Saturday, February 26, 2011

म्हणून...

'परिवर्तन' कशासाठी?
कोणीतरी विचारले -

हम दो हमारे दो,
चौकोनी कुटुंब
चौकटीतच राहिले,
म्हणून...

'आपण सामान्य' म्हणत
गुंड, पुंड, झुंडीला
घाबरले,
म्हणून...

राजकारण नको
म्हणणारे वाढले,
राजकारण करू
म्हणणारे 'काढले',
म्हणून...

'चलता है'
म्हणणारे वाढले,
'नहीं चलेगा'
म्हणणाऱ्यांना मारले,
म्हणून...

'खाणे' अगदी
नित्यनेमाचे झाले,
निमित्त काढून 'पिणे'
रोजचेच झाले.
खाण्यासाठी 'नोटा'
पिण्यासाठी 'धान्य'
सारे सोयीचे झाले,
म्हणून...

टू जी - थ्री जी
राष्ट्रकुल-बिष्ट्रकुल
'खेळ' केले,
म्हणून...

बदला म्हणून
बदल्या झाल्या,
इमानी लोक
शून्य उरले,
म्हणून...

वेळेला चहा लागतो,
वेळ साधण्यासाठी 'चहा पाणी'
सवयीचे झाले,
म्हणून...

इतिहास खोडून
नवा लिहिला,
भविष्यकाळ नव्याने
जुनाच लिहिला,
म्हणून...

'भाऊ' 'आबा'
'दादा' 'बाबा'
या सगळ्यांवर 'साहेब'
उदंड झाले,
म्हणून...

लढतो म्हणणारा
ठार झाला
उघडकीस आणणारा
गायब झाला
तरी सगळे गप्पच बसले,
बाकी जाऊ द्या हो, पण
षंढ थंड लोक पाहून
डोकेच फिरले,
म्हणून...

तन्मय कानिटकर
२५/०२/२०१०

Monday, February 14, 2011

लोकशाहीची भिंत...

चीनच्या राजधानीमध्ये बीजिंगमध्ये त्याननमेन चौकात एका बाजूला पोस्ट ऑफिस आहे. त्याची मोठीच्या मोठी भिंत त्यानानमेन चौकाला लागूनच आहे. १९७९ साली अचानक या भिंतीला विलक्षण महत्व आले.... असंख्य लोक या भिंतीवर येऊन पोस्टर्स चिकटवू लागले.. चित्र काढू लागले संदेश लिहू लागले... कम्युनिस्ट राजवटीत दबल्या गेलेल्या सर्जनशीलतेला मुक्त द्वार मिळाल्याप्रमाणे लोक या भिंतीवर आपल्या मनातल्या गोष्टी लिहू लागले... चीन सारख्या कट्टर कम्युनिस्ट देशातले लोक या भिंतीवर उघडपणे लोकशाहीची मागणी करू लागले. एक दिवस एक पोस्टर झळकले त्यात खुद्द चेअरमन माओंवर टीका केलेली होती. मग तशा आशयाची असंख्य पत्रके या भिंतीवर दिसली. माओ यांच्या अपरोक्ष त्यांची पत्नी जियांग हिने केलेल्या अत्याचारांचा निषेध केला जाऊ लागला. रोज शेकडो नवीन पोस्टर्स! एक दिवस एका विद्यार्थ्याने याच भिंतीवर आठ कलमी मागणीपत्र लावले. बहुपक्षीय शासनपद्धती, खुल्या निवडणुका, लोकप्रतिनिधींचे सरकार, भक्कम न्यायव्यवस्था, वृत्तपत्रीय स्वातंत्र्य, माहितीचा अधिकार, भ्रष्टाचाराचा बिमोड, नागरिक म्हणून मूलभूत अधिकार इत्यादी गोष्टी या मागणीपत्रात अंतर्भूत होत्या.  मग त्या पाठोपाठ असंख्य लोकांनी आपापली मते नोंदवली. लोकशाहीच्या बाजूने कौल दिला. असंख्य चित्रे, व्यंगचित्रे या भिंतीवर येऊ लागली. भ्रष्ट आणि गुन्हेगार अशा लोकांना शिक्षा करण्याची मागणी करणारी शेकडो हजारो भित्तीपत्रके या भिंतीवर लागली. कम्युनिस्ट चीनचा संस्थापक असलेल्या माओवर टीका होणारी पत्रके लागताच बीबीसी आणि अमेरिकन वार्ताहरांनी ही खबर जगभर पसरवली. आणि याच पाश्चात्य वार्ताहरांनी त्यानानमेन चौकातील या भिंतीला नाव दिले "लोकशाहीची भिंत!".... लोकांचा क्षोभ उफाळून आला होता, त्यांनी अपली मते या भिंतीच्या माध्यमातून सरकारपर्यंत पोचवली. पुढे पुढे तर आपल्या मनातील गोष्टी व्यक्त करायची ही कल्पना चीनी लोकांना इतकी आवडली की चीन मधल्या सगळ्या शहरांमध्ये गावोगावी अशा प्रकारच्या असंख्य लोकशाहीच्या भिंती उभ्या राहू लागल्या. लोक त्यावर लोकशाही, खुल्या निवडणुकांची मागणी करू लागले. कम्युनिस्ट सरकारने अगदी स्त्री पुरुष संबंधांबाबतही काही वेडगळ कायदे करून ठेवले होते. त्यावर हल्ला होणारीही पत्रके या भिंतींवर झळकू लागली. व्यक्तिस्वातंत्र्याचा पुनरुच्चार करत या लोकशाहीच्या भिंतीने चीनी कम्युनिस्ट पक्षाला हादरवून सोडले. अखेर एक दिवस लष्कराला हुकुम सुटले आणि लष्कराने लोकशाहीच्या सर्व भिंती साफ केल्या. त्यावर लिहिणाऱ्या लोकांना  कैद केले. दडपशाहीचा वरवंटा सर्वत्र फिरवला. पण लोकशाहीच्या भिंतीने सरकारच्या मनात आता आपल्या हातातून सत्ता जातीये की काय अशी धडकी भरवली..!!!

सुमारे ३२ वर्षांनी पुन्हा एकदा लोकशाहीच्या भिंतीने कमाल घडवून आणली... चीन मध्ये नव्हे...तर चीन पासून हजारो मैल लांब देशात....इजिप्त मध्ये..!!

सलग तीस वर्ष सत्ता गाजवणाऱ्या होस्नी मुबारक यांना हाकलून लावायची मागणी सर्वत्र होऊ लागली..लोकांच्या मनातील असंतोष प्रकट होऊ लागला... आधुनिक काळाला साजेशी अशी आधुनिक लोकशाहीची भिंत इजिप्त मधल्या लोकांनी विचार व्यक्त करायला मते मांडायला वापरली... या आधुनिक लोकशाहीच्या भिंतीचे नाव- "फेसबुक". फेसबुक वरील "पेज" मधून हजारो लोक एकत्र आले. त्यांनी होस्नी मुबारक यांच्या राजवटीचा निषेध केला. त्यांच्या त्यांच्या फेसबुक अकौंट वरील "wall" वर असंख्य लोक विचार व्यक्त करू लागले, एकत्र येऊ लागले.. पाहता पाहता वातवरण बदलले. अवघ्या काही दिवसात लाखो लोक मुबारक राजवाटीविरोधात उभे राहिले. आधुनिक लोकशाही भिंतीच्या, फेसबुकच्या, ताकदीने सारे जग स्तिमित झाले. जगभरचे वार्ताहर इजिप्त मध्ये आले. इथल्या लोकांचे मन जाणून घेऊ लागले. आणि १८ दिवसांच्या लोकांच्या उग्र आंदोलनानंतर होस्नी मुबारक यांना राजीनामा द्यावा लागला.... आधुनिक लोकशाहीच्या भिंतीची कमाल...!!!

सोशल नेट्वर्किंग वेबसाईट्स वापरून काय घडू शकते याचे हे एक उदाहरण आहे... ही एक "लोकशाहीची भिंत" आहे.. त्यावर भ्रष्टाचार करणार्यांना उघड करा, आपल्याला काय वाटते ते लिहा, तक्रार करा, आरोप करा.... हा आवाज आज न उद्या सरकार पर्यंत जाणारच आहे याची खात्री बाळगा...त्याचा पुरेपूर वापर करून मोठ्यातल्या मोठ्या भ्रष्ट लोकांना आपण निष्प्रभ करू शकतो. आपल्याला जे वाटतं, ते या भिंतीवर लिहले पाहिजे... इथेच विचारविनिमय घडेल..भ्रष्ट आणि गैरकारभार करणाऱ्या लोकांना, लोकप्रतिनिधी,राजकारणी, अधिकारी वर्ग इ सर्वांना आपण या लोकशाहीच्या भिंतीच्या माध्यमातून वठणीवर आणू शकतो. एक सामान्य माणूस म्हणून तुम्ही-आम्ही हे घडवू शकतो....!!!