Thursday, December 22, 2011

सर'कार'नामा...!

चारचाकी गाडी ही गोष्ट प्रतिष्ठेची आणि मानाची समजली जाते. साहजिकच राजकारण आणि सत्ताकारण यामध्ये गाडीला विशेष महत्व आहे. माझ्या डोक्यात जेव्हा हा विषय पहिल्यांदा आला तेव्हा सगळ्यात आधी मला जुने मराठी सिनेमे आठवले. विशेषतः सामना आणि सिंहासन. दोन्हीमध्ये राजकारण आणि राजकारणी मंडळी. साधारणपणे गावातला पाटील- राजकारणी यांच्याकडे कायम एक जीप. ती जीप म्हणजे एक सत्तेचे केंद्रच. अगदी हिंदी फिल्म्स मध्ये सुद्धा गावच्या ठाकूर कडे कायम एक जीप. ज्याच्या ड्रायव्हर किंवा त्या शेजारच्या सीट वर बसून ते आपली सत्ता गाजवणार...! सिंहासन मध्ये गावातल्या आमदाराकडे जीप आणि शहरात मात्र गाड्यांमध्ये विविधता हे अगदी व्यवस्थित दाखवलं आहे. 
मध्यंतरी निवडणुका राजकारण वगैरे विषयांवर एका मित्राशी गप्पा सुरु झाल्या. तो मित्र मुळातला कलाकार, त्याचा राजकारण वगैरेशी फार संबंध नाही. आवर्जून मतदान करायला मात्र जातो तो. बोलता बोलता तो एकदम उसळून म्हणला," जे लोक रस्त्यात बोलेरो गाडी उभी करतात आणि ट्राफिक जाम करतात त्यांना गां*वर वेताच्या छडीने फटके दिले पाहिजेत..."
किती प्रातिनिधिक प्रतिक्रिया होती ही...! 
पूर्वी लाल दिव्याची गाडी, किंवा भारत सरकार, महाराष्ट्र शासन वगैरे लिहिलेली गाडी (बहुतेक वेळा Ambassador) दिसली तर त्याला मान दिला जात असे. तो मान आम्हालाही मिळाला पाहिजे, या भावनेतूनच कदाचित गाडीवर पक्षाचा/ संघटनेचा किंवा तत्सम स्टीकर लावणे ही गोष्ट सुरु झाली असावी. शिवसेनेचा वाघ, मनसेचा झेंडा, राष्ट्रवादीचे घड्याळ, काँग्रेसचा हात यांचे स्टीकर आजकाल गाड्यांवर सर्रास बघायला मिळतात. वास्तविक पाहता नंबरप्लेटवर स्टीकर किंवा चित्र असण्यावर कायद्याने बंदी आहे. तसे असल्यास रु १००/- एवढा दंडही आहे. पण तरीही आमचे नेते बिनधास्तपणे नंबरप्लेटवर आपले चिन्ह चिकटवतात.. बिचारे ट्राफिक हवालदार! अशा गाड्यांवर कारवाई करावी तर पंचाईतच.. चुकून एखाद्या सापाच्या शेपटीवर पाय पडला तर काय घ्या..! त्यामुळे या गाड्या रस्त्याच्या मध्यात कोणाचीच तमा न बाळगता उभ्या केल्या जातात. अनेकदा यातून दाढी वाढलेली अवाढव्य देह असलेली आणि चेहऱ्यावर प्रचंड गुर्मी असणारी गुंड दिसणारी (असतीलच असं नाही !) माणसं उतरतात. मग काय बिशाद कोणा पुणेकराची की तो त्यांना इथे गाडी लावू नका म्हणून सुनावेल?! ट्राफिक जाम झाल्यावर लोक या मंडळींना शिव्या देत पुढे जातात पण निवडणुकीच्या वेळी मात्र या सगळ्या गोष्टी विसरून मतदान करतात किंवा करतंच नाहीत...! (पुणेकरांना स्मृतिभ्रंश झाला आहे... त्यामुळे कलमाडी पुण्याचा खासदार आहे यात काहीच आश्चर्य नाही...!!) पण चिंता नसावी राजकीय पक्ष अशा प्रकारे रस्त्यात आपली अवाढव्य गाडी उभी करून ट्राफिक निर्माण करतात आणि पुणेकरांना भविष्यात वाढणाऱ्या प्रचंड ट्राफिक चे आत्तापासूनच ट्रेनिंग देतात. या दिव्यातून तावून सुलाखून बाहेर पडल्यावर पुण्याच्या छोट्या रस्त्यांवर कितीही ट्राफिक वाढला तरी पुणेकर आत्मविश्वासाने तोंड देतील याबद्दल मला जराही संदेह नाही..!  
मनसेने या सगळ्या बाबतीत बऱ्यापैकी बाजी मारली आहे. पूर्वी शिवसेना आघाडीवर होती. राष्ट्रवादी बऱ्यापैकी आहे. काँग्रेस तुरळक आणि भाजप अगदी कमी (किमान या बाबतीत तरी पार्टी विथ डिफरन्स असं त्यांना म्हणता येतं!). कार वर असणारे स्टिकर्स आहेतच पण मनसेने दुचाकी पण सोडल्या नाहीत. दुचाकी च्या नंबरप्लेटवर मनसेचा झेंडा असणं ही गोष्ट नवीन राहिली नाहीये... साहजिकच अशी बाईक कोणी चालवत असेल तर आजूबाजूचे मध्यमवर्गीय पांढरपेशा लोक गाडी हळू आणि जपूनच चालवतात. एकूणच यामुळे वाहतूक सुरळीत राहायला मदत होते हे आपण लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे असे समाजकार्य करणाऱ्या या मंडळींना शिव्या देणे आपण थांबवावे असे विनम्र आवाहन... 
या सामाजिक कार्यात राजकीय पक्षच आघाडीवर असले तरी इतर सामाजिक संस्था आणि स्वघोषित जातीय पुढारी यांचा वाटा नक्कीच मोठा आहे. "राजे", "राजे, पुन्हा जन्माला या", "मी मराठा", "मी मराठी", "ब्रिगेड", "पतित पावन" अशा स्टिकर्सनी गाड्या अप्रतिम रंगवलेल्या असतात. एकूणच आपल्या जीवनान्त्ला एकसुरीपणा दूर करण्याचे श्रेय या मंडळींना जाते. 
सध्याच्या सुधारलेल्या आर्थिक परिस्थितीत, झगमगत असलेल्या मॉल वाल्या दुनियेत साहजिकच स्वातंत्र्य आणि मुक्त वावर वाढला आहे. परंतु हे सगळं तात्पुरतं आहे याची जाणीव याच संघटना पक्ष करून देत असतात. कितीही सुंदर काचेची दुकानं तुम्ही बांधलीत तरी "बंद" च्या दिवशी ती उघडी ठेवण्याचं स्वातंत्र्य तुम्हाला नाही.. इतकेच नव्हे तर valentine day वगैरे ला मुक्तपणे फिरावं म्हणणाऱ्या मंडळींना चोप मिळेल असा संदेश या संस्था देतात... या सगळ्याची आठवण सातत्याने या कार वरच्या स्टिकर्स मधून तुम्हाला-आम्हाला या संस्था सातत्याने करून देत असतात. साहजिकच "उगीचच भयमुक्त राहू नका... आम्ही आहोत" असा संदेश या स्टिकर्स च्या माध्यमातून समाजाला दिला जातो...!
वास्तवाची जाणीव करून देण्याचे फार मोठे काम या स्टिकर्स असलेल्या दुचाक्या आणि गाड्या करत असतात. प्रत्येक गोष्टीकडे स'कारा'त्मक दृष्ट्या बघितले पाहिजे. 
आपली गाडी नो पार्किंग मध्ये उभी असल्यावर ती उचलून नेली जाते. शिवाय दंड भरावा लागतो किंवा तो टाळण्यासाठी पोलिसाचे खिसे गरम करावे लागतात आणि भ्रष्टाचार वाढतो. त्यामुळे माझे समस्त पुणेकरांना आवाहन की त्यांनी लवकरात लवकर स्टीकर पद्धतीचा अवलंब करावा. आपण मत कोणालाही देत असाल किंवा नसाल, नंबर प्लेटवर कोणत्यातरी पक्षाचे चिन्ह असणे फार गरजेचे आहे. शिवाय गाडीच्या काचेवर राजे/शिवराय/आम्ही कोल्हापूरचे/ छत्रपती/ नडेल त्याला तोडेल/ छावा/ सरकार राज/जय महाराष्ट्र वगैरे वगैरेचे स्टिकर्स लावून घ्यावेत. किंवा फारशी चिंता न करता स्थानिक आमदाराचे नाव फोटोचा स्टीकर करून तो लावावा. यामुळे आपली गाडी कुठेही असली तरी उचलली जाणार नाही. थोडक्यात भ्रष्टाचाराची पाळी येणार नाही. आणि एकूणच भ्रष्टाचार कमी होईल. उपोषण वगैरे मार्गांपेक्षा भ्रष्टाचार निर्मुलनासाठी स्टीकरचा मार्ग सोपा आहे हेच मी यातून सिद्ध करत आहे..! 
माझा हा लेख वाचून जास्तीत जास्त लोकांनी स्टिकर्स लावले तर, लोकपालचे जसे 'जन'लोकपाल झाले.. तसेच या लेखाचे नाव मी सर'कार'नामा वरून जन'कार'नामा असे ठेवीन असे मी जाहीर आश्वासन देतो..! 
बाकी तुम्ही सुज्ञ आहात... आवश्यक तो संदेश घ्यावा...!!