Monday, May 16, 2011

शहरीकरण, भारत, द होल अर्थ डिसिप्लीन इ. इ.

र्यावरणवादी, गांधीवादी, समाजवादी, सामाजिक कार्यकर्ते,  राजकीय नेते, शहर नियोजन तज्ञ आणि एकूणच सामान्य नागरिक शहरीकरणाला खूप विरोध करतात. वेगाने होत जाणारे शहरीकरण हा महाराष्ट्रासमोरचा आणि देशासमोरचाच एक मोठा प्रश्न होऊन बसला असल्याचे चित्र आहे.
"शहरीकरण म्हणजे प्रदूषण, शहरीकरण म्हणजे ढासळलेली नितीमत्ता, शहरीकरण म्हणजे माणसांचा गजबजाट, शहरीकरण म्हणजे ट्राफिक जाम, शहरीकरण म्हणजे आर्थिक विषमता, शहरीकरण म्हणजे आयुष्याचा प्रचंड वेग, शहरीकरण म्हणजे जीवघेणी स्पर्धा, शहरीकरण म्हणजे चैनबाजी.... एकूणच शहरीकरण म्हणजे वाईट.. तर याउलट खेडेगाव म्हणजे शुद्ध हवा, खेडेगाव म्हणजे परंपरा सांभाळणारा समाज, खेडेगाव म्हणजे वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न नाही, खेडेगाव म्हणजे ध्वनी प्रदूषण नाही, खेडेगाव म्हणजे संथ निवांत आयुष्य, खेडेगाव म्हणजे प्रामाणिकपणा, खेडेगाव म्हणजे नैतिकतेची खाणच! " अशी एक सामान्य समजूत आहे. या असल्या समजुतीला आपल्या बॉलीवूड सिनेमांनी आणि असंख्य कथा कादंबऱ्यांनी खत पाणीच घातलं. गावातून आलेला गरीब बिचारा भोळा मनुष्य हा कित्येक चित्रपटांचा हिरो आहे. शहरातल्या लोकांना असल्या गोष्टी पाहायला वाचायला उगीचच आवडतात. कदाचित असल्या गोष्टींमध्ये नकळतच त्यांच्या मनातील आदर्शवादी माणसाची काल्पनिक मूर्ती साकार होते.
माझ्या मते खेडेगाव म्हणजे भोळेपणा, सरळपणा, प्रामाणिकपणा या सगळ्या भंपक समजुती आहेत. माणूस इथून तिथून सगळीकडून सारखाच. शहरामध्ये टिकून राहण्याच्या स्पर्धेत माणूस आपोआपच स्वतःचे हित बघायला शिकतो. आणि त्यात काहीही गैर नाही...अगदी शंभर टक्के...! कारण शेवटी Survival हीच माणसाची नैसर्गिक प्रवृत्ती असते. त्यामुळेच खेडेगावान्मधेही माणसं एकमेकांवर कुरघोड्या करतात, जातीपातीचे समूह तयार करून स्वतःभोवती संरक्षक भिंत उभारायचा प्रयत्न करतात. यामुळेच खेड्यांमध्ये जाती चे राजकारण मोठे आहे. यामध्ये अशिक्षित असण्याचाही हातभार लागतो. आणि लोक अशिक्षित राहण्याचे कारणही तिथल्या लोकांना त्याची गरज न भासणं हे आहे. Survival साठी शिकणं आवश्यक असतं तर खेड्यातले लोक शिकले असते. पण शिकण्याने केवळ आयुष्य सुधारतं आणि त्याशिवायही माणूस जगू शकतो या विचाराने खेड्यात अशिक्षितपणा जास्त आहे. एकूण मुद्दा एवढाच की खेड्यातले लोक तेवढे चांगले असल्या भ्रामक समजुतीमध्ये कोणीही राहू नये.


कोणी कितीही काही केलं तरी शहरीकरण होतेच आहे. शहरांची वाढ बेसुमार होत आहे. खेड्यांमधून लोकांचे लोंढे शहरांकडे येतायत. रोजगाराच्या आशेने. कारण सांगितलं जातं की तिथे रोजगार उपलब्ध नाही म्हणून ते शहरात येतात. शहरांचा बकालपणा वाढतोय, झोपडपट्ट्या वाढतायत, गुन्हेगारी वाढते आहे. मग यावर उपाय काय? शहराकडे खेडेगावातील माणूस कधीच येऊ नये, यासाठी तिथल्या तिथेच स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करणे गरजेचे आहे, असा उपाय काही लोकांकडून सांगितला जातो. परंतु अशा पद्धतीने लोक खेडेगावातच अडकून पडतील. त्यांचे राहणीमान उंचावणार कसे? त्याहून महत्वाचे म्हणजे 'समृद्ध' कसे होणार?! म्हणजे खेड्यातला माणूस आणि शहरातला माणूस दोघेही जरी महिन्याला २०,००० रुपये कमावत असतील, तरी खेड्यातला माणूस रोज जेवणात पिठलं भाकरीच खाणार, पण शहरातला माणूस मात्र महिन्यातून चार वेळ विविध हॉटेल्स मध्ये जाऊन चायनीज, अमेरिकन, फ्रेंच, पंजाबी असं खाणार! किंवा शहरातला तरुण महिन्यातून किमान दोनदा पब मध्ये जाऊन मनसोक्त नाचतो किंवा शहरातील तरुणींना प्रचंड स्वातंत्र्य आहे पण खेड्यात मात्र मनसोक्त नाचायला तमाशा सोडून काही नाही. अशा अनेक गोष्टी. या एकदा खेड्यातल्या माणसाला कळल्या (आणि त्या कळणारच कारण टीव्ही खेड्यान्मधेही घराघरात पोचलाय) की त्याला शहराचे आकर्षण निर्माण होणार... ते कसे रोखणार??!!! यावर काही महाभाग असं सुचवतील की हेच स्वातंत्र्य, त्याचबरोबर हॉटेल्स वगैरे हे सर्व खेड्यातही असावं. म्हणजे त्या खेड्यात ते झालं की आजूबाजूच्या गावचे जिथे हे सगळं नसेल ते त्या खेड्यात येऊ लागतील, हळूहळू ते खेडे एक बाजारपेठ बनेल. त्यासाठी चकाचक रस्ते येतील. बाजारपेठ म्हणल्यावर व्यापारी येतील. दुकाने येतील. मग त्या खेड्याचे शहर व्हायला कितीसा वेळ लागणार?!! मग माझा प्रश्न असा आहे की असं झालं तर त्या खेड्याचं शहरीकरणच झालं की...!!!! मग शहरीकरण हा प्रकार रोखावा कसा?

अनेकदा मी यावर खूप सखोल विचार केला आहे.. आम्हा मित्रांमधेही यावर चर्चा झाली आहे. काही काही वेळा तर जेवा खायची शुद्धच राहत नसे, तासन तास चर्चा, वाद, विचारसरणी वरून चर्चा चालूच...!  विशेषतः मनसे च्या भूमिकेनंतर हे सगळं वाढलं. शहरांकडे येणारे लोंढे आणि त्यामागची मानसिकता. त्यातून उद्भवणारे 'मूळच्या लोकांच्या' नावाने होणारे राजकारण... तरीही हे सगळं कसं रोखावं, यासगळ्यावरचा उपाय काय हे मात्र उमगत नव्हतं... मध्यंतरी सहजच एक मासिक हाती पडलं आणि त्यामधला एक लेख वाचता वाचता त्यातले काही मुद्दे आणि माझे विचार असे एकदम नवीनच काहीतरी गवसले. तेच आज तुमच्यासमोर मांडावे वाटले म्हणून हा लेख...

स्टूअर्ट ब्रांड या विचारवंताने आपल्या ‘द होल अर्थ डिसिप्लीन’ (The whole earth Discipline) या नवीन पुस्तकामधून संपूर्ण शहरीकरणाचा विचार मांडला आहे. शहरीकरण हा प्रकार वाईट न मानता, शहरीकरणाला एक चांगली गोष्ट मानून त्याचे योग्य नियोजन करावे. आज जगातील आणि भारतातीलही ४५-५०% जनता शहरांमध्ये राहते. असा अंदाज वर्तवण्यात येत आहे की पुढच्या २० वर्षात हीच टक्केवारी साधारणपणे ८० च्या घरात पोचलेली असेल. याचा अर्थ शहरांचा भूभाग वगळता इतर भूभाग निर्मनुष्य असेल.. किंवा अत्यंत जास्त विरळ लोकसंख्येचा असेल. जर हे होणारच आहे तर त्या दृष्टीने नियोजन का करू नये? एका प्रचंड मोठ्या शहराच्या महानगरपालिकेचे केवळ प्रशासकीय दृष्टीकोनातून अनेक छोटे प्रभाग करावेत. आणि त्या प्रभागांना मर्यादित स्वायत्तता देऊन विकास आणि नियोजन करावे. त्यामुळे प्रशासकीय दृष्ट्या ते कठीण जाणार नाही. शहराचा विस्तार हा एखाद्या जिल्ह्याएवढा असावा. म्हणजे ७०-८० लाख लोक सहज मावू शकतील. अशा विस्तीर्ण जागी योग्य नियोजन करून शहरीकरण घडवून आणले पाहिजे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, पर्यावरणाच्या दृष्टीने आवश्यक गोष्टींचे काटेकोरपणे पालन करून शहराचे नियोजन झाले तर ही शहरे विद्रूप आणि घाण होणार नाहीत.  
८०% लोकसंख्या एकाच जागी एकवटल्याने अनेक फायदे होतील. सगळ्यात महत्वाचा म्हणजे विखुरलेल्या लोकसंख्येसाठी पायाभूत सोयीसुविधा निर्मितीवर होणारा अफाट खर्च कमी होईल. लांबच लांब कालवे खोदणे, कित्येक हजार किलोमीटर्स च्या विजेच्या लाईन्स टाकणे, हजारो किलोमीटर्स चे रस्त्यांचे आणि रेल्वेचे जाळे तयार करणे, विखुरलेल्या लोकसंख्येला सार्वजनिक वाहतुकीच्या सोयी उपलब्ध करून देणे अशा असंख्य गोष्टींवर होणारा अफाट खर्च कमी होईल. आणि हा पैसा अधिक रचनात्मक, नवनिर्मितीसाठी वापरता येईल. शहरीकरण अधिक व्यापक आणि नियोजन करून करणे शक्य होईल.
याशिवाय होणारा अजून एक फायदा म्हणजे शहरात ८०% जनता राहू लागली की उरलेली २०% जनता असेल शेतकरी..! यामुळे खेडेगावांमध्ये मुबलक प्रमाणात शेतजमीन उपलब्ध होऊन. सलग मोठ्या जमिनींच्या पट्ट्यांवर यांत्रिक शेती करून शेती उत्पादन वाढवणेही शक्य होईल. शिवाय प्रचंड मोठा भूभाग हा वनीकरण, वनसंवर्धन, अभयारण्ये यासाठी खुला राहील. अशा असंख्य ठिकाणी नियोजन करून पर्यटन व्यवसाय वाढवता येऊ शकतो. पर्यटनातून येणारे परकीय चलन आपल्या अर्थव्यवस्थेला उपयोगी पडणारे आहे. नियोजन करून बांधलेली धरणे, वनीकरण या प्रकल्पांमधून पर्यावरण संवर्धनाचे फार महत्वाचे कार्य होऊ शकते.
स्टूअर्ट ब्रांड याच्या शहरीकरणाच्या विचारांपलीकडे जाऊन मला भारताच्या संदर्भातही शहरीकरणाचा विचार पसंत पडतो. आज जे शहरे विरुद्ध खेडी असे चित्र सामाजिक क्षेत्रात आहे ते समूळ नष्ट होईल. याशिवाय कोणीही कितीही नाकारले तरी शहरांमध्ये भेदभावाच्या भिंती कमी आहेत. किमान व्यवहाराच्या पातळीवर तरी या भिंती आड येत नाहीत. साक्षरता आणि सुशिक्षितपणा यातला फरक महत्वाचा आहे. खेड्यांमध्ये साक्षरता आहे, शहरांमध्ये सुशिक्षितपणा वाढीस लागेल. आणि शिक्षणाच्या माध्यमातून समाज प्रगल्भ व्हायला मदत होईल.
राजकीय दृष्ट्या कोणत्याही पक्षाला आज मतदारांपर्यंत पोचायचे म्हणजे मोठाच प्रश्न असतो. प्रचारांमध्ये पाण्यासारखा पैशाचा अपव्यय होतो. आणि त्याचमुळे पैसा असलेलेच लोक राजकारणात सहभाग घेऊ शकतात. खऱ्या खुऱ्या लोकशाहीची वाटचाल ही शहरीकरणातून होऊ शकेल. शहरातच सामाजिक संस्था जास्त का असतात?! याचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे राजकीय दृष्ट्या आणि सामाजिक दृष्ट्या वाढीस लागलेली प्रगल्भता. दूर दूर वसणाऱ्या खेड्यांपर्यंत निवडणूक प्रक्रिया पोचवण्यासाठी निवडणूक आयोग आणि सरकारचा प्रचंड पैसा खर्च होतो. हा सगळा पैसा आणि याच्याशी निगडीत श्रम, हे सगळेच सुनियोजित शहरीकरणाच्या प्रयोगाने साध्य करण्यासारखे आहे.
कलेच्या दृष्टीने बघायला गेलं तर नाटक, संगीत, सिनेमा या क्षेत्रात सातत्याने नवनिर्मिती आणि प्रयोगशीलता ही शहरांमध्येच का दिसून येते?! याचे सगळ्यात महत्वाचे कारण म्हणजे शहरांमधला बहुसांस्कृतिक समाज! आणि याच कारणामुळे, या प्रचंड exposure मुळे शहरामध्ये स्वातंत्र्य असते, सहजता असते. भारतीय समाजाच्या दृष्टीने ब्रांड चे शहरीकरणाचे मॉडेल मला फारच आवडले.
यामध्ये सगळ्यात महत्वाचे आहे ते म्हणजे नियोजन.. planning... नियोजन शून्य शहरांची सध्याची परिस्थिती आपण पाहतोच आहोत. त्यामुळे शहरीकरणाच्या विचारांमध्ये नियोजन हा भाग गृहीत धरलेला आहे.
खरंच सुनियोजित शहरीकरणाने असंख्य प्रश्नांचा गुंता सुटू शकतो? मी कदाचित खूप वरवर विचार मांडला असेल. पण ही कल्पना मला विचार करायला लावणारी होती एवढे मात्र खरे. या लेखात मांडलेल्या विचारांमध्ये असंख्य त्रुटी असतील कदाचित.मी अस्सल शहरी मनुष्य आहे आणि मला शहरी जीवन मनापासून आवडते... म्हणूनही कदाचित मला ब्रांड चे विचार अधिक आवडले... पण अगदी त्रयस्थपणे विचार करायचा मी जेव्हा प्रयत्न केला तेव्हाही मला त्यात असंख्य गोष्टी आकर्षक दिसल्या.. पण यावर अधिकाधिक चर्चा व्हावी असे मला वाटते. म्हणूनच संपूर्ण लेख नीट वाचून आपल्या प्रतीक्रीयांपेक्षा (reaction) खरं तर  विचारपूर्वक मत (opinion) ऐकायला मला आवडेल...! कमेंट्स करून, ईमेल करून, एस एम एस करून आपली मतं मला जरूर कळवा..! माझी विचारधारा सुधारण्यासाठी, प्रगल्भ करण्यासाठी त्याचा उपयोगाच होईल..

Friday, May 6, 2011

हसायला पैसे पडत नाहीत...


हसणं ही एक विलक्षण गोष्ट आहे..मानव जातीला असलेलं ते एक वरदान आहे.
एखादी व्यक्ती हर्षा भोगले सारखी असते की ज्याच्या प्रसन्न हसण्याने सगळं वातावरणाच प्रसन्न होऊन जातं... काही जणांचं हसणं इतकं निर्मळ असतं की त्या निर्मळतेची भूल पडावी (वीस वर्ष सातत्याने खेळूनही, आजही विकेट पडल्यावर सचिन तेंडूलकर तितकाच निर्मळपणे कसा हसू शकतो?!!!)... काहींचं हसणं इतकं दिलखुलास की त्या मोकळेपणामुळे समोरचाही एकदम मोकळा होऊन जावा ('कौन बनेगा..' मध्ये अमिताभ समोरच्याला किती जास्त कम्फर्टेबल फील द्यायचा आठवतंय?! ).. एखाद्याचं खुनशी हास्य ज्यामुळे समोरच्याला कापरे भरावे (अमरीश पुरीचा कोणताही सिनेमा बघा यासाठी..).. कोणाचे लाचार हसणे- जे पाहून एखाद्याला तिडीक जावी (आजूबाजूला पहिले तरी हजारो उदाहरणे सापडतील)...एखादीच माधुरी नाहीतर मधुबाला जिच्या केवळ एका हास्यासाठी लाखो लोक दिवाने व्हावेत.. एखादीच मोनालिसा, जिच्या स्मित हास्यावर शेकडो वर्ष उलटली तरी लाखो पानं लिहिली जात आहेत, संशोधन होत आहे..!!!

सामान्यतः माणसं ओळखीचा माणूस समोर दिसला तर त्याच्याकडे पाहून हसतात आणि समोरचाही माणूस हसूनच प्रतिसाद देतो. जगात कुठेही गेलात तरी यामध्ये फरक पडणार नाही. कारण हीच माणसाची स्वाभाविक प्रतिक्रिया असते..! सत्ताधारी नामक एक वर्ग पूर्वीपासून जगात सर्वत्र आहे.. या वर्गाने 'शिष्टाचार' या नावाखाली निर्मळ आणि स्वच्छ हसण्याची फार गळचेपी केली आहे. ब्रिटीश लोक कधी काळी जगाचे सत्ताधारी असल्याने तिथे तर हे जरा अतीच आहे. उगीचच थोडसंच कसनुसं हसायचं किंवा हसताना आवाज करायचा नाही.. असल्या फालतू आणि फुटकळ शिष्टचारांमुळे अनेक जण मोकळेपणे हसणं विसरून गेले आहेत की काय असं वाटतं.. शिष्ठ मंडळींचा आचार म्हणजे शिष्टाचार अशी माझी शिष्टाचार ची व्याख्या आहे. माझ्या ओळखीत काही मंडळी आहेत, कदाचित त्यांच्या मते हसायला पैसे पडतात...! त्यामुळे रस्त्यात वगैरे दिसल्यावर ओळख दाखवायला आपण जरी हसलो तरी ही मंडळी चेहऱ्यावर मख्ख... किंवा फार फार तर ओळख दाखवणारी अल्पशी हालचाल, एखाद दुसरी सुरकुती पडेल चेहऱ्यावर इतकीच...!!! यामागे नेमके काय कारण असते हे मला कधीच न उलगडलेले कोडे आहे. लोक एकमेकांकडे बघून सहज हसत का नाहीत? 'समोरचा हसला तरच मी हसेन' असा विचार काहीजण करतात.. यामध्ये 'अहं'चा भाव आहे. तो चूकच असला तरी किमान समोरचा हसल्यावर तरी हे लोक हसतात..! पण काही लोक तुम्ही काहीही केलं तरी हसत नाहीत. यामध्ये त्यांना कमीपणा वाटत असावा. पण अशा मंडळींचं जरा निरीक्षण केल्यावर मला जाणवलं ते म्हणजे ते स्वतःच्या अत्यंत जवळच्या मित्रांमाधेही अतिशय थोडं अर्धवट आणि मोजकं हसतात... एखाद्या कद्रू मारवाड्याने पै पै खर्च करताना करावा तसा विचार हे लोक एखाद्या सेकंदाच्या हसण्यासाठी करतात. "याच्याकडे पाहून हसल्याने माझा काही फायदा होणार आहे का?" असा विचार हे लोक करत असतील का?? असा विचार जर कोणी करत असतील तर ते महामूर्ख आहेत असं माझं ठाम मत आहे. कारण फायदा नसला तरी तोटाही नसेल तर छान प्रसन्न हसायला काय जातं?? असो.. या लोकांच्या शिष्ठपणाला कोण काय करणार?! आपण मात्र यांच्याकडे बघून हसायचे आपले व्रत सोडू नये. कारण मुळात हसणे फुकट असल्याने त्यांनी प्रतिसाद न दिल्याने आपले हास्य फुकट गेले असेही आपल्याला म्हणता येत नाही...!!! 

हसल्यामुळे तब्येत उत्तम राहायला फायदा होतो असं डॉक्टर म्हणतात... असेल बुवा..! आमच्या दिलखुलास हसण्याने आमचीच तब्येत चांगली राहात असेल तर काय वाईट आहे! शिवाय हसण्याने मानसिक आरोग्य सुधारते असंही म्हणतात. 
माझा एक मुंबई मधला मित्र आहे, म्युझिक अरेंजर आहे. दिवसातले १२-१४ तास तो कामात असतो. कामाचा थकवा तर येतोच. पण कामाच्या ठिकाणी असलेल्या मंडळींनाही खूप वेळच्या कामामुळे खूप ताण पडतो. अशा वेळी हा पठ्ठ्या आपल्या धमाल विनोद बुद्धीच्या सहाय्याने सगळं वातावरण सतत हसवत ठेवतो. तुफान विनोदांमुळे वातावरण हलकं फुलकं राहून थकवा कमी होतो आणि शिवाय कामही अतिशय उत्तम होतं असा त्याचा अनुभव आहे. 
सचिन तेंडूलकर एकदा एका मुलाखतीत म्हणला होता, "टीम मध्ये धमाल वातावरण ठेवणारे दोन खेळाडू आहेत एक युवराज आणि दुसरा हरभजन. हे दोघे सतत इतरांची थट्टा करणे खोड्या काढणे अशा गोष्टी करून टीम ला हसवत राहतात. ड्रेसिंग रूम मधेच आम्ही इतके मस्त वातावरणात असतो की साहजिकच त्याचा उत्कृष्ट परिणाम आम्हाला खेळताना दिसून येतो." 
माझ्या एका मित्राच्या घरातले त्याच्यासह सर्व जण जाड..! पण त्यांच्या घरातले सर्व जण स्वतःच्या जाडीवर दिलखुलासपणे विनोद करतात आणि हसतात...! इतकं की शेवटी अनेकदा लोकच म्हणतात, "एवढे काही तुम्ही जाड नाही..!" स्वतःच्या व्यंगांवर, कमीपणावर, चुकांवर मोकळेपणे हसता येणं हे प्रगल्भपणाचे लक्षण आहे. घसरून पडणाऱ्याला सगळेच हसतात... आणि जरूर हसावे त्यात काहीच चूक नाही..!! स्वतः घसरून पडल्यावरही स्वतःवर हसता यायला हवे..! कधी कधी लोक आपल्याला हातोहात मूर्ख बनवतात.. अशा घटना प्रत्येकाच्या बाबतीत घडतात. त्या त्या वेळी आपण चिडतो संतापतो (ती प्रतिक्रिया असते!) पण नंतर मात्र आपल्याला किती सहज एखाद्याने फसवावे यावर हसता यायला हवे. नंतर आयुष्यभर उगीचच ती घटना आठवत चिडण्यात काय अर्थ आहे? त्यापेक्षा त्यावर हसून त्या आठवणींवर मनसोक्त हसावे, स्वतःची थट्टा करावी.. यामुळे किती समाधान मिळते हे आपल्यालाच जाणवेल. 
यासंबंधी एक किस्सा आठवतो मला. माझी मावशी सांगलीची. तिचे आजोबा फार सज्जन आणि सरळ माणूस. ते सांगलीतल्या एका दत्त मंदिराचे विश्वस्त होते. एक दिवस त्यांच्याकडे एक कोणीतरी 'महाराज' आले आणि म्हणले मी देवाचाच अवतार. बरेच दिवस त्यांनी फुकट पाहुणचार झोडला. पंचक्रोशीतून लोक त्यांच्या दर्शनाला यायचे. एक दिवस त्यांनी सांगितले की जाऊन मंदिरात नारळ फोडा आणि दत्त महाराज स्वतः तुम्हाला दर्शन देतील. मावशीचे आजोबा आणि असंख्य लोक मंदिरात गेले आणि नारळ फोडला. लोकांनी भिंग लावून लावून दत्त दिसतो का पहिले. पण उत्तम खोबऱ्याव्यतिरिक्त आत काहीच नव्हते. मंडळी घरी येऊन पाहतात तर काय? ते महाराज पसार झालेले...!! घरातल्या त्या वेळच्या सर्व मंडळींच्या (स्वतःच्या आजोबांसकट) बावळटपणावर मावशी आणि आम्ही सगळेच नेहमी मनसोक्त हसतो...!! 

"दैनिक सकाळ"ने एकदा १०,००० हसणाऱ्या लोकांच्या फोटोंचं प्रदर्शन लावलं होतं. मला त्यांच्या या विलक्षण प्रदर्शनाचं प्रचंड कौतुक वाटलं होतं. अगदी सामन्यातला सामान्य माणूस त्या फोटोंमध्ये होता (माझाही फोटो होता त्या प्रदर्शनामध्ये). रस्त्यावर फिरून फिरून पुण्यातल्या विविध भागात जाऊन हे फोटो काढण्यात आले होते. त्या प्रदर्शनात एक फेरफटका मारला तरी विलक्षण वाटत होतं.. जिकडे पाहू तिकडे हसणारे चेहरे..! अहाहा... सामान्य लोकांच्या हसण्याचा असामान्य अविष्कार होता तो... कितीतरी लोकांच्या नकळत त्यांचे फोटो टिपण्यात आले होते. लहान बाळांपासून ते सुरकुत्यांच्या जाळ्या चेहऱ्यावर असलेल्या वृद्ध मंडळींपर्यंत सर्व जण मस्त हसतायत...!!! 

रंग दे बसंती मध्ये ब्रिटीश पोलीस अधिकाऱ्याच्या तोंडी एक डायलॉग आहे, 'मला दोनच प्रकारे मरणाऱ्या व्यक्ती माहित होत्या. एक जे आरडा ओरडा करत मरतात आणि दुसरे जे शांतपणे मरतात, पण मग माझी तिसऱ्या प्रकारच्या व्यक्तींशी भेट झाली. जे हसत हसत मरणाला सामोरे गेले... " 
माणसाच्या आयुष्यात अडचणी आणि दुःखाचे क्षण येतंच असतात. पण अशा वेळी उदास चेहरा केल्याने अडचणीतून मार्ग सापडणार असतो काय?? मग त्यापेक्षा सदा हसतमुख राहिल्याने जर स्वतःबरोबर इतरांनाही आनंद मिळणार असेल तर त्यात वाईट काय..!! 

मला कधी कधी चार्ली चाप्लीन, लॉरेल हार्डी, मिस्टर बीन, आर के लक्ष्मण, परेश रावल, मेहमूद, जॉनी लिव्हर, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, प्रशांत दामले आणि सर्व विदुषक लोक या मंडळींचं विलक्षण हेवा वाटतो.. जगाला हसवण्याचं काम हे फार मोठं काम आहे. स्वतःची दुःखं चिंता बाजूला ठेवून लोक यांच्याकडे पाहून मनसोक्त हसतात... केवढं मोठं काम... केवढे उपकार या मंडळींनी जगावर केले आहेत. सातत्याने जगाला हसत ठेवले आहे. 

हसायला पैसे पडत नाहीत. हसल्याने कोणतेही नुकसान होत नाही. तेव्हा हसताना कंजूषी करणे बंद करूया.. शिष्ठपणा सोडून देत दिलखुलास आणि मोकळेपणे हसायला शिकूया... 
'चिंटू'चं एक पोस्टर होतं माझ्याकडे- "मला हसायला आवडतं, तुम्हाला?"...!!!! 

मला खरंच हसायला खू SSSSSS प आवडतं...! तुम्हाला?? 

Sunday, May 1, 2011

फ्लेक्स, होर्डींग्स इत्यादी इत्यादी...


पुण्यातली काही मंडळी "फ्लेक्स आणि होर्डींग्स मुळे शहर कुरूप होते..." अशी बोंब अधून मधून मारत असतात... आणि काही वर्तमानपत्रे याला प्रसिद्धीही देतात... आणि या सगळ्याचा परिपाक म्हणजे नुकतेच पुणे महापालिकेने नवीन होर्डींग्स पॉलिसी अंमलात आणायचे ठरवले आहे. त्याला विरोध वगैरे होतोच आहे... पण मुळात होर्डींग्स मुळे शहर कुरूप होते ही गोष्ट महापालिकेने मान्यच केल्यासारखे झाले आहे. या मंडळींनी एकदा शहराच्या कुरुपतेची व्याख्या केली पाहिजे.. माझ्यापुरतं म्हणायचा झालं तर स्वच्छता नसलेलं, आणि हिरवगार नसलेलं शहर म्हणजे कुरूप शहर... यामध्ये होर्डींग्स आणि फ्लेक्समुळे काहीच फरक पडायचं कारण नाही... बहुतेकांचा असा आक्षेप असतो की कोणताही अन्या गन्या पप्पू आपल्या वाढदिवसाचा फ्लेक्स गल्लीच्या तोंडाशी लावतो... हा खासा न्याय आहे... म्हणजे गल्लीतल्या पप्पू ने फ्लेक्स लावला तर ते नको पण अजित पवारने लावला तर चालेल??? 
होर्डींग्स हे भांडवली आणि मुक्त अर्थव्यवस्थेचा अविभाज्य घटक आहे. त्यामुळे त्याला नाक मुरडून कसं चालेल? 
फ्लेक्स हे लोकांपर्यंत पोचायचं एक प्रभावी मध्यम आहे. आजकाल राजकीय पक्षांसमोर असलेला अत्यंत मोठा महत्वाचा प्रश्न म्हणजे सातत्याने स्वतःचे अस्तित्व दाखवून देणे... त्यासाठी फ्लेक्स चा उपयोग होतो... नेत्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने का होईना आपले नगरसेवक निवडणुकां व्यतिरिक्तही आपल्याला दिसतात...! अनेकदा "शुभेच्छुक" मध्ये असणारे छोटे मोठे कार्यकर्ते माहित होतात. त्यांची पदं सुद्धा माहित होतात. कोण या वॉर्ड च्या पक्ष कार्यकारिणीचा सदस्य आहे आणि कोण याच ठिकाणचा पक्षाच्या युवक शाखेचा अध्यक्ष आहे असल्या फालतू फुटकळ पण विलक्षण मनोरंजक गोष्टीही फ्लेक्स मधूनच कळतात...! इतकेच नव्हे या फ्लेक्स च्या निमित्तानेच कोणता पक्ष वेगवेगळी निमित्ते काढून सातत्याने काही न काही कार्यक्रम भरवत असतो. (सगळ्याची सुरुवात मकर संक्रांत उत्सव, मग २६ जानेवारी, शिवजयंती उत्सव, त्यानंतर महाशिवरात्री, पाडवा, राम नवमी, आंबेडकर जयंती, महाराष्ट्र दिन, वट पौर्णिमा, मग १५ ऑगस्ट, दही हंडी, त्यानंतर हक्काचा गणेशोत्सव, नवरात्री, दसरा, दिवाळी, दत्तजयंती, २५ डिसेंबर... याव्यतिरिक्त प्रत्येक पक्षाच्या वर्धापनदिनाचे महोत्सव, त्या पक्षाच्या नेत्यांचे वाढदिवस व त्याबद्दल उत्सव इत्यादी इत्यादी...) या कार्यक्रमांच्या आयोजनातून आपल्याला लक्षात येते की राजकीय पक्षांकडे केवढा पैसा आहे... राजकीय पक्षांना आपले देणगीदार जाहीर न करण्याची मुभा असते. त्यामुळे राजकीय पक्षांकडे नेमका पैसा कुठून आणि कसा येतो, कुठे कुठे किती खर्च होतो याविषयी सामान्य माणूस कायमच अंधारात राहतो. पण या फ्लेक्स च्या निमित्ताने किमान या पक्षांची खर्च करण्याची क्षमता केवढी अवाढव्य आहे याची प्रचीती येते.. शिवाय वर्षभर फुकट चार धाम यात्रा, अष्टविनायक दर्शन असल्या गोष्टी चालूच असतात, त्या विषयीही माहिती फ्लेक्स मधूनच कळते. सामान्य ज्ञान वाढवणारी इतकी सोपी आणि साधी गोष्ट सामान्य माणसाला कशी उपलब्ध होणार?!! आणि तेही सगळे फुकट...!!! त्यामुळे फ्लेक्स वर आगपाखड करणे थांबवण्यात यावे... 
स्वतःच्या वाढदिवसाचे फ्लेक्स लावण्याबरोबर जनहितार्थ फ्लेक्स लावणारेही काही लोक आहेत त्यांचे विशेष कौतुक करावे वाटते. कोथरूड मधील नगरसेवक मुरलीधर मोहोळ यांनी पौड रोड येथे चालू भुयारी मार्गाची तपशीलवार माहिती, अगदी नकाशा व डिझाईन सकट त्या कामाच्या शेजारीच फ्लेक्स वर छापली आहे. फ्लेक्स वगैरे गोष्टींचा असाही फायदा करता येतो याचे एक उदाहरणच नगरसेवक मुरलीधर मोहोळ यांनी घालून दिले आहे. त्यामुळे उठसुठ फ्लेक्सला नावं ठेवणे बंद करावे असे मला वाटते. 

होर्डींग्स हा आपल्या दैनंदिन शहरी जीवनाचाच एक भाग आहे. टीव्ही वर जाहिराती नकोत असे म्हणून चालेल का? किंवा फ्लेक्स विरुद्ध बोंब मारणाऱ्या वर्तमानपत्रांनी आपल्या जाहिराती काढून टाकल्या तर चालेल का...?? मग शहरातून होर्डींग्स वर असलेल्या जाहिरातींवरच एवढा राग का? या जाहिराती आपल्याला कितीतरी गोष्टींबद्दल माहिती देतात... होर्डींग्स शिवाय "अमूल"चे खुमासदार शेरे आपल्यापर्यंत सहजपणे कसे पोचले असते?!! बिग बझार मध्ये सेल लागलाय इथपासून ते ज्वेलरी शॉप मध्ये नवीन दागिने आले आहेत इथपर्यंत, किंवा नवीन टीव्ही च्या मॉडेल प्रमाणेच नवीन गाडीचे मॉडेल होर्डींग्स मधूनच आपल्यापर्यंत पोचत असते.. सिग्नल ला थांबल्यावर आजूबाजूची होर्डींग्स न्याहाळणे ही माझी आवडीची गोष्ट आहे. अलका थिएटर च्या चौकात तर कितीतरी होर्डींग्स, सिग्नल वरची १-२ मिनिटे सहज निघून जातात...!! या होर्डींग्स मधून कित्येक गोष्टी आपल्या पर्यंत पोचतात... एखादेच वेगळे होर्डिंग आपले लक्ष वेधून घेते... अशा या होर्डींग्सच्या रंगबेरंगी दुनियेत कुरूप काय आहे ते मला कळतंच नाही...! 
फ्लेक्स आणि होर्डींग्स बाबत सध्या असलेले नियम आणि शुल्क समाधानकारक आहे.  याबाबतची शुल्क आकारणी व परवानगी महापालिकेचे आकाश चिन्ह विभाग देते. फ्लेक्स साठी एक आठवड्याची परवानगी देऊन तेवढ्याच कालावधीसाठी शुल्क आकारले जाते. हे शुल्क सध्या बऱ्यापैकी आहे. १० X १० चा फ्लेक्स लावायला सुमारे ८०० रुपये शुल्क भरावे लागते. यापेक्षाही शुल्क कमी केल्यास हरकत नाही. फ्लेक्स आणि होर्डींग्स यामधून महापालिकेला प्रचंड उत्पन्न मिळू शकते. सध्या महापालिका तुटीचे अर्थसंकल्प मांडत असताना अशा प्रकारच्या पूरक उत्पन्न स्त्रोतांचाही विचार महापालिकेमध्ये व्हायला हवा. 
थोडक्यात काय, काही मंडळी बोंबाबोंब करतात म्हणून या गोष्टी वाईट ठरत नाहीत. यामुळे शहर मुळीच कुरूप होत नाही, उलट झाला तर महापालिकेचा फायदाच होतो...
फ्लेक्स आणि होर्डींग्स या गोष्टींकडे नकारात्मक दृष्टीने न बघता सकारात्मक दृष्टीने बघायची गरज आहे.. आणि खरे सांगायचे तर त्यांची मजा लुटायलाही आपण शिकायला हवे...