Saturday, February 24, 2018

शुद्धतेच्या अशुद्ध कल्पना

“वनपर्वाच्या ३०७ व्या अध्यायात सूर्य म्हणतो, हे कुंती, कन्या शब्दाची उत्पत्ती कम् या धातूपासून झाली असून त्याचा अर्थ हव्या त्या पुरुषाची इच्छा करू शकणारी असा आहे. कन्या स्वतंत्र आहे स्त्रिया व पुरुष यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा आडपडदा नसणे हीच लोकांची स्वाभाविक स्थिती असून विवाहादिक संस्कार कृत्रिम आहेत...”, १९२३ मध्ये इतिहासाचार्य राजवाडे यांनी भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास या पुस्तकात आपल्या पूर्वजांच्या स्त्री-पुरुष नातेसंबंधांच्या कल्पना काय होत्या याबद्दल सांगताना हे लिहिलं आहे. या घटनेला जवळपास तब्बल शंभर वर्ष झाली आहेत. सुमारे सत्तर ऐंशी वर्षांपूर्वी महाराष्ट्रातच र.धों. कर्वे नावाचा एक माणूस संततिनियमनाचा प्रसार व्हावा आणि स्त्रियांना लैंगिक स्वातंत्र्य मिळावं यासाठी अहोरात्र झटत होता.

ही दोन उदाहरणं मुद्दाम दिली. गेल्या शतकात मांडले गेलेले हे विचार बघता,  आज आपला समाज फारच वेगळ्या कुठल्यातरी टप्प्यावर उभा असायला हवा अशी एखाद्या बाहेरून बघणाऱ्याची समजूत होईल. पण त्याच वेळी, लग्नाच्या वेळी जात पंचायतीने कौमार्य तपासून बघण्याच्या आत्ताच्या आपल्या समाजातल्या घटना ऐकल्या की चक्रावून जायला होतं. आणि मग यातून आपल्या शुद्धतेच्या आणि पावित्र्याच्या सगळ्या कल्पनांचा असणारा पगडा डोक्यात आल्यावाचून राहत नाही. तत्त्वतः, शुद्धतेच्या आजच्या कल्पना स्त्री-पुरुष दोघांनाही लागू केल्या जात असल्या तरी, स्त्रिया त्यात जास्त भरडल्या जातात हे वास्तव आहे. आणि म्हणून या मुद्द्यांकडे स्त्री-पुरुष समानता आणि स्वातंत्र्य या अंगानेच बघायला हवं. 

लैंगिक स्वातंत्र्य असा उच्चार जरी केला तरी अनेकांच्या तळपायाची आग अगदी मस्तकात जाते. “हे असलं सगळं म्हणजे स्वैराचाराला स्वातंत्र्याचा मुलामा देण्यासारखं आहे” हा विचार कित्येकांच्या डोक्यात येतोच येतो. पण स्वातंत्र्य कुठे संपतं आणि स्वैराचार कुठे सुरु होतो हे कोणी ठरवायचं? आणि कशाच्या आधारावर? निव्वळ संस्कृती आणि परंपरांचे दाखले द्यायचे तर इतिहासाचार्य राजवाडे आपल्या पुस्तकात त्या सांस्कृतिक दाखल्यांची अक्षरशः चिरफाड करतात. मग हातात काय उरतं? आपले वाडवडील कसे वागले ते बघणं? पण याही बाबतीत आपण साफ गडबडतोच की. आमच्या दोन पिढ्या आधी अविवाहित तरुण-तरुणींचे एकत्र असे सर्रास मित्र-मैत्रिणींचे गट कॉलेजात असत का? माझ्या आईवडिलांच्या पिढीमध्ये ते होते. म्हणजे माझ्या आईवडिलांच्या पिढीने स्वैराचार केला काय? स्वातंत्र्य आणि स्वैराचाराच्या कल्पना म्हणजे कधीही न बदलता येणारी गोष्ट नव्हे. उलट स्थळकाळानुसार यात प्रचंड बदल होत गेले आहेत, यापुढेही होणार आहेत. याचं सगळ्यात मुख्य कारण म्हणजे त्या कल्पना आहेत. युवाल नोआह हरारी नावाचा लेखक आपल्या सेपियन्स या सध्याच्या अत्यंत गाजणाऱ्या पुस्तकात या प्रकारच्या कल्पनांना इमॅजीन्ड रिअॅलिटी म्हणतो. म्हणजे काल्पनिक वास्तव. आणि अर्थातच हे काल्पनिक असल्यानेच परिवर्तनीय आहे.
कॉलेजमध्ये गर्लफ्रेंड/बॉयफ्रेंड असणं ही गोष्ट आता आश्चर्याची किंवा कुतूहलाची नाही. हे जे नातं निर्माण होतं हे पुढे जाऊन लग्नामध्येच अपग्रेड होईल याची शाश्वती नात्यात असणारे स्वतः मुलगा-मुलगी कोणी देईलच असं नाही. तशी शाश्वती देणंही कठीणच आहे म्हणा. कारण डिग्री हातात पडली की लग्नाचा बार उडवून टाकायची पद्धत आता शहरी सुशिक्षित वर्गात तरी नाही. आधीपेक्षा मुलं-मुली आता लवकर वयात येऊ लागल्या आहेत असं मध्ये आमच्या एका कार्यक्रमांत एक डॉक्टर वक्त्या होत्या त्या म्हणत होत्या. (१० फेब्रुवारीच्या म.टा. च्या मैफल पुरवणीत यावर एक लेखही आला होता.) वयात येणं म्हणजेच, लैंगिक उर्मी निर्माण व्हायला सुरुवात होणं आणि प्रत्यक्ष लग्न होणं यातला कालावधी बघितला तर आधीपेक्षा तो जवळ जवळ दुप्पट झालाय. हे घडत असतानाच माहिती तंत्रज्ञान आणि अर्थकारणाने आपलं आयुष्य आमूलाग्र बदललं आहे. स्त्री-पुरुष संबंधांमध्ये मोकळेपणा आलाय. आमच्या आधीच्या पिढीपेक्षा आजच्या पिढीत शाळा-कॉलेजपासूनच मित्र मैत्रिणींमध्ये स्पर्शाची भाषा कितीतरी अधिक आहे. एकमेकांना सहजपणे मिठी मारणं ही काय दुर्मिळ गोष्ट नाही. अशा परिस्थितीत माणसाच्या शुद्धतेच्या कल्पना एकदा तपासून बघायला नकोत का? नाही तर होतं काय, की शेवटी बहुतांश तरुण मंडळी स्वतःतल्या नैसर्गिक असणार्‍या उर्मी दाबून ठेवू शकत तर नाहीतच, पण वरून मात्र खोट्या नैतिकतेचा बुरखा पांघरतात. आपल्या मध्ययुगीन सामाजिक संकल्पनांमुळे आपण आपला समाज अधिकाधिक दांभिक करण्यात हातभार लावत नाही का?

याच चर्चेतून मग आपण येऊन पोचतो ते व्हर्जिनिटी नावाच्या प्रांतात. एखादी व्यक्ती (स्त्री किंवा पुरुष) ही लग्नाआधी व्हर्जिनच असली पाहिजे या विचारांमागे एक काल्पनिक वास्तव आहे. आणि ते वास्तव म्हणजे- अशीच व्यक्ती शुद्ध असते. मागे एकदा रिलेशनशिप- मनातलं ओठांवर या नावाचा आम्ही एक कार्यक्रम घेतला होता. सगळ्या विषयांवर खुल्लम खुल्ला बोलायचा मंच असं आम्ही म्हणलं होतं त्याचं वर्णन करताना. त्यावेळी काही मुला-मुलींनी महत्त्वाचा मुद्दा मांडला, ‘आपण शरीराच्या व्हर्जिनिटीबद्दल बोलतो. पण मनाच्या व्हर्जिनिटीचं काय?’. २०१७ च्या प्रपंच या दिवाळी अंकात लेखक राजन खान यांनी आपल्यातल्या व्यभिचारी निसर्ग नावाचा एक सुंदर लेख लिहिलाय. व्यभिचार हा केवळ शारीरिक पातळीवर नसतो तर तो मनाच्या पातळीवरही असतो ही त्या लेखातली त्यांची भूमिका न पटण्याचं काहीच कारण नाही. समजा मी एक व्यक्ती म्हणून सामाजिक संकल्पनांना मान देत शारीरिक दृष्ट्‍या व्हर्जिन असेन, पण मनात मात्र दुसर्‍या एका व्यक्तीने घर केले होते. त्या व्यक्तीबरोबर मी अनेक सामायिक अनुभव निर्माण करत नातं तयार केलं होतं, आता काही नाहीये, पण भूतकाळात तर होतंच, अशी परिस्थिती असेल. मग मी मानसिक दृष्ट्‍या, भावनिक दृष्ट्‍या व्हर्जिन नाही. आता काय करायचं? मी अशुद्ध आहे का? यावर मनात काय आहे या गोष्टीला महत्त्व नाही असं जर उत्तर असेल तर व्यक्तीच्या मनाला आपण किती कमी लेखतो आणि शरीराला म्हणजे बाह्य गोष्टींना महत्त्व देतो हेच सिद्ध होतं. आपला शुद्धतेचा पोकळ डौल तेवढा उघड होतो यातून. या अशुद्ध कल्पनांमधून जेवढे लवकर बाहेर तेवढं उत्तम.
समोर असणाऱ्या माणसाला माणूस म्हणून वागवणं, काल्पनिक वास्तवांच्या फार आहारी न जाणं याला पर्याय नाही. काल्पनिक वास्तवांच्या आहारी गेल्यावर हेच ते अंतिम सत्य या अविर्भावात आपण बोलू लागतो. जगाचा आणि तंत्रज्ञानाने निर्माण झालेल्या परिस्थितीचा रेटा एका बाजूने आणि दुसऱ्या बाजूने आपल्या दुनियेला मध्ययुगात ठेवण्याचा आपला अट्टाहास; यातून संघर्ष तेवढा उभा राहतो. लग्न करताना किंवा जोडीदार निवडताना, आणि त्यानंतर एकत्र राहतानाही या सगळ्याचा विचार करणं गरजेचं आहे. आमच्या पिढीने तर अधिकच. नाही तर या संघर्षात सगळ्यात जास्त नुकसान आमचंच आहे. आमचं आणि आमच्या पुढच्या पिढीचं. 

(दि. २४ फेब्रुवारी २०१८ रोजी प्रकाशित झालेल्या महाराष्ट्र टाईम्सच्या मैफल पुरवणीत प्रसिद्ध.)

Saturday, February 10, 2018

हास्य महात्म्य

माझ्या कामामुळे गेल्या तीन वर्षात लग्नाला उभ्या असणाऱ्या असंख्य मुला-मुलींशी बोलता आलंय. जोडीदाराबाबत तुमच्या काय अपेक्षा आहेत असा प्रश्न विचारल्यावर अनेक अपेक्षांची जंत्री समोरून येते. त्यात वय-जात-पगार-उंची-शिक्षण अशा सगळ्या ठराविक गोष्टींचा समावेश आहे. ‘समजूतदार जोडीदार असावा’ हेही आहे. पण अगदी एका हाताच्या बोटावर मोजण्याइतके अपवाद सोडले तर बाकी कोणीही जोडीदाराची विनोदबुद्धी उत्तम असावी अशी अपेक्षा सांगितलेली नाही. मला या गोष्टीचं प्रचंड आश्चर्य वाटतं. हसणं ही एक विलक्षण गोष्ट आहे. मानव जातीला असलेलं ते एक वरदान आहे. एखादी व्यक्ती हर्षा भोगले सारखी असते की ज्याच्या प्रसन्न हसण्याने सगळं वातावरणाच प्रसन्न होऊन जातं. काही जणांचं हसणं इतकं निर्मळ असतं की त्या निर्मळतेची भूल पडावी. चोवीस वर्ष सातत्याने खेळूनही, अगदी मैदानावरच्या शेवटच्या दिवशीही विकेट
पडल्यावर सचिन तेंडूलकर तितकाच निर्मळपणे कसा हसू शकतो?!!! या निर्मळ हसण्याची पडतेच भूल. काहींचं हसणं इतकं दिलखुलास की त्या मोकळेपणामुळे समोरचाही एकदम मोकळा होऊन जावा. 'कौन बनेगा..' मध्ये अमिताभ समोरच्याला किती जास्त कम्फर्टेबल करायचा, आठवतंय?!. एखाद्याचं खुनशी हास्य ज्यामुळे समोरच्याला कापरं भरावं. एखादीच माधुरी नाहीतर मधुबाला जिच्या केवळ एका हास्यासाठी लाखो लोक दिवाने व्हावेत. एखादीच मोनालिसा, जिच्या स्मित हास्यावर शेकडो वर्ष उलटली तरी चर्चा थांबत नाहीत.

सामान्यतः ओळखीचा माणूस समोर दिसला तर त्याच्याकडे पाहून आपण हसतो आणि समोरचाही माणूस हसूनच प्रतिसाद देतो. जगात कुठेही गेलात तरी यामध्ये फरक पडणार नाही. कारण हीच माणसाची स्वाभाविक प्रतिक्रिया असते. 'शिष्टाचार' या नावाखाली निर्मळ आणि स्वच्छ हसण्याची फार गळचेपी केली आहे. उगीचच थोडसंच कसनुसं हसायचं किंवा हसताना आवाज करायचा नाही.. असल्या फालतू आणि फुटकळ शिष्टचारांमुळे अनेक जण मोकळेपणे हसणं विसरून गेले आहेत की काय असं मला वाटतं. माझ्या ओळखीत काही मंडळी आहेत, कदाचित त्यांच्या मते हसायला पैसे पडतात. त्यामुळे रस्त्यात वगैरे दिसल्यावर ओळख दाखवायला आपण जरी हसलो तरी ही मंडळी चेहऱ्यावर मख्ख. किंवा फार फार तर ओळख दाखवणारी अल्पशी हालचाल, एखाद दुसरी सुरकुती पडेल चेहऱ्यावर इतकीच. यामागे नेमकं काय कारण असतं हे मला कधीच न उलगडलेले कोडं आहे. लोक एकमेकांकडे बघून सहज हसत का नाहीत?
माझा एक मित्र म्युझिक अरेंजर आहे. दिवसातले १२-१४ तास तो कामात असतो. कामाचा थकवा तर येतोच. पण कामाच्या ठिकाणी असलेल्या मंडळींनाही खूप वेळच्या कामामुळे खूप ताण पडतो. अशा वेळी हा पठ्ठ्या आपल्या धमाल विनोद बुद्धीच्या सहाय्याने सगळं वातावरण सतत हसवत ठेवतो. तुफान विनोदांमुळे वातावरण हलकं फुलकं राहून थकवा कमी होतो आणि शिवाय कामही अतिशय उत्तम होतं असा त्याचा अनुभव आहे. बहुधा सचिन तेंडूलकर एकदा एका मुलाखतीत म्हणला होता, "टीम मध्ये धमाल वातावरण ठेवणारे दोन खेळाडू आहेत- एक युवराज आणि दुसरा हरभजन. हे दोघे सतत इतरांची थट्टा करणे खोड्या काढणे अशा गोष्टी करून टीम ला हसवत राहतात. ड्रेसिंग रूम मधेच आम्ही इतके मस्त वातावरणात असतो की साहजिकच त्याचा उत्कृष्ट परिणाम आम्हाला खेळताना दिसून येतो." 
मध्यंतरी आलीया भटने याबाबत एक फार सुंदर उदाहरण सगळ्यांसमोर ठेवलं. टीव्हीवरच्या एका कार्यक्रमात तिने चुकीचं उत्तर दिलं आणि मग त्यानंतर इंटरनेटवर लोकांनी तिची यथेच्छ थट्टा केली. तिच्या ज्ञानावर, तिच्या बुद्धिमत्तेवर अनेक विनोद झाले. पण तिने या सगळ्यावर कडवटपणे प्रतिक्रिया दिली नाही. ना ती स्वतःच्या कोशात निघून गेली. उलट तिनेही ही मजा खूप खिलाडूपणे घेतली. तिने स्वतःवरही विनोद केले. मला वाटतं सार्वजनिक जीवनातच नव्हे तर आपल्या सर्वांच्या रोजच्या खाजगी जीवनात सुद्धा अशी उदाहरणं कमी बघायला मिळतात. स्वतःवरही हसता येणं हे प्रगल्भतेचं लक्षण आहे. इतकंच नव्हे तर स्वतःला आणि दुसऱ्यालाही, आहे तसं विनाअट स्वीकारण्याचं हे एक लक्षण आहे. सुदृढ नात्यासाठी ही गोष्ट किती महत्त्वाची आहे हे काय वेगळं सांगायला नको.

जोडीदार मस्त हसणारा असावा, त्याची/तिची विनोदबुद्धी तल्लख असावी, माझ्या किंवा इतरांच्याही चांगल्या विनोदांना दाद देणारा असावा अशी अपेक्षा का बरं असत नाही? आपल्या रोजच्या आयुष्यात कितीतरी अडचणी सातत्याने येत असतात. अनेक प्रश्न, अडचणी, समस्या वगैरे वगैरे मधून कोणाची सुटका झालीये? पण अशावेळी विनोदबुद्धीच कामाला येईल. जोडीदार निवडताना, विशेषतः अरेंज मॅरेजबाबत, विनोद बुद्धी हा मुद्दा कमालीचा दुर्लक्षित झाला आहे असं मला फार वाटतं.  लग्नानंतरचं सहजीवन समृद्ध होण्यासाठी हास्यविनोद, थट्टा-मस्करी या गोष्टींची नितांत आवश्यकता आहे. लग्नाकडे ‘ही काहीतरी फार गंभीर गोष्ट आहे’ अशा अविर्भावात कायम बघितलं गेलं असल्याने जणू विनोदबुद्धी आता काय कामाची नाही, असा विचार नकळतच होत असावा का? का हे फक्त लग्न ठरवण्याच्या प्रक्रीयेपुरतं मर्यादित नाहीये? एकुणातच आपण हसण्याला घाबरायला लागलोय का? आजकाल पटकन कोणाच्याही कधीही भावना दुखावल्या जातात त्यामुळे थट्टा-मस्करीचं अवकाश छोटं होतंय की काय? आपल्याला विचार करायला हवा. स्वतःवर, दुसऱ्यावर, जगावर हसता यायला पाहिजे. तसा हसणारा आणि साथ देणारा जोडीदारही पाहिजे. असं वाटण्याची शक्यता आहे की, या मी मांडतोय त्या गोष्टी फारच वरवरच्या आहेत किंवा लग्नासारख्या गांभीर्याने घ्यायच्या गोष्टीला उथळ बनवत आहेत. पाश्चिमात्य जगात ‘डेटिंग’च्या पद्धतीत विनोदबुद्धीला विशेष महत्त्व देणं हे समाजमान्य असल्यासारखं आहे, असं म्हणतात. पण डेटिंग आणि लग्न यात फरक आहे असं म्हणत विनोदबुद्धीला उथळ मानायची चूक आपण का करावी?! मानवी नाती, फक्त लग्नाचंच नातं नव्हे तर सर्वच, ही गांभीर्यानेच घ्यायची गोष्ट आहे असं मी मानतो, पण गांभीर्याने घ्यायचं म्हणजे चेहऱ्यावर इस्त्री मारून हास्यविनोद टाळून जगायचं असं थोडीच आहे?!
जोडीदार निवडताना वय-जात-पगार-उंची-शिक्षण या गोष्टी दुय्यम आहेत. मस्त हसण्याची मुभा आणि
संधी नसेल, तर सगळ्या गोष्टी असूनही सहजीवनात गडबड होईल. चढ-उतार, समस्या, अडचणी या गोष्टी सगळ्यांच्या आयुष्यात येतात आणि जोडीदारासह आपण त्यांना तोंड देतो तेव्हा आपणच एकमेकांचे ऊर्जा स्त्रोत असतो. आता जर त्यावेळी आपण चिडचिड करणारे किंवा सदैव गंभीर आणि काहीतरी भयंकर घडत असल्यासारखे असू तर हा ऊर्जा स्त्रोत आटेल की वाढेल?  आपल्या आणि आपल्या जोडीदाराच्याही रोजच्या आयुष्यातले ताण-तणाव कमी होतील की वाढतील? विनोदबुद्धी असणं हे कठीण प्रसंगांना तोंड देण्याची क्षमता उत्तम असण्याचं लक्षण आहे. पाडगावकरांनी आपल्या एका कवितेत म्हणलंय तसं, काही माणसं ‘एरंडेल प्यायल्यासारखं आयुष्य पीत असतात’, असंही जगता येईलच की, पण तो मार्ग आपल्याला हवाय का? नसेल तर सुरुवात स्वतःपासून करायला हवी. जोडीदाराबरोबर समृद्ध आयुष्य जगण्यासाठी, आपणही दुसर्‍याचे जोडीदार होणार आहोत हे लक्षात ठेवून, दिलखुलास हसण्याची, थट्टा मस्करी करण्याची आणि अर्थातच, पचवण्याचीही (ते जास्त महत्त्वाचं!) क्षमता आपल्या अंगी असली पाहिजे याचे प्रयत्न करायला हवेत. फार अवघड नाही हे. जमेल नक्की सगळ्यांना. असंच दिलखुलासपणे, निर्मळपणे हसणारं जग निर्माण करता येईल. करूया ना?



(दि. १० फेब्रुवारी २०१८ रोजी प्रकाशित झालेल्या महाराष्ट्र टाईम्सच्या मैफल या पुरवणीत प्रसिद्ध.)