Monday, March 22, 2010

संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे...!!!!!

शीर्षक वाचून हा एका राजकीय लेख असणार अशी खात्री तुम्ही बाळगली असेल. पण नंतर घोळ नको म्हणून आधीच ही गोष्ट स्पष्ट करतो की तुम्ही समजता तसला हा लेख नाही. सध्या पुणेकरांसमोर जो यक्षप्रश्न पडला आहे त्यावर उपाय आहे संयुक्त महाराष्ट्राचा!!! कोणता आहे हा यक्षप्रश्न???



थोडी पार्श्वभूमी: ३ वर्षांपूर्वी भारताच्या क्रिकेट बोर्डाने आयपीएल सुरु करायचा निर्णय घेतला. त्यामध्ये ८ शहरांचे संघ नक्की करण्यात आले. समस्त मराठी लोकांच्या निष्ठा मुंबापुरीच्या संघाकडे होत्या.... मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाल्यामुळे सगळ्याच मराठी जनतेची एकजूट झाली आहे असे राजकारणी लोक सांगतात त्याचे चित्र आयपीएल मधेही दिसले. क्रिकेटचा 'देव' सचिन तेंडूलकर हा "मुंबई इंडियन्स" या संघाद्वारे संपूर्ण महाराष्ट्राचे नेतृत्व करत होता... सलग ३ वर्षे महाराष्ट्राच्या या संघाची एकजूट दिसून आली.
पण हाय!! घात झाला..... इंग्रजांची फूट नीती वापरून आयपीएल च्या चालक मालकांनी महाराष्ट्रात फूट पाडली.... आणि पुण्यासाठी स्वतंत्र संघ देण्याची घोषणा केली.... इतकेच नव्हे तर ही फूट मजबूत करण्यासाठी "सहारा" कडून १७०० कोटी रुपयांची बोली पुण्यावर लावण्यात आली..!!! आता स्वतंत्र विदर्भाची मागणी करणाऱ्यांना नागपूर संघ न देऊन चुचकारण्यात आले आहे.(खरंतर शरद पवारांनी स्वतंत्र विदर्भला केव्हाच पाठींबा दर्शवला आहे.) शिवाय एका "मोदी"(ललित) करवी दुसऱ्या "मोदी"(नरेंद्र) च्या राज्यातल्या अहमदाबादला आयपीएल मध्ये सामावून न घेत पवारांनी मोठीच राजकीय खेळी केली आहे असे म्हणावे लागेल ( दोन्ही मोदी भाजपशी संबंधित..!! काट्याने काटा काढण्यात पवार तरबेज आहेत!! )....!!!!!



आता पुणेकरांसमोर यक्षप्रश्न आहे तो म्हणजे आपला पाठींबा कोणाला द्यायचा?? गेली ३ वर्षे ज्यांनी आपले नेतृत्व केले त्या देवाच्या संघाला की पुणेरीपण दाखवत पुण्याच्या संघाला??? पुणेकरांचे पुण्यावर किती प्रेम आहे हे काही मी सांगायची गरज नाही.... पण प्रत्यक्ष देवाच्या विरोधात जायला पुणेकर कितपत तयार होतील याबद्दल मला चिंता आहे. आणि बाकीच्या वेळी ठीक आहे, सोयीस्कर पद्धतीनी पुणे किंवा मुंबई ला पाठींबा देता येईल, पण पुणे विरुद्ध मुंबई अशा सामन्याच्या वेळेस???
छे! छे!! पुण्याचा संघ निर्माण करून मुंबई ला महाराष्ट्रापासून वेगळे करण्यात आले आहे असे माझे ठाम मत आहे.... सबब, पुण्याचा संघ रद्द करून आता मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे असे आंदोलन नव्याने उभारावे लागेल आणि मुंबईसह सर्व महाराष्ट्रातून या आंदोलनाला भरघोस पाठींबा मिळेल असा मला ठाम विश्वास वाटतो...!!! बाकी राज ठाकरे अद्याप या विषयात कसे पडले नाहीत ते कळत नाही. शिवाय उद्धवने तरी यात पडायला हवं, नाहीतर राज सारं श्रेय लुटून नेईल...आणि पुन्हा शिवसेनेवर नामुष्कीची वेळ येईल.....!!!!! अर्थात पुणेकरांसमोरचे ज्वलंत प्रश्नांकडे दुर्लक्ष करायची राजकारणी लोकांना सवयच आहे.... त्यामुळे याही बाबतीत हे दुर्लक्ष करतील याबद्दल शंका नको...!!!
पुणेकरांनो जागे व्हा... संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे यासाठी लढा द्या....
जय महाराष्ट्र...!!!!!

No comments:

Post a Comment