सध्या
साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेल्या साहित्यिकांनी हे पुरस्कार परत करण्याची एक
लाटच उसळली आहे. साहित्यिक कलबुर्गी यांची हत्या, त्यानंतर दादरी मध्ये घडलेला
प्रकार या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर ‘मोदी सत्तेत आल्याने चेव चढून धर्मांध संघटना
अधिकाधिक आक्रमक होत हिंसक कृती करत आहेत’ अशा आशयाचा निष्कर्ष काढत हे पुरस्कार
परत केले जात आहेत. या कृतीवर दोन्ही बाजूंनी ज्या प्रतिक्रिया येत आहेत त्या बघून
माझ्या मनात तरी चिंता दाटून येते. मन व्यथित होते.
प्रत्यक्ष घटनांचे चमत्कारिक अर्थ लावल्याने कडवट, निर्बुद्ध आणि बिनबुडाच्या
निष्कर्षांची एक मालिकाच तयार होते आहे. आणि यामुळे एका न भेदता येणाऱ्या चक्रव्यूहात
आपण अडकत चाललो आहोत कदाचित. अर्थ लावण्यामध्ये गफलत केल्याने बघा कशी गडबड उडते
आहे सगळी. सर्वप्रथम हे कबूल केलेच पाहिजे की या कित्येक साहित्यिकांनी नुकत्या
घडल्या तितक्याच गंभीर घटना यापूर्वी अनेकदा घडूनही पुरस्कार परत करण्याचा प्रकार
केला नव्हता. आणि आज मोदी सत्तेत आल्यावर त्या पार्श्वभूमीवर या घटना अधिक गंभीर
भासू लागल्या आहेत. आता ही झाली सत्य घटना. या गोष्टीचा काही जण अर्थ असा लावत
आहेत की त्यावेळी त्यांचे समर्थन कॉंग्रेसला असल्याने कॉंग्रेस विरोधात काहीही
बोलणे त्यांनी टाळले. काहीजण असाही अर्थ लावताना दिसतात की, मुळात हे सगळे
साहित्यिक वरवर सेक्युलरवादाचा बुरखा पांघरलेले हिंदूविरोधी लोक आहेत. आता एखाद्याच्या
वा काहींच्या बाबतीत वरीलपैकी एखादे कारण लागू असेलही कदाचित. पण सरसकट हेच कारण
आहे आणि हे सर्व लोक असलेच आहेत असं म्हणत सगळ्यांना एका तागड्यात तोलण्यासाठी
माझे मन तयार नाही. कारण शक्यतांचाच वेध घ्यायचा तर दोन शक्यतांना का थांबावे? तिसरी
शक्यता अशीही आहे की आधी जेव्हा तिरस्करणीय घटना घडल्या तेव्हा ही मंडळी तेवढी
संवेदनशील नसतील. आता मात्र त्यांना हे सगळं असह्य होऊ लागलं असेल. कदाचित असेही
असेल की शिखांवर झालेल्या अत्याचाराने पाया रचला
गेला असेल आणि दादरी घडल्यावर आता मात्र कळस झाला असं वाटून त्यांनी ही
कृती केली असेल. अशा कितीतरी शक्यता आहेतच की. मग आपण तरी एकाच चष्म्यातून या
साहित्यिक मंडळींना बघत त्यांच्यावर टीका करण्यात काय हशील? तेव्हा पहिला माझा
मुद्दा म्हणजे कारणमीमांसा करताना एकांगी दृष्टीकोन आपल्याला सोडायला हवा. तरच आपण
सत्याच्या अधिक जवळ जाऊ शकू.
दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे ‘अमुक अमुक घडलं तेव्हा नाही काही केलं. आणि आता
मात्र हे करतायत’ अशा आशयाची टीका तकलादू आहे. कारण आधी नाही केलं पण निदान आता
तरी निषेधाचा सूर काढण्याचं धाडस यांनी दाखवलं हे समाधान आपण का मानू नये? “देर है,
अंधेर नहीं” हे का स्वीकारू नये? या आधीच्या वेळांना ते गप्प बसले तेव्हा त्यांची
चूक झाली हे स्वीकारून, त्याबद्दल त्यांना क्षमा करून आता ते एखादी निषेधाची गोष्ट
करत असतील तर ती सकारात्मकपणे न स्वीकारण्याइतके कोत्या मनाचे आपण झालो आहोत का? १९२०
साली समजा गांधीजींच्या असहकार चळवळीत नव्याने सामील होणाऱ्या लोकांवर “लोकमान्य
जेव्हा आंदोलन करत होते तेव्हा तुम्ही सहभागी नाही झालात, आता गांधीजी नेतृत्व
करतायत तर लगेच आलात होय? दुटप्पी आहात तुम्ही.” अशी टीका केली गेली असती तर काय
घडलं असतं? पण त्यावेळी आधीपासून असलेले लोक म्हणले की ठीक आहे, उशिरा का होईना
तुम्हाला सुबुद्धी झाली हे काय कमी आहे?!
वरच्या माझ्या मुद्द्यांच्या पलीकडे जाऊन माझा तिसरा मुद्दा म्हणजे जाणून
बुजून निवडक वेळेला निषेध करणाऱ्या मंडळींबाबत. आता कधी निषेध करायचा आणि कधी नाही
याची निवड केवळ हे पुरस्कार प्राप्त साहित्यिक अन् विचारवंतच तेवढे करतात असा एक
भंपक गैरसमज सध्या पसरवला जात आहे. माझा
असा दावा आहे की आपल्यातला प्रत्येकजण, हो हो अगदी प्रत्येकजण, कुठल्या गोष्टींचा निषेध
करायचा, कशाला विरोध करायचा याची जाणून बुजून किंवा नकळतही निवड करत असतो. काहीजण
जाहीरपणे हा निषेध व्यक्त करतात काहीजण खाजगीत, मित्रांमध्ये, गप्पांमध्ये. पण आपण
प्रत्येकजण निषेधाची वेळ निवडत असतो. निवडक निषेधामध्ये काही दोष असल्यास तो
आपल्याही माथी आहे. आणि खरे तर मला विचाराल तर यात दोष असा काही नाहीच मुळी!
आपल्या सर्वांचे काही प्राधान्यक्रम असतात, काही गोष्टी अधिक भावतात, काही अधिक
जाणवतात आणि त्यावर आपण प्रतिक्रिया देत असतो. यात दुटप्पीपणा काहीच नाही. सगळेजण ‘पॉलिटिकली
करेक्ट’ विधानं करू शकत नाहीत. मानवी स्वभावाचाच हा भाग आहे. आपल्याला या
साहित्यिकांच्या निवडक निषेधाचा राग येतो याचं कारण म्हणजे यांना प्रसिद्धी मिळते.
आपण शांतपणे हे समजून घेऊया आपल्याला त्यांच्या निवडक निषेधाचा राग नसून त्याबद्दल
मिळणाऱ्या प्रसिद्धीबद्दल असूया आहे. शिवाय ही भीतीही पेरली जात आहे की या
निषेधामुळे अमुक अमुक बाजू वरचढ होईल. सगळ्याला दोनच बाजू आहेत असे समजून संपूर्ण
जगाची विभागणी ‘आर या पार’ असं करत तथाकथित आपली बाजू वरचढ करण्याच्या अर्थहीन
उचापत्यांमध्ये आपला वेळ घालवावा इतका आपला वेळ स्वस्त आहे का? त्यापेक्षा घडल्या
घटनांचा आपल्या अनुभव, प्राधान्य आणि आकलनानुसार अन्वयार्थ लावत निष्कर्षाप्रत
येणे अधिक श्रेयस्कर नाही का? वातवरण कलुषित करणाऱ्या, कडवट निष्कर्षांकडे
नेणाऱ्या आणि संपूर्ण समाजाचं ध्रुवीकरण करू बघणाऱ्या दोन्ही बाजूंच्या काव्याला
बळी न पडण्याचं आपण ठरवू शकत नाही काय?
इथवर आपण काय करावं याबाबत माझी मते मी मांडली. आता या या पुरस्कार परत
करणाऱ्या साहित्यिकांकडे वळूया. साहित्यिक
विचारवंत वगैरे मंडळींनो, जालियानवालाबाग हत्याकांडाचा निषेध म्हणून रवीन्द्रनाथांनी
‘सर’ किताब परत केला हे आठवून आपल्याला आजही त्यांच्याविषयी आदर वाटतो. पण यातल्या दोन
गोष्टी महत्वाच्या वाटतात. पहिलं म्हणजे ज्या ब्रिटिशांनी सर किताब दिला त्याच
ब्रिटीशांच्या अधिकाऱ्याने क्रौर्याची परिसीमा गाठणारा गोळीबार केला आणि अत्याचार
घडवून आणले. असे क्रौर्य करणाऱ्या लोकांकडून मला सर किताब नको असे ठणकावून
सांगणारी कृती रवीन्द्रनाथांनी केली म्हणून ती तर्कसंगत ठरते. नुकत्या घडल्या
घटनांमध्ये अशी कोणतीही तर्कसंगती नाहीच. विचारवंत अन् साहित्यिक यांची हत्या झाली
ती कोणी केली हे अद्याप स्पष्ट नाही. पण ती कोणा शासकीय अधिकाऱ्याने केली आहे असे
सकृतदर्शनी तरी आढळून आलेले नाही. दादरी मध्ये चेहरा नसलेल्या जमावाकडून ही कृती
झाली. त्याचा अप्रत्यक्ष दोष, त्या जमावाला थेट किंवा आडून भडकवणाऱ्या मोजक्या
संघटना/व्यक्ती यांच्याकडे जाऊ शकत असेलही. पण म्हणून केंद्र शासकीय यंत्रणेला
थेटपणे दोषी धरता येणार नाही असे माझे स्पष्ट मत आहे. इतकेच नव्हे तर ज्यांना दोषी
धरले जात आहे त्यांनीच हा पुरस्कार दिला असता तर या पुरस्कार परतीच्या प्रवासाला
काही मतलब होता. इथे तुमचे सगळेच तर्कट अजब आहे.
साहित्यिक मंडळींनो, जसे तुमच्याविषयी टोकाचा द्वेष पसरवून समाजाचे ध्रुवीकरण करणाऱ्या
समाजकंटकांचा उपद्व्याप तिरस्करणीय आहे तसेच अर्धवट विचाराने, अडाण्यासारखे
त्यांच्या उपद्व्यापांना इंधन देणाऱ्या तुमच्या कृतीही आक्षेपार्ह आहेत. लोकांना
तुमचे थोतांड दिसल्यावर प्रामाणिक मध्यममार्गी, संयत आणि इहवादी मंडळींचीही गळचेपी
होते. ओले-सुके भेद न होता सगळेच जळून जाते. फायदा होतो तो फक्त या ध्रुवीकरण करून
लोकांना कडवट कट्टर बनवू पाहणाऱ्या नेत्यांचा. समाजाला कोणत्याही एका दिशेच्या टोकाचे
लोक पुढे नेऊ शकत नाहीत. ना डावे, ना उजवे. ना खालचे ना वरचे. समाजाला
सुवर्णमध्याला खेचून आणण्याची क्षमता असणारे लोक तुमच्या अप्रामाणिक वर्तनामुळे निष्प्रभ
होत जातात हा इतिहास आपल्यासह अनेक देशांचा आहे. या इतिहासापासून तुम्ही काही
शिकणार आहात की सर्व धर्मांच्या माकडांच्या हातात कोलीत देण्याचा उद्योग करत बसणार
याचा तुम्हाला निर्णय करावा लागेल. तुम्ही दुसरा पर्याय निवडल्यास, इथून पुढे,
विशेषतः माहितीच्या प्रचंड उपलब्धतेच्या काळात तुमचा अप्रामाणिकपणा आणि थोतांड हेच
प्रामाणिक मंडळींच्या विरोधातले सगळ्यात मोठे हत्यार बनेल याबद्दल शंका नको.
पुरस्कारांच्या परतीचा प्रवास हा संयत, संवेदनशील आणि मध्यममार्गी समाजाला; हिंसक, असहिष्णू आणि टोकाच्या समाजाकडे नेणारा प्रवास बनू नये अशी प्रार्थना आणि
प्रयत्न आपण करूयात. तेच आपल्या हातात आहे, नाही का?
Kadak lihila aahes
ReplyDeletethanks a lot!
Deleteतक॔सुसंगत लिखाण! पटले!
ReplyDeleteसाहित्यिकांचं वागणं थोतांड कसं किंवा ते अप्रामाणिक कसे हे स्पष्ट होत नाही.
ReplyDeleteमी याबाबत आधीच विवेचन केले आहे. पुरस्कार कोणी दिले, सध्याच्या परिस्थिती/घटनांसाठी दोषी कोण याची तर्कसंगत मांडणी असणे आवश्यक आहे. नुसत्याच भयगंडातून तर हे आपण करत नाहीओत ना याचे आत्मपरिक्षण आणि या सगळ्याच्या पुढे जाऊन आजवरच्या इतर घटनांच्या वेळी आपण पुढे आलो नाही याची प्रमाणिक कबूली इतक्या गोष्टी नसतील तर हे सगळे उपद्वयाप थोतांडच म्हणावे लागतील.
Deleteप्रज्ञा पवार यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
ReplyDeleteप्रति,
माननीय मुख्यमंत्री,
महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई – 32
एका अघोषित अशा आणीबाणीच्या पर्वातून आपण सगळेच सध्या जात आहोत. 1975 मधील आणीबाणीपेक्षाही सद्यकालीन आणीबाणीची भीषणता अधिक तीव्र आहे. याचे कारण तेव्हा जनसामान्यांवर फक्त शासनाचीच करडी नजर होती. आता मात्र शासनासहित अगदी आपण जिथे राहतो, वावरतो, नोकरी-व्यवसाय करतो तिथपर्यंत आपल्यावर लक्ष ठेवणारे सत्ताधार्यांचे पक्षसेवक दिसतात. शिक्षण, इतिहास, विज्ञान, कला-साहित्य आणि एकूणच सांस्कृतिक क्षेत्रात अपरिमित दंडेलशाही सुरू आहे. अतिशय बीभत्स, ओंगळवाणं असं आजचं सार्वजनिक चर्चाविश्व झालेलं आहे.
दादरीमध्ये घडलेली मोहम्मद अखलाक नृशंस हत्या, गुजरातमधील मुस्लिम युवकांना गरबा-बंदी, महाराष्ट्रात सातत्याने होणाऱ्या दलितांच्या अमानुष हत्या, लव्हजिहाद, घरवापसीच्या मोहिमा सुरू आहेत. विवेकाच्या आवाजाला प्रत्युत्तर देता येत नसेल तर विवेकी व्यक्तींची दिवसाढवळ्या हत्या करण्यापर्यंत परिस्थिती बिघडलेली आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्या, कोणताही वेगळा विचार खपवून घेतला जाणार नाही हे स्पष्ट करणार्या आहेत. मुद्दा केवळ लेखकांच्या अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा, त्यांच्या जीवितांच्या सन्मानपूर्ण रक्षणाचा नाही. तो तर आहेच, पण मी ज्या महाराष्ट्रात-भारतात राहते तिथली सर्वसामान्य माणसेही जीव मुठीत धरून कसंबसं जगत आहेत. जमातवादाचं विष जाणीवपूर्वक देशभर पसरवलं जात आहे.
काय खावं, प्यावं, कसं जगावं, प्रेम कुणावर करावं, कुणावर करू नये, कोणता वेष परिधान करावा, व्यक्त कसं व्हावं इथपासून भयाचं एक अनामिक सावट घेऊन जगणारी माणसं माझ्या अवतीभोवती आहेत. लेखक-कलावंतांच्या मूलभूत अधिकाराचा मुद्दा अधोरेखित करीत असताना सर्वसामान्य माणसांच्या जगण्याच्या अधिकारावरच विद्यमान शासनव्यवस्थेकडून घाला घातला जात आहे. भारतीय राज्यघटनेच्या पायाभूत मूल्यांवरच घाव घालण्याचा हा जो चौफेर प्रयत्न सुरू आहे त्याचा निषेध म्हणून मी मला मिळालेले आजवरचे सर्व शासकीय पुरस्कार, पुरस्कारांच्या रक्कमेसह (1,13,000 रु. – अक्षरी एक लाख तेरा हजार रुपये) शासनाला परत करीत आहे.
विविध भाषांमधून लिखाण करणारे अनेक सन्माननीय भारतीय लेखक लोकशाही न्यायव्यवस्थेप्रती जागरूक राहून त्यांना मिळालेले पुरस्कार परत करीत आहेत. एका अर्थाने त्यांनी जी देशव्यापी चळवळ सुरू केली आहे, त्याच्याशी मी एक मराठी कवयित्री-लेखिका म्हणून स्वतःला जोडून घेऊन महाराष्ट्रातून माझ्याही निषेधाचा आवाज घुमवू इच्छिते. सुधींद्र कुलकर्णी यांची भूमिका ज्या संवेदनशीलतेने आपण समजून घेतली त्याच संवेदनशीलतेने माझीही भूमिका समजून घ्यावी आणि राज्याचे प्रमुख या नात्याने महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला सुरक्षित जीविताची आणि त्याच्या मूलभूत स्वातंत्र्याची हमी द्यावी, अशी कळकळीची विनंती मी आपणास करते.
आपली विश्वासू,
प्रज्ञा दया पवार
दुर्दैवाने या पत्रात प्रज्ञा पवार यांनी काढलेल्या निष्कर्षांची जंत्री असली तरी त्याचे संदर्भ किंवा दाखले नाहीत. कवयित्री वा साहित्यिक म्हणून लोकांना आदर असला तरी तुम्ही म्हणाल त्यावर आंधळेपणाने लोकांनी विश्वास का ठेवावा? वरच्या पत्रातच बघूया-
Delete<> हा निष्कर्ष पत्राच्या सुरुवातीलाच मांडला आहे. पण कशाच्या आधारे त्या हे म्हणत आहेत?
दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी यांच्यापैकी दाभोलकरांची हत्या झाली तेव्हा सध्याचे सत्ताधारी सत्तेत नव्हते. आणि कलबुर्गी यांची हत्या झाली ती कॉंग्रेसशासित राज्यात. पोलीस दल हे राज्य शासनाच्या अखत्यारीत येतं हे लक्षात घेता सध्याच्या केंद्रीय शासनव्यवस्थेला किती दोष द्यायचा याला मर्यादा आहेत. 'आपल्या' लोकांचे सरकार आले आहे असे मानून त्या सरकारच्या वळचणीला राहत दंडेलशाही करणाऱ्या संस्था व व्यक्ती काही ठिकाणी उन्मत्त झाल्या असतीलही. पण तरी अशा घटना 'वाढल्याचे' साधार मांडल्याशिवाय त्यावर विश्वास ठेवणे कठीण जाते. शिवाय सर्वच गोष्टींना सरसकट एकाच तागड्यात तोलणे हेही कठीण आहे. सुधींद्र कुलकर्णी यांच्या कार्यक्रमाला पाठींबा देणारे सत्ताधारी पक्षाचे फडणवीस मुख्यमंत्री आहेत. कर्नाटकात धार्मिक धुमाकूळ घालणाऱ्या श्रीरामसेनेवर आपल्या कार्यकाळात गोव्यात मात्र बंदी घालणारे पर्रीकर संरक्षण मंत्री आहेत. तेव्हा सर्व गोष्टींना सरसकट रंग लावून मोकळे होण्याचा जो गाढवपणा सध्याचे भक्त लोक करतात तो निदान विचारी मंडळींनी तरी करू नये असे आपले मला वाटते.
मी तर म्हणतो, आज अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर खरंच घाला घातला जातो आहे की नाही याची लिटमस तपासणी करण्याच्या हेतूने या साहित्यिकांनी एकत्र येत गावोगाव फिरून बंदी घातलेल्या पुस्तकांचे जाहीर वाचन करावे, घटनाबाह्य सेन्सॉरशिप लादल्या गेलेल्या सिनेमांचे खेळ आयोजित करावेत, एमएफ हुसेनच्या किंवा तत्सम चित्रकार वगैरे मंडळींची प्रदर्शने भरवावीत, चर्चासत्रे घ्यावीत, सर्व धर्मांची कठोर चिकित्सा करणाऱ्या पुस्तिका छापून त्याचे वाटप करावे, चार्ली हेब्दोच्या कार्टून्सचे देशाच्या सर्व भागात प्रदर्शन भरवावे, ए.आर. रेहमान विरोधात फतवा काढल्याबद्दल निषेध सभा आयोजित कराव्यात, हिंदू मुस्लीम ख्रिश्चन भेद न करता अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी कृतीशील व्हावे. आणीबाणीचा उल्लेख केला गेला आहे. माझ्या ऐकण्यानुसार आणीबाणी काळात अनेक साहित्यिक, विचारवंत गावोगाव फिरून जनजागृती करत होते, त्याबद्दल जेलची हवाही खात होते. कृतीशील निषेध केल्यास बांधिलकी दिसते. नुसत्या पत्रकार परिषदा घेऊन घोषणा केल्याने हा सगळा नुसता वरवरचा दिखावा आहे अशी लोकांना खात्री पटवून देणे मुळीच कठीण होणार नाही हे समजून घ्यावे. पुरस्कार परत करणे हे थोतांड नाही हे कृतीशीलपणे लोकांसमोर सिद्ध करावे लागेल. अन्यथा चिखलफेक सहन करण्याची तयारी ठेवावी लागेल.