Saturday, February 24, 2018

शुद्धतेच्या अशुद्ध कल्पना

“वनपर्वाच्या ३०७ व्या अध्यायात सूर्य म्हणतो, हे कुंती, कन्या शब्दाची उत्पत्ती कम् या धातूपासून झाली असून त्याचा अर्थ हव्या त्या पुरुषाची इच्छा करू शकणारी असा आहे. कन्या स्वतंत्र आहे स्त्रिया व पुरुष यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा आडपडदा नसणे हीच लोकांची स्वाभाविक स्थिती असून विवाहादिक संस्कार कृत्रिम आहेत...”, १९२३ मध्ये इतिहासाचार्य राजवाडे यांनी भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास या पुस्तकात आपल्या पूर्वजांच्या स्त्री-पुरुष नातेसंबंधांच्या कल्पना काय होत्या याबद्दल सांगताना हे लिहिलं आहे. या घटनेला जवळपास तब्बल शंभर वर्ष झाली आहेत. सुमारे सत्तर ऐंशी वर्षांपूर्वी महाराष्ट्रातच र.धों. कर्वे नावाचा एक माणूस संततिनियमनाचा प्रसार व्हावा आणि स्त्रियांना लैंगिक स्वातंत्र्य मिळावं यासाठी अहोरात्र झटत होता.

ही दोन उदाहरणं मुद्दाम दिली. गेल्या शतकात मांडले गेलेले हे विचार बघता,  आज आपला समाज फारच वेगळ्या कुठल्यातरी टप्प्यावर उभा असायला हवा अशी एखाद्या बाहेरून बघणाऱ्याची समजूत होईल. पण त्याच वेळी, लग्नाच्या वेळी जात पंचायतीने कौमार्य तपासून बघण्याच्या आत्ताच्या आपल्या समाजातल्या घटना ऐकल्या की चक्रावून जायला होतं. आणि मग यातून आपल्या शुद्धतेच्या आणि पावित्र्याच्या सगळ्या कल्पनांचा असणारा पगडा डोक्यात आल्यावाचून राहत नाही. तत्त्वतः, शुद्धतेच्या आजच्या कल्पना स्त्री-पुरुष दोघांनाही लागू केल्या जात असल्या तरी, स्त्रिया त्यात जास्त भरडल्या जातात हे वास्तव आहे. आणि म्हणून या मुद्द्यांकडे स्त्री-पुरुष समानता आणि स्वातंत्र्य या अंगानेच बघायला हवं. 

लैंगिक स्वातंत्र्य असा उच्चार जरी केला तरी अनेकांच्या तळपायाची आग अगदी मस्तकात जाते. “हे असलं सगळं म्हणजे स्वैराचाराला स्वातंत्र्याचा मुलामा देण्यासारखं आहे” हा विचार कित्येकांच्या डोक्यात येतोच येतो. पण स्वातंत्र्य कुठे संपतं आणि स्वैराचार कुठे सुरु होतो हे कोणी ठरवायचं? आणि कशाच्या आधारावर? निव्वळ संस्कृती आणि परंपरांचे दाखले द्यायचे तर इतिहासाचार्य राजवाडे आपल्या पुस्तकात त्या सांस्कृतिक दाखल्यांची अक्षरशः चिरफाड करतात. मग हातात काय उरतं? आपले वाडवडील कसे वागले ते बघणं? पण याही बाबतीत आपण साफ गडबडतोच की. आमच्या दोन पिढ्या आधी अविवाहित तरुण-तरुणींचे एकत्र असे सर्रास मित्र-मैत्रिणींचे गट कॉलेजात असत का? माझ्या आईवडिलांच्या पिढीमध्ये ते होते. म्हणजे माझ्या आईवडिलांच्या पिढीने स्वैराचार केला काय? स्वातंत्र्य आणि स्वैराचाराच्या कल्पना म्हणजे कधीही न बदलता येणारी गोष्ट नव्हे. उलट स्थळकाळानुसार यात प्रचंड बदल होत गेले आहेत, यापुढेही होणार आहेत. याचं सगळ्यात मुख्य कारण म्हणजे त्या कल्पना आहेत. युवाल नोआह हरारी नावाचा लेखक आपल्या सेपियन्स या सध्याच्या अत्यंत गाजणाऱ्या पुस्तकात या प्रकारच्या कल्पनांना इमॅजीन्ड रिअॅलिटी म्हणतो. म्हणजे काल्पनिक वास्तव. आणि अर्थातच हे काल्पनिक असल्यानेच परिवर्तनीय आहे.
कॉलेजमध्ये गर्लफ्रेंड/बॉयफ्रेंड असणं ही गोष्ट आता आश्चर्याची किंवा कुतूहलाची नाही. हे जे नातं निर्माण होतं हे पुढे जाऊन लग्नामध्येच अपग्रेड होईल याची शाश्वती नात्यात असणारे स्वतः मुलगा-मुलगी कोणी देईलच असं नाही. तशी शाश्वती देणंही कठीणच आहे म्हणा. कारण डिग्री हातात पडली की लग्नाचा बार उडवून टाकायची पद्धत आता शहरी सुशिक्षित वर्गात तरी नाही. आधीपेक्षा मुलं-मुली आता लवकर वयात येऊ लागल्या आहेत असं मध्ये आमच्या एका कार्यक्रमांत एक डॉक्टर वक्त्या होत्या त्या म्हणत होत्या. (१० फेब्रुवारीच्या म.टा. च्या मैफल पुरवणीत यावर एक लेखही आला होता.) वयात येणं म्हणजेच, लैंगिक उर्मी निर्माण व्हायला सुरुवात होणं आणि प्रत्यक्ष लग्न होणं यातला कालावधी बघितला तर आधीपेक्षा तो जवळ जवळ दुप्पट झालाय. हे घडत असतानाच माहिती तंत्रज्ञान आणि अर्थकारणाने आपलं आयुष्य आमूलाग्र बदललं आहे. स्त्री-पुरुष संबंधांमध्ये मोकळेपणा आलाय. आमच्या आधीच्या पिढीपेक्षा आजच्या पिढीत शाळा-कॉलेजपासूनच मित्र मैत्रिणींमध्ये स्पर्शाची भाषा कितीतरी अधिक आहे. एकमेकांना सहजपणे मिठी मारणं ही काय दुर्मिळ गोष्ट नाही. अशा परिस्थितीत माणसाच्या शुद्धतेच्या कल्पना एकदा तपासून बघायला नकोत का? नाही तर होतं काय, की शेवटी बहुतांश तरुण मंडळी स्वतःतल्या नैसर्गिक असणार्‍या उर्मी दाबून ठेवू शकत तर नाहीतच, पण वरून मात्र खोट्या नैतिकतेचा बुरखा पांघरतात. आपल्या मध्ययुगीन सामाजिक संकल्पनांमुळे आपण आपला समाज अधिकाधिक दांभिक करण्यात हातभार लावत नाही का?

याच चर्चेतून मग आपण येऊन पोचतो ते व्हर्जिनिटी नावाच्या प्रांतात. एखादी व्यक्ती (स्त्री किंवा पुरुष) ही लग्नाआधी व्हर्जिनच असली पाहिजे या विचारांमागे एक काल्पनिक वास्तव आहे. आणि ते वास्तव म्हणजे- अशीच व्यक्ती शुद्ध असते. मागे एकदा रिलेशनशिप- मनातलं ओठांवर या नावाचा आम्ही एक कार्यक्रम घेतला होता. सगळ्या विषयांवर खुल्लम खुल्ला बोलायचा मंच असं आम्ही म्हणलं होतं त्याचं वर्णन करताना. त्यावेळी काही मुला-मुलींनी महत्त्वाचा मुद्दा मांडला, ‘आपण शरीराच्या व्हर्जिनिटीबद्दल बोलतो. पण मनाच्या व्हर्जिनिटीचं काय?’. २०१७ च्या प्रपंच या दिवाळी अंकात लेखक राजन खान यांनी आपल्यातल्या व्यभिचारी निसर्ग नावाचा एक सुंदर लेख लिहिलाय. व्यभिचार हा केवळ शारीरिक पातळीवर नसतो तर तो मनाच्या पातळीवरही असतो ही त्या लेखातली त्यांची भूमिका न पटण्याचं काहीच कारण नाही. समजा मी एक व्यक्ती म्हणून सामाजिक संकल्पनांना मान देत शारीरिक दृष्ट्‍या व्हर्जिन असेन, पण मनात मात्र दुसर्‍या एका व्यक्तीने घर केले होते. त्या व्यक्तीबरोबर मी अनेक सामायिक अनुभव निर्माण करत नातं तयार केलं होतं, आता काही नाहीये, पण भूतकाळात तर होतंच, अशी परिस्थिती असेल. मग मी मानसिक दृष्ट्‍या, भावनिक दृष्ट्‍या व्हर्जिन नाही. आता काय करायचं? मी अशुद्ध आहे का? यावर मनात काय आहे या गोष्टीला महत्त्व नाही असं जर उत्तर असेल तर व्यक्तीच्या मनाला आपण किती कमी लेखतो आणि शरीराला म्हणजे बाह्य गोष्टींना महत्त्व देतो हेच सिद्ध होतं. आपला शुद्धतेचा पोकळ डौल तेवढा उघड होतो यातून. या अशुद्ध कल्पनांमधून जेवढे लवकर बाहेर तेवढं उत्तम.
समोर असणाऱ्या माणसाला माणूस म्हणून वागवणं, काल्पनिक वास्तवांच्या फार आहारी न जाणं याला पर्याय नाही. काल्पनिक वास्तवांच्या आहारी गेल्यावर हेच ते अंतिम सत्य या अविर्भावात आपण बोलू लागतो. जगाचा आणि तंत्रज्ञानाने निर्माण झालेल्या परिस्थितीचा रेटा एका बाजूने आणि दुसऱ्या बाजूने आपल्या दुनियेला मध्ययुगात ठेवण्याचा आपला अट्टाहास; यातून संघर्ष तेवढा उभा राहतो. लग्न करताना किंवा जोडीदार निवडताना, आणि त्यानंतर एकत्र राहतानाही या सगळ्याचा विचार करणं गरजेचं आहे. आमच्या पिढीने तर अधिकच. नाही तर या संघर्षात सगळ्यात जास्त नुकसान आमचंच आहे. आमचं आणि आमच्या पुढच्या पिढीचं. 

(दि. २४ फेब्रुवारी २०१८ रोजी प्रकाशित झालेल्या महाराष्ट्र टाईम्सच्या मैफल पुरवणीत प्रसिद्ध.)

No comments:

Post a Comment