Showing posts with label व्यक्तीविशेष. Show all posts
Showing posts with label व्यक्तीविशेष. Show all posts

Saturday, August 1, 2020

लोकमान्य

आज लोकमान्यांचा १०० वा स्मृतिदिन. 

लोकमान्य टिळक हा माझ्या अत्यंत प्रेमाचा आणि जिव्हाळ्याचा विषय आहे. टिळकांवर पुरोगामी मंडळींकडून नेहमी खरमरीत टीका केली जाते आणि त्यातले कित्येक मुद्दे आजच्या दृष्टिकोनातून रास्तच आहेत! पण कोणत्याही महापुरुषाकडे बघताना एकेका वेळी त्यांनी घेतलेली भूमिका, एखाद्या वेळचे वर्तन यापलीकडे जात त्यांची असणारी मनोभूमिका, दृष्टिकोन आणि त्या व्यक्तीचा झालेला एकूण प्रवास, संपूर्ण जीवनपट; असा सगळा विचार करावा लागतो. टिळक याला अपवाद असायचं कारण नाही. सुरुवातीला सनातनी ब्राह्मणांचे पुढारी असणारे टिळक, दंगली झाल्या तेव्हा मराठी हिंदूंचे पुढारी बनले. प्लेग, दुष्काळ आणि ब्रिटिश जुलूम अशा अस्मानी आणि सुलतानी संकटांच्या काळात ते शेतकरी वर्गापर्यंतही पोचले आणि बघता बघता महाराष्ट्राचे नेते झाले. आणि १९०५ पासून थेट राष्ट्रीय नेते बनले. १८८० ची सनातनी विचारधारा घेऊन ते या स्थानावर पोहोचणं शक्यच नव्हतं. त्यांच्या भूमिका, त्यांचा दृष्टिकोन हळूहळू व्यापक होत गेला, विकसित होत गेला. हे विकसित होत जाणं मला मोहवून टाकतं.

मंडालेच्या तुरुंगातून सुटल्यावर तर ज्या प्रमाणे त्यांनी कामगार चळवळीबद्दल आस्था ठेवली ती बघता टिळक हळूहळू समाजवादाकडे झुकत होते की काय असं वाटतं. इंग्लंडला जाऊन लेबर पार्टीबरोबर मैत्रीचा प्रयत्न त्यांनी केला. त्यांना देणगी देखील दिली. (पुढे याच पक्षाच्या सरकारने भारताला स्वातंत्र्य द्यायचा निर्णय घेतला!). रशियन कम्युनिस्ट क्रांतीचंही त्यांनी स्वागत केलं. पुण्याच्या पेठेतला सनातनी दृष्टिकोन टप्प्याटप्प्याने व्यापक होत आंतरराष्ट्रीय होत गेला. आणि तरी पाय घट्ट मातीत. त्यामुळे कोणत्याही विचारधारेला त्यांनी भारतीय नजरेतून जोखून बघितलं. बाहेरच्या देशातलं आपल्याही देशात जसंच्या तसं आणावं असा भाबडेपणा नव्हता. मला वाटतं गांधींनी स्वतःला गोखल्यांचं शिष्य म्हणवलं तरी ते खरंतर टिळकांचाच हाही वारसा घेऊन पुढे गेले. म्हणून तेही लोकांना आपलेसे वाटले. या मातीतले वाटले.

टिळक नुसते पुस्तकी आदर्शवादी नव्हते. डोळ्यासमोर आदर्श असणं त्यांना अमान्य नव्हतं, पण 'आज' काय करणं शक्य आहे आणि काय नाही याची मांडणी करून, जे शक्य आहे त्यावर काम करणं यावर त्यांचा आयुष्यभर भर होता. इतकं विवेकनिष्ठ (rational) राहणं आपल्याला रोज साध्या साध्या बाबतीतही जमत नाही सहजपणे. 'जेवढं मिळेल ते आनंदाने स्वीकारायचं आणि उरलेल्यासाठी प्रयत्न करत राहायचं' हे त्यांचं सूत्र ज्याला त्यांनीच नाव दिलं- प्रतियोगी सहकारिता. ब्रिटिशांनी काही सुधारणा दिल्यावर जहाल आदर्शवादी मंडळींचा आग्रह होता आपण 'खाईन तर तुपाशी' हीच भूमिका घ्यावी, मवाळ मंडळींना जे मिळतंय त्यालाच तूप म्हणायचं होतं. टिळकांनी मध्यममार्ग काढला, विवेकनिष्ठ मार्ग काढला. त्यावेळी अग्रलेखाचं शीर्षक होतं- 'उजाडलं पण सूर्य कुठे आहे?' म्हणजे उजाडलं असं म्हणायला त्यांनी हात आखडता घेतला नाही, पण सूर्य नाही हेही सांगितलं.

व्यक्तिशः मला, भूमिका, विचारधारा विकसित होत जाणं आकर्षक वाटतं. ते मानवी आणि नैसर्गिक वाटतं. स्थळ-काळ-परिस्थितीनुसार विचार बदलणं, व्यापक होणं हे माणूस म्हणून प्रगल्भ होण्याचं लक्षण आहे, असं मला वाटतं. त्यामुळे लहानपणीच कसे टिळक 'टरफलं उचलणार नाही' म्हणणारे बाणेदार व्यक्ती होते या कथे (narrative)पेक्षा आक्रमक, हट्टी आणि सनातनी टिळक पुढे संयत, उदारमतवादी आणि अधिकाधिक विवेकनिष्ठ होत गेले हे narrative जास्त महत्त्वाचं वाटतं. लहानपणापासून हेच सांगायला हवं खरंतर. आपले महापुरुष हे सुरुवातीपासून सुपरहिरो होते यापेक्षा; सामान्य माणूस असणाऱ्यालाही बदलता येतं, सुधारता येतं, अधिक कष्ट घेत, वेगवेगळ्या गोष्टींचा परिचय करून घेत विकसित होता येतं हा संदेश महत्त्वाचा आहे.


Wednesday, October 2, 2019

ताश्कंद, शास्त्रीजी आणि मृत्यूचे गूढ

काही महिन्यांपूर्वी अनुज धर या पत्रकार-लेखकाचं ‘युअर प्राईम मिनिस्टर इज डेड हे पुस्तक बाजारात आलं.  पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या मृत्यूबाबत आजही गूढ आहे, त्यांचा मृत्यू नैसर्गिक नव्हता असं मानणारे बरेच आहेत. या विषयाबाबतचं नेमकं सत्य लोकांसमोर यावं म्हणून वेगवेगळ्या पातळ्यांवर आजवर झालेले प्रयत्न, आजही उघड न झालेली कागदपत्रं आणि यातून निर्माण होणारं संशयाचं धुकं या सगळ्याचा आढावा लेखकाने आपल्या पुस्तकात घेतला आहे.

‘देशात कृषीक्रांतीची सुरुवात करत आणि युद्धात पाकिस्तानला धडा शिकवत, ‘जय जवान जय किसान’ ही घोषणा प्रत्यक्षात आणणारे कणखर पंतप्रधान’ अशी प्रतिमा असणारे लाल बहादूर शास्त्री हे भारतीयांचे इतिहासातले एक लाडके नेते आहेत. स्वातंत्र्याच्या ७० वर्षांत गांधी-नेहरू परीवाराबाहेरच्या कॉंग्रेसच्या नेत्याला एवढी प्रचंड लोकप्रियता मिळाली असा हा कदाचित एकमेव नेता. त्यामुळे आजही या विषयांत राजकारण आहे. प्रदीर्घ काळ कॉंग्रेस सत्तेत असल्याने आणि त्यावेळी त्यांच्या सरकारांनी नेहमीच शास्त्रीजींच्या मृत्यूविषयक तपशील उघड करण्यास, तपास करण्यास दिलेले नकार हेही या सध्याच्या राजकारणाला पोषक आहे. लेखक अनुज धर गेले कित्येक वर्ष नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूबाबत असणारं गूढ उकलण्याचा प्रयत्न करत आहेत. ‘मिशन नेताजी’ या उपक्रमामार्फत त्यांनी आणि त्यांच्या मित्रांनी नेताजींबाबत अनेक गोष्टी उघड केल्या आहेत. अनेक कागदपत्रं खुली करायला सरकारला भाग पाडलं आहे. आणि या प्रयत्नांच्या वेळेस आलेले अनुभव, नेताजींच्या प्रकरणात केलेला त्यांचा अभ्यास या सगळ्यामुळे कॉंग्रेस पक्षाबद्दल आणि विशेषतः गांधी-नेहरू घराण्याबद्दल त्यांच्या मनात कटुता आहे, अढी आहे हे त्यांच्या लेखनात दिसतं. पण तरीही, लेखनाचा कल आणि निष्कर्ष निःपक्षपाती नसले तरीही, त्यांनी उपस्थित केलेले मुद्दे आणि मांडलेला अभ्यास चोख आहे. आणि त्या अभ्यासानुसार जे प्रश्न उपस्थित होतात ते प्रामाणिकपणे सत्य जाणून घेण्याची इच्छा असणाऱ्या कोणत्याही सजग नागरिकाच्या डोक्यात घुमत राहतात- तुम्ही राजकीय विचारधारेच्या दृष्टीने कोणत्याही बाजूला असलात तरीही! आणि त्या प्रश्नांची उत्तरं मिळायला हवीत अशी इच्छा तयार होते. मला वाटतं हेच या पुस्तकाचं यश आहे.
‘नेताजींच्या विषयाचा जेवढा माझा अभ्यास आहे तेवढा शास्त्रीजींच्याबाबत नाही’ अशी प्रस्तावनेतच प्रांजळपणे कबुली देत, पण तरीही ‘कोणीतरी हा अभ्यास करून मांडायला हवा’ म्हणून ही जबाबदारी स्वीकारत असल्याचं सांगत लेखक विषयाला सुरुवात करतात. भारत पाकिस्तान युद्धानंतर सोव्हिएत रशियाच्या मध्यस्थीने ताश्कंद इथे पाकिस्तानचे हुकुमशहा अयुब खान आणि आपले पंतप्रधान शास्त्रीजी यांच्यात तह झाला. त्यानंतर लगेचच शास्त्रीजींचा मृत्यू झाला. या घटनेबाबत वेगवेगळे मतप्रवाह आहेत. सरकारची अधिकृत भूमिका अशी आहे की हृदयविकाराच्या धक्क्याने शास्त्रीजी गेले. नैसर्गिक मृत्यू होता तो. याबाबत सविस्तर अहवाल सरकारने संसदेत सादरही केला. त्यावेळचे सरकारमधले वरिष्ठ मंत्री यशवंतराव चव्हाण यांनीही या विषयी संसदेत सरकारची भूमिका मांडली. त्याचवेळी, शास्त्रीजींचा खून झाला असून त्यामागे अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा- सीआयए असल्याच्या भारतात बातम्या पसरल्या होत्या. अनेकांनी हा आरोप केला होता. काहींनी मात्र शास्त्रीजींच्या मृत्यूमागे सोव्हिएत रशियाच्या केजीबी या गुप्तचर यंत्रणेचा हात असल्याचे आरोप केले, तर काहींनी शास्त्रीजींच्या मृत्यूमागे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विशेषतः इंदिरा गांधी असल्याचीही शक्यता जाहीरपणे व्यक्त केली. लेखक अनुज धर यांनी या सगळ्या शक्यतांचा वेध घेण्याचा प्रयत्न केला आहे.
शास्त्रीजींचा मृतदेह भारतात आला त्यावेळची त्याची स्थिती, त्याबद्दल शास्त्रीजींच्या कुटुंबीयांनी व्यक्त  केलेली मतं आणि अधिकृत सरकारी अहवालाबाबत निर्माण झालेले प्रश्न या सगळ्याचा उहापोह लेखक सुरुवातीला करतात. संसदेत विरोधी बाकांवरून राज नारायण, अटलबिहारी वाजपेयी यांच्यासारख्या दिग्गजांनी सरकारला धारेवर धरण्याच्या केलेल्या प्रयत्नांबाबत विस्ताराने लिहिलं आहे. सत्ताधारी कॉंग्रेसच्याही अनेक खासदारांनी शास्त्रीजींच्या मृत्यूबाबत प्रश्न उपस्थित केले होते. अखेर सरकारने सविस्तर उत्तर दिलं आणि या प्रकरणावर संसदीय आघाडीवर पडदा पडला. पुढे बांगलादेश युद्ध आणि पाठोपाठ आणीबाणी या घटनांनी शास्त्रीजींच्या मृत्यूचा मुद्दा मागे पडला असं लेखक खेदाने म्हणतात.
सीआयए किंवा केजीबीचा हात असल्याच्या आरोपांचं लेखक बऱ्यापैकी खंडन करतात. अमेरिकन कायद्यानुसार अगदी गुप्तचर यंत्रणांचीही सरकारी कागदपत्रं ठराविक काळाने कोणालाही बघायला उपलब्ध होतात. शास्त्रीजींच्या मृत्युच्या वेळेसची ही कागदपत्रं स्वतः तपासून सीआयएकडे शास्त्रीजींना मारण्यासाठी कसलाही उद्देश किंवा इच्छा असल्याचं दिसत नाही, असा निष्कर्ष लेखकाने काढला आहे. सोव्हिएत रशियाचं विघटन झाल्यानंतर केजीबीमधली अनेक गुपितं उघड झाली पण तरीही आत्तापर्यंत उपलब्ध कागदपत्रांनुसार शास्त्रीजींच्या मृत्यूमध्ये सोव्हिएत रशियाने काही भूमिका बजावली असेल असा पुरावा दिसत नाही असंही लेखक सविस्तर मांडणीतून सांगतात. आता विषय येऊन पोहोचतो भारतातल्या नेत्यांपर्यंत आणि इंदिरा गांधी यांच्यापर्यंत. आपले पूर्वग्रह बाजूला ठेवून, अनुज धर निःसंदिग्धपणे सांगतात की, इंदिरा गांधी आणि शास्त्रीजींचा अकाली मृत्यू या गोष्टी जोडणारा एकही पुरावा नाही. तेव्हा याविषयीच्या आरोपांमध्ये तथ्य नाही. अर्थात हे म्हणत असतानाच इंदिरा गांधी सरकारने काहीतरी महत्त्वाची माहिती दडवण्याचा सातत्याने प्रयत्न केल्याचं दिसून आलं आहे हा आरोप करतात. आणीबाणीनंतर वाजपेयी आणि राज नारायण ज्या जनता सरकारमध्ये होते त्या सरकारनेही या विषयांत खोलात जाण्याचा प्रयत्न केला नाही, ना शास्त्रीजींविषयीची कोणतीही कागदपत्रं खुली केली. आजवरच्या कोणत्याही पक्षाच्या सरकारने या विषयांत पुरेशी पारदर्शकता बाळगलेली नाही हेही लेखक ठासून सांगतात.
नेताजी सुभाष चंद्र बोस हे ताश्कंद कराराच्या वेळेस तेथेच होते असा एका फोटोच्या आधारे खळबळजनक दावा काही मंडळींनी केला. हा दावा साफ चुकीचा असून व्यक्तीशः लेखक या दाव्याशी मुळीच सहमत नसल्याचं मत व्यक्त करतात. नेताजींबाबतचा पारदर्शकतेचा आग्रह, त्यासाठीचे प्रयत्न आणि नेताजी आणि शास्त्रीजी या दोन्ही प्रकरणांतली साम्यस्थळं; यासाठी लेखकाने एक स्वतंत्र प्रकरण लिहिलं आहे. यात आजवरच्या सरकारांनी लपवलेली माहिती, किंवा गोष्टी उघड होऊ नयेत यासाठी केलेली धडपड याबद्दल परत परत लिहिलं आहे. एखाद्या कार्यकर्त्याची सत्य माहिती मिळवण्याची धडपड आणि त्यात सातत्याने सरकारी पातळीवरून न मिळालेले सहकार्य यामुळे लेखनात येणारी कटुता या प्रकरणात अधिकच प्राधान्याने दिसते. ‘ताश्कंद फाईल्स’ या सिनेमासाठी बरीच माहिती लेखकाने पुरवली असल्याने या सिनेमाचा कौतुकाने अनेकदा उल्लेख येतो. सिनेमातून महत्त्वाचा विषय मुख्य धारेत चर्चेला येईल अशी आशाही लेखक बाळगतो. पण तो सिनेमा कलात्मक दृष्ट्या तर सुमार होताच, पण त्याबरोबर शास्त्रीजींच्या मृत्यूबाबत विचारायला हवेत असे कोणतेही ठोस प्रश्न न उपस्थित करता, कोणत्याही मुख्य मुद्द्याला गांभीर्याने न भिडता तो उथळ आणि प्रचारकी सिनेमा बनतो. शास्त्रीजींचा मुद्दा पार बाजूलाच पडतो हे केवढं मोठं दुर्दैव!
माझ्या मते हे पुस्तक काही मुद्द्यांच्या दृष्टीने बघणं आवश्यक आहे. एक म्हणजे लेखकाने नेताजी असोत वा शास्त्रीजी, माहिती मिळवण्यासाठी अधिकार कायद्याचा सातत्याने मुक्तहस्ते वापर केला. आवश्यक तिथे सरकारला धारेवर धरणारी अपिलं दाखल करून माहिती मिळवली. सत्य माहितीसाठी न्यायालयीन लढाई लढावी लागली. यातून माहिती अधिकार कायद्याचं महत्त्व जसं अधोरेखित होतं तसंच सरकारला ठणकावणारे निर्णय देणाऱ्या माहिती आयुक्तांच्या स्वायत्ततेचंही होतं. आज कायदा बदलानंतर या स्वायत्ततेला धोका पोहचला असताना तर याकडे अधिकच गांभीर्याने बघावं लागतं. दुसरा मुद्दा असा की, लेखकाच्या किंवा त्या आधीच्या अनेकांच्या पारदर्शकतेच्या लढाईदरम्यान बहुतांश काळ जरी कॉंग्रेस पक्ष सत्तेत असला तरी विरोधक जेव्हा जेव्हा सत्तेत आले तेव्हा तेही भारत सरकारने आजवर घेतलेल्या भूमिकेपासून फार फारकत घेऊ शकले नाहीत. आजही नव्याने आलेल्या बिगर काँग्रेसी सरकारला पाच वर्षांपेक्षा जास्त काळ झाला तरी नेताजींच्या बाबतीत फक्त मोजकी काही कागदपत्रं उघड झाली. ती देखील ‘प्रत्यक्ष नेताजींचा मृत्यू विमान अपघातात झाला का नाही आणि नसल्यास नंतर नेताजी कुठे होते’ या प्रश्नांच्या जवळपासही नेणारी नाहीत. शास्त्रीजींच्या बाबतीत तर तेवढंही झालं नाही. लेखकाने अमेरिकन सरकारच्या दर काही कालावधीने गुप्त कागदपत्रंही खुली करण्याचं वारंवार कौतुक केलं आहे आणि यातून भारताने बोध घ्यावा असंही सुचवलं आहे. हा मुद्दा महत्त्वाचा आहे. माहिती अधिकार कायदा येऊन चौदा वर्ष झाली पण अजून तो कायदा मजबूत करणं तर सोडाच पण आहे त्याची पुरेशी व्यापक अंमलबजावणीही झालेली नाही. सरकारकडे असणारी माहिती सरकारमध्ये असणारे पक्ष स्वतःच्या फायद्यासाठी तर वापरत नाहीएत ना हे जाणण्याचा एकमेव प्रभावी मार्ग म्हणजे सरकारी माहिती सरकारच्या खऱ्या मालकांना म्हणजेच जनतेला खुली केली पाहिजे.
सगळ्यात शेवटी, अनेक दशकांपूर्वी घडलेल्या या सगळ्या घटनांचा आज शोध का घ्यायचा? आज या सगळ्या चर्चेची गरज आहे का? होय, नक्कीच गरज आहे. याची कारणं दोन. वर्तमान भारतीय राजकारणात इतिहासातल्या घटना आणि महापुरुषांच्या वागण्याचा, वक्तव्यांचा सातत्याने उल्लेख होत असतो. त्याबद्दल बोलणं होतं. आणि त्याचा वर्तमानातल्या मतदानावर परिणाम होतो. त्यामुळे वर्तमानातल्या निर्णयप्रक्रियेवर परिणाम करणाऱ्या इतिहासातल्या गोष्टींचा वेध घ्यायलाच हवा. आणि दुसरं अधिक गंभीर म्हणजे, सोशल मिडियाचा उदय. गावाच्या पारावर नाहीतर मित्रांच्या कट्ट्यावर होणारी थापा भरलेली कुजबुज आता सोशल मिडियावरून प्रत्येकाच्या हातात आली आहे. तिचा मारा प्रचंड आहे. हे कोणत्या एका विचारधारेच्या लोकांकडून होतंय असं मानायचं कारण नाही. सगळीकडूनच होतंय. सोशल मिडियाच्या उदयापासून दर दोन खऱ्या वाक्यांच्या आवरणाखाली दहा थापा पसरत आहेत. अशावेळी सत्य आणि अधिकृत माहितीचा प्रवाह खुला करणं ही कोणत्याही पक्षाच्या सरकारने अत्यंत गांभीर्याने स्वीकारावी अशी जबाबदारी आहे. अनुज धर यांच्यासारख्या मंडळींनी प्रामाणिकपणे आणि चिकाटीने केलेल्या अभ्यासाला सत्य माहितीच्या प्रवाहाची जोड लाभली तर आपली लोकशाही अधिक पारदर्शक आणि मजबूत होईल याबद्दल माझ्या मनात तिळमात्र शंका नाही.

पुस्तकाचे नाव : युअर प्राईम मिनिस्टर इज डेड.
लेखक : अनुज धर
प्रकाशक : वितस्ता पब्लिशिंग
मूल्य : रु. ३९५/-


Saturday, January 23, 2016

नेताजी

नेताजी सुभाषचंद्र बोस हे नाव ऐकलं की मन उचंबळून येतं. अतुलनीय शौर्य, देशप्रेम आणि त्यागाचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे नेताजी. आयसीएस म्हणजे आजकाल ज्याला आयएएस म्हणलं जातं, त्यात निवड होऊनही, त्या ऐशोआरामाच्या नोकरीवर लाथ मारून देशबंधू चित्तरंजन दास यांच्या नेतृत्वाखाली देशसेवेत रुजू होणारे सुभाषबाबू. मग त्यांचा आलेख चढताच राहिला. त्यांनी दोनदा कॉंग्रेसचं अध्यक्षपद भूषवलं. पहिल्यांदा कोणत्याही विरोधाशिवाय. तर दुसऱ्यावेळी महात्मा-सरदार-पंडित या महान त्रिमूर्तीच्या विरोधाचा प्रत्यक्ष निवडणुकीत साफ पराभव करून. पण दुर्दैव असं की पक्ष संघटनेची साथ नसतानाच प्रकृतीचीही साथ मिळेना. शेवटी अध्यक्षपद सोडावं लागलं. पुढे तर कॉंग्रेसमधून त्यांना काढून टाकलं गेलं. मग स्वतःचा फॉरवर्ड ब्लॉक हा पक्ष. त्यानंतर अटक. मग एक दिवस अचानक इंग्रजांच्या हातावर तुरी देऊन अत्यंत शिताफीने सटकून, पुढे कष्टाचा प्रवास करून काबूलमार्गे जर्मनीला जाणं, प्रत्यक्ष हिटलरची भेट घेऊन भारतीय स्वतंत्रसंग्रामाला मदत करण्याबाबत चर्चा करणं, त्याच्यावर इतकी छाप पाडणं की जर्मनीने त्यांच्यासाठी पाणबुडी देणं, त्या छोट्याश्या पाणबुडीतून हजाव मैलांचा धोकादायक प्रवास करून जपानला जाणं, सिंगापूरमध्ये आझाद हिंद सरकार स्थापन करणं आणि आझाद हिंद सेना घेऊन प्रत्यक्ष ब्रिटीश साम्राज्याला धडकी भरवणं आणि एकाएकी त्यांच्या मृत्यूची वार्ता येणं. अक्षरशः थक्क करणारा आयुष्याचा आलेख. इतकं विलक्षण आयुष्य जगणारे लोक विरळाच. पण नेताजींची कथा इथेच संपत नाही. वारंवार ते जिवंत असल्याचे बोलले जाते, त्याबाबत सत्य शोधण्यासाठी सरकारी समित्या बसवल्या जातात. तैवान इथेच बोस विमान अपघातात गेले हेच सरकार सांगत राहिले. आपणही आपल्या अभ्यासाच्या पुस्तकात हेच शिकलो. पण तरीझी अधून मधून उठणाऱ्या बातम्यांमुळे सुभाषचंद्र बोस या नावाभोवती एक गूढ वलय आहे. आणि हेच गूढतेचं वलय अधिकच गहिरं होतं जेव्हा आपल्याला कळतं सरकार दफ्तरी सुभाषबाबूंविषयीच्या  काही फाईल्स गुप्त ठेवण्यात आल्या आहेत. आणि वारंवार मागण्या होऊनही सरकारने त्या फाईल्स खुल्या करायला नकार दिला आहे. या सगळ्या गूढ गोष्टींवर प्रकाश टाकणारं पुस्तक म्हणजे अनुज धर या पत्रकाराचं “What Happened to Netaji”.

सुरुवातीच्या काही पानातच हे पुस्तक आपली पकड घेतं. विषयच रंजक आहे. त्यात अनुज धर यांनी ‘मिशन नेताजी’ या आपल्या मंचामार्फत संपूर्ण विषयाचा अतिशय तपशीलवार अभ्यास केला आहे जो वारंवार या पुस्तकात जाणवतो. नेताजींच्या मृत्यूविषयी आलेल्या बातमीपासून कोणी कोणी काय प्रतिक्रिया दिली, सरकार दफ्तरी काय नोंदी आहेत, बोस कुटुंबीय काय म्हणत होते असा सगळा माहितीचा खजिना अनुज धर आपल्यापुढे उघडून ठेवतो. मग नेताजींविषयी सत्य शोधण्यासाठी स्थापन झालेल्या समितीने कसे काम केले, कुठे कुठे जाणून बुजून चुका ठेवण्यात आल्या, सरकार पातळीवर कशी अनास्था होती याविषयी लेखक पुराव्यांनिशी विवेचन करतो. स्वतः गेली कित्येक वर्ष अनुज धर हे मिशन नेताजी अंतर्गत सगळ्या संशोधनाच्या कामात गुंतल्यामुळे या सगळ्या कथनाला चांगली खोली येत जाते. हळूहळू काळ पुढे सरकतो तसे आपण गुमनामी बाबा उर्फ भगवानजी या व्यक्ती पर्यंत येऊन पोहोचतो. अनुज धर याने बरंच संशोधन करून असा निष्कर्ष काढला आहे की ही गुमनामी बाबा नामक व्यक्तीच सुभाषबाबू होती. आणि हे सगळंच वाचणं अत्यंत रंजक आहे. अर्थात अनुज धर याने काढलेला निष्कर्ष हाच अंतिम मानावा असा त्याचा आग्रह नाही. त्याचा मुख्य रोख आहे तो सरकारकडे असणाऱ्या गुप्त फाईल्स खुल्या करण्यावर. त्या खुल्या झाल्या तर आपोआपच सुभाषबाबूंविषयी माहिती प्रकाशात येईल आणि त्यांच्या आयुष्याविषयीचे रहस्य उकलण्यात मदत होईल अशी लेखक मांडणी करतो.

अर्थात सुरुवातीपासूनच हे जाणवतं की अनुज धर याचा कॉंग्रेस पक्षावर आणि त्यातही विशेषकरून पंडित नेहरूंवर विलक्षण राग आहे. वारंवार नेहरूंनी सत्य लपवण्याचा प्रयत्न केला हे तो ठसवतोय हे जाणवतं. अर्थातच आधीचे सुभाषबाबूंचे अगदी जवळचे मित्र असणारे नेहरू, पहिले पंतप्रधान आणि सुभाषबाबूंचे १९३९ नंतरचे राजकीय विरोधक या नात्याने कित्येक सुभाषप्रेमींच्या रोषाचे मानकरी ठरतात यात नवल नाही. त्यात पुढेही बहुसंख्य वर्ष कॉंग्रेसच सत्तेत असल्याने गांधी-नेहरू घराण्याचे हित जपण्यासाठी सुभाषबाबूंना डावलण्यात आल्याची भावना अनुज धरच्या लेखनातून प्रतीत होते. त्यात काही अंशी तथ्य आढळलं तरी त्याचे म्हणणे बरेचसे पूर्वग्रह दुषित आहे हेही जाणवत राहतं. त्यामुळे निःपक्षपातीपणे मुद्देसूद मांडणी करण्याच्या बाबतीत हे पुस्तक कमी पडतं. अधून मधून तर चक्क प्रचारकी थाटाची मांडणी होते. सुदैवाने अथवा दुर्दैवाने पंडित नेहरू आणि इंदिरा यांच्यानंतर मध्ये मोरारजी यांचं सरकार आलं. गुमनामी बाबा यांच्या सांगण्यानुसार मोरारजींना गुमनामी बाबा हेच सुभाषबाबू असल्याचं माहित होतं. असं असेल तर त्याचवेळी, किंवा गुमनामी बाबा गेल्यावर तरी मोरारजींनी हे सत्य जगाला का नाही सांगितलं? असं मानलं की ते मूळचे कॉंग्रेसचे आणि नेहरूंच्या नेतृत्वाखाली काम केलेले नेते होते म्हणून त्यांनी हे टाळलं, तरी त्यांच्याच मंत्रिमंडळात परराष्ट्रमंत्री म्हणून कार्यरत असणारे अटल बिहारी वाजपेयी हे देखील गप्प कसे बसले? अनुज धर यांच्या लेखनातून सातत्याने दिसतं की सुभाषबाबू यांच्याशी संबंधित रहस्य हे परराष्ट्रव्यवहाराशी निगडीत आहे. अशावेळी वाजपेयींना सुभाषबाबू यांच्याविषयी माहिती असणारच. त्यात अनुज धर हेही सांगतात की संघाच्या गोळवलकर गुरुजींनी गुमनामी बाबांशी संपर्क ठेवला होता. वाजपेयी आणि गोळवलकर यांना जर सुभाषबाबूंविषयी सत्य माहित होतं तर त्यांनी ते उघड का केलं नाही. इथपर्यंत अनुज धर भाजप-संघालाही आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करतो. पण मग एकदम “कदाचित त्यांनी ‘व्यापक राष्ट्रहित लक्षात घेतलं असेल’ ‘काहीतरी खरंच महत्त्वाचं कारण असेल’” अशी समजुतीची भूमिकाही घेतो. अर्थात ही समजुतीची भूमिका आपल्या पूर्वग्रहांमुळे नेहरूंबाबत घेणं साफ नाकारतो. अर्थात वाजपेयी पंतप्रधान झाल्यावरही सुभाषबाबूंविषयी सत्य शोधनाला सरकार कॉंग्रेस सरकार प्रमाणेच उत्तरं देत होतं हे सांगून अनुज धर संताप व्यक्त करतो. बोस कुटुंबियांपैकी बहुतांश जण हे सरकारी भूमिकेच्या विरोधात असले तरी जे सरकारच्या बाजूने आहेत त्यांचे कॉंग्रेसशी लागे-बांधे आहेत हेही अनुज धर सूचित करतो. असं असलं तरी अनुज धर “नेहरूंनी सुभाषबाबूंचा सैबेरियात खून घडवून आणला” या सुब्रमण्यम स्वामींच्या आरोपाला फेटाळून लावतो. सुब्रमण्यम स्वामी यांचे आरोप बिनबुडाचे असून, ते सत्यापासून अधिकच दूर घेऊन जाणारे आहेत हेही अनुज धर ठासून सांगतो. 

अजूनही, २०१६ मध्ये, माहिती अधिकार कायदा येऊनही ६ वर्ष झाली तरीही, सुभाषबाबूंविषयीच्या सगळ्या फाईल्स काही उघड होत नाहीत हे खरंच दुर्दैव आहे. याबाबत वारंवार मागणी करणारा भाजप आज अभूतपूर्व बहुमताने सत्तेत विराजमान आहे. पण तरीही फाईल्स काही उघड झालेल्या नाहीत. मोदींना फाईल्स उघड करण्यात येणारी एक महत्त्वपूर्ण गोष्ट अनुज धर अधोरेखित करतो, ती म्हणजे, जर नेहरू दोषी आहेत असं त्या फाईल्स उघड केल्याने निष्कर्ष निघाला तर केवळ नेहरूच नव्हे तर सरदार पटेल हेही तितकेच दोषी आहेत असं उघड होईल अशी शक्यता आहे. एकतर पटेल आणि सुभाषबाबू यांचं कधीच पटलं नाही. सुभाषबाबूंना कॉंग्रेस यंत्रणेत निष्प्रभ करण्यात आपलं सगळं राजकीय कौशल्य पणाला लावलं ते पटेलांनीच. सरदार पटेलांचे ज्येष्ठ बंधू विठ्ठलभाई हे सुभाषबाबूंच्या जवळचे होते. त्यांच्या मृत्यूपत्रात असणाऱ्या सुभाषबाबूंच्या उल्लेखामुळे त्यातून प्रकरण कोर्टात जाण्यापर्यंत गोष्टी गेल्याने तर सरदार आणि नेताजी यांच्यात व्यक्तिगत कटुता आली होती. शिवाय १९४५ला सुभाषबाबूंच्या मृत्यूची बातमी आल्यानंतर पटेल हेच सत्तेत होते. प्रत्यक्ष स्वातंत्र्य मिळण्याआधीही पटेल संयुक्त सरकारात मंत्री होते. नुकतेच पश्चिम बंगाल सरकारने उघड केलेल्या काही कागदपत्रांवरून हे स्पष्ट झालं की १९४५ पासून ते पुढची जवळपास सतरा अठरा वर्ष भारतीय गुप्तचर विभाग बोस कुटुंबीयांवर लक्ष ठेवून होता. खुद्द पटेल यांच्याच गृहमंत्री या नात्याने अधिपत्याखाली हे सगळं चालू होतं. त्यामुळे अर्थातच केवळ नेहरूंवर दोषारोप करून चालणार नाही तर पटेलही तितकेच जबाबदार असतील, ही शक्यता लक्षात घेऊन मोदी कागदपत्र उघड करण्याच्या बाबतीत उत्साह दाखवत नसावेत असं लेखक सुचवतो. आणि दुसरं कारण म्हणजे गांधीजी. गांधीजींनाही सुभाषबाबूंबद्दल माहिती होती असे सुचवणारी कागदपत्र गुप्त फाईल्स मध्ये असतील तर चिखलाचे शिंतोडे गांधीजींवर देखील उडतील. आणि सध्या पटेल आणि गांधीजी या दोघांच्याही सध्याच्या प्रतिमेची नरेंद्र मोदी यांना आवश्यकता आहे अशी मांडणी अनुज धर करतो. पुस्तकाचा बहुतांश भाग हा नेहरू-कॉंग्रेस यांच्यावर टीका करण्यत घालवल्यावर शेवटच्या भागात भाजपही कॉंग्रेसच्याच वाटेवर जात आहे अशी टिपणीही अनुज धर करतो.

शेवटी स्वच्छ दृष्टीने आणि निःपक्षपातीपणे पुस्तक वाचल्यास, आपण या निष्कर्षाला येऊन पोहोचतो की जोवर सरकारकडे असलेल्या या विषयातल्या सर्वच्या सर्व गुप्त फाईल्स सार्वजनिक होत नाहीत, त्यातली माहिती लोकांपर्यंत जात नाही तोवर नेहरू-पटेलच काय पण कोणावरच दोषारोप करण्यात अर्थ नाही. किंबहुना त्या फाईल्स लवकरात लवकर खुल्या झाल्यास स्वामींनी केले तसले बिनबुडाचे आरोप होणं तरी बंद होईल. आणि हो, दोष द्यायचाच तर तो सर्वांना द्यावा लागेल. त्या फाईल्स गुप्त ठेवून भारतीय इतिहासातल्या सर्वात उत्तुंग अशा नेत्यांपैकी एकाची माहिती भारतीय समाजापासून वर्षानुवर्षे लपवून ठेवण्याचा दोष नेहरूंपासून इंदिरा गांधी-वाजपेयी यांच्यासह नरेंद्र मोदींपर्यंत सर्वांच्याच माथी लागतो. सुभाषबाबूंविषयीचं रहस्य उकलण्याचा प्रयत्न करणारं हे पुस्तक नक्कीच वाचण्यासारखं आहे.

इतिहासाचं विकृतीकरण करण्याचा आपल्या समाजाला आजार आहे. त्यामुळे ऐतिहासिक दस्तऐवाजांपासून आपल्या समाजाला दूर ठेवणं म्हणजे त्या विकृतीकारणाला बळ देण्यासारखं आहे. त्यामुळे सर्व माहिती उघड करत सत्य काय आहे ते जनतेसमोर मांडायलाच हवं. आज मोदी सरकार १०० फाईल्स खुल्या करणार आहे. पण तेवढ्याच फाईल्स खुल्या करून संपूर्ण सत्याचा शोध लागेलच असं नाही. अर्धवट फाईल्स खुल्या केल्याने अर्धवट माहिती समोर येईल. आणि अर्धवट माहितीचे निष्कर्ष राजकीय फायद्यासाठी काढले जाणार नाहीतच असं म्हणणं भाबडेपणाचं ठरेल. त्यामुळे शंभर फाईल्स खुल्या केल्या तरी ते पुरेसं नाही. म्हणूनच हुरळून न जाता सुभाषबाबूंविषयीची सर्व माहिती आता तरी जनतेसमोर खुली व्हायलाच हवी ही मागणी लावून धरणाऱ्या अनुज धर याच्या ‘मिशन नेताजी’च्या पाठीशी आपण नागरिकांनी उभं राहिलं पाहिजे. बापूंचा सत्याचा आग्रह त्यांचा वारसा सांगणाऱ्या कॉंग्रेसने तरी जुमानला नाही. आता वारंवार गांधीजींचं नाव घेणारं मोदी सरकार तरी सुभाषबाबूंविषयीच्या सत्याचा आग्रह धरणार का हे बघायचे.

आज सुभाषबाबूंची जयंती. या भारतीय इतिहासातल्या लोकविलक्षण नायकाला आदरपूर्वक सलाम! 

Tuesday, July 28, 2015

मनातले कलाम

“जगण्याला जीवन म्हणावे अशी माणसे हजार वर्षातून एकदाच जन्माला येतात”
- पु.ल.देशपांडे

इतर अनेक विद्यार्थ्यांप्रमाणेच माझीही अब्दुल कलाम यांच्याशी पहिली ओळख झाली ती ‘अग्नीपंख’ मधून. मूळ इंग्लिश पुस्तकाचा हा मराठी अनुवाद. तेव्हा मी इंग्लिश पुस्तकांना घाबरायचो आणि त्यांच्यापासून दूरच असायचो. पहिल्यांदा अग्नीपंख वाचलं तेव्हा एवढं भावलं नव्हतं. तीच तीच नेहमीची कहाणी वाटली होती. गरिबाघरचं मूल, शिकण्याची धडपड आणि मग कष्ट केल्याने फार मोठा माणूस होणं. उगीचच नको इतका गाजावाजा केलेलं पुस्तक आहे हे असं वाटलं.
पुढे एकदा वेगवेगळ्या पुस्तकांविषयी आमच्या गप्पा रंगल्या असताना माझा एक मित्र म्हणाला अनुवाद कितीही चांगले असले तरी शेवटी मूळ लेखकाच्या शैलीतलं लेखन वाचलं पाहिजे. त्यानंतर मग मी निश्चय करून इंग्लिश वाचायला सुरुवात केली. याच प्रवासात कधीतरी “Wings of Fire” वाचायला घेतलं. पुस्तकाबाबत मनात पूर्वग्रह असूनही एकदा वाचायला सुरुवात केल्यावर हळूहळू मी त्यात गुंतत गेलो. एपीजे अब्दुल कलाम ही व्यक्ती स्वतः त्यांची कथा मला सांगत आहे असंच वाटू लागलं. अनुवाद वाचताना वाटलेला परकेपणा आताशा नाहीसाच झाला. कलाम एकदम आवडले, नव्हे प्रेमातच पडलो मी त्यांच्या! त्यानंतर प्रत्येक वेळी त्यांचं टीव्हीवर/यूट्यूबवर भाषण ऐकताना, त्यांच्याविषयी वाचताना मन उचंबळून यायचं. राष्ट्रपती या पदाला सर्वार्थाने गौरवलं त्यांनी. त्या पदाची ढासळलेली पत सावरली त्यांनी. आमचे राष्ट्रपती, देशाचे प्रथम नागरिक हे डॉ एपीजे अब्दुल कलाम आहेत हे म्हणताना अभिमान वाटायचा. त्यांची ती राष्ट्रपती असतानाही जपलेली हेअरस्टाईल, चेहऱ्यावरचं निखळ हसू आणि मूलभूत मानवी चांगुलपणावर असणारा त्यांचा गाढा विश्वास या गोष्टी मोहवून टाकत.

मला आठवतं पाकिस्तानच्या अणुकार्यक्रमाचे प्रमुख अब्दुल कादिर खान यांना अण्वस्त्र तंत्रज्ञान लिबिया आणि कोरियाला बेकायदा दिल्याचा आरोप होऊन जेलमध्ये होते. त्याचवेळी भारताचे अणुकार्यक्रमाचे आधारस्तंभ असणारे कलाम आपल्या देशाचं सर्वोच्च स्थान भूषवत होते. केवढा फरक हा २४ तासांच्या फरकाने स्वतंत्र झालेल्या दोन देशांतला!

कोणत्यातरी मासिकाने (नेमकं आठवत नाही पण बहुधा इंडिया टुडे) एक लेख छापला होता. त्यात त्यांनी असं म्हणलं होतं की भारत कसा खराखुरा सेक्युलर देश आहे. या देशाचे बहुसंख्य नागरिक हिंदू असतानाही राष्ट्रपती मुसलमान आहे, पंतप्रधान शीख आहे, सत्ताधारी पक्षाच्या प्रमुख ख्रिश्चन आहेत. लेखकाची नजर गढूळच होती असं वाटून गेलं मला. तोवर कलाम हे मुसलमान आहेत असा विचारही माझ्या मनात कधी आला नव्हता. काहीही कारण नसताना धर्माचा उल्लेख केल्याने काय मिळतं लोकांना असं वाटून गेलं. लहान मुलांशी कलाम बोलायला उभं राहिल्यावर त्यांची ओळख ‘हे आपले एक मुसलमान शास्त्रज्ञ आणि राष्ट्रपती’ अशी करून दिली तर लहान मुलांवर त्याचा किती वाईट परिणाम होईल. असो. पण कलाम सगळ्या सीमा भेदत संपूर्ण देशाचे झाले. राज्य, प्रांत, भाषा, धर्म, जात कसलाही अडसर आला नाही. त्यांच्या व्यक्तिमत्वाने भारावून गेला नाही असा कोणता सामान्य भारतीय नागरिक असेल? अशी फार कमी माणसं आहेत, जवळ जवळ नाहीतच, की ज्यांच्याबद्दल संपूर्ण भारत देशाला आदर वाटावा. आणि आदराबरोबर प्रेमही वाटावं. विद्यार्थ्यांशी बोलतानाच काल ते गेले. पहिल्यांदा ही बातमी मोबाईलवर आली तेव्हा विश्वासच बसला नाही. मग एकदम टचकन डोळ्यात पाणी आलं. एखादा माणूस आयुष्यात कधीही न भेटता इतका आपलासा कसा बनतो? त्यांच्या शब्दांमुळे प्रत्येकाला प्रेरणा मिळते. ही ताकद त्या शब्दांची नाही. शब्द काय डिक्शनरीमध्येही छापलेले असतात. पण शब्द उच्चारणारी व्यक्ती त्या शब्दांना वजन देते. आणि म्हणूनच जेव्हा कलाम म्हणतात स्वप्न बघा आणि त्यांचा पाठलाग करा तेव्हा स्वप्न बघणं आणि मेहनत घेत ती स्वप्न पुरी करण्याचा ध्यास घेणं हेच आपलं कर्तव्य आहे असं वाटू लागतं.


परिवर्तनतर्फे आम्ही सीओईपी च्या विद्यार्थ्यांना घेऊन बॉम्ब शोधक आणि नाशक पथकासाठी(BDDS) उपयोगी पडतील असे छोटे सोपे रोबो बनवण्याचा एक प्रोजेक्ट चालू केला होता. त्याचा पहिला प्रोटोटाईप तयार झाल्यावर तो कलामांच्या हस्ते BDDS ला देण्याचा सोहळा करायचा असं आम्ही ठरवलं होतं. त्यानिमित्ताने एकदा माझं कलामांच्या सेक्रेटरींशी सविस्तर बोलणंही झालं होतं. पण त्यावेळच्या BDDS प्रमुखांची बदली झाली, सीओईपीचे विद्यार्थीही शिक्षण संपवून बाहेर पडले असं होत होत पुढे तो प्रकल्प बारगळला. आणि कलामांना परिवर्तनच्या कार्यक्रमात बोलवायचं राहिलं ते राहिलंच. आज ते जास्त जाणवतंय. आम्ही एक स्वप्न बघितलं जे पूर्ण नाही करू शकलो. पण त्या निराशेतही पुन्हा कलामच मला सांगतायत जणू की ‘स्वप्न बघणं थांबवू नका. स्वप्न बघा आणि त्यांचा पाठलाग करा.’ माझ्या मनातले हे कलाम मला स्वस्थ बसू देत नाहीत. ते पुन्हा पुन्हा स्वप्न बघायला सांगतायत आणि पुन्हा पुन्हा त्या स्वप्नांचा पाठलाग करण्याची उर्जा आणि प्रेरणा देतायत. आणि मीही त्यांना पुन्हा पुन्हा आश्वस्त करतोय की ‘ज्या समृद्ध, संपन्न आणि समाधानी समाजाच्या निर्मितीचं स्वप्न मी बघितलंय त्याचा मी पाठलाग करतो आहे आणि करत राहीन.’  यावर या मनातल्या कलामांच्या चेहऱ्यावर एक प्रसन्न आणि निखळ हसू उमटतंय आणि मग ते त्यांची स्वप्नांची पोतडी सावरत त्यांच्या पुढच्या विद्यार्थ्याकडे चालत जातायत...स्वप्न वाटायला! 

Wednesday, May 28, 2014

माझे सावरकर

इतिहासातल्या ज्या काही थोड्या लोकांमुळे मी कमालीचा प्रभावित झालो त्यातले एक म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर. याच यादीत महात्मा गांधींचेही नाव मी घेतो यामुळे अनेक जण चकित होतात. टोकाचे गांधीवादी मला येऊन म्हणतात, “तुला सावरकर नीट समजले आहेत का? आणि समजले असूनही तू जर सावरकरांना मानत असशील तर तुला सावरकरच काय पण गांधीदेखील नीट समजले नाहीत.” टोकाचे सावरकरप्रेमी मला येऊन म्हणतात, “तू सावरकरांनी गांधींबद्दल जे लिहिले आहे ते तू वाचूनही हे हे म्हणत असशील तर तुला सावरकर समजलेच नाहीत. आणि साहजिकच आहे, तुला गांधीही समजले नाहीत.”
मला या सगळ्या संभाषणाची गंमत वाटते. पूर्वीच्या सिनेमात खानदान की दुश्मनी वगैरे असायची तसे सावरकर-गांधीजी यांचे त्या काळात मतभेद होते या मुद्द्यावर आजही त्यांचे तथाकथित अनुयायी तावातावाने भांडताना बघून मला हसूच येतं. आपल्यातले बहुतेक सगळे जण कुठल्या तरी कंपू मध्ये शिरायला इतके अधीर का असतात? आणि अपवादाने कोणी स्वतः नसले याबाबत उत्साही, तरी बाकीचे त्यांना कुठल्या ना कुठल्या कंपूचे लेबल लावून मोकळे होतात. मग ती व्यक्तीपण आपण याच कंपू मधले असा विचार करू लागते. “हा मार्क्सला चांगलं म्हणला? म्हणजे हा मार्क्सवादी. समाजवादी तरी नक्कीच.”, “हा टाटांची स्तुती करतो? म्हणजे साला भांडवलवादी.”, “हा गांधींचे कौतुक करतो म्हणजे संघाचा असूच शकत नाही.”, “हा सावरकरांची स्तुती करतो? म्हणजे हा पक्का मुस्लीम विरोधक.”, “हा नेहरूंच्या धोरणांचे कौतुक करतो? म्हणजे हा संघ विरोधक असला पाहिजे.”, “हा सरदार पटेलांचे कौतुक करतो म्हणजे हा नेहरूंचा विरोधक असला पाहिजे.”, “हा छत्रपती संभाजी महाराजांची जयंती साजरी करतो? म्हणजे हा मराठा जातीचा असावा..”, “हा बाजीराव पेशव्याचे कौतुक करतोय म्हणजे हा नक्की बामन”; अशा असंख्य लेबलांचा महापूर आहे आपल्या समाजात. खिरापत वाटल्यासारखे ही लेबलं वाटली जातात. ती अंगावर मिरवण्यात कित्येकांना आनंदही वाटतो. कसला आनंद ते देव जाणे. (आता माझे हे शेवटचे वाक्य वाचून काहींनी “देव जाणे? म्हणजे हा आस्तिक” असे लेबल मला चिकटवले असल्यास नवल नाही!) गंमतीदार आहे सगळं.

असो. तर मुख्य मुद्दा असा की ज्यांच्यामुळे मी विलक्षण प्रभावित झालो, नेहमी होतो, अशा
महान व्यक्तींच्या यादीत मी सावरकरांचे नाव अग्रक्रमाने घेतो. सावरकरांची आज जयंती. जिकडे तिकडे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे कौतुक चालू असेल, पुतळ्यांना हार घातले जातील, व्याख्याने दिली जातील तसबिरींना हार घातले जातील, कुठे सोयीस्करपणे अंदमानला काळ्यापाण्याची शिक्षा भोगायला जाण्याआधीच्या त्यांच्या कर्तृत्वावर तेवढा प्रकाश टाकला जाईल, तर कुठे सोयीस्करपणे ‘हिंदू हे स्वयमेव राष्ट्र आहेत’ या त्यांच्या सिद्धांताला धरून चर्चा रंगेल. या सगळ्या गदारोळात माझे सावरकर नेमके कोणते? मला भावलेले सावरकर कोणते? हा विचार मी करू लागलो आणि असंख्य गोष्टी डोळ्यासमोर येऊ लागल्या.
चाफेकर बंधू फाशी गेले ती बातमी ऐकून अस्वस्थ झालेल्या विनायकने “स्वातंत्र्यलक्ष्मी की जय” म्हणत स्वातंत्र्यासाठी ‘मारता मारता मरेतो झुंजेन’ ही शपथ घेतली. हा प्रसंग कल्पनेतही डोळ्यासमोर उभा केला तर आजही अंगावर रोमांच उभे राहतात. चौदा-पंधरा वर्षाचा पोरगा, नाशिकजवळच्या भगूर गावात गल्लीबोळात हूडपणे फिरणारा, डोक्याने विलक्षण तल्लख असणारा विनायक दामोदर सावरकर हा पोरगा. ‘स्वातंत्र्यलक्ष्मी की जय’ हे विलक्षण शब्द त्याला कसे स्फुरले असतील? हे सावरकर माझे आहेत. वंगभंगाने संतापलेल्या देशवासियांना स्वदेशी आणि बहिष्काराचा मंत्र कॉंग्रेसने दिल्यानंतर, देशातली पहिली परदेशी कपड्यांची होळी पुण्यात मुठा नदीच्या काठावर पेटवणारे तेजस्वी सावरकर मला माझे वाटतात. अखंड वाचन करून इतिहास समजून घेणारे आणि हा इतिहास लोकांना कळावा यासाठी आपल्या अमोघ शैलीत पुस्तके लिहिणारे सावरकर, पुस्तक छपाईला जाण्यापूर्वीच पुस्तकावर सरकारने बंदी घालावी इतकी लेखणीची दहशत निर्माण करणारे सावरकर मला भावतात. वास्तविक, ‘मैझिनी’ भारतीयांना माहित झालाच नसता कदाचित कधीच. पण त्याचे चरित्र वाचल्यावर त्यांना ते मराठीत आणावे वाटले. महाराष्ट्रातल्या लोकांना मैझिनी आणि गैरीबाल्डी बद्दल वाचून शिवरायांची आठवण होईल असं त्यांना वाटलं. इटलीची नाळ थेट मराठी भूमीशी जोडण्याचा काय हा असामान्य प्रयत्न! इंग्लंड मध्ये राहून भारतीय स्वातंत्र्याचा प्रश्न हा आंतरराष्ट्रीय स्वरूपाचा आहे याकडे इतर देशांचे लक्ष वेधण्याचा त्यांनी केलेला प्रयत्न, इंग्रजांना सळो की पळो करून सोडण्यासाठी बॉम्ब विषयक पत्रके भारतात पाठवणे, मग पिस्तुले पाठवणे... अटक झाल्यावर बोटीवरून समुद्रात स्वतःला झोकून देणारे आणि पुन्हा अटक फ्रेंच भूमीवर केल्यामुळे अभय मिळावे अशी मागणी करणारे वीर सावरकर. अंदमानात कोलूचे यातनाकांड स्वीकारणारे, कितीही कष्ट झाले तरी स्वातंत्र्यासाठी आत्महत्येच्या विचारांपासून स्वतःला दूर नेणारे स्वातंत्र्यवीर. आपल्या प्रगल्भतेच्या जोरावर स्फुरणाऱ्या कवितांच्या आधारे आणि मातृभूमीच्या उद्धाराचे एकमेव स्वप्न बघत अंदमानातील भीषण कारावास सहन करणारे स्वातंत्र्यवीर सावरकर.
सहभोजनाच्या माध्यमातून अस्पृश्यता दूर करण्याचा प्रयत्न करणारे आणि समाजसुधारणेच्या दृष्टीने एक प्रतिक म्हणून ‘पतितपावन’ मंदिराची उभारणी करणारे सुधारक सावरकर. नैतिकतेचा मुख्य पाया धर्मग्रंथ नसून बुद्धी हा आहे आणि नैतिकता ही मनुष्याने मनुष्यासाठी निर्माण केलेली गोष्ट असल्याने ती परिवर्तनीय आहे असे मानणारे सावरकर मला बेहद्द आवडतात. “परराज्य उलथून पाडण्यासाठी गुप्त कट, सशस्त्र बंडाळी ही सर्व साधने अपरिहार्यच असतात, पण या सर्व वृत्ती स्वराज्य स्थापन होताच तत्काळ टाकून देण्याचा सल्ला देणारे सावरकर. ‘स्वतंत्र देशात सरकारच्या चुका या आपण जनतेनेच निवडून दिलेल्या सरकारने केल्या असल्याने जबाबदारी आपल्यावरही येते आणि आपण एकदम डोक्यात राख घालता कामा नये’ असा अस्सल लोकशाहीवादी सल्ला देणारे स्वातंत्र्यवीर. ‘जोपर्यंत आपली मते कोणी बळाच्या जोरावर सक्तीने दुसऱ्यावर लादीत नाही, तोपर्यंत प्रत्येक नागरिकाचा विचार व भाषण स्वातंत्र्याचा अनिर्बंध हक्क इतरांनी मान्य केला पाहिजे’ असे १९३८ सालातच ‘मराठा’ मध्ये लेख लिहून संभाषण स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारे स्वातंत्र्यवीर मला मनापासून प्रभावित करतात. राष्ट्राभिमानाविषयी बोलत असतानाच, ‘स्वदेशाच्या राक्षसी हावेला बळी पडून अन्य देशाच्या न्याय्य अस्तित्वावर व अधिकारावर अतिक्रमण करतो राष्ट्राभिमान अधर्म्य आणि दंडनीय आहे’ असे ठणकावून स्पष्ट करणारे सावरकर मला कोणत्याही साम्राज्यवादविरोधी व्यक्तीपेक्षा तसूभरही कमी भासत नाहीत. भाषा हा कोणत्याही संस्कृतीमधला अत्यंत महत्वाचा असा भाग. आणि म्हणून मराठी भाषा शुद्धीसाठी त्यांनी केलेले अपूर्व प्रयत्न. एकेका इंग्रजी शब्दाला काय सुंदर मराठी पर्यायी शब्द दिले त्यांनी. दूरदर्शन, दूरध्वनी, महानगरपालिका, मुख्याध्यापक, औषधालय, युद्धनौका, पाणबुडी... असे कितीतरी! आता बजेट ला पर्यायी म्हणून दिलेला 'अर्थसंकल्प' हा शब्द पहा.. अहाहा ! या शब्दात आर्थिक नियोजन नाही नुसते...तर त्याचा 'संकल्प' पण आहे! मराठी भाषेला अशा कित्येक शब्दांची देणगी सावरकरांनी दिली. बंदीतून मुक्तता झाल्यानंतर पाचव्या दिवशी तिरंग्याचे ध्वजारोहण सावरकरांच्या हस्ते केले गेले, त्यावेळी बोलताना, “हा राष्ट्रीय ध्वज आहे; तो हिंदूध्वजापेक्षा मोठा आहे आणि त्या ध्वजाखाली उभा राहून जातीय वा धार्मिक भावना ठेवील तो पापी होय” असे म्हणणारे स्वातंत्र्यवीर मला बुद्धिवादी सेक्युलर वाटतात. लोकशाही आणि धर्मनिरपेक्षता याविषयी बोलताना अजमेर इथल्या भाषणात सावरकर म्हणतात, “आमचे पार्लमेंट अशा स्वरूपाचे तयार होईल की त्या पार्लमेंटच्या आत पाय ठेवताच हिंदू, मुसलमान, पारशी या भेदाचा मागमूसही राहणार नाही.” भारतीय संविधान तयार झाल्यावर “भारतीय राष्ट्राचे खरेखुरे राष्ट्रीय स्वरूप सिद्ध करून दाखवल्याबद्दल मी तुमचे अभिनंदन करतो” अशी तार घटना समितीच्या अध्यक्षांना तार करणारे सावरकर. ‘गायीला देवता मानणे’ हा गाढवपणा आहे अशा भाषेत धर्मश्रद्धेची चिकित्सा करणारे बुद्धीप्रामाण्यवादी सावरकर पुढे जाऊन म्हणतात, “हा प्रश्न एका फुटकळ धर्मसमजुतीचा नाही. अशा धार्मिक छापाच्या ज्या शेकडो खुळ्या समजुती आपल्या लोकांची बुद्धीहत्या करीत आहेत, त्या भाकड वृत्तीचा आहे.”

तुम्हाला भावणारे, आवडणारे, भिडणारे सावरकर कदाचित वेगळे असतील. पण या आणि अशा असंख्य उदाहरणांमधून प्रतीत होणारे प्रखर बुद्धिवादी, ध्येयवादी, राष्ट्रप्रेमी स्वातंत्र्यवीर मला माझे वाटतात. आजच्या सावरकर जयंतीच्या दिवशी, माझ्या सावरकरांनी लिखाण आणि वागणुकीतून जो लोकशाहीचा, बुद्धिवादाचा, स्वतंत्र पद्धतीने प्रत्येकाने विचार करण्याचा आणि विज्ञाननिष्ठेचा जो संदेश दिला आहे तो आपल्या समाजाच्या मनात ठसावा एवढीच सदिच्छा !

Tuesday, July 23, 2013

र.धों.

सुमारे ९० वर्षांपूर्वी एका अत्यंत विद्वान, हुशार अशा गणिताच्या प्राध्यापकाने निर्भीडपणे अशी काही मते मांडायला सुरुवात केली की ज्यामुळे पुण्या मुंबईतल्या स्वघोषित धर्म अन् संस्कृतीरक्षक मंडळींच्या तळपायाची आग मस्तकात गेली. पण या माणसाने त्या लोकांची टीका सहन केली, आकसाने कोर्टात खटले झाले तेही पचवले, दारिद्र्यात दिवस काढले पण लोकांना योग्य ती शिकवण देण्याचे काम अविरत चालू ठेवले. या महान माणसाच्या हयातीत त्याचे कधीच कौतुक झाले नाही. पण त्याची वैचारिक झेप बघितली तर आजही थक्क व्हायला होतं. आज ज्याबद्दल आपण बोलत असतो त्याविषयी या माणसाने ९० वर्षांपूर्वी, तेव्हाच्या कर्मठ लोकांना न जुमानता, विचार मांडले. या माणसाचे नाव र.धों म्हणजेच- रघुनाथ धोंडो कर्वे. 

रधोंचे वडील म्हणजे एका विधवेशी पुनर्विवाह करून कर्मठ लोकांच्या पुण्यात आपल्या कार्याची मुहूर्तमेढ रोवणारे महर्षी धोंडो केशव उर्फ अण्णासाहेब कर्वे. महर्षी कर्व्यांनी त्यांच्या काळी विधवेशी विवाह करून समाजाला जो अभूतपूर्व धक्का दिला त्याहून कित्येक पटींनी धक्कादायक असे विचार रधोंनी मांडले असं म्हणायला हरकत नाही. विधवांना शिकवणं एकवेळ मंजूर झालं समाजात, पण विवाह संस्थेपासून लैंगिक स्वातंत्र्यापर्यंत रधोंनी मांडलेले विचार समाजाला मूळापासून गदागदा लावणारे होते यात शंकाच नाही.
रधोंचे अनेक विचार आजही पचवणं कठीण जाईल असे आहेत. बहुतांश सामाजिक प्रश्नांचे मूळ हे भरमसाठ वाढत जाणाऱ्या लोकसंख्येत आहे हे त्याचं मत आज बहुतेकांना पटलं आहे, मान्य झालं आहे. पण आजही ‘स्त्री स्वातंत्र्याच्या गप्पा कितीही केल्या तरी जोवर स्त्रीला लैंगिक स्वातंत्र्य मिळत नाही तोवर, स्त्री खऱ्या अर्थाने स्वतंत्र होणार नाही’ यासारखी त्यांची मते आपल्या आजच्या समाजालाही पचवणं अवघड आहेच. समाजात मोकळेपणाने लैंगिकतेविषयी चर्चा व्हावी, त्या बाबतीत आडपडदा नसावा आणि त्याहून महत्वाचं म्हणजे लैंगिक सुख घेणे म्हणजे काहीतरी चुकीचे, अपवित्र आणि पाप करतो आहे ही भावना मनातून काढून टाकून याबाबतीत प्रमाणिकपणा स्वीकारायला हवा ही रधोंची मते आजही समाजात प्रत्यक्षात उतरलेली नाहीत. तर्कशुद्ध, विज्ञाननिष्ठ विचार ही रधोंची खासियत. ‘समाजस्वास्थ्य’ हे मासिक काढून वर्षानुवर्षे लोकांना शिक्षण देत राहिले रधों. पण त्या वेळी जितका कर्मठ समाज आपला होता तितका तो आता कर्मठ राहिला नसला तरी देवभोळेपणा आजही आपल्या समाजात आहे. अंधश्रद्धा तर वाढतंच जात आहेत. कोणताही बाबा बुवा उठतो आणि बलात्कारांपासून वाचण्यासाठी मंत्र वगैरे म्हणण्याचे बिनडोक उपाय सांगतो, आणि हजारो लाखो लोक त्यांच्या नावाचा जप करतात हे बघितल्यावर रधोंनी शंभर वर्षांपूर्वी जे सांगितलं ते वाया गेलं की काय असं वाटतं.

रधों त्या वेळीही उपेक्षित होते, आजही उपेक्षितच राहिले आहेत. लैंगिकता, खुलेपणा, स्त्री-पुरुष समानता याविषयी बोलू लागल्यावर पाश्चात्य देश आपल्या कसे पुढे असतात असा एक विचार आपल्या डोक्यात सहज येऊन जाण्याची शक्यता असते. संततीनियमन करण्याची साधने विक्री करणारे आणि त्याबाबत शास्त्रशुद्ध माहिती देणारे क्लिनिक रधोंनी १९२१ साली सुरु केलं होतं त्याच वर्षी अशा पद्धतीचं क्लिनिक लंडन मध्येही प्रथमच सुरु झालं होतं हे बघितल्यास रधोंची वैचारिक झेप लक्षात यावी. १९२१! कर्मठ धार्मिकता, अस्पृश्यता, बालविवाह आणि दारिद्र्याने गांजलेला असा आपला समाज होता तेव्हा. अशावेळी संततीनियमन करण्याची कंडोम सारखी साधनं विक्रीचे क्लिनिक काढावे हे केवढे अचाट कार्य आहे! आज ९० वर्षांनंतरही आमच्या समाजात खुलेपणाने कंडोम हा शब्द देखील उच्चारण्याची चोरी आहे. ‘या अशा शब्दांमुळे आमच्या समाजातल्या पुरुषांच्या भावना चाळवल्या जातात आणि म्हणून बलात्कार होतात’ असली बिनबुडाची भंपक विधाने आमचे नेते, खाप पंचायती आणि बाबा-बुवा करतात ही मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे. रधोंची कर्मभूमी असलेल्या मुंबई शहराच्या महापालिकेतले सुमार बुद्धीचे सर्वपक्षीय नगरसेवक एकमताने अंतर्वस्त्रांच्या दुकानातील पुतळ्यांवर बंदी आणतात या बालिशपणाला काय म्हणावे? समाजाला मध्ययुगात, अंधारयुगात नेत आहोत काय आपण पुन्हा? पब मध्ये जाऊन मुलींना मारहाण करणाऱ्या तथाकथित धर्मरक्षक ‘सेना’ आजही उजळ माथ्याने फिरतात. किंबहुना अशा सेना अन् ब्रिगेडसची आणि त्यांच्या समर्थकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. ही फार गंभीरपणे विचार करण्याची गोष्ट आहे असं मला वाटतं.

हे बदलायला हवं. ‘समाजस्वास्थ्य’ जापायचं असेल तर मुख्यतः नैतिक-अनैतिकतेच्या दांभिक आणि भिकार कल्पनांना कवटाळून बसणं थांबलं पाहिजे. आपण कितीही स्त्री स्वातंत्र्य आणि स्त्री-पुरुष समानता याविषयी बोललो तरी रधोंच्या लैंगिकतेविषयीच्या परखड मतांना डावलून चालणार नाही. त्यांच्या विचारांवर, लेखनावर गांभीर्याने विचार व्हायला हवा. वाद-विवाद व्हायला हवेत. खुलेपणाने चर्चा व्हायला हवी...

*(रधोंबद्दल अधिक जाणून घ्यायचे असल्यास, रधोंचे संपूर्ण लेखन आता बाजारात उपलब्ध आहे. डॉ. अनंत देशमुख यांनी रधोंचे चरित्र लिहिले आहे तेही अवश्य वाचावे. त्याशिवाय अमोल पालेकर यांचा किशोर कदम यांची मुख्य भूमिका असलेला ‘ध्यासपर्व’ नावाचा एक अप्रतिम चित्रपटही बघण्यासारखा आहे.)