Wednesday, March 12, 2025

चुकलेले अंदाज, सुजलेली शहरे

‘शहरं म्हणजे विकासाची इंजिनं’ या प्रकारची शहरांना महत्त्व देणारी वाक्य आपल्या राजकीय नेत्यांच्या तोंडी सदैव असतात. पण प्रत्यक्षात आपल्या राज्यकर्त्यांची शहरांच्या शासनव्यवस्थेकडे बघायची वृत्ती ही अत्यंत बुरसटलेली, सरंजामी आणि मध्ययुगीन आहे. दरवर्षी महानगरपालिकांचे अर्थसंकल्प मांडले जातात तेव्हा तर हे अधिकच प्रकर्षाने जाणवतं. तेच मांडण्यासाठी हा लेखप्रपंच. 

सध्या एकापाठोपाठ एक असे महाराष्ट्रातल्या महानगरपालिकांचे अर्थसंकल्प सादर होत आहेत. ‘बजेट’ या इंग्रजी शब्दासाठी मराठीत ‘अर्थसंकल्प’ हा फार सुंदर प्रतिशब्द आहे. पण दुर्दैवाने आपल्या महापालिका निव्वळ ‘अंदाजपत्रक’ मांडतात. पैसे कसे येणार आणि कसे जाणार याचे दरवर्षी चुकणारे अंदाज! त्यात ना कसला विशेष संकल्प, ना कुठली दृष्टी. पण दोष त्या त्या महापालिकांचा नाही. दोष आहे तो शहरांना आर्थिक दृष्ट्या पांगळे ठेवणाऱ्या राज्यकर्त्यांचा. शहरांची शासनव्यवस्थाच इतकी भुसभुशीत करून ठेवलेली आहे की मनात आणलं तरी कोणत्या शहराला फार वेगळ्या मार्गाने वाटचाल करता येत नाही. आणि म्हणून आपली सगळी शहरं एकसारखीच दिसतात. नियोजनशून्य, बकाल, आणि सुजलेली. सर्वांचे प्रश्नही इकडून तिकडून तेच, प्रश्नांवर उपाय म्हणून सुचवल्या जाणाऱ्या योजनाही तशाच वरवर आणि पोकळ. मी असं का म्हणतो आहे ते या शहरांचे अर्थसंकल्प बघितले की लक्षात येईल.


शहरांचा मिंधेपणा  

शहरांना प्रगती केव्हा करता येईल जेव्हा शहरांच्या हातात त्यांचा स्वतःचा पुरेसा पैसा असेल, पैसा उभा करायचे विविध मार्ग उपलब्ध असतील, अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर जेव्हा शहरं आर्थिक दृष्ट्या स्वयंपूर्ण असतील! नुकतेच पुणे महानगरपालिकेचा १२,६१८ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर झाला. यापैकी तब्बल ६२५२ कोटी रुपये (म्हणजे जवळपास ५०% रक्कम!) हे केंद्र-राज्य सरकारांकडून येणे अपेक्षित आहेत.  यापैकी २७०० कोटी रुपये हे वस्तू-सेवा करामधला वाटा म्हणून मिळणे अपेक्षित आहेत.  जकात जाऊन, स्थानिक संस्था कर आला आणि मग तोही जाऊन वस्तू सेवा कर (GST) आला. जकात असो वा स्थानिक संस्था कर, हे महापालिकेचे स्वतःचे उत्पन्नाचे स्रोत होते. वस्तू सेवा करात शहरांना वाटा मिळणे अपेक्षित असलं तरी त्यासाठी राज्य सरकारची मेहेरबानी असावी लागते. ‘पैसे द्या’ म्हणत महापालिकांना राज्य सरकार पुढे हात पसरावे लागतात. राज्य सरकारला वाटेल तेव्हा, जमेल तेव्हा, राजकीय सोय गैरसोय बघून हे पैसे शहरांना मिळतात. ऑक्टोबर २०२४ मध्ये महाराष्ट्र सरकारकडून पुणे महापालिकेला येणाऱ्या वस्तूसेवा कराची थकबाकी वाढत जाऊन ती झाली तब्बल १४०० कोटी रुपये!  संपूर्ण कोल्हापूर महापालिकेचा गेल्या वर्षीचा अर्थसंकल्प १२०० कोटींच्या घरात होता, आणि इथे पुण्याची निव्वळ जीएसटी थकबाकी १४०० कोटी! यातून या विषयाचे गांभीर्य लक्षात यावे. 

शिवाय हा विषय केवळ पुण्याचा आहे असं नाही. महाराष्ट्रातल्या प्रत्येक महानगरपालिकेला राज्य सरकारचं मांडलिक असण्यावाचून पर्यायच नाही अशी परिस्थिती आहे. ठाण्यात साडेपाच हजार कोटींपैकी किमान २,००० कोटी  ,  नाशिक मध्ये ३०५३ कोटींपैकी किमान १५०० कोटी रुपये राज्याकडून मिळणे अपेक्षित आहे.  नागपूरमध्ये तर केंद्र-राज्याच्या मदतीचं अर्थसंकल्पातलं प्रमाण ७०% एवढं प्रचंड आहे.  इतर छोट्या महानगरपालिकांची तर बातच सोडा! आर्थिक नाड्या अशा प्रकारे राज्य सरकारच्या हातात असल्यावर शहरं याचक बनतात, आणि शहरांमधले राजकीय नेते राज्यातल्या नेत्यांचे मिंधे! आणि राज्य सरकारं आणि राज्यस्तरीय नेते सरंजामी आव आणत पैसा देताना उपकार करत असल्याची भावना जोपासतात. 


बांधकामं करत राहण्याशिवाय पर्याय नाही!

आज कोणत्याही शहरातले बहुसंख्य नेते बघा. त्यांचे या ना त्या स्वरुपात बांधकाम व्यवसायात हात असतात. ‘बांधकाम व्यावसायिक आणि राजकारणी यांचं साटंलोटं असतं’ वगैरे गोष्टी कालबाह्य झाल्या आहेत. कारण ते आता वेगळे उरलेच नाहीत. राजकारणीच बांधकाम व्यावसायिक झाले आहेत वा बांधकाम व्यावसायिक राजकारणी झाले आहेत. शहरांच्या अर्थसंकल्पाचा आणि बांधकाम व्यवसायाचा कसा घनिष्ट संबंध आहे हे बघणं रंजक आहे. शहरांमध्ये बेफाम बांधकामं होत राहणं, सिमेंटचे मनोरे उभे होत राहणं ही बांधकाम व्यावसायिक उर्फ राजकीय नेत्यांचीच नव्हे तर महापालिकांचीही गरज बनली आहे. पुण्याच्या अर्थसंकल्पानुसार येत्या वर्षात तब्बल २३% उत्पन्न ‘बांधकाम विकास शुल्कातून’ मिळणार आहे. तर मिळकत करातूनही गोळा होणार आहेत २३%. काल ज्यातून बांधकाम शुल्क मिळाले त्यातूनच आज मिळकतकर मिळणार आहे. अशाप्रकारे पुणे महापालिकेचा ४६% पैसा काल झालेल्या आणि आज-उद्या होणाऱ्या बांधकामामुळे येणार आहे. शहरानुसार हे आकडे बदलतील. पण गाभा तोच आहे. बांधकाम विकास शुल्क आणि मिळकतकर एवढ्या दोनच उत्पन्नावर महापालिकेची उरलीसुरली स्वायत्तता अवलंबून आहे. शहरांकडे दुसरे भरीव उत्पन्नाचे स्रोत कायद्यानेच उपलब्ध नाहीत. 


उपाय काय?

या सगळ्यात आपली शहरं वाढत नाहीत, तर नुसतीच सुजतात, एखाद्या रोगट शरीरासारखी. एखाद दुसरा प्रकल्प एखाद्या राजकीय नेत्याच्या आशीर्वादाने येतो. पण या वरवरच्या मलमपट्टीने रोग थोडीच बरा होणार? शहरांच्या या परिस्थितीवर काही मूलभूत बदल करण्याची गरज आहे. शहरांना आर्थिक स्वायत्तता देण्यासाठी ज्याप्रमाणे वस्तूसेवा करामध्येच राज्याचा निम्मा वाटा असतो, त्याच धर्तीवर शहरांना करामधलाच वाटा द्यायला हवा. शहरांत होणाऱ्या व्यावसायिक उलाढालीचा थेट वाटा राज्य सरकारकडे हात न पसरता शहरांना मिळायला हवा. जगभरात अनेक देशांत आयकराचा वाटाही केंद्र सरकारकडून शहरांना दिला जातो. आत्ता योजनांना अनुदान रूपात केंद्र सरकार शहरांना पैसे देत असलं तरी ते पुरेसं नाही. एकतर त्याला अटी असतात आणि तो पैसा केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या योजनेपुरताच वापरता येतो. म्हणजे शहरांची स्वायत्तता इथे जपली जात नाही. विनाअट हक्काचा वाटा मिळणे ही गरज आहे. आणि सर्वात शेवटचा महत्त्वाचा उपाय म्हणजे शहरांची शासनव्यवस्था अमुलाग्र सुधारणे. शहरांमधली आयुक्त पद्धत बदलून महापौर पद्धत आणली पाहिजे. देशात पंतप्रधान, राज्यात मुख्यमंत्री तसं शहरात थेट कार्यकारी अधिकार असणारं महापौरपद आणि मंत्रीमंडळासारखी कौन्सिल/परिषद. सर्व राजकीय पक्षांनी वेळोवेळी या सुधारणेच्या आवश्यकतेचा उल्लेख केला आहे. पण प्रत्यक्षात आयुक्तामार्फत शहरांवर नियंत्रण ठेवण्याची संधी कोणतंच राज्य सरकार सोडत नाही. (निवडणुका घेतल्या तर!) निवडून आलेल्या नगरसेवकांना आपापल्या प्रभागाची जहागिरी वाटली म्हणजे नगसेवक निव्वळ प्रभागसेवक बनून राहतात, शहरांना कायदेशीर नेतृत्व उरत नाही. अशावेळी मग पालकमंत्री किंवा महापालिकेच्या बाहेरचे अन्य कोणी नेते शहरावर राज्य करतात आणि आयुक्त त्यांचा हस्तक बनतो. लोकशाही, उत्तरदायित्व या सगळ्यालाच यात हरताळ फासला जातो. या शासनव्यवस्थेला शहरांच्या मिंधेपणातच फायदा असतो. शहराच्या फायद्याचा विचार करून प्रभावीपणे करसंकलन करणे, उत्पन्न वाढवण्यासाठी मिळकतकर रचनेत सुधारणा करणे अशा अवघड जागांचे निर्णय घेण्याची महापालिकेची क्षमता क्षीण होत जाते. महापालिकांची अकार्यक्षमता किती कमी आहे याची दोन उदाहरणं- २०२०-२१ मध्ये मिळकतकर न भरणाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी अभय योजना जाहीर करून महापालिकेने अशा लोकांचा दंड आणि व्याज माफ केले आणि २१० कोटी रुपयांचे नुकसान सहन केले. २०२१-२२ मध्ये पुन्हा अभय योजना आली आणि महापालिकेने पुन्हा ६४ कोटी रुपये गमावले. २०२०-२१ मध्ये योजनेचा फायदा घेतलेल्यांपैकी ४२% आणि २०२१-२२ मध्ये फायदा घेतलेल्यांपैकी तब्बल ६७% लोकांनी २०२४ अखेरीपर्यंत पुन्हा मिळकतकर थकवला आहे. दुसरं उदाहरण म्हणजे गेल्या वर्षभरात पुण्याला ११,६०० कोटी रुपयांचं उत्पन्न मिळणार असा अर्थ‘संकल्प’ होता. प्रत्यक्षात ११ महिन्यात जेमतेम ६५०० कोटी रुपये जमा झाले आहेत. 

आयुक्त दरवर्षी शहरांचे अर्थसंकल्प मांडतात, त्यात कोटीच्या कोटी उड्डाणे असतात. अर्थसंकल्प म्हणजे वर्षभरासाठीचा विकास आराखडा असतो. तो राबवण्याची नियत आणि कुवत महापालिका शासनव्यवस्थेमध्ये असल्याशिवाय आपली शहरं अशीच रोगटपणे सुजत राहणार आहेत. 

(दि. १२ मार्च २०२५ रोजी दै. सकाळ मध्ये प्रसिद्ध.)


संदर्भ :-

[1] दै. सकाळ दि. ५ मार्च २०२५ रोजीची बातमी.

[2] https://www.hindustantimes.com/cities/pune-news/pmc-yet-to-receive-1400-cr-gst-dues-from-stategovt-101728410906666.html

[3] https://www.lokmat.com/thane/thane-municipal-corporation-budget-2025-presented-a-a849-c653/

[4] https://realty.economictimes.indiatimes.com/news/regulatory/thane-civic-body-presents-rs-5645-crore-budget-for-2025-26/118788692

[5] https://timesofindia.indiatimes.com/city/nashik/nashik-civic-body-unveils-rs-3053-31cr-draft-budget-outlay-for-2025-26/articleshow/118310365.cms

[6] https://www.careratings.com/upload/CompanyFiles/PR/202403130316_Nagpur_Municipal_Corporation.pdf

Tuesday, January 28, 2025

शहरांचा ई-गव्हर्नन्स : पेला अर्धा भरलेला!

गेल्या चार वर्षांपासून ‘पॉलिसी रिसर्च ऑर्गनायझेशन’ या अभ्यास गटातर्फे दरवर्षी महाराष्ट्रातील सर्व शहरांच्या ई-गव्हर्नन्स निर्देशांक प्रसिद्ध केला जातो. या वर्षीचा ई-गव्हर्नन्सचा हा लेखाजोखा नुकताच प्रसिद्ध झाला. त्याविषयी-

२०२५ पर्यंत भारतात ९० कोटी इंटरनेट वापरकर्ते असतील असा एक अंदाज होता. पण भारत सरकारच्या प्रेस इन्फोर्मेशन ब्युरोच्या आकडेवारीनुसार आत्ताच तब्बल ९५ कोटी इंटरनेट वापरकर्ते झाले आहेत. २०१४ मध्ये हाच आकडा २५ कोटी एवढा होता. अवघ्या दहा वर्षांत झालेली ही वाढ अचंबित करणारी आहे. यातले बहुसंख्य मोबाईलवर इंटरनेट वापरतात. साहजिकच माहिती तंत्रज्ञान हे अफाट वेगाने आपल्या दैनंदिन आयुष्याचा भाग बनलं आहे. हा काही केवळ उच्चभ्रू वर्गापुरता मर्यादित बदल नाही, तर तळागाळापासून झालेली क्रांती आहे. या सगळ्या बदलांना साजेश्या आपल्या शासनव्यवस्था आहेत का हे तपासून बघणं महत्त्वाचं आहे. महाराष्ट्र राज्य सरकारचं ई-गव्हर्नन्स धोरण-२०११, केंद्र सरकारचा मोबाईल गव्हर्नन्ससाठीचा २०१२ चा आराखडा, ‘नॅशनल ई-गव्हर्नन्स प्लॅन’, ‘डिजिटल इंडिया’ या वेगवेगळ्या माध्यमातून आपल्या राज्य-केंद्र सरकारांनी गेल्या दीड दशकात ई-गव्हर्नन्ससाठी धोरणं ठरवली. पण कागदावर असणाऱ्या या सगळ्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी किती झाली, त्यात सातत्य राहिले का ते महत्त्वाचं. नेमकं हेच काम शहरी शासनव्यवस्थांचा अभ्यास करणाऱ्या पॉलिसी रिसर्च ऑर्गनायझेशनने २०२२ मध्ये हातात घेतलं. देशातील सर्वाधिक शहरीकरण झालेलं राज्य म्हणजे महाराष्ट्र. आज राज्यात तब्बल २९ महानगरपालिका आहेत. राज्यातली जवळपास अर्धी जनता शहरी भागात राहते. त्यामुळेच शहरांच्या ई-गव्हर्नन्स तपासण्याला महत्त्व आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या ई-गव्हर्नमेंट सर्व्हे आणि नॅशनल ई-गव्हर्नन्स सर्व्हिस डिलिव्हरी असेसमेंट हा अहवाल, तसेच केंद्र-राज्य सरकारांची धोरणं या सगळ्याच्या आधारे ई-गव्हर्नन्स इंडेक्सचे निकष ठरवले आहेत.

या अभ्यासाच्या एकूण ८० दिवसांच्या कालावधीत महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व म्हणजे २९
महानगरपालिकांची ई-गव्हर्नन्स व्यवस्था अभ्यासली गेली. त्यासाठी उपलब्धता (accessbility), सेवा (Services), पारदर्शकता (Transparency) या तीन प्रकारांत विभागलेले एकूण तब्बल १०१ निकष ठरवण्यात आले होते. महापालिकेचे अधिकृत संकेतस्थळ
, मोबाईल प्रणाली (Application) आणि समाजमाध्यमे या तीन ठिकाणी ही तपासणी झाली. यंदा सर्वाधिक गुण मिळवत पुणे महापालिका पहिली आली, तर अगदी थोड्या थोड्या गुणांच्या फरकाने कोल्हापूर आणि पिंपरी चिंचवड यांनी अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक मिळवला. गेली सलग तीन वर्षं पिंपरी-चिंचवड महापालिकेने या निर्देशांकात पहिला क्रमांक पटकावत बाजी मारली होती. यंदाही पिंपरी-चिंचवडची कामगिरी चांगलीच असली तरी, पुणे आणि कोल्हापूरने आपल्या कामगिरीत कमालीची सुधारणा केल्याने पिंपरी चिंचवडला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं आहे. नेहमीच पहिल्या पाचमध्ये असणाऱ्या पुण्याने यंदा वेबसाईटबाबत आणि सेवा या निकषाबाबत विलक्षण वरचढ काम केल्यामुळे थेट अव्वल क्रमांक गाठला. तर कोल्हापूर महानगरपालिकेने गेली दोन वर्षं सातत्यपूर्ण काम करत आपला ई-गव्हर्नन्स कमालीचा सुधारला. २०२३ मध्ये २० व्या क्रमांकावर असणारं कोल्हापूर शहर गेल्या वर्षी थेट तिसऱ्या आणि यंदा दुसऱ्या क्रमांकावर पोचलं ते त्यांनी सर्व आघाड्यांवर केलेल्या सातत्यपूर्ण कामामुळेच.    

पेला अर्धा भरलेला

ढोबळपणे म्हणायचं तर यंदा सलग चौथ्या वर्षी आलेला हा अहवाल बघता शहरांचा ई-गव्हर्नन्स टप्प्याटप्प्याने सुधारताना दिसतो आहे. २०२३ मध्ये फक्त दोन महानगरपालिकांना १० पैकी ५ पेक्षा जास्त गुण मिळाले होते. यंदा मात्र अशा महापालिका एकूण नऊ आहेत. २०२२ मध्ये, ई-गव्हर्नन्स इंडेक्सच्या पहिल्या वर्षी सर्व महापालिकांत पहिला क्रमांक मिळवणाऱ्या पिंपरी चिंचवडचे गुण होते अवघे ५.९२. पण यंदा मात्र पहिल्या क्रमांकावर असणाऱ्या पुण्याचे गुण आहेत ८.२२! हीच प्रगती जवळपास प्रत्येक शहराची आहे. अमरावतीने २०२२ मध्ये २.९२ गुण मिळवले होते तर यंदा ६.८३ मिळवत सहावा क्रमांक मिळवला; कोल्हापूरची झेप तर २.१७ ते ८.०२ गुण एवढी मोठी आहे!

समाजमाध्यमांच्या बाबतीत महानगरपालिकांनी लक्षणीय सुधारणा केली आहे. यंदा २९ पैकी तब्बल १७ शहरांना समाजमाध्यमे या निकषावर पैकीच्या पैकी गुण मिळाले आहेत. ई-गव्हर्नन्स निर्देशांक प्रसिद्ध होऊ लागल्यापासून अमरावती, कोल्हापूर, नवी मुंबई, मिरा भाईंदर, पिंपरी चिंचवड, पुणे या अशा काही महानगरपालिकांनी ई-गव्हर्नन्स सुधारण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू केले. काही अधिकाऱ्यांचा, महापालिका आयुक्तांचा आणि राजकीय नेत्यांचाही याबाबतचा पुढाकार कौतुकास्पद होता. त्याचंच फळ म्हणजे सुधारलेला ई-गव्हर्नन्स!

 

पेला अर्धा रिकामा!

ई-गव्हर्नन्समध्ये कौतुकास्पद सुधारणा असली पण सारंच काही आलबेल आहे असं नाही. किंबहुना काही धक्कादायक आणि चिंताजनक बाबीही आहेत. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे आज मोबाईलवरून अक्षरशः काहीही करता येण्याची ताकद नागरिकांच्या हातात असताना ई-गव्हर्नन्समध्ये मोबाईल गव्हर्नन्सला अनन्यसाधारण महत्त्व आहे. परंतु, तब्बल पूर्ण एक डझन शहरांना मोबाईल अॅप्लिकेशनच्या निकषावर चक्क शून्य गुण मिळाले आहेत!

काही शहरनिहाय चिंताजनक बाबीही आहेत. जालना आणि परभणी या दोन शहरांना एकूण १०१ पैकी एकाही निकषाची पूर्तता न करता आल्याने शून्य गुण मिळाले. २०२३, २०२४ या दोन्ही वर्षी एक पेक्षा कमी गुण एकाही शहराला नव्हता. पण यंदा जालना, परभणी आणि जळगांव यांनी ही निराशाजनक कामगिरी केली. २०२३ मध्ये १६ व्या क्रमांकावर असणारं जळगांव यंदा थेट शेवटून दुसऱ्या क्रमांकावर गेलं, तर २०२४ मध्ये १८ व्या क्रमांकावर असणाऱ्या परभणीने यंदा थेट तळच गाठला. जालना ही तुलनेने नवीन महापालिका म्हणून सवलत द्यावी तर नवीनच असणाऱ्या इचलकरंजीने मात्र यंदा १६वा क्रमांक पटकावला आहे.

सांगली-मिरज-कुपवाड या महापालिकेची अधोगती विशेष नोंद घ्यावी अशी आहे. २०२३ मध्ये १४वा, २०२४ मध्ये १५वा क्रमांक मिळवणारी ही महापालिका यंदा थेट २६ व्या क्रमांकावर घसरली. केवळ इतर महापालिका पुढे गेल्यामुळे हे घडलं असं नव्हे तर त्यांची स्वतःची कामगिरीही खालावली. ३.२ गुणांवरून १.९८ पर्यंत ही घसरण झाली आहे.

 

आव्हाने आणि पुढील दिशा

महानगरपालिकांना आपापल्या शहरांचा ई-गव्हर्नन्स गांभीर्याने घेण्याची गरज आहे. अगदी साध्या गोष्टींपासून सुरूवात होते. उदाहरणार्थ अनेक पालिकांची संकेतस्थळे nic.in किंवा gov.in सारख्या सरकारच्या अधिकृत पत्त्यांवर नाहीत. किंवा मुंबईसारखे मोजके अपवाद वगळता इतरांची समाजमाध्यमांवरची अकाऊन्ट्स व्हेरीफाईड नाहीत. मोबाईल अॅप्लिकेशन देखील अधिकृत कोणतं हे चटकन कळत नाही. अशा गोष्टींचा परिणाम वापरकर्त्यावर होतो. माहिती अद्ययावत नसणे, असली तर अर्धवट असणे, सापडायला अवघड ठेवणे यामुळे ई-गव्हर्नन्सचा दर्जा घसरतो. एखाद्या आयुक्तांची किंवा जबाबदार अधिकाऱ्यांची बदली झाली की कामगिरीत घसरण होण्याचा प्रकार दिसतो. हे टाळण्यासाठी ई-गव्हर्नन्ससाठी प्रशासनाने अंतर्गत प्रक्रियाप्रणाली राबवणे आवश्यक आहे.

एकुणात भविष्यात ई-गव्हर्नन्स सुधारण्यासाठी शहरांना नेटाने सातत्यपूर्ण प्रयत्न करावे लागतील, इतकंच नव्हे तर स्वतःला अद्ययावत करत राहावं लागेल. यातला सातत्य हा शब्द महत्त्वाचा आहे. एकदाच काहीतरी करून भागणार नाही, कारण कालची नवी गोष्ट आज जुनी झालेली असते, असा आधुनिक तंत्रज्ञानाचा वेग आहे. नागरिकांना सर्वात जवळचं असणारं सरकार म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था. त्यामुळे त्यांनी कालसुसंगत राहण्याला पर्यायच नाही! आजचा ई-गव्हर्नन्सचा अर्धा रिकामा पेला पूर्ण भरण्याच्या दिशेने वाटचाल करायला हवी.

(दि. २८ जानेवारी २०२५ रोजी दै. सकाळ मध्ये प्रसिद्ध.)