Wednesday, May 28, 2014

माझे सावरकर

इतिहासातल्या ज्या काही थोड्या लोकांमुळे मी कमालीचा प्रभावित झालो त्यातले एक म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर. याच यादीत महात्मा गांधींचेही नाव मी घेतो यामुळे अनेक जण चकित होतात. टोकाचे गांधीवादी मला येऊन म्हणतात, “तुला सावरकर नीट समजले आहेत का? आणि समजले असूनही तू जर सावरकरांना मानत असशील तर तुला सावरकरच काय पण गांधीदेखील नीट समजले नाहीत.” टोकाचे सावरकरप्रेमी मला येऊन म्हणतात, “तू सावरकरांनी गांधींबद्दल जे लिहिले आहे ते तू वाचूनही हे हे म्हणत असशील तर तुला सावरकर समजलेच नाहीत. आणि साहजिकच आहे, तुला गांधीही समजले नाहीत.”
मला या सगळ्या संभाषणाची गंमत वाटते. पूर्वीच्या सिनेमात खानदान की दुश्मनी वगैरे असायची तसे सावरकर-गांधीजी यांचे त्या काळात मतभेद होते या मुद्द्यावर आजही त्यांचे तथाकथित अनुयायी तावातावाने भांडताना बघून मला हसूच येतं. आपल्यातले बहुतेक सगळे जण कुठल्या तरी कंपू मध्ये शिरायला इतके अधीर का असतात? आणि अपवादाने कोणी स्वतः नसले याबाबत उत्साही, तरी बाकीचे त्यांना कुठल्या ना कुठल्या कंपूचे लेबल लावून मोकळे होतात. मग ती व्यक्तीपण आपण याच कंपू मधले असा विचार करू लागते. “हा मार्क्सला चांगलं म्हणला? म्हणजे हा मार्क्सवादी. समाजवादी तरी नक्कीच.”, “हा टाटांची स्तुती करतो? म्हणजे साला भांडवलवादी.”, “हा गांधींचे कौतुक करतो म्हणजे संघाचा असूच शकत नाही.”, “हा सावरकरांची स्तुती करतो? म्हणजे हा पक्का मुस्लीम विरोधक.”, “हा नेहरूंच्या धोरणांचे कौतुक करतो? म्हणजे हा संघ विरोधक असला पाहिजे.”, “हा सरदार पटेलांचे कौतुक करतो म्हणजे हा नेहरूंचा विरोधक असला पाहिजे.”, “हा छत्रपती संभाजी महाराजांची जयंती साजरी करतो? म्हणजे हा मराठा जातीचा असावा..”, “हा बाजीराव पेशव्याचे कौतुक करतोय म्हणजे हा नक्की बामन”; अशा असंख्य लेबलांचा महापूर आहे आपल्या समाजात. खिरापत वाटल्यासारखे ही लेबलं वाटली जातात. ती अंगावर मिरवण्यात कित्येकांना आनंदही वाटतो. कसला आनंद ते देव जाणे. (आता माझे हे शेवटचे वाक्य वाचून काहींनी “देव जाणे? म्हणजे हा आस्तिक” असे लेबल मला चिकटवले असल्यास नवल नाही!) गंमतीदार आहे सगळं.

असो. तर मुख्य मुद्दा असा की ज्यांच्यामुळे मी विलक्षण प्रभावित झालो, नेहमी होतो, अशा
महान व्यक्तींच्या यादीत मी सावरकरांचे नाव अग्रक्रमाने घेतो. सावरकरांची आज जयंती. जिकडे तिकडे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे कौतुक चालू असेल, पुतळ्यांना हार घातले जातील, व्याख्याने दिली जातील तसबिरींना हार घातले जातील, कुठे सोयीस्करपणे अंदमानला काळ्यापाण्याची शिक्षा भोगायला जाण्याआधीच्या त्यांच्या कर्तृत्वावर तेवढा प्रकाश टाकला जाईल, तर कुठे सोयीस्करपणे ‘हिंदू हे स्वयमेव राष्ट्र आहेत’ या त्यांच्या सिद्धांताला धरून चर्चा रंगेल. या सगळ्या गदारोळात माझे सावरकर नेमके कोणते? मला भावलेले सावरकर कोणते? हा विचार मी करू लागलो आणि असंख्य गोष्टी डोळ्यासमोर येऊ लागल्या.
चाफेकर बंधू फाशी गेले ती बातमी ऐकून अस्वस्थ झालेल्या विनायकने “स्वातंत्र्यलक्ष्मी की जय” म्हणत स्वातंत्र्यासाठी ‘मारता मारता मरेतो झुंजेन’ ही शपथ घेतली. हा प्रसंग कल्पनेतही डोळ्यासमोर उभा केला तर आजही अंगावर रोमांच उभे राहतात. चौदा-पंधरा वर्षाचा पोरगा, नाशिकजवळच्या भगूर गावात गल्लीबोळात हूडपणे फिरणारा, डोक्याने विलक्षण तल्लख असणारा विनायक दामोदर सावरकर हा पोरगा. ‘स्वातंत्र्यलक्ष्मी की जय’ हे विलक्षण शब्द त्याला कसे स्फुरले असतील? हे सावरकर माझे आहेत. वंगभंगाने संतापलेल्या देशवासियांना स्वदेशी आणि बहिष्काराचा मंत्र कॉंग्रेसने दिल्यानंतर, देशातली पहिली परदेशी कपड्यांची होळी पुण्यात मुठा नदीच्या काठावर पेटवणारे तेजस्वी सावरकर मला माझे वाटतात. अखंड वाचन करून इतिहास समजून घेणारे आणि हा इतिहास लोकांना कळावा यासाठी आपल्या अमोघ शैलीत पुस्तके लिहिणारे सावरकर, पुस्तक छपाईला जाण्यापूर्वीच पुस्तकावर सरकारने बंदी घालावी इतकी लेखणीची दहशत निर्माण करणारे सावरकर मला भावतात. वास्तविक, ‘मैझिनी’ भारतीयांना माहित झालाच नसता कदाचित कधीच. पण त्याचे चरित्र वाचल्यावर त्यांना ते मराठीत आणावे वाटले. महाराष्ट्रातल्या लोकांना मैझिनी आणि गैरीबाल्डी बद्दल वाचून शिवरायांची आठवण होईल असं त्यांना वाटलं. इटलीची नाळ थेट मराठी भूमीशी जोडण्याचा काय हा असामान्य प्रयत्न! इंग्लंड मध्ये राहून भारतीय स्वातंत्र्याचा प्रश्न हा आंतरराष्ट्रीय स्वरूपाचा आहे याकडे इतर देशांचे लक्ष वेधण्याचा त्यांनी केलेला प्रयत्न, इंग्रजांना सळो की पळो करून सोडण्यासाठी बॉम्ब विषयक पत्रके भारतात पाठवणे, मग पिस्तुले पाठवणे... अटक झाल्यावर बोटीवरून समुद्रात स्वतःला झोकून देणारे आणि पुन्हा अटक फ्रेंच भूमीवर केल्यामुळे अभय मिळावे अशी मागणी करणारे वीर सावरकर. अंदमानात कोलूचे यातनाकांड स्वीकारणारे, कितीही कष्ट झाले तरी स्वातंत्र्यासाठी आत्महत्येच्या विचारांपासून स्वतःला दूर नेणारे स्वातंत्र्यवीर. आपल्या प्रगल्भतेच्या जोरावर स्फुरणाऱ्या कवितांच्या आधारे आणि मातृभूमीच्या उद्धाराचे एकमेव स्वप्न बघत अंदमानातील भीषण कारावास सहन करणारे स्वातंत्र्यवीर सावरकर.
सहभोजनाच्या माध्यमातून अस्पृश्यता दूर करण्याचा प्रयत्न करणारे आणि समाजसुधारणेच्या दृष्टीने एक प्रतिक म्हणून ‘पतितपावन’ मंदिराची उभारणी करणारे सुधारक सावरकर. नैतिकतेचा मुख्य पाया धर्मग्रंथ नसून बुद्धी हा आहे आणि नैतिकता ही मनुष्याने मनुष्यासाठी निर्माण केलेली गोष्ट असल्याने ती परिवर्तनीय आहे असे मानणारे सावरकर मला बेहद्द आवडतात. “परराज्य उलथून पाडण्यासाठी गुप्त कट, सशस्त्र बंडाळी ही सर्व साधने अपरिहार्यच असतात, पण या सर्व वृत्ती स्वराज्य स्थापन होताच तत्काळ टाकून देण्याचा सल्ला देणारे सावरकर. ‘स्वतंत्र देशात सरकारच्या चुका या आपण जनतेनेच निवडून दिलेल्या सरकारने केल्या असल्याने जबाबदारी आपल्यावरही येते आणि आपण एकदम डोक्यात राख घालता कामा नये’ असा अस्सल लोकशाहीवादी सल्ला देणारे स्वातंत्र्यवीर. ‘जोपर्यंत आपली मते कोणी बळाच्या जोरावर सक्तीने दुसऱ्यावर लादीत नाही, तोपर्यंत प्रत्येक नागरिकाचा विचार व भाषण स्वातंत्र्याचा अनिर्बंध हक्क इतरांनी मान्य केला पाहिजे’ असे १९३८ सालातच ‘मराठा’ मध्ये लेख लिहून संभाषण स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारे स्वातंत्र्यवीर मला मनापासून प्रभावित करतात. राष्ट्राभिमानाविषयी बोलत असतानाच, ‘स्वदेशाच्या राक्षसी हावेला बळी पडून अन्य देशाच्या न्याय्य अस्तित्वावर व अधिकारावर अतिक्रमण करतो राष्ट्राभिमान अधर्म्य आणि दंडनीय आहे’ असे ठणकावून स्पष्ट करणारे सावरकर मला कोणत्याही साम्राज्यवादविरोधी व्यक्तीपेक्षा तसूभरही कमी भासत नाहीत. भाषा हा कोणत्याही संस्कृतीमधला अत्यंत महत्वाचा असा भाग. आणि म्हणून मराठी भाषा शुद्धीसाठी त्यांनी केलेले अपूर्व प्रयत्न. एकेका इंग्रजी शब्दाला काय सुंदर मराठी पर्यायी शब्द दिले त्यांनी. दूरदर्शन, दूरध्वनी, महानगरपालिका, मुख्याध्यापक, औषधालय, युद्धनौका, पाणबुडी... असे कितीतरी! आता बजेट ला पर्यायी म्हणून दिलेला 'अर्थसंकल्प' हा शब्द पहा.. अहाहा ! या शब्दात आर्थिक नियोजन नाही नुसते...तर त्याचा 'संकल्प' पण आहे! मराठी भाषेला अशा कित्येक शब्दांची देणगी सावरकरांनी दिली. बंदीतून मुक्तता झाल्यानंतर पाचव्या दिवशी तिरंग्याचे ध्वजारोहण सावरकरांच्या हस्ते केले गेले, त्यावेळी बोलताना, “हा राष्ट्रीय ध्वज आहे; तो हिंदूध्वजापेक्षा मोठा आहे आणि त्या ध्वजाखाली उभा राहून जातीय वा धार्मिक भावना ठेवील तो पापी होय” असे म्हणणारे स्वातंत्र्यवीर मला बुद्धिवादी सेक्युलर वाटतात. लोकशाही आणि धर्मनिरपेक्षता याविषयी बोलताना अजमेर इथल्या भाषणात सावरकर म्हणतात, “आमचे पार्लमेंट अशा स्वरूपाचे तयार होईल की त्या पार्लमेंटच्या आत पाय ठेवताच हिंदू, मुसलमान, पारशी या भेदाचा मागमूसही राहणार नाही.” भारतीय संविधान तयार झाल्यावर “भारतीय राष्ट्राचे खरेखुरे राष्ट्रीय स्वरूप सिद्ध करून दाखवल्याबद्दल मी तुमचे अभिनंदन करतो” अशी तार घटना समितीच्या अध्यक्षांना तार करणारे सावरकर. ‘गायीला देवता मानणे’ हा गाढवपणा आहे अशा भाषेत धर्मश्रद्धेची चिकित्सा करणारे बुद्धीप्रामाण्यवादी सावरकर पुढे जाऊन म्हणतात, “हा प्रश्न एका फुटकळ धर्मसमजुतीचा नाही. अशा धार्मिक छापाच्या ज्या शेकडो खुळ्या समजुती आपल्या लोकांची बुद्धीहत्या करीत आहेत, त्या भाकड वृत्तीचा आहे.”

तुम्हाला भावणारे, आवडणारे, भिडणारे सावरकर कदाचित वेगळे असतील. पण या आणि अशा असंख्य उदाहरणांमधून प्रतीत होणारे प्रखर बुद्धिवादी, ध्येयवादी, राष्ट्रप्रेमी स्वातंत्र्यवीर मला माझे वाटतात. आजच्या सावरकर जयंतीच्या दिवशी, माझ्या सावरकरांनी लिखाण आणि वागणुकीतून जो लोकशाहीचा, बुद्धिवादाचा, स्वतंत्र पद्धतीने प्रत्येकाने विचार करण्याचा आणि विज्ञाननिष्ठेचा जो संदेश दिला आहे तो आपल्या समाजाच्या मनात ठसावा एवढीच सदिच्छा !

Monday, April 14, 2014

मित्रहो,

जेव्हापासून मी आम आदमी पक्षात आलोय, तेव्हापासून आणि विशेषतः गेले काही दिवस मी अनेकांशी चर्चा केली, वाद घातले. या दरम्यान विरोधकांचे अनेक मुद्देही मला पटले. पण तरीही, आम आदमी पक्षाकडून झालेल्या काही चुका मान्य करूनही, मी आम आदमी पक्षाच्या विजयासाठी काम करण्याचा प्रयत्न करतो आहे, यामागे माझी नेमकी भूमिका काय आहे ते मांडण्याचा हा प्रयत्न. आपला पक्षीय अभिनिवेश बाजूला ठेवून, मुद्दे सोडून आणि व्यक्तिगत पातळीवरची चर्चा यावर होऊ नये अशी इच्छा आहे. खुलेपणाने, मन मोकळे करून विचारमंथन व्हावे. इथे कमेंट्स मध्ये झाले नाही तरी चालेल पण स्वतःच्या मनात चिंतन नक्की व्हावे अशी इच्छा आहे. 

नेमके आम्ही काय करू पाहतो आहोत
'सत्ता मिळवणे' एवढाच मर्यादित उद्देश ठेवून राजकारणात येण्याचा आम आदमी पक्षाचा विचार नाही. आम्ही राजकारण बदलू पाहतो आहोत. राजकारणाची पारंपारिक पद्धती बदलू पाहत आहोत. नरेंद्र मोदी असो नाहीतर राहुल गांधी नाहीतर राज ठाकरे; या सगळ्यांचं राजकारण हे पारंपारिक पद्धतीचं आहे, सत्ता मिळवण्यासाठी पैसा आणि मग सत्तेतून अजून जास्त पैसा या दुष्टचक्रात अडकलेलं. हे तोडण्याचा, याला पर्याय देण्याचा प्रयत्न म्हणजे आम आदमी पक्ष. म्हणून आम आदमी पक्षाकडे पैसे देऊन आणलेले लोक दिसणार नाहीत, दिसतील ते फक्त विचारांमुळे एकत्र आलेले कार्यकर्ते. प्रत्येक पै पै कोठून आला आहे हे जाहीर करण्याची धडाडीही हा पक्ष दाखवतो आहे. इतर कोणताही पक्ष हे करत नाही. उलट त्यांच्याकडील निधीपैकी ७५% निधी कोठून आला हे त्यांनी जाहीर केलेलं नाही ही वस्तुस्थिती आहे. 

मी या पक्षाकडे एक अभूतपूर्व प्रयोग म्हणून बघतो. प्रयोगच आहे हा. आणि हा प्रयोग आज तरी यशस्वी होणे गरजेचे आहे. 'आजची प्रस्थापितांची राजकारणाची ही पद्धत का बरे पडली असेल' असा मी विचार करतो तेव्हा मला वाटतं, की केवळ याच मार्गाने विजय मिळतो हा प्रस्थापित राजकारण्यांच्या मनात असणारा विश्वासच यामागे आहे. पण जर यावेळच्या निवडणुकीत असं दिसलं की, पारंपारिक भ्रष्ट राजकारण हे नव्या स्वच्छ राजकारणासमोर फिकं पडत आहे तर प्रस्थापितांमध्येही चलबिचल होईल आणि स्वतःमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न केला जाईल. आणि यामुळे एकूणच राजकारणात सुधारणा व्हायला सुरुवात होईल. पण जर पुन्हा प्रस्थापितच विजयी झाले तर मात्र याचा अर्थ असा होईल की बाकी काहीही असो, विजयी होण्यासाठी तुम्हाला पैसा आणि गुंडांची ताकद लागतेच. म्हणजे एका अर्थी तत्वांपेक्षा पैसा आणि गुंडांची प्रतिष्ठा समाजात वाढेल. 
आणि यातूनच 'इस देश का कुछ नहीं हो सकता' म्हणणाऱ्या निराशावाद्यांची लाट येईल. 

आपल्याला नेमके काय हवे आहे

सगळ्या चांगल्या गोष्टी आम आदमी पक्षच केवळ घडवून आणेल असा अहंभाव माझा आणि पक्षनेतृत्वाचाही नाही. पण आम आदमी पक्ष केवळ रिंगणात असल्याने होणाऱ्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. आज काही लोक तरी स्वच्छ राजकारण करत निवडणूक लढवून संसदेत जाणं गरजेचं आहे. तिथे जाऊन त्यांनी आत प्रभावी दबाव गट म्हणून काम करणं आवश्यक आहे. आणि म्हणून आज तरी आम आदमी पक्षाला निवडून देऊन या पद्धतीच्या राजकारणाच्या पाठीशी ठामपणे उभं राहिलं पाहिजे. आणि खरं तर विचार करणाऱ्या सुशिक्षित सुसंस्कृत समाजाने तर अधिकच जिद्दीने उभं राहिलं पाहिजे असं माझं स्वप्न आहे.  

वारंवार हा प्रश्न येतो की आज तरी आपल्या देशाला अस्थिर सरकार परवडणारे नाही. माझं म्हणणं आहे की, तसं बघितलं तर अस्थिर सरकार केव्हाही वाईटच असतं, आज काय आणि ५ वर्षांनी काय! पण खरं सांगायचं तर अस्थिरतेला घाबरून आता चालणार नाही. गेली १५ वर्षे तर स्थिर सरकार आहेच आपल्या देशात. पण याच काळात आपली पत अधिकाधिक ढासळली आहे. राजकारणाची पातळी नको इतकी घसरली आहे. पैशाचा आणि दारूचा महापूर कसा वाहतो निवडणुकांत हे पाहतो आहोत आपण. या सगळ्या परिस्थितीत बदल हवा तर काही काळ अस्थिरता येणार हे गृहीत धरलं पाहिजे. या सगळ्या प्रस्थापितांना अस्थिर केल्याशिवाय हे जागे तरी कसे होतील? आणि इतकं होऊनही ते जागे नाही झाले तर पुढच्या निवडणुकांत आम आदमी पक्षाच्या जागा वाढतील आणि आम्हीच स्थिर सरकार देऊ. 
आज आम आदमी पक्षामुळे अस्थिरता आल्यास हीच परिवर्तनाची नांदी असेल. 

जसं हिंसा चांगली का वाईट या प्रश्नाचं उत्तर काळ-वेळ-परिस्थिती आणि उद्देश पाहून ठरतं तसंच यावेळच्या निवडणुकीच्या बाबतीत अस्थिरतेचं आहे. यावेळची अस्थिरता ही दूरचा विचार करता चांगली असेल... किंबहुना मी तर म्हणेन आज अस्थिरता अत्यावश्यकच आहे. 
गंमतीचा भाग असा की सध्या मी गलिच्छ वस्त्यांपासून प्रचंड मोठ्या सोसायट्यांपर्यंत सगळीकडे फिरतो आहे प्रचारासाठी. पण अस्थिरतेचा मुद्दा मध्यमवर्गाने उपस्थित केला तितका कोणीही केला नाही. मला वाटतं, मध्यमवर्गात असणारी स्वाभाविक 'स्थितीप्रियता' आता कुठेतरी मोडावी लागेल. आहे ते बरं चाललं आहे, थोडीफार डागडुजी करून चालवून नेऊ असा विचार करून चालणार नाही. निदान मला तरी थोड्याफार डागडुजीने काम होईल असं वाटत नाही. माझ्या मते आता सगळा राजकारणाचा गाडा गदागदा हलवून योग्य मार्गाला लावायला हवाय. खालून वरून घुसळण करायला हवीये. कम्फर्ट झोन मधून बाहेर पडायला हवंय. अगदी सर्वंकष मंथन. आता मंथन म्हणल्यावर यामधून सुरुवातीला अस्थिरतेचं वगैरे विष बाहेर येईल. पण शेवटी अमृतच बाहेर येणार हे नक्की... 
मागे एक मस्त ओळ वाचली होती- comfort zone is a beautiful place, but nothing ever grows there. 

आणि हो, उद्या आम आदमी पक्षाचे लोकही आजच्या प्रस्थापित पक्षांसारखे नालायक निघाले तर त्यांनासुद्धा हाकलून लावण्याची जिद्द आपल्या सारख्या सुशिक्षित आणि देश व समाजाविषयी सजग असणाऱ्यांनी बाळगली पाहिजे असे मी मानतो. पण बदल हवा असेल तर आजतरी जे आम आदमी पक्षाच्या निमित्ताने जे होत आहे त्याला सक्रीय पाठिंबा दिलाच पाहिजे आणि म्हणूनच आम आदमी पक्षाच्या 'झाडू'लाच मत देणे आवश्यक आहे याबद्दल मी निःशंक आहे.

Tuesday, March 25, 2014

मला हसायला आवडतं... तुम्हाला?

कधी कधी चिंता मला वाटते
हसणे फार दुर्मिळ झाले.
कारण काय? मला वाटते,
नीट ‘बघणे’ फार दुर्मिळ झाले.

आजुबाजू बघता, न हसावे असे काय आहे?
विसंगतींनी भरले जग, रडावे असे काय आहे?

पुराणे एक सत्य सांगतो,
दृष्टी तशी सृष्टी.
मनातले मळभ दूर सारले की,
हवी तितकी हास्यवृष्टी !

‘मळभ’ सरले की वृष्टी??
ही पहा, आणखी एक विसंगती.
अरेच्चा कोणीच हसलेही नाही..
कधी कधी चिंता मला वाटते,
हसणे फार दुर्मिळ झाले
आता वाटते, बघणेच काय,
नीट ‘वाचणेही’ फार दुर्मिळ झाले.

पोलीसदलाचा प्रमुख एक गुंड,
कायदेमंडळाचा प्रमुख एक पुंड,
डबक्याला म्हणावे पवित्र कुंड,
जनता म्हणावे, असली जरी झुंड.
इतक्या हास्यास्पद गोष्टी असोनही
हसणे आम्ही विसरलो.
हसणाऱ्यांना मारून-झोडून-चोप देऊन चक्क,
जगणे आम्ही विसरलो.

चित्रातून हसवले म्हणून मारले
शब्दातून हसवले त्याला कापून काढले.
हसवण्या बंदी घालणारे फतवे कोणी काढले,
दुर्दैव, फतवे ते बिनबोभाट आपण पाळले.

खरा प्रश्न सांगू काय आहे?
स्वतःच स्वतःवर हसणे बंद झाले,
मग दुसऱ्याने आपल्यावर हसणे सुद्धा
आम्ही धाक दाखवून बंद पाडले.

पुन्हा एक पुराणे सत्य सांगतो,
जे गांधीबाबा बोले ते सांगतो,
सुरुवात स्वतःपासून करणे आहे.
दुसऱ्याच्या आधी स्वतःवर हसणे आहे.

स्वतःवर खळखळून हसूया.
व्यंगावर हसूया
अडाणीपणावर हसूया
भाबडेपणावर हसूया
वेडपटपणावरही हसूया
तुम्ही हसलात तर जग हसेल,
आधी तुमच्यावर आणि मग स्वतःवरही!

प्रश्न नि चिंता सर्वांनाच आहेत हो...
पण त्यात रडण्याचा भार का घ्यावा?
त्यापेक्षा भरपूर हसा!
हलकं वाटेल नक्की, विश्वास ठेवा.

मला तर हसायला आवडतं... तुम्हाला?

Thursday, February 27, 2014

मराठीसाठी

क्सफोर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने ‘अ व्हेरी शॉर्ट इंट्रोडक्शन टू..’ अशी एक सिरीज काढली आहे. जवळपास ४०० विषयांवरील पुस्तकांची!! यामध्ये विविध विषयांवर अगदी थोडक्यात पण नेमकी माहिती देण्यात आली आहे. जेमतेम शंभर पानांची पुस्तकं ही. यांच्या विषयांची वैविध्यता किती असावी? तर यात इतिहास आहे, तत्वज्ञान आहे, वेगवेगळ्या विचारधारा आहेत, व्यक्तींच्या विचारांची माहिती आहे, शेयरबाजार, एचआयव्ही, नेतृत्वगुण, नागरिकत्व, रसायनशास्त्र, वृत्तपत्रविद्या, मूल्यव्यवस्था, अणू उर्जा, अणू बॉम्ब, पर्यावरणशास्त्र, ग्लोबल वॉर्मिंग वगैरे वगैरे असंख्य विषय. कोणता विषय नाही ते विचारा... शिवाय महत्वाची गोष्ट अशी की तुम्हाला त्या विषयातली माहिती असण्याची मुळीच गरज नाही. कोणत्याही सामान्य माणसाला कोणतेही पुस्तक वाचता यावे अशी याची सोपी मांडणी. मराठीत अशी पुस्तके का नाहीत?

आपल्याकडे मराठीत अशी पुस्तकांची एक साखळी मला आठवते आहे जी राष्ट्रीय नेत्यांच्या आणि महान व्यक्तींच्या चरित्रांची आहे/होती. चरित्रे आणि इतिहास हा बहुतांशवेळा अस्मितेचा भाग बनतात. त्यातून मग इतिहासप्रसिद्ध व्यक्तींचे दैवतीकरण सुरु होते, ऐतिहासिक घटनांचे उदात्तीकरण सुरु होते. मराठी भाषेला इतिहास, मनोरंजन आणि संस्कृतीच्या गप्पांमध्ये अडकवले नाही पाहिजे. मराठी निव्वळ अस्मितेची भाषा न राहता, ‘ज्ञानभाषा’ व्हायला हवी. ज्ञान मिळवण्यासाठी मला जर इंग्रजीशिवाय दुसरा आधारच नसेल तर माझी मराठीशी असणारी बांधिलकी कमी होत जाईल ही गोष्ट सूर्यप्रकाशाइतकी स्पष्ट आहे. मला ज्ञान मिळवण्यासाठी माझ्या मातृभाषेचा उपयोग होत नसेल तर असे होणे साहजिकच म्हणावे लागेल. आणि असे होऊ देणे मराठीप्रेमींना नक्कीच आवडणार नाही.

सुदैवाने यासगळ्याचा विचार करणारे असंख्य गट महाराष्ट्रभर आहेत. पण त्यांचेही मराठीप्रेम मोडी लिपी शिकणे वगैरे पासून सुरु होऊन मराठी सिनेमा-नाटके इथे संपेल की काय अशी भीती मला कधीकधी वाटते. मराठी ही ज्ञानभाषा होण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. काही जण म्हणतील की मराठीत केवढे तरी ज्ञान आहे वगैरे. पण हे ज्ञान सोप्या भाषेत पाहिजे, सहज आकर्षित करणारे पाहिजे. ‘वाचा तुकाराम गाथा आणि घ्या समजून’ असे केल्यास त्याचा काय उपयोग? शिवाय मराठी व्यक्तींशिवाय जगात अनेकांनी अनेक विचार मांडले, शोध लावले, अभ्यास केले त्यांचा समावेश झाला नाही तर ती खऱ्या अर्थाने ज्ञानभाषा कशी काय होईल? इंग्रजीत जे प्रचंड ज्ञान उपलब्ध आहे ते मराठीत आणावे लागेल. मराठीत आणायचे म्हणजे केवळ भाषांतरे नव्हे. मराठीत लिहिले गेले पाहिजे. चांगली पुस्तके प्रसिद्ध व्हायला हवीत. त्यांचे मार्केटिंग व्हायला हवे, त्यांचे मुखपृष्ठ, त्यांची बांधणी हे सर्वोत्तम हवे. जागतिकीकरणामध्ये मराठीची स्पर्धा इंग्रजीशी असणार आहेच. हे लक्षात घेऊनच स्पर्धेला सामोरे गेले पाहिजे. शिवाय केवळ पुस्तके नव्हेत तर वेबसाईट, मोबाईल अप्लिकेशन्स, ब्लॉग्स हे सगळे मराठीत यायला हवे. कोठूनही बघता आले पाहिजे, वाचता आले पाहिजे. मराठीला ज्ञानभाषा करण्याचा असा हा चौफेर प्रयत्न झाल्यास मराठी टिकेल, संपन्न होईल. आणि पोकळ कडवट अस्मितेपेक्षा आदर वाटावा, जिव्हाळा वाटावा, प्रेम वाटावे अशी भाषा असेल. आणि त्याहून महत्वाचे म्हणजे अशी मराठी भाषाच मराठी माणसांमध्ये ज्ञानाची भूक वाढवेल. अर्धवट माहिती, स्वतःचा असा शून्य विचार आणि न्यूनगंडातून आलेली पोकळ आक्रमकता या गोष्टीत अडकलेल्या आपल्या समाजाला बाहेर काढायला हातभार लावेल.

Tuesday, February 11, 2014

मेरे पास ‘मा’ है |

मचे राजकारणी एकदा का नगरसेवक, आमदार, खासदार, मंत्री, महापौर वा तत्सम पदावर निवडून गेले की आयुष्यभरासाठी एक उपाधी आपल्या नावामागे चिकटवतात- ‘मा.’ वास्तविक नगरसेवक पदावर निवडून गेल्यावर त्यांना मनापासून मान द्यावा अशी कृत्ये ते करतात काय, याबद्दल बहुतांश नागरिकांच्या मनात दाट शंका आहे. पण तो मुद्दा सध्या ठेवू बाजूला. सत्तापदावर असणाऱ्या या मंडळींनी आपल्या नावामागे आपण होऊन ‘मा. उर्फ माननीय’ लावावे, हा प्रकार म्हणजे स्वतःच सुरु केलेल्या शिक्षण संस्थेकडून स्वतःलाच मानद डॉक्टरेट घेण्यासारखे आहे. बरे, हे इथेच थांबले असते तरी एक वेळ ठीक. पण आमचे लोकप्रतिनिधी हा ‘मा’, आपला पाच वर्षाचा कार्यकाल संपला तरी सोडत नाहीत. नावामागे ‘मा’ तसाच आयुष्यभर राहतो आणि त्याचा अर्थ आता ‘माजी’ असा बनतो. आमच्या लोकप्रतिनिधींकडे ‘गाडी है, बंगला है, बँक बैलन्स है... और ‘मा’ भी है!”

व्हीआयपी संस्कृतीचे अगदी साधेसे उदाहरण म्हणजे हे नावामागे मा. लावण्याची आमच्या लोकप्रतिनिधींची अनिवार इच्छा. नगरसेवक असताना ‘आम्हाला मान द्या, आम्ही नगरसेवक आहोत’ हे सातत्याने दाखवून देण्याच्या या वृत्तीचं होणारं दर्शन आणि पद गेल्यावरही आम्हाला तोच मान मिळत राहिला पाहिजे यासाठी चालू केविलवाण्या धडपडीचं दर्शन या दोन्ही गोष्टी बघून आम्हाला तरी अगदी उबग येतो. आपण लोकप्रतिनिधी झालो म्हणजे जणू जहांगिरदार झालो वॉर्डाचे आणि येऊ तेव्हा लोकांनी पटापट मुजरे घातले पाहिजेत असली सरंजामी मध्ययुगीन वृत्ती या ‘मा’ वाल्या व्हीआयपी संस्कृतीमध्ये झळकते.
महापालिकेच्या एखाद्या कार्यक्रमाची कार्यक्रमपत्रिका बघितल्यास तर वैताग येतो. मुळात लिहिलेली असतात सतराशे साठ नावे. सगळ्यांच्या नावामागे ‘मा.’ मला तर कधीकधी वाटतं, गणितात करतात तसं सगळ्यांना मिळून एक मोठा कंस काढून कंसाबाहेर कॉमन ‘मा’ लिहावा! निदान ती कार्यक्रमपत्रिका तरी कमी अजागळ दिसेल. विनोदाचा भाग जाऊ द्या. पण मला प्रश्न पडतो की आजवर एवढे नगरसेवक निवडून महापालिकेत गेले. त्यातल्या एकालाही ही गोष्ट खटकली नाही? एवढ्या राजकीय पक्षांमधल्या एकालाही असं वाटलं नाही की ‘मानापमानाचं कसलं थोतांड मांडलंय इथे. हे बंद झालं पाहिजे.’? एकदा आमचे राजकारणी लोकप्रतिनिधी म्हणून निवडून गेले की ते ‘सामान्य नागरिक’ उरतच नाहीत काय? ते एकदम खास बनून जातात का? एकदम व्हीआयपी? दुर्दैवाचा भाग हा की अनेकदा वर्तमानपत्र सुद्धा ‘माननियांनी अमुक अमुक निर्णय घेतला’ अशा पद्धतीच्या बातम्या देतात. काय म्हणावे याला?! मला वाटतं, आपल्याला जर हे सगळं कधी खटकलं नसेल तर आपलीही मानसिकता अद्याप पुरेशी लोकशाहीवादी झालेली नाही. आपण अजून ‘प्रत्येक नागरिक समान दर्जाचा’ या लोकशाहीच्या पायापासून दूर आहोत असे मानावे लागेल.



आपल्या व्यवस्थेत बोकाळलेल्या व्हीआयपी संस्कृतीला छेद देण्यासाठी उठसूट ‘मा’च्या वापराला फाटा द्यायला हवा. गोष्ट तशी साधीशी आणि छोटीशीच आहे. कोणी म्हणेल ‘एवढ्या बारक्या बारक्या गोष्टींवर काय राव आक्षेप घेता!’ पण मला वाटतं, नुसते कायदे करून किंवा व्यवस्थेत चांगले लोक पाठवून व्यवस्था सुधारणार नाहीये. त्याने कदाचित चांगली राजकीय व्यवस्था तयार होईल. पण चांगल्या सुदृढ समाजव्यवस्थेसाठी आपल्याला अशा बारीक बारीक गोष्टींपासून सुरुवात करत आपली मानसिकता बदलायला हातभार लावायला हवा. तरच आपण आदर्श अशा लोकशाही समाजव्यवस्थेकडे जाऊ शकू.