Thursday, September 27, 2012

‘सोय’वाद...!


गांधीवाद, मार्क्सवाद, माओवाद, हिंदुत्ववाद, समाजवाद, भांडवलवाद, यंव वाद अन् त्यंव वाद... अशा असंख्य वादांची, विचारसरणींची नावे आपण ऐकत असतो, वाचत असतो अभ्यासत असतो, अनेक जण ती आत्मसात सुद्धा करतात, काहीजण पुढे जाऊन त्याच्यात भर घालतात, प्रसार करतात. एकूणच अनेकदा आपले जीवन हे ठराविक विचारसरणीला बांधून आपण जगत असतो.
माझ्या कामाच्या निमित्ताने अनेक लोकांशी भेटायची संधी मिळत असते. अनेकांशी चर्चा होत असतात. आणि या सगळ्यातून राहून राहून जे जाणवतं ते हे की विशिष्ट विचारसरणीशी बांधिलकी असणारे फारच अल्प लोक आहेत. अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतके. बाकी लोक आपल्या सोयीनुसार, परिस्थितीनुसार हवी ती टोपी घालणारे- ‘सोय’वादी...

झोपडपट्टी नको हा मध्यमवर्गीय विचार तर आहे, पण मग त्या झोपडपट्टीतल्या लोकांनी जायचं कुठे असा समाजवादी विचारही आहे. एका बाजूला मॉल्स आणि झगमगाट हवा आहे, दुसऱ्या बाजूला बोलण्यात बाजारपेठेच्या वर्चस्वाला विरोधही आहे. एका बाजूला अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर भरभरून बोलणे आहे पण दुसऱ्याच बाजूला धर्म-व्यक्ती-श्रद्धा याबद्दल कोणी काही बोलल्यावर मारायला सरसावणारेही हेच लोक आहेत. एका बाजूला समोरच्याने आपली मते अपरिवर्तनीय ठेवावीत असा अट्टाहास आहे तर दुसऱ्या बाजूला स्वतःच्या भूमिका एकाच दिवसात चार वेळा बदलण्याची विलक्षण हातोटीही आहे. एका बाजूला स्वतःच्या गोष्टी, लफडी लपवण्यासाठी आटापिटा चाललाय, तर दुसऱ्या बाजूला जगातल्या प्रत्येक व्यक्तीच्या वैयक्तिक लफड्यांची माहिती मिळवण्यासाठी गुगल-फेसबुक आणि न्यूज चैनेल्स वर तासन तास घालवण्यात येतायत. एका बाजूला जातीभेद दूर ठेवायचा विचार आहे पण लग्न करताना मात्र पोटजातसुद्धा चालत नाही. बायको एकदम स्मार्ट करिअरिस्ट हवी पण तिने नवऱ्याच्या भोवती भोवती फिरावं, स्वयंपाक करावा अशा अपेक्षाही आहेत. पोराने वर्गात पाहिलं यावं अशी अपेक्षा आहे पण वक्तृत्व आणि टेबलटेनिस च्या स्पर्धा जिंकाव्यात अशी मनापासून मागणी आहे. सिस्टीम बिघडलीये आणि ती सुधारण्यासाठी आपल्यालाच हात पाय हलवायला लागणार आहेत हे कळूनही निष्क्रीय राहण्यात आनंद मिळवण्यात येतोय. फर्ड्या इंग्लिशमध्ये, एसी हॉलमध्ये उभं राहून पर्यावरण वाचवण्यावर भाषण द्यायचंय, पण त्याच कार्यक्रमात ‘मिनरल वॉटर’ची प्लास्टिक बाटली प्रत्येक वक्त्याच्या पुढ्यात ठेवलेली हवी आहे. एक जबाबदार व्यक्ती म्हणून सगळ्या बाबतीत आपल्याला विचारलं जावं, आपला सल्ला घ्यावा अशी मनापासून इच्छा आहे, पण जबाबदारी घेण्याची मात्र तयारी नाही. हक्क हवे आहेत, कर्तव्ये विसरायची आहेत. पोरांना टिळकांच्या आणि झाशीच्या राणीच्या बहादुरीच्या गोष्टी सांगायच्या आहेत पण त्यांनी काहीतरी वेगळे करायचा विचारही करायला बंदी आहे. सावरकरांचा हिंदुत्ववाद हवा आहे, पण गोमांस खाल्ल्याने काहीही होत नाही हे त्यांचं मत मात्र विचारात घेतलं जात नाही. हातात आय फोन-५ घ्यायचाय पण त्यावर ज्योतिषाचे अप्लिकेशन डाउनलोड करायचेय. वेडगळ अंधश्रद्धांमुळे बळी वगैरे देणाऱ्या खेडूत माणसाला तुच्छ लेखायचं पण कुठल्यातरी थोतांड बाबाचा अंगारा लावल्याशिवाय घराबाहेर पडायचं नाहीये. फिरंगी टीव्ही सिरीयल मधले कमरेखालचे विनोद प्रचंड आनंद घेत बघायचे मात्र आपल्या सिरीयल मधल्या सुनेने टिकली लावलेली नसेल तर चालत नाही. इतिहासातल्या सोयीच्या गोष्टी तेवढ्या घ्यायच्या, गैरसोयीचा मजकूर सांगायचाच नाही. एका बाजूला लोकशाहीला शिव्या घालायच्या आणि हुकुमशाहीच हवी वगैरे बडबड करायची पण या बडबडीचे स्वातंत्र्य लोकशाही मुळेच मिळाले आहे हे सत्य स्वीकारायचे नाही. सत्यमेव जयते म्हणायचं पण सातत्याने स्वतःच्याच खऱ्या इच्छांना-विचारांना दाबून टाकून ‘असे काही नव्हतेच’ असे छान खोटे हसू चेहऱ्यावर आणत सांगायचे.
बरं या सगळ्यामध्ये तडजोडीचा सुवर्णमध्य गाठायचा प्रयत्न आहे असेही नाही. एकदा या टोकाला जायचंय तर दुसऱ्या वेळी दुसऱ्याचं टोकाला- सारे सोयीनुसार! हाच तो ‘सोय’वाद (conveniencism)..!

कदाचित मीही एक सोयवादी...!!

Friday, September 14, 2012

गोष्टी सोप्या करण्याचा मार्ग!


हानपणापासूनच मला नकाशांचं प्रचंड आकर्षण होतं. तासन् तास मी नकाशांमध्ये रंगून जायचो. शाळेत टीचर्सरूम मध्ये जगाचा एक आणि भारताचा एक असे भले मोठे नकाशे होते. एकदा वर्गात तास चालू असताना मी टीचर्स रूम मध्ये तो नकाशा बघत बसल्यावर सरांचा ओरडाही खाल्ला होता. पाचवीत होतो मी तेव्हा.
घरी आईनी एकदा अटलास आणून दिला. प्रत्येक पानावर नकाशेच नकाशे! किती हरखून गेलो होतो मी. प्रत्येक खंडाचा नकाशा. भारताच्या प्रत्येक भागाचा एक सविस्तर नकाशा. महाराष्ट्राचे तर अनेक नकाशे. पाऊस, पिके, नद्या, खनिज सगळं सगळं दाखवणारे! मजा यायची जाम...
लहानपणी बहुतेक मुलांना नकाशांचं आकर्षण असतं. माझं ते अद्याप टिकून आहे. आणि ते कधी जाईल असंही वाटत नाही मला. नकाशे बघण्यात मी आजही रंगून जातो. सगळ्यात पहिल्यांदा ज्यावेळी ‘गुगल अर्थ’ मी बघितलं, त्यावेळी तर मी अक्षरशः वेडा झालो. त्या पृथ्वीवर मी आधी आशिया मग भारत मग पुणे शोधात शेवटी माझं घरही शोधलं तेव्हा काहीतरी प्रचंड मिळाल्याचा आनंद मला झाला होता!
माणसाला मोठ्या गोष्टी छोट्या स्वरुपात मॉडेल म्हणून दाखवण्याची आंतरिक इच्छा फार पूर्वीपासून असणार. म्हणूनच त्याने आपल्या गुहेत मी शिकार कशी करतो वगैरे गोष्टी कोरून ठेवल्या! आदिवासी शिल्पांमध्ये आणि चित्रांमध्ये गावं काढलेली असतात. ती गावं म्हणजे दुसरं तिसरं काही नसून नकाशेच तर आहेत! जुने पुराणे नकाशे बघितले (फिल्म्स, प्रदर्शनं अशा ठिकाणी..!) तर त्यात अशाच पद्धतीने गोष्टी दाखवलेल्या असत. प्रमाणबद्ध नसायचे ते नकाशे पण होते नकाशेच न! प्रत्यक्षातल्या गोष्टींचा अंदाज यावा म्हणून कागदावर रेखाटलेली द्विमितीय प्रतिकृती! त्यातही डोंगर दऱ्या विशिष्ट खाणाखुणा करून दाखवल्या जायच्या. अशा पद्धतीने हळूहळू नकाशे रेखाटावे कसे याचं शास्त्रच तयार होत गेलं. त्याला म्हणतात नकाशाविद्या, इंग्लिशमध्ये कार्टोग्राफी.
नकाशा हा प्रकार केवळ एखादी भौगोलिक जागा समजावून सांगण्यासाठीच वापरली जाते असे नाही. अनेक प्रेझेंटेशन्स वगैरे मध्ये अवघड गोष्टी समजावून सांगताना वापरला जाणारा “फ्लो चार्ट” हा एक प्रकारचा नकाशाच तर असतो. खरेदी विक्रीचे चढ उतार वगैरे दाखवणारा ग्राफ ही एक प्रकारचा नकाशाच असतो. आपली वंशावळ दाखवताना कोण कोणाचा मुलगा असं त्या आकृतीमध्ये किती सोपं जातं समजायला! एकूणच आपलं सगळं जीवनच नकाशामय झालंय!
मुळात माणसाला चित्र स्वरुपात असलेल्या गोष्टी आवडतात, भावतात, पटकन समजतात. गोष्टी सोप्या करून सांगण्यासाठी नकाशे वापरतात. आर्किटेक्ट किंवा बिल्डर आपल्या घराचा प्लान आपल्यासमोर ठेवतो तो नकाशाच तर असतो!
प्रवासाला निघालो आणि जिथे जाणार असतो तिथला नकाशा बघतो. गुगल मुळे हे आजकाल फारच सोपं झालंय!

नकाशांची ही महती आपल्या सरकारला फारशी कळली नसावी किंवा कळूनही लोकांना गोष्टी सहज कळण्यासाठी नकाशे वापरावेत ही संकल्पना सरकारी बाबूंना विशेष रुचली नसावी. आम्ही ‘परिवर्तन’चं काम ज्यावेळी सुरु केलं त्यावेळी पुण्यातल्या वॉर्डस् चे नकाशे हवे होते. पण सहजपणे ते कुठेच मिळेनात. शेवटी बराच आटापिटा करून ते मिळाले. यावेळच्या महापालिका निवडणुकीत नवीन प्रभागांचे नकाशे सहज मिळाले ही गोष्ट खरी आहे. पण अजूनही विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघ यांचे नकाशे सहजपणे उपलब्ध होत नाहीत हे वास्तव आहे. महापालिकेच्या संकेतस्थळावर खरे तर महापालिका ज्या सुविधा देते त्या शहरात कुठे कुठे आहेत कशा आहेत या सगळ्या गोष्टी दर्शवणारा एक किंवा अनेक नकाशे असले पाहिजेत. पण यातले काहीही महापालिकेच्या संकेतस्थळावर नाही. आजकाल कित्येकांच्या हातात मोबाईल आणि त्यात इंटरनेट असताना सरकारी यंत्रणांनीही अद्ययावत राहण्याची गरज आहे.
मध्ये शहरातल्या सार्वजनिक स्वच्छतागृहांचा प्रश्न काही वर्तमानपत्रांनी लावून धरल्यामुळे चर्चेत आला होता एकदम. सार्वजनिक स्वच्छतागृहे नेमकी कुठे आहेत कशी आहेत याबद्दल सुतराम कल्पना तुम्हाला बसल्या जागी येत नाही. अख्ख्या ऑस्ट्रेलिया मध्ये, एखादे शहर नव्हे, अख्ख्या देशात कुठे कुठे स्वच्छतागृहे आहेत याचा नकाशा इंटरनेटवर बघण्यास उपलब्ध आहे! म्हणजे तुम्ही प्रवासाला निघालात तर तुम्हाला मोबाईलवर सहज हवी ती माहिती योग्य वेळी उपलब्ध होईल!
इतकेच नव्हे तर पोलीस स्टेशन, अग्निशमन दल, जवळचे हॉस्पिटल, पेट्रोल पंप, मेकानिक अशा महत्वपूर्ण आणि अचानक गरज पडू शकेल अशा गोष्टी नकाशावर का असू शकत नाहीत? केवळ शहरातच नव्हे तर हायवेज वर हे उपयोगी पडू शकेल. अशा अनेक गोष्टी करता येण्यासारख्या आहेत. उदाहरणार्थ आता गणेशोत्सव आहे. कुठल्या कुठल्या रस्त्यावर मांडव उभे असतील हे नकाशावर दिसू शकेल? का नाही? उपलब्ध तंत्रज्ञान पाहता हे फार अवघड मुळीच नाही. गर्दीच्या वेळी कुठल्या रस्त्यावर किती ट्राफिक आहे हे नकाशावर दिसू शकते! संध्याकाळी कर्वे रस्ता गर्दीने पूर्ण भरल्यामुळे नकाशात तो लाल दिसू लागला! हेही होऊ शकते की! किंवा अगदी सोपे म्हणजे कोणतं अधिकारी कोणाला उत्तरदायी आहे याची एक सुटसुटीत आकृती किंवा Organogram असू शकतो! नागरिकांना आपले सरकार किती सहज कळेल या पद्धतीमुळे. माहितीच्या अभावामुळे जो शासकीय यंत्रणा आणि नागरिक यांच्यातला दुरावा आहे तो दूर करायला अशा सोप्या गोष्टींचा अगदीच उपयोग होऊ शकतो.
नकाशांमुळे (इथे नकाशा हा शब्द नकाशे, आलेख, आकृत्या, फ्लो चार्ट, Organogram इ. सगळ्याला मिळून वापरला आहे!) गोष्टी समजायला सोप्या जातात. समजलेल्या गोष्टी जवळच्या वाटतात... आणि म्हणूनच सरकारी बाबूंनी याचा विचार करायला हवा की लोकांना सरकार आपलं वाटावं असं वाटत असेल तर त्यांना हवी ती माहिती त्यांना समजेल अशा सुटसुटीत पद्धतीने उपलब्ध करून द्यायला हवी. ४००० पानांचा एखादा अहवाल देण्यापेक्षा चार आलेख जास्त लोकांना भावतात, समजतात!
गोष्टी सुटसुटीत आणि सोप्या करण्याचा नकाशे हा एक (एकमेव नव्हे! पण नक्कीच प्रभावी) मार्ग आहे! 

Tuesday, September 4, 2012

थेंबाची प्रेमकहाणी


एकदा एक थेंब वैतागला
सगळ्या सिस्टीमवर रागावला.
त्याने ठरवले, आता पृथ्वीकडे जायचे नाही
पाऊस म्हणून मुळीसुद्धा बरसायचे नाही.

हे ऐकून इतर सगळे थेंब अवाक् झाले.
आकाशातले देवसुद्धा चकित झाले.
त्या थेंबाशी नीट बोलायला हवं
नेमकं काय झालं विचारायला हवं.
सगळीकडे हीच चर्चा!

थेंब म्हणाला,
पृथ्वीवरच्या प्रेमापोटी, अनावर ओढीने,
मी तिच्याकडे झेपावायचे
पण तिला नाही किंमत माझी, मग
का बरं मी एवढे प्रेम करायचे?

तिने मला कवेत घ्यावे, कुरवाळावे
तिच्याजवळ तिचा म्हणून मला राहू द्यावे,
एवढी साधी इच्छा माझी.
माझ्या असण्याने ती सुखावते, फुलते
पण उपयोग संपल्यावर माझी रवानगी समुद्राच्या खऱ्या पाण्यात होते.
एवढीच का लायकी माझी?

तिच्या या वागण्याने किती जखमा होतात म्हणून सांगू?
समुद्रातले मीठ त्या जखमेवर चोळले जाते, दाद कुठे मागू?
वाफ बनून दुरावलो जरी तिच्यापासून,
तरी त्याचे तिला काही वाटत नाही.
दुःखाने वेडापिसा होतो मी,
माझ्या डोळ्यातले पाणी काही आटत नाही.

ढगात बसूनही तिच्यापासून दूर मी जाणार नाही,
अशी तिची पक्की खात्री आहे.
मला कितीही राग येवो, तिच्या मोहपाशातून सुटता मला
येणार नाही असे तिला वाटते आहे.

कित्येक कोटी वर्ष माझ्या भावनांशी ती अशी खेळते आहे.
मी मात्र बरसतो आहे,
हजार फुटांवरून झेपावतो आहे,
आणि ती मात्र दुष्टपणे मला झिडकारते आहे.

थेंबाच्या या बोलण्यावर बाकीचे थेंब सुन्न झाले.
सारे काही पटल्याने आकाशातले देवसुद्धा स्तब्ध झाले.
थेंबाचा शब्दन् शब्द खरा होता..
पृथ्वीला कोण काय समजावणार, उपयोगच नव्हता.

आपल्या भोवती घिरट्या घालणाऱ्या
देखण्या चंद्राचे तिला आकर्षण वाटत होते.
खडकाळ, कसलाही जीव नाही अशा अचेतन चंद्रावर
तिचे प्रेम जडले होते.

थेंब तरी काय म्हणणार...
बरसायचे त्याचे काम!
पडून शकले झाली तरी
बेधडकपणे बरसणार..! 

त्याने पृथ्वीचा नाद सोडला, आणि तो
चक्क मंगळीकडे निघाला.
‘आपण इथे याआधी आलो आहे’
थेंबाला मनापासून वाटू लागले.
थेंबाकडे बघून, हताश, उदास
बसलेल्या मंगळीच्या चेहऱ्यावर हसू उमटले.
जुनी ओळख पटली, मनातली किल्मिषे दूर सरली.

आणि मग?
मग काय!
अनावर ओढीने बेभान होत, थेंब मंगळीकडे झेपावला...
तिनेही मग हात फैलावत त्याला आपल्या कवेत घेतला.
अन् इकडे, पृथ्वीवर मोठा गहजब झाला!
मंगळावर पाणी सापडले, म्हणत ‘नासा’ने जल्लोष केला!!

 तन्मय कानिटकर
१ सप्टेंबर २०१२