Sunday, March 28, 2010

देव...

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्याशी गप्पांचा कार्यक्रम नुकताच झाला. परिवर्तन या आमच्याच संस्थेने तो आयोजित केला होता. या निमित्ताने पुन्हा एकदा डोक्यात श्रद्धा-अंधश्रद्धा, देव संकल्पना, वैज्ञानिक दृष्टीकोन, अध्यात्म या सगळ्या विचारांचे वादळ उठले.
शाळेत असताना इतर असंख्य मुलांप्रमाणेच मीही "देव नाही" अशा मताचा झालो होतो... पुढे पुढे जस जसा मोठा झालो, विचार करू लागलो तस तसा मी देव ही "संकल्पना" म्हणून मान्य करू लागलो. "मनाला बरं वाटावं, मानसिक आधार" म्हणून माणसाने देव या संकल्पनेची निर्मिती केली असा माझा ठाम विश्वास तयार झाला. मी निसर्गाला देव म्हणू लागलो कारण 'संपूर्ण विश्वाची गती आणि उर्जा' म्हणजेच देव आशी मी देवाची व्याख्या केली. आणि त्यानुसार निसर्ग हाच देव असे मी ठरवले. पण मग जेव्हा मी अशा काही लोकांच्या संपर्कात आलो की जे मला सांगत होते की अरे हे सगळं विज्ञान आहे. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्राच्या नियमाप्रमाणे सर्व काही चालू आहे. उत्क्रांतीवादाच्या नियमाप्रमाणे आपण तयार झालो आहोत..... देव वगैरे सगळं काही झूट आहे....तेव्हा मी विचारात पडलो...
पण मग असा लक्षात आलं की "उर्जेचे स्वरूप बदलता येते पण, उर्जा निर्माण करता येत नाही आणि नष्टही करता येत नाही" हा भौतिकशास्त्रातला नियम आहे... मग सगळं भौतिकशास्त्राप्रमाणे वैज्ञानिक पद्धतीनी चालू आहे असं असलं तरी सुरुवातीला जी प्रचंड उर्जा या विश्वात तयार झाली असेल ती "तयार" कोणी केली??? कोणत्याही सामान्य मानवाचे तर हे काम नक्कीच नाही.... आणि म्हणूनच या विश्वाच्या आणि उर्जेच्या निर्मात्याला, म्हणजेच निसर्गाला देव असे म्हणावे असे मी ठरवले...
देव आहे हे ठरलं पण पुढे प्रश्न आला श्रद्धेचा.... श्रद्धा व्यक्त कशी करावी? मंदिरातल्या मूर्तीला नमस्कार करून "सगळं नीट होऊ दे रे बाबा!" असं म्हणणं म्हणजे श्रद्धा बाळगणं का?? हे मला पटेना... देवाबद्दल आणि माहित नसलेल्या त्या प्रचंड उर्जेच्या निर्मात्याबद्दल माझ्या मनात श्रद्धा आहे, आदर आहे... पण ती व्यक्त कशी करावी हा सर्वस्वी माझा प्रश्न आहे असे मला वाटू लागले.
आणि इथेच मी माझ्या दुसऱ्या मताची आणि नव्याने तयार तिसऱ्या मताची सांगड घातली. मनाला बरं वाटेल मानसिक समाधान मिळेल अशा कोणत्याही मार्गाने श्रद्धा ठेवायला निसर्ग देव परवानगी देतो असे माझे ठाम मत बनले. शिवाय देव हा मूर्तीत शोधायची गरज नाही तो प्रत्येक गोष्टीत आहे या संतांच्या भूमिकेचा मी माझ्या परीने जेव्हा विचार केला तेव्हा माझ्या लक्षात आलं की प्रत्येक गोष्टीत उर्जा आहे, गती आहे... आणि म्हणूनच त्यांचा निर्माताही सृष्टीत सर्वत्र आहे... आणि सर्वत्र म्हणजे माझ्यातही आहे....
इथेच माझ्या अध्यात्मावरच्या विचारांची सुरुवात झाली. आधुनिक विज्ञानाने हे सिद्ध केले आहे की माणूस त्याच्या मेंदूच्या क्षमतेच्या १०-१६ टक्केच भाग वापरतो.... आईनस्टाइन त्याचा मेंदू इतर कोणत्याही मानवापेक्षा जास्त म्हणजे १६ टक्क्यांपर्यंत वापरायचा असं आधुनिक शास्त्र सांगतं... वैज्ञानिक पद्धतीनी सिद्ध झालेली ही गोष्ट....! असं असताना जी गोष्ट वापरात नाही ती गोष्ट उत्क्रांत्वादाच्या नियमाप्रमाणे नष्ट व्हायला हवी होती..... "होमो इरेक्तस" नावाचा मानव अतिशय सामान्य बुद्धिमत्तेचा होता... तो उत्क्रांत होत होत आजचा "होमो सेपियन सेपियन" हा हुशार मानव तयार झाला. पण मानावांमधील सगळ्यात हुशार मानव जेमतेम १६ टक्के मेंदू वापरात असेल तर उर्वरित ८४ टक्के मेंदू, माणसाची शेपटी जशी वापर नसल्याने नष्ट झाली तसाच नष्ट व्हायला हवा होता. पण तसे गेल्या हजारो वर्षात घडलेले नाही. काय कारण असेल याचं? माणसाचा उरलेला ८४ टक्के मेंदूही कार्यरत असणार आणि म्हणूनच तो उत्क्रांतीच्या प्रक्रियेत टिकून आहे..!! पण ८४ टक्के मेंदू काय काम करतो याचं उत्तर आधुनिक विज्ञान अजूनपर्यंत देऊ शकलेले नाही. माझ्या मते, तो उर्वरित ८४ टक्के मेंदू म्हणजेच जो प्रत्येक माणसात आहे असे आपण म्हणतो तो देवाचा अंश. तो देवाचा अंश प्राप्त करण्यासाठीच, ती प्रचंड अशी अध्यात्मिक अनुभूती मिळवण्यासाठीच लोक जीवाचा आटापिटा करतात... कारण आत्ता वापरतो त्यापेक्षा पाचपट जास्त मेंदू वापरता आला तर ती उर्जा केवढी प्रचंड असेल याचा आपण अंदाजही करू शकत नाही.

अध्यात्म म्हणजे दुसरे तिसरे काही नसून हा ८४ टक्के मेंदू कार्यान्वयित करण्याचा प्रयत्न आहे असे माझे ठाम मत आहे. त्यासाठी आपल्या वेदांमध्ये योग साधना सांगण्यात आली संतांनी नामस्मरणाचा मार्ग सांगितला. योग काय किंवा नाम स्मरण काय, त्याचा मूळ गाभा एकंच आहे असे नीट पाहिल्यावर आपल्या लक्षात येते. याचा मूळ गाभा आहे आपल्या शरीरातली सर्व उर्जा एखाद्या ठिकाणी केंद्रित करणे... स्वामी विवेकानंद ध्यानमग्न अवस्थेत जेव्हा बसायला सांगतात तेव्हा त्याचा अर्थ असतो निस्तब्ध बसून अंगातली सारी उर्जा केंद्रित करणे....आणि त्यामुळेच अनेकांना जी अध्यात्मिक अनुभूती येते ती केवळ त्यांचा ८४ टक्के मेंदू कार्यान्वयित झाल्यामुळे येत असली पाहिजे असं मला वाटतं. अनेकदा आपण पाहतो/ऐकतो की संत साधू हे वासना लोभ या "सर्वांपलीकडे" गेलेले असतात.... याचा अर्थ काय? याचा अर्थ असं आहे की त्यांचा ८४ टक्के मेंदू कार्यान्वयित झालेला असल्यामुळे त्यांना, सामान्य १६ टक्के मेंदूच्या माणसाला ज्या वासना, इच्छा आकांक्षा असतात त्या शिल्लकच राहिलेल्या नसतात. ते १६ टक्क्यांच्या पलीकडे गेलेले असतात...!!!!

बौद्ध तत्वज्ञानाप्रमाणे शरीर हे मेल्यावरही कुठल्या न कुठल्या स्वरुपात शिल्लक राहते (वैज्ञानिक दृष्ट्या हे पटते. कारण शरीर म्हणजेही एक प्रकारची उर्जाच!! ), म्हणजेच मेल्यानंतर माणसाच्या शरीरातील उर्जेचे रूप बदलते आणि माणूस विश्वातल्या विविध उर्जांमध्ये विखुरला जातो त्यालाच आपण देवाघरी जाणे म्हणतो कारण देव सर्वत्र आहे, कुठल्याही उर्जेत जरी मनुष्याचे शरीर गेले तरी ते देवाचेच म्हणजेच त्या माहित नसलेल्या प्रचंड उर्जेचेच घर असते....!!! ८४ टक्के मेंदू कार्यान्वयित केलेल्या व्यक्तीस आधीच देवाचा म्हणजेच उर्जेचा साक्षात्कार झालेला असतो, अशा वेळी जगातल्या इतर उर्जेत विलीन होण्याचे भय या लोकांना का बरं वाटेल??? आणि म्हणूनच त्यांना मृत्यूची भीती वाटत नाही... त्यांनाच आपण संत म्हणतो!!!!

परंतु १६ टक्क्यांच्या पलीकडे जाणारे/जाऊ शकणारे फारच थोडे असतात. आणि म्हणूनच १६ टक्के बुद्धिमत्ता असलेल्या तुमच्या माझ्यासारख्या सामान्य लोकांनी धर्म संकल्पना आणली... आणि त्याबरोबरच देव ही कोणतीतरी बाह्य गोष्ट आहे आणि तिला खुश केल्याने आपले जीवन सुकर होणार आहे अशी समजूत सामान्य माणसांनी करून घेतली. याच्यात अनेकांनी स्वतःचा फायदा कसा होईल ते बघितले. दुसऱ्यावर कुरघोडी करायच्या मानवी स्वभावानुसार स्वतःचे महत्व टिकवण्यासाठी काही जणांनी नवीन धर्म तयार केले. प्रत्येक धर्माला मानणाऱ्या लोकांमध्ये १६ टक्क्यांच्या पलीकडे पोचलेले काही लोक होऊन गेले. आणि त्यांच्या असं लक्षात आला की वेगवेगळे धर्म म्हणजे शेवटी शरीरातली सर्व उर्जा केंद्रित करायचे विविध मार्ग आहेत इतकंच... शेवट होतो तो एकाच ठिकाणी!!! आणि म्हणूनच ते म्हणू लागले "राम रहीम एक है..."

धर्माच्या नावाखाली जे काही अत्याचार केले गेले, नियम बनवले गेले ते केवळ आणि केवळ समाजातल्या एका गटाने दुसऱ्या गटावर वर्चस्व गाजवण्यासाठी...!! त्यामागे कोणतीही दैवी अशी गोष्ट नाही.

या संदर्भात थोडे वाचन केल्यावर मला असे जाणवले की पूर्वीपासून देव आकाशात राहतो असे मनात असल्यामुळे त्याला खुश करायचे तर आकाशात काहीतरी पाठवले पाहिजे असे आपल्या पूर्वजांना वाटू लागले, एखादी गोष्ट जाळली की धूर बनून आकाशात जाते ही गोष्ट पाहून आपल्या बुद्धिमान पूर्वजांनी देवासाठी विविध गोष्टी पाठवण्यासाठी यज्ञ करायला सुरुवात केली.... देवाला काय आवडते याचा स्वतःच काही विचार केला आणि त्या गोष्टींची आहुती ते यज्ञात देऊ लागले. अशा असंख्य विचारांमधून अनेक वर्षांच्या अनेक लोकांच्या मंथनातून आजच्या रूढी तयार झाल्या आहेत. त्या सगळ्याच उत्तम आहेत योग्य आहेत हे म्हणणं जितका मूर्खपणाचे ठरेल तितकंच या सगळ्याच गोष्टी टाकाऊ आहेत हेही म्हणणे मूर्खपणाचे आहे.
संपूर्ण मेंदू कार्यान्वयित झालेल्या लोकांना आपण इतर सामान्य लोकांचे आयुष्य सुधारावे असे वाटू लागले. प्रचंड बुद्धिमत्ता त्यांना आता वापरता येत असल्यामुळे त्यांनी सामान्य लोकांना प्रभावित केले आणि काही चांगल्या गोष्टी "देवाची" भीती घालत करायला लावल्या. त्यामुळेच कित्येक रूढी परंपरांमध्ये आपल्याला विज्ञान आढळते... याचेच एक छोटेसे उदाहरण: गणपतीची किंवा कोणत्याही देवतेची आरती करताना कापूर का जाळायचा असा प्रश्न विचारलात तर त्याचं उत्तर आहे की कापूर जाळल्याने हवेतील जंतू-सूक्ष्मजीव मरतात..!! लोकांची मानसिकता ही लहान मुलांसारखी असते. रात्री दात घास असं सांगितलं की लहान मुलं ऐकत नाही, पण रात्री दात नाही घासलेस तर बागुलबुवा येईल असे सांगितल्यावर ही मुले दात घासायला उठतात. एखादी गोष्ट रोज करा असं सांगितलं तर किती लोक करतील? उलट ती नाही केली तर देव रागवेल अशी भीती घातल्याने लोक चांगल्या प्रथा अंगिकारतात असं संतांच्या लक्षात आलं. अर्थातच असंख्य भोंदू लोकांनी या सगळ्याचा फायदा घेतला आणि समाजाला व लोकांना हजारो वर्षे लुटले. आता हे सर्व थांबले पाहिजे. सर्व प्रथा रूढी परंपरा यांचा वैज्ञानिक दृष्टीने विचार व्हायला हवा, पण त्याचबरोबर प्रत्येकात असणाऱ्या देवाला नाकारण्याची चूक टाळण्याची दक्षता घ्यावी, वैज्ञानिकांनी अध्यात्म आणि विज्ञान याची सांगड घालायचा प्रयत्न करावा असे मला वाटते.

सर्वात जास्त मेंदू वापरणारा मानव असं म्हणल्या गेलेल्या आणि विज्ञानावर परमभक्ती असणाऱ्या आईनस्टाइनने सुद्धा देवावर, देवाच्या अस्तित्वावर उघड विश्वास प्रकट केला होता.... आपण तर जेमतेम १० ते १५ टक्के मेंदू वापरणारे लोक आहोत.....!!!!!

2 comments:

  1. hey...finally mazach to pahila maan! wachlay ho sagla....! hmm..tyawar ithe kahich lihit nai..karan tyatlya baryachshya goshti aplya bolnyat yapoorvi yeun gelyat.. kahi matanshi mi sahamt ahe,kahi kadachit mazya neatshi pachani padli nahiet,or dumat ahe...! mazya weglya tyeories ani laws apply kelyawar mala tya weglya umaglyat...! boluch....

    ReplyDelete
  2. i cant say anything but bravo!!! charcha vagaire ya saglya palikade this effort, the effort of thinking and analysing is worth this praise... a graet article is that hich either sparks a debate or lraves u speechless(asa maza mat ahe), this does both...BRAVO!

    ReplyDelete