आज कित्येक वर्षांनी डेक्कन क्वीनने पुणे-मुंबई प्रवास केला. पूर्वी ते ६ जणांचं कम्पार्टमेंट पुरेसं
मोठं
वाटायचं. आता ते छोटं वाटतं. गाडी सुरु व्हायला काहीच
वेळ असताना एक जोडपं आलं आणि पाठोपाठ एक आई-मुलगी अशा एकदम तीन स्त्रिया आल्या. तेव्हा पटकन कोणीही काहीही न बोलता
दोन्ही बाजूच्या सहा-सहा जणांच्या
कम्पार्टमेंट्स मधल्या जागांची आदलाबदल वगैरे झाली. अगदी सहजपणे घडलं हे. कोणी काही विचारलं नाही, बोललं नाही. मग एका बाजूला पाच स्त्रिया, आणि त्यातल्या एकीचा नवरा असे ६ बसले गेले. दुसऱ्या बाजूला आम्ही ६ आडदांड बाप्ये. जागा अजूनच कमी झाल्याचा
भास झाला तेव्हा मला. एवढं घडतंय तोवर दख्खनची राणी निघाली.
सुरुवातीचा काही काळ थंड शांततेत गेल्यावर
मग माझ्या समोरच्या माणसाच्या हातात 'सामना' बघून आमच्या गप्पा सुरु
झाल्या. अरुण नाव त्यांचं. पन्नाशीचे असावेत साधारण. पुढे गप्पांमधून समजलं की
कट्टर शिवसैनिक. पूर्वी कुठलेतरी शाखाप्रमुख वगैरे होते म्हणाले. "सतरा वर्षांचा असताना
पहिल्यांदा बाळासाहेबांना ऐकलं आणि त्यांचा भक्तच झालो", ते म्हणाले. एकदा राजकारणाच्या गप्पा
सुरु झाल्यावर बाकीचेही सहभागी झाले. एकजण शरद पवार समर्थक तर दुसरे होते ते
पूर्वी कॉंग्रेसचे पाठीराखे होते पण आता मोदींनी जादू केलीये म्हणत होते. पण हे म्हणता म्हणताच राहुल
गांधी आता जरा मोठा झालाय असंही म्हणत होते. चौथे जे काका होते, ते मात्र सगळ्याच राजकारण्यांना एकजात
शिव्या घालत होते. ते म्हणाले, "मी वेगवेगळ्या निवडणुकांत
वेगवेगळ्या लोकांना मतं दिली आहेत आजवर. कम्युनिस्ट ते आम आदमी
पार्टी, व्हाया शिवसेना-भाजप-मनसे, पण एकही पक्ष लायकीचा नाही." त्यामुळे गेल्या पालिका
निवडणुकीत 'नोटा' वापरलं असं म्हणाले.
तेवढ्यात डेक्कन क्वीनचं प्रसिद्ध ऑम्लेट आणि कटलेट आलं. ते घेऊन पहिला घास
घेईपर्यंत काही काळ शांतता झाली आणि मग खाता खाता पुन्हा चर्चा सुरु. मी सगळं फक्त शांतपणे ऐकत होतो. मध्येच एखादा प्रश्न
विचारून बोलायला उद्युक्त करत होतो इतरांना. ‘शेतकरी आत्महत्या का करतात’ याविषयावर एकदा चर्चा येऊन गेली. पण यातलं कोणालाच फारसं
माहित नाही म्हणल्यावर चर्चेची गाडी मुंबईवर आली. आमच्यातले तिघेच मुंबईकर होते. सेनेचे अरुण म्हणाले, "आम्ही मराठी माणसाला पुरेसा न्याय नाही देऊ शकलोय. अजून बऱ्याच गोष्टी करायला
हव्या होत्या. मला वाटलं होतं राजसाहेब काहीतरी करतील. पण तसं काय घडत तरी नाहीये." मी त्यांना विचारलं की
तुम्ही नाही का मनसेमध्ये गेलात, तर म्हणाले, "मी बाळासाहेबांचा सैनिक आहे. शिवसेनेला दगा कसा देऊ? राज आणि उद्धव यांनी एकत्र आलं पाहिजे. मी राजसाहेबांच्या सभांना
जातो, मला ते आवडतात. पण काम सेनेचंच
करणार.".
"पर्यावरण हा मुद्दा मोठाय आणि त्यावर कोणताच पक्ष काहीच बोलत नाही", असं ते शरद पवार समर्थक काका म्हणाले. शिवाय भ्रष्टाचार सगळ्याच
पक्षात आहे असंही बोलणं झालं. त्यावर इतरांनी दुजोरा दिला. असं करत करत शेवटी, सगळेच पक्ष सुधारण्याची गरज आहे असा
एकमताने निष्कर्ष निघाला.
"मग सगळे चांगले लोक बाहेर पडून वेगळा पक्ष का काढत नाहीत?",
असं ते सुरुवातीपासून
सगळ्यांना शिव्या घालणाऱ्या काकांनी विचारल्यावर सेनेचे अरुण म्हणाले, तसं केलं तर त्यांचा पुन्हा 'आप' होईल. त्यापेक्षा प्रत्येकाने
आपापला पक्ष सुधारण्याचे प्रयत्न केले पाहिजेत. पक्ष भेद असले म्हणून
एकमेकांच्या उरावर बसायची गरज नाही, एकोप्याने चांगलं काम करता
येतं अशीही चर्चा झाली. कल्याण स्टेशन आलं तेव्हा
चर्चा हळूहळू थंड होऊन एक दोघांना डुलकी लागू लागली होती.
थोड्या वेळाने मी दरवाजात वारा खात उभा राहिलो. दरवाजातच खाली एक एकोणीस-वीस वर्ष वयाचा मुलगा बसला होता. नुसतं बघितल्यावर, याची आयुष्यात यो यो हनी सिंगच्या पलीकडे
संगीतातली रुची गेली नसेल असा दिसणारा. पण त्याने मोबाईलवर कौशिकी
चक्रवर्तीचं गायन लावलं होतं. आणि तल्लीन होऊन तो ऐकत होता. “समोर आलेली व्यक्ती ही
राजकारणी असो नाहीतर सामान्य माणूस, किती पटकन आपण एखाद्याबद्दल आपल्या मनात प्रतिमा तयार करतो ना? कित्येकदा तर चुकीचीच...” हा विचार मी करत असतानाच दख्खनची राणी दादर
स्टेशनमध्ये शिरली. आणि मी बाहेर पडून मुंबईच्या सकाळच्या त्या अवाढव्य
गर्दीत मिसळून गेलो.
No comments:
Post a Comment