Saturday, January 20, 2018

नातं, आपलं जगाशी.

काही दिवसांपूर्वी आमची मित्रमंडळींमध्ये चर्चा चालली होती, नातं म्हणजे नेमकं काय या विषयावर. एका मित्राने वेगवेगळी नाती सांगितली, आई-बाबा, भाऊ, बहिण, नवरा, बायको वगैरे वगैरे. पण ही सगळी कोणकोणती नाती अस्तित्वात आहेत त्याची नावांची यादी झाली. प्रत्यक्षात नातं म्हणजे काय? काय असलं पाहिजे म्हणजे एका व्यक्तीचं दुसऱ्या व्यक्तीशी नातं आहे असं आपण म्हणू शकतो? एक मैत्रीण म्हणाली, प्रेम असलं पाहिजे. पण मग जी नाती प्रेमाशिवाय असतात, त्यांचं काय? आपले आपल्या ऑफिसमधले सहकारी, कोपऱ्यावरचा दुकानदार, व्यवसायातला भागीदार अशा अनेक मंडळींशी आपलं प्रेमाशिवायही नातं असतं. म्हणजे मग नातं म्हणजे काय हे ठरवताना प्रेमाचा काही संबंध नाही. मग नातं म्हणजे काय?
मला असं वाटतं, ‘सामायिक अनुभव’, इंग्रजीत ज्याला शेअर्ड किंवा कॉमन एक्स्पीरियंन्स असं म्हणता येईल, हा कोणत्याही नात्याचा पाया आहे. सामायिक अनुभव असेल तरच ते नातं आहे असं म्हणता येऊ शकतं. आपण आपल्या जुन्या एखाद्या मित्राला किंवा मैत्रिणीला भेटतो तेव्हा गप्पांमध्ये जुन्या आठवणी निघतात. किती साहजिक असतं ना हे? आपले सामायिक अनुभव आपण आठवतो आणि त्यामुळे आपण किती छान मित्र/मैत्रिणी आहोत याची जाणीव दोघांनाही होते. एकाच घरात वाढलेल्या दोन भावांचं एक सामायिक अनुभवविश्व तयार होतं आणि त्यांच्यात नातं तयार होतं. रक्ताचं नातं काहीही असलं तरी त्याला सामायिक अनुभवांची जोड नसेल तर ते नातं असेल का? आपण कित्येक वेळा बघतो की एखादी व्यक्ती जवळच्या नात्यातली असते पण कधी भेटच झालेली नाही. अशावेळी नावापुरतं नातं काही का असेना. प्रत्यक्षात ते नसतंच. ते परत निर्माण करायचं तर भेटणं, बोलणं या सारखे सामायिक अनुभव निर्माण करावे लागतात. या उलट काही वेळा एखाद्या संकटात एकत्र सापडलेले, एकमेकांना आधी न ओळखणारे लोक एकदम बांधले जातात. मुंबईत दर पावसाळ्यात बघतो आपण ते. कशामुळे होतं असं? अर्थातच- शेअर्ड एक्स्पीरियंन्स. किंवा एकत्र घेतलेला अनुभव. हा अनुभव, ही सामायिक काहीतरी असण्याची भावना दोन व्यक्तींमध्ये बंध तयार करते आणि आपण त्याला नातं म्हणतो.
नात्याला आपण आपल्या सोयीसाठी अनेक नावं दिली, नावांनुसार नात्यांना हक्क, कर्तव्ये आणि विशेषाधिकार वाटून दिले. एखाद्या व्यक्तीचे दुसऱ्या एखाद्याच व्यक्तीबरोबर सगळे सामायिक अनुभव असतील ही गोष्ट अशक्यच. त्यामुळे नातंही केवळ एकच असं असणार नाही हे उघडच आहे. एकाच व्यक्तीची अनेक नाती तयार होऊ लागली. सामायिक अनुभवांचं जाळं विस्तारत गेलं. आणि त्या नात्यांच्या बांधणीतून आपण समाज नावाची चीज उभी केली. वेगवेगळ्या प्रकारच्या सामायिक अनुभवांतून आपण जगाशी नातं तयार केलं आहे. आज माझं जगाशी, जगातल्या कित्येक गोष्टींशी भन्नाट नातं आहे याचं कारण माझे सामायिक अनुभव. एकाच स्टेडियममध्ये बसून आपल्या लाडक्या संघाला पाठींबा देणारे पाठीराखे एकमेकांशी एका नात्याने बांधले जातात कारण समोर घडणारा खेळाचा सामना आणि आपल्या आवडत्या संघाला पाठींबा देण्याची भावना या दोन्ही गोष्टी त्यांच्या सामायिक अनुभवात मोडतात.
दोन प्रकारचे मोलेक्युलर बॉंड्स असतात असं केमिस्ट्रीमध्ये शिकल्याचं आठवतंय. आयोनिक आणि कोव्हॅलंट बॉंड्स. पहिल्या प्रकारात एक अणू दुसऱ्या अणूला आपला इलेक्ट्रॉन देतो. आणि त्या दोघांमध्ये बंध तयार होतो. तो आयोनिक बॉंड. पण दुसरा प्रकार जास्त रंजक. इथे दोन अणू एक इलेक्ट्रॉन शेअर करतात. आणि या सामायिक इलेक्ट्रॉनच्या माध्यमातून जो बंध तयार होतो तो कोव्हॅलंट बॉंड. पहिला प्रकार सुटसुटीत. अगदी कोरड्या व्यवहारासारखा. वस्तू घ्या, पैसे द्या, विषय संपला. पण दुसऱ्यात नुसता व्यवहार नाही. त्यामुळे या प्रकारात या बॉंड्सच्या साखळ्या तयार होतात. अधिकाधिक क्लिष्ट रचना यात तयार होऊ शकते. एकाची अनेकांशी नाती आणि नात्यांची साखळी. आपल्या समाजासारखंच की सगळं!
हे विस्ताराने मांडण्याचा उद्देश असा की या असंख्य नात्यांच्या मांदियाळीत एका नात्याला आपण जगभर अनन्यसाधारण महत्त्व दिलेलं आहे आणि ते म्हणजे नवरा-बायको. अनेकदा मी माझ्याशी बोलणाऱ्या मुला-मुलींना अगदी मूलभूत प्रश्न विचारतो की त्यांना लग्न करण्याची इच्छा का आहे? त्यावर अनेकांकडून ‘शेअरिंग’ करायला जोडीदार असं एक उत्तर मिळतं. आपण हे म्हणतो, तेव्हा आपला आजचा दिवस कसा गेला एवढंच जोडीदाराला सांगणं म्हणजे शेअरिंग असं आपल्याला अपेक्षित असतं का? नक्कीच नाही. रिपोर्टिंग आणि शेअरिंगमध्ये फरक आहे ना. आपण एका व्यक्तीबरोबर हे जे लग्नाचं नातं निर्माण करू इच्छितो तेव्हा साधं दैनंदिन जगणंसुद्धा त्या व्यक्तीबरोबर सामायिक अनुभवाच्या कक्षेत कसं आणता येईल हे बघतो. नवरा बायको फिरायला जातात, जेवायला जातात बाहेर, एकत्र नाटक सिनेमा बघतात, एकत्र स्वयंपाक करतात, प्रदर्शनं बघतात, शॉपिंग करतात, वेगवेगळ्या समारंभांना जातात, काहीतरी एकत्र शिकतात, एकत्र पाळीव प्राणी पाळतात, एकत्र घर सजवतात, एकत्र नवीन पिढीला जन्म देतात, एकत्र नवीन पिढीला वाढवतात आणि या सगळ्यातून ते सातत्याने नवनवीन असे सामायिक अनुभव तयार करत असतात. सामायिक अनुभव सगळे चांगलेच असतात असं काही नाही. वाईटही असू शकतात. पण त्या सगळ्यांची गोळाबेरीज करत त्यांचं नातं कसं आहे ते ठरेल. इतरांप्रमाणेच आपल्या स्वतःबरोबरच्या नात्यालाही हे सामायिक अनुभवाचं तत्त्व लागू होईल. आपण एकटे असताना काय काय केलं, वाचलं, बघितलं, अनुभवलं यातून आपलं एक स्वतःशीही नातं तयार होत जातं.
लग्न करत असताना, जोडीदार निवडत असताना, म्हणजेच एक नवं नातं निर्माण करायला जात असताना वरवरच्या निव्वळ भौतिक गरजांशी निगडीत अपेक्षांच्या पलीकडे आपल्याला जायला हवं. आपल्याला कोणत्या व्यक्तीबरोबर, कोणत्या कुटुंबाबरोबर शेअर्ड एक्स्पीरियंन्स घ्यायला आवडणार आहे, आपल्या अनुभवांमध्ये कोणाला सामावून घ्यायला आवडणार आहे ही गोष्ट विचारांत घेणं महत्त्वाचंय. ही पहिली पायरी आहे. पुढेही अनेक पायऱ्या आहेत, पण त्याविषयी आता पुढच्या लेखांमध्ये. 
(दि.२० जानेवारी २०१८ रोजी प्रकाशित झालेल्या महाराष्ट्र टाईम्सच्या मैफल या पुरवणीत प्रसिद्ध.)

No comments:

Post a Comment