Thursday, February 27, 2014

मराठीसाठी

क्सफोर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने ‘अ व्हेरी शॉर्ट इंट्रोडक्शन टू..’ अशी एक सिरीज काढली आहे. जवळपास ४०० विषयांवरील पुस्तकांची!! यामध्ये विविध विषयांवर अगदी थोडक्यात पण नेमकी माहिती देण्यात आली आहे. जेमतेम शंभर पानांची पुस्तकं ही. यांच्या विषयांची वैविध्यता किती असावी? तर यात इतिहास आहे, तत्वज्ञान आहे, वेगवेगळ्या विचारधारा आहेत, व्यक्तींच्या विचारांची माहिती आहे, शेयरबाजार, एचआयव्ही, नेतृत्वगुण, नागरिकत्व, रसायनशास्त्र, वृत्तपत्रविद्या, मूल्यव्यवस्था, अणू उर्जा, अणू बॉम्ब, पर्यावरणशास्त्र, ग्लोबल वॉर्मिंग वगैरे वगैरे असंख्य विषय. कोणता विषय नाही ते विचारा... शिवाय महत्वाची गोष्ट अशी की तुम्हाला त्या विषयातली माहिती असण्याची मुळीच गरज नाही. कोणत्याही सामान्य माणसाला कोणतेही पुस्तक वाचता यावे अशी याची सोपी मांडणी. मराठीत अशी पुस्तके का नाहीत?

आपल्याकडे मराठीत अशी पुस्तकांची एक साखळी मला आठवते आहे जी राष्ट्रीय नेत्यांच्या आणि महान व्यक्तींच्या चरित्रांची आहे/होती. चरित्रे आणि इतिहास हा बहुतांशवेळा अस्मितेचा भाग बनतात. त्यातून मग इतिहासप्रसिद्ध व्यक्तींचे दैवतीकरण सुरु होते, ऐतिहासिक घटनांचे उदात्तीकरण सुरु होते. मराठी भाषेला इतिहास, मनोरंजन आणि संस्कृतीच्या गप्पांमध्ये अडकवले नाही पाहिजे. मराठी निव्वळ अस्मितेची भाषा न राहता, ‘ज्ञानभाषा’ व्हायला हवी. ज्ञान मिळवण्यासाठी मला जर इंग्रजीशिवाय दुसरा आधारच नसेल तर माझी मराठीशी असणारी बांधिलकी कमी होत जाईल ही गोष्ट सूर्यप्रकाशाइतकी स्पष्ट आहे. मला ज्ञान मिळवण्यासाठी माझ्या मातृभाषेचा उपयोग होत नसेल तर असे होणे साहजिकच म्हणावे लागेल. आणि असे होऊ देणे मराठीप्रेमींना नक्कीच आवडणार नाही.

सुदैवाने यासगळ्याचा विचार करणारे असंख्य गट महाराष्ट्रभर आहेत. पण त्यांचेही मराठीप्रेम मोडी लिपी शिकणे वगैरे पासून सुरु होऊन मराठी सिनेमा-नाटके इथे संपेल की काय अशी भीती मला कधीकधी वाटते. मराठी ही ज्ञानभाषा होण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. काही जण म्हणतील की मराठीत केवढे तरी ज्ञान आहे वगैरे. पण हे ज्ञान सोप्या भाषेत पाहिजे, सहज आकर्षित करणारे पाहिजे. ‘वाचा तुकाराम गाथा आणि घ्या समजून’ असे केल्यास त्याचा काय उपयोग? शिवाय मराठी व्यक्तींशिवाय जगात अनेकांनी अनेक विचार मांडले, शोध लावले, अभ्यास केले त्यांचा समावेश झाला नाही तर ती खऱ्या अर्थाने ज्ञानभाषा कशी काय होईल? इंग्रजीत जे प्रचंड ज्ञान उपलब्ध आहे ते मराठीत आणावे लागेल. मराठीत आणायचे म्हणजे केवळ भाषांतरे नव्हे. मराठीत लिहिले गेले पाहिजे. चांगली पुस्तके प्रसिद्ध व्हायला हवीत. त्यांचे मार्केटिंग व्हायला हवे, त्यांचे मुखपृष्ठ, त्यांची बांधणी हे सर्वोत्तम हवे. जागतिकीकरणामध्ये मराठीची स्पर्धा इंग्रजीशी असणार आहेच. हे लक्षात घेऊनच स्पर्धेला सामोरे गेले पाहिजे. शिवाय केवळ पुस्तके नव्हेत तर वेबसाईट, मोबाईल अप्लिकेशन्स, ब्लॉग्स हे सगळे मराठीत यायला हवे. कोठूनही बघता आले पाहिजे, वाचता आले पाहिजे. मराठीला ज्ञानभाषा करण्याचा असा हा चौफेर प्रयत्न झाल्यास मराठी टिकेल, संपन्न होईल. आणि पोकळ कडवट अस्मितेपेक्षा आदर वाटावा, जिव्हाळा वाटावा, प्रेम वाटावे अशी भाषा असेल. आणि त्याहून महत्वाचे म्हणजे अशी मराठी भाषाच मराठी माणसांमध्ये ज्ञानाची भूक वाढवेल. अर्धवट माहिती, स्वतःचा असा शून्य विचार आणि न्यूनगंडातून आलेली पोकळ आक्रमकता या गोष्टीत अडकलेल्या आपल्या समाजाला बाहेर काढायला हातभार लावेल.

2 comments:

  1. तू अशी सिरीज लिहायला घेतोयस का? नितीन प्रकाशन प्रकाशित करायला तयार आहे. वेबसाईट, मोबाईल अप्लिकेशन्स, ब्लॉग्स यांच्या माध्यमातून हे सगळे नितीन प्रकाशन नियमितपणे वाचकांपर्यंत पोचवत असते. प्रकाशनाची स्वतंत्र मार्केटिंग आणि वितरण व्यवस्था महाराष्ट्रभर कार्यरत आहेच.

    ReplyDelete