Friday, January 12, 2018

मोठी उडी!

लग्न म्हणजे काय? लग्न कधी करावं? करायलाच हवं का? मग करिअरचं काय? जमेल का आमचं? माझ्या कुटुंबाचं आणि जोडीदाराचं जमेल का? मला आत्ता आहे ते स्वातंत्र्य लग्नानंतरही मिळेल का? लग्न न करण्याचा पर्याय आहे का? जुन्या ‘रिलेशनशिप्स’चं काय करायचं? एकनिष्ठतेचं काय करायचं? वगैरे वगैरे अनेक प्रश्न माझ्या पिढीच्या प्रत्येकाच्या डोक्यात आहेत. त्या प्रश्नांवर थोडं मंथन करावं म्हणून हा लेख.

ऐंशी-नव्वदच्या दशकात जन्माला आलेली आम्ही मंडळी प्रचंड बदल बघत मोठी झालो आहोत. आणि या बदलांना सगळ्यात मोठा रेटा दिलाय तो तंत्रज्ञानाने. तंत्रज्ञानाने आपलं सगळ्यांचं जीवन अमुलाग्र बदललं आहे. एवढा बदल, मला नाही वाटत आजवर इतर कोणत्याही पिढीच्या वाट्याला मोठं होताना आला असेल. आणि या बदलांना तोंड देता देता, आत्मसात करता करता जुनं जग आणि नवीन जग यात तुफान ओढाताण होत होत नवनवीन प्रश्न निर्माण होतायत. आता काही जण म्हणतील, की हे तर प्रत्येक पिढीच्या बाबतीत झालंय, हे नवीन नाही. कागदावर हे म्हणणं बरोबर वाटलं तरी बदलांची वारंवारिता (Frequency) आणि तीव्रता (Intensity) ही आत्ता कित्येक पटींनी जास्त आहे. आणि कदाचित ती वाढतच जाणार आहे. तंत्रज्ञानामुळे आपल्या आयुष्यात अनेक सुख-सोयी आल्या हा झाला केवळ एक भाग. पण इतरांना जाणून घेण्याची, इतरांकडे बघण्याची, इतरांशी बोलण्याची अशी एक प्रचंड मोठी खिडकी तंत्रज्ञानाने उघडून दिली. आणि या खिडकीमुळे आपण विचारांच्या दृष्टीने स्वतंत्र व्हायला चालना मिळाली. ‘आपण आणि आपल्या आजूबाजूचा परीचयातला समाज’ या डबक्यातून आपण एकदम मोठ्या महासागरात येऊन पडलो. आपल्या आजूबाजूचेही आलेच या महासागरात. पण तरी महासागरात आल्यावर क्षितीजं रुंदावली. ‘कोण काय म्हणेल’ ही भीती तुलनेने कमी झाली. जगाच्या दुसऱ्या कोपऱ्यात कुठेतरी माझ्यासारखं इतरांपेक्षा वेगळे विचार असणारं कोणीतरी असू शकतं आणि त्या कोणातरीबरोबर मी संपर्क साधू शकतो, विचारांची देवाणघेवाण करू शकतो ही शक्यता आपल्याला पारंपारिक बंधनांच्या खड्ड्यातून खेचून बाहेर काढू शकते. आपण स्वातंत्र्याच्या दिशेने चालू लागतो. गावाकडच्या मंडळींना शहरात आल्यावर जी स्वातंत्र्याची अनुभूती मिळते तीच आता सर्वच ठिकाणच्या लोकांना मोठ्या प्रमाणावर घरबसल्या मिळण्याची सोय उपलब्ध झाली. ही नवीन तंत्रज्ञानाची ताकद आहे. या स्वातंत्र्याच्या अनुभूतीमुळे विचारांच्या आणि आकांक्षांच्या कक्षा विस्तारल्या. जगात लोक काय काय विचार करतात, एकमेकांना कसं वागवतात, सामाजिक बंडखोरी कशी करतात, त्या मागच्या प्रेरणा काय असतात, विचारधारा काय असते अशा कित्येक गोष्टी आपल्या समोर सहजपणे उलगडत असतात. कितीही घ्याल ते कमीच आहे! साहजिकच माझं विचारांचं अवकाश एकदम मोठं होत जातं. आज एकाच दिवशीच्या वर्तमानपत्रात ऑनर किलिंगची बातमी आणि पॉलिअॅमरी सारख्या विषयावरचा लेख असू शकतो. कारण या वर्तमानपत्राच्या वाचकाच्या भाव विश्वात जसा ऑनर किलिंग अस्तित्वात असणारा समाज आहे तसंच देशोदेशीचे कलाकार, विचारवंत, लेखक आणि त्यांचं नातेसंबंधांवरचं म्हणणं हेही आहे. अर्थातच या माहितीच्या प्रचंड माऱ्यानंतर आमची पिढी गोंधळात पडली नसती तरच नवल.

कुटुंब या शब्दाची व्याप्ती आता कमी होत गेली आहे असं अनेकदा म्हणलं जातं. विभक्त कुटुंब, फ्लॅट संस्कृती अशा गोष्टींवर टीका केली जाते. कुटुंब या शब्दाच्या अर्थाची व्याप्ती कमी झालीये का याबद्दल मला शंका आहे. पण कुटुंबाची व्याख्या आणि कुटुंबाकडून असणाऱ्या अपेक्षा बदलल्या आहेत हे मात्र खरं. शहरं मोठी झाली, कामाचे तास वाढले, त्याबरोबर माझं पारंपारिक कुटुंब छोटं होत गेलं. चुलत-मामे-मावस भावंडं आधीपेक्षा दूर गेली. नित्यनेमाने संपर्क असावा अशी रक्ताच्या नात्यातली माणसं कमी झाली. रक्ताच्या नात्यांतली कित्येक मंडळी वर्षातून एकदा एखाद्या लग्नात वगैरे भेटू लागली, किंबहुना नुसती दिसू लागली. नाती टिकण्यासाठी आणि फुलण्यासाठी आवश्यक असा शेअरिंगचा भाग संपलाच. “मी आयुष्यात ज्यांना सगळं मिळून तीन वेळा भेटलोय त्यांनाही मी लग्नाला आमंत्रण द्यायचं हे काय मला पटत नाही.”, माझ्या एका मित्राने मला सांगितलं होतं. असं म्हणणारे आज काही कमी नाहीत. ही भावना आमच्या पिढीच्या मुला-मुलींमध्ये आहेच. केवळ मी अमुक घरात जन्माला आलो म्हणून माझ्याशी जोडले जाणारे नातेवाईक आता मला जवळचे वाटत नाहीत. आणि जवळचे वाटले नाहीत तरीही त्यांना जवळचे मानण्याचं, त्यांना माझं कुटुंब मानण्याचं पारंपारिक बंधनही डबक्यातून महासागरात आलेल्या मला नकोसं वाटतं. असं असेल तर मग कुटुंबाची व्याप्ती कमी झाली आहे या म्हणण्यात चूक काय? तर गफलत अशी आहे की, कुटुंबाची व्याख्या बदलून आमच्या पिढीने नव्याने ज्यांच्याशी जवळचे नातेसंबंध तयार केले त्या सर्वांना स्वतःच्या नकळतच कुटुंबियांचा दर्जा दिला आहे. त्यामुळे व्याप्ती कमी झाली आहे यापेक्षा व्याख्या विस्तारली आहे हे म्हणणं अधिक योग्य ठरेल. माझे मित्र-मैत्रिणी, त्यांचे कुटुंबीय, माझे कुटुंबीय, शेजारी, ऑफिसमधले सहकारी, असे अनेकजण माझ्या या नव्या कुटुंबात सामील होत जातात. ज्यांना मी निवडलेलं असतं. अगदी माझ्या रक्ताच्या नात्यांतल्या एखाद्याबरोबर माझं असं काही मस्त नातं निर्माण होतं की रक्ताचं नातं दुय्यम ठरतं. माझं आणि माझ्या पिढीच्या मंडळींचं प्राथमिक कुटुंब हे अशा ‘तयार केलेल्या नात्यांचं’ आहे.
स्वातंत्र्याची अनुभूती वाढण्याचं तंत्रज्ञानासह अजून एक महत्त्वाचं कारण म्हणजे बदललेल्या जगात व्यक्ती व्यक्तीला मिळालेली आर्थिक स्वायत्तता. गेल्या चार-पाच दशकात स्त्रिया कमवायला बाहेर पडल्या तेव्हा आर्थिक स्वायत्तता असणाऱ्यांचं समाजातलं प्रमाण एकदम वाढलं. पारंपारिक असे जातीचे आणि त्याबरोबर येणाऱ्या व्यवसायांचे जोखड निघून जाऊन नोकरदार मध्यमवर्ग अधिक विस्तृत झाला. तेव्हाच पुरुषही कुटुंबाच्या व्यवसाय किंवा पारंपारिक उपजीविकेच्या मार्गावर अवलंबून नसल्याने स्वायत्त होत गेला. ही स्वायत्तता गेल्या तीस वर्षांच्या जागतिकीकरणाच्या काळात अजूनच वाढली. साहजिकच कुटुंबावरचं अवलंबित्व कमी झालं.

कुटुंबव्यवस्थेशी निगडीत या बदलांचा आढावा घेतल्याशिवाय लग्न या विषयाकडे आपल्याला वळता येत नाही. याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे लग्न हाच पारंपारिक कुटुंबव्यवस्थेचा पाया आहे. पण वर उल्लेखलेल्या नव्या कुटुंबव्यवस्थेसाठी लग्न ही पूर्वअट नाही. साहजिकच लग्न ही गोष्ट थोडी मागे पडते. कमी प्राधान्याची बनते. अस्तित्वात असणाऱ्या नव्या कुटुंबव्यवस्थेत सगळ्या गरजा पूर्ण होत असतील तर मला लग्न केल्याने नव्याने काय मिळणार हा प्रश्न पडणं साहजिकच आहे. बौद्धिक, भावनिक, भौतिक आणि लैंगिक अशा माणसाच्या चार प्रमुख गरजा आहेत. यातल्या पहिल्या तीन तर माझ्या नव्या कुटुंबाकडून पूर्ण होतातच होतात, पण चौथी लैंगिक गरजही पूर्ण होणे सहज शक्य असते. विवाहपूर्व शरीरसंबंधांचं अस्तित्व नाकारण्यात काहीच अर्थ नाही. अजून याला व्यापक मान्यता नाही. पारंपारिक समजुतींचा जबरदस्त पगडा असल्याने या गोष्टीला लपवून ठेवण्याकडे बहुतेकांचा कल असतो. पण तरीही, ती अस्तित्वात आहेच. आणि अस्तित्वात आहे याचाच अर्थ लैंगिक गरजही भागण्याचे मार्ग आज उपलब्ध आहेत. ‘माझ्या चारही गरजा भागत असताना मी लग्नाच्या फंदात का पडू’ असा साहजिक प्रश्न अनेकांना पडतो. त्यातही लग्नाला जोडले गेलेले शब्द-वाक्य यांचा दोष फारच मोठा आहे. लग्न म्हणजे बंधन, लग्न म्हणजे तडजोड, लग्न म्हणजे स्वातंत्र्य संपले, लग्न म्हणजे बायकोची कटकट, लग्न म्हणजे सासूशी भांडण, लग्न म्हणजे मित्रांसाठी आता वेळ नाही वगैरे वगैरे असंख्य वाक्य असतात. ‘माझ्या सगळ्या गरजा पूर्ण होत असताना किंवा पूर्ण होण्याची शक्यता असताना मी या सगळ्या नकारात्मक आणि कटकटीच्या गोष्टी का बरं स्वीकारू? आपण होऊन स्वतःच्या पायावर धोंडा कशाला पाडून घ्यायचा’ असा विचार अनेकजण करतातच. तरीही ते पुढे जाऊन लग्न करतात, लग्नासाठी विवाहसंस्थांमध्ये नाव नोंदवतात कारण आपल्या आजूबाजूच्या मंडळींचं एक दडपण घेतलं जातं. डबक्यातून महासागरात आलो तरी आपल्याबरोबर डबक्यातून आलेली मंडळी आजूबाजूलाच असतात आणि त्यांचं मत पूर्णपणे डावलण्याचं धैर्य सगळ्यांना दाखवता येत नाही, काहीजण ती लढाई टाळूही बघतात. ज्याची त्याची निवड असते. यात चूक-बरोबर असं काही नाही, पण आहे हे असं आहे.

लग्नव्यवस्था कुठून अस्तित्वात आली इकडे आपण एकदा गेलं पाहिजे म्हणजे मग लग्न का करायचं किंवा नाही याचं उत्तर मिळू शकेल. हजारो वर्षांपूर्वी टोळी बनवून राहणारा मनुष्यप्राणी हा मातृसत्ताक पद्धतीने राहत होता म्हणतात. मुलांना वाढवणं, संगोपन करणं ही जबाबदारी अर्थातच स्त्रियांची होती. वडील कोण आहे हा प्रश्न बिनमहत्त्वाचा होता. मुलं आईवरून ओळखली जात. पुढे मग झालं असं की माणसाला शेतीचा शोध लागला. शेतीच्या शोधाबरोबर खाजगी मालमत्ता ही संकल्पना अस्तित्वात आली आणि त्याबरोबर माझी खाजगी मालमत्ता मी मेल्यावर कोणाकडे जाणार या विचारांतून माझा वारस कोण हा प्रश्न निर्माण झाला. शिकारीप्रमाणेच शेती करण्याची मुख्य जबाबदारी देखील पुरुषांकडेच होती. त्यामुळे माझा वारस कोण हे पुरुषाला कळणे आवश्यक आहे आणि त्यासाठी एका स्त्री-बरोबर एकच पुरुष असेल तर त्या स्त्री ने जन्म दिलेले अपत्य त्या पुरुषाचेच असेल, या सगळ्या विचारांतून लग्न नावाची संकल्पना अस्तित्वात आली. थोडक्यात, ‘आपला वारसा पुढे नेण्यासाठी नवीन पिढीला जन्म देणे’ हा लग्नाचा प्राथमिक उद्देश आहे.  लग्न का करायचं, आणि लग्न कधी करावं या दोन्ही प्रश्नांच्या उत्तराकडे जाण्याआधी हा लग्नाचा प्राथमिक उद्देश लक्षात घेणं अत्यावश्यक ठरतं. आयुष्यभराचा जोडीदार, हक्काचा माणूस, समजून घेणारी, आधार देणारी, सुख-दुःखात साथ देणारी अशी ‘एकच’ व्यक्ती हवी ही आपली नैसर्गिक गरज नसून, वर्षानुवर्षे परंपरेने आपल्याला तसे वाढवले असल्याने तयार झालेली विचारधारा आहे. सिनेमा-काव्य यातून या विचारधारेला खतपाणीच मिळालं. संपर्क माध्यमांची कमतरता, आर्थिक-राजकीय अस्थिरता अशा सगळ्या जुन्या काळात कदाचित या व्यवस्थेने सामाजिक स्थैर्य देत मानवजातीला मदतच केली असू शकते. पण तो स्वतंत्र लेखाचा विषय होईल. आजच्या काळात मात्र आपली विचारधारा ही नैसर्गिक नसून कृत्रिमपणे निर्माण केलेली आहे हे समजून घेणं आवश्यक आहे. त्यामुळे लग्न का करायचं याच्या उत्तरांमध्ये नवीन पिढीला जन्म देणे आणि तेही वारसा हक्क देण्याच्या दृष्टीने हे दोन मुद्दे फार महत्त्वाचे ठरतात. लग्न कधी करावं याबाबत डॉक्टर मंडळी आपलं मत मांडतातच त्यामुळे त्याबाबत खोलात मी जाणार नाही. पण लग्नाचा उद्देश हा नवीन पिढीला जन्म देणे हा आहे हे लक्षात घेतल्यावर तो उद्देश पुरा करण्यासाठी आपलं शरीर सर्वोत्तम अवस्थेत असतानाच लग्न करणं हे तर्कशुद्ध (लॉजिकल) आहे. आणि इथेच लग्न कधी करावं याचं उत्तर मिळतं. आज आमच्या पिढीची जीवनशैली ही अतिशय सुखाची आणि सर्व सोयींनी युक्त अशी आहे. अशावेळी लग्न करून एका दुसऱ्या व्यक्तीला आपल्या आयुष्यात महत्त्वाचं स्थान देऊन स्वतःचा कम्फर्ट झोन सोडणं ही गोष्ट बहुतेकांना कठीण जाते आणि मग हळूहळू घरात पालकांशी वादही व्हायला लागतात. आई-वडील मागे लागतात ‘लग्न कर’ म्हणून. आणि आपण मात्र मुळीच तयार नसतो. योग्य वयातच सगळ्या गोष्टी व्हायला हव्यात या पालकांच्या वाक्यात लग्नाचा मूळ उद्देश डोकावतो आणि म्हणूनच त्यांचं म्हणणं नजरे आड करता येत नाही. एकुणात मोठ्या कचाट्यातच ही पिढी अडकून बसली आहे.


मग यातून बाहेर पडण्यासाठी नेमकं करावं काय? मला वाटतं, परिस्थितीच्या रेट्यामुळे आपली कुटुंबाची व्याख्या बदलली आहे हे समजून घेणं आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे स्वीकारणं ही पहिली पायरी असू शकते. लग्न हा आयुष्याचा एक भाग आहे, नक्कीच महत्त्वाचा, पण एक भाग आहे, एकमेव नव्हे हेही समजून घ्यायला लागेल. लग्न करताना त्याबद्दलची आपली कारणमीमांसा पक्की असली पाहिजे. मी लग्न का करतो/करते आहे, हे नेमकं माहित असायला हवं.’लोक म्हणतात म्हणून’, ‘आता सगळेच मित्र करतायत म्हणून, अशी उथळ विचारधारा बाजूला ठेवायला हवी. मला माझ्या लग्नातून आणि लग्न ज्या व्यक्तीशी करणार आहे त्या व्यक्तीशी निर्माण होणाऱ्या नात्याकडून काय हवं आहे, मी काय देऊ शकतो, माझ्या चारही गरजा या एकाच जोडीदाराकडून पूर्ण व्हाव्यात अशी माझी अपेक्षा असणार आहे का? तसे नसल्यास त्याची दुसरी काही सोय असणार आहे का? त्याबद्दल तुम्ही तुमच्या जोडीदाराशी खुलेपणे बोलू शकणार आहात ना, खोटेपणापेक्षा नवीन नातं तयार करताना आपण प्रामाणिक वागणुकीचा पाया रचू शकणार ना; अशा सगळ्या सगळ्या मुद्द्यांवर आमच्या पिढीने सविस्तर विचार करण्याची गरज आहे. याचे कुठे कोचिंग क्लासेस नाहीत, ना याचं काही टेक्स्टबुक. व्यक्तीनुसार बदलतील हे विचार. आणि हा विचार करताना आपण महासागरात आहोत, हे लक्षात घेऊन जुन्या डबक्यातल्या आजूबाजूच्या मंडळींची चिंता न करण्याचं धोरण ठेवावं लागेल. स्वतंत्र मनोवृत्तीने, तर्कसंगत विचार करत आपण निर्णय घेणं शिकण्याची गरज आहे. ‘माझ्या निर्णयाला मीच जबाबदार, यातले यश आणि अपयश दोन्ही माझेच’ हा प्रगल्भ विचार घेत पुढे जाणं गरजेचं आहे. मला माहित्ये की हे सगळं काही सोपं नाही. आपली कुटुंबाची व्याख्या जितकी सहजपणे आणि कदाचित नकळतपणेही बदलली तसं नातेसंबंधांच्या किंवा लग्नाच्या बाबतीत होणार नाही. इथे कदाचित विशेष प्रयत्न करावे लागतील. पण ते करणं हेच आमच्या पिढीसाठी आणि पुढच्याही पिढ्यांसाठी गरजेचं आहे. ही एक उडी आहे. तंत्रज्ञान ज्या वेगात पुढे जातंय त्याबरोबर पुढे जाताना फरफट होऊ नये यासाठी आम्हाला प्रगल्भ व्हावं लागेल. त्या प्रगल्भतेच्या दिशेने मारायची ही उडी आहे. उडी मारताना जसं थोडं मागे जाऊन आपण पळत येऊन मग उडी मारतो, तसंच पुन्हा एकदा जरा मागे जात, आपण निर्माण केलेल्या व्यवस्था, समजुती आणि परंपरा यांना तर्कशुद्ध विचारांच्या कसोटीवर घासून पुसून तपासून आम्हाला उडी मारायची आहे. एक मोठी उडी! 

(जानेवारी २०१८ मध्ये विश्व संवाद केंद्र, मुंबई यांच्या युवा विशेषांकात प्रसिद्ध.)

1 comment:

  1. परीपक्वतेने निर्णय घेऊन होणाऱ्या परिणामांना सामोरे जायचं ही मानसिकता ,तुमच्या पिढीची मला आवडते.

    ReplyDelete