Monday, April 13, 2020

‘माहितीमारी’च्या काळात शहाणपणाची सप्तपदी

सध्या जगभर सगळ्या चर्चांत करोना व्हायरस, कोव्हीड-१९ असे शब्द कानावर पडतायत. याबद्दलची प्रचंड माहिती आपल्यापर्यंत पोहचते आहे. जगातली किमान २५० ते ३०० कोटी जनता सध्या लॉकडाऊनमुळे आपापल्या घरांत किंवा विलगीकरण कक्षात (quarantine) मध्ये आहे. जागतिक महामारी (pandemic) असं याला म्हणलं गेलंय. आणि अर्थातच इतके लोक आपापल्या घरात अडकले असताना, त्यातल्या बहुसंख्य व्यक्तींना वीज, इंटरनेट, मोबाईल या गोष्टी उपलब्ध असल्याने घरबसल्या अनेक गोष्टींची माहिती एकमेकांना दिली जात आहे. यात जसं या व्हायरसची माहिती आहे, तसंच इतर अनेक गोष्टीही आहेत. साहजिकच अफवांचं पीक निघतंय, वेगवेगळे लोक आपापल्या विचारधारेनुसार खोटे, अर्धसत्य, संदर्भ सोडून असणारे असे संदेश सोशल मीडियातून पसरवून आपली पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. सोशल मिडियाच्या उदयापासूनच हे आपल्याला नेहमी दिसत आलं असलं तरी, सध्याच्या काळात लोकांच्या हातात असणारा जास्तीचा वेळ आणि डोक्याला नसणारं काम, यामुळे याची व्याप्ती अधिकच वाढते आहे. म्हणून या सगळ्याला infodemic म्हणजे माहितीची महामारी असंही म्हणलं जातंय. आपण याला म्हणूया माहितीमारी. 
तर अशा या माहितीमारीच्या काळात आपण आपलं शहाणपण कसं टिकवावं यासाठीच्या या सात पायऱ्या-
१)    तुम्हाला आलेला एखादा संदेश किंवा व्हिडीओ तुम्ही वाचल्यावर किंवा बघितल्यावर कोणत्याही प्रकारच्या तीव्र भावना तुमच्या मनात तयार झाल्या का, हा प्रश्न स्वतःला विचारा. एखाद्या व्यक्ती विरोधात, सरकारविरोधात, समुदायाविरोधात प्रचंड संताप वाटणे, तिरस्कार वाटणे, घृणा वाटणे, किंवा पराकोटीचा अभिमान वाटणे, उन्मादी आनंद वाटणे, प्रचंड भीती वाटणे, हताश वाटणे, अतिआत्मविश्वास वाटणे, अशा प्रकारच्या कोणत्याही भावना मनात तयार तर झाल्या नाहीत ना हे तपासा.
२)    अशा प्रकारे कोणत्याही तीव्र भावना मनात निर्माण झाल्या असतील तर पहिली गोष्ट समजून घ्यायची ही की हीच धोक्याची घंटा आहे. सावध राहायला हवं. कदाचित तो संदेश, तो व्हिडीओ अशाच प्रकारे बनवलेला असू शकतो की ज्याने तीव्र भावना निर्माण होतील. ज्या अर्थी तुमच्या तीव्र भावना उफाळून आल्या त्या अर्थी इतरही अनेकांच्या उफाळून येऊ शकतात हे लक्षात घ्यायला हवं. या अर्थी तुमच्या हातात एक भावनिक बॉम्बच आहे. बॉम्ब आहे म्हणल्यावर तो काळजीपूर्वक हाताळणं गरजेचं.
३)    आता तो संदेश पुढे इतर अनेकांना आत्ता पाठवणं आवश्यक आहे का हा प्रश्न स्वतःला विचारा. उत्तर होकारार्थी असेल तर त्याचं ठोस कारण काय हाही पुढचा प्रश्न यायला हवा.  एवढी ‘तातडीची’ ही बाब आहे का? म्हणूनच या प्रश्नात ‘आत्ता हा शब्द महत्त्वाचा आहे. आत्ताऐवजी उद्या पाठवला तर? उद्या ऐवजी पुढच्या आठवड्यात पाठवला तर? हे प्रश्न विचारा. ही गोष्ट आत्ताच समोरच्याला समजावी इतकी तातडीची आहे का, या प्रश्नावर होकारार्थी उत्तर असेल तर पुढची पायरी बघा. तुमचं उत्तर नकारार्थी असेल तर संदेश पुढे पाठवू नका. तुमच्या मोबाईल मध्ये आणि तुमच्या मनातही त्या संदेशाला थंड होऊ द्या.
४)    दुसरा दिवस उजाडू देत, अजून एक दोन दिवस जाऊ देत. त्या थंड संदेशातल्या मजकूराकडे आपण जाऊया आता. याबाबतीत सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे या संदेशातून कोणाला ‘व्हिलन किंवा ‘हिरो ठरवलं गेलं आहे का हा प्रश्न विचारा. उदाहरणार्थ, एखाद्या संदेशातून सरकार, संस्था, व्यक्ती, धार्मिक समुदाय हे दोषी आहेत, खलनायक आहेत असा सूर निघत असेल किंवा यापैकी कोणीही नायक आहेत असा सूर निघत असेल तर ही धोक्याची दुसरी घंटा. अशावेळी आपलाच मोबाईल उघडा आणि त्यात सामान्यतः यापेक्षा उलटी बाजू दाखवणारे न्यूज चॅनेल, वर्तमानपत्र, राजकीय-सामाजिक कार्यकर्ते हे त्या विषयाला कसं दाखवत आहेत, त्याबद्दल काय म्हणत आहेत ते बघा. तुम्हाला दुसरी बाजू समजेल. उदाहरणार्थ, एखादा संदेश सरकारवर कडक टीका करत असेल तर  सरकारबाजूची भूमिका मांडणारे लोक काय म्हणतायत ते बघा, एखाद्या संदेशात एखाद्या समुदायाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं असेल तर अनेकदा त्यांची बाजू घेऊन बोलणारे लोक काय म्हणत आहेत ते बघा. कधीकधी दुसरी बाजू मांडणारे लोक आपल्याच आजूबाजूला, मित्रपरिवारात, कुटुंबात असतात. त्यांना त्यांचं मत विचारा. समजून घ्या त्यांचं म्हणणं काय आहे. त्यांचं मत विचारताना दुसऱ्याला खिजवण्याचा हेतू मनात नसेल तर, समोरच्यालाही ते जाणवतं आणि मोकळा संवाद होऊ शकतो.
५)    अर्थात बऱ्याचदा असेच संदेश मोबाईलवर येतात ज्याबद्दल अधिकृत न्यूज चॅनेल, वर्तमानपत्र यात काहीच नसतं. अशावेळी त्या संदेशातील महत्त्वाचा भाग ‘गुगल’ वर तपासा. अनेक न्यूज चॅनेल, ऑनलाईन वेबसाईट या अशा पसरणाऱ्या खोट्या बातम्या उघड करण्याचं काम करतात. alt news सारख्या वेबसाईट्स हे प्रभावीपणे करत आहेत. त्यावर तपासा की आपल्याकडे आलेला संदेश खोटा असल्याचं यांनी आधीच सिद्ध तर केलेलं नाही ना? केलं असेल तर तो हातातला भावनांचा बॉम्ब निकामी करून टाका. संदेश/व्हिडीओ आपल्या मोबाईलमधून कायमचा डिलीट करा. दुसऱ्या पायरीवर आपण म्हणलं की, संदेश थंड होऊ द्या त्याचं हेही कारण की त्या संदेशात/व्हिडीओमध्ये चुकीचं अथवा खोटं काही असेल तर ते उघड व्हायला अवधी मिळतो.  
६)    क्वचितच असं होतं की आपल्या हातात आलेला संदेश या वरच्या सगळ्या पायऱ्यांच्या पलीकडे जाऊनही उरतो. अजूनही तो संदेश उरला आहे आणि तीव्र भावना निर्माण करतो आहे अशा स्थितीत आपण सहाव्या आणि महत्त्वाच्या पायरीवर येऊन पोहचतो. अशावेळी स्वतःला प्रश्न हा विचारावा की या संदेशावर ‘नेमकी काय कृती व्हायला हवी’ आणि ‘ती कोणी करावी अशी आपली अपेक्षा आहे’? उदाहरणार्थ, शहराच्या एखाद्या भागात काही अनुचित प्रकार घडत आहे असा संदेश आपल्याला आला. क्र.४ आणि ५ च्या पायऱ्या पाळूनही खरे-खोटे काहीच समजले नाही. आता, हा प्रश्न विचारावा की तो अनुचित प्रकार घडत असताना नेमकी काय कृती घडायला आपल्याला हवी आहे. आणि ती कृती कोणी करायला हवी आहे. असं मानू की याचं उत्तर ‘तो अनुचित प्रकार थांबायला हवा आहे आणि ‘हे काम पोलिसांनी करायला हवं आहे अशी उत्तरं स्वतःला स्वतःकडून मिळाली. कृती करायचे ‘अधिकृत आणि कायदेशीर’ अधिकार कोणाकडे आहेत हेही बघणं गरजेचं आहे. कारण बेकायदेशीर झुंडींना पाठींबा देणारे आपण नाही. आपण सभ्य सुसंस्कृत नागरिक आहोत.
७)    एकदा का कृती कोणी करायला हवी हे लक्षात आलं की त्या संबंधित व्यक्तीला/ यंत्रणांना याबाबत माहिती देणं ही शेवटची पायरी. ‘तुमच्याकडे संदेश आला, त्या संदेशाची (पायरी ४ आणि ५ नुसार) शहानिशा करण्याचा तुम्ही प्रयत्न केलात पण शहानिशा करता आलेली नाही, तरी एक योग्य यंत्रणा म्हणून मी तुमच्यापर्यंत हा संदेश पोहचवत आहे.’ अशा सविस्तर पद्धतीने ही माहिती यंत्रणांना देणं गरजेचं आहे. तुमच्याकडे आलेला भावनिक बॉम्ब तुम्ही योग्य त्या यंत्रणांना निकामी करण्यासाठी सुपूर्त केलात तर नागरिक म्हणून तुमचं चोख कर्तव्य बजावलं असं समजावं.
आपल्याकडे आलेला संदेश/व्हिडीओ दुसऱ्याकडे ढकलण्याच्या (फॉरवर्ड करण्याच्या) आपल्या सर्वांनाच सध्या लागलेल्या बेजबाबदार सवयीला ही सप्तपदी चांगलाच आळा घालेल! शहानिशा न करता संदेश पुढे ढकलण्याच्या आपल्या कृतीमागे एक कारण असतं. आपण असं मानतो की, हे करून आपण समाजाचं भलं करतोय. समाजासाठी काहीतरी करायची इच्छा आपल्या सगळ्यांमध्ये असते. पण सगळेच कुठे सामाजिक काम करतात? सगळेच कुठे देणग्या देऊ शकतात? अशावेळी तीव्र भावना उद्दीपित करणाऱ्या, कोणाला तरी ‘व्हिलन’ किंवा ‘हिरो’ ठरवणाऱ्या संदेशांना पुढे पाठवून आपण लोकजागृतीचं काम करतो आहोत, अशी आपल्याही नकळत आपण स्वतःची समजूत करून घेतो. ‘समाजासाठी आपण काही केलं पाहिजे या विचारांनुसार कृती करायची सर्वात सोपी पळवाट म्हणजे घरबसल्या संदेश पुढे ढकलणे. यातून समाजाचं भलं तर होत नाहीच, पण आपण आपल्याही नकळत अफवांना बढावा देतो, अंधश्रद्धांना खतपाणी घालतो, समाजाचा भयगंड वाढवतो, समाजाचं शहाणपण संपवण्याच्या प्रयत्नांत हातभार लावतो.

सगळं जग सध्या एकत्र येऊन जागतिक महामारीचा सामना करतंय. आज ना उद्या या संकटावर आपण मात करणार आहोत. ‘महामारी संपली खरी, पण माहितीमारीचा राक्षस मोठा करून!’ अशी, आगीतून फुफाट्यात नेणारी आपली अवस्था होऊ नये याची काळजी घ्यायला हवी. शहानिशा न केलेली माहिती रोगासारखी फैलावून माहितीमारी येते आणि भावनांच्या तीव्रतेमुळे आपलं व्यक्तिगत पातळीवर मानसिक आरोग्य तर पार बिघडवून टाकतेच, आणि त्याबरोबर सामाजिक आरोग्यही बिघडवते. पण ही वर उल्लेखलेली सप्तपदी पाळली तर माहितीमारीचा जो प्रादुर्भाव होतो आहे त्याला आपण रोखू शकू. यातून आपण स्वतःचं मूलभूत शहाणपण तर जपूच, पण सोबत सर्वांनाही शहाणे राहायला मदत करू.

(दि. १३ एप्रिल २०२० रोजी प्रकाशित झालेल्या दै सकाळ मध्ये प्रसिद्ध.)

No comments:

Post a Comment