कित्येकदा डोळ्यांना एखादं दृश्य सुंदर दिसत असतं आणि ते
आपण कॅमेऱ्यात पकडायला जातो. पण प्रत्यक्ष फोटो आणि आपण बघितलेली प्रतिमा यात फारच
अंतर आहे असं वाटतं. एखादा सुंदर सूर्यास्त असतो. पण फोटो काढल्यावर त्या फोटोत
इतर अनेक बिल्डींग्स, दिव्यांचे खांब, खांबांवरच्या तारा, पुढ्यात असणाऱ्या माणसांची डोकी
असं सगळं सगळं त्या फोटोत दिसत असतं. आणि मग तो सुंदर सूर्यास्त अजिबात सुंदर नाही
असं वाटू लागतं. खरंतर आपण आपल्या डोळ्यांना दिसतंय तशीच्या तशी प्रतिमा पकडत
असतो. पण तरीही हा फरक राहतो. का बरं होतं असं? याचं कारण आहे आपला मेंदू!
डोळ्यांच्या मागे पडद्यावर उमटलेली प्रतिमा आपल्या मेंदूकडे पाठवली जाते आणि आपला
मेंदू त्यावर प्रक्रिया करतो. मेंदूत असणारं फोटोशॉपच असतं हे जणू. आपला मेंदू
डोळ्याकडून आलेल्या प्रतिमेमधल्या अडचणीच्या गोष्टी सरळ डिलीट करून टाकतो. आणि
फोकस करतो सूर्यास्तावर. आपला मेंदू कसा गंमतीदार काम करतो याचं हे एक छोटंसं
उदाहरण. पण हे फक्त फोटोबाबत घडतं असं नव्हे तर आपल्या सर्वच अनुभवांच्या बाबतीत मेंदू
हे करतो. एखाद्या हॉटेलचं जेवण आपल्याला कधीतरी आवडलेलं असतं. आणि पुढच्या वेळी
अगदी तीच चव असली तरी आपल्याला आधीइतका आनंद येतोच असं नाही. याचं कारण, चव आणि
चवीचा अनुभव या दोन स्वतंत्र गोष्टी आहेत. आपल्या प्राधान्याने लक्षात राहतो चवीचा
अनुभव. सिंहगड चढून जाऊन मग केलेलं झुणका भाकरीचं जेवण आणि गाडीने थेट वर जाऊन
केलेलं तेच जेवण यातल्या अनुभवात आणि अनुभवाच्या आठवणीत कसा फरक पडतो ते अनेकांनी
अनुभवलं असेल.
आणि हे सगळं मानवी नातेसंबंधांच्या बाबतीत सुद्धा लागू
होतंच होतं. विशेषतः अरेंज्ड मॅरेजच्या प्रक्रियेत
असणाऱ्या मंडळींकडे बघून तर मला
हे नेहमी जाणवतं. आमच्याकडे अनेक पालक येऊन आम्हाला सांगतात की, ‘माझ्या
मुलाचं/मुलीचं मला काही कळत नाही. सगळ्यांना नकार देतो/देते. म्हणते/म्हणतो-
‘क्लिक होत नाही’. आता
हे क्लिक होण्याचं गौडबंगाल नेमकं आहे काय?’. खरंतर क्लिक होण्याचा अगदी सोपा सरळ
अर्थ असा आहे की आपण आपल्याला भावलेल्या गोष्टींवर अधिक ‘फोकस’ करतो. आपला मेंदू इतर अनेक
गोष्टी कदाचित अडचणीच्या, कदाचित नापसंतीच्या; थेट डिलीट करतो आणि चांगल्या
गोष्टींवर फोकस ठेवत मनात फोटो क्लिक करून टाकतो! अरेंज्ड मॅरेजच्या प्रक्रियेत अनेकदा घडतं असं की आपल्याला
‘भावलेल्या’ किंवा आवडतील अशा गोष्टींवर आपण पुरेसा फोकसच देत नाही. आणि मग
तुलनेने नगण्य असणाऱ्या अडचणीच्या, किंवा कधीकधी तर अडचणीच्या नसणाऱ्याही,
गोष्टींचा मोठा बागुलबुवा उभा राहतो. आणि मग ‘क्लिक’ काही होत नाही. खरंतर आपण
आपल्या मनाला क्लिक होण्याची मुभा देत नाही. याचा अर्थ दिसेल ते सगळं आणि असेल तसं
स्वीकारावं आणि पुढे व्हावं असा बिलकुल नाही. आपली म्हणून काही एक आवड, पसंती, प्राधान्य असं
सगळं असतंच की. आंधळेपणाने जोडीदार निवडावा असं कोणीच सुचवणार नाही, सुचवूही नये. पेला अर्धा भरला
आहे एवढ्यावरच केवळ लक्ष द्यावं इतकं साधं आणि उथळही हे नाही. पण पेला अर्धा भरला असेल
तर तो कोणत्या पदार्थाने भरला आहे, जो पदार्थ आहे तो आपल्या
आवडीचा आहे का, आपल्या ‘डाएट’ मध्ये तो पदार्थ बसतोय का, आपली आत्ता भूक/तहान किती आहे, उर्वरित पेला आज ना
उद्या भरला जाण्याची शक्यता आहे का अशा शेकडो शक्यता आणि विचार आहेत जे करायला
हवेत. आणि हे सगळं करण्यासाठी मनाची दारं खुली हवीत.
जोडीदार निवडीची प्रक्रिया अधिक सोपी, सुलभ आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे
आनंददायी करायची तर आपल्याला आपल्या मेंदूला काही प्रमाणात मोकळं सोडावं लागेल. एक
मुलगी मला भेटली होती मागे. आकांक्षा म्हणूया तिला. तर या आकांक्षाला काहीही झालं
तरी ‘आयटी’ मध्ये काम करणारा नवरा नको होता. गंमतीचा भाग असा
की तिला अखेर पसंत पडला तो मुलगा आयटी क्षेत्रात काम करणाराच निघाला! असं कसं काय
घडलं हे विचारल्यावर ती म्हणाली, “हाच मुलगा ‘क्लिक झाला!’”. सुदैवाने तिने अपेक्षा अगदी पक्की ठरवून ठेवली असली तरी मनाचे दरवाजे
उघडे ठेवले होते. समोर येणाऱ्या प्रोफाइल्स कडे तिने खुल्या मनाने बघितल्यामुळे,
आय टी क्षेत्रात काम करणारा मुलगा ही नगण्य अडचण तिच्याच मेंदूने आपोआप डिलीट
केली. आणि इतर गोष्टींवर फोकस केला. इतर गोष्टींमध्ये काही गोष्टी मनाने टिपल्या
आणि त्याच प्रतिमेला क्लिक करत फोटो निघाला!
जुलै मध्ये ‘प्रतिमेची चौकट’ या लेखात आपण प्रतिमेच्या
चौकटीत न अडकण्यासाठी मनाला मोकळीक देण्याविषयी चर्चा केली होती. आता समोरची
व्यक्ती ‘क्लिक’ व्हावी असं वाटत असेल तर अपेक्षांच्या चौकटीत देखील न अडकता मनाला
मोकळं सोडायला हवं. छोट्या छोट्या गोष्टींवर अनावश्यक फोकस टाळायला हवा. कसं
करायचं हे? खरंतर याचं
उत्तरही सोपं आहे. अपेक्षांची चौकट न ठेवता, कोणत्या गोष्टी
अजिबात म्हणजे अजिबात चालणार नाहीत अशांची यादी करायची. अर्थातच त्याची सुस्पष्ट,
नेमकी आणि तर्कशुद्ध म्हणजे लॉजिकल अशी कारणमीमांसा हवी. इंग्रजीत ज्याला ‘मेक ऑर
ब्रेक’ म्हणतात अशी ही यादी. नीट विचार केला तर अशी यादी अगदी छोटी असते. आपण
जसजसा यावर अधिकाधिक विचार करत जातो तसतसं ही यादी उथळ आवडी निवडी, ऐकीव गोष्टी
आणि कल्पनेतल्या प्रतिमांमधून बाहेर पडून मूलभूत अशा जीवनमूल्यांकडे म्हणजे लाईफ
व्हॅल्यूज् कडे जाते. आदर, तदानुभूती किंवा समानुभूती
(एम्पथी), विश्वास, पारदर्शकता अशा स्वाभाविक गोष्टींकडे आपला ‘फोकस’ जाऊ लागतो.
आणि या फोकस मधल्या गोष्टींची झलक समोरच्या व्यक्तीत दिसली की ती व्यक्ती आपल्याहीनकळत
आपल्याला ‘क्लिक’ होते! एक उदाहरण देतो. आमच्या एका कार्यक्रमात एकदा सगळ्या
उपस्थित मुला-मुलींना आम्ही चहा ठेवला होता. केटरिंग करणाऱ्यांचा नेहमीचा
कर्मचारीवर्ग त्या दिवशी नसल्याने तो चहा आम्ही आयोजक मंडळीच सगळ्यांना जागेवर
नेऊन देत होतो. तेव्हा एक मुलगा पटकन मदत करायला पुढे सरसावला. इतर सव्वाशे
लोकांमध्ये एकट्या त्याचं हे पटकन मदतीला पुढे येणं नजरेतून सुटणं कठीण होतं. नंतर
आम्हाला समजलं, एका मुलीने या त्याच्या स्वभावाची मनात नोंद केली होती. त्या
मुलाच्या इतर कमी महत्त्वाच्या किंवा बिनमहत्त्वाच्या गोष्टी मनात डिलीट करत तो
मुलगा तिला ‘क्लिक’ झाला होता!
सौंदर्य,
पगार, खानदान, नोकरी-व्यवसायाचं क्षेत्र, जात, पत्रिका अशा सगळ्या गोष्टी जोडीदार निवडताना बघितल्या जातात हे खरंच. पण
आमचा अनुभव आहे की, अंतिमतः या गोष्टी कधीच निर्णायक ठरत नाहीत. विवाहसंस्थेच्या
फॉर्ममध्ये भरलेल्या अपेक्षांच्या चौकटीच्या बाहेरच ‘क्लिक होणं’ असं ज्याला म्हणतात
ती गंमत घडते. त्याची एक मजा आहे आणि ती मजा अनुभवायची तर वर म्हणल्याप्रमाणे
मनाला तुलनेने बिनमहत्त्वाच्या गोष्टी डिलीट करण्याची मुभा दिली पाहिजे. तेवढी
दिली की जोडीदार निवड ही प्रक्रिया आनंदाची होईल आणि मग ‘क्लिकक्लिकाट’ होणार हे
नक्की!
(दि. १७ नोव्हेंबर २०१८ रोजी प्रकाशित झालेल्या महाराष्ट्र टाईम्सच्या ‘मैफल’
या पुरवणीत प्रसिद्ध.)