सुमारे ९० वर्षांपूर्वी एका अत्यंत
विद्वान, हुशार अशा गणिताच्या प्राध्यापकाने निर्भीडपणे अशी काही मते मांडायला
सुरुवात केली की ज्यामुळे पुण्या मुंबईतल्या स्वघोषित धर्म अन् संस्कृतीरक्षक
मंडळींच्या तळपायाची आग मस्तकात गेली. पण या माणसाने त्या लोकांची टीका सहन केली,
आकसाने कोर्टात खटले झाले तेही पचवले, दारिद्र्यात दिवस काढले पण लोकांना योग्य ती
शिकवण देण्याचे काम अविरत चालू ठेवले. या महान माणसाच्या हयातीत त्याचे कधीच कौतुक
झाले नाही. पण त्याची वैचारिक झेप बघितली तर आजही थक्क व्हायला होतं. आज ज्याबद्दल
आपण बोलत असतो त्याविषयी या माणसाने ९० वर्षांपूर्वी, तेव्हाच्या कर्मठ लोकांना न
जुमानता, विचार मांडले. या माणसाचे नाव र.धों म्हणजेच- रघुनाथ धोंडो कर्वे.
रधोंचे वडील म्हणजे एका विधवेशी पुनर्विवाह करून कर्मठ लोकांच्या
पुण्यात आपल्या कार्याची मुहूर्तमेढ रोवणारे महर्षी धोंडो केशव उर्फ अण्णासाहेब
कर्वे. महर्षी कर्व्यांनी त्यांच्या काळी विधवेशी विवाह करून समाजाला जो अभूतपूर्व
धक्का दिला त्याहून कित्येक पटींनी धक्कादायक असे विचार रधोंनी मांडले असं
म्हणायला हरकत नाही. विधवांना शिकवणं एकवेळ मंजूर झालं समाजात, पण विवाह
संस्थेपासून लैंगिक स्वातंत्र्यापर्यंत रधोंनी मांडलेले विचार समाजाला मूळापासून
गदागदा लावणारे होते यात शंकाच नाही.
रधोंचे अनेक विचार आजही पचवणं कठीण जाईल असे आहेत. बहुतांश सामाजिक
प्रश्नांचे मूळ हे भरमसाठ वाढत जाणाऱ्या लोकसंख्येत आहे हे त्याचं मत आज
बहुतेकांना पटलं आहे, मान्य झालं आहे. पण आजही ‘स्त्री स्वातंत्र्याच्या गप्पा
कितीही केल्या तरी जोवर स्त्रीला लैंगिक स्वातंत्र्य मिळत नाही तोवर, स्त्री खऱ्या
अर्थाने स्वतंत्र होणार नाही’ यासारखी त्यांची मते आपल्या आजच्या समाजालाही पचवणं
अवघड आहेच. समाजात मोकळेपणाने लैंगिकतेविषयी चर्चा व्हावी, त्या बाबतीत आडपडदा
नसावा आणि त्याहून महत्वाचं म्हणजे लैंगिक सुख घेणे म्हणजे काहीतरी चुकीचे,
अपवित्र आणि पाप करतो आहे ही भावना मनातून काढून टाकून याबाबतीत प्रमाणिकपणा
स्वीकारायला हवा ही रधोंची मते आजही समाजात प्रत्यक्षात उतरलेली नाहीत. तर्कशुद्ध,
विज्ञाननिष्ठ विचार ही रधोंची खासियत. ‘समाजस्वास्थ्य’ हे मासिक काढून
वर्षानुवर्षे लोकांना शिक्षण देत राहिले रधों. पण त्या वेळी जितका कर्मठ समाज आपला
होता तितका तो आता कर्मठ राहिला नसला तरी देवभोळेपणा आजही आपल्या समाजात आहे.
अंधश्रद्धा तर वाढतंच जात आहेत. कोणताही बाबा बुवा उठतो आणि बलात्कारांपासून
वाचण्यासाठी मंत्र वगैरे म्हणण्याचे बिनडोक उपाय सांगतो, आणि हजारो लाखो लोक
त्यांच्या नावाचा जप करतात हे बघितल्यावर रधोंनी शंभर वर्षांपूर्वी जे सांगितलं ते
वाया गेलं की काय असं वाटतं.
रधों त्या वेळीही उपेक्षित होते, आजही उपेक्षितच राहिले आहेत. लैंगिकता,
खुलेपणा, स्त्री-पुरुष समानता याविषयी बोलू लागल्यावर पाश्चात्य देश आपल्या कसे
पुढे असतात असा एक विचार आपल्या डोक्यात सहज येऊन जाण्याची शक्यता असते. संततीनियमन
करण्याची साधने विक्री करणारे आणि त्याबाबत शास्त्रशुद्ध माहिती देणारे क्लिनिक
रधोंनी १९२१ साली सुरु केलं होतं त्याच वर्षी अशा पद्धतीचं क्लिनिक लंडन मध्येही
प्रथमच सुरु झालं होतं हे बघितल्यास रधोंची वैचारिक झेप लक्षात यावी. १९२१! कर्मठ
धार्मिकता, अस्पृश्यता, बालविवाह आणि दारिद्र्याने गांजलेला असा आपला समाज होता
तेव्हा. अशावेळी संततीनियमन करण्याची कंडोम सारखी साधनं विक्रीचे क्लिनिक काढावे
हे केवढे अचाट कार्य आहे! आज ९० वर्षांनंतरही आमच्या समाजात खुलेपणाने कंडोम हा
शब्द देखील उच्चारण्याची चोरी आहे. ‘या अशा शब्दांमुळे आमच्या समाजातल्या
पुरुषांच्या भावना चाळवल्या जातात आणि म्हणून बलात्कार होतात’ असली बिनबुडाची भंपक
विधाने आमचे नेते, खाप पंचायती आणि बाबा-बुवा करतात ही मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे.
रधोंची कर्मभूमी असलेल्या मुंबई शहराच्या महापालिकेतले सुमार बुद्धीचे सर्वपक्षीय नगरसेवक
एकमताने अंतर्वस्त्रांच्या दुकानातील पुतळ्यांवर बंदी आणतात या बालिशपणाला काय
म्हणावे? समाजाला मध्ययुगात, अंधारयुगात नेत आहोत काय आपण पुन्हा? पब मध्ये जाऊन
मुलींना मारहाण करणाऱ्या तथाकथित धर्मरक्षक ‘सेना’ आजही उजळ माथ्याने फिरतात.
किंबहुना अशा सेना अन् ब्रिगेडसची आणि त्यांच्या समर्थकांची संख्या दिवसेंदिवस
वाढत चालली आहे. ही फार गंभीरपणे विचार करण्याची गोष्ट आहे असं मला वाटतं.
हे बदलायला हवं. ‘समाजस्वास्थ्य’ जापायचं असेल तर मुख्यतः
नैतिक-अनैतिकतेच्या दांभिक आणि भिकार कल्पनांना कवटाळून बसणं थांबलं पाहिजे. आपण
कितीही स्त्री स्वातंत्र्य आणि स्त्री-पुरुष समानता याविषयी बोललो तरी रधोंच्या लैंगिकतेविषयीच्या
परखड मतांना डावलून चालणार नाही. त्यांच्या विचारांवर, लेखनावर गांभीर्याने विचार व्हायला
हवा. वाद-विवाद व्हायला हवेत. खुलेपणाने चर्चा व्हायला हवी...
*(रधोंबद्दल अधिक जाणून
घ्यायचे असल्यास, रधोंचे संपूर्ण लेखन आता बाजारात उपलब्ध आहे. डॉ. अनंत देशमुख
यांनी रधोंचे चरित्र लिहिले आहे तेही अवश्य वाचावे. त्याशिवाय अमोल पालेकर यांचा किशोर
कदम यांची मुख्य भूमिका असलेला ‘ध्यासपर्व’ नावाचा एक अप्रतिम चित्रपटही
बघण्यासारखा आहे.)