Friday, January 17, 2020

निवडकतेचा बागुलबुवा


जे गेले काही वर्ष सामाजिक-राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत, मत व्यक्त करत आहेत; त्यांच्याकडून जर सध्याच्या सरकारवर टीका केली गेली तर त्यांना सरकार समर्थकांकडून एका विशिष्ट अस्त्राचा सामना करावा लागतो- ‘तेव्हा कुठे होतात हे त्या अस्त्राचं नाव. सुरुवाती सुरुवातीला भले भले कार्यकर्ते या अस्त्राने गांगरून गेले. तेव्हा आम्हा छोट्या कार्यकर्त्यांची काय कथा? ‘आपण दुटप्पी आहोत, आपण निवडक विरोध करतो’ अशी टीका आपल्यावर होईल ही भीती तर होतीच. पण त्याबरोबर आपण जे मुद्दे मांडतो आहोत ते मागेच पडतील अशीही भीती होती. घडलंही तसंच. मुद्द्यापेक्षा मुद्दा मांडणाऱ्यावर शाब्दिक हल्ले सुरु झाले आणि आपले मुद्दे लोकांपर्यंत नेता यावेत यासाठी कार्यकर्त्यांची समतोल व्यक्त होण्याची, विश्वासार्हता कमावण्याची एक केविलवाणी धडपड सुरु झाली. कार्यकर्ते अगदी अलगदपणे या जाळ्यात अडकले. याचं कारण, भारत मोठा देश आहे आणि राजकीय-सामाजिक उलथापालथ सतत सुरु असते, अशा स्थितीत घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीवर अभ्यासपूर्ण टिपण्णी करणं कोणत्याही सामान्य माणसाला केवळ अशक्य आहे. काही ना काही हातून सुटणारच. आणि हातून गोष्ट सुटली की ‘तेव्हा कुठे होतात’ या अस्त्राचा मारा सुरु होतो. ‘तुम्ही टीकाकार निवडक टीका करता म्हणून आम्ही तुमच्या टीकेकडे लक्ष देणार नाही’ असा संदेश आपल्याच आजूबाजूच्या मंडळींकडून कार्यकर्ता अनुभवतो तेव्हा अजूनच भांबावून जातो. आणि हे व्यापक प्रमाणात जरी गेल्या काही वर्षांत घडताना दिसलं असलं तरी यावर काही विशिष्ट विचारसरणीच्या लोकांचा कॉपीराईट नाही. सर्वच बाजूंचे लोक समोरच्या बाजूच्या लोकांच्या निवडकतेवर थेट आक्रमकपणे किंवा अप्रत्यक्षपणे टीका करताना दिसतात. अशावेळी भांबावलेल्या कार्यकर्त्यांसाठी आणि कोणत्याही निमित्ताने ‘तेव्हा कुठे होतात’ अस्त्राचा वापर करणाऱ्या मंडळींसाठी खास हा लेखप्रपंच.

सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे हे समजून घेऊया की, आपल्यातला प्रत्येक जण, होय अगदी प्रत्येक जण, कशावर बोलायचं, कधी बोलायचं, किती बोलायचं, कौतुक करायचं की टीका करायची हे सगळं ‘निवडतो’. केवळ सामाजिक-राजकीय क्षेत्रात नव्हे, प्रत्येक बाबतीत ठरवतो. घरात सुद्धा कोणाशी किती कधी कसं बोलायचं हे डावपेच अतिशय काळजीपूर्वक आखतो. कधी कळत, कधी नकळत. याचं कारण उघड आहे, माणूस एकाच वेळी सतत सगळ्या आघाड्यांवर लढू शकत नाही. आपण आपल्या लढाया ‘निवडतो’. आपली क्षमता किती, आपकडे उपलब्ध वेळ आणि ऊर्जा किती अशा गोष्टी विचारांत घेऊनच कोणताही माणूस ही निवड करत असतो. त्यात काहीही गैर नाही, दुटप्पी तर नाहीच नाही.

विचार करा, “बाबा आमटेंनी विदर्भात काम सुरु केलं, पण कोकणात का बरं नाही केलं? कोकणात काय महारोगी नव्हते का?” असा कोणी प्रश्न केला तर? किंवा “तुम्ही फक्त राळेगणसिद्धीचा कायापालट केलात, पण इतर हजारो खेड्यांचं दुःख तुम्हाला दिसलं नाही का?”, असा प्रश्न अण्णा हजारेंना केला तर? “मेळघाटात कुपोषणासाठी काम करता तर देशात इतर ठिकाणी कुपोषणग्रस्त नाहीत का?” असा प्रश्न मेळघाटात काम करणाऱ्या संस्थांना आपण करतो का? का बरं नाही करत? कारण आपण हे समजून घेतो की एखादी व्यक्ती आपल्या स्वतःच्या क्षमतेनुसार, त्या व्यक्तीला उपलब्ध असलेल्या पैसा, वेळ, ऊर्जा या स्रोतांचा विचार करून काम उभं करते. अगदी हाच समजूतदारपणा सध्या कार्यकर्त्यांच्या अंगावर येणाऱ्या ट्रोलकऱ्यांमध्ये दिसत नाही. एखादी व्यक्ती तबला शिकायला लागली म्हणजे ‘सतार का नाही’ हा प्रश्न जितका बावळटपणाचा आहे तितकाच अमुक गोष्टीबद्दलच का बोलता हाही प्रश्न आहे.
मग दुटप्पीपणा केव्हा होतो असं म्हणता येईल? दुटप्पीपणा तेव्हा होतो जेव्हा, स्वतःच्या विचारांना सुसंगत अशीच, पण आपल्याला न पटणाऱ्या व्यक्तीने/व्यक्तीसमूहाने भूमिका घेतल्यास त्यांची ती भूमिका अमान्य करणे. म्हणजे हिंसाचाराला माझा विरोध असेल तर मी घडणाऱ्या प्रत्येक हिंसाचाराचा विरोध करणं अशक्य आहे, पण विरोध करणं सोडाच, त्या हिंसाचाराचं मी समर्थन करत असेन तर तो झाला दुटप्पीपणा. जोवर तुमची वर्तणूक या प्रकारात मोडत नसेल तोवर दुटप्पीपणाचा आरोप होईल या भीतीखाली कार्यकर्त्यांनी राहण्याची गरज नाही. ज्या व्यक्तीला जे मुद्दे, जे प्रश्न जवळचे वाटतात तिने त्या मुद्द्यांवर, त्या प्रश्नांवर काम करावं इतकं हे सोपं आहे. कोणाला केरळमधल्या हिंसाचाराच्या विरोधात उतरायचं असेल तर त्याने त्यासाठी उतरावं, कोणाला जेएनयूमधल्या हिंसाचाराच्या विरोधात बोलायचं असेल त्याने त्याबद्दल बोलावं. ज्याला एकाच पक्षाच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात उतरायचं असेल त्याने त्या विरोधात उतरावं. कोणाला दुसऱ्या एका पक्षाच्या चुका दाखवायच्या असतील तर त्याने त्यात वेळ द्यावा. या निवडीमुळे कोणी दुटप्पी ठरत नाही ही गोष्ट मनावर कोरून घ्यायला हवी.

‘मुद्दा निवड’ स्वाभाविक आहे. ती मानवी आहे. आपण सुपर-ह्यूमन्स म्हणजे अतिमानव नाही. मानवी क्षमतांनुसारच आपण भूमिका घेणार. ‘सगळ्या मुद्द्यांवर बोला’ आणि ते जमत नसेल तर ‘कशावरच बोलू नकाअसा जो अवास्तव आग्रह अनेकांकडून घेतला जातो तो जुमानायची गरज नाही. ‘कशावरच बोलू नकाचा विजय होणं लोकशाहीसाठी महाभयंकर धोकादायक आहे. प्रत्येक माणसाची वृत्ती आणि क्षमता वेगळी असते. तुम्हाला जमेल-रुचेल-पचेल त्या मुद्द्यावर, जमेल-रुचेल-पचेल तसं आणि तेव्हा व्यक्त होण्यात, लढण्यात कसलीच अडचण नाही. तुम्हाला जे योग्य मुद्दे वाटतात ते घेऊन आंदोलन करा, आंदोलनांत सहभागी व्हा. लढा उभारा. पण लढा कोणाविरुद्ध असला पाहिजे? तो असला पाहिजे त्या त्या ठिकाणच्या सामर्थ्याच्या केंद्राविरुद्ध, निर्णयकेंद्राविरुद्ध, सत्ताकेंद्राविरुद्ध. इतर आंदोलकांविरुद्ध नव्हे! दोन स्वतंत्र ठिकाणच्या एकाच प्रकारच्या अन्यायाबद्दल बोलणारे दोन आंदोलक एकमेकांचे शत्रू बनत नाहीत, किंबहुना बनता कामा नयेत- वेगळ्या विचारसरणीचे किंवा वेगळ्या पक्षाला/नेत्याला मानणारे असले तरीही. ते दोघे एकमेकांचे नैसर्गिक मित्र (Natural ally) व्हायला हवेत, साथी व्हायला हवेत. असं घडलं त्यांची निष्ठा मुद्द्याप्रती आहे आणि नेत्याप्रती किंवा पक्षाप्रती नाही हे म्हणता येईल.

खरंतर ‘तेव्हा कुठे होतात’ या अस्त्राचा वापर करणाऱ्यांवरच हे अस्त्र उलटवणं सहज शक्य आहे कारण असं म्हणणारेही निवडक टीका/कौतुक करत असतातच. पण अस्त्र उलटवून काहीच फायदा नाही. त्या चक्रव्यूहात अडकायलाच नको. निवडकतेचा बागुलबुवा ठामपणे नाकारायला हवा. आपल्यातल्या प्रत्येक जण निवडक आहे आणि ते मानवी आहे या सत्याचा स्वीकार करून काम करत राहू. ‘अमुक ठिकाणी काम करताय पण तमुक ठिकाणी का नाही’ असा प्रश्न करणाऱ्यांना सांगूया की ‘तू तमुक ठिकाणी काम कर, तुला किंवा तमुक ठिकाणी जे काम करतील त्यांनाही आमचा पाठींबा आहेच!’. हा ‘पोलिटिकल करेक्टनेस’ नाही. ही आहे प्रगल्भ सामाजिक समज. इतपत विशाल मनाने आपण आपल्या विरोधी विचारांच्याही लोकांना स्वीकारू का? हे जमवायला तर हवंच. काळाची गरजच आहे ही. जमवूया!

(दि. १७ जानेवारी २०२० रोजी प्रकाशित झालेल्या दै सकाळ मध्ये प्रसिद्ध.)

No comments:

Post a Comment