Sunday, March 21, 2010

मागणी तसा पुरवठा नाही....

मी जेव्हापासून परिवर्तन या आमच्या संस्थेच्या माध्यमातून सामाजिक-राजकीय काम करायला लागलो आहे तेव्हापासून एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवली आहे. ती म्हणजे लोकांमध्ये अशा कामांसाठी जसे कौतुक करायची वृत्ती आहे, तशीच "याने काय होणार" अशी निराशावादी वृत्तीही आहे. एकूणच सध्याच्या देशातल्या भयानक स्थितीमुळे पेटून जाऊन हे सगळं बदलायची इच्छा होण्याऐवजी उलट "कोणीतरी करायला पाहिजे" असा म्हणत आपापल्या कामात व्यग्र होणाऱ्यांचीच संख्या खूप जास्त आहे. सध्याची परिस्थिती खूपच वाईट आहे हे सगळ्यांनाच माहित आहे, मान्य आहे. अशा वेळी हि परिस्थिती बदलण्यासाठी जे प्रयत्न करायची गरज आहे त्यासाठी पुढे येणाऱ्यांची संख्या फारच थोडी आहे. ही परिस्थिती बदलवणे, ही गोष्ट खूपच अवाढव्य अशी आहे. यासाठी जितक्या लोकांच्या सहभागाची आणि कार्याची आवश्यकता आहे ती संख्या पाहता सध्याची संख्या शून्य म्हणावी लागेल. थोडक्यात या कार्यासाठी जितकी मागणी आहे तितका पुरवठा नाही....
आणि मागणी तसा पुरवठा नाही म्हणजे अर्थशास्त्राच्या नियमानुसार सगळी व्यवस्थाच कोलमडायची शक्यता निर्माण होते...अशा वेळी एकतर मागणी कमी करावी लागते किंवा पुरवठा वाढवावा लागतो. आता सध्याच्या परिस्थितीत तरी सुधारणा होणं शक्य दिसत नाही. म्हणजेच मागणी कमी करणा शक्य होणार नाही. तेव्हा पुरवठा वाढवायला हवा..... देशाच्या विकासाच्या दिशेने काम करण्यासाठी हजारो निष्ठावंत आणि तळमळीने काम करणाऱ्या लोकांची गरज आहे. सध्या हजारो तर सोडाच जेमतेम काही लोक प्रयत्न करताना आढळतात ज्यांची संख्या दोन आकड्यांच्या पुढे जात नाही.
थोडक्यात देश सुधारायचा असेल तर अलोट निष्ठेने आणि कष्टाने काम करणाऱ्यांची मोठी फौजच असली पाहिजे.
अनेक वर्षांपूर्वी अशा तरुणांची फौज निर्माण करायचा प्रयत्न राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून केला गेला. संघाच्या राष्ट्रप्रेमाबद्दल आणि निष्ठेबद्दल कोणीच काही बोलू शकणार नाही. मात्र त्यांच्या विचारसरणीमध्ये फारच दोष होते आणि आहेत. कम्युनिस्ट पक्षाचे आणि कम्युनिस्ट संघटनांचे लोक अत्यंत तळमळीने, जातीधर्मांच्या पलीकडे जाऊन कार्य करतात परंतु वास्तवाचे भान त्यांना नाही, त्यामुळे तळमळीने केलेलं प्रचंड काम वाया जातं. शरद पवारांसारख्या मुरब्बी राजकारण्याला वास्तवाचं भान आहे, राजकारणात त्यांचा हात धरणारा कोणी नाही... मात्र तत्वनिष्ठा...कर्तव्यनिष्ठा इत्यादी गोष्टींपासून ते दूर आहेत. अशा परिस्थितीत आपल्याला ज्यांचे स्वदेश प्रेम हे संघ कार्यकर्त्यांप्रमाणे असेल, ज्यांची तळमळ आणि कार्य करण्याची इच्छा ही कम्युनिस्ट कार्यकर्त्यांसारखी समानतेच्या जोरावर उभारली असेल आणि ज्यांच्याजवळ देशाच्या दुश्मनांना नेस्तनाबूत करायचे शरद पवारांचे राजकीय कौशल्य आणि वास्तवाचे भान असेल अशा लोकांची फौज निर्माण करायची आहे....

हे अवाढव्य काम कोण एकट्या दुकट्याला पेलाव्ण्यासारखे नाही. मागणी एवढी आहे... कि पुरवठा आता तरी वाढवलाच पाहिजे.....!!!!

No comments:

Post a Comment