Saturday, July 28, 2018

प्रतिमेची चौकट


मध्यंतरी मी एक टेड टॉक बघितला. टेड टॉक्स हा एक जगभर चालणारा फारच अफलातून उपक्रम आहे. ज्यात असंख्य विषयांवर जगातली तज्ज्ञ मंडळी बोलतात. मेगन रामसे यांचा न्यूयॉर्क टेड टॉक मधला तो व्हिडीओ अक्षरशः हलवणारा आहे. त्या असं सांगतात की दर महिन्याला किमान दहा हजार लोक मी सुंदर आहे की कुरूप असा प्रश्न गुगल वर विचारतात. कित्येक मुलं-मुली आपले व्हिडीओ यूट्यूबवर टाकतात आणि विचारतात की सांगा मी सुंदर आहे का. मेगन यांनी आपल्या बोलण्यात सांगितलं तो एक छोटासा भाग आहे. पण प्रत्यक्ष रोजच्या आयुष्यात आपण आपल्या आजूबाजूला बघतो, सोशल मिडियाच्या उदयापासून आज बहुसंख्य लोक या सांगा मी कसा/कशी आहे या चक्रव्यूहात अडकले आहेत. फक्त माझी पिढी नव्हे तर आज किशोरवयात असणारी आणि पालक वर्गात मोडणारी मंडळीही माझी प्रतिमा काय आहे या गोष्टीला प्रमाणाबाहेर महत्त्व देत आहेत. “आपण अमुक अमुक करूया ना, म्हणजे इन्स्टाग्रामवर फोटो टाकता येईल”, अशा प्रकारचे संवाद जेव्हा कानावर पडतात तेव्हा साहजिकच माझ्या मनात अनेक प्रश्न उभे राहतात.  विशेषतः जोडीदार निवड, लग्न या बाबतीत तर या प्रतिमेच्या चौकटींचं करायचं काय हा प्रश्न आ वासून पुढे येतोच येतो.

मनात प्रतिमा तयार होणं हा खूप स्वाभाविक भाग आहे. सिनेमाचं ट्रेलर बघून सिनेमाबद्दल प्रतिमा निर्माण करण्यापासून ते भाषण कलेवरून राजकीय नेत्याची प्रतिमा निर्माण करण्यापर्यंत आपला मेंदू काम करतच असतो. किंबहुना आपल्या कल्पनाशक्ती आणि सृजनाचा तो अविभाज्य भाग आहे. तो टाळता येणार नाही. पण प्रश्न निर्माण होतात जेव्हा प्रतिमेलाच वास्तव मानून आपण पुढे जाऊ लागतो. या प्रतिमेच्या चौकटीत अडकल्याने होतं असं की, वास्तवापेक्षा प्रतिमेच्याच प्रेमात पडायला होतं. त्यात स्वतःच्याच प्रतिमेच्या प्रेमात पडलं की ती प्रतिमा जपणं ओघानेच आलं. सेलिब्रिटी आणि नेते मंडळींच्या आयुष्यात असणारा हा प्रतिमा जपण्याचा प्रश्न सोशल मिडियाच्या अस्तित्वामुळे सहजपणे आपल्याही घरात, मोबाईल मार्फत आपल्या हातात आणि अर्थातच आपल्या मनात मुक्कामाला आला. माझ्या प्रतिमा निर्मितीसाठी अनेक गोष्टी करण्याचं बंधन आपण स्वतःवरच घालून घेऊ लागलो. मी ठराविक पद्धतीचे फोटो सोशल मिडियावर टाकलेच पाहिजेत, मी अमुक अमुक भूमिका मांडलीच पाहिजे, मी किती मजा करतोय/करते आहे किंवा किती दुःखात आहे हेही मी जाहीरपणे लिहिलं पाहिजे म्हणजे मला हवी तशी मी प्रतिमा निर्माण करत जाईन हा विचार आपल्याही नकळतपणे आपल्यावर अधिराज्य गाजवू लागला. हळूहळू आपल्यातला पोलिटिकल करेक्टनेस वाढायला लागला. आपण एक समाज म्हणूनही दांभिक होऊ लागलो. आणि ही दांभिकता हळूहळू झिरपत जाऊन सगळ्याच बाबतीत दिसू लागली. तशी ती लग्न, नाती, सहजीवन या विषयांत देखील आली.

एक उदाहरण सांगतो. मध्यंतरी एक गृहस्थ मला भेटायला आले होते. त्यांना आपल्या मुलाचं लग्न करायचं होतं आणि त्या दृष्टीने ते आणि त्यांचा मुलगा असे भेटायला आले होते. हे गृहस्थ आणि माझा, काही सामाजिक-राजकीय चळवळी, बैठका यामुळे थोडाफार परिचय होता. विविध विषयांवर ते फेसबुकवर लिहित असतात जे मी बघितलं आहे. जातिभेदाविरोधात ते अनेकदा बोलले आहेत. भावी जोडीदाराबाबतच्या अपेक्षा वगैरे बद्दल बोलताना नंतर ते हळूच चाचरत मला म्हणाले, “मुलगी शक्यतो आमच्या जातीचीच शोधतोय हं...”. त्यांनी सोशल मिडियावर तयार केलेल्या त्यांच्या प्रतिमेच्या फुग्याला टाचणी लागली त्या वाक्याने. सोशल मिडियावरच्या प्रतिमेला वास्तव न मानण्याचा धडा मी पुन्हा एकदा मनात गिरवला त्या दिवशी. हाच धडा सगळ्यांनीही लक्षात ठेवावा. विशेषतः लग्न करू बघणाऱ्या किंवा जोडीदार शोधणाऱ्या मंडळींनी. आमचा असा अनुभव आहे की लग्न ठरवायच्या वेबसाईटवर एखादी प्रोफाईल आकर्षक वाटली की ताबडतोब त्या व्यक्तीची फेसबुक प्रोफाईल देखील बघितली जाते. पूर्वी मुलं-मुली हे करायचे. आता पालकदेखील करतात. फेसबुकवरून नुसता अधिक अंदाज घेण्याचा प्रयत्न एवढ्यापुरतं हे मर्यादित असतं तर प्रश्न आला नसता. पण फेसबुक प्रोफाईल बघून निष्कर्ष काढले जातात आणि गडबड होते. फोटोंवरून, फोटोंमधले कपडे बघून, मित्रयादीतल्या लोकांकडे बघून. मनातल्या मनात आपण त्या प्रोफाईलमधून तयार झालेल्या प्रतिमेला नकार किंवा होकार देऊन सुद्धा टाकतो. आपल्याला जोडीदार म्हणून माणूस हवाय की फेसबुक/वेबसाईट प्रोफाईल मधून समोर येणारी प्रतिमा? हाडामांसाचा जिवंत माणूस जोडीदार म्हणून हवा असेल तर प्रत्यक्ष भेटायला हवं, बोलायला हवं. भेटल्या बोलल्याशिवाय निष्कर्षाला येणं हे काही शहाणपणाचं नाही. कधीकधी यात होतं काय की, जर त्या प्रोफाईलमधल्या व्यक्तीला प्रत्यक्ष भेटायचं ठरवलं गेलं तर मुलं-मुली आपल्या मनात तयार झालेली त्या व्यक्तीची प्रतिमा घेऊन भेटायला जातात. आणि भेटीचा पूर्ण वेळ समोरच्याला समजून घेण्याऐवजी मनातल्या प्रतिमेशी पडताळणी करण्यात निघून जातो. समोरच्या व्यक्तीला माणूस म्हणून जाणून घेणं राहतं दूर!

हे सगळं जसं सोशल मिडियावरच्या प्रतिमांच्या बाबतीत होतं तसंच आपण आपल्या जोडीदाराबद्दल, लग्नाबद्दल अनेक कल्पना रंगवलेल्या असतात. अनेक प्रतिमा तयार केलेल्या असतात. कथा कादंबऱ्या आणि बॉलीवूडने आपण हे करावं यासाठी मेरे ख्वाबों में जो आये... म्हणत भरीव कामगिरी करून ठेवलीच आहे. जोडीदाराचा शोध घेताना या मनातल्या प्रतिमेला आपण आदर्शवत ठेवतो. आणि जसं फेसबुक प्रोफाईलवाल्या प्रतिमेशी समोरच्या व्यक्तीची पडताळणी केली जाते; तसंच समोरची व्यक्ती आपल्या मनातल्या प्रतिमेत बसते आहे का याची तपासणी सुरू होते. आणि पुन्हा तोच परिणाम होतो- समोरच्या माणसाला माणूस म्हणून जाणून घेणं दूरच राहतं. जगात जेवढ्या व्यक्ती असण्याच्या आणि जेवढ्या व्यक्ती आवडण्याच्या शक्यता आहेत तेवढ्या सगळ्यांचा सविस्तर विचार करून आपण आपल्या मनातली प्रतिमा निर्माण केलेली असणं शक्यच नसतं. म्हणजे, समोरच्या व्यक्तीमध्ये अशा अनेक गोष्टी असू शकतात ज्या आवडू शकतात पण त्यांचा आधी कधी विचार केला नव्हता. पण हे असं असेल तरीही ते समजणारच नाही कारण समोरच्याला जाणून घेण्यासाठी आवश्यक ती मोकळीक आपण मनाला दिलेलीच नसते!

“लग्नाची कल्पना मला आवडते आहे पण कदाचित प्रत्यक्ष लग्न नाही आवडणार” अशा आशयाचं एक वाक्य माझ्या एका मैत्रिणीने फेसबुकवर लिहिलं होतं. या वाक्यातच वास्तवापेक्षा मनातली प्रतिमाच आवडत असल्याची खुली कबुली आहे बघा. आपल्या पिढीला या प्रतिमांच्या प्रेमातून बाहेर यायला हवं. आयडियल किंवा आदर्श असं म्हणत प्रतिमांचे जे इमले रचले जातात त्यात वास्तव आयुष्यातला आनंद घेणं, समजून घेणं, जाणून घेणं राहून गेलं तर काय मजा? अनुभव घेण्यासाठी म्हणून अनुभव घ्यायला हवेत, सोशल मिडियावर शेअर करण्यासाठी नव्हे. सोशल मिडिया हा आता आपल्या आयुष्याचा, एकुणात समाजाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. त्यामुळे तो टाळता येणं कठीण आहे. पण समोर उत्तम अन्नपदार्थ आल्यावर पहिला विचार त्याच्या स्वादाचा असण्यापेक्षा, याचा फोटो इन्स्टाग्राम वर किती छान दिसेल हा येत असेल तर आपण आपल्या प्रतिमेच्या आणि प्रतिमा निर्मितीच्या कार्यक्रमात फारच गुंतलो आहोत हे समजावे. जोडीदार निवडताना आणि निवडल्यावर नात्यातही प्रतिमेच्या आधारे निष्कर्ष काढणार असू, मनातल्या प्रतिमेशी पडताळणी करणार असू तर प्रतिमांच्या चौकटीत आपण चांगलेच अडकलो आहोत हेही जाणून घ्यावं.

शेवटी इतकंच की, अनुभवांना अनुभव म्हणून अनुभवण्यासाठी, माणसांना माणूस म्हणून जाणून घेण्यासाठी प्रतिमेची ही चौकट वेळीच मोडीत काढणं आपल्या हिताचं आहे एवढं नक्की.

(दि. २८ जुलै २०१८ रोजी प्रकाशित झालेल्या महाराष्ट्र टाईम्सच्या मैफल पुरवणीत प्रसिद्ध)

Saturday, July 14, 2018

नव्याची नवलाई

मध्यंतरी मी नेटफ्लिक्सवर ‘न्यूनेस’ नावाचा एक सिनेमा बघितला. आयुष्यात नाविन्य शोधू पाहणाऱ्या एका तरुण जोडप्याची ती प्रेमकथा. नाविन्याची सवय असणारे दोघं नात्यांत स्थैर्य आल्यावर अस्वस्थ होतात आणि वेगळे होतात वगैरे कथा आहे त्याची. सिनेमा तसा सामान्यच वाटला मला. पण यात जो मुद्दा मांडला गेला होता, तो कुठेतरी माझ्या रोजच्या अनुभवांशी जोडला जाईल असा होता. आमच्या एका गप्पांच्या कार्यक्रमात बोलताना वरुण म्हणाला, “लग्नानंतर आयुष्यभर एकाच व्यक्तीबरोबर राहायचं ही कल्पनाही मला अजून पचली नाहीये. किती कंटाळा येईल ना काही वर्षांनी!”. वरुण हे जे म्हणाला ते अनेकदा अनेक मुला-मुलींनी वेगवेगळ्या गप्पांमध्ये मांडलं आहे. ‘कंटाळा येण्याच्या’ शक्यतेची भीती व्यक्त केली आहे.
या निमित्ताने मनात आलेला प्रश्न म्हणजे, आज लग्नाला उभी
असण्याच्या वयातली मिलेनियल जनरेशन म्हणजे माझी पिढी सतत नाविन्याचा ध्यास असणारी पिढी आहे का? ‘युज अँड थ्रो’ हे आज परवलीचे शब्द आहेत. “अमुक अमुक गोष्ट मी गेले चाळीस वर्ष वापरत्ये” असं सांगणारी आपली एखादी आजी असते. आपण असं काही सांगू शकू का कधी हा प्रश्न मनात येतोच येतो. एकुणात बदललेल्या जागतिक अर्थव्यवस्थेत आणि रोज होत जाणाऱ्या तंत्रज्ञानाच्या बदलांमुळे आपल्या रोजच्या वापरातल्या वस्तू तर वेगाने बदलत आहेत. नवनवीन तंत्रज्ञानामुळे वस्तूंच्या अपग्रेडेड व्हर्जन्स म्हणजेच सुधारित आवृत्त्या बाजारात येताना दिसतात, त्यांची किंमतही परवडेल अशी असते. आणि बघता बघता आपल्या रोजच्या वापरातल्या गोष्टी पटापट बदलत जातात. उदाहरणादाखल आयुष्यात आजवर मोबाईलचे किती हँडसेट्स आपण वापरले हे आठवलं तरी जाणवेल जास्तीत जास्त दर दोन-तीन वर्षांत आपण नवीन फोन घेतला आहे. हा आधीच्या आणि आत्ताच्या पिढीच्या आयुष्यात पडलेला फरक चांगला किंवा वाईट याची चर्चा आपण इथे करत नाही आहोत.  तो स्वतंत्र लेखाचा विषय होईल. मुद्दा हा आहे की, आपलं सगळं आयुष्य हळूहळू नाविन्याशी आणि नाविन्याच्या इच्छेशी जोडलं गेलं आहे. एखाद्या कंपनीची वर्षानुवर्षे तीच जाहिरात टीव्हीवर दिसत असेल तर उपयोग होत नाही. आता अक्षरश: दर महिन्या-दोन महिन्याला नवनवीन जाहिराती आणल्या जाताना दिसतात. दर काही वर्षांनी नवीन नोकरी शोधणारे आज असंख्य आहेत. ‘फेसबुक’शिवाय पान हलत नाही अशी आज तरुण पिढीची परिस्थिती असूनही, नाविन्याच्या शोधात लोक दुसर्‍या कुठल्या जागी जाऊ नयेत म्हणून फेसबुकला सुद्धा सातत्याने धडपड करावी लागते. फेसबुकवर सतत नवनवीन फीचर्स, सोयी-सुविधा आणल्या जातात. हे नाविन्य न राखल्यास एक दिवस फेसबुक संपेल. कोणतंही क्षेत्र घ्या. तिथे हे लागू पडतंच.
कदाचित सतत नाविन्याची मागणी करणाऱ्या या नव्या व्यवस्थेमुळे असेल, पण मिलेनियल जनरेशनचं आयुष्य आधीच्या पिढ्यांच्या तुलनेत अधिक अस्थिर आहे असं मला वाटतं. त्याची एक भीतीही या पिढीत आहे. असुरक्षितता निर्माण झाली आहे. तसं नसतं तर रोज नवनवीन खोट्या बातम्या सोशल मिडियामधून वेड्यासारख्या पसरल्या नसत्या. नाना पाटेकर नाही तर विश्वास नांगरे पाटील यांचे नाव वापरत काहीतरी थातूरमातूर मेसेजेस पुढे ढकलून देणं घडलं नसतं. या गोष्टी आपल्या मनातल्या असुरक्षिततेच्या भावनेवर पोसल्या जातात. नुसतीच नवी माध्यमं हाताशी आली म्हणून ते घडलेलं नाही. हे घडण्या मागची ऊर्जा आपल्या मनातल्या असुरक्षित, अस्थिर वाटण्याच्या भावनेमधून आली असणार. यातून अर्थातच नातेसंबंध, लग्न या विषयांत देखील एक प्रकारची अस्थिरता शिरकाव करते. आणि त्यातून यापासून दूर पळण्याची वृत्तीही बळावते. आपण आहोत तो कम्फर्ट झोन सोडून नवीन कोणत्या तरी असुरक्षित गोष्टीत कशासाठी पडायचं असा एक विचार अनेकांच्या मनात डोकावतो आणि मग त्यातून लग्न किंवा जवळच्या नातेसंबंधांची भीती वाटू लागते. इंग्रजीत ज्याला कमिटमेंट फोबिया म्हणतात तो हा प्रकार. खरी गंमत अजून पुढेच आहे. माझ्या मते, अस्थिरतेतून निर्माण होणार्‍या या भीतीची आपल्याला इतकी सवय झाली आहे की ही सवय आणि दुसर्‍या बाजूला असणारी नाविन्याची ओढ यामुळे कुठेतरी आपल्याला स्थैर्याचीही भीती वाटू लागली आहे! रणबीर कपूर पण आपल्या ये जवानी है दीवानी या सिनेमात काय म्हणतो बघा, “मैं उड़ना चाहता हूँ, दौड़ना चाहता हूँ, गिरना भी चाहता हूँ, बस रुकना नहीं चाहता |”. आपल्या पिढीने हेच जणू स्वीकारलंय. हेच त्या ‘न्युनेस’ नामक सिनेमात यांनी मांडायचा प्रयत्न केलाय. लग्न झालं की एकमेकांना अधिक ओळखण्याचा, एकमेकांबरोबर मजा करण्याचा असा सुरुवातीचा एक कालखंड संपला की नवीन काही फार उरतच नाही आणि एक रुटीन सुरू होतं. अगदी मजेचं सुद्धा ‘रिच्युअल’ तयार होतं. उदाहरणार्थ दर रविवारी एक सिनेमा बघणे, दर शनिवारी मित्रांसोबत जेवण करणे वगैरे वगैरे. एकदा गोष्टी अशा ठरून गेल्या की स्थैर्य येतं. नाविन्य संपतं किंवा कमी होतं. अरेंज्ड मॅरेज मध्ये तर जोडीदार शोधताना आवडी निवडी जुळतात का यालाही आवर्जून प्राधान्य दिलं जातं. म्हणजेच तिथेही नाविन्य उरत नाही. गंमत अशी की हे असं सगळ्यांच्याच बाबतीत घडतं. स्वाभाविकही असतं ते. पण असं सगळं चित्र डोळ्यासमोर उभं राहिल्यावर या चित्राचीच अनेकांना भीती वाटते. ‘बस रुकना नहीं चाहता’ म्हणता म्हणता उलट सगळं स्थिर झालं तर, याचीच भीती वाटू लागते. “आयुष्यभर एकाच व्यक्तीबरोबर राहायचं हे केवढं अवघड आहे!”, असं आज मिलेनियल जनरेशन मधली मुलं-मुली म्हणतात तेव्हा ते एकाच व्यक्तीबरोबर राहायचं म्हणजे ‘आता आयुष्यात काही नाविन्य उरणारच नाही’ अशा निष्कर्षाच्या दिशेला जातात. एकाच वेळी, लग्नाच्या आधी अस्थिरतेतून वाटणारी असुरक्षितता आणि लग्नानंतर येणार्‍या स्थैर्याचीही भीती अशी काहीशी ही कोंडी आहे.
खरं तर थेट या ‘आता काही नाविन्यच उरणार नाही’ अशा निष्कर्षाला जाण्याची गरज नसते. कोणत्याही नात्यांत नाविन्य निर्माण करता येऊ शकतं. अनेक जोडपी असा प्रयत्न करताना दिसतातही. एकत्र एखादी नवीन गोष्ट शिकणं इथपासून ते लग्नानंतरही एकट्यानेच फिरायला जाणे- ‘सोलो ट्रीप’ला जाणे इथपर्यंत अनेक गोष्टी अनेक जोडपी नात्यांतलं नाविन्य टिकवण्यासाठी करतात. शिवाय अजून एक महत्त्वाचा मुद्दा असा की माणूस बदलतो. आपल्याला येणार्‍या अनुभवांमुळे, वयामुळे आपल्यात अनेक बदल होतच असतात. नात्यांतल्या नाविन्याचाच हा भाग आहे. त्या बदलांचा किंवा नाविन्य येण्याचा वेग कदाचित कमी असल्याने, पटकन लक्षात येत नाही. पण असे छोटे-मोठे बदल माणसांत नसते झाले तर खरंच कंटाळवाणं होईल! पण एकमेकांसोबत राहताना हे होत जाणारे बदल अनुभवणं, त्याचीही मजा घेणं यामुळे नातं अधिक घट्ट आणि प्रगल्भ व्हायला मदत होते. त्यामुळे लग्नाआधीच, लग्नानंतर नाविन्य जाईल आणि आयुष्य एकदम स्थिर होऊन जाईल किंवा प्रवाही राहणार नाही याची भीती बाळगण्याची गरज नसते. आणि पुढचा मुद्दा असा की सतत नात्यांत नाविन्य असलंच पाहिजे आणि ते नसणारं आयुष्य कंटाळवाणंच असेल असं गृहीत धरून आपणच उगीच एका गोष्टीचं, “बाप रे केवढं भयानक असेल ते” असं म्हणत ‘भयानकीकरण’ करतो. नाविन्य आणत नातं फुलवणं आणि स्थैर्यामध्ये असणारी शांत सुरक्षितताही एकत्र अनुभवणं या दोन्ही गोष्टींचा मेळ साधत पुढे जाण्यात शहाणपण आहे. नाही तर आपण सतत कसल्या तरी शोधात नाखूष राहू. ‘नाविन्य’ या साधनालाच साध्य मानून पुढे गेलं तर गडबड होते. ‘नाविन्य हवं’ म्हणून काहीतरी करण्यापेक्षा जे करायचं आहे, हवं आहे त्यासाठी नवीन काहीतरी करू, ही विचारांची दिशा ठेवली तर डोक्यातला गोंधळ कमी होईल, हे नक्की.  
(दि. १४ जुलै २०१८ रोजी प्रकाशित झालेल्या महाराष्ट्र टाईम्सच्या मैफल या पुरवणीत प्रसिद्ध)

Friday, July 6, 2018

द पनामा पेपर्स

एका शांत रात्री १० वाजता जर्मनीतल्या बास्टीयन ओबेरमायर या पत्रकाराला एका अनामिक व्यक्तीकडून ऑनलाईन संपर्क साधला गेला. जॉन डो असं त्याने स्वतःचं टोपणनाव सांगितलं. कर चुकवणाऱ्या आणि काळा पैसा लपवणाऱ्या लोकांची माहिती दिली जाईल असं त्या व्यक्तीने सांगितलं. बास्टीयन ओबेरमायरने आपल्या सहकाऱ्याला- फ्रेडरिक ओबेरमायरला सोबत घेतले. आणि मग माहिती यायला सुरुवात झाली. किंबहुना माहितीचा प्रचंड धबधबाच कोसळू लागला. तब्बल २.६ टेराबाईट एवढा प्रचंड डेटा टप्प्याटप्प्याने पत्रकारांपर्यंत पोचला. माहिती फुटली होती- डेटा लीक झाला होता! जगात अनेक ठिकाणी उलथापालथ घडवून आणण्याची क्षमता असणारी माहिती...
The Panama Papers

पनामा देशात असणाऱ्या मोझाक-फॉन्सेका नावाच्या लॉ फर्म मधली ही सगळी माहिती होती. एकूण परदेशांत थाटल्या गेलेल्या २,१४,००० कंपन्यांचे (Offshore companies) व्यवहार, त्याबाबतचे ई-मेल्स, त्यांचे अनेक करार अशी सगळी मिळून एक कोटीपेक्षा जास्त कागदपत्रे यात होती. एवढी प्रचंड माहिती बघायची तर आपण अपुरे पडू हे जाणवून दोघा जर्मन पत्रकारांनी संपर्क साधला International Consortium of Investigative Journalists (ICIJ) या शोधपत्रकारांच्या बहुप्रतिष्ठित संस्थेला. त्यांच्या अपेक्षेप्रमाणे, जेरार्ड राईल या पत्रकाराच्या नेतृत्वाखाली कार्यरत असणाऱ्या ICIJ ने हा त्यांचा स्वतःचा प्रकल्प म्हणून हातात घ्यायचं ठरवलं आणि सुरु झाला एक थक्क करणारा प्रवास. जवळपास ८० देशांतली १०७ प्रसिद्धी माध्यमे आणि त्यातल्या ४०० पेक्षा जास्त शोधपत्रकारांनी वर्षभरापेक्षा जास्त काळ या कागदपत्रांचा अभ्यास केला. आपापल्या देशातले काळा पैसा लपवणारे, गैरव्यवहार करणारे अशा मंडळींची माहिती अक्षरशः खणून काढली. आणि हे सगळं जगभर, एकत्र एकाच वेळी उघड केलं गेलं ३ एप्रिल २०१६ या दिवशी. ICIJ ने या प्रकल्पाला नाव दिलं होतं- पनामा पेपर्स!

असंख्य देशांतले राजकीय नेते, राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान, त्यांचे नातेवाईक, मोठमोठे उद्योगपती, खेळाडू, फिल्मस्टार्स, माफिया, ड्रग लॉर्ड्स, अशा काही हजार मंडळींची नावं या कागदपत्रांमध्ये आहेत. अक्षरशः शेकडो कोटी डॉलर्सचे व्यवहार यात आहेत. जवळपास पाचशे वेगवेगळ्या बँकांनी १५ हजारपेक्षा जास्त बनावट कंपन्या (shell companies) तयार करण्यात कसा हातभार लावला हेही या पनामा पेपर्समध्ये उघड झालं. तब्बल बारा देशांचे आजी किंवा माजी प्रमुख या कागदपत्रांत आहेत. ६० पेक्षा जास्त अशा व्यक्ती आहेत ज्या, राष्ट्रप्रमुखांचे नातेवाईक, मित्र वगैरे आहेत. पनामा पेपर्स उघड झाल्यापासून पाकिस्तानच्या नवाझ शरीफ याच्यासह इतर देशांच्या कित्येक पंतप्रधान, मंत्री, प्रमुख राजकीय नेते यांना आपापली पदं सोडावी लागली आहेत. जागतिक फुटबॉल संघटनेचा प्रचंड भ्रष्टाचार उघड झाला आहे. असंख्य देशांमध्ये चौकश्या बसल्या, आर्थिक गुन्ह्यांचा शोध घेणं सुरु झालं. ज्यांच्याकडे ही सगळी फुटलेली माहिती येत गेली त्या दोघा ओबेरमायर पत्रकारांनी ही थरारक कहाणी पुस्तक रूपाने लिहिली आहे.

इतकी प्रचंड माहिती फुटण्याचं हे जगातलं आजवरचं एकमेव उदाहरण. आंतरराष्ट्रीय स्तरावर पत्रकारांचं इतक्या मोठ्या प्रमाणात परस्पर सहकार्य तयार होत जगभरातला गैरकारभार उघड करण्याचंही हे एकमेव उदाहरण. आणि म्हणूनच ही सगळी घडामोड खुद्द दोघा ओबेरमायर यांच्या शब्दात वाचायला मिळणं हा एक भन्नाट अनुभव आहे. सुरुवातीलाच आडनावं सारखी असली तरी आम्ही दोघे भाऊ नाही असं ते पुस्तकात सांगतात. पुस्तक लिहिताना ते वर्तमानकाळातलं कथन असल्यासारखं लिहिलंय. या शैलीने मजा येते. जणू हे दोघे तुम्हाला पुन्हा त्या सगळ्या प्रक्रियेत नेतात. सामान्यतः आर्थिक घोटाळे क्लिष्ट स्वरूपाचे असतात. बनावट कंपन्यांच्या मार्फत पैसा परदेशात साठवणे या स्वरूपाचा घोटाळा असतो तेव्हा तर हे सगळं समजून घेणं अधिकच कठीण. मुळात कुठल्यातरी गैरमार्गाने कमावलेला पैसा लपवणे यासाठीच बनावट कंपन्यांचा उपयोग केला जात असल्याने मुद्दाम कष्ट आणि काळजी घेत लपवलेली गोष्ट खणून काढणं हे काम सोपं नाही. पैसा लपवण्यासाठी आणि बनावट कंपन्या उभारण्यासाठी मदत करणारी मोझाक-फॉन्सेका ही लॉ फर्म पनामा देशात असल्याने अनेक कागदपत्र स्पॅनिश भाषेत होती. बरं अगदी थोडी कागदपत्र असती तर तितकंसं क्लिष्ट झालं नसतं. पण जेव्हा तुमच्यासमोर एक कोटी कागदपत्र असतात तेव्हा मती गुंग न झाली तरच नवल.

पण ICIJ ने एकदा प्रकल्प हातात घेतल्यावर काही गोष्टी थोड्याफार सोप्या होऊ लागल्या हे लेखक आपल्याला सांगतात. मरीना वॉकर यांना या प्रकल्पाच्या प्रमुख समन्वयक म्हणून ICIJ ने नेमलं. मिळणारी ही सगळी माहिती कशी शोधावी हे सांगायला एक डेटा एक्स्पर्ट नेमला गेला- दक्षिण अमेरिकी मार्ल काबरा. त्याबरोबरच हेही आव्हान होतं की एकाच वेळी जगभरातले पत्रकार एवढा प्रचंड डेटा बघतील कसा? म्हणजे मग सगळ्यांसाठी एक सुरक्षित ऑनलाईन सिस्टीम बनवावी लागणार आणि त्यातच माहिती आणि प्रत्येकाने शोधलेल्या गोष्टीही टाकल्या जातील असं ठरलं. तशी सिस्टीम उभारली गेली. इतक्या सगळ्या कागदपत्रांना वाचायला गेलं की नेहमीचे वापरातले कॉम्प्युटर्स बंद पडत होते. तेव्हा मग ओबेरमायर आणि त्यांच्या टीमसाठी त्यांच्या वर्तमानपत्राच्या संपादक मंडळाने नवीन सुपर कंप्युटर घेण्याची परवानगी दिली. पुढे तर तोही कमी पडू लागल्यावर तब्बल १७,५०० डॉलर्स किंमतीचा अजूनच ताकदवान सुपर कंप्युटर घ्यावा लागला. एकूणच एवढी प्रचंड माहिती शोधायची तर अधिक चांगल्या सिस्टीमची- सॉफ्टवेअरची गरज होती. न्युइक्स नावाची ऑस्ट्रेलियन कंपनी अशा प्रकारची प्रणाली बनवते. पण न्युइक्स इन्व्हेस्टिगेटर प्रचंड महाग गोष्ट आहे. सहसा देशांची पोलीस खाती, गुप्तहेर यंत्रणा, शेअरबाजारावर देखरेख ठेवणाऱ्या यंत्रणा या न्युइक्स वपरतात. पण इथे ICIJ चा संचालक- जेरार्ड राईल कामी आला. तो स्वतः ऑस्ट्रेलियन असल्याने न्युइक्सशी संपर्क साधून त्यांना या प्रकल्पासाठी मदत करण्याची विंनती केली. ICIJ च्या या टीमला न्युइक्स इन्व्हेस्टिगेटर मोफत वापरायला मिळाला! चांगल्या कामासाठी कशा पद्धतीने लोक आपापला खारीचा वाटा उचलतात याचं एक उदाहरण.

आपल्या तशी ओळखीतली नावं मोझाक-फॉन्सेकाच्या फुटलेल्या माहितीत दिसू लागल्यावर आपला पुस्तकातला उत्साह वाढत जातो. रशियाचा सर्वेसर्वा व्लादिमिर पुतीन, चीनचे झी जिनपिंग, सिरीयाचा असाद, लिबियाचा गदाफी, पाकिस्तानचा नवाझ शरीफ असे राजकारणी, त्यांचे नातेवाईक किंवा इतर सहकारी, त्यांच्याशी संबंधित उद्योगपती या नावांबरोबर प्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी, युनायटेड नेशन्सचे माजी जनरल सेक्रेटरी कोफी अन्नान यांचा मुलगा कोजो अन्नान अशी नावं आपल्याला धक्का देऊन जातात.

ओबेरमायर ज्या ज्या घोटाळ्यांच्या शोधात स्वतः गुंतले होते त्याचीच मुख्यत्वे यात थोडी सविस्तर माहिती आहे. बाकीच्यांचे नुसते उल्लेख आहेत. भारतातील इंडियन एक्स्प्रेस ग्रुप या संशोधनात सहभागी होता. पुस्तकात याचा उल्लेख आहे. परंतु तपशील नाहीत. आणि ते स्वाभाविकच म्हणावं लागेल, कारण प्रत्येक घोटाळा तपशीलांत लिहायचं तर पुस्तकाच्या साडेतीनशे पानांत ते कधीच मावलं नसतं. इंडियन एक्स्प्रेसने पनामा पेपर्सचा अभ्यास करून त्यात पाचशेपेक्षा जास्त भारतीय असल्याचं उघड केलंय. अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय, डीएलएफ कंपनीचे केपी सिंग आणि त्यांचे काही नातेवाईक, इंडिया बुल्सचे समीर गेहलोत आणि या बरोबरच आपल्या पंतप्रधानांच्या जवळचे मानले जाणारे गौतम अदानी यांचे बंधू विनोद अदानी; यांची नावं या यादीत आहेत. २०१३ मध्येच मृत पावलेला, कुख्यात डॉन दाउद इब्राहीमचा साथीदार, इक्बाल मिरची याचंही नाव या यादीत झळकलंय.

ज्याला काहीतरी लपवायचे आहे, तोच परदेशात बनावट कंपन्या स्थापन करतो असं हे लेखक ठासून सांगतात. केवळ कर चुकवून बाहेर नेलेला पैसा एवढं आणि इतकं साधं हे नाही हे सांगण्यासाठी दोघा ओबेरमायरने अनेक उदाहरणं दिली आहेत. सिरीयामध्ये चालू असणाऱ्या यादवी युद्धाच्या दृष्टीने महत्त्वाच्या व्यक्तींचा पैसा फिरवला गेला आहे. तिथे हजारो निष्पाप मंडळींचं शिरकाण चालू आहे आणि एक प्रकारे बनावट कंपन्यांच्या माध्यमातून या सगळ्याला मदतच केली जात आहे. लोकशाही देशांत काळा पैसा निवडणुकीत ओतून पुन्हा आपली सत्ता स्थिर करण्यासाठी वापरला जातो हेही हे लेखक सूचित करतात. आफ्रिकन देशांची त्यांच्याच हुकुमशहा आणि नेत्यांनी कशी आणि केवढ्या प्रचंड प्रमाणात लूटमार केली आहे, बघता बघता आईसलँडसारख्या एका श्रीमंत देशाचं दिवाळं कसं वाजतं या सगळ्याचं तपशिलांसह वर्णन या पुस्तकात आहे. ड्रग माफियांचा पैसा जेव्हा बनावट कंपन्यांच्या मार्फत परदेशात नेला जातो, तेव्हा ती फक्त कर चुकवेगिरी नसते, किंवा तो नुसताच आर्थिक घोटाळा नसतो, हे या लेखकांचं म्हणणं पटल्याशिवाय राहात नाही. आर्थिक घोटाळे तसे समजायला कठीण वाटू शकतात. ते असतातही तसे गुंतागुंतीचे. म्हणूनच काही तांत्रिक शब्द आणि त्याचे नेमके अर्थ असे पुस्तकाच्या शेवटी एका यादीत दिले आहेत. त्या यादीची मदत होते. पुस्तकाची भाषा सोपी, सुटसुटीत आणि प्रवाही आहे. एकूण पैशाचे आकडे, समोर येत जाणारी नावं, कशा पद्धतीने बनावट कंपन्यांच्या सहाय्याने परदेशी पैसा नेला जातो, या सगळ्याचा पुस्तक वाचून अंदाज येईल.

शोधपत्रकारांवर येणाऱ्या दबावाचा उल्लेख पुस्तकात वारंवार येतो. दोघे लेखक हे जर्मनीचे रहिवासी असल्याने स्वतःला सुदैवी मानतात. परंतु इतर देशांमध्ये भयानक स्थिती असल्याचंही निदर्शनाला आणून देतात. पनामा पेपर्स प्रसिद्ध करून काही शोधपत्रकार अक्षरशः जीवाची बाजी लावत आहेत. या टीममधल्या रशियामधल्या दोघा पत्रकारांचे फोटो देशद्रोही आणि अमेरिकेचे एजंट असं म्हणत टीव्हीवर दाखवले गेले. पनामा पेपर्सबाबतचे एक कार्टून प्रसारित करणाऱ्या चीनी वकिलाला अटक झाली. हॉंगकॉंगमधल्या एका वर्तमानपत्राच्या मुख्य संपादकाला काढून टाकण्यात आलं, व्हेनेझुएला मधल्या पत्रकाराला नोकरीवरून कमी केलं गेलं, ट्युनिशियामधल्या पनामा पेपर्सची बातमी देणाऱ्या ऑनलाईन मासिकाची वेबसाईट हॅक केली गेली. खुद्द पनामामध्ये ३ एप्रिलचं वर्तमानपत्र हिंसाचार होईल या भीतीने वेगळ्या गुप्त ठिकाणी छापावं लागलं. पण जगभर या पनामा पेपर्सने उलथापालथ घडवली. आणि अजूनही घडतेच आहे. त्या कागदपत्रांच्या आधारे, नवीन चौकश्यांच्या आधारे रोज नवनवीन गोष्टी सातत्याने समोर येत आहेत. आणि हे सगळं घडलं फक्त एका- मोझाक फॉन्सेका या केवळ एका लॉ फर्मच्या कागदपत्रांच्या आधारे. अशा बनावट कंपन्या स्थापन करून देणाऱ्या इतर असंख्य संस्था जगभर सर्वत्र आहेत. म्हणजे काळा पैसा देशाबाहेर नेण्याची यंत्रणा केवढी प्रचंड मोठी आणि व्यापक असेल याचा अंदाज सुद्धा करवत नाही.

ज्या अनामिक व्यक्तीने ही सगळी माहिती फोडली, त्या जॉन डोने सगळी माहिती देऊन झाल्यावर सगळ्यात शेवटी जगासाठी एक संदेश देखील पाठवला. जगात वाढत जाणारी आर्थिक विषमता यामुळे अस्वस्थ होत त्याने हे कृत्य केल्याचं म्हणलंय. त्या आधीच्या प्रकरणांत लेखक काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित करतात. आधुनिक लोकशाही समाजातसुद्धा पैशाच्या जोरावर देशांचे कायदे-नियम धाब्यावर बसवणाऱ्या एक टक्के लोकांमुळे कायद्याचं इमाने इतबारे पालन करणाऱ्या ९९ टक्के सामान्य जनतेवर अन्याय होत असतो हे या पनामा पेपर्समधल्या माहितीमुळे उघड्या नागड्या रुपात समोर येतं. हे पुस्तक एकदा हातात घेतलं की ठेववतच नाही. अर्थकारण-समाजकारण-राजकारण यात रस असणाऱ्याने अगदी आवर्जून वाचावं आणि समजून घ्यावं असं हे पुस्तक- द पनामा पेपर्स.

पुस्तकाचं नाव - द पनामा पेपर्स- ब्रेकिंग द स्टोरी ऑफ हाऊ द रिच अँड पावरफुल हाईड देअर मनी.

लेखक- बास्टीयन ओबेरमायर आणि फ्रेडरिक ओबेरमायर

प्रकाशक – वन वर्ल्ड पब्लिशर

किंमत – रु. ४९९/-


(दि. ६ जुलै २०१८ रोजी प्रकाशित झालेल्या लोकप्रभा या साप्ताहिकात प्रसिद्ध.)