अण्णांच्या निमित्ताने, देशभर चर्चा वादविवाद मोर्चे, आंदोलने, आरोप प्रत्यारोप यांचा पाऊस पडला. एकूणच फारसा मतदानाला कधी बाहेर न पडलेला, भ्रष्टाचाराला भरपूर हातभार लावलेला- पण मनातून भ्रष्टाचार नकोसा असलेला, एकूणच प्रस्थापित व्यवस्थेविषयी असंतोष बाळगणारा पण स्वतः काहीही करण्याची इच्छा असूनही धमक नसणारा असा मध्यमवर्ग अण्णांना पाठींबा द्यायला मोठ्या संख्येने रस्त्यावर आला. अण्णा म्हणतील तसे झाले तर कदाचित सर्व भ्रष्टाचार नष्ट होईल, देशातून सोन्याचा धूर निघू शकेल अशी भाबडी आशा बाळगणारा हा वर्ग (काही जणांना तर १ रुपयाला ४० डॉलर अशी आपली अर्थव्यवस्था झाली असेल अशी स्वप्नेही पडू लागली!). अर्थात या सगळ्यामध्ये असलेला लोकांचा सहभाग आणि सहभागामागे असलेली भावना ही शंभर टक्के प्रामाणिक होती याबद्दल मला जराही शंका नाही. अनेक लोक काहीतरी बदल घडतोय आणि आपण त्याचा भाग असला पाहिजे अशा भावनेनेही आले होते.
अगदी पहिल्यापासून, एप्रिल मधल्या अण्णांच्या उपोषणापासूनच लोक राजकीय पक्षांच्या आणि नेत्यांच्या नावे बोंब मारत होते. प्रत्येक वेळी मोर्चा, सभा वगैरे साठी येणाऱ्या लोकांमध्ये राजकीय पक्षांबद्दल पराकोटीचा तिरस्कार दिसून येत होता. आपले राज्यकर्ते हे एकजात चोर आहेत आणि सगळ्यांना शनिवारवाड्यावर फाशी दिले पाहिजे असे म्हणणारेही असंख्य लोक मला या सगळ्या कालावधीत भेटले. लोकशाही मध्ये लोकच आपल्या राज्यकर्त्यांबद्दल असे म्हणताना पाहून मी चकित झालो. नाराज झालो. दुखावलो गेलो.
फेसबुकवर आपल्या प्रोफाईल वर पॉलीटीकल व्ह्यूज या कॉलम मध्ये 'नॉट पॉलीटीकल' असे अभिमानाने लिहिणारे असंख्य लोक असतात. त्याचा या मंडळींना अभिमानही असतो. (यामध्ये मुलींची संख्या मुलांपेक्षा खूपच जास्त आहे. संसदेपासून महापालिकेपर्यंत सर्वत्र महिलांना ५०% आरक्षण दिलेलं असताना एका बाजूला ही अवस्था!) अनेकदा आमच्या परिवर्तन संस्थेसंदर्भात असंख्य लोकांना भेटायची वेळ येते. परिवर्तन ही एक राजकीय संघटना आहे असे सांगितल्यावर लोक बिचकतात. 'म्हणजे कोणत्या पार्टीचे तुम्ही' असे संशयानेच विचारतात. 'निवडणूक लढवणे म्हणजे राजकारण नव्हे, लोकांचे हक्क अधिकार याविषयी आम्ही काम करतो जे राजकीयच आहे' अशा आशयाचे ५ मिनिटांचे स्पष्टीकरण दिल्यावर लोकांचा आमच्यावर विश्वास बसतो. हे झालं सामान्य लोकांचं. ते एकवेळ ठीक आहे. पण आम्ही राजकीय नाही असे सामाजिक संस्थांचे लोक जेव्हा सांगतात तेव्हा माझं डोकंच फिरतं. स्वतःला जागरूक म्हणवणारा हा गट असून राजकीय नाही असे अभिमानाने सांगणे या सारखा महामुर्खपणा कोणत्याही लोकशाही देशात दिसणार नाही. लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांसाठी लोकांमार्फत उभारलेली राज्यकर्ती संस्था. जर संपूर्ण यंत्रणाच लोकांची असेल तर खुद्द लोकच अ-राजकीय कसे असू शकतात??? लोकशाहीमध्ये मानो या न मानो, आपण राजकारणाशी जोडलो गेलेलो असतोच. सकाळी चहातली साखर आणि वर्तमानपत्र इथूनच राजकारणाच्या प्रभावाची सुरुवात होते. आणि हा प्रभाव कायम सुरूच असतो. मनोरंजनापासून क्रीडा क्षेत्रापर्यंत. सर्वत्र राजकारण आहेच आणि असणारच कारण ही लोकशाही आहे. 'मी राजकीय आहे' असे ज्या दिवशी आपण आणि आपल्यातले बहुसंख्य अभिमानाने म्हणायला शिकू त्या दिवशी या देशातली लोकशाही यशस्वी होऊन प्रगल्भ व्हायला लागली आहे असे म्हणता येईल. तोपर्यंत आपण अजूनही बाल्यावस्थेत आहोत. लोकशाहीच्या प्रगल्भतेच्या दृष्टीने तेराव्या चौदाव्या शतकात इंग्लंड मध्ये असलेली परिस्थिती आणि आत्ताची आपली परिस्थिती यात मला फार काही फरक जाणवत नाही. आपण उठता बसता टिळक-गांधी-सावरकर-नेहरू ही नावे घेतो, पण हे नेमके कशासाठी भांडले याची 'समज' फारच थोड्यांना आहे बहुतेक. माहिती अनेकांना आहे. पण माहिती असणे म्हणजे समज असणे असे नव्हे. हे लोक ब्रिटीशांच्या विरुद्ध लढले नाहीत. हे लढले भारतीयांच्या राजकीय हक्कांसाठी. जर युद्ध फक्त ब्रिटीशांच्या विरुद्ध असतं तर १५ ऑगस्ट नंतरही सुरु राहिलं असतं. लढाई होती ती राजकीय हक्कांसाठी. प्रत्येक भारतीय नागरिकाला राजकीय अधिकार मिळाले पाहिजेत यासाठी हे सगळे लोक लढले आणि आज पासष्ट वर्षानंतर तेच अधिकार हक्क वापरायला नकार देण्यात आपण धन्यता मानतोय.
अ-राजकीय असण्याने आपण फार स्वच्छ शुद्ध, निरपेक्ष, निस्वार्थी असल्याचा गैरसमज अनेकांना होतो. या गैरसमजाच्या भोवऱ्यात आपण अडकलो आहोत. यातून आता बाहेर येऊया. आपल्या लोकशाहीला अधिक सक्षम आणि प्रगल्भ बनवूया.