Sunday, February 19, 2012

निवडणूक, प्रचार, कार्यकर्ते इत्यादी...

बंडू आणि तात्या चहा पीत बसलेले असतात... दोघही निवांत... बंडू बिडी पेटवतो आणि एक प्रदीर्घ झुरका घेत तात्याला विचारतो, "काय रे तात्या, पुढची इलेक्शन कधीये?"
"दोन वर्षांनी..."- तात्या बंडूच्या हातातून बिडी घेत उद्गारतो...
आता पुढची दोन वर्ष कशी काढायची, आर्थिक नियोजन कसे करायचे या विचारात दोघंही गढून जातात..  धुरांची वलयं काढता काढता दोघांच्याही डोक्यात २ महिने तरळून गेले...
बंडू आणि तात्या म्हणजे अस्सल "स्टार प्रचारक"..! शिवाय त्यांचा होणारा खर्च इलेक्शन कमिशन ला दाखवावाही लागत नाही... दोघांनाही ८-१० निवडणुकांचा अनुभव. म्हणाल तिथे म्हणाल त्या लोकांसमोर बोलण्याची त्यांची हातोटी म्हणजे विलक्षणच! त्यामुळे दोघांनाही भरपूर भाव! पण सुरुवातीलाच ते दोघंही जात नाहीत. "तिकीट नक्की झालं की या" असं ते प्रत्येक उमेदवाराला सांगतात. काहीजण "आमचं तिकीट कोन कापतं तेच बघतो. अन कापलं तरी आपन उभा राहनार" असं सांगतात. अशावेळी मग बंडू आणि तात्याला काही बोलता येत नाही आणि मग दोघंही प्रचारात सामील होतात. दोघांकडे एकेक डायरी असते. त्यामध्ये संपूर्ण प्रचाराचे शेड्युल असते, पण त्यातही शेवटचे ५ दिवस मोकळे सोडलेले असतात... एकाच प्रभागात असणारे १०-१५ उमेदवारांचा प्रचार करायचा म्हणजे डायरी पाहिजेच. जसजसे उमेदवार नक्की होतात तसतशी बंडू-तात्याची डायरी भरत जाते. सकाळी पंजासाठी प्रचारफेरी, दुपारी कमळासाठी सभेचे नियोजन, संध्याकाळी घड्याळाच्या रोड शोचे आयोजन तर रात्री इंजीनासाठी मतदार याद्यांचे काम.. असे दिवसभर काम करायचे, कामाचे पैसे वाजवून घ्यायचे- तशी आधीच बोली झालेली! अशा प्रकारे महिनाभर काम केल्यावर कोणत्या पक्षाचे काय मुद्दे आहेत, कोणाचे कमजोर मुद्दे काय आहेत, कोणावर कसले आरोप झाले आहेत याची इत्यंभूत माहिती बंडू आणि तात्याला मिळते. मग या बातम्या गपचूप काही पत्रकारांना कळवायच्या त्याबदल्यात चहा बिडी उकळायची ही या दोघांची खासियत..!
असे होता होता प्रचाराचे शेवटचे ५ दिवस उरतात. आता उमेदवार नक्की झालेले असतात, प्रचाराची धामधूम उडालेली असते. आणि प्रचारासाठी लागणाऱ्या पोरांची किंमत सुद्धा वधारलेली असते..! काही ठिकाणी २०० रुपये दिवस तर काही ठिकाणी तब्बल २००० रुपये दिवस..! अशी सगळी परिस्थिती निर्माण झाली की बंडू आणि तात्या एखाद्या सिंहासनावर बसल्यासारखे बसतात... समोर सगळे सगळे उमेदवार- भाऊ, दादा,बाबा,अण्णा, भाई,रावसाहेब अगदी सगळे!... शेवटचे ५ दिवस बंडू आणि तात्या पूर्णवेळ एकाच उमेदवाराचा प्रचार करतात. ती त्यांनी वर्षानुवर्षे घालून घेतलेली शिस्त आहे. एक उमेदवार बोली सुरु करतो, आधी बोली बंडू साठी, "५००० रुपये दिवस!", त्यावर दुसरा ओरडतो, "१० हजार!" तिसरा आणखीन जोरात ओरडतो," १२ हजार!".... बाकीचे काही कार्यकर्ते असूयेने आणि इर्षेने बंडू-तात्याकडे बघत असतात. पण अनेकांच्या डोळ्यात आदराचे भावही असतात. 'एक दिवस आपल्याला या पायरीवर पोचायचं आहे' असे भाव अनेकांच्या चेहऱ्यावर असतात..!
अखेर बंडू वरची बोली संपते आणि बंडू शेवटचे पाच दिवस कोणाबरोबर प्रचार करणार हे ठरते. मग तात्यावारची बोली.. बंडू हातचा गेला हे लक्षात घेऊन तात्यावारची बोली बंडू वरच्या शेवटच्या बोलीपासून सुरु होते..! आणि ती जवळ जवळ तिप्पट होऊन संपते... पण तरीही बंडू आणि तात्या सगळे पैसे एकत्र करून समसमान वाटून घेतात. तसा त्यांच्यातला अलिखित करारच आहे. वर्षानुवर्षे असेच चालले आहे. दोघंही आपल्याकडेच यावेत प्रचाराला असा प्रयत्न बहुतेक जण करतात, पण या बोली लावण्याच्या नाट्यामुळे अनेकांना ते परवडत नाही. शेवटी दोन भाग्यवान उमेदवारांना बंडू एकाला आणि एकाला तात्या असे प्रचाराला मिळतात...! मग शेवटचे पाच दिवस मात्र दोघांना बिड्या मारायलाही वेळ नसतो. अथक काम... प्रचारादरम्यान काही ठिकाणी पैसे वाटप, ते उघडकीस आणणे, मग ते प्रकरण मिटवणे, बोगस मतदार शोधणे, अशा विविध गोष्टींकडे बंडू आणि तात्या "साईड इन्कम सोर्स" म्हणून बघतात... याच दरम्यान एकदोन मारहाणीच्या घटना घडवून आणणे हा तर या दोघांच्या डाव्या हातचा मळ..! एकूण काय तर हे पाच दिवस धंदा तेजीत येतो...
प्रचार संपला, निवडणूक झाली...एक उमेदवार जिंकला, बाकी पडले.. सिझन संपला.. मग दोघंही आपापल्या बायका पोरांना घेऊन मुळशीला मस्त दोन-चार दिवस विश्रांतीला जातात... गेल्या अनेक वर्षांच्या मेहनतीचे फळ म्हणजे- दोघांनी मुळशीला शेजारी शेजारी छान दोन फार्म हाउसेस बांधली आहेत. अर्थात तरीही बिडी सोडून मार्लबरो मारायला लागलेत असे घडलेले नाही...!
दोघंही शांतपणे तळ्याकाठी खुर्च्या टाकून बसलेत, दोघात एक बिडी शेअर मारतायत... विचार करतायत, आता पुढची दोन वर्ष काय करायचं...!

*हे सर्व असत्य आणि काल्पनिक असून कोणाला कशामध्ये साधर्म्य बिधर्म्य वगैरे वगैरे सापडल्यास तो निव्वळ योगायोग आहे असे समजावे, किंवा आपले कान आणि डोळे फारच तीक्ष्ण आहेत असे समजावे...! :)

Thursday, January 19, 2012

स्वातंत्र्य की समानता?

फ्रेंच राज्यक्रांतीने जगाला स्वातंत्र्य आणि समता असे दोन मंत्र दिले. आणि आधुनिक इतिहासात बहुतांश देशातले अर्थकारण-राजकारण हे याच दोन मुद्द्यांभोवती फिरत राहिले. इंग्लंड-जर्मनी-रशिया सारख्या पूर्वापार स्वतंत्र बलाढ्य देशांपासून भारतासारख्या पारतंत्र्यात असलेल्या देशांपर्यंत सगळ्यांचे राजकारण प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पद्धतीने याच मुद्द्यांच्या भोवती फिरत होते आणि अजूनही त्यात फार फरक झाला आहे असे मला वाटत नाही.

बहुतांश विचारवंतांनी हे दोन मुद्दे परस्पर विरोधी असल्याचे मत नोंदवले आहे. त्यासाठी शीतयुद्धाचा, कम्युनिस्टांचा संदर्भ दिला जातो. रशियामधली कम्युनिस्ट राजवट जुलमी होती, गुप्त पोलिसांचा सूळसूळाट होता. अभिव्यक्ती स्वातंत्र्य नावालाही नव्हते. पण कोणी कितीही नाही म्हणले तरी बऱ्यापैकी समानता होती. रशियातल्या सर्व भागात वस्तूंच्या किंमती सारख्या होत्या. अधिकारी वर्ग वगळता बाकी सगळी जनता एकाच पातळीवर होती. हिटलरच्या राज्यात तर सर्वसामान्य लोकांचा राहणीमानाचा दर्जा खूपच चांगला होता. पण समानता अशी नव्हती आणि स्वातंत्र्य तर औषधालाही नव्हते. याउलट परिस्थिती पश्चिम युरोपीय देश आणि अमेरिकेत उद्भवली. अधिकाधिक स्वातंत्र्य मिळत गेले, पण त्याच प्रमाणात विषमताही वाढली. आज अमेरिकेत ऑक्युपाय वॉलस्ट्रीट हे चालू आंदोलन हे विषमतेचाच परिपाक आहे. आर्थिक उदारीकरणामुळे सर्वसामान्य भारतीय नागरिकांची आर्थिक परिस्थिती सुधारली असली तरी त्यानंतर आर्थिक क्षेत्रात आलेल्या स्वातंत्र्याच्या वाऱ्यांमुळे श्रीमंत गरीब ही दरी प्रमाणाबाहेर रुंदावली आहे. आज एफ.डी.आय. ला रिटेल मध्ये गुंतवणूक करण्याचे स्वातंत्र्य द्यावे का याबद्दल जोरदार खडाजंगी होते याचे मूळ कारण हेच आहे की हे स्वातंत्र्य बहाल केले तर या क्षेत्रातील समानता पूर्णपणे नष्ट होईल असे मानले जाते. यामध्ये बरोबर काय चूक काय या हा या लेखाचा विषय नाही. पण आधुनिक जगातलं राजकारण समाजकारण आणि अर्थकारण हे याच वादाच्या केंद्रस्थानी असणार आहे ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे.

अनेक समाजवादी-कम्युनिस्ट लोकांना वाटतं समानता हेच खरेखुरे स्वातंत्र्य.. तर सर्वांनाच सर्व प्रकारचे स्वातंत्र्य देणे ही खरीखुरी समानता असा स्वातंत्र्यवादी मंडळींचा दावा असतो. अर्थातच ह्या दोन्ही प्रकारची मंडळींमध्ये सातत्याने रस्सीखेच चालू असते. आणि यामध्ये आपण कायमच अडकलेलो असतो. समानता हा विषय कायमच आपल्याला आकर्षक वाटतो. सर्वेः सुखिनः सन्तु हा विचार तर भारतीयांच्या डोक्यात अगदीच मुरलेला आहे. आपल्या पुराणात, संत साहित्यात, एकूणच तथाकथित संस्कृतीत समानता आहे. पण दुसऱ्याच बाजूला भिषण जाती व्यवस्था आहे जी विषमतेवरच तर आधारलेली आहे. त्यामुळे राजकीय-सामाजिक आर्थिक पातळीवर भारतात समानता तर नाहीच शिवाय सर्व समाज घट्ट सामाजिक-नैतिक बंधनांमध्ये अडकलेला आहे. बंधनं आहेत अशा ठिकाणी स्वातंत्र्य कसे नांदणार? त्यामुळे आपण ना स्वातंत्र्य उपभोगू शकतो ना समानता!



हा सोबत दिलेला ग्राफ पहा.आपली सध्याची स्थिती पहा-ना पुरेसे स्वातंत्र्य, ना समानता. हिरवी रेषा म्हणजे कसे घडायला हवे याचा आदर्श. पण प्रत्यक्षात कसे घडते ते म्हणजे लाल रेषा.. हिटलर-स्टालिन, हिंदू-मुसलमान धर्मवेडे लोक हे सगळे या ग्राफ मधल्या क्ष अक्षाच्या (X axis) खाली मोडतात. कारण त्यांचा आणि स्वातंत्र्याचा संबंधच काय?! भांडवलवादी आणि कम्युनिस्ट विचारसरणी परस्पर विरोधी दिशांना टोकाच्या जागी दिसून येते.

प्रथम हे मान्य करायला हवे आणि समजून घेतले पाहिजे की संपूर्ण स्वातंत्र्य आणि संपूर्ण समानता या अव्यवहार्य गोष्टी आहेत. हिरव्या रेषेच्या टोकाशी असलेली स्थिती म्हणजे अराजकवादी मंडळींचा (Anarchists) स्वर्गच..! पण ती गोष्ट व्यवहारात अशक्य आहे. त्यामुळे लाल रेषा आणि हिरवी रेषा एकमेकांना छेदतात तो बिंदू गाठायचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्यानंतर अधिक स्वातंत्र्याच्या दिशेने आपण गेलो तर समानता कमी होत जाईल, अधिक समानतेकडे जाऊ लागलो तर स्वातंत्र्याचा संकोच होईल. म्हणूनच मी आदर्श असणारी हिरवी रेषा ही हिरव्याच रंगाच्या दोन वेगळ्या छटांनी (shades) दाखवली आहे. आपल्याला सामाजिक-राजकीय-आर्थिक क्षेत्रात हा परफेक्ट इक्विलीब्रीयम (Perfect Equilibrium) कसा साधायचा यावर विचार करावा लागेल. असा सविस्तर आणि सर्व समावेशक विचार केल्याशिवाय व्यापक अर्थाने परिवर्तन अशक्य आहे. राजकीय विचारसरणीचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा या ग्राफ मध्ये संबंधित राजकीय पक्ष कुठे आहे याचा विचार झाला पाहिजे. आपल्याला नेमके कुठे जायचे आहे, त्यातून स्वातंत्र्य समानता याचा विचार करता खरच किती प्रमाणात काय मिळणार आहे असा साधक बाधक विचार करावा लागेल.

लोकशाही,स्वातंत्र्य आणि समानता या तीन मूल्यांवर आधारित परफेक्ट इक्विलीब्रीयम असलेली एखादी सिस्टीम आपण उभारू शकतो?

*यामध्ये मांडलेले विचार संपूर्णपणे योग्य आहेत असा माझा दावा नाही. माझ्या डोक्यातले विचार मी सगळ्यांपुढे मांडतो आहे. त्या निमित्ताने स्वातंत्र्य-समानता या परस्पर विरोधी मुद्द्यांवर अधिकाधिक चर्चा व्हावी इतकीच अपेक्षा..

Thursday, December 22, 2011

सर'कार'नामा...!

चारचाकी गाडी ही गोष्ट प्रतिष्ठेची आणि मानाची समजली जाते. साहजिकच राजकारण आणि सत्ताकारण यामध्ये गाडीला विशेष महत्व आहे. माझ्या डोक्यात जेव्हा हा विषय पहिल्यांदा आला तेव्हा सगळ्यात आधी मला जुने मराठी सिनेमे आठवले. विशेषतः सामना आणि सिंहासन. दोन्हीमध्ये राजकारण आणि राजकारणी मंडळी. साधारणपणे गावातला पाटील- राजकारणी यांच्याकडे कायम एक जीप. ती जीप म्हणजे एक सत्तेचे केंद्रच. अगदी हिंदी फिल्म्स मध्ये सुद्धा गावच्या ठाकूर कडे कायम एक जीप. ज्याच्या ड्रायव्हर किंवा त्या शेजारच्या सीट वर बसून ते आपली सत्ता गाजवणार...! सिंहासन मध्ये गावातल्या आमदाराकडे जीप आणि शहरात मात्र गाड्यांमध्ये विविधता हे अगदी व्यवस्थित दाखवलं आहे. 
मध्यंतरी निवडणुका राजकारण वगैरे विषयांवर एका मित्राशी गप्पा सुरु झाल्या. तो मित्र मुळातला कलाकार, त्याचा राजकारण वगैरेशी फार संबंध नाही. आवर्जून मतदान करायला मात्र जातो तो. बोलता बोलता तो एकदम उसळून म्हणला," जे लोक रस्त्यात बोलेरो गाडी उभी करतात आणि ट्राफिक जाम करतात त्यांना गां*वर वेताच्या छडीने फटके दिले पाहिजेत..."
किती प्रातिनिधिक प्रतिक्रिया होती ही...! 
पूर्वी लाल दिव्याची गाडी, किंवा भारत सरकार, महाराष्ट्र शासन वगैरे लिहिलेली गाडी (बहुतेक वेळा Ambassador) दिसली तर त्याला मान दिला जात असे. तो मान आम्हालाही मिळाला पाहिजे, या भावनेतूनच कदाचित गाडीवर पक्षाचा/ संघटनेचा किंवा तत्सम स्टीकर लावणे ही गोष्ट सुरु झाली असावी. शिवसेनेचा वाघ, मनसेचा झेंडा, राष्ट्रवादीचे घड्याळ, काँग्रेसचा हात यांचे स्टीकर आजकाल गाड्यांवर सर्रास बघायला मिळतात. वास्तविक पाहता नंबरप्लेटवर स्टीकर किंवा चित्र असण्यावर कायद्याने बंदी आहे. तसे असल्यास रु १००/- एवढा दंडही आहे. पण तरीही आमचे नेते बिनधास्तपणे नंबरप्लेटवर आपले चिन्ह चिकटवतात.. बिचारे ट्राफिक हवालदार! अशा गाड्यांवर कारवाई करावी तर पंचाईतच.. चुकून एखाद्या सापाच्या शेपटीवर पाय पडला तर काय घ्या..! त्यामुळे या गाड्या रस्त्याच्या मध्यात कोणाचीच तमा न बाळगता उभ्या केल्या जातात. अनेकदा यातून दाढी वाढलेली अवाढव्य देह असलेली आणि चेहऱ्यावर प्रचंड गुर्मी असणारी गुंड दिसणारी (असतीलच असं नाही !) माणसं उतरतात. मग काय बिशाद कोणा पुणेकराची की तो त्यांना इथे गाडी लावू नका म्हणून सुनावेल?! ट्राफिक जाम झाल्यावर लोक या मंडळींना शिव्या देत पुढे जातात पण निवडणुकीच्या वेळी मात्र या सगळ्या गोष्टी विसरून मतदान करतात किंवा करतंच नाहीत...! (पुणेकरांना स्मृतिभ्रंश झाला आहे... त्यामुळे कलमाडी पुण्याचा खासदार आहे यात काहीच आश्चर्य नाही...!!) पण चिंता नसावी राजकीय पक्ष अशा प्रकारे रस्त्यात आपली अवाढव्य गाडी उभी करून ट्राफिक निर्माण करतात आणि पुणेकरांना भविष्यात वाढणाऱ्या प्रचंड ट्राफिक चे आत्तापासूनच ट्रेनिंग देतात. या दिव्यातून तावून सुलाखून बाहेर पडल्यावर पुण्याच्या छोट्या रस्त्यांवर कितीही ट्राफिक वाढला तरी पुणेकर आत्मविश्वासाने तोंड देतील याबद्दल मला जराही संदेह नाही..!  
मनसेने या सगळ्या बाबतीत बऱ्यापैकी बाजी मारली आहे. पूर्वी शिवसेना आघाडीवर होती. राष्ट्रवादी बऱ्यापैकी आहे. काँग्रेस तुरळक आणि भाजप अगदी कमी (किमान या बाबतीत तरी पार्टी विथ डिफरन्स असं त्यांना म्हणता येतं!). कार वर असणारे स्टिकर्स आहेतच पण मनसेने दुचाकी पण सोडल्या नाहीत. दुचाकी च्या नंबरप्लेटवर मनसेचा झेंडा असणं ही गोष्ट नवीन राहिली नाहीये... साहजिकच अशी बाईक कोणी चालवत असेल तर आजूबाजूचे मध्यमवर्गीय पांढरपेशा लोक गाडी हळू आणि जपूनच चालवतात. एकूणच यामुळे वाहतूक सुरळीत राहायला मदत होते हे आपण लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे असे समाजकार्य करणाऱ्या या मंडळींना शिव्या देणे आपण थांबवावे असे विनम्र आवाहन... 
या सामाजिक कार्यात राजकीय पक्षच आघाडीवर असले तरी इतर सामाजिक संस्था आणि स्वघोषित जातीय पुढारी यांचा वाटा नक्कीच मोठा आहे. "राजे", "राजे, पुन्हा जन्माला या", "मी मराठा", "मी मराठी", "ब्रिगेड", "पतित पावन" अशा स्टिकर्सनी गाड्या अप्रतिम रंगवलेल्या असतात. एकूणच आपल्या जीवनान्त्ला एकसुरीपणा दूर करण्याचे श्रेय या मंडळींना जाते. 
सध्याच्या सुधारलेल्या आर्थिक परिस्थितीत, झगमगत असलेल्या मॉल वाल्या दुनियेत साहजिकच स्वातंत्र्य आणि मुक्त वावर वाढला आहे. परंतु हे सगळं तात्पुरतं आहे याची जाणीव याच संघटना पक्ष करून देत असतात. कितीही सुंदर काचेची दुकानं तुम्ही बांधलीत तरी "बंद" च्या दिवशी ती उघडी ठेवण्याचं स्वातंत्र्य तुम्हाला नाही.. इतकेच नव्हे तर valentine day वगैरे ला मुक्तपणे फिरावं म्हणणाऱ्या मंडळींना चोप मिळेल असा संदेश या संस्था देतात... या सगळ्याची आठवण सातत्याने या कार वरच्या स्टिकर्स मधून तुम्हाला-आम्हाला या संस्था सातत्याने करून देत असतात. साहजिकच "उगीचच भयमुक्त राहू नका... आम्ही आहोत" असा संदेश या स्टिकर्स च्या माध्यमातून समाजाला दिला जातो...!
वास्तवाची जाणीव करून देण्याचे फार मोठे काम या स्टिकर्स असलेल्या दुचाक्या आणि गाड्या करत असतात. प्रत्येक गोष्टीकडे स'कारा'त्मक दृष्ट्या बघितले पाहिजे. 
आपली गाडी नो पार्किंग मध्ये उभी असल्यावर ती उचलून नेली जाते. शिवाय दंड भरावा लागतो किंवा तो टाळण्यासाठी पोलिसाचे खिसे गरम करावे लागतात आणि भ्रष्टाचार वाढतो. त्यामुळे माझे समस्त पुणेकरांना आवाहन की त्यांनी लवकरात लवकर स्टीकर पद्धतीचा अवलंब करावा. आपण मत कोणालाही देत असाल किंवा नसाल, नंबर प्लेटवर कोणत्यातरी पक्षाचे चिन्ह असणे फार गरजेचे आहे. शिवाय गाडीच्या काचेवर राजे/शिवराय/आम्ही कोल्हापूरचे/ छत्रपती/ नडेल त्याला तोडेल/ छावा/ सरकार राज/जय महाराष्ट्र वगैरे वगैरेचे स्टिकर्स लावून घ्यावेत. किंवा फारशी चिंता न करता स्थानिक आमदाराचे नाव फोटोचा स्टीकर करून तो लावावा. यामुळे आपली गाडी कुठेही असली तरी उचलली जाणार नाही. थोडक्यात भ्रष्टाचाराची पाळी येणार नाही. आणि एकूणच भ्रष्टाचार कमी होईल. उपोषण वगैरे मार्गांपेक्षा भ्रष्टाचार निर्मुलनासाठी स्टीकरचा मार्ग सोपा आहे हेच मी यातून सिद्ध करत आहे..! 
माझा हा लेख वाचून जास्तीत जास्त लोकांनी स्टिकर्स लावले तर, लोकपालचे जसे 'जन'लोकपाल झाले.. तसेच या लेखाचे नाव मी सर'कार'नामा वरून जन'कार'नामा असे ठेवीन असे मी जाहीर आश्वासन देतो..! 
बाकी तुम्ही सुज्ञ आहात... आवश्यक तो संदेश घ्यावा...!! 

Saturday, November 19, 2011

दिवाळी फराळ...

मच्याकडे सगळेच खवय्ये आहेत. त्यामुळे दिवाळी फराळ हा प्रकार जोरदार असतो..! त्यातही आजीकडे एक दिवस फराळ कार्यक्रम असतो. त्यामुळे दिवाळी फराळ हा एकदम जिव्हाळ्याचा विषय... पण चकली-लाडू यापलीकडे जाऊन एका वेगळ्या प्रकारच्या फराळाची आमच्याकडे पद्धत आहे... अगदी वर्षानुवर्षे चालू असा वैचारिक फराळ...! 

आमच्याकडे दर वर्षी दिवाळी अंकांची मेजवानीच असते... दिवाळी अंक बाजारात आले की कपड्यांच्या दुकानात सेल लागल्यावर बायकांची जी अवस्था होते तीच माझी होते.. 
लहानपणी शाळेत असताना मी मला जे दिवाळी अंक हवे असायचे (उदा. छात्र प्रबोधन, किशोर, ठकठक, कुमार इ.) ते मी 'कमवायचो'..! 
शाळेला दिवाळीची सुट्टी लागेपर्यंत सगळेच दिवाळी अंक बाजारात यायचे. त्याची किमतीसह यादी बाबा आणून ठेवायचे. आणि मी घरोघर फिरून दिवाळी अंकांची ऑर्डर घ्यायचो. सुरुवात अर्थातच नातेवाईक-मित्र अशी व्हायची. त्यांच्याकडून ऑर्डर्स मिळाल्या की मग आईच्या मैत्रिणी, त्यांच्या सोसायट्या, मग दिसेल त्या बिल्डींग मध्ये घुसून सेल्समनगिरी करायचो. सहावी सातवीतला मुलगा घरपोच दिवाळी अंक विक्री करतोय हे पाहून लोकांना आश्चर्य वाटायचं. माझा मित्र सोहम हा ज्ञान प्रबोधिनीत होता. त्यांना त्यांच्या शाळेने फटाके विक्री करायला सांगितलेली असे. त्यामुळे एक दोन वर्ष आम्ही एकत्रच बाहेर पडायचो. फटाके आणि दिवाळी अंक, घरपोच विक्री! दोघांच्याही हातात आपापल्या याद्या आणि एक ऑर्डर घ्यायची वही. 
ऑर्डर्स घेतल्या की मग अप्पा बळवंत चौकात जायचे, तिथल्या 'संदेश एजन्सी' मधून सगळे दिवाळी अंक विकत घ्यायचे आणि मग सगळ्या घरांमध्ये ते पोचते करायचे हा उद्योग दिवाळीचे आधी २ दिवस चालायचा... 'संदेश' मधून मला सवलतीच्या दरात अंक मिळायचे. प्रत्येक अंकामागे २०% सुटायचे. मग हे पैसे वापरून मी माझी दिवाळी अंकांची खरेदी करायचो...! जास्तीत जास्त दिवाळी अंक खरेदी करता यावेत म्हणून मी अक्षरशः दिवसभर ऑर्डर्स घेत भटकायचो. सतत हिशोब करून किती ऑर्डर्स अजून घ्यायला लागतील ते बघायचो. पण एकदा का माझे दिवाळी अंक हातात आले की मग पुढची सुट्टी जी जायची त्याला तोड नाही...!!! दिवसभर तंगड्या पसरून वाचत पडायचे...!!! तेव्हा लागलेली ही सवय आता आयुष्यात कधी सुटेल असं वाटत नाही... 
नेहमीप्रमाणेच याही वर्षी भरपूर दिवाळी फराळ झाला...! अंतर्नाद, लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, अनुभव, साप्ताहिक सकाळ, जत्रा, माहेर, मानिनी, प्रपंच, आवाज, अनुवाद, चिन्ह अशा एकसे एक अंकांनी यावेळची दिवाळी भन्नाट गेली...!
त्यातले काही खास लेख प्रत्येकाने वाचावेत असेच आहेत. साप्ताहिक सकाळ मध्ये असलेला पुण्याच्या नदीवरचा लेख तुफान आहे. अतिशय अभ्यासपूर्ण...! पुण्यातली नदी, नदीचे प्रदूषण आणि सरकारची भूमिका अशा विविध गोष्टी या लेखात आहेत. 
महाराष्ट्र टाईम्स तर विलक्षण आहे... गेल्या ५० वर्षातले मटा मध्ये छापून आलेले उत्तमोत्तम लेख एकत्र करून छापले आहेत. गोविंदराव तळवलकरांच्या चीन हल्ल्यावारच्या एखाने या अंकाची सुरुवात होते... मग पु. ल., तेंडूलकर, हृदयनाथ मंगेशकर, इरावती कर्वे, आर के लक्ष्मण, नरहर कुरुंदकर, गदिमा, सुहास पळशीकर, कुमार केतकर, कुसुमाग्रज, सुनीताबाई देशपांडे, यशवंतराव चव्हाण, जयंत नारळीकर, नाना पाटेकर, व्यंकटेश माडगुळकर अशा दिग्गजांचे लेख एकाच अंकात मिळणे ही फारच मोठी मेजवानी होती...! यापैकी पुलंनी लिहिलेला बालगंधर्व यांच्यावरचा लेख, गदिमांचा आचार्य अत्रेंवरचा लेख, विजय तेंडूलकर, नारळीकर आणि नानाचा लेख तर फारच सुंदर. गोविंद तळवलकर यांचे सर्वच लेख अफाट..! महाराष्ट्र टाईम्स चा अंक हा नुसता वाचायचा अंक नसून संग्रही ठेवायचा अंक आहे. 
इतरही सगळ्याच दिवाळी अंकात खजिनाच आहे. अक्षर मधला मटा च्या ५० वर्षातल्या ३ प्रमुख संपादकांवर लिहिलेला प्रकाश अकोलकरांचा लेख, किंवा अक्षर मधला सोशल मिडिया वरचा स्वतंत्र विभाग, प्रपंच मधला "जगण्यावर शतदा प्रेम करावे" या विभागातले आनंद नाडकर्णी, अनिल अवचट, अच्युत गोडबोले यांचे लेख, अंतर्नाद मधले लेख, चिन्ह मधले नाडकर्णी आणि भालचंद्र नेमाडे यांचे लेख, माहेर मधला डॉ अभय बंग यांच्या मुलाचा लेख, लोकसत्ता मधला गिरीश कुबेर यांचा लेख हे सर्वच फार वाचनीय आणि विचार करायला लावणारे आहे. 

लोकांनी दिवाळी अंकाचे वाचन केले तरी दिवाळीच्या महिन्याभरात लोकांची प्रगल्भता कित्येक पटींनी वाढेल. दिवाळीच्या निमित्ताने विचारवंत, तज्ञ, पत्रकार, जाणकार लोक आपण होऊन माहितीचा, विचारांचा खजिना उघड करत असतात. तो भरभरून घेणे आणि स्वतःला प्रगल्भ करणे आपल्याच हातात आहे. 
वाचनाला पर्याय नाही. समाज अप्रगल्भ राहू द्यायचा नसेल तर सातत्याने वाचन लेखन व्हायला पाहिजे. त्यावर चर्चा व्हायला पाहिजे. कालच एका मित्राबरोबर गप्पा मारत होतो. बोलता बोलता तो म्हणाला ते एकदम पटलं. तो म्हणाला, आजकाल फेसबुक वगैरे मुळे लोक पटकन कशावरही विश्वास ठेवतात. एक फोटो कोणीतरी 'शेअर' करतो त्यावर कोणाचीतरी बदनामी असते. आणि कसलीही शहानिशा न करता असंख्य लोक त्याचा प्रसार करतात. आणि बेधुंदपणे या गोष्टी पसरतात लोक त्यावर विश्वासही ठेवतात. हे सगळं मुळीच चांगलं नाही असं माझं मत आहे. सर्वांगाने विचार करून, माहिती घेऊन, खोलवर वाचन केले गेले पाहिजे. समाज प्रगल्भ आणि सुसंस्कृत होणे गरजेचे आहे. 

Tuesday, November 1, 2011

चारित्र्य, कर्तृत्व वगैरे वगैरे...


मागे एकदा एक अप्रतिम ई मेल वाचला होता:
पुढील पैकी कोणता मनुष्य तुम्हाला नेता म्हणून आवडेल?
१) हा माणूस रोज दारू, प्रचंड सिगारेट. रात्र रात्र जागरणं तर रोजचीच.
२) हा माणूस दारू पितो शिवाय अनेक बायकांशी याची लफडी असल्याची सातत्याने चर्चा. शिवाय सत्ता जाऊ नये यासाठी धडपड.
३) हा माणूस कधीच दारू पीत नाही. सिगारेटला तर शिवतही नाही. एकच प्रेयसी, जिच्याशी लग्न. 

सर विन्स्टन चर्चिल  
यापैकी पहिली व्यक्ती आहे ग्रेट ब्रिटीश पंतप्रधान सर विन्स्टन चर्चिल, दुसऱ्याचे नाव आहे महान अमेरिकन अध्यक्ष फ्रांक्लीन डी रूझवेल्ट आणि तिसऱ्याचे नाव आहे एक भयानक हुकुमशहा अडोल्फ हिटलर!! 

किती लवकर आपण एखाद्या व्यक्तीबद्दल मत बनवून टाकतो ना?? विशेषतः व्यसन आणि लैंगिक चारित्र्य या बाबतीत तर भारतीय लोक ताबडतोब आपले मत बनवून टाकतात. त्यातही राजकारणाच्या बाबतीत एकदम हळवे होतात. सिनेमातल्या नट्या आणि नट यांची कितीही लफडी वगैरे असली तरी त्याविषयी फारसे वाईट कधीच वाटत नाही उलट त्या बातम्यांमध्ये जरा जास्तच रस असतो. पण एखाद्या राजकीय व्यक्तीचे कोणाशीही संबंध असतील तर मात्र आपल्या डोक्यातून ती व्यक्ती पार बादच होऊन जाते. अर्थात अमिताभ बच्चन चे अनेक नट्यांबरोबर संबंध होते (अशी चर्चा तरी होती, खरेखोटे अमिताभ, रेखा, जया यांनाच ठाऊक) तरीही निवडणुकीच्या रिंगणात त्याला मात्र या तराजूवर तोलले गेले नाही...! 
मस्तानी
सध्या फेसबुक वर राहुल गांधी च्या कोलंबियन मैत्रिणी वरून जोरदार चर्चा वगैरे चालू आहेत. किंवा उठ सूट नेहरूंच्या आणि लेडी माउंटबैटन यांच्या संबंधावरून टीका होत असते. असल्या भंपक भपकेबाज प्रचाराला आपले लोक बळी पडतात हे आपले खरोखरच दुर्दैव आहे. राहुल गांधी किंवा नेहरूंवर टीका करायची तर त्यांच्या कार्यावर करा, विचारधारेवर करा. या दोघांच्या किंवा इतर कोणाच्याही बाजूने बोलायचा माझा उद्देश नाही. माझे म्हणणे एवढेच आहे की कोणाचेही काही का संबंध असेनात कोणाशीही, त्याने त्याच्या कर्तृत्वावर फरक पडत नाही ना हे महत्वाचे. त्यामुळे मूल्यमापन करायचे तर कर्तृत्वाचे करा, विचारांचे करा... त्यांचे लैंगिक चारित्र्य वगैरे कसे होते असल्या भंपक आणि फुटकळ गोष्टींचा बाऊ करणे थांबायला हवे. पण आपल्या इथल्या परंपरावादी बिनडोक लोकांना याबाबत अक्कल नाही आणि हे समजून घेण्याची प्रगल्भताही नाही.
आमच्या पुराणात-इतिहासात द्रौपदी पाच पांडवांची बायको होती. शिवाय प्रत्येक पांडवाच्या स्वतंत्र बायकाही होत्या. विवाहबाह्य संबंध होते, विवाह पूर्व संबंध होते. अर्जुनाने द्रौपदी असताना कृष्णाच्या बहिणीचे हरण केले म्हणून कोणी त्याच्या  कर्तृत्वावर आक्षेप घेत नाही. किंवा पाच पती असूनही द्रौपदीच्या धैर्याची आणि महानतेची स्तुतीच ऐकायला मिळते. कोणी शिवाजीचे मूल्यमापन शिवाजीच्या आठ पत्नी होत्या या गोष्टीवरून करू लागले तर त्या व्यक्तीला आपण वेड्यातच काढू...! मस्तानी होती म्हणून बाजीरावाचे शौर्य कमी होत नाही.

एखाद्या व्यक्तीची भरपूर लफडी असतील पण ती प्रचंड काम करणारी असेल, भ्रष्टाचार वगैरे दृष्टीने स्वच्छ असेल तरी आपल्या इथे एखादा एकपत्नीवाला भ्रष्ट गुंड मनुष्य विक्रमी मताधिक्क्याने निवडून येईल. असले बुरसटलेले मतदार असतील तर या देशात राजकीय प्रगती कधी होणारच नाही. विचार करण्याची पद्धती बदलल्याशिवाय राजकीय परिवर्तन टिकाऊ होणार नाही. अर्थात हे फक्त आपल्या इथे आहे अशातला भाग नाही. अमेरिकेतही एखाद्या राजकीय व्यक्तीचे विवाह बाह्य वगैरे संबंध असणे तिथल्या लोकांना पचत नाही. पण फ्रान्स चे उदाहरण आवर्जून द्यावे वाटते. फ्रान्सच्या अध्यक्षांनी सार्कोझी यांनी आपल्या पहिल्या पत्नीबरोबर घटस्फोट घेऊन इटालियन गायिका असलेल्या कार्ला ब्रुनी या आपल्या प्रेयसीबरोबर विवाह केला. तिथल्या मिडीयाने या गोष्टीवर भरपूर टीका टिप्पणी केली. विरोधी पक्षांनी तर हा मुद्दाच बनवला. देशाचा अध्यक्ष असे कृत्य करूच कसे शकतो असे म्हणत सार्कोझी यांच्यावर तोफ डागली. पण फ्रेंच जनता तिथल्या राजकारण्यांपेक्षा प्रगल्भ निघाली. त्यांनी विरोधी पक्षीयांना मुळीच भिक घातली नाही. आपल्याकडे हे होऊ शकते? 
सार्कोझी आणि कार्ला ब्रुनी
मुळात विवाह, लैंगिक संबंध वगैरे गोष्टी एखाद्याची वैयक्तिक बाब आहे आणि त्याबाबत इतरांनी नाक खुपसण्याची गरज नाही हे आपल्या लोकांना कळतच नाही. याचा अर्थ या सगळ्यावर कोणी टीका करूच नये असा माझा बिलकुल आग्रह नाही. ते स्वातंत्र्य नसेल तर लोकशाहीला काय अर्थ? फक्त टीका करायची तर तेवढ्या मुद्द्यापुरती करा. त्याचा संबंध उगीचच कुठेतरी जोडत बसायची गरज नसते. राहुल गांधीला कोलंबियन मैत्रीण आहे, किंवा प्रमोद महाजन यांची अनेक लफडी होती अशी चर्चा असते हि बाब मला पटत नाही किंवा आवडत नाही असे कोणाला म्हणायचे असेल तर त्यावर माझा मुळीच आक्षेप नाही. आणि कोणाचाही असूही नये. पण कोणी जर म्हणायला लागले की राहुल गांधी राजकीय नेता म्हणून भुक्कड आहे कारण त्याला कोलंबियन मैत्रीण आहे तर माझा आक्षेप आहे. कारण या वाक्यात ना प्रगल्भता दिसते ना बौद्धिक कुवत दिसते. 

एखाद्याची गर्लफ्रेंड आहे यात "लो मोराल्स" (Low morals) कसे काय झाले??? त्याच्या भावना, त्याचे प्रेम हे कोणावर असावे, कोणावर नसावे, कितीवेळा असावे, किती जणींवर/ जणांवर असावे याचा आणि इतरांचा काय संबंध?? यामध्ये लो मोराल्स म्हणजे कमी दर्जाची तत्वे काय आहेत?? ज्यामध्ये दोन्ही बाजूंची परस्पर संमती आहे, अशा कोणत्याही (लैंगिक, भावनिक, बौद्धिक, अध्यात्मिक इ.) प्रकारच्या नात्याला आक्षेप घेणारे इतर लोक कोण?? ती गोष्ट आवडली नाही असे असू शकते. पण त्याचा आणि राजकीय मुल्यमापनाचा काय संबंध? शिवाय काही वर्षांपूर्वीपर्यंत मुलीने इतर मुलांशी बोलणे या गोष्टीलाही लो मोराल्स चे काम म्हणले जायचे. पुढे काळ बदलला. नंतर मुलामुलींमध्ये स्पर्श होण्याला समाजात आक्षेप असायचा. पण आजकाल सहज मिठी मारणं ही काय फार मोठीशी गोष्ट राहिली नाहीये. एकूणच काय तर आपण हळू हळू प्रगल्भ होतोय. या गोष्टी नगण्य आहेत हे समजून घेतोय. त्यामुळे लो मोराल्स वगैरे गोष्टी कधीच कायमस्वरूपी नसतात. तारतम्याने त्या बदलल्या जातात, बदलायच्या असतात नाहीतर आपल्यात आणि श्री राम सेने सारख्या भुक्कड लोकांमध्ये काहीच फरक राहणार नाही. "माझ्या राजकीय नेत्याने कसे जगावे याचा आदर्श घालून द्यावा" अशी जर कोणाची अपेक्षा असेल तर मला त्याच्या बुद्धीची कीव करावी वाटेल. राजकीय नेत्याचे काम आहे राजकीय नेतृत्व करणे. लैंगिक नैतिकतेचे आदर्श घालून देणे हे राजकीय नेत्याचे कामच नाही. 

कोणतीही गोष्ट Black किंवा white असू शकत नाही. What about Grey shades? माणूस जेव्हा एखादी कृती करतो तेव्हा त्याला असंख्य पैलू असतात. जे पैलू अनेकदा इतरांच्या समजुतीच्या कुवतीबाहेर असतात. दूरवरून एखादी गोष्ट judge करणे तितकेसे योग्य होत नाही ते त्यामुळे! एखाद्याचे असतील विवाहबाह्य संबंध किंवा एखाद्याच्या असतील एका मागोमाग एक १० गर्लफ्रेंड्स... यामध्ये कोणी कोणाचा विश्वासघात केला आहे कोण चूक कोण बरोबर याबाबत शंभर टक्के माहिती आपल्याला असू शकत नाही आणि असण्याची गरजही नाही. त्यामुळे कोणावरही वर वर पाहून ठप्पा मारण्याची चूक आपण करू नये. आणि हो सामाजिक नैतिकतेला मान द्यावा लागतो म्हणून तर आपल्या नेत्यांचे कोणाशीही कसेही संबंध असले तरी ते गुप्त ठेवावे लागतात. म्हणूनच सगळ्या बाबतीत दांभिकता आणि अप्रामाणिकपणा दिसून येतो. मी इथे लोकांवरच टीका करतो आहे जे आपल्या नैतिकतेच्या कालबाह्य संकल्पना सोडायला तयार नाहीत. शिवाय नैतिकतेचा आदर्श घालून घ्यावा ही झाली 'आदर्शवादी' संकल्पना. पण प्रत्यक्षात तसे नसेल तरी बिघडले नाही पाहिजे असे माझे म्हणणे आहे.
एखाद्या व्यक्तीला तुम्ही कामावर घेत असाल तर त्याची काम करायची क्षमता बघता की त्याची किती लफडी होती/आहेत हे बघता? CV मध्ये आजपर्यंतच्या गर्लफ्रेंड्स किंवा बॉयफ्रेंड्सची संख्या लिहितात का??? मग आपला सेवक (By the way, लोकप्रतिनिधी आपला सेवक असतो बर का!) निवडताना निवडणुकीतच आपण असल्या भुक्कड आणि उथळ विचारांच्या आहारी का जातो? 
एकूणच लैंगिक चारित्र्य आणि कर्तृत्व याचा काडीमात्र संबंध नाही ही गोष्ट सूर्यप्रकाशाइतकी स्वच्छ असताना केवळ प्रचारी आणि भंपक गोष्टींना एवढे महत्व का देतो? 
सुशिक्षित झालो तरी सुसंस्कृत आणि प्रगल्भ कधी होणार?? काहींना वाटेल लैंगिक चारित्र्य जर योग्य नसेल तर कसली आली आहे सुसंस्कृतता... पण सुसंस्कृतता लैंगिक चारित्र्यात नसून माणसाला माणसासारखे वागवणे, समोरच्याला आवश्यक स्वातंत्र्य देणे आणि त्याच्या स्वातंत्र्याचा, वैयक्तिक 'स्पेस'चा आदर करणे यामध्ये असते.