एचबीओ
ची ‘गेम ऑफ थ्रोन्स’ ही टीव्ही सिरीज जगातल्या सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या सिरीज
पैकी एक आहे. ‘वेस्टरॉस नावाच्या एका खंडप्राय भागावर राज्य करण्यासाठी, तिथलं
सिंहासन हस्तगत करण्यासाठी झगडणारे वेगवेगळे सरदार, राजे,
सैनिक. प्रेमकथा, कट कारस्थानं आणि इतर अनेक
कथानकं-उपकथानकं’ अशी ही एक काल्पनिक सिरीज. या ‘गेम ऑफ थ्रोन्स’चा काल्पनिक थरार
सामान्य वाटावा असा थरार याच देशात दख्खनच्या भूमीत पाचशे वर्षं घडत होता. भारताचा
इतिहास सर्वार्थाने बदलला तो या भूमीने. इथल्या या इतिहासाने. हाच अत्यंत रोमहर्षक
इतिहास सांगणारं पुस्तक म्हणजे मनू एस पिल्ले या लेखकाने लिहिलेलं ‘रिबेल
सुलतान्स’.
‘द
डेक्कन फ्रॉम खिलजी टू शिवाजी’ असं या पुस्तकाचं उपशिर्षक या अडीचशे पानी पुस्तकात
साधारण काय असेल याची कल्पना देतं. इसवी सन १२०६ (दिल्लीत सुलतानशाहीची स्थापना)
ते १७०७ (औरंगजेबाचा मृत्यू) या पाचशे वर्षात दख्खनच्या प्रदेशातले राजे-सुलतान
यांची ही कहाणी आहे. मी सातवीत असताना या कालखंडाचा इतिहास अभ्यासात होता.
विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही,
गोवळकोंड्याची कुतुबशाही, बिदरची बारीदशाही आणि विदर्भातली इमादशाही अशी सगळी नावं
पाठ केली होती. ‘बहामनी
सुलतानशाही नष्ट होऊन त्या जागी या सुलतानशाह्या आल्या. दक्षिणेत विजयनगरचं
साम्राज्य होतं. आणि मग पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचं हिंदवी स्वराज्य
स्थापन केलं’ असं ढोबळपणे शिकलो होतो. पण दख्खनचा इतिहास याहून बराच रंगीत आहे असं
लेखक सुरुवातीलाच सांगतो. आणि हळूहळू एकेका सुलतानाच्या दरबाराची, त्यांच्या
राजधान्यांची सफर घडवून आणतो.
शाळेत शिकवलेल्या इतिहासापलीकडे फार काही माहित नसणाऱ्या
किंवा अगदी थोडेफार तपशील माहित असणाऱ्या प्रत्येकाला हे पुस्तक भुरळ पाडेल. मनू
पिल्ले याची भाषा ओघवती आहे. नकाशे, पूर्ण घराण्यांची आकृती काढून वंशावळ दाखवणे आणि
सुरुवातीलाच या पाचशे वर्षांच्या इतिहासातल्या ठळक घटना एका ‘टाईमलाईनवर’ मांडणे
यामुळे वाचताना मदत होते. शिवाय माहितीचा अतिरिक्त मारा करून वाचणाऱ्याला गोंधळात
टाकणं त्याने टाळलं आहे. मोजक्या पण महत्त्वाच्या गोष्टी सांगत मूळ कथा पुढे सरकते
आणि वाचकाला गुंतवत नेते. या सुलतानांचं आपापसांतलं वर्तन कसं होतं,
स्थानिक राजकारण कसं होतं याची माहिती मिळत जाते. जवळपास प्रत्येकवेळी गादीसाठी
झालेली कत्तल हा या सुलतानांच्या इतिहासातला एक सामायिक भाग. मुलाने वडिलांना
मारणे, वडिलांनी मुलाला मारणे,
भावाभावांमध्ये कत्तल, गादीवर बसायला मदत करणाऱ्या मंत्र्याला मारणे,
कसलाही धोका नसला तरी भविष्यात कटकट नको म्हणून अनेकांचा काटा काढणे या सगळ्यातून
या सुलतानशाह्या पुढे सरकतात. या कत्तलीच्या इतिहासातून विजयनगरचं समृद्ध आणि
ताकदवान साम्राज्यही अपवाद नाही.
इराणशी नाळ जोडणारे पर्शियन,
तुर्की मूळ सांगणारे आणि दख्खनी म्हणवले जाणारे- म्हणजे मूळचे इथले पण धर्मांतर
झालेले असे तीन मुसलमान गटाचे सत्ताधारी, विजयनगरचे हिंदू राजे या कथेत मुख्य
धारेत आहेत. पण हळूहळू मूळ कोणतंही असलं तरी या सुलतानशाह्या कशा इथल्या मातीत
रुजत गेल्या याची कहाणी उलगडत जाते. त्यांचं आपापसातलं राजकारण त्यानुसारच आकार
घेतं. मराठे, कानडी आणि तेलुगु यांचं योगदानही अधोरेखित होतं. मूळचे
इथिओपियामधून गुलाम म्हणून आणवले गेलेले आफ्रिकन लोक कसे सत्तेच्या पायऱ्या चढत
गेले असे अनेक घटक या इतिहासात आहेत. या सगळ्याला पोर्तुगीजांची फोडणीही आहे. ‘विजयनगरच्या
हिंदू राजाविरुद्ध पाच मुसलमान सुलतान एकत्र आले आणि त्यांनी विजयनगरचे राज्य
संपवले’ हे इतिहासाचं सुटसुटीकरण आहे आणि प्रत्यक्षात इतिहास याहून खूपच क्लिष्ट
आणि गुंतागुंतीचा आहे हे लेखक सप्रमाण सिद्ध करतो. ‘रायावाकाकामू’ नामक दक्षिण
भारतीय ग्रंथात गंमतीदार नोंद सापडते. त्यात दख्खनमधले मुसलमान सुलतान म्हणजे
शत्रू आहेत. पण त्यांचा शत्रू-मुघल बादशहा हा ‘शत्रूचा शत्रू तो मित्र’ या
नात्याने चांगला मानला आहे. त्यामुळे मांडणी धार्मिक दिसली तरी त्याचा गाभा राजकारणाचा
आहे. या ग्रंथातच अजून पुढे जात तिरुपतीच्या विष्णूने विजयनगरचा राया,
पुरीच्या जगन्नाथाने ओरिसाचा गजपती राजा आणि काशीच्या विश्वनाथाने दिल्लीच्या मुघल
बादशहाला नेमलं आहे अशीही मखलाशी आहे. एकुणात, व्यक्तिगत
महत्त्वाकांक्षा, लोभ या गोष्टी दख्खनच्या साठमारीत धर्मापेक्षाही
कितीतरी जास्त प्रभावी होत्या हे लेखक मनू पिल्ले सावकाशपणे उलगडत नेतो. याबरोबर
राजकीय घडामोडींसोबतच लेखक आपल्याला त्यावेळच्या समाजाचीही झलक देतो. पर्शियन आणि
दख्खनी यांच्यातून विस्तवही न जाणं, सुन्नी-सुफी-शिया यांच्यात संघर्ष होणं, स्थानिक
भाषांना मिळणारं प्राधान्य बघून पर्शियन मूळचे अधिकारी दुखावले जाणं अशा सामाजिक
कलहांची मांडणी होते. अर्थात, लेखकही हे मान्य करतो की सगळं वर्णन केवळ दरबारी
संदर्भाने आले आहे. त्यावेळच्या संपूर्ण समाजाची ही मांडणी नाही.
विजापूर, गुलबर्गा, गोवळकोंडा, विजयनगर ही दख्खनवरची मुख्य शहरं आपापल्या
सत्ताधाऱ्यांच्या सुवर्णकाळात कशी बहरली, इथे आलेल्या परदेशी प्रवाश्यांनी काय
लिहून ठेवलंय यातून या शहरांची कल्पना येते. अधिकृत ऐतिहासिक दस्तऐवजांतून
मिळालेले या सुलतानांच्या उत्पन्नाचे आकडे वाचले की अवाक व्हायला होतं. मी हे वाचत
असताना सहजच ‘गुगल’ करून बघितलं की त्या काळात युरोपीय सत्तांची आर्थिक स्थिती काय
होती. दख्खनच्या सुलतानांचे आकडे चक्रावून टाकणारे आहेत. ‘भारतात सोन्याचा धूर
निघत असे’ असं जे म्हणतात त्याची कल्पना येते. पण आपापसातल्या
मध्ययुगीन लढाया आणि दूरदृष्टीचा अभाव यामुळे ही शहरं बघता बघता धुळीला कशी मिळाली
याची कहाणी आपल्यासमोर उलगडते.
पर्शियन मूळ असणारा सुलतान दरबारात अस्खलित मराठीत संवाद
साधणं पसंत करतो; अनेक विषयांत गती असणारा एखादा सुलतान स्वतःच एक ग्रंथ लिहितो;
एक आदिल शहा सुलतान सरस्वती देवीच्या भक्तीत एवढा रमतो की तो स्वतःला विद्येच्या
देवता सरस्वती आणि गणपती यांचा मुलगा मानतो. त्याची ही भक्ती बघून इतर सरदारांच्या
मनात शंका येते की हा हिंदू तर झाला नाही ना; इथिओपियन गुलाम मलिक अंबर मुघल
आक्रमणाविरोधात दख्खनचा रक्षणकर्ता बनतो; त्या आधी चांद बीबी मुघलांच्या विरोधातला
लढा उभारते; सिंहासनाच्या खेळात पराभूत झालेल्या आणि परांगदा होऊन गोव्यात पोर्तुगीजांच्या
आश्रयाने राहणाऱ्या मीर अलीची एका ख्रिश्चन माणसाच्या प्रेमात पडणारी आणि पळून
जाऊन ख्रिश्चन होत लग्न करणारी मुलगी; अशा वेगवेगळ्या
पात्रांनी हा इतिहास कमालीचा रोमांचक केला आहे. अर्थातच त्यामुळे पुस्तक वाचताना
खाली ठेववत नाही.
यात दिसणारं राजकारण आणि या सत्तांचं वैभव या सगळ्याचा
स्थानिक सामान्य माणसाशी संबंध नव्हता हे जाणवतं. सामान्य माणूस पिचलेलाच होता.
दुष्काळ आणि युद्ध अशा अक्षरशः अस्मानी आणि सुलतानी संकटांनी वेढलेला होता.
नर्मदेच्या खालचा भूप्रदेश संधी मिळताच दिल्लीच्या अंमलाखालून वेगळा करण्याचा
दख्खनी सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न, स्थानिक भाषा आणि संस्कृतीला त्यांनी दिलेलं
महत्त्व या दोन्हीतून एक प्रादेशिकतेची अस्मितेची जाणीव या दख्खनच्या सुलतानांच्या
मध्ययुगीन इतिहासाने निर्माण केली. पण त्यातून स्वार्थी आणि लुबाडणारे सुलतान आणि
त्यांचे इथलेच सरदार जहांगीरदार तयार झाले. अशावेळी रयतेच्या भल्याचा विचार करणारे
आणि तो विचार अंमलातही आणणारे छत्रपती शिवाजी महाराज या सगळ्या राजे-सुलतानांत
वेगळे आणि उठून दिसतात. आणि म्हणूनच त्यांनी उभं केलेलं मराठा राज्य मुघल
साम्राज्यालाही खाली खेचण्यात सिंहाचा वाटा उचलतं. पाच सुलतानांनी एकत्र येत
विजयनगरचं साम्राज्य संपवलं. नंतर आपापसांत लढणाऱ्या सुलतानांना औरंगजेबाने एकेक
करत संपवलं. आणि पुढे मराठे औरंगजेबालाही पुरून उरले. त्याबरोबरच दख्खनच्या
इतिहासावरचं हे पुस्तक संपतं.
मुळातला रोमांचक इतिहास आणि तो मांडण्याची मनू पिल्ले
याची ओघवती भाषाशैली यामुळे हे पुस्तक ‘वाचलेच पाहिजे असे काही’ असं
आहे, हे निश्चित.
लेखक - मनू एस पिल्ले
प्रकाशक - जगरनॉट बुक्स.
किंमत – रू. ५९९/-