Monday, September 24, 2018

तडजोडीच्या पुढे जाताना

“आमचा मुलगा एवढे जास्त कमावतो की मुलीला काहीही जॉब वगैरे करण्याची गरजच नाही.”, असं म्हणणारे पालक आजही भेटतात तेव्हा मला, खरंच सांगतो, काय बोलावं ते पटकन कळतच नाही. “आमच्या मुलीचा पगार अमुक अमुक आहे, पण त्यापेक्षा जास्त पगार असणाराच नवरा असावा कारण शेवटी घर चालवण्याची जबाबदारी त्याच्यावरच आहे.” अशी अपेक्षा ठेवणाऱ्या पालकांबद्दलही मला असंच आश्चर्य वाटतं. त्याही पुढे जाऊन मला आपल्या पालकांना दुजोरा देणाऱ्या मुला-मुलींचं जास्त आश्चर्य वाटतं. शिवाय अशा मंडळींची संख्याही कमी नाही, हे बघून काही प्रमाणात चिंताही वाटते. 

मला कायमच प्रश्न पडत आला आहे की स्त्री-पुरुष समता हे एक जीवनमूल्य म्हणून आपण खरंच स्वीकारलं आहे का? की ती केवळ एक तात्पुरती तडजोड आहे. परिस्थितीच्या रेट्यानुसार आलेली गोष्ट आहे? असं म्हणलं जातं की तत्वज्ञान, धर्म, समाजकार्य, जनजागृती, राजकारण या सगळ्यापेक्षाही अर्थकारण ही गोष्ट जास्त परिवर्तन घडवून आणते. आज आपल्याकडे मुली शिकत आहेत, नोकरी करत आहेत कारण ती आपली ‘अर्थकारणाची’ गरज बनते आहे. घरात कमावणाऱ्या दोन व्यक्ती असतील तर अधिक चांगलं राहणीमान ठेवता येतंय. गेली काही दशकं मुली धडाडीने पुढे येत कर्तबगारी दाखवत आहेत कारण अर्थकारणाच्या गरजेमुळे त्यांना आता ती संधी मिळाली आहे. इतकंच नव्हे, तर आपला देश हा भेदभाव करत नाही, इथल्या सर्व नागरिकांना समान संधी देतो असं चित्र उभं करणं हे देशात होणाऱ्या परदेशी गुंतवणुकीसाठीदेखील आवश्यक मानलं जातं. त्यामुळे रोजगारासह सगळ्याच बाबतीत लिंगभेद न करणं ही आपली समाजाच्या विचारधारेत झालेल्या बदलांपेक्षाही अर्थकारणाची जास्त गरज आहे. आणि त्यामुळे आपण सोयीस्करपणे, अर्थकारणापुरतं समाज मान्यतांशी, धार्मिक समजुतींशी, पारंपारिक संकल्पनांशी आणि स्वतःच्या मनाशीही काही प्रमाणात नुसतीच तडजोड केली आहे बहुतेक असं मला अनेकदा वाटतं. ‘तडजोड म्हणून असल्याने काय बिघडलं? त्या निमित्ताने निदान ही स्त्री-पुरुष समता अंमलात तरी येते आहे की..’ असा प्रश्न पडू शकतो. तडजोड असली म्हणजे आपण सतत यातून बाहेर पडायचा मार्ग आपल्याही नकळत शोधत राहतो. तडजोड म्हणजे जणू तात्पुरता उपाय. तात्पुरती मलमपट्टी. तडजोड ही भावना मुळातच नकारात्मक आहे. तडजोडीकडून आपल्याला स्वीकाराकडे (Acceptance) जायला हवं. स्वीकाराच्या पुढे येतं ते म्हणजे अनुकूल होणं (Adaptation). आणि अनुकूलनाकडून आपण जातो आत्मसात (Internalization) करण्याकडे. ‘लग्न म्हणजे तडजोड’ असं एक वाक्य नेहमी बोललं जातं. मला ते बिलकुल पटत नाही. सुरुवात तडजोडीने होतही असेल. पण तडजोडीकडून आत्मसात करण्याकडे जाण्याचा हा चार टप्प्यांचा प्रवास हा, केवळ लग्नच नव्हे, तर कोणत्याही सुदृढ नात्याचा पाया आहे. म्हणूनच एखादी गोष्ट आपण तडजोड म्हणून अंमलात आणली आहे की एक जीवनमूल्य म्हणून आपण हे स्वीकारून पुढे जात आत्मसात केलं आहे का हा प्रश्न विचारला गेला पाहिजे.


हे आठवण्याचं एक कारण म्हणजे लग्न ठरवण्याच्या प्रक्रियेत लग्नाला उभे मुलगे, मुली आणि त्यांचे पालक, यांच्याकडून ठेवल्या जाणाऱ्या अपेक्षा. अरेंज्ड मॅरेजच्या प्रक्रियेत जेव्हा एखाद्या विवाहसंस्थेत किंवा वेबसाईटवर नांव नोंदवलं जातं तेव्हा नोंदणी फॉर्ममध्ये असणाऱ्या अनेक प्रश्नांत ‘जोडीदार कमावता असावा का’ हा प्रश्न विचारलेला असतो. यामध्ये मुलींकडून भरल्या जाणाऱ्या फॉर्ममध्ये ‘असलाच पाहिजे’ हाच पर्यायच निवडलेला असतो. मुलांकडून मात्र ‘काहीही चालेल हा पर्याय निवडला जाण्याचं प्रमाण प्रचंड आहे. ‘आर्थिकदृष्ट्या घर चालवण्याची प्राथमिक जबाबदारी ही पुरुषाची आहे, आणि स्त्रीने देखील कमावलं तर अधिक बरे पडेल, हे खरं असलं तरीही ते काय बंधनकारक नाही’ ही विचारधारा अगदी पक्की झाली आहे. मध्यंतरी एक मुलगी मला सांगत होती, “लग्नानंतर काही वर्ष मला आवडतंय तोवर मी जॉब करीन. पण नंतर करीनच असं नाही. मला माझे पेंटिंग वगैरे छंद जोपासायला आवडेल. त्यामुळे मला नवराही असा हवाय जो आत्ताची माझी लाईफस्टाईल तरी निदान टिकवू शकेल एवढे कमावत असेल.” या मुलीचं लग्न जमायला काहीच अडचण नाही आली. पण विचार करा असं एखाद्या मुलाने आपल्या प्रोफाईलमध्ये लिहिलं असतं तर? मागे एकदा मला एक मुलगा माहित होता. त्याने आपली खूप पगार असणारी मोठ्या कंपनीतली नोकरी सोडून एका सामाजिक संस्थेत तुटपुंज्या पगारावर काम करायला सुरुवात केली होती. ‘घर चालवण्याची प्राथमिक जबाबदारी घेईल अशा मुलीशी मला लग्न करायचं आहे असं तो म्हणाला होता. अरेंज्ड मॅरेजच्या ठरलेल्या पठडीतल्या प्रक्रियेत त्याचं लग्न जमणार तरी कसं? बरं, हा सगळा पुरुषानेच घर चालवण्याचा आग्रह केवळ मुलींकडून येतो असं नव्हे तर ते आपलंच मुख्य काम आहे अशी बहुसंख्य पुरुषांचीही समजूत आहे. एकुणात मध्ययुगीन मानसिकतेला बढावा देण्याचं काम दोघं मिळून करतात अगदी! 

या सगळ्याचा अर्थ, आता उलट परिस्थिती आणावी असा नव्हे. आता स्त्रियांनी प्राथमिक जबाबदारी घ्यावी आणि पुरुषांनी मुख्यतः आपले छंद जोपासावेत, घर-मुलं याकडे बघावं असंही मी सुचवत नाहीये. लग्नाच्या नात्यामध्ये, अरेंज्ड मॅरेज असेल नाहीतर लव्ह मॅरेज, आर्थिकदृष्ट्या घर चालवणं असो किंवा घरकाम-मुलं या दृष्टीने घर चालवणं असो, ती दोघांचीही प्राथमिक जबाबदारी असली पाहिजे. म्हणून आपण इथे समता हा शब्द ‘समन्यायी या अर्थी वापरत आहोत. समन्यायी व्हायचं, याचा अर्थ असा की, ‘स्त्री आहेस म्हणून तुझं काम हे आणि ‘पुरुष आहेस म्हणून तुझं काम ते ही विचारधाराच मूळातून काढून टाकावी लागेल. हे होणार नाही तोवर आपल्या समाजाची मानसिकता विषम न्यायाचीच राहिल. का कुणास ठाऊक, अनेक बाबतीत अतिशय मुक्त आणि उदार विचारांची वाटणारी मंडळी अरेंज्ड मॅरेजच्या बाबतीत एकदम मध्ययुगीन बुरसटलेल्या मानसिकतेची बनून जातात असा माझा अनुभव आहे. आपल्या समाजात मुक्त विचार आणि उदारमतवाद हा तडजोडीकडून स्वीकार आणि अनुकूलन यासह आत्मसात करण्याकडे जायला हवा. त्याचं प्रतिबिंब जोडीदार निवडीच्या प्रक्रियेतही दिसायला हवं. जमेल आपल्याला हे?

(दि. २२ सप्टेंबर २०१८ रोजी प्रकाशित झालेल्या महाराष्ट्र टाईम्सच्या मैफल पुरवणीत प्रसिद्ध)

Saturday, September 15, 2018

‘स्व’च्या ओळखीसाठी नव्या वाटा


ज्या व्यक्तीसाठी जोडीदार शोधायचा आहे, ती व्यक्ती मुळात कशी आहे, ही एक गोष्ट जोडीदार निवडताना अत्यंत महत्त्वाची मानली गेली आहे. जेव्हापासून आपण समाजात हा जोड्या लावण्याचा उद्योग आरंभला आहे (म्हणजे अक्षरशः हजारो वर्ष!) तेव्हापासूनच हा प्रश्न महत्त्वाचा आहे. एखादी व्यक्ती नेमकी कशी आहे, हे ठरवायचं कोणी आणि कशाच्या आधारावर, हे दोन मुद्दे स्थळ-काळानुसार नक्कीच बदलत गेले. पण मूळ प्रश्न कायम आहेच. धर्म, जात, खानदान, समाजातला सन्मान, कर्तृत्व, संपत्ती, सौंदर्य अशा वेगवेगळ्या निकषांच्या आधारे एखाद्याची ओळख ठरवून जोडीदार निवडीची प्रक्रिया जगभर आहे. पण हे किंवा असे निकष पुरेसे आहेत का? तुमच्यासाठी जोडीदार निवडण्यासाठी तुम्हाला अगदी नेमकेपणाने कोण ओळखतं?

आधीच्या पिढीपर्यंत पालकवर्गाची या क्षेत्रात पूर्ण सत्ता होती जणू. पण यात बदल झाला. विसाव्या शतकात बदलणाऱ्या अर्थकारण-समाजकारणाने व्यक्ती कुटुंबापासून काहीशी स्वायत्त होत गेली. मी स्वतःला कोणाहीपेक्षा जास्त ओळखतो/ते, आणि म्हणून माझ्या जोडीदाराबद्दलचा अंतिम निर्णय घ्यायला मीच सर्वाधिक लायक आहे’, असा सूर उमटू लागला. अर्थात आजही आमच्याकडे येणारे काही पालक दावा करतात की, ‘आम्हाला आमच्या मुला/मुलीच्या आवडी-निवडी, अपेक्षा असं सगळं नीट माहिती आहे आणि म्हणून त्यांच्यासाठी जोडीदार निवडण्याची प्राथमिक जबाबदारी आम्ही घेण्यात काही गैर नाही. क्वचित प्रसंगी मुलं-मुलीही या म्हणण्याला दुजोरा देतात. पण जोडीदार निवडीच्या प्रवासात काही काळ घालवला आहे अशा कोणत्याही पालक-मुलामुलींशी बोलल्यावर जाणवतं की, हे वाटतं तितकं सोपं नसतं! “आम्ही सुचवतो त्यातलं एकही स्थळ आमच्या मुलाला/मुलीला आवडत नाही” असं म्हणणारे पालक, आणि “आई-बाबांना नेमकं कळतच नाहीये, मला जोडीदार म्हणून कशी व्यक्ती हवीये.”, असं म्हणणारी मुलंमुली, आम्हाला अगदी रोज भेटत असतात. स्वतःच्या नेमक्या ओळखीचा हा गंमतीशीर घोळ झाला की लग्नाची इच्छा असतानाही लग्न लांबणीवर पडू लागतं.

आनंदी सहजीवनासाठी जोडीदार निवडीच्या अपेक्षा ठरवण्याआधी स्वची नीट ओळख करून घ्या हा झाला सिद्धांत- थिअरी. पण हा सिद्धांत प्रत्यक्षात उतरवायचा कसा? गेल्या शतकात यावर एक उत्तर शोधलं गेलं ते मानसशास्त्रातून. मानसशास्त्रीय चाचण्या वापरून व्यक्तिमत्व कसं आहे, स्वभाव कसा आहे, नात्याच्या दृष्टीने स्वभावातल्या धोक्याच्या जागा कोणत्या, चांगल्या गोष्टी कोणत्या अशा प्रश्नांना अगदी सविस्तरपणे उत्तर देणारी यंत्रणा मानसशास्त्राने दिली. अजूनही त्यात सातत्याने प्रगती होत आहे. आज या चाचण्या आणि त्याबरोबर केलं जाणारं समुपदेशन हे या स्व च्या ओळखीसाठी उपयोगी पडतं आहे. त्या आधारे जोडीदार निवडीच्या बाबतीत निर्णय घेणाऱ्यांचं प्रमाणही वाढतंय. कोणत्याही व्यक्तीला ओळखणं यात दोन महत्त्वाच्या गोष्टी येतात- एक म्हणजे नेमक्या आणि उपयुक्त माहितीचं संकलन, जे या मानसशास्त्रीय चाचण्यांमधून केलं जातं आणि त्या माहितीचं विश्लेषण- जे या चाचणीत दिलेल्या उत्तरांवरून आणि समुपदेशनातून केलं जातं. मानसशास्त्रातली वेगवेगळी साधनं हेच काम करतात. पण या जोडीला एकविसाव्या शतकात एका नव्या गोष्टीने जन्म घेतलाय. आणि ती म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स.

द वॉल स्ट्रीट जर्नलचा २०१२ मधला एक लेख मी वाचला होता. त्याचं शीर्षक होतं- तुमचं पुस्तक तुम्हाला वाचतंय!मोबाईल, आय-पॅड किंवा किंडल अशी इलेक्ट्रॉनिक उपकरणं हातात घेऊन त्यावर ई-पुस्तक वाचणं ही गोष्ट आता भारतात देखील नवीन राहिलेली नाही. माहिती तंत्रज्ञान क्रांतीनंतर आता आपल्या हातात येणाऱ्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांची गंमत अशी आहे की तुम्ही त्या उपकरणातून एखादी सोय-सेवा मिळवत असता तेव्हा ते उपकरणही तुमची माहिती गोळा करत असतं. जेव्हा वाचक एखादं ई-पुस्तक वाचत असतो, तेव्हा ते उपकरणही एक प्रकारे तुम्हाला वाचत असतं. आणि त्यातून तुमच्याविषयीची माहिती मिळवत असतं. पुस्तकाच्या कोणत्या पानावर तुम्ही किती वेळ घालवलात, कुठे तुम्हाला एखाद्या शब्दाचा अर्थ शोधायची गरज पडली, कुठली पानं तुम्ही न वाचताच पुढे गेलात अशी सगळी माहिती गोळा केली जात असते. या माहितीचं नेमकं विश्लेषण करण्यासाठी क्लिष्ट स्वरुपाची गणिती प्रक्रिया उभारली जाते, म्हणजेच अल्गोरीदम्स बनवले जातात. हे अल्गोरीदम्स अधिकाधिक ताकदवान बनवता येतात जेव्हा विश्लेषण करण्यासाठी विस्तृत माहिती त्यांना मिळू लागते. फेस रेकग्निशन सारख्या गोष्टी या आपल्या हातातल्या मोबाईलवर आल्या आहेत. त्या या पुस्तक वाचण्याच्या उपकरणाबरोबर जोडल्यावर तुमचा चेहरा बघून कोणता मजकूर वाचताना तुम्हाला हसू आलं, कधी वाईट वाटलं अशा गोष्टींची माहिती मिळवता येऊ शकते. अनेक जण आता हातात स्मार्टवॉच किंवा फिटबीट सारखी उपकरणं घालतात. यातून तुमच्या शरीराची इत्थंभूत माहितीही मिळू शकते. हे सगळं समजा, ई-पुस्तकाच्या उपकरणासह, एका यंत्रणेला जोडलं असेल तर पुस्तकाचा कोणता भाग वाचताना तुमच्या हृदयाचे ठोके वाढले हेही नोंदवलं जाईल. या यंत्रणेच्या अल्गोरिदमला तुमच्याबद्दलची अधिक माहिती मिळेल. या माहितीचं सविस्तर विश्लेषण करून तुम्ही एक व्यक्ती म्हणून कसे आहात याचे आडाखे बांधले जातात. एखादं पुस्तक तुम्हाला आवडलं आहे किंवा नाही, हे तुमच्या या सगळ्या माहितीच्या विश्लेषणावरून अल्गोरिदमच सांगू शकेल!

हे फक्त ई-पुस्तकाच्या बाबत लागू नाही. सगळीकडेच आहे. मोबाईल आणि इंटरनेट मार्फत या अल्गोरीदम्समध्ये आपल्या सगळ्या गोष्टींची सातत्याने नोंद ठेवली जाते. आपल्या आवडी-निवडी, मित्रपरिवार, आपण कुठे जातो फिरतो, सवयी, आनंदाचे क्षण, रागाचे क्षण या सगळ्याची माहिती सातत्याने बघू शकता येईल, तपासता येईल असे अल्गोरिदम तयार करून, त्यातून तुम्ही नेमके कसे आहात याची एक प्रतिमा निर्माण होत असते. आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे अशी यंत्रणा, जी या सगळ्या माहिती आणि विश्लेषणानंतर तुम्हाला योग्य ते सल्ले देते. अगदी सोपं उदाहरण म्हणजे तुम्ही इंटरनेटवर एखादी गोष्ट सर्च केली असेल आणि त्यानंतर फेसबुक उघडलं तर त्या सर्च केलेल्या गोष्टीशी निगडीत जाहिराती तुम्हाला दिसू लागतात. ही या अल्गोरिदम्सची कमाल आहे. जसजसं जास्त क्लिष्ट अल्गोरीदम्स आणि सक्षम आर्टिफिशियल इंटेलिजन्स माणसाच्या क्षमतांपेक्षा अधिक दर्जेदार काम करू लागतात, तसतसं आपण त्यावर अवलंबून राहू लागतो. हे आत्ताही घडतंच आहे. लेखक युवाल नोआह हरारी आपल्या एका भाषणात याविषयी बोलताना गुगल मॅपचं उदाहरण देतो. अपरिचित शहरात गेल्यावर तिथले रस्ते माहित नसताना गुगल मॅपला एखाद्या ठिकाणी जायचं कसं ते आपण विचारतो. आणि त्यानंतर ते अॅप्लिकेशन जे सांगतं ते बिनबोभाट पाळतो. का बरं? कारण आपल्याला विश्वास असतो, की या परिस्थितीत हे आपल्याला आपल्या स्वतःपेक्षाही अधिक योग्य काहीतरी सांगणार आहे.

नेटफ्लिक्स वरच्या ब्लॅक मिरर नावाच्या भन्नाट मालिकेत एक भाग या विषयावर आहे. त्यातल्या एक अशी व्यवस्था दाखवली आहे, जिथे अल्गोरीदम्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या आधारे तुमच्यासाठीचा अनुरूप जोडीदार निवडला जातो. अर्थात ती एक काल्पनिक कथा आहे. पण या प्रकारच्या गोष्टी भविष्यात फार लांब नाहीत. आजही तुमच्या फेसबुकवरच्या वावराच्या आधारे, तुमच्या मित्रपरिवाराच्या आधारे तुम्हाला फेसबुक हे काही लोक तुम्हाला माहित असतील(पीपल यू मे नो) असं म्हणत सुचवतं. लग्नासाठी जोडीदार निवडण्यासाठीच्या अनेक वेबसाईट्स, डेटिंग साईट्स या अशा गोष्टींचा प्राथमिक पातळीवर वापर करू लागल्या देखील आहेत. अर्थातच अधिकाधिक सुधारणा होत त्याही भविष्यात त्यावर विसंबून राहता येईल एवढ्या जास्त विश्वासार्ह बनतील. मानसशास्त्रातल्या साधनांसह, ‘स्व च्या ओळखीसाठी एका नव्या वाटेवर आपला आता प्रवास चालू आहे. नजीकच्या भविष्यात, तुम्हाला कदाचित तुमच्यापेक्षाही जास्त नीट ओळखणाऱ्या अल्गोरिदमच्या आधारे तुमच्यासाठी अनुरूप जोडीदार कोण असेल हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स सांगू लागला तर आश्चर्य वाटायला नको! त्यावेळी आपण गुगल मॅप सारख्या गोष्टीवर आज ठेवतो तसा पूर्ण विश्वास ठेवू का, हे बघणं फारच रंजक ठरणार आहे!

(दि. १५ सप्टेंबर २०१८ रोजी प्रकाशित झालेल्या महाराष्ट्र टाईम्सच्या मैफल पुरवणीत प्रसिद्ध.)