संक्रांतीच्या शुभेच्छांसोबत जे काही
फोटो, चित्र
फॉरवर्ड होतात त्यात हमखास पतंग असतो. संक्रांतीला
पतंग उडवण्याची महाराष्ट्रात विशेष पद्धत नाही. गुजरात-राजस्थान बाजूला संक्रांत
आणि पतंग यांचं नातं अधिक जवळचं. पण पतंग उडवायला निमित्त थोडीच लागायचं? लहानपणी
आम्ही शुक्रवार पेठेत राहायचो तेव्हा भरपूर पतंग उडवायचो. आणि या पतंग उडवण्याचा
कलेत माझ्या इतका अडाणी प्राणी माझ्यातरी बघण्यात नव्हता. मला आयुष्यात फार कमी
वेळा पतंग नीट उडवता आलाय. एक तर आधी पतंग उडायचा नाही. उडालाच तर मला त्याला
सांभाळता यायचं नाही. उडायला लागल्यावर आनंदाने मी भरपूर ढील देणार आणि मग पतंग
माझं ऐकणं बंद करणार, असं फार वेळा घडायचं. कित्येक पतंग असेच वाया घालवल्यावर माझ्या मोठ्या
भावाचा- अमेयचा आणि मित्रांचाही ओरडा खाल्लाय. नंतर मग अमेय मला पतंग हातातच
द्यायचा नाही. त्याच्या मागे उभं राहून मांजाला ढील देणं किंवा मांजा गुंडाळून
घेणं हेच माझं मुख्य काम बनलं होतं. किंवा पतंगाला मांजा बांधणे, शेपटी लावणे असं काय काय मी करायचो. त्यात मात्र मी तरबेज झालो. हाताची
वीत करून मांजा गुंडाळायची पद्धत इतकी अंगात भिनलीए की आता लॅपटॉपची वायर पण तशीच
गुंडाळली जाते.
गच्ची गच्चीत पतंग उडवणाऱ्या
पोरांमध्ये स्पर्धा असायची तेव्हा दुसऱ्याचा पतंग कापायचा तर मांजाला धार पाहिजे.
म्हणून मग रात्री बसून मांजाला खळ लावणे वगैरे उद्योग केल्याचं चांगलं लक्षात आहे.
हे करताना आमचेही हात कापले गेलेत. पण ती त्यावेळी अभिमानाने मिरवण्याची गोष्ट
वाटायची.
'मांज्यामुळे पक्षी
जखमी' अशा बातम्या आता वाचायला मिळतात, पण त्यावेळी हे सगळं कुठे माहीत होतं? माहीत असतं
तरी कळून घेतलं असतंच असं नाही. समोरच्याचा पतंग कसा काटता येईल हेच डोक्यात,
बाकी जगाचं काही का नुकसान होईना. आपला समाज पण असाच कधी कधी लहान
मुलांसारखा वागतो, नाही?! समाज हा लहान
मुलासारखा वागतो म्हणून त्याला सतत कोणीतरी मायबाप सरकार लागतं का? आमच्या गावात आम्हीच सरकार असा अस्सल लोकशाही नारा देत, स्वतःची जबाबदारी स्वतः घ्यायला आणि एक प्रकारे प्रौढ, प्रगल्भ व्हायला घाबरतो का आपण? काय माहित.
No comments:
Post a Comment