Saturday, October 20, 2018

पर्यायांचा महापूर


 “जेवता जेवता काहीतरी बघावं म्हणून मी ‘नेटफ्लिक्स’ लावलं. पण जेवण संपलं तरी नेमकं काय बघावं ते ठरलंच नव्हतं माझं.”, मध्यंतरी माझा एक मित्र मला सांगत होता. मला ते ऐकून गंमत वाटली होती. नेटफ्लिक्स, अॅमॅझॉन प्राईम अशा ऑनलाईन सिनेमा, सिरीज बघण्याची सोय देणाऱ्या सेवांमुळे बघायला अक्षरशः हजारो गोष्टी असतात आपल्यासमोर. आपल्याला हव्या त्या पद्धतीचे, वेगवेगळ्या भाषांतल्या फिल्म्स आणि सिरीज इथे बघता येतात, असं असताना तपटकन एखादी निवडणं का बरं कठीण गेलं असेल? पण नुकताच अगदी असाच अनुभव मलाही आला. अमेरिकेच्या प्रवासाला निघालो तेव्हा विमानात समोर असणाऱ्या स्क्रीनवर ६५० वेगवेगळ्या फिल्म्स बघायला उपलब्ध आहेत असं दिसत होतं. मी खुश झालो. पण माझ्या त्या मित्राप्रमाणेच बराच वेळ मीदेखील नुसतेच कोणकोणत्या फिल्म्स आहेत ते बघत बसलो होतो. ‘ब्राउझ’ करत होतो. त्यात मला आवडणाऱ्या कित्येक फिल्म्स होत्या. कित्येक अशाही होत्या ज्या मला ‘एकदा बघायची आहे हं ही फिल्म’ या वर्गात मोडणाऱ्या होत्या. पण तरीही एका कोणत्या तरी फिल्मपाशी थांबून ती मी बघायला लागायला भरपूर वेळ गेला. समोरच्या असंख्य पर्यायांमध्ये मी अगदी वाहवत गेलो होतो. नेमक्या निर्णयापाशी मला येताच येत नव्हतं. या अनुभवाने जरा डोक्यातल्या विचारचक्राला गती आली. टीव्ही चॅनेल्सचं उदाहरण आहे. पूर्वी टीव्हीवर एक दूरदर्शन हाच चॅनेल दिसायचा. नंतर एकेक करत वाढत गेले. आज तर एकूण किती भाषांमधले किती चॅनेल्स आहेत काय माहित! त्यात रोज भर पडते आहेच. त्यातून टीव्ही चॅनेल्स ‘सर्फिंग’ असा एक प्रकार निर्माण झाला. ‘ब्राउझिंग’ हा जणू आपल्या सगळ्याच जगण्याचा अविभाज्य भाग बनला आहे की काय?

बहुसंख्य पर्याय उपलब्ध असणं हे आपल्या स्वातंत्र्यासाठी आणि एकूणच चांगलं राहण्यासाठी आवश्यक मानलं जातं. एका हॉटेलमधला इडली-डोसा नाही आवडला तर दुसऱ्या हॉटेलमध्ये जाण्याचा पर्याय आणि स्वातंत्र्य उपलब्ध असेल तर आपण अधिक आनंदी राहू. या उलट तुम्हाला आवडो किंवा न आवडो, अमुक हॉटेल मध्येच तुम्हाला इडली-डोसा खावा लागेल असं बंधन कोणी घातलं तर ते मनाला रुचणार नाही. माणूस स्वतःच्या आनंदासाठी, सुख-सोयींसाठी अधिक पर्याय उपलब्ध असणाऱ्या व्यवस्थेत राहू बघतो. पण ‘जेवढे पर्याय अधिक तेवढं अधिक आनंदाच्या आणि सुख-सोयीच्या दिशेने जाणं, हे ‘थिअरी’ मध्ये पटलं, तरी प्रत्यक्षात असं घडतं का?’, यावर जगभर अनेक मंडळी अभ्यास करत आहेत. अमेरिकन मानसशास्त्रज्ज्ञ बॅरी श्वार्ट्झ याने या विषयावर एक पुस्तकच लिहिलं आहे ज्याचं नाव आहे- ‘द पॅरॅडॉक्स ऑफ चॉईस’- पर्यायांचा विरोधाभास! यावरचा त्याचा टेड टॉकदेखील फार रंजक आहे. हार्वर्ड बिझिनेस रिव्ह्यू मध्ये लिहिलेल्या आपल्या लेखात बॅरी श्वार्ट्झ म्हणतो, मुबलक पर्यायांमुळे निवड क्षमता तर कमी होतेच, पण त्याबरोबर आपण निवडलेल्या पर्यायाबाबत वाटणारं समाधान देखील कमी होताना दिसतं- पर्याय योग्य निवडला असला तरीही. पर्याय निवडीच्या प्रक्रियेत येणारा मानसिक थकवा वेगळाच. अनेक पर्यायांमुळे चिंता, हळहळ, अपेक्षा अवास्तव वाढवून ठेवणे आणि स्वतःला दोष देणे अशा गोष्टींना आपण आपल्या मनात जागा देतो.

हे आज लेखात मांडायचा हेतू असा की, जोडीदार निवड, लग्न आणि त्यातही विशेषतः अरेंज्ड मॅरेजच्या दुनियेत या सगळ्या अभ्यासाला विचारात घेणं भाग आहे. गेल्या पिढीपर्यंत लग्नाच्या क्षेत्रात पर्यायांची उपलब्धता ही गोष्ट अस्तित्वातच नव्हती जणू. ‘पहिलीच मुलगी बघितली आणि लग्न करून टाकलं’ अशा कित्येक कथा, आत्ता माझ्या आजी-आजोबांच्या पिढीत असलेली मंडळी सांगतात. पण आता जमीन अस्मानाचा फरक पडलाय. शेकडो विवाहसंस्था आहेत. रोज नव्याने भर पडणाऱ्या वेबसाईट्स आणि या सगळ्यावर लग्नाला उभ्या मुला-मुलींची हजारो-लाखोंच्या संख्येने प्रोफाइल्स आहेत. “मी चारशे मुलांची प्रोफाइल्स बघितली. त्यात आवडलीही बरीच. पण एकच मुलगा निवडायचा, तर ते काही जमत नाहीये.”, मध्यंतरी नम्रता आमच्या एका कार्यक्रमात सांगत होती. हे केवळ तिच्याच बाबतीत घडतं असं नव्हे तर शेकडो स्थळं बघितली पण अजून अंतिम निर्णय घेता येत नाहीए असं म्हणणारी कित्येक मुलं-मुली मला भेटतात. का घडतं असं?

मला वाटतं, असं घडण्यामागे दोन गोष्टी आहेत- पहिली म्हणजे चुकण्याची भीती. यातही गंमत अशी आहे की, एकही पर्याय नसताना निवड चुकल्यावर तेवढं वाईट वाटत नाही, जेवढं पर्याय असताना चुकीचा पर्याय निवडला या गोष्टीचं आपल्याला वाईट वाटतं. एक प्रकारे आपण ‘आपला निर्णय चुकणं’ हे आपल्या व्यक्ती म्हणून असणाऱ्या योग्यतेशी जोडायला जातो. आपल्या चुकीच्या किंवा बरोबर निर्णयाला आपण आपल्या आत्मसन्मानाशी जोडतो. साहजिकच चुकीचा पर्याय निवडण्याच्या शक्यतेची एक जबरदस्त भीती मनात बसते. आणि ही भीती, निर्णय घेणं लांबणीवर टाकायला भाग पाडते. चुकण्याची भीती या पहिल्या गोष्टीनंतर येणारी दुसरी गोष्ट आपल्याला या भीतीच्याही एक पाउल पुढे नेतो. आणि ती म्हणजे, ‘अजून चांगला पर्याय मिळू शकला असता’ हा विचार. या विचारामुळे आपण घेतलेला निर्णय हा चुकीचा ‘ठरवला’ जाण्याची शक्यता वाढते. आपण घेतलेला निर्णय योग्य असला तरीही, ‘अजून चांगला पर्याय निवडता आला असता का’ या विचारामुळे घेतलेला निर्णय चुकीचाच आहे असं ठरवलं जाऊ शकतं. अर्थातच, एखादी वस्तू घेण्याच्या निर्णयापेक्षा जोडीदार निवडण्याच्या निर्णयात या विचारांची तीव्रता कित्येक पटींनी वाढते. साहजिकच या सगळ्याचा परिणाम आपल्या आपल्या आनंदी राहण्यावर नसता झाला तरच नवल.

मग या परिस्थितीत काय बरं करावं? उपाय म्हणून एक त्रिसूत्री डोक्यात आली-
१.      मला काय हवंय, याची स्पष्टता आणि नेमकेपणा. एक उदाहरण बघा. समजा, पुण्याहून मुंबईला जाणे हे हवं असेल, तर बस, रेल्वे, विमान, स्वतःची गाडी, कॅब असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. पण त्यातला कोणता निवडायचा याने गोंधळात पडायला होईल. पण “दुपारी पुण्यातून निघून, आरामदायी पद्धतीने ए.सी. मध्ये बसून पण पाचशे रुपयांपेक्षा जास्त महाग पडणार नाही, तरी चार तासाच्या आत पोचवेल असा पर्याय हवाय” असा नेमकेपणा आणला की, बाकी पर्याय आपोआप कमी होत होत शिवनेरी बसने जाण्याचा पर्याय समोर येतो. नेमकेपणा असा उपयोगी पडतो.

२.     इतर पर्याय? छोड दिया जाये! आता या वरच्या उदाहरणात इतर जे पर्याय होते, त्यांना धरून ठेवलं आणि मोकळं सोडून दिलं नाही तर, ते मला ‘हळहळ वाटण्याच्या’ भावनेकडे खेचत राहतील. “अर्रर... यापेक्षा रेल्वे स्वस्त पडली असती...” या सारखे नंतर येणारे विचार आपण निवडलेला पर्याय चुकीचा ‘ठरवायला’ हातभार लावतात. एकदा निर्णय झाल्यावर इतर पर्यायांना सोडून देणं हा यावरचा मार्ग आहे. इंग्रजीत याला ‘लेट गो म्हणतात. यासाठी डॉ. अनिल अवचट यांनी बोलताना एकदा वापरलेले शब्द होते - “छोड दिया जाये!”. मंत्रच आहे हा एक!

३.      कुछ तो लोग कहेंगे. चुकण्याच्या भीतीमागे अनेकदा लोक काय म्हणतील आणि मी निवडलेल्या पर्यायाला चूक ठरवलं जाईल का, या विचारांचा पगडा असतो. काहीही केले तरी नावं ठेवणारे लोक सापडतीलच. शेवटी, मला काय वाटतंय आणि माझ्या आनंदात, समाधानात कशाने भर पडते आहे यावर अधिक लक्ष देणं आणि आत्मविश्वासाने निर्णय घेऊन ते निभावणं याला पर्याय नाहीच!

थोडक्यात सांगायचा मुद्दा हा की, अनेक पर्याय उपलब्ध असणं, हे आजच्या आपल्या जगाचं वास्तव असलं तरी, ते आपल्याला मदत करणारं ठरायला हवं, निर्णय घेण्याच्या दृष्टीने पंगू करणारं नव्हे. अनंत पर्यायांच्या महापुरात वाहवत न जाता, जोडीदार निवडायच्या दिशेने निर्णायक पाउल उचलणं शहाणपणाचं आहे, नाही का?   

(दि. २० ऑक्टोबर २०१८ रोजी प्रकाशित झालेल्या महाराष्ट्र टाईम्सच्या मैफल पुरवणीत प्रसिद्ध.)

No comments:

Post a Comment