराने वागवण्याची, सौजन्याने वागवण्याची मूलभूत जबाबदारी देखील पार पाडता येत नसेल तर नवीन नाती निर्माण करणं, ती टिकवणं, फुलवणं, बहरणं या फार लांबच्या गोष्टी झाल्या.

लग्न ठरवू बघणाऱ्या मुलं-मुली आणि पालक यांच्या निमित्ताने हा विषय डोक्यात आला तरी हा काही तेवढ्या पुरता मर्यादित नाही. सौजन्याने वागणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. मध्ये एकदा फेसबुकवर मी एक शॉर्ट फिल्म बघितली होती. त्यात अगदी सुरुवातीला एक मुलगी एका काकूंना रस्त्यात काहीतरी मदत करते. काकू पुढे आपल्या कामाला जातात तिथे त्या एका मुलाला त्याच्या काहीतरी अडचणीच्या वेळी मदत करतात. मग तो मुलगा एका प्रसंगात अशीच अजून एका व्यक्तीला मदत करतो. अशी ही दिवसभर घडणार्‍या गोष्टींची साखळी. एकाने सुरुवात केली की हळूहळू सगळ्यांनाच त्या चांगुलपणाची, सौजन्याची लागणच होते जणू. मला जाणवलं, असं आपल्याही आयुष्यात कित्येकदा घडतं की! सकाळी एखाद्या व्यक्तीशी झालेली छान भेट, घडलेली एखादी घटना यामुळे सगळा दिवस आनंदात जातो. आपला दिवस आनंदात जात असतो, आपण छान प्रसन्न मूड मध्ये असतो तेव्हा आपल्याही नकळत आपण अनेकांना या मार्गावर आणत असतो. सौजन्याची हीच गंमत आहे असं मला वाटतं.

माझ्या मते, सौजन्याचा मुद्दा हा, इंग्रजीत ज्याला एम्पथी म्हणलं जातं त्या गुणाशी निगडीत आहे. एम्पथी म्हणजे मराठीत समानुभूती (किंवा तदनुभूती.). समानुभूती मध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो तो म्हणजे समोरच्या व्यक्तीच्या जागी जाऊन विचार करणं. “मी आत्ता समोरच्या बाजूला असतो/असते तर नेमकं काय केलं असतं, मला काय अपेक्षित असलं असतं” हा विचार करून कृती करणं हा भाग समानुभूतीमध्ये अंतर्भूत आहे. गांधीजी म्हणायचे ना, बी द चेंज यू वॉन्ट टू सी’, जे तुम्हाला हवंय तसे तुम्ही आधी बना, तसंच आहे हे. किंवा इंग्रजीतल्या गेटिंग इन वन्स शूज या वाक्प्रचारासारखं आहे. दुसर्‍याचे जोडे घालून बघणे! आपण समोरच्या व्यक्तीला जसे वागवत आहोत तसं आपल्याला कोणी वागवलं तर आवडेल का, इतका साधा विचार करून, म्हणजेच समानुभूतीने विचार करून, वागू लागलो की आपल्या वागणुकीत आपोआप सौजन्य येईल. मात्र यासाठी आपला अहंगंड बाजूला सारावा लागतो. अहंगंड बाळगून सौजन्याने वागणं शक्य नाही. दुसर्‍याचे जोडे घालून बघायचे तर आधी स्वत:चे काढून बाजूला ठेवावे लागतात. आपला अहंगंड नेमकं तेच करू देत नाही. अहंगंड तसाच ठेवून तोंडदेखलं चांगलं वागणं म्हणजे सौजन्य नव्हे. मी, माझं कुटुंब, माझं आयुष्य या स्व केंद्री दृष्टीकोनात एक प्रकारचा छान कम्फर्ट झोन तयार होतो. आणि त्यातून या कम्फर्ट झोनच्या बाहेरच्या मंडळींबाबत सौजन्याचा बहुदा विसरच पडतो. अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतात. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीला दिलेली भेटायची वेळ पाळणे, उशीर होणार असल्यास तसं कळवणे. दुसरी व्यक्ती आपली वाट बघत असेल हा समानुभूतीने विचार केला की शक्यतो उशीर न करणे आणि उशीर होणार असल्यास कळवणे या दोन्ही गोष्टी सहजपणे डोक्यात येतात. यालाच आपण सौजन्य म्हणतो.
सौजन्याने वागणं ही काय एकदा कधीतरी करायची गोष्ट नव्हे. ती एक सवय आहे जी लावून घेतली पाहिजे. मला वाटतं, प्रगल्भ समाजासाठी समानुभूतीतून सौजन्य आणि सौजन्यातून सहकार्य, अशी ही तीन ची साखळी आहे. आपण “...आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.”, प्रतिज्ञेतलं हे वाक्य प्रत्येकाने समजून उमजून अंमलात आणायचा प्रयत्न सुरू केला तर एक प्रसन्न आणि आनंदी व्यक्ती होण्याकडे, सुदृढ कुटुंब निर्माण करण्याकडे आणि प्रगल्भ समाज बनण्याकडे उचललेलं दमदार पाऊल असेल असा मला विश्वास वाटतो. मग करूया ना हे?!

(दि. २५ ऑगस्ट २०१८ रोजी प्रकाशित झालेल्या महाराष्ट्र टाईम्सच्या मैफल पुरवणीत प्रसिद्ध)

Saturday, August 11, 2018

‘सेक्शुअल कम्पॅटिबिलीटी’चं काय करायचं?

“स्वभाव आणि पर्सनॅलिटी तर यातून समजेल पण...मला एक प्रश्न आहे...”, मानसीने जरा अडखळत विचारलं, “या गोष्टी आहेत महत्त्वाच्या पण, सेक्शुअल कम्पॅटिबिलीटी लग्ना आधी कशी तपासून बघायची?” आम्ही आमच्याकडे येणार्‍या लग्नाला उभ्या मुला-मुलींसाठी काही चाचण्या तयार केल्या आहेत. मॅरिटल रेडीनेस’, पर्सनॅलिटी अशा गोष्टी यात तपासून बघता येतात. जन्मपत्रिका बघत पारंपारिक गुणमिलन बघण्यापेक्षा मानसशास्त्राच्या आधारे स्वभाव मिलन किंवा मनोमिलन बघणं अधिक गरजेचं आहे या विचारातून आम्ही हे चालू केलं. या गोष्टींचं महत्त्व बहुतेकांना आता पटलंय. पण गाडी तिथेच थांबलेली नाही. कारण आता या चाचण्यांच्या पुढे जात मानसीने विचारलेल्या प्रश्नाकडे माझी पिढी पटकन आली देखील!  

सेक्शुअल कम्पॅटिबिलीटी किंवा मराठीत- लैंगिक अनुरूपता, हा विषय निघाला की, असंख्य गोष्टींच्या
विचाराने अनेकांचा चांगलाच गोंधळ उडतो.
“सेक्शुअल कम्पॅटिबिलीटी कसली आलीये त्यात! नैसर्गिकपणे होतं सगळं.” इथपासून प्रतिक्रियांना सुरुवात होते आणि मग,
“पण बाकी सगळं स्थळ छान असेल पण लैंगिक अनुरूपता नसेल तर काय करायचं
?,
“म्हणून काय तुम्ही तपासत बसणार की काय
? आपली संस्कृती...आपली परंपरा..”,
“मग काय
, लग्न झाल्यावर घटस्फोट घ्यायचा उद्योग करत बसायचं की काय? आजकाल किती घटस्फोट केवळ बेडरूममध्ये जमत नाही म्हणून होतात...”
“पण मग आयुष्यभर काय नुसतं ट्रायल अँड एरर करत बसणार का
?
“ही सगळी लग्न व्यवस्थाच चूक आहे...”
, वगैरे वगैरे अशा अनेक परस्पर विरोधी मतांवर गाडी जाऊन पोचते.

आपल्या समाजात गेल्या तीस वर्षात आलेल्या खुल्या वातावरणामुळे हा विषय, हे प्रश्न हळूहळू पुढे येत आहेत. कदाचित आज त्यांची तीव्रता कमी आहे. पण बदलत्या काळात तीव्रता कमी तर होणार नाहीच, उलट आमची मिलेनियल जनरेशन अधिक आक्रमकपणे हे विषय आपल्या चर्चाविश्वात आणत जाईल. अशा वेळी यांना तारतम्याने आणि तर्कशुद्ध पद्धतीने सामोरं गेलं पाहिजे. उत्तरं शोधली पाहिजेत. त्याचाच हा आज थोडा प्रयत्न.

टोळ्या बनवून फिरणारा माणूस शेती करू लागून स्थिरावल्यावर, जगभर लग्न ही गोष्ट अस्तित्वात आली तीच मुळी प्रजो‍त्पादन आणि वारसाहक्क या दोन गोष्टी सुटसुटीत आणि व्यवस्थाबद्ध पद्धतीने व्हाव्या म्हणून. लैंगिक संबंध ही गोष्ट लग्नाशी पक्की जोडली गेली. एकूण समाजाच्या सोयीच्या दृष्टीने माणसांचे कायदे, धर्म, रूढी, परंपरा या आपोआपच या व्यवस्थेभोवती गुंफत नेल्या गेल्या. पण आता काळ बदलला. समाजाची सोय एका बाजूला, पण व्यक्तिगत बाबतीत समाजाने लुडबुड करू नये असं म्हणण्या इतकी आर्थिक-राजकीय ताकद आणि स्वातंत्र्य आजच्या पिढीला मिळालं आहे. म्हणूनच स्वतःच्या पायावर स्वतंत्रपणे उभी असणारी पिढी लग्नामधल्या अगदी गाभ्याशीच असणाऱ्या लैंगिक समाधानाविषयी प्रश्न करते आहे यात आश्चर्य काहीच नाही.

जेव्हा सेक्शुअल कम्पॅटिबिलीटी हा विषय निघतो तेव्हा सगळ्या चर्चेचा केंद्रबिंदु या दोन शब्दांपैकी सेक्शुअल याच शब्दावर आणला जातो आणि खरी गडबड होते असं मला वाटतं. पण सगळी गंमत ही कम्पॅटिबिलीटी या शब्दात आहे आणि आपल्या चर्चेचा केंद्रबिंदू तिकडे नेला पाहिजे. आम्ही नेहमीच सांगतो, कम्पॅटिबिलीटी किंवा अनुरूपता ही रेडीमेड नसते. ती हळूहळू घडत जाणारी गोष्ट आहे. आणि त्यांचा अरेंज्ड मॅरेज किंवा लव्ह मॅरेजशी काही संबंध नाही. दोन कोणत्याही व्यक्ती एकत्र आल्यावर अगदी पहिल्या दिवसापासून त्यांचं सगळ्यात उत्तम जमलं असं होत नाही. अगदी पहिल्या भेटीत उत्तम जमलेल्यांचं काही काळ गेल्यावर अधिक चांगलं जमू लागलेलं असतं कारण दोघांमध्ये अनुरूपता तयार होत गेलेली असते. फार दूर जायची गरज नाही, अगदी आपला सगळ्यात जवळचा मित्र किंवा मैत्रिण आठवा. इतक्या वर्षांच्या ओळखीमध्ये टप्प्या टप्प्याने तुम्ही एकमेकांना अधिकाधिक अनुरूप होत जाता. अगदी कामाच्या ठिकाणी सुद्धा आपण आपल्या सहकाऱ्याबरोबर हळूहळू अनुरूप होत जातो. मग नवरा-बायको, प्रियकर-प्रेयसी या नात्यांत अनुरूपता रेडीमेड कशी असेल? नसतेच ती. साहजिकच ही गोष्ट लैंगिक बाबतीत देखील लागू होते.

लैंगिकतेच्या बाबतीत एक महत्त्वाचा भाग विचारांत घ्यायला हवा आणि तो म्हणजे मोजके काही अपवाद वगळता मानव हा असा प्राणी आहे जो केवळ प्रजो‍त्पादन नव्हे तर, स्वतःच्या सुखासाठी देखील लैंगिक संबंध ठेवतो. माणसाचा मेंदू आणि त्यातल्या जाणीवा त्या पद्धतीने विकसित झाल्या आहेत, प्रगत झाल्या आहेत. सेक्स ही कृती माणसासाठी शरीराच्या यांत्रिकतेच्या पलीकडे जाऊन मनाशीही जोडली गेलेली आहे. एखाद्या व्यक्तीचा लैंगिक अनुभव आनंददायी होण्यामागे प्रत्यक्ष शरीरापेक्षाही मनाचा हातभार जास्त असतो, असं आज अभ्यासक सांगतात. दोन व्यक्तींमधलं नातं, त्यांच्यातली निर्माण झालेली बौद्धिक-भावनिक अनुरूपता यांचा सकारात्मक परिणाम लैंगिक संबंधांमध्ये आणि दिसून येतो. म्हणूनच लैंगिक अनुरूपता अशी वेगळी काढून तपासायची कुठली सोयच नाही. किंबहुना इतर गोष्टी नसतील तर लैंगिक अनुरूपता देखील असणार नाही. कृतीनंतर तात्पुरतं वाटणारं शरीर सुख टिकाऊ नसेल. दोन व्यक्तींच्या शारीरिक आणि मानसिक स्थितीवर लैंगिक संबंध आनंददायी आहेत किंवा नाही हे ठरतं. आणि म्हणूनच लग्नाच्या पहिल्या रात्री किंवा हनिमूनच्या वेळीच सर्वोत्तम लैंगिक अनुभव आपल्याला मिळेल आणि न मिळाल्यास आपण एकमेकांना लैंगिक दृष्ट्या अनुरूप नाही’, असे निष्कर्ष काढणं घाई गडबडीचं ठरेल. म्हणूनच अर्थात सुहाग रात’, हनिमून याबद्दलच्या बॉलीवूडने फुगवलेल्या अतिरंजित कल्पना मनातून काढून टाकणं शहाणपणाचं आहे. लग्नानंतरचा सुरुवातीचा काळ हा एकमेकांची अधिक नीट ओळख करून घेण्याचा, समजून घेण्याचा, एकमेकांना अनुरूप होत जाण्याचा कालावधी आहे. एकमेकांबरोबर असे भावनिक दृष्ट्या अनुरूप होत जाणारे बेडरूममध्येही एकमेकांना सहजपणे अनुरूप होत जातात. हे सगळं फक्त अरेंज्ड मॅरेजवाल्या मंडळींना लागू होतं असं मुळीच नाही. लव्ह मॅरेज केलेल्या मंडळींनादेखील याच टप्प्यांमधून जावं लागतं. अगदी लग्नाआधी लैंगिक संबंध असणाऱ्या जोडप्यांनासुद्धा लैंगिक अनुरूपतेपर्यंत पोचायला त्यांच्या नात्याचा सुरुवातीचा काळ द्यावा लागतो. या विषयातल्या जगभरच्या तज्ज्ञ अभ्यासक मंडळींनी याविषयी संशोधन करून, अभ्यास करून हे निष्कर्ष काढले आहेत. नात्यात इतर सर्व विषयांप्रमाणेच लैंगिक अनुरूपतादेखील दोघांनी मिळून हळूहळू मिळवायची गोष्ट आहे. रेडीमेड मिळत नाही. आणि त्याच मुळे अर्थात, लग्नापूर्वी ती तपासायची कोणतीच सोय उपलब्धही नाही, त्याहून महत्त्वाचं- गरजेचीही नाही. या विषयातली गरजेची गोष्ट आहे ती म्हणजे लैंगिक आरोग्य तपासणी.

आज काही लग्न मोडताना दिसतात ती लग्नाआधी लैंगिक आरोग्य तपासणी करून न घेतल्यामुळे. लैंगिक अनुरूपता तपासण्यापेक्षा लैंगिक आरोग्य तपासणीकडे लक्ष देणं जास्त आवश्यक आहे. बदललेली जीवनशैली, कामाचे वाढलेले तास, रोजचे ताण तणाव याचा परिणाम शरीर आणि मनावर होत असतो. आणि अर्थातच अंतिमतः सेक्सवर देखील होत असतो. दारू, सिगरेट, तंबाखू, गुटखा अशा सर्व व्यसनांचा लैंगिक आरोग्यावर परिणाम होतो. लैंगिक आरोग्य जपणे आपल्याच हातात असतं. लग्नाआधी या विषयातल्या तज्ज्ञ डॉक्टरना भेटून त्यांचा सल्ला, समुपदेशन घेणं अत्यावश्यक आहे. इंटरनेटवर माहिती मिळते, ज्ञान नाही. त्यामुळे इंटरनेटवर वाचून सगळं समजलं अशा भ्रमात न राहता तज्ज्ञ डॉक्टरांकडे जाऊन लैंगिक आरोग्याची तपासणी करून घ्यायला हवी. हे समुपदेशन आणि तपासणी मुलं-मुली दोघांनीही करून घ्यायला हवी. याचे अनेक फायदे असतात. एकतर लैंगिक आरोग्याविषयी सविस्तर माहिती आपल्याला होते. काही उपचारांची गरज असेल तत्काळ त्याबाबत काहीतरी करता येतं. दुसरं म्हणजे तज्ज्ञ व्यक्तीकडून मनातल्या शंकांचं निरसन होतं. तिसरं, त्याहून महत्त्वाचं म्हणजे लैंगिक संबंधांच्या बाबतीत अनेक गैरसमज असतात ते सगळे या समुपदेशनातून दूर होऊ शकतात.

शेवटी सांगायचा मुद्दा इतकाच की, सेक्शुअल कम्पॅटिबिलीटीच्या मागे धावण्यापेक्षा, एकमेकांबरोबरचं नातं प्रगल्भ करत भावनिक अनुरूपतेकडे जाणं, लैंगिक आरोग्य उत्तम ठेवणं आणि यातून सेक्शुअल कम्पॅटिबिलीटी देखील मिळवणं, हाच आनंदी सहजीवनाचा राजमार्ग आहे.

(दि. ११ ऑगस्ट २०१८ रोजी प्रकाशित झालेल्या महाराष्ट्र टाईम्सच्या मैफल पुरवणीत प्रसिद्ध)