Monday, October 22, 2012

राजकारणाला पर्याय नाही


जकाल उठसूट लोक ‘केजरीवाल आणि कंपनीवर कसे ते प्रसिद्धीसाठी हपापलेले आहेत आणि त्यांच्या नुसती आरोपांची राळ उठवण्याच्या प्रकारामुळे काहीही बदल होणार नाही’ असे म्हणत याविषयी बेताल आणि संदर्भहीन बडबड करताना आढळतात. मुळात राजकीय पक्ष काढण्याची आणि राजकीय पर्याय देण्याची केजरीवाल यांची कल्पना न समजलेले, न पटलेले किंवा न पचलेले लोक अशी भाषा करत आहेत असे माझे निरीक्षण आहे. किमान माझ्या संपर्कात आलेले तरी!
जिथे लोकशाही नांदत आहे, तुमच्या माझ्या आयुष्यावर प्रमाणाबाहेर परिणाम करणारे निर्णय जी व्यवस्था आज घेत आहे त्यात परिवर्तन करायचे तर ते नुसते बसून किंवा काहीच न करून होणार नाही. किंवा ते व्यवस्थेबाहेरून प्रयत्न करूनही होणार नाही. परिवर्तन करायचे तर ते व्यवस्थेत शिरूनच करावे लागेल. आणि त्या दृष्टीने केजरीवाल यांच्या राजकारणात यायच्या निर्णयाचे स्वागत करायला हवे.

सध्या केजरीवाल यांनी ज्या पद्धतीने राजकीय नेत्यांवर आणि त्यांच्या गैरप्रकारांवर जोरदार हल्ले चढवायला सुरुवात केली आहे याचा प्रधान हेतू लक्षात घ्यायला हवा. केजरीवाल यांनी आपल्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये स्पष्टपणे सांगितलं की हे सगळं उघड केल्याने या लोकांवर कारवाई होईल अशी त्यांची मुळीच अपेक्षा नाही. केजरीवाल यांच्या या ‘हल्लाबोल’चा मुख्य हेतू हा ही राजकीय व्यवस्था किती पोखरलेली आहे हे परत परत ओरडून सांगणे... माल चांगला असेल तर ओरडावे लागत नाही अशी जुनी म्हण आपल्याकडे पूर्वी होती. त्यात आता मुक्त अर्थव्यवस्थेत अमुलाग्र बदल झाला. ओरडण्याला आज महत्व आहे. आणि का असू नये? उगीच मार्केटिंगला वाईट ठरवण्यात काय हशील आहे? माल चांगला असेल तर माल चांगला आहे हे ओरडून सांगावेच लागेल. नाहीतर सध्याच्या राजकीय व्यवस्थेत हा आवाज कधी बंद पडून जाईल कळणारही नाही.

केजरीवाल यांचा तुमची आमची, सामान्य नागरिकांची माथी भडकवण्याचा आटापिटा चालू आहे. आजपर्यंत भुक्कड भावनिक मुद्दे उचलत राजकीय पक्षांनी माथी भडकावण्याचेच तर काम केले आहे की. मग या नवीन पक्षाने तेच काम अधिक तर्कशुद्ध विचार आणि प्रामाणिक हेतूच्या सहाय्याने करायचा प्रयत्न केला की आमचे भंपक बुद्धिवादी त्यांच्यावर टीका करणार? हा कसला दुटप्पीपणा? राजकीय पक्षांना, बुद्धिवादी मंडळींना, आणि नागरिकांनाही एक भीषण स्थैर्य आले आहे. आणि पाणी स्थिर झाले की गढूळ होणार या न्यायाने आमची मानसिकताच गढूळ होऊन गेली आहे. कोणी काही वेगळे प्रयोग करू लागला की त्याला प्रोत्साहन देण्याऐवजी खाली कसे खेचता येईल यावर बहुतांश वेळ खर्ची घालणार. त्या प्रयोग करणाऱ्या व्यक्तीला हिणवणार, घाबरवून सोडणार. आणि हे केवळ राजकीय बाबतीतच आहे असे नव्हे. तर अगदी करिअर निवडण्यापासून वेगळे चित्रपट करण्यापर्यंत आणि वेगळ्या प्रकारचे कपडे घालण्यापासून रूढी परंपरांमध्ये, सवयींमध्ये वेगळेपण आणण्यापर्यंत, सर्वत्र आम्ही स्थितिप्रिय झालो आहोत. आहेत ते बरं चाललंय! शिवाय असं म्हणत दुःख उगाळत बसायचं आणि त्या दुःखांनाच चक्क ग्लोरिफाय करायचं! केजरीवाल आणि कंपनी वर होणारी टीका ही याच स्थितिप्रिय आणि दुःखलोलुप मानसिकतेतून आली आहे.

गडकरी-पवार यांच्यात लागेबांधे आहेत असे केजरीवाल यांनी सांगितल्यावर ‘हे काय आम्हाला माहितीच आहे की, नवीन काय?’ अशी प्रतिक्रिया काही महाभागांनी दिली. अशा वेळी त्यांना मला प्रश्न विचारावा वाटतो- तुम्हाला हे माहितीच होतं तर गोट्या खेळत होतात का इतके दिवस? तुम्ही का पुढे होऊन हे जगाला सांगितलं नाहीत? की तुमच्यात तेवढी धमक नव्हती? आज आता केजरीवाल नामक एक धडपड्या माहिती अधिकारात काही डॉक्युमेंटस् मिळवून लोकांसमोर थेट मांडतो आहे आणि एकूण व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करतो आहे तर त्याला साथ द्यायचं सोडून त्याच्यावर टीका करण्यात आणि एक प्रकारे दुसरी बाजू नकळतपणे उचलून धरण्यात काय बहादुरी किंवा हुशारी आहे, कळत नाही.

रॉबर्ट वढेरा यांची संपत्ती, गडकरींच्या संस्थेला दिली गेलेली जमीन असे प्रश्न उपस्थित करून, आपल्यासमोर मांडून केजरीवाल आपल्याला आवाहन करू इच्छित आहेत की आता तरी वेगळे मार्ग आहेत त्यांच्याकडे बघा आणि परिवर्तनाच्या लढाईत सामील व्हा. एक प्रकारे केजरीवाल आपल्याला आव्हानही देत आहेत की नुसते घरात बसून टीका करण्यापेक्षा मैदानात या आणि या व्यवस्थेशी दोन हात करा. एवढेच नव्हे तर केजरीवाल आपल्या निष्क्रियतेवर घणाघाती टीका करत आहेत. एका बाजूला केजरीवाल संसदेचा आणि तिचा अपमान करणाऱ्या संसद सदस्यांचा मर्मभेदक उपहास करत आहेत. तर त्याचवेळी संसदेत शिरूनच आपल्याला बदल घडवायचा आहे हे ठासून सांगत आहेत. एका बाजूला नकळतच व्यवस्थेबद्दल अनास्था आणि द्वेष पसरवत आहे पण त्याचवेळी नवीन व्यवस्था निर्मितीची आशा दाखवत आहेत. आणि आपल्याकडून मदतीची अपेक्षा करत आहेत.
ज्या मध्यमवर्गीय बुद्धिवाद्यांच्या जोरावर केजरीवाल पुढे जाऊ इच्छितात त्यांच्या मनातील एक प्रश्न म्हणजे पुढे जाऊन केजरीवाल आणि त्यांचे साथीदार सुद्धा भ्रष्ट झाले तर काय? केजरीवाल सुद्धा भ्रष्ट होण्या न होण्याची शक्यता अगदी ५०-५० आहे असे गृहीत धरले तरीही, यासारखा दुसरा भंपक प्रश्न नाही. कारण यातून ‘केजरीवाल भ्रष्ट झाले तर त्यांनाही उखडून फेकून देऊ’ हा आत्मविश्वास नसल्याचेच तेवढे स्पष्ट होते आहे. उलट ‘नवीन भ्रष्ट होण्याची ५०% शक्यता असणाऱ्या माणसाला पाठींबा देण्यापेक्षा जुना १००% भ्रष्ट काय वाईट?’ अशी पराभूत मनोवृत्ती दिसते. आणि ही मनोवृत्ती पुढे जाऊन आपला अपेक्षाभंग होईल केवळ या विचारातून आलेली आहे. लोकांना (कदाचित होणाऱ्या) अपेक्षाभंगाचे दुःख एकूण सामाजिक-राजकीय परिस्थिती अधिकाधिक भीषण होऊ देण्यापेक्षा जास्त वाटते यापेक्षा दुर्दैव काय असावे!

आजच्या परिस्थितीत टोकाला जाऊन माथी भडकवणारे हवे आहेत. टोकाला जाऊन माथी भडकून घेणारे हवे आहेत. आणि तुटपुंजे चार पाच नव्हेत तर घाऊक प्रमाणात हजारो लाखोंच्या संख्येने लोकांची माथी सध्याच्या व्यवस्थेवर कृतीशीलपणे भडकायला हवीत. कधीकधी एका टोकाला जाणे आवश्यक असते. कारण परिस्थिती दुसऱ्या टोकाला गेलेली असते. ती मूळपदावर, मध्यम मार्गावर आणण्यासाठी हे करावेच लागेल. हे काम मोठे कठीण आणि कौशल्याचे आहे. कारण यात तर्कशुद्ध आणि अहिंसात्मक मार्गाने या टोकाच्या विचारांची गुंफण करावी लागेल, मार्केटिंग करावे लागेल. तर्कशुद्ध मार्गाने टोकाची भूमिका मांडणे या गोष्टी स्वभावतः परस्पर विरुद्ध आहेत हे लक्षात घेतले म्हणजे हे काम किती कठीण आहे याची कल्पना येते.

केजरीवाल आपला राजकीय पक्ष उभा कसा करतात हे बघण्यास मी उत्सुक आहे. त्यांचा राजकीय पक्ष आणि कार्यकर्ते हे दिल्ली, मुंबई, बारामती किंवा नागपूर च्या इशाऱ्यावर चालणाऱ्या इतर पक्षांप्रमाणेच निघू नये अशी इच्छा. हे टाळण्यासाठी स्थानिक पातळीवर स्थानिक नेतृत्व उभे करावे लागेल. लोकांमधून दूरदृष्टी आणि रचनात्मक कार्याची आवड आणि जाण असणाऱ्या मंडळींनी पुढे येऊन हे आव्हान स्वीकारले पाहिजे. ‘कशी गंमत चालली आहे’ असे बघण्यापेक्षा जबाबदारीने वागून जबाबदाऱ्या उचलल्या पाहिजेत. नुसत्या टीका अन् टिप्पण्या करून काय होणार?

एक गोष्ट मात्र आपण आपल्या मनात अक्षरशः कोरून घेतली पाहिजे- लोकशाहीत राजकारणाशिवाय पर्याय नाही. केवळ केजरीवाल नव्हे तर कोणत्याही पक्षाच्या आणि पार्श्वभूमीच्या राजकारणात नवे प्रयोग करू इच्छिणाऱ्यांना, नवे बदल घडवू पाहणाऱ्यांना आपण ‘सक्रीय’ पाठींबा दिला पाहिजे. त्यातंच आपलं आणि आपल्या पुढच्या पिढ्यांचं हित आहे. आणि हे आपण जितकं लवकर आत्मसात करू तितकं चांगलं. 

Saturday, October 20, 2012

षटके


दर ६ वर्षांनी एक बदलांचा मौसम येतो
असा सिद्धांत मी आत्ता (उगीचच) मांडला आहे.
१ ते ६, ७ ते १२, १३ ते १८ आणि १९ ते २४.
माझा आता हा बदलांचा मौसम आला आहे.

बघा विचार करून पटेल तुम्हालाही.
कदाचित अगदी ६ च असं नाही,
पण ४-६-८ असलं तुमचं काहीतरी
नक्की नक्की सापडेल तुम्हालाही.

१९ ते २४... अहाहा काय सुंदर षटक होतं हे.
बेभान होऊन नाचलो काय,
बेहोश होऊन गायलो काय,
बेफिकीर होऊन घुमलो काय,
अन् बेताल होऊन वागलो काय!

याच षटकात सारखे सारखे समजले,
शिक्षणात गती फारशी नव्हतीच कधी.
याच षटकात सारखे फुकट मिरवले,
जरी फारसे काही जमले नाही कधी.

सैतानालाही अंगावर घ्यायला दंड फुरफुरले,
कणभरही भीती कसली वाटली नाही कधी,
अजुनी वाटते, नक्की असते त्याला लोळवले,
हे खरेच, की समोर तो साला आला नाही कधी!

याच षटकात वास्तवाचे पुरते भान सुटले,
प्रेमही केले अगदी बेफाम होत कधी.
षटकात या स्वप्ने बघितली अन् रोमान्स केले,
षटकात या कधी आनंद, डोळ्यात पाणी कधी.

आता २५ ते ३० चे षटक आव्हान देते आहे.
खोटे का सांगू, काहीसा बावरतो मी कधी.
अपेक्षांचे बोजे उचलावे वाटते आहे, पण
अचानक कॉन्फिडन्स कमी पडतो कधी.

एक मन म्हणते आहे आता कळेल दुनियादारी.
दुसरे मात्र कुशीत घेत कुरवाळते कधी.
घाबरतो कशाला तुझीच तर आहे दुनिया सारी,
असे म्हणत मला आधार देते कधी.

षटकाला या सामोरे जाण्यास सिद्ध आता व्हायचे आहे.
‘सामोरे’ नको म्हणायला, खटकतोय हा शब्द.
षटकाला याही ‘आपलेसे करायला’ सिद्ध आता व्हायचे आहे.
असे म्हणूया! कारण पॉझिटिव्ह वाटतोय हा शब्द!

एक मात्र नक्की, अजून
बेभान होऊन नाचणे सोडवत नाही,
बेहोश होऊन गाणे सोडवत नाही,
बेफिकीर होऊन घुमणे सोडवत नाही,
अन् बेताल होऊन वागणे सोडवत नाही.

या सगळ्याची आपलीच एक मजा आहे.
उत्कटपणे जगणे यापेक्षा वेगळे काय आहे?
आहे मत हे आत्ताचे, गद्धेपंचविशीचे !
कोणी सांगावे? बदलला मौसम की,
बदलेल हे मत कदाचित उद्या.
‘बदलू नकोस’, सांगणे असले जरी मनाचे

बदलांचे हे मौसम येतंच राहणार
आपल्याला ते कवेत घेतंच राहणार.
स्वागत या षटकाचे दिलखुलासपणे करतो.
हसून मी या बदलांना आता आपलेसे करतो.


-    तन्मय कानिटकर
२० ऑक्टोबर २०१२

Wednesday, October 3, 2012

ध्यास


भीषण वादळे आली जरी,
सोडून गेले भित्रे उंदीर जरी,
नव्हे बुडणारे हे जहाज,
विसरले सारे तरी...


संकटांचे पहाड कोसळले जरी,
अडचणींचे डोंगर उभे ठाकले जरी,
थकणार नाही, थांबणार नाही,
अंधार दाटून आला तरी...

कोणी आमची खूप चेष्टा केली.
कोणी आम्हाला मूर्ख ठरवले,
कोणी आम्हाला स्वप्नाळू म्हणले,
कोणी तर चक्क स्वार्थी म्हणले.
टीका झाली तरी सुधारणा करत कार्यरत राहणे,
हा आमचा स्वभाव आहे
नुसते टिकणे नव्हे, तर अधिक प्रगल्भ बनणे,
ही आमची सवय आहे.  

परिवर्तन हाच आमचा ध्यास आहे,
परिवर्तन हाच आमचा श्वास आहे.
ध्येय आमचे निश्चित आहे,
मार्ग आमचा स्वच्छ आहे.
हे सोपे नाही याची कल्पना स्पष्ट, आम्हाला आहे,
सोपे काही नाकोचे, अवघड आव्हानच स्वीकारायचे आहे.

धर्मांचे अन् संस्कृतीचे रक्षक दंड थोपटून आमच्याविरुद्ध उभे राहतील,
कारण त्यांचे दुकान आम्ही बंद करू.
लोकांच्या जीवाचा सौदा करणारे शस्त्र परजून आमच्याविरुद्ध उभे राहतील,
कारण त्यांचे सौदे आम्ही हाणून पाडू.
गुंड पुंड, आणि समाजहिताचा देखावा करणारे आमच्या जिवावर उठतील,
कारण ते गुंड आहेत हे आम्ही ठासून सांगू.
समाजाचे रक्षकच कायद्याचा गैरवापर आमच्याविरुद्ध करू पाहतील,
कारण ते गुंडांच्या हातातले बाहुले आहेत, हेही आम्ही ठासून सांगू.

कोणी आम्हास जातीयतेच्या विळख्यात अडकवायला बघेल,
कोणी आम्हास धाक दपटशाने नमवायचा प्रयत्न करेल.
कठोर राहू, सावध राहू...
कारण कधी कोणी मित्रच भोस्कायला बघेल.


पुरंदरचा तह केला म्हणजे राज्य धुळीस मिळत नसते,
शिवरायांनी शिकवले आम्हां,
योग्य वेळी, योग्य ती पावले घ्यायचा
धूर्तपणा शिकवला त्यांनी आम्हां...


समोरचा शत्रू दिल्लीचा खुद्द औरंग्या !
तरी थडगे त्याचे इथेच आहे.
आज नाहीतर उद्या शत्रूचे समाजाच्या,
थडगे असणार इथेच आहे.




असेल ध्यास परिवर्तनाचा तर स्वागत तुमचे आहे.
जिद्द, चिकाटी अन् निर्भयता एवढेच मागणे आमचे आहे.

इथे तुमचा धर्म वा तुमची जात विचारली जाणार नाही,
तुम्ही स्त्री की पुरुष ते महत्वाचे नाही,
अन् तुमचा रंग काळा की गोरा याला महत्व नाही.
परिवर्तनाची प्रामाणिक इच्छा हाच सदस्यत्वाचा निकष,
समाजपरिवर्तनाचा विचार, यापलीकडे कसले आलेत निकष?!

बलदंड सत्ता अन् त्याचे माजलेले सत्ताधारी,
वेगवेगळ्या प्रकारचे, रंगांचे, पण माजलेले सत्ताधारी-
राजकारणी, उद्योगपती, गुंड, धर्म अन् झुंडीचे कारभारी,
यांच्याच जहांगीरदाऱ्या आम्हाला उखडायच्या आहेत,
यांच्या अन्यायकारक चौकटी मोडायच्या आहेत.
परिवर्तनाची ही इच्छा बाळगणारा प्रत्येकजण या लढाईतील सैनिक आहे,
परिवर्तन व्हावे म्हणून झटणारा प्रत्येकजण या लढाईचा सेनानी आहे.

तुमच्याच इच्छेमुळे तुम्ही आज आमच्यातलेच एक झालात,
परिवर्तनाच्या प्रचंड कार्यामधले एक सहकारी झालात.

शपथ घेऊ आपण आज-
कर्तव्यावरील निष्ठेने, चालत राहू आपण,
व्यक्ती व्यक्ती महत्वाची, पण व्यक्तिपूजेला फाटा देऊ आपण.
उच्च ध्येयाकडे पाहून.
अंतिम उद्दिष्टाकडे पाहून.

भीषण वादळे आली जरी,
सोडून गेले भित्रे उंदीर जरी,
नव्हे बुडणारे हे जहाज,
विसरले सारे तरी...

संकटांचे पहाड कोसळले जरी,
अडचणींचे डोंगर उभे ठाकले जरी,
थकणार नाही, थांबणार नाही,
अंधार दाटून आला तरी...

कारण,
परिवर्तन आपला ध्यास आहे,
परिवर्तन आपला श्वास आहे.

 - तन्मय कानिटकर
२ ऑक्टोबर २०१२