Monday, December 25, 2017

मैं भी पोस्टमन, तू भी पोस्टमन...

“...पोस्टमन म्हणजे, मजकुरातून अगदी अलिप्त राहून, माणूस म्हणजे फक्त पत्त्याचा धनी एवढंच ओळखतात...पोस्टाचं देवासारखं आहे. पोस्टमन देईल ते आपण निमूटपणे घ्यावं. देणारा तो, घेणारे आपण. शेवटी काय हो, आपण फक्त पत्त्यातल्या नावाचे धनी, मजकुराचा मालक निराळाच असतो.”
- ‘माझे पौष्टिक जीवन’, पु.ल.देशपांडे.

पुलंच्या इतर अनेक लेखनाबरोबर या ‘माझे पौष्टिक जीवन’ची कितीतरी पारायणं आपल्यातल्या
अनेकांनी केली असतील. मला आठवतंय, पहिल्यांदा मी हे वाचलं होतं तेव्हा ‘गर्दी बघत किंवा रस्त्यातली मारामारी बघत उभा पोस्टमन मी कधीही बघितलेला नाही. एकवेळ पोलीस उभा दिसेल पण पोस्टमन आपलं काम करत असतो’ हे वाक्य वाचल्यावर कित्येक दिवस मी पोस्टमन मंडळींचं बारकाईने निरीक्षण केलं होतं. आणि खरोखरच सदैव पत्र पोचती करायला सायकल मारणारे पोस्टमन बघून मला त्यांच्याविषयी विशेष आदर वाटला होता.

अर्थात पंधरा वीस वर्षांपूर्वीची ही आठवण डोक्यात यायचं काही कारण नव्हतं. पण एकामागोमाग घडणाऱ्या घटना, समोर येणाऱ्या धक्कादायक गोष्टी यामुळे पोस्टमन मंडळींची आठवण आली. पण आता मला आधीसारखा आदर न वाटता भीतीच वाटू लागलीये. कारण पोस्टमन बदललेत. म्हणजे आपले पोस्टाचे पोस्टमन अगदी आधीसारखेच असतीलही. पण सोशल मिडियावरच्या पोस्टमन मंडळींनी कोणत्याही विचारी माणसाच्या मनात अक्षरशः दहशत निर्माण केली आहे. आपल्याला नेमकं झालंय तरी काय? आपल्यापर्यंत फेसबुक-ट्विटर आणि त्याहीपेक्षा व्हॉट्सअॅपमार्फत पोहचणारी प्रत्येक गोष्ट पुढे कोणाकडे तरी पाठवण्याची पोस्टमनची ड्युटी करण्याचा आपण आटापिटा का करतो? आपल्या सगळ्यांना पोस्टमन का व्हावंसं वाटतंय हा प्रश्न गेले अनेक दिवस माझ्या डोक्यात घर करून आहे.
सोशल मिडिया आणि इंटरनेट या गोष्टी लोकशाहीला मजबूत करणाऱ्या आहेत, यामुळे सामान्य माणसाला व्यक्त होण्याचा, आवाज उठवण्याचा मार्ग मिळेल आणि यातून लोकशाही सुदृढ होईल असा एक भाबडेपणा माझ्यात परवा परवापर्यंत होता. लोकांना व्यक्त होण्याची संधी मिळाल्याने काही चूक घडलंय असं नव्हे. पण स्वतः व्यक्त होण्यापेक्षा, दुसऱ्या कोणाचंतरी व्यक्त होणं खऱ्याखोट्याची शहानिशा न करता अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचवणं यातून एक मोठाच राक्षस पैदा झाला आहे. सोशल मिडियाच्या सुरुवातीच्या काळात गांधीजी-नेहरू यांच्याबद्दल कित्येक खोट्यानाट्या गोष्टी, फोटोशॉप केलेली छायाचित्रे पसरवली गेली होती. कोणाकडून पसरवली गेली? तर या नव्या पोस्टमन मंडळींनी कसलाही पुढचा मागचा विचार न करता या गोष्टी बेधडकपणे पुढे धाडून दिल्या. हळूहळू इतर विचारधारांचे लोकही या नव्या माध्यमांना सरावले, या राक्षसाच्या ताकदीची त्यांना कल्पना आली आणि मग त्यांच्याकडूनही साफ साफ खोट्या गोष्टी अतिशय सराईतपणे सोशल मिडियावर टाकल्या जाऊ लागल्या. नव-पोस्टमन वर्गाकडून त्या सर्वदूर पोचतील याची तजवीज केली गेली. मंत्री-लोकप्रतिनिधी यांनीही वेगवेगळ्या वेळी आपल्याकडून या सगळ्यात हातभार लावला. परदेशातल्या शहरांचे किंवा विकासाचे फोटो आपल्या कामगिरीचे कौतुक म्हणून या मंडळींच्या चक्क अधिकृत सोशल मिडिया खात्यांवरून शेअर केले गेले. लोक पोस्टमन बनू बघत असतील तर ते आपलेच प्रतिनिधी नाहीत का?! त्यामुळे तेही पोस्टमनसारखेच वागले, त्यात आश्चर्य काय? कोणताही राजकीय पक्ष, कोणतीही राजकीय विचारधारा आज या उद्योगांत नसल्याचं दिसून येत नाही. खोट्याचा एवढा प्रचंड महापूर याआधी कधी होता काय आपल्या आयुष्यात?
फेसबुक-ट्विटरच्या ज्या काही थोड्या मर्यादा होत्या त्या व्हॉट्सअॅपने पार मोडीत काढल्या. परवाचा किस्सा सांगतो. एका व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये, ज्यावर सुमारे सव्वाशे लोक आहेत, एका माणसाने एका महापुरुषाच्या पुस्तकातला एक उतारा टाकला. एका विशिष्ट जातीच्या मंडळींवर तोंडसुख घेणारा तो मजकूर आणि त्यासोबत पुस्तकाचे नाव आणि पान क्रमांक इत्यादी तपशीलदेखील दिलेले होते. मजकूर अगदी खरा भासावा, अशा पद्धतीने संदर्भ वगैरे देण्यासह काळजी घेतली गेली होती. परंतु, त्या मजकुराची पहिली तीन-चार वाक्ये सोडली तर पुढचा बहुतांश मजकूर मूळ पुस्तकात नव्हताच. किंबहुना मूळचा मजकूर वाचल्यास त्यातून पूर्णपणे वेगळा अर्थ निघत होता. काही अभ्यासू मंडळींनी पुस्तकाच्या त्या पानांचे फोटोच त्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर शेअर केल्याने हा खोटेपणा उघड झाला. पण असे कितीवेळा घडते? केवळ पोस्टमन बनण्याच्या एका व्यक्तीच्या अनिवार ओढीमुळे किती नुकसान होऊ शकते याचं हे छोटं उदाहरण आहे. बरे, हे सगळे पोस्टमन पुलंच्या पोस्टमनसारखे अलिप्त नसतात. ते जो मजकूर पोचवतात तो वाचून त्यांचं पित्त खवळलेलं असतं. एखाद्या व्यक्तीबद्दल किंवा व्यक्तीसमूहाबद्दल पराकोटीचा द्वेष वाटू लागतो. याच भावनिक अवस्थेत त्याला असेच इतर अनेक शहानिशा न केलेले अर्धवट, संदर्भ सोडून पाठवलेले मजकूर अन्य पोस्टमनकडून मिळत राहतात. आणि हळूहळू त्याच्या मनातला कडवटपणा भीतीदायक अवस्थेला जाऊन पोचतो. डोळ्यांवर चष्मे चढतात, माणसांना लेबलं चिकटतात आणि माणूस माणसापासून दुरावतो. या अशा वातावरणात सामाजिक सहिष्णुता जपावी तरी कशी? कोणत्याही स्फोट होऊ शकेल असं ठासून दारुगोळा भरलेलं कोठार झालंय आपलं मन, शांतता कशी मिळेल?

हे प्रकार फक्त राजकीय मुद्द्यांपाशी थांबत नाहीत. सणांना शुभेच्छा देणारे संदेश, रोज न चुकता पुढे ढकलले जाणारे ‘शुभ सकाळ’, ‘शुभ रात्री’ असले संदेश याबरोबरच संपूर्णतः चुकीचे वैद्यकीय सल्लेही शहानिशा न करता पुढे पाठवले जातात ही गोष्ट एखाद्याच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार होऊ शकते याचा विचार केला जातो का? ही असली पोस्टमनगिरी करताना आपण आपले मेंदू नेमके कुठे गहाण टाकलेले असतात हे मला काही उलगडत नाही. एखाद्या अभिनेत्याच्या मृत्यूची बातमी आपण तत्काळ पोस्टमन बनत पुढे ढकलून देतो आणि प्रत्यक्षात असे काहीही न घडल्याचे दिसून येते तेव्हा स्वतःच्या कृत्याची किमान लाज वाटण्याची संवेदनशीलता आपल्यामध्ये उरली आहे की नाही? ‘अमुक अमुक लेख माझ्या नावे व्हॉट्सअॅपवर फिरतोय परंतु तो मी लिहिलेला नाही’ अशा आशयाचा खुलासा देण्याची वेळ किती वेळा आणि किती लोकांवर आपण आणणार आहोत? ‘आयुष्यात लवकर उठणे का योग्य आहे इथपासून ते आपल्या पूर्वजांनी लावलेले शोध’ इथपर्यंत अनेक बाबतीतलं नाना पाटेकर आणि विश्वास नांगरे पाटील यांचं म्हणणं मला व्हॉट्सअॅप मेसेजमधून मिळालं आहे. म्हणजे म्हणणं भलत्याच कोणाचं तरी आणि खाली नाव मात्र नाना किंवा नांगरे-पाटलांचं असा सगळा उद्योग. काही मंडळी, ‘आला तसा फॉरवर्ड केला आहे’ अशा आशयाची ओळही लिहितात. त्यातून काय साध्य होतं नेमकं? खरं-खोटं याची शहानिशा न करता मी आलं ते पुढे ढकलण्याचा बिनडोकपणा आपण केला आहे एवढंच काय ते ही मंडळी आपण होऊन जाहीर करत असतात. काय मिळवतो आपण या असल्या बिनडोक उद्योगांतून?

गेल्या वर्षी झालेल्या अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत रशियाने सोशल मिडियाच्या माध्यमातून हस्तक्षेप केल्याचं आता उघड झालंय. रशियाने पसरवलेल्या चुकीच्या माहितीचा प्रसार तब्बल १४६ मिलियन म्हणजे तब्बल १४.६ कोटी फेसबुक युझर्सपर्यंत पोचलं असू शकेल असं खुद्द फेसबुकनेच मान्य केलंय. युट्यूबवर ११०६ व्हिडीओज् आणि तब्बल छत्तीस हजार पेक्षा जास्त ट्विटर खाती यांची पाळेमुळे रशियात आहेत ज्यांचा चुकीची माहिती पसरवण्यात वाटा आहे.[1] आणि हे सगळं तर अजून हिमनगाचं केवळ टोक आहे. द इकॉनॉमिस्टच्या लेखात एक छान वाक्य आहे- ‘रशियाने अमेरिकेवर हा हल्ला केल्यावर अमेरिकन लोक आपापसांत, एकमेकांवर हल्ले करण्यात मग्न झाले.’ मागे कधीतरी एकदा गणपतीच्या मूर्तीची विटंबना केल्याची अफवा पसरून पुण्यात वातावरण तंग झालं होतं. त्यावेळी माझ्या डोक्यात विचार आला होता, ‘एक समाज म्हणून आपल्याला आपापसांत झुंजवणं किती सोपं झालंय!’ आज तर सोशल मिडिया आणि तमाम पोस्टमन मंडळींमुळे आपण अजूनच हतबल झालोय. द डार्क नाईट सिनेमातला जोकर म्हणतो ना, “मॅडनेस इज लाईक ग्रॅव्हिटी, ऑल यू नीड इज लिट्ल पुश!”. फक्त एक छोटासा धक्का द्या, सगळा वेडेपणाचा धोंडा गडगडत अंगावर येईल, अशी अवस्था झालीये आपली.

मला वाटतं आपल्या देशातल्या या सगळ्या बदलांकडे बघताना लोकपाल आंदोलन हा एक महत्त्वाचा टप्पा मानायला हवा. लोकपाल आंदोलनात सामील झालेल्या हजारो लोकांनी मोठ्या अभिमानाने आणि एक प्रकारे आशेने ‘मैं हूँ अण्णा’ लिहिलेली टोपी घातली होती. ‘मैं भी अण्णा, तू भी अण्णा, अब तो सारा देश है अण्णा’ ही घोषणा दुमदुमली होती. तेव्हापासून हळूहळू, सोशल मिडियाच्या राक्षसाला खाऊ-पिऊ घालत, पोस्टमन बनून ताकद देत मोठं केलंय. ‘मैं भी पोस्टमन, तू भी पोस्टमन, अब तो सारा देश है पोस्टमन’ इकडे आपण वेगाने वाटचाल केलेली आहे. पण आता हे रोखायला हवं. हा जो नव-पोस्टमनवर्ग तयार झाला आहे त्याला रोखायला हवं. सुरुवात स्वतःपासून करूया. इंडियन पोस्ट खातं आणि त्यांचे सगळे पोस्टमन उत्तम काम करत आहेत आणि आपण रेम्या डोक्याची पोस्टमनगिरी करण्याची मुळीच आवश्यकता नाही हे समजून घेऊयात. कोणताही व्हॉट्सअॅप-फेसबुक-ट्विटर किंवा अन्य कोणत्याही सोशल मिडिया वरचा मजकूर, शक्य तेवढी सर्व शहानिशा केल्याशिवाय, पुढे ढकलण्याचा गाढवपणा न करण्याचा निश्चय करूयात. एवढं साधं पहिलं पाउल तरी उचलता येईल ना आपल्याला? प्रगल्भ समाजासाठी आपल्याला हे करावंच लागेल.

(दि.  २५ डिसेंबर २०१७ रोजी प्रकाशित झालेल्या 'साप्ताहिक विवेक'मध्ये प्रसिद्ध. http://www.evivek.com/)



[1] https://www.economist.com/news/leaders/21730871-facebook-google-and-twitter-were-supposed-save-politics-good-information-drove-out?cid1=cust/ednew/n/bl/n/2017112n/owned/n/n/nwl/n/n/ap/77921/n