“जगण्याला जीवन म्हणावे अशी माणसे हजार वर्षातून एकदाच
जन्माला येतात”
- पु.ल.देशपांडे
- पु.ल.देशपांडे
इतर अनेक विद्यार्थ्यांप्रमाणेच माझीही अब्दुल कलाम यांच्याशी पहिली ओळख झाली
ती ‘अग्नीपंख’ मधून. मूळ इंग्लिश पुस्तकाचा हा मराठी अनुवाद. तेव्हा मी इंग्लिश
पुस्तकांना घाबरायचो आणि त्यांच्यापासून दूरच असायचो. पहिल्यांदा अग्नीपंख वाचलं
तेव्हा एवढं भावलं नव्हतं. तीच तीच नेहमीची कहाणी वाटली होती. गरिबाघरचं मूल, शिकण्याची
धडपड आणि मग कष्ट केल्याने फार मोठा माणूस होणं. उगीचच नको इतका गाजावाजा केलेलं
पुस्तक आहे हे असं वाटलं.
पुढे एकदा वेगवेगळ्या पुस्तकांविषयी आमच्या गप्पा रंगल्या असताना माझा एक
मित्र म्हणाला अनुवाद कितीही चांगले असले तरी शेवटी मूळ लेखकाच्या शैलीतलं लेखन
वाचलं पाहिजे. त्यानंतर मग मी निश्चय करून इंग्लिश वाचायला सुरुवात केली. याच
प्रवासात कधीतरी “Wings of Fire” वाचायला घेतलं. पुस्तकाबाबत मनात पूर्वग्रह
असूनही एकदा वाचायला सुरुवात केल्यावर हळूहळू मी त्यात गुंतत गेलो. एपीजे अब्दुल
कलाम ही व्यक्ती स्वतः त्यांची कथा मला सांगत आहे असंच वाटू लागलं. अनुवाद वाचताना
वाटलेला परकेपणा आताशा नाहीसाच झाला. कलाम एकदम आवडले, नव्हे प्रेमातच पडलो मी
त्यांच्या! त्यानंतर प्रत्येक वेळी त्यांचं टीव्हीवर/यूट्यूबवर भाषण ऐकताना,
त्यांच्याविषयी वाचताना मन उचंबळून यायचं. राष्ट्रपती या पदाला सर्वार्थाने गौरवलं
त्यांनी. त्या पदाची ढासळलेली पत सावरली त्यांनी. आमचे राष्ट्रपती, देशाचे प्रथम
नागरिक हे डॉ एपीजे अब्दुल कलाम आहेत हे म्हणताना अभिमान वाटायचा. त्यांची ती राष्ट्रपती
असतानाही जपलेली हेअरस्टाईल, चेहऱ्यावरचं निखळ हसू आणि मूलभूत मानवी चांगुलपणावर
असणारा त्यांचा गाढा विश्वास या गोष्टी मोहवून टाकत.
मला आठवतं पाकिस्तानच्या अणुकार्यक्रमाचे प्रमुख अब्दुल कादिर खान यांना अण्वस्त्र
तंत्रज्ञान लिबिया आणि कोरियाला बेकायदा दिल्याचा आरोप होऊन जेलमध्ये होते.
त्याचवेळी भारताचे अणुकार्यक्रमाचे आधारस्तंभ असणारे कलाम आपल्या देशाचं सर्वोच्च
स्थान भूषवत होते. केवढा फरक हा २४ तासांच्या फरकाने स्वतंत्र झालेल्या दोन
देशांतला!
कोणत्यातरी मासिकाने (नेमकं आठवत नाही पण बहुधा इंडिया टुडे) एक लेख छापला
होता. त्यात त्यांनी असं म्हणलं होतं की भारत कसा खराखुरा सेक्युलर देश आहे. या
देशाचे बहुसंख्य नागरिक हिंदू असतानाही राष्ट्रपती मुसलमान आहे, पंतप्रधान शीख
आहे, सत्ताधारी पक्षाच्या प्रमुख ख्रिश्चन आहेत. लेखकाची नजर गढूळच होती असं वाटून
गेलं मला. तोवर कलाम हे मुसलमान आहेत असा विचारही माझ्या मनात कधी आला नव्हता.
काहीही कारण नसताना धर्माचा उल्लेख केल्याने काय मिळतं लोकांना असं वाटून गेलं. लहान
मुलांशी कलाम बोलायला उभं राहिल्यावर त्यांची ओळख ‘हे आपले एक मुसलमान शास्त्रज्ञ
आणि राष्ट्रपती’ अशी करून दिली तर लहान मुलांवर त्याचा किती वाईट परिणाम होईल. असो.
पण कलाम सगळ्या सीमा भेदत संपूर्ण देशाचे झाले. राज्य, प्रांत, भाषा, धर्म, जात कसलाही
अडसर आला नाही. त्यांच्या व्यक्तिमत्वाने भारावून गेला नाही असा कोणता सामान्य भारतीय
नागरिक असेल? अशी फार कमी माणसं आहेत, जवळ जवळ नाहीतच, की ज्यांच्याबद्दल संपूर्ण
भारत देशाला आदर वाटावा. आणि आदराबरोबर प्रेमही वाटावं. विद्यार्थ्यांशी बोलतानाच
काल ते गेले. पहिल्यांदा ही बातमी मोबाईलवर आली तेव्हा विश्वासच बसला नाही. मग
एकदम टचकन डोळ्यात पाणी आलं. एखादा माणूस आयुष्यात कधीही न भेटता इतका आपलासा कसा
बनतो? त्यांच्या शब्दांमुळे प्रत्येकाला प्रेरणा मिळते. ही ताकद त्या शब्दांची नाही.
शब्द काय डिक्शनरीमध्येही छापलेले असतात. पण शब्द उच्चारणारी व्यक्ती त्या
शब्दांना वजन देते. आणि म्हणूनच जेव्हा कलाम म्हणतात स्वप्न बघा आणि त्यांचा
पाठलाग करा तेव्हा स्वप्न बघणं आणि मेहनत घेत ती स्वप्न पुरी करण्याचा ध्यास घेणं
हेच आपलं कर्तव्य आहे असं वाटू लागतं.
परिवर्तनतर्फे आम्ही सीओईपी च्या विद्यार्थ्यांना घेऊन बॉम्ब शोधक आणि नाशक
पथकासाठी(BDDS) उपयोगी पडतील असे छोटे सोपे रोबो बनवण्याचा एक प्रोजेक्ट चालू केला
होता. त्याचा पहिला प्रोटोटाईप तयार झाल्यावर तो कलामांच्या हस्ते BDDS ला देण्याचा
सोहळा करायचा असं आम्ही ठरवलं होतं. त्यानिमित्ताने एकदा माझं कलामांच्या
सेक्रेटरींशी सविस्तर बोलणंही झालं होतं. पण त्यावेळच्या BDDS प्रमुखांची बदली झाली,
सीओईपीचे विद्यार्थीही शिक्षण संपवून बाहेर पडले असं होत होत पुढे तो प्रकल्प
बारगळला. आणि कलामांना परिवर्तनच्या कार्यक्रमात बोलवायचं राहिलं ते राहिलंच. आज
ते जास्त जाणवतंय. आम्ही एक स्वप्न बघितलं जे पूर्ण नाही करू शकलो. पण त्या निराशेतही
पुन्हा कलामच मला सांगतायत जणू की ‘स्वप्न बघणं थांबवू नका. स्वप्न बघा आणि
त्यांचा पाठलाग करा.’ माझ्या मनातले हे कलाम मला स्वस्थ बसू देत नाहीत. ते पुन्हा
पुन्हा स्वप्न बघायला सांगतायत आणि पुन्हा पुन्हा त्या स्वप्नांचा पाठलाग करण्याची
उर्जा आणि प्रेरणा देतायत. आणि मीही त्यांना पुन्हा पुन्हा आश्वस्त करतोय की ‘ज्या
समृद्ध, संपन्न आणि समाधानी समाजाच्या निर्मितीचं स्वप्न मी बघितलंय त्याचा मी
पाठलाग करतो आहे आणि करत राहीन.’ यावर या मनातल्या
कलामांच्या चेहऱ्यावर एक प्रसन्न आणि निखळ हसू उमटतंय आणि मग ते त्यांची
स्वप्नांची पोतडी सावरत त्यांच्या पुढच्या विद्यार्थ्याकडे चालत जातायत...स्वप्न वाटायला!