Sunday, May 27, 2012

कोणार्क एक्स्प्रेस !

ध्यंतरी एका सामाजिक संस्थेच्या 'पोलिटिकल- इलेक्टोरल रीफॉर्म्स' या विषयावरच्या राष्ट्रीय परिषदेला जाण्याची संधी मला मिळाली. ही परिषद होती ओडिशा मध्ये. तिथे जाईपर्यंत ओरिसा म्हणणारा मी आता मात्र कटाक्षाने ओडिशा म्हणतो...! जसं पुण्याला पूना किंवा मुंबईला बॉम्बे म्हणलेलं आपल्याला आवडत नाही तसंच तिथले लोकही ओडिशा म्हणावं यासाठी आग्रही आहेत असे वाटले. ५ आणि ६ मे च्या या परिषदेसाठी मी ५ मेला पहाटे कोणार्क एक्स्प्रेसने भुबनेश्वर मध्ये पोचलो. रेल्वेने प्रवास माझी अत्यंत लाडकी गोष्ट आहे. रेल्वे मध्ये जी मजा येते ती विमानात नाही. आणि भारतीय रेल्वेने आम्हाला मुळीच निराश केलं नाही. एवढ्या लांबची गाडी अगदी वेळेत पोचली. या वेळी मी रेल्वेवर विशेष खुश झालो ते त्यांच्या अप्रतिम कॉफी साठी...! 
देशभरातून लोक परिषदेसाठी आले होते. एकुणात ती परिषद उत्तमच झाली. काही चांगल्या लोकांशी ओळखी झाल्या. राजकीय पक्षांचे नेते, नोकरशहा अशा मंडळींनी या परिषदेत उपस्थिती लावली आणि आपली मते मांडली. या परिषदेत सहभागी होण्याचा अनुभव नक्कीच  चांगला होता.
दोन दिवसांची आमची परिषद संपली त्या दिवशी संध्याकाळी ओडिशा बघायला बाहेर पडलो. उन्हाळ्यात भारतातल्या हिमालय वगळून  इतर कोणत्याही भागाप्रमाणेच ओडिशाही भयानक गरम होतं. तरी आमच्या नशिबाने आम्ही ज्या दिवशी पोचलो त्या दिवशी पहाटे पावसाची एक सर येऊन गेली होती. आणि पहाटे का होईना हवेत थोडाफार गारवा होता. दुपारनंतर मात्र भयानक हवा, जणू भट्टीच. 



भुबनेश्वर  पासून  अगदी जवळच धौली या ठिकाणी आम्ही बौद्ध स्तूप बघायला गेलो. याच प्रदेशात इतिहासातले सुप्रसिद्ध  कलिंगाचे युद्ध सम्राट अशोक लढला होता. ज्या ठिकाणी सम्राट अशोकाने बौद्ध धर्माची दीक्षा घेतली तिथे हा स्तूप बांधला असल्याचे आम्हाला तिथल्या माणसाने सांगितले. बुद्धामध्ये आणि बौद्ध गोष्टींमध्ये एक वेगळीच शांती असते असं मला नेहमी वाटतं. का माहित नाही...पण बुद्धाची ती शांत मूर्ती, ओठांवरचं स्मितहास्य, एकुणात बौद्ध धर्माला असलेली उदारतेची पार्श्वभूमी या सगळ्याचा तो एकत्रित परिणाम असावा. गेल्या वर्षी हिमाचल प्रदेश च्या स्पिती खोऱ्यातल्या बौद्ध मठात आम्ही गेलो होतो. त्यावेळी माझ्या मनातले सगळे विचार एकदम  शांत झाले होते. एक अनामिक शांतता मनाला लाभली होती. आणि त्यात मी अगदी तल्लीन झालो होतो. तिथली थंडी, दऱ्या, हिमालयाचं रौद्रभीषण रूप याचाही तो परिणाम असावा असं मला वाटलं होतं त्यावेळी. पण इथे ओडिशा मध्ये दूरदूरपर्यंत डोंगर दिसत नव्हते. एका टेकाडावरच हा स्तूप असला तरी आजूबाजूला सगळा प्रदेश सपाट. नजर जाईल तिथपर्यंत सपाट प्रदेशात शेती पसरलेली. शांतपणे संथपणे वाहणारी 'दया' नदी. उकाडा. अशी हिमालायापेक्षा संपूर्ण वेगळी भौगोलिक  परिस्थिती असूनही धौलीचा स्तूप बघताना मला तीच शांतता जाणवली जी मला हिमायालात जाणवली होती. आणि हेच मला विलक्षण वाटलं. कदाचित आधी म्हणल्याप्रमाणे हा बुद्धाचाच परिणाम असावा. दुर्दैवाने आम्ही जास्त वेळ तिथे थांबलो नाही. बस पुढे निघाली..  पुरी च्या समुद्राकाठी आम्ही पोचलो त्यावेळी समुद्राला भारती आली होती. अंधार पडला होता. आणि त्याहून महत्वाचं समुद्रातून उगवणारा नारंगी रंगाचा पौर्णिमेचा चंद्र दिसत होता. पहिल्यांदा ते दृश्य बघताना अक्षरशः श्वास रोखला गेला.आम्ही गेलो त्या दिवशी (६ मे) 'सूपरमून' होता. म्हणजे नेहमीपेक्षा चंद्र पृथ्वीच्या जास्त जवळ असल्याने मोठा दिसत होता. असा चंद्र उगवताना बघणं हे फारच जास्त अप्रतिम होतं. एकतर आजपर्यंत (गोवा नाहीतर कोकणात) कायम समुद्रात अस्त होणारे सूर्य-चंद्र बघायची सवय. पण भारताच्या पूर्व किनाऱ्यावर समुद्रातून होणारा चंद्रोदय मी पहिल्यांदाच बघितला. अपूर्व होतं ते! 

दुसऱ्या दिवशी दुपारी आमची पुण्याला परत यायची ट्रेन होती. पण thank god, पहाटे लवकर उठून कोणार्क ला जाऊन यायचा आम्ही निर्णय घेतला. पहाटे ४ वाजता आम्ही भुबनेश्वरहून निघालो. काहीही झालं तरी सूर्योदयाला कोणार्क मध्ये आपण असलं पाहिजे असं डोक्यात होतं. थेट कोणार्कच्या बीच वर गेलो. आणि समुद्रातून होणारा सूर्योदय सुद्धा बघितला!  ६ च्या सुमारास आम्ही कोणार्क च्या सूर्यमंदिराच्या आवारात शिरलो. आणि पुढचे दोन तास भान हरपून ते मंदिर बघू लागलो. इ.स.१२५० मध्ये बांधलेलं हे मंदीर शिल्पकलेचा आणि स्थापत्यकलेचा उत्कृष्ठ नमुना आहे. सुरुवातीलाच असलेल्या एका चौथऱ्यावर असंख्य नर्तकी आणि सुंदर स्त्रियांची शिल्पे. वाद्य वाजवणारेही आहेत. एकूण संगीत संदर्भात असंख्य शिल्पे. काही शिल्पांमध्ये स्त्रिया नटत  सजत आहेत. 

हा चौथरा सोडला की मुख्य मंदिर सुरु होतं. याची रचना अशी आहे की हा एक रथ वाटावा. सात घोडे हा रथ ओढण्यासाठी. आता सात घोडे शिल्लक नाहीत. काळाच्या ओघात दोन फुटके तुटके घोडे शिल्लक आहेत. रथाला दिवसाच्या २४ तासांचं प्रतिक म्हणून २४ चाके आहेत. प्रत्येक चाकाला ८ प्रहर दर्शवणारे आठ आरे आहेत. आणि संपूर्ण मंदिर भरलं आहे ते खजुराहो मध्ये आहेत तशा लैंगिक क्रिया करतानाच्या स्त्री पुरुषांची शिल्पे. ही शिल्पे खरोखरच फारच सुंदर आहेत. इतक्या उघडपणे विविध प्रकारे संभोग करणाऱ्या स्त्री पुरुषांची शिल्पे असूनही ती बघत असताना पॉर्न फिल्म बघितल्यासारखं वाटत नाही. उलट त्या सौंदर्याचा आपण मुक्तपणे आस्वाद घेतो. मला वाटतं ती शिल्पे करताना त्याबाबत असणारा मोकळेपणा आणि प्रामाणिकपणा हा त्या शिल्पांमधूनच जाणवतो. आणि म्हणूनच कदाचित ती शिल्प व्हल्गर वाटली नाहीत मला. 

आपले पूर्वज खरच इतके मुक्त विचारांचे होते? आज काही मंडळी संस्कृती संस्कृती बोलत असतात. सेक्स हा शब्द उच्चारणं सुद्धा गुन्हा असल्यासारखे वागतात. पण ही मंदिरे काय सांगतात आपल्याला? आणि हे मंदिर काही फार अगदी बाबा आदम च्या जमान्यातले नाहीये. अवघ्या ८०० वर्षांपूर्वी आपला समाज इतका खुल्या विचारांचा होता की संभोग ही गोष्ट पवित्र मानून त्याचे उदात्तीकरण केले जात होते! इतकेच नव्हे तर मंदिरासारख्या सर्वांना खुल्या असणाऱ्या जागेवर अशी आडपडदा नसलेली शिल्पे कोरणे हे पराकोटीच्या प्रगल्भतेचं लक्षण आहे. बरं, असंही म्हणता येत नाही की यात फक्त नवरा बायकोचीच शिल्पे आहेत. कारण यात एक पुरुष दोन स्त्रिया, दोन पुरुष एक स्त्री, फक्त दोन स्त्रिया, अशी विविध प्रकारची शिल्पे आहेत. तथाकथित  'संस्कृती रक्षकांच्या' तालिबानी वृत्तीकडे बघता त्यांनी ही शिल्पे बघितली तर त्यांना कल्चरल शॉक बसून ते ही शिल्पे तोडायला निघतील अशी भीती वाटते...! 
इतर शिल्पांमध्ये सिंह आणि हत्ती हे प्राणी प्राधान्याने. कुठे युद्धातल्या हत्तीने शत्रूच्या सैनिकाला सोंडेत उचलले आहे तर कुठे शौर्याचे प्रतिक म्हणून सिंहाने हत्तीला ठार केलेले दाखवले आहे. युद्धाचा विजेता आपल्या घोड्यासह ढाल तलवार घेऊन जातानाचे शिल्प तर केवळ अप्रतिम. आणि त्याच घोड्याच्या पायदळी तुडवला जाणारा शत्रू..! कोणार्क मंदिराप्रमाणेच मंदिराचे आवारही प्रचंड मोठे आहे. आणि सरकारने हे सगळंच अतिशय सुंदर स्थितीत हे ठेवलेले आहे हे पाहून बरं वाटलं. निघावं वाटत नव्हतं. पण ऊन भयानक वाढलं होतं आणि पुण्याला परत येणारी ट्रेन सुद्धा पकडायची असल्याने आम्ही निघालो. रेल्वे ने परत येताना चिल्का सरोवर दिसलं. जगातलं दोन नंबरचं आणि आशिया मधलं हे सर्वात मोठे सरोवर. धौली बुद्ध स्तूपाच्या जवळून वाहणारी दया नदी चिल्का सरोवराच्या उत्तर भागात अरबी समुद्राला मिळते. चिल्काला निवांत पणे जायला हवं... विशेषतः थंडीमध्ये. थंडीत उत्तर गोलार्धातून सर्वात जास्त पक्षी चिल्काच्या प्रदेशात स्थलांतर करून येतात. त्यावेळी इथे वेळ घेऊन यायला हवं. परत एकदा धौली आणि कोणार्क मध्ये वेळ घालवावा असं वाटतं...शिवाय ओडीशामध्ये जंगलं आहेत. इतरही निसर्गसुंदर जागा आहेत ज्या बघायच्या राहून गेल्यात. त्यामुळे परत एकदा जायचं आहे ओडिशा मध्ये.. तशी संधी मिळाली तर सोडणार नाही हे निश्चित !  

1 comment: