इतिहासातल्या ज्या काही थोड्या लोकांमुळे मी
कमालीचा प्रभावित झालो त्यातले एक म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर. याच यादीत
महात्मा गांधींचेही नाव मी घेतो यामुळे अनेक जण चकित होतात. टोकाचे गांधीवादी मला
येऊन म्हणतात, “तुला सावरकर नीट समजले आहेत का? आणि समजले असूनही तू जर सावरकरांना
मानत असशील तर तुला सावरकरच काय पण गांधीदेखील नीट समजले नाहीत.” टोकाचे
सावरकरप्रेमी मला येऊन म्हणतात, “तू सावरकरांनी गांधींबद्दल जे लिहिले आहे ते तू
वाचूनही हे हे म्हणत असशील तर तुला सावरकर समजलेच नाहीत. आणि साहजिकच आहे, तुला
गांधीही समजले नाहीत.”
मला या सगळ्या संभाषणाची गंमत वाटते. पूर्वीच्या
सिनेमात खानदान की दुश्मनी वगैरे असायची तसे सावरकर-गांधीजी यांचे त्या काळात
मतभेद होते या मुद्द्यावर आजही त्यांचे तथाकथित अनुयायी तावातावाने भांडताना बघून
मला हसूच येतं. आपल्यातले बहुतेक सगळे जण कुठल्या तरी कंपू मध्ये शिरायला इतके
अधीर का असतात? आणि अपवादाने कोणी स्वतः नसले याबाबत उत्साही, तरी बाकीचे त्यांना
कुठल्या ना कुठल्या कंपूचे लेबल लावून मोकळे होतात. मग ती व्यक्तीपण आपण याच कंपू
मधले असा विचार करू लागते. “हा मार्क्सला चांगलं म्हणला? म्हणजे हा मार्क्सवादी.
समाजवादी तरी नक्कीच.”, “हा टाटांची स्तुती करतो? म्हणजे साला भांडवलवादी.”, “हा
गांधींचे कौतुक करतो म्हणजे संघाचा असूच शकत नाही.”, “हा सावरकरांची स्तुती करतो?
म्हणजे हा पक्का मुस्लीम विरोधक.”, “हा नेहरूंच्या धोरणांचे कौतुक करतो? म्हणजे हा
संघ विरोधक असला पाहिजे.”, “हा सरदार पटेलांचे कौतुक करतो म्हणजे हा नेहरूंचा
विरोधक असला पाहिजे.”, “हा छत्रपती संभाजी महाराजांची जयंती साजरी करतो? म्हणजे हा
मराठा जातीचा असावा..”, “हा बाजीराव पेशव्याचे कौतुक करतोय म्हणजे हा नक्की बामन”;
अशा असंख्य लेबलांचा महापूर आहे आपल्या समाजात. खिरापत वाटल्यासारखे ही लेबलं
वाटली जातात. ती अंगावर मिरवण्यात कित्येकांना आनंदही वाटतो. कसला आनंद ते देव
जाणे. (आता माझे हे शेवटचे वाक्य वाचून काहींनी “देव जाणे? म्हणजे हा आस्तिक” असे
लेबल मला चिकटवले असल्यास नवल नाही!) गंमतीदार आहे सगळं.
असो. तर मुख्य मुद्दा असा की ज्यांच्यामुळे मी
विलक्षण प्रभावित झालो, नेहमी होतो, अशा
महान व्यक्तींच्या यादीत मी सावरकरांचे
नाव अग्रक्रमाने घेतो. सावरकरांची आज जयंती. जिकडे तिकडे स्वातंत्र्यवीर
सावरकरांचे कौतुक चालू असेल, पुतळ्यांना हार घातले जातील, व्याख्याने दिली जातील
तसबिरींना हार घातले जातील, कुठे सोयीस्करपणे अंदमानला काळ्यापाण्याची शिक्षा
भोगायला जाण्याआधीच्या त्यांच्या कर्तृत्वावर तेवढा प्रकाश टाकला जाईल, तर कुठे
सोयीस्करपणे ‘हिंदू हे स्वयमेव राष्ट्र आहेत’ या त्यांच्या सिद्धांताला धरून चर्चा
रंगेल. या सगळ्या गदारोळात माझे सावरकर नेमके कोणते? मला भावलेले सावरकर कोणते? हा
विचार मी करू लागलो आणि असंख्य गोष्टी डोळ्यासमोर येऊ लागल्या.
चाफेकर बंधू फाशी गेले ती बातमी ऐकून अस्वस्थ
झालेल्या विनायकने “स्वातंत्र्यलक्ष्मी की जय” म्हणत स्वातंत्र्यासाठी ‘मारता
मारता मरेतो झुंजेन’ ही शपथ घेतली. हा प्रसंग कल्पनेतही डोळ्यासमोर उभा केला तर
आजही अंगावर रोमांच उभे राहतात. चौदा-पंधरा वर्षाचा पोरगा, नाशिकजवळच्या भगूर
गावात गल्लीबोळात हूडपणे फिरणारा, डोक्याने विलक्षण तल्लख असणारा विनायक दामोदर
सावरकर हा पोरगा. ‘स्वातंत्र्यलक्ष्मी की जय’ हे विलक्षण शब्द त्याला कसे स्फुरले असतील?
हे सावरकर माझे आहेत. वंगभंगाने संतापलेल्या देशवासियांना स्वदेशी आणि बहिष्काराचा
मंत्र कॉंग्रेसने दिल्यानंतर, देशातली पहिली परदेशी कपड्यांची होळी पुण्यात मुठा नदीच्या
काठावर पेटवणारे तेजस्वी सावरकर मला माझे वाटतात. अखंड वाचन करून इतिहास समजून
घेणारे आणि हा इतिहास लोकांना कळावा यासाठी आपल्या अमोघ शैलीत पुस्तके लिहिणारे
सावरकर, पुस्तक छपाईला जाण्यापूर्वीच पुस्तकावर सरकारने बंदी घालावी इतकी लेखणीची
दहशत निर्माण करणारे सावरकर मला भावतात. वास्तविक, ‘मैझिनी’ भारतीयांना माहित
झालाच नसता कदाचित कधीच. पण त्याचे चरित्र वाचल्यावर त्यांना ते मराठीत आणावे
वाटले. महाराष्ट्रातल्या लोकांना मैझिनी आणि गैरीबाल्डी बद्दल वाचून शिवरायांची
आठवण होईल असं त्यांना वाटलं. इटलीची नाळ थेट मराठी भूमीशी जोडण्याचा काय हा असामान्य
प्रयत्न! इंग्लंड मध्ये राहून भारतीय स्वातंत्र्याचा प्रश्न हा आंतरराष्ट्रीय
स्वरूपाचा आहे याकडे इतर देशांचे लक्ष वेधण्याचा त्यांनी केलेला प्रयत्न,
इंग्रजांना सळो की पळो करून सोडण्यासाठी बॉम्ब विषयक पत्रके भारतात पाठवणे, मग
पिस्तुले पाठवणे... अटक झाल्यावर बोटीवरून समुद्रात स्वतःला झोकून देणारे आणि पुन्हा
अटक फ्रेंच भूमीवर केल्यामुळे अभय मिळावे अशी मागणी करणारे वीर सावरकर. अंदमानात
कोलूचे यातनाकांड स्वीकारणारे, कितीही कष्ट झाले तरी स्वातंत्र्यासाठी आत्महत्येच्या
विचारांपासून स्वतःला दूर नेणारे स्वातंत्र्यवीर. आपल्या प्रगल्भतेच्या जोरावर
स्फुरणाऱ्या कवितांच्या आधारे आणि मातृभूमीच्या उद्धाराचे एकमेव स्वप्न बघत
अंदमानातील भीषण कारावास सहन करणारे स्वातंत्र्यवीर सावरकर.
सहभोजनाच्या माध्यमातून अस्पृश्यता दूर करण्याचा
प्रयत्न करणारे आणि समाजसुधारणेच्या दृष्टीने एक प्रतिक म्हणून ‘पतितपावन’
मंदिराची उभारणी करणारे सुधारक सावरकर. नैतिकतेचा मुख्य पाया धर्मग्रंथ नसून
बुद्धी हा आहे आणि नैतिकता ही मनुष्याने मनुष्यासाठी निर्माण केलेली गोष्ट
असल्याने ती परिवर्तनीय आहे असे मानणारे सावरकर मला बेहद्द आवडतात. “परराज्य उलथून
पाडण्यासाठी गुप्त कट, सशस्त्र बंडाळी ही सर्व साधने अपरिहार्यच असतात, पण या सर्व
वृत्ती स्वराज्य स्थापन होताच तत्काळ टाकून देण्याचा सल्ला देणारे सावरकर. ‘स्वतंत्र
देशात सरकारच्या चुका या आपण जनतेनेच निवडून दिलेल्या सरकारने केल्या असल्याने जबाबदारी
आपल्यावरही येते आणि आपण एकदम डोक्यात राख घालता कामा नये’ असा अस्सल लोकशाहीवादी
सल्ला देणारे स्वातंत्र्यवीर. ‘जोपर्यंत आपली मते कोणी बळाच्या जोरावर सक्तीने
दुसऱ्यावर लादीत नाही, तोपर्यंत प्रत्येक नागरिकाचा विचार व भाषण स्वातंत्र्याचा
अनिर्बंध हक्क इतरांनी मान्य केला पाहिजे’ असे १९३८ सालातच ‘मराठा’ मध्ये लेख
लिहून संभाषण स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारे स्वातंत्र्यवीर मला मनापासून
प्रभावित करतात. राष्ट्राभिमानाविषयी बोलत असतानाच, ‘स्वदेशाच्या राक्षसी हावेला
बळी पडून अन्य देशाच्या न्याय्य अस्तित्वावर व अधिकारावर अतिक्रमण करतो
राष्ट्राभिमान अधर्म्य आणि दंडनीय आहे’ असे ठणकावून स्पष्ट करणारे सावरकर मला
कोणत्याही साम्राज्यवादविरोधी व्यक्तीपेक्षा तसूभरही कमी भासत नाहीत. भाषा हा कोणत्याही संस्कृतीमधला अत्यंत महत्वाचा असा भाग. आणि म्हणून मराठी भाषा शुद्धीसाठी त्यांनी केलेले अपूर्व प्रयत्न. एकेका इंग्रजी शब्दाला काय सुंदर मराठी पर्यायी शब्द दिले त्यांनी. दूरदर्शन, दूरध्वनी, महानगरपालिका, मुख्याध्यापक, औषधालय, युद्धनौका, पाणबुडी... असे कितीतरी! आता बजेट ला पर्यायी म्हणून दिलेला 'अर्थसंकल्प' हा शब्द पहा.. अहाहा ! या शब्दात आर्थिक नियोजन नाही नुसते...तर त्याचा 'संकल्प' पण आहे! मराठी भाषेला अशा कित्येक शब्दांची देणगी सावरकरांनी दिली. बंदीतून मुक्तता
झाल्यानंतर पाचव्या दिवशी तिरंग्याचे ध्वजारोहण सावरकरांच्या हस्ते केले गेले,
त्यावेळी बोलताना, “हा राष्ट्रीय ध्वज आहे; तो हिंदूध्वजापेक्षा मोठा आहे आणि त्या
ध्वजाखाली उभा राहून जातीय वा धार्मिक भावना ठेवील तो पापी होय” असे म्हणणारे
स्वातंत्र्यवीर मला बुद्धिवादी सेक्युलर वाटतात. लोकशाही आणि धर्मनिरपेक्षता
याविषयी बोलताना अजमेर इथल्या भाषणात सावरकर म्हणतात, “आमचे पार्लमेंट अशा
स्वरूपाचे तयार होईल की त्या पार्लमेंटच्या आत पाय ठेवताच हिंदू, मुसलमान, पारशी
या भेदाचा मागमूसही राहणार नाही.” भारतीय संविधान तयार झाल्यावर “भारतीय
राष्ट्राचे खरेखुरे राष्ट्रीय स्वरूप सिद्ध करून दाखवल्याबद्दल मी तुमचे अभिनंदन
करतो” अशी तार घटना समितीच्या अध्यक्षांना तार करणारे सावरकर. ‘गायीला देवता मानणे’
हा गाढवपणा आहे अशा भाषेत धर्मश्रद्धेची चिकित्सा करणारे बुद्धीप्रामाण्यवादी सावरकर
पुढे जाऊन म्हणतात, “हा प्रश्न एका फुटकळ धर्मसमजुतीचा नाही. अशा धार्मिक छापाच्या
ज्या शेकडो खुळ्या समजुती आपल्या लोकांची बुद्धीहत्या करीत आहेत, त्या भाकड
वृत्तीचा आहे.”
तुम्हाला भावणारे, आवडणारे, भिडणारे सावरकर
कदाचित वेगळे असतील. पण या आणि अशा असंख्य उदाहरणांमधून प्रतीत होणारे प्रखर
बुद्धिवादी, ध्येयवादी, राष्ट्रप्रेमी स्वातंत्र्यवीर मला माझे वाटतात. आजच्या
सावरकर जयंतीच्या दिवशी, माझ्या सावरकरांनी लिखाण आणि वागणुकीतून जो लोकशाहीचा, बुद्धिवादाचा,
स्वतंत्र पद्धतीने प्रत्येकाने विचार करण्याचा आणि विज्ञाननिष्ठेचा जो संदेश दिला
आहे तो आपल्या समाजाच्या मनात ठसावा एवढीच सदिच्छा !