12 Sun Signs |
नुकतेच ऐकिवात आले की बारा राशींमध्ये मारामाऱ्या सुरु झाल्या आहेत. ३६० अंशाचे आकाश प्रत्येकी ३० अंश या पद्धतीने शेकडो वर्षांपूर्वीच विभागले गेले असताना तेराव्या राशीचा नुकताच लागलेला "शोध" हे या राशींमधल्या भांडणाचे मूळ आहे. तेराव्या राशीला नेमके किती अंश द्यावेत आणि ते कोणी द्यावेत यावरून हा वाद सुरु असल्याचे समजते. नवीन आलेल्या राशीने आपल्याला समान वागणूक मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली असल्याचे अधिकृत सूत्रांकडून सांगण्यात आले. नवीन राशीला पश्चिमी लोक 'ओफियोकस' असे म्हणत असले तरी, नव्या राशीच्या चित्रावरून "भुजंगधारी" असे मराठी नाव देण्यात आले आहे.
ophiuchus |
पार्श्वभूमी:
सुमारे २३०० वर्षांपूर्वीच्या ज्योतिषी आणि संशोधक लोकांनी गणित करणे सोपे जावे यासाठी केवळ बाराच राशींना मान्यता दिली. शिवाय पूर्वापार चालत आलेल्या परंपरेनुसार त्यावेळचे लोक "१३" हा आकडा अशुभ मानत असत. (तेव्हा तेरा तेरा तेरा सुरूऊSSSSSSर हे गाणे नव्हते नाहीतर तेरा आकडा कायमचा काढूनच टाकण्यात आला असता.असो.) त्यामुळे (प्रत्यक्षात असल्या तरी) तेरा राशी नकोत असा निर्णय घेऊन भुजंगधारी राशीला काढून टाकण्यात आले. इतिहासात झालेल्या आपल्यावरचा अन्याय दूर करण्याचे या राशीने ठरवले आणि जोतीबा फुल्यांपासून नेल्सन मंडेला, चे गव्हेरा यांच्यासकट आंबेडकरांपर्यंत सर्वांना स्मरून "भुजंगधारी" राशीने 'समानतेसाठी' लढा चालू केला. आपला लढा तीव्र करतानाच "सत्यशोधक" समाज त्या राशीला उपयोगी पडला... आपल्या बद्दलचे सर्व ऐतिहासिक सत्य या राशीने जगासमोर ठेवले. अखेर जगाने तेराव्या भुजंगधारी राशीला मान्यता दिली. पण तिथेही या राशीने "कोणाची मेहेरबानी नकोय. मला माझे जन्मसिद्ध हक्क हवेत" असा बाणेदारपणा दाखवत "तेरावी" रास म्हणवून घ्यायला साफ नकार दिला. मीन नंतरची अशी शेवटची रास न होता या राशीने सरळ सरळ वृश्चिक आणि मकर यांच्या मध्ये घुसखोरी करत आपली जागा बनवली. सबब मोठ्या भांडणाला सुरुवात झाली.
जगभर स्वागत..!!
जगातल्या अनेक ज्योतिष वगैरेंनी तेराव्या राशीला पाठींबा दिला असून आता अतिशय क्लिष्ट आणि अवघड गणिती प्रक्रिया करता येणे शक्य असल्याने तेरावी रास असावीच असा ठराव जागतिक ज्योतिष परिषदेने नुकताच पास केल्याचे समजले. इतकेच नव्हे तर बारा प्रस्थापित राशी विरुद्ध एक अन्यायाखाली पिचली गेलेली रास याचे स्वरूप प्रस्थापित उच्चवर्गीय विरुद्ध शोषित कनिष्ठवर्गीय असे असल्याचे जागतिक कम्युनिस्ट चळवळीने जाहीर केले आहे. अशा प्रकारे भरगोस पाठिंब्याच्या बळावर भुजंगधारी राशीला ३६० अंशाच्या आकाशात विशेष आरक्षण देण्याची मागणी होत असल्याचे दिसून आले आहे.
राजकीय उलथापालथ
तेराव्या राशीचा "शोध" लागताच तिला देण्यात आलेले मराठी नाव पाहून मनसे आणि शिवसेनेने या राशीला संपूर्ण पाठींबा जाहीर केला आहे. प्रथम कोणी मान्यता दिली यावरून दोन्ही पक्षांमध्ये आरोपांच्या फैरी झडत आहेत. काँग्रेस च्या वरिष्ठ नेत्यांनी या राशीबाबत "इटली" मधील शिलालेखात असलेले उल्लेख पाहून ताबडतोब मान्यता दिली आहे. भाजप ने यावर अद्याप मौन बाळगले असून 'या बाबत जाहीर भूमिका व धोरण ठरवताना अंतर्गत संघर्ष उफाळून येईल की काय या चिंतेत सध्या गडकरी असल्याचे' एका वरिष्ठ नेत्याने नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितले. पवार साहेबांनी (नेहमीप्रमाणेच) दोन वेगवेगळ्या मुलाखतीत दोन वेगवेगळ्या आणि परस्परविरोधी भूमिका मांडल्या आहेत. रिपाइं च्या नेत्यांनी ही रास दलित रास असल्याचे सांगून आरक्षणाच्या कल्पनेला पाठींबा दर्शवला आहे. त्यासाठी वेळ पडल्यास आम्ही आंदोलनही करू असा इशारा आठवल्यांनी दिला.
एकूणच राजकीय वर्तुळात या राशीमुळे खमंग चर्चा रंगू लागल्या आहेत. आणि पुढचे अधिवेशन या प्रश्नावरून वादळी होण्याची शक्यता बोलून दाखवली जात आहे.
भारताची भूमिका:
"नव्याने निर्माण झालेला राशींचा प्रश्न हा एक आंतरराष्ट्रीय प्रश्न असून भारत यामध्ये आपले कर्तव्य चोख बजावेल", असे आज पंतप्रधानांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या प्रश्नावर अभ्यास करण्यासाठी संसद सदस्यांची सर्वपक्षीय अशी एक विशेष समिती नेमण्यात आल्याचेही त्यांनी जाहीर केले. संबंधित समिती येत्या काही महिन्यात इटली, ग्रीस, चीन, दक्षिण अमेरिका, इजिप्त अशा प्राचीन संस्कृती असलेल्या देशांचा अभ्यास दौरा करेल व या प्रश्नावर सखोल अहवाल पुढच्या पावसाळी अधिवेशनात लोकसभेत मांडेल असे ठोस आश्वासनही पंतप्रधानांनी या वेळी दिले.
पाकिस्तानकडून (पुन्हा एकदा) भारताची कॉपी..!
भारताची या आंतरराष्ट्रीय प्रश्नावर असलेली तातडीची प्रतिक्रिया पाहून पाकिस्तानने इस्लाम आणि राशी यांचा संबंध काय यावर विचार करण्यासाठी समिती नेमली आहे. संबंधित समितीमध्ये एकूण ८ सदस्य असून त्यापैकी पाच जण पाकिस्तानी लष्करातले अधिकारी आहेत, दोन जण आयएसआय एजंट असून उरलेला एक सदस्य मौलवी आहे. संबंधित समितीचा अभ्यास दौरा पाकव्याप्त काश्मीर पासून सुरु होऊन पेशावरमध्ये संपेल असे वृत्त डॉन या वृत्तपत्राने दिले आहे.
विरोधी सूर...
'तेरावी रास ही खरी रास नसून तोतया रास आहे, त्यामुळे तिचा निषेध करावा' असा ठराव इतर बारा राशींनी केला आहे. यासाठी घेण्यात आलेल्या सभेचे अध्यक्षपद वृश्चिक राशीने भूषवले व आपल्या भाषणात भुजंगधारी राशीवर कडाडून हल्ला चढवला व या नव्या राशीच्या घुसखोरीमुळे मकर वृश्चिक रास यांना किती त्रास सहन करावा लागत आहे याबद्दल सांगितले. 'आपल्यामध्ये आपण नव्या राशीला सामावून घेऊ वाटल्यास काही अटी घालू, पण एकदम दुसरेच टोक न गाठता मध्यम मार्ग शोधू.' अशी भूमिका तूळ राशीने मांडली मात्र फारसे अनुमोदन न मिळाल्याने हा ठराव फेटाळण्यात आला.
दरम्यान अंधश्रद्धा निर्मूलन समितीने "मुळात बारा राशींनाच आम्ही मानत नाही तेव्हा तेराव्या राशीला आम्ही मान्यता देण्याचा प्रश्नच येत नाही." असे पत्रक प्रसिद्धीस दिले. त्याचबरोबर दाभोलकरांनी पंतप्रधानांच्या विशेष समिती नेमण्याच्या निर्णयावर कडक टीका केली.
"तेरावी रास आधी असती तर कदाचित माझा सिनेमा लोकांना आवडला असता", असे हताश उद्गार अविनाश गोवारीकर यांनी खाजगीत काढल्याचे वृत्त एका सिने मासिकात प्रसिद्ध झाले. मात्र गोवारीकर यांनी तातडीने आपण असे काहीच न म्हणल्याचे जाहीर केले.
'राशीचक्र' हा कार्यक्रम बंद पडल्याने लोकांना निखळ मनोरंजन मिळेनासे झाले असल्याची टीका शरद उपाध्ये यांनी केली.
महाविद्यालयीन विद्यार्थी व विशेषतः विद्यार्थिनी यांना तेराव्या राशीचा जबरदस्त धक्का बसला आहे आणि लिंडा गुडमन ची पुस्तके चुकीची असल्याचे सिद्ध होणार या विचारांनी त्या कावऱ्याबावऱ्या झाल्या आहेत. बायबल सारखे लिंडा गुडमन चे पुस्तक वाचणाऱ्या एका विद्यार्थिनीने आत्महत्येचाही प्रयत्न केला म्हणे. तिची रास आधी "लिब्रा" होती आता ती "व्हर्गो" झाल्याने तिला धक्का बसून तिने हे कृत्य केल्याचे निष्पन्न झाले आहे. सामाजिक आरोग्य धोक्यात आणणाऱ्या या तेराव्या राशीला हाकलून लावा अशी मागणी समाजातील विविध स्तरातून उच्चरवाने होत आहे.
मुळातच असलेल्या बौद्धिक दुष्काळात हा तेरावा आल्याची खंत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांनी आज एका कार्यक्रमात व्यक्त केली. लवकरात लवकर हा दुष्काळ संपो आणि प्रखर बुद्धिमत्तेचा सुकाळ सर्वत्र पसरो अशी इच्छाही त्यांनी बोलून दाखवली.
संपादकीय टीप:- आमच्या या वृत्तस्थळासकट इतर सर्व वृत्तपत्र आणि टीव्ही वाहिन्यांना खाद्य पुरवणाऱ्या या तेराव्या राशीचे शतशः आभार....!!!!!