एखादा मनुष्य ‘भक्ती में शक्ती है |’ असं म्हणत
वैयक्तिक आणि अध्यात्मिक पातळीवर
कशाविषयी भक्तीभाव राखत असेल तर त्याचा कोणाला फारसा उपद्रव होण्याचं कारण नाही. ‘विठ्ठल विठ्ठल’ म्हणत भक्ती करणाऱ्या वारकऱ्याचा कोणाला त्रास का बरं होईल? पण भक्तीभाव जेव्हा सामाजिक बनू लागतो, त्याला राजकीय रंग चढू लागतो तेव्हा तो उपद्रव निर्माण करू लागतो. जगाच्या इतिहासात एक काळ असा होता जेव्हा भक्ती-शक्ती, म्हणजेच धर्म आणि राजकारण, या दोन्ही गोष्टी वेगळ्या केल्या जात नसत. त्यामुळेच राजाला धर्माचे अधिष्ठान लागत असे, आणि धर्माला राजाश्रय. समजूत अशी की राजा हा थेट देवाने नेमलेला आहे. आणि मुख्य धर्मगुरू हा देवाचा दूत आहे. त्या काळात या सगळ्या गोष्टी लोकांच्या अंगवळणी पडल्या होत्या, त्यांना समाजमान्यता होती. हळूहळू काळ बदलला. युरोपातल्या रेनेसांस मध्ये म्हणजे प्रबोधन काळात धर्मसंस्थेला आव्हान दिलं गेलं. जसजशी आधुनिक लोकशाही विकसित होऊ लागली तशी राजकीय भक्तीसंप्रदायाची पीछेहाट होत गेली. राजसत्तेपासून धर्म वेगळा केला गेला. आणि युरोपियन लोकांनी जगभर राज्य केल्याने हीच विचारधारा जगभर पसरली. पण जिथे जिथे लोकशाहीचे थडगे खणले गेले तिथे तिथे या ना त्या स्वरुपात भक्तीसंप्रदाय वाढत गेला. इराणसारख्या देशांत तो पारंपारिक धार्मिक स्वरुपात दिसून आला तर जर्मनी, इटली या ठिकाणी तो एकतंत्री हुकुमशाहीच्या स्वरुपात दिसून आला. रशिया-चीन इथे तो कम्युनिझमच्या नावाखाली उदयाला आला. भारतातही लोकशाही राज्यव्यवस्था रुजली तरी लोकशाही मानसिकता कधीच न रुजल्याने राजकीय भक्तीसंप्रदाय कधी संपलाच नाही. आणि मी जेव्हापासून राजकीय घडामोडी बारकाईने बघतो आहे, तेव्हापासून हा संप्रदाय वेगाने फोफावतो आहे. इतकेच नव्हे तर याला प्रतिष्ठाही प्राप्त होत आहे.
कशाविषयी भक्तीभाव राखत असेल तर त्याचा कोणाला फारसा उपद्रव होण्याचं कारण नाही. ‘विठ्ठल विठ्ठल’ म्हणत भक्ती करणाऱ्या वारकऱ्याचा कोणाला त्रास का बरं होईल? पण भक्तीभाव जेव्हा सामाजिक बनू लागतो, त्याला राजकीय रंग चढू लागतो तेव्हा तो उपद्रव निर्माण करू लागतो. जगाच्या इतिहासात एक काळ असा होता जेव्हा भक्ती-शक्ती, म्हणजेच धर्म आणि राजकारण, या दोन्ही गोष्टी वेगळ्या केल्या जात नसत. त्यामुळेच राजाला धर्माचे अधिष्ठान लागत असे, आणि धर्माला राजाश्रय. समजूत अशी की राजा हा थेट देवाने नेमलेला आहे. आणि मुख्य धर्मगुरू हा देवाचा दूत आहे. त्या काळात या सगळ्या गोष्टी लोकांच्या अंगवळणी पडल्या होत्या, त्यांना समाजमान्यता होती. हळूहळू काळ बदलला. युरोपातल्या रेनेसांस मध्ये म्हणजे प्रबोधन काळात धर्मसंस्थेला आव्हान दिलं गेलं. जसजशी आधुनिक लोकशाही विकसित होऊ लागली तशी राजकीय भक्तीसंप्रदायाची पीछेहाट होत गेली. राजसत्तेपासून धर्म वेगळा केला गेला. आणि युरोपियन लोकांनी जगभर राज्य केल्याने हीच विचारधारा जगभर पसरली. पण जिथे जिथे लोकशाहीचे थडगे खणले गेले तिथे तिथे या ना त्या स्वरुपात भक्तीसंप्रदाय वाढत गेला. इराणसारख्या देशांत तो पारंपारिक धार्मिक स्वरुपात दिसून आला तर जर्मनी, इटली या ठिकाणी तो एकतंत्री हुकुमशाहीच्या स्वरुपात दिसून आला. रशिया-चीन इथे तो कम्युनिझमच्या नावाखाली उदयाला आला. भारतातही लोकशाही राज्यव्यवस्था रुजली तरी लोकशाही मानसिकता कधीच न रुजल्याने राजकीय भक्तीसंप्रदाय कधी संपलाच नाही. आणि मी जेव्हापासून राजकीय घडामोडी बारकाईने बघतो आहे, तेव्हापासून हा संप्रदाय वेगाने फोफावतो आहे. इतकेच नव्हे तर याला प्रतिष्ठाही प्राप्त होत आहे.
काही भक्तीप्रसंग मला इथे नमूद करावेसे वाटतात-
(१) २००९ च्या लोकसभा निवडणुकीचा प्रचार धडाक्यात सुरु होता आणि आम्ही राजकारणात
रस असणारी मित्रमंडळी सगळ्या राजकीय पक्षांच्या प्रचार सभा ऐकायला जात होतो.
त्यावेळी पुण्यात राज ठाकरे नरेंद्र मोदी आणि सोनिया गांधी यांच्या सभांना आम्ही
हजेरी लावली होती. राज ठाकरे यांची सभा नदी पात्रात होती आणि अजून त्यांच्या
भाषणात तोचतोचपणा यायचा होता. सभा अप्रतिम झाली आणि राज यांचे भाषणही चांगलं झालं.
आम्ही सभेच्या ठिकाणावरून बाहेर पडत असताना मी सहज माझ्या मित्राला म्हणलं, “राज
ठाकरेची वक्तृत्व शैली प्रभावी आहे हं !”. शेजारून जाणारा एक भक्त थबकला आणि मला
दरडावून म्हणाला- “राजसाहेब ठाकरे म्हण... अरे-तुरे काय करतोस आमच्या साहेबांना..”
(२) महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक आम आदमी पक्षाने लढवावी अशी असंख्य
कार्यकर्त्यांची इच्छा होती. ती डावलून निवडणूक लढवणार नसल्याचं केजरीवालने जाहीर
केलं तेव्हा कित्येक भक्तांनी “अरविंदने घेतला आहे ना निर्णय मग तो योग्यच असणार. अरविंद
चुकू शकतच नाही” असा सूर लावला. वास्तविक केजरीवालने चुका झाल्यावर त्याचे परिणाम
भोगल्यावर त्या चुका खुलेपणे मान्यही केल्या आहेत. ही पार्श्वभूमी असतानाही ही
भक्ती !
(३) मोदी निवडून आल्यावर एकदा एका भक्ताशी गप्पा मारत होतो. मी त्याला म्हणलं मोदी
केंद्रात निवडून आले आणि त्यांनी तिथला भ्रष्टाचार संपवला तर उत्तमच. पण
महापालिकेतले नगरसेवकही भ्रष्टाचार न करणारे निवडून जाईपर्यंत काम करावे लागेलच.
शिवाय मोदींपासून ते अगदी नगरसेवकांपर्यंत कोणाचाही पाय घसरू न देणं ही आपली
जबाबदारी नाही का? त्यावर त्याने मोठे नमुनेदार उत्तर दिलं, “छे छे... नमोंचा पाय
घसरणं केवळ अशक्य. ते चूक काही करूच शकत नाही. इतकी व्हिजन असलेला, देशप्रेमी
मनुष्य चूक करूच कसा शकेल? आणि त्यांचे सगळे गुण हळू हळू ट्रिकल डाऊन होत, झिरपत
झिरपत नगरसेवकापर्यंत पोहचतील. पाच वर्षात भारत सुपर पॉवर होणार बघ!”
(४) शरद पवारांना कोणीतरी थोबाडीत मारण्याची घटना घडली तेव्हा अण्णा हजारे यांनी
“एकही मारा?” अशी प्रतिक्रिया दिल्याची बातमी प्रसिद्ध झाल्यावर पुण्याच्या खुद्द
महापौरांसह राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नगरसेवक-पदाधिकारी मंडळींनी स्वारगेट
चौकात आंदोलन करून सगळी वाहतूक ठप्प करून ठेवली होती. अण्णा हजारे यांच्या
प्रतीकात्मक पुतळ्याला चपला मारणे वगैरे प्रकार करण्यात आले होते त्यावेळी.
(४) टाईम मासिकाने आपल्या एका अंकाच्या मुखपृष्ठावर मनमोहनसिंग यांना ‘अंडर
अचिव्हर’ म्हणल्यावर आपली भक्ती दर्शवण्यासाठी ओडिशा मधल्या काही कॉंग्रेसच्या
कार्यकर्त्यांनी टाईम्स ऑफ इंडियाचे ऑफिस फोडले. वास्तविक पाहता टाईम मासिक आणि
टाईम्स ऑफ इंडियाचा दुरान्वयेही संबंध नाही. असो.
(५) तामिळनाडूच्या अम्मांना अटक झाल्यावर पाच-सात भक्तांना हृदयविकाराचा झटका बसला
तर तेवढ्याच मंडळींनी थेट आत्महत्या केली. अम्मांच्या पक्षाच्या नवीन
मुख्यमंत्र्यांना शपथ घेताना रडू आले. चेन्नई मध्ये काही ठिकाणी तोडफोड आणि जाळपोळ
पण झाली.
अनुयायी असणं, एखादी व्यक्ती आवडणे, एखाद्या
व्यक्तीकडून प्रेरणा घेणं, त्या व्यक्तीसंबंधी विश्वास वाटणं या सगळ्या गोष्टी
अतिशय स्वाभाविक आहेत. पण विश्वास जेव्हा अंधविश्वासाकडे जाऊ लागतो, प्रेरणा आणि
उन्माद यातला फरक जेव्हा पुसट होत जातो, आपण ज्या व्यक्तीचे अनुयायी आहोत ती
व्यक्ती अस्खलनशील आहे असं जेव्हा वाटू लागतं, जेव्हा टीका करणाऱ्यावर उलट टीका,
टिंगलटवाळी, बहिष्कार किंवा थेट हिंसाचार अशी अस्त्र उगारली जातात तेव्हा समजावे
की आपण भक्तीसंप्रदायाचा भाग बनू लागलो आहोत.
राजकीय भक्ती संप्रदायाची खासियत म्हणजे तो
टोकाची भूमिका घेऊन आपल्यावर टीका करणाऱ्यांना थेट आपला शत्रू मानू लागतो. आणि
शत्रूला नामोहरम करण्यासाठी सर्व उपलब्ध शस्त्रास्त्रांचा वापर करू लागतो. यातले
सगळ्यात प्रभावी अस्त्र म्हणजे टिंगलटवाळी आणि प्रतिमाहरण. स्टालिनने सुरुवातीच्या
काळात रशियामध्ये याचा तुफान वापर केला. आपल्या राजकीय विरोधकांची सुरुवातीला
वर्तमानपत्रातून निंदा नालस्ती सुरु होत असे. मग पद्धतशीरपणे त्यांच्या विचारांची,
कृत्यांची टिंगल सुरु होई. हळूहळू ते कसे मार्क्सवादाच्या विरोधातले आहेत आणि
स्टालिन हाच कसा खरा मार्क्सवादी, लेनिनचा पट्टशिष्य हे ठसवलं जाई. आणि मग एवढं
झाल्यावर लोकांच्या मनातून विरोधकांची प्रतिमा खालावल्यावर त्यांना गोळ्या घातल्या
जात. हे तंत्र स्टालिनने एवढं प्रभावीपणे वापरलं की एखाद्या नेत्याच्या विरोधात
वर्तमानपत्रात एखादा जरी टीकात्मक लेख छापून आला की तो थेट स्टालिनचे पाय धरायला
धावू लागे. स्टालिनचे अवास्तव कौतुक सुरु करे. स्टालिनला अवतारी पुरुष मानू लागे. माओने
चीनमध्ये हेच केलं. त्याने तर घोषणाच दिली- ‘बम्बार्ड द हेडक्वार्टर्स’-
मुख्यालयावर हल्ला बोल. पक्षातल्या आपल्या विरोधकांना निंदा नालस्ती, टिंगलटवाळी
करत सामाजिक जीवनातून उठवणे आणि मग गोळ्या घालून ठार करणे हे तंत्र माओने देखील यथेच्छ
वापरले. इतके थोर गांधीजी. पण या महात्म्याला तरी सुभाषबाबूंनी केलेला विरोध सहन
कुठे झाला? कॉंग्रेस मध्ये त्यांना काम करणे अशक्य व्हावे अशी परिस्थिती
गांधीजींनी निर्माण केलीच. आणि ती ते करू शकले कारण ‘गांधीजी वाक्यं प्रमाणं’
म्हणत असंख्य भक्त मंडळी त्यांच्या आजूबाजूला उभी होती. टीका ऐकून घेणं, त्यावर पूर्वग्रह
बाजूला ठेवून विचार करणं, टीकाकारांबद्दल सहिष्णुता दाखवणं, टीका लक्षात घेऊन
आपल्यातले दोष दूर करायचा प्रयत्न करणं या गोष्टी सुदृढ लोकशाहीच्या दृष्टीने
आवश्यक अशा आहेत. या नसतील तर प्रगल्भ आणि चांगली लोकशाही व्यवस्था या देशात कधीही
निर्माण होऊ शकणार नाही.
थोडक्यात सांगायचा मुद्दा असा की, ‘निंदकाचे घर
असावे शेजारी’ असे कितीही जरी तुकोबांनी सांगितले तरी ते स्वीकारण्याची तयारी
आमच्या राजकीय भक्ती-सांप्रदायिकतेच्या विळख्यात अडकलेल्या लोकांची नाही. ‘सुदृढ लोकशाही
हवी’ यावर एकमत असल्यास आपल्याला त्या दिशेने प्रयत्न करावे लागतील. आरोपाचे
प्रत्युत्तर आरोप असू शकत नाही हे आपल्याला शिकावं लागेल. आपल्या धोरणाला,
विचारधारेला होणारा विरोध म्हणजे त्यात काही त्रुटी असल्यास त्या दूर करण्याची संधी
असते हे समजून घ्यावं लागेल. मतभेद आणि दर्जेदार वादविवाद यामुळेच आपले विचार अधिक
सुस्पष्ट करण्याची आणि अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचवण्याची संधी आपल्याला मिळत असते
हे लक्षात घ्यावं लागेल. आपल्याला चांगल्या लोकशाही मानसिकता असलेल्या समाजाच्या
निर्मितीसाठी, भक्ती-संप्रदायात न अडकण्याची काळजी घ्यावी लागेल.
समर्थांचा दासबोध आणि मंगेश पाडगांवकरांचा उदासबोध
यातून प्रेरणा घेत “भक्तलक्षण” सुचले-
- भक्तलक्षण -
करून टिंगल विरोधकांची
कवने रचून नेत्यांची
घोषणा गोंधळ ज्याने केला
तो येक भक्त
कवने रचून नेत्यांची
घोषणा गोंधळ ज्याने केला
तो येक भक्त
भक्ती हाच एकमेव धर्म
भक्ती हेच एकमेव कर्म
नेता ज्याचा शिव-विष्णू-ब्रह्म
तो येक भक्त
भक्ती हेच एकमेव कर्म
नेता ज्याचा शिव-विष्णू-ब्रह्म
तो येक भक्त
प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट
प्रतिमेच्या प्रेमात रमले मर्कट
सोडून दिले सर्व तर्कट
तो येक भक्त
प्रतिमेच्या प्रेमात रमले मर्कट
सोडून दिले सर्व तर्कट
तो येक भक्त
झापड लावून घोड्यासारखा
डोले नंदीबैलासारखा
बहिरा ठार नागासारखा
तो येक भक्त
डोले नंदीबैलासारखा
बहिरा ठार नागासारखा
तो येक भक्त
चर्चाखोर भांडखोर
शंकाखोर टीकाखोर
यांना शत्रू ज्याने मानले
तो येक भक्त
शंकाखोर टीकाखोर
यांना शत्रू ज्याने मानले
तो येक भक्त
(ता.क. - फेसबुकवर जेव्हा मी मोदीभक्तांचा उल्लेख केला तेव्हा अनेकजण एकदम
उसळले- आम आदमी पक्षात काय भक्त नाहीत का वगैरे वगैरे. यातले अनेकजण मला बऱ्याच वर्षांपासून
ओळखणारेही होते याचं मला आश्चर्य वाटलं. मी नेहमीच सर्व प्रकारच्या राजकीय भक्ती
संप्रदायावर टीकाच केली आहे आणि करत राहीन. मग ते मोदी भक्त असो नाहीतर राज-भक्त असो
किंवा केजरीवाल भक्त. २०११ मध्येही अण्णा आंदोलनाच्या वेळी मी लेख लिहून ‘मसीहा
मानसिकतेवर’ टीका केली होती. तेव्हा माझ्या या लेखनाचा रोख निव्वळ मोदी भक्तांवर
नाही हे सर्व भक्तांनी समजून घेणे आवश्यक आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हे
सर्व लेखन हे ‘भक्त केंद्रित’ आहे. त्यांच्या त्यांच्या नेत्यांवर ही टीका नाही
हेही समजून घेण्याचा प्रयत्न करावा. अर्थात सर्वच गोष्टी पूर्वग्रहाच्या चष्म्यातून
बघायच्या असतील तर मग बोलणेच खुंटले!)