Thursday, March 17, 2011

हे चालणार नाही...!!!

परवाच पासपोर्ट ऑफिसला गेलो होतो. तिथे फॉर्म सबमिशन ची एक भली मोठी रांग होती.. लोक सकाळपासून येऊन त्या वाढत्या उन्हात उभे होते. त्या लोकांमध्ये मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय, अल्प उत्पन्न स्तरातले लोक सुद्धा होते. एखाद दुसरे उच्च आर्थिक स्तरातले कुटुंब गॉगल लावून उभे होते... एकूणच रांगेची शिस्त सगळ्यांना पाळावी लागत होती. आणि सगळेच 'समान' होऊन गपचूप रांगेत उभे होते. फरक असला तर फक्त कपड्यांमध्ये होता. उन्हाचा त्रास, सरकारी कामामुळे आलेली असहायता, फुकट जाणारा वेळ यामुळे सगळेच त्रस्त झाले होते.. 
तेवढ्यात एक माणूस मोबाईलवर बोलत बोलत रांगेच्या बाजूने पुढे आला. तिथे पोचताच त्याने फोन बंद केला आणि तिथे उभ्या सिक्युरिटी गार्डला एक व्हिजिटिंग कार्ड दिले आणि अमुक अमुक अधिकाऱ्याला दाखव असे फर्मावले. एकूणच त्या माणसाचा अविर्भाव, उच्चभ्रू कपडे यामुळे सिक्युरिटी गार्ड निमुटपणे आत गेला. पाचच मिनिटात तो बाहेर आला आणि त्याने त्या माणसाला थेट आत सोडले. सगळ्यांच्या समोरच हे घडले.. आपण इथे तासन तास उभं राहायचं आणि हे लोक मात्र वशिला लावून पुढे जाणार याला काय अर्थ आहे असे भाव सगळ्यांच्याच चेहऱ्यावर उमटले. 
मध्ये थोडा वेळ गेला. एक पन्नाशीच्या बाई, पांढरे केस, बॉब कट केलेला, सोन्याच्या काड्यांचा चष्मा आणि एका कानाला लावलेला Black Berry!! भांबावल्यासारखी ती बाई इकडे तिकडे बघत फिरत होती. फिरता फिरता इंग्लिश मध्ये फोन वर बोलत होती. "सिक्युरिटी,सिक्युरिटी, प्लीज टेक धिस फोन. लो, बात करो.." असं म्हणत ती बाई रांगेच्या सगळ्यात पुढे उभ्या सिक्युरिटी गार्डपाशी आली. त्याने तो फोन हातात घेतला. एवढा महागडा फोन आयुष्यात पहिल्यांदाच हातात धरून मनोमन सुखावला असेल तो..!! त्या गार्ड ला फोन वर काहीतरी सांगण्यात आले. आणि त्याने त्या बाईंना आत सोडले. पुन्हा एकदा सर्वांसमक्ष घडलेला प्रसंग... आता मात्र लोक भडकले. ऊन वाढले होते, लोक आधीच वैतागले होते. २-३ जण उसळून पुढे आले आणि सिक्युरिटी गार्डशी भांडू लागले. "ऑफिसरला बोलवा, ही काय पद्धत झाली? ही लोकशाही आहे..." "वशिलेबाजी कसली चालवली आहे इथे??" "हे चालणार नाही...!" या २-३ लोकांना ताबडतोब रांगेतल्या सगळ्यांचाच पाठींबा मिळाला. त्यांच्या मनातलेच तर बोलले जात होते. आपल्यावर काहीसा अन्याय झाल्याची भावना सगळ्यांचीच होती... "हे चालणार नाही..." असं म्हणत एक काका पुढे झाले. आणि सिक्युरिटी गार्ड वर नजर ठेवू लागले, अजून एक दोन जण पण त्यांच्याबरोबर नजर ठेवायला उभे राहिले.. पुढच्या तासा दोन तासात काही लोक ओळख सांगून वगैरे आत जायचा प्रयत्न करू लागले. पण गार्ड ने त्यांना आत सोडले नाही. आपल्यावर नजर ठेवणाऱ्या लोकांची त्या गार्डला भीती वाटली.. आणि बघता बघता सगळे सुरळीत होत लोक रांगेने एक एक करत आत गेले कोणीही मध्ये घुसले नाही कोणाला घुसू दिले गेले नाही...!!!!

असे शेकडो प्रसंग आपल्या आजूबाजूला घडत असतात. अगदी कॉलेज ची फी भरतानाही कोणी मध्ये घुसला तर मागचे लोक आरडा ओरडा करतात. हीच गोष्ट सगळीकडे घडते. "हे चालणार नाही" असं म्हणत जेव्हा लोक जागरूक होतात तेव्हा राज्यकर्त्यांना झुकावेच लागते... आज खरोखरच सरकार वर नजर ठेवायची गरज आहे. त्या काकांप्रमाणे प्रत्येक जागरूक नागरिकाने हे काम करायला हवं. त्यासाठी माहिती अधिकार कायद्याचे शास्त्र आपल्याकडे आहे. एकदा का नागरिकांची सगळ्या गोष्टींवर बारकाईने नजर आहे हे सरकारला जाणवू लागले की अपप्रवृत्ती, अकार्यक्षमता, गैरकारभार, भ्रष्टाचार या सगळ्याला आळा बसेल... वरच्या उदाहरणात जसे मी तासन तास उभा आहे आणि कोणीतरी पुढे येऊन घुसतो आहे आणि सरळ आत जातो आहे या मुळे जी अन्यायाची भावना लोकांच्या मनात निर्माण झाली तीच भावना आपलाच कर रूपाने दिलेला पैसा राजकीय नेते आणि प्रशासकीय अधिकारी खिशात घालताना पाहून निर्माण व्हायला हवी. किंबहुना ती अधिक गंभीर आणि अधिक आक्रमक असली पाहिजे. कारण प्रश्न केवळ अन्यायाचा नसून कष्ट करून घाम गाळून आपण कमावलेल्या पैशाचा आहे...
ज्या दिवशी "हे चालणार नाही" असं म्हणत सरकारवर नजर ठेवायला पुढे येतील त्या दिवशी प्रशासन पातळीवरच्या व्यापक परिवर्तनाची सुरुवात होईल... माहिती अधिकाराबाबत जागरूकता,प्रसार आणि परिणामकारक वापर या तीन गोष्टींनी हे साध्य करणे शक्य आहे...

Saturday, February 26, 2011

म्हणून...

'परिवर्तन' कशासाठी?
कोणीतरी विचारले -

हम दो हमारे दो,
चौकोनी कुटुंब
चौकटीतच राहिले,
म्हणून...

'आपण सामान्य' म्हणत
गुंड, पुंड, झुंडीला
घाबरले,
म्हणून...

राजकारण नको
म्हणणारे वाढले,
राजकारण करू
म्हणणारे 'काढले',
म्हणून...

'चलता है'
म्हणणारे वाढले,
'नहीं चलेगा'
म्हणणाऱ्यांना मारले,
म्हणून...

'खाणे' अगदी
नित्यनेमाचे झाले,
निमित्त काढून 'पिणे'
रोजचेच झाले.
खाण्यासाठी 'नोटा'
पिण्यासाठी 'धान्य'
सारे सोयीचे झाले,
म्हणून...

टू जी - थ्री जी
राष्ट्रकुल-बिष्ट्रकुल
'खेळ' केले,
म्हणून...

बदला म्हणून
बदल्या झाल्या,
इमानी लोक
शून्य उरले,
म्हणून...

वेळेला चहा लागतो,
वेळ साधण्यासाठी 'चहा पाणी'
सवयीचे झाले,
म्हणून...

इतिहास खोडून
नवा लिहिला,
भविष्यकाळ नव्याने
जुनाच लिहिला,
म्हणून...

'भाऊ' 'आबा'
'दादा' 'बाबा'
या सगळ्यांवर 'साहेब'
उदंड झाले,
म्हणून...

लढतो म्हणणारा
ठार झाला
उघडकीस आणणारा
गायब झाला
तरी सगळे गप्पच बसले,
बाकी जाऊ द्या हो, पण
षंढ थंड लोक पाहून
डोकेच फिरले,
म्हणून...

तन्मय कानिटकर
२५/०२/२०१०

Monday, February 14, 2011

लोकशाहीची भिंत...

चीनच्या राजधानीमध्ये बीजिंगमध्ये त्याननमेन चौकात एका बाजूला पोस्ट ऑफिस आहे. त्याची मोठीच्या मोठी भिंत त्यानानमेन चौकाला लागूनच आहे. १९७९ साली अचानक या भिंतीला विलक्षण महत्व आले.... असंख्य लोक या भिंतीवर येऊन पोस्टर्स चिकटवू लागले.. चित्र काढू लागले संदेश लिहू लागले... कम्युनिस्ट राजवटीत दबल्या गेलेल्या सर्जनशीलतेला मुक्त द्वार मिळाल्याप्रमाणे लोक या भिंतीवर आपल्या मनातल्या गोष्टी लिहू लागले... चीन सारख्या कट्टर कम्युनिस्ट देशातले लोक या भिंतीवर उघडपणे लोकशाहीची मागणी करू लागले. एक दिवस एक पोस्टर झळकले त्यात खुद्द चेअरमन माओंवर टीका केलेली होती. मग तशा आशयाची असंख्य पत्रके या भिंतीवर दिसली. माओ यांच्या अपरोक्ष त्यांची पत्नी जियांग हिने केलेल्या अत्याचारांचा निषेध केला जाऊ लागला. रोज शेकडो नवीन पोस्टर्स! एक दिवस एका विद्यार्थ्याने याच भिंतीवर आठ कलमी मागणीपत्र लावले. बहुपक्षीय शासनपद्धती, खुल्या निवडणुका, लोकप्रतिनिधींचे सरकार, भक्कम न्यायव्यवस्था, वृत्तपत्रीय स्वातंत्र्य, माहितीचा अधिकार, भ्रष्टाचाराचा बिमोड, नागरिक म्हणून मूलभूत अधिकार इत्यादी गोष्टी या मागणीपत्रात अंतर्भूत होत्या.  मग त्या पाठोपाठ असंख्य लोकांनी आपापली मते नोंदवली. लोकशाहीच्या बाजूने कौल दिला. असंख्य चित्रे, व्यंगचित्रे या भिंतीवर येऊ लागली. भ्रष्ट आणि गुन्हेगार अशा लोकांना शिक्षा करण्याची मागणी करणारी शेकडो हजारो भित्तीपत्रके या भिंतीवर लागली. कम्युनिस्ट चीनचा संस्थापक असलेल्या माओवर टीका होणारी पत्रके लागताच बीबीसी आणि अमेरिकन वार्ताहरांनी ही खबर जगभर पसरवली. आणि याच पाश्चात्य वार्ताहरांनी त्यानानमेन चौकातील या भिंतीला नाव दिले "लोकशाहीची भिंत!".... लोकांचा क्षोभ उफाळून आला होता, त्यांनी अपली मते या भिंतीच्या माध्यमातून सरकारपर्यंत पोचवली. पुढे पुढे तर आपल्या मनातील गोष्टी व्यक्त करायची ही कल्पना चीनी लोकांना इतकी आवडली की चीन मधल्या सगळ्या शहरांमध्ये गावोगावी अशा प्रकारच्या असंख्य लोकशाहीच्या भिंती उभ्या राहू लागल्या. लोक त्यावर लोकशाही, खुल्या निवडणुकांची मागणी करू लागले. कम्युनिस्ट सरकारने अगदी स्त्री पुरुष संबंधांबाबतही काही वेडगळ कायदे करून ठेवले होते. त्यावर हल्ला होणारीही पत्रके या भिंतींवर झळकू लागली. व्यक्तिस्वातंत्र्याचा पुनरुच्चार करत या लोकशाहीच्या भिंतीने चीनी कम्युनिस्ट पक्षाला हादरवून सोडले. अखेर एक दिवस लष्कराला हुकुम सुटले आणि लष्कराने लोकशाहीच्या सर्व भिंती साफ केल्या. त्यावर लिहिणाऱ्या लोकांना  कैद केले. दडपशाहीचा वरवंटा सर्वत्र फिरवला. पण लोकशाहीच्या भिंतीने सरकारच्या मनात आता आपल्या हातातून सत्ता जातीये की काय अशी धडकी भरवली..!!!

सुमारे ३२ वर्षांनी पुन्हा एकदा लोकशाहीच्या भिंतीने कमाल घडवून आणली... चीन मध्ये नव्हे...तर चीन पासून हजारो मैल लांब देशात....इजिप्त मध्ये..!!

सलग तीस वर्ष सत्ता गाजवणाऱ्या होस्नी मुबारक यांना हाकलून लावायची मागणी सर्वत्र होऊ लागली..लोकांच्या मनातील असंतोष प्रकट होऊ लागला... आधुनिक काळाला साजेशी अशी आधुनिक लोकशाहीची भिंत इजिप्त मधल्या लोकांनी विचार व्यक्त करायला मते मांडायला वापरली... या आधुनिक लोकशाहीच्या भिंतीचे नाव- "फेसबुक". फेसबुक वरील "पेज" मधून हजारो लोक एकत्र आले. त्यांनी होस्नी मुबारक यांच्या राजवटीचा निषेध केला. त्यांच्या त्यांच्या फेसबुक अकौंट वरील "wall" वर असंख्य लोक विचार व्यक्त करू लागले, एकत्र येऊ लागले.. पाहता पाहता वातवरण बदलले. अवघ्या काही दिवसात लाखो लोक मुबारक राजवाटीविरोधात उभे राहिले. आधुनिक लोकशाही भिंतीच्या, फेसबुकच्या, ताकदीने सारे जग स्तिमित झाले. जगभरचे वार्ताहर इजिप्त मध्ये आले. इथल्या लोकांचे मन जाणून घेऊ लागले. आणि १८ दिवसांच्या लोकांच्या उग्र आंदोलनानंतर होस्नी मुबारक यांना राजीनामा द्यावा लागला.... आधुनिक लोकशाहीच्या भिंतीची कमाल...!!!

सोशल नेट्वर्किंग वेबसाईट्स वापरून काय घडू शकते याचे हे एक उदाहरण आहे... ही एक "लोकशाहीची भिंत" आहे.. त्यावर भ्रष्टाचार करणार्यांना उघड करा, आपल्याला काय वाटते ते लिहा, तक्रार करा, आरोप करा.... हा आवाज आज न उद्या सरकार पर्यंत जाणारच आहे याची खात्री बाळगा...त्याचा पुरेपूर वापर करून मोठ्यातल्या मोठ्या भ्रष्ट लोकांना आपण निष्प्रभ करू शकतो. आपल्याला जे वाटतं, ते या भिंतीवर लिहले पाहिजे... इथेच विचारविनिमय घडेल..भ्रष्ट आणि गैरकारभार करणाऱ्या लोकांना, लोकप्रतिनिधी,राजकारणी, अधिकारी वर्ग इ सर्वांना आपण या लोकशाहीच्या भिंतीच्या माध्यमातून वठणीवर आणू शकतो. एक सामान्य माणूस म्हणून तुम्ही-आम्ही हे घडवू शकतो....!!!

Thursday, January 20, 2011

नष्ट होण्यात मजा आहे...!

र्मग्रंथात सांगितलं आहे की एक हजार वर्षांनी जग नष्ट होणार. युरोपातल्या सगळ्या लोकांमध्ये भीती पसरली. ९९५...९९६...९९७...९९८... असे करता करता एक दिवस इसवी सन ९९९ उजाडले. शेवटचे वर्ष... देवाचीच इच्छा.. या वर्षानंतर सगळं संपणार म्हणून श्रीमंतांनी गरिबांना पैसे वाटायला सुरुवात केली. अन्नधान्याचा काळा बाजार करणाऱ्या सगळ्या लोकांनी गोदामातील दडवून ठेवलेले अन्न भुकेल्या लोकांमध्ये वाटून टाकले. अनेक वर्षांपासूनचे शत्रू, मरताना कटुता संपवूयात असं म्हणत एकमेकांचे मित्र बनले. सगळे लोक जास्तीत जास्त आनंदी राहायचा प्रयत्न करू लागले, मरताना गाठीशी पुण्य असावे म्हणून परोपकार करू लागले. सात आठ पिढ्या बसून खातील एवढी संपत्ती असलेले लोक पुढच्या पिढ्यांचा विचार सोडून देऊन सर्व संपत्ती वाटून टाकू लागले. मरण्यापूर्वी हे जग एकदा तरी पहिलेच पाहिजे अशा भावनेने असंख्य लोक जग पहायला निघाले...सफरींवर  निघाले! असंख्य लोक धर्मातील पंथा पंथातील भेद मिटवून सलोख्याने राहू लागले. देशांमधील युद्धे थांबली. जसजसा विश्वाच्या अंताचा दिवस जवळ येऊ लागला तसतसे लोक आपापल्या इच्छा पूर्ण करून चर्च मध्ये जमा झाले. २५ डिसेंबर..ख्रिसमस.. सर्वत्र मोठ्या धूमधडाक्यात साजरा करण्यात आला. असंख्य नाटके, लग्न, गाण्याचे कार्यक्रम, सामुहिक नृत्य...जल्लोषात लोक आपले मरणाचे भय आणि दुःख विसरण्याचा प्रयत्न करत होते. अखेर इ.स. ९९९ चा ३१ डिसेंबर संपला... १ जानेवारी उजाडला... काहीच घडले नाही. मग २...३...४... करता करता ३१ जानेवारी उजाडला. हळूहळू पाहता पाहता इ.स. १००० चे बाराही महिने संपले...इ.स. १०००...१००१...१००२... ही पण वर्षे भुर्रकन उडून गेली. काहीच घडले नाही. आता जगाचा अंत होणार नाही.. लोकांना कळून चुकले. श्रीमंतांनी गरिबांना वाटलेले पैसे परत मागायला सुरुवात केली. गरिबांनी ते द्यायला नकार दिला. मग भांडणे सुरु झाली. पुन्हा एकदा भुकेले लोक रस्त्यांमधून फिरू लागले.. मित्रांमध्ये वितुष्ट आले...पुढच्या पिढ्यांसाठी द्रव्य साठवायला सुरुवात झाली. देशांमध्ये युद्धांना तोंड लागले. पंथा पंथातले वाद पुन्हा सुरु झाले. नास्तिक लोक सगळ्या आस्तिक लोकांना नावे ठेऊ लागले. चोऱ्या दरोड्यांना ऊत आला. धर्माचे प्रमुख असलेल्यांनी धर्माची म्हणजेच पर्यायाने स्वतःची सत्ता अबाधित राहावी म्हणून नवनवीन नियम तयार केले. एकूणच जग आधी होते तसलेच झाले... मधला वर्षभराचा काळ हा स्वप्नवत वाटू लागला.

----------------------------------------------------------------------------------------

जगातल्या काही मोठ्या संस्कृतींची गोष्ट...

इजिप्शियन संस्कृती...प्रचंड मंदिरे, ग्रेट पिरामिड आणि ममी बनवून मृतदेह जपून ठेवणारी संस्कृती. सुमारे दोन तीन हजार वर्षांपूर्वी या त्या आधी किमान एक हजार वर्ष अस्तित्वात असलेल्या जुन्या संस्कृतीचा नाश झाला. अत्यंत हुशार, प्रगल्भ अशी संस्कृती एकाएकी नष्ट झाली. का नष्ट झाली, कशामुळे नष्ट झाली याबाबत कसलाही खुलासा इतिहास करू शकत नाही. इ.स.पूर्व ३०० च्या आसपास अलेक्झांडर जेव्हा इजिप्त मध्ये गेला तेव्हा त्याला तिथली सगळी संकृती मोडकळीला आलेली दिसली. आणि अडाणी लोक तिथे राज्य करताना आढळले. 

मोहेंजोदडो हडप्पा संस्कृती... त्या काळी स्थापत्यशास्त्रामध्ये आशियातील सर्वोत्तम नगरे सिंधू नदीपासून ते अफगणिस्तानातील अमुदर्या नदीपर्यंत पसरली होती. इथल्या नगर रचनेकडे पाहून आधुनिक काळातही चकित व्हावे! ख्रिस्तपूर्व ३००० पासून ख्रि.पू. १६०० पर्यंत या संस्कृतीची भरभराट झाली. त्यानंतर अचानक इथे राहणाऱ्या लोकांनी भांडी कुंडी वगैरे सगळे काही सोडून ही नगरे सोडून दिली. हडप्पा संस्कृती नष्ट झाली. इथे राहणारे लोक इथून निघून का गेले, कुठे गेले...इतिहासाला काहीच माहित नाही. त्याच लोकांचे वंशज म्हणवणारे गंगेच्या खोऱ्यात पसरलेले लोक मात्र त्यांच्या इतके प्रगल्भ नव्हते. हडप्पा संस्कृती का नष्ट झाली? 

माया संस्कृती... दक्षिण अमेरिकेत प्रचंड मोठी बांधकामे, थडगी, अप्रतिम मंदिरे बांधणारी ही संस्कृती. हजारो लोक राहू शकतील अशी अप्रतिम नगरे आणि आजही आश्चर्याने तोंडात बोटे घालायला लावेल असे खगोलशास्त्रातले ज्ञान ही या माया संस्कृतीची खासियत. इ.स. १००० पर्यंत हे सगळे टिकून होते. पुढे एका एकी ही संस्कृती नष्ट झाली. या नगरांमध्ये राहणारे लोक सगळे काही तसेच सोडून निघून गेले. पुढे पाचशे वर्षांनी जेव्हा युरोपीय वसाहतवादी तिथे आले तेव्हा त्यांना या प्रचंड नगरांमध्ये राहणारे अडाणी आदिवासी सापडले. माया संस्कृती कशी नष्ट झाली, ते सगळे लोक कुठे गेले, नेमके काय झाले याबाबत कोणालाच काही माहित नाही. 

इतक्या प्रगल्भ, हुशार आणि ज्ञानाचे भांडार असलेल्या या संस्कृती का नष्ट झाल्या? त्यांनी आपले ज्ञान पुढच्या पिढ्यांना का दिले नाही? नैसर्गिक वृत्तीच्या विरोधात जाऊन त्या संस्कृतीन्मधले लोक असे का वागले?? त्यांना आपला वंश जिवंत ठेवायचा नव्हता का? त्यांना माणूस प्राणी जगावा असे वाटले नाही का? नेमके काय झाले? अशा नष्ट झालेल्या अजून किती संस्कृती, नगरे जमिनीखाली आहेत माहीतच नाही...

--------------------------------------------------------------------------------------

"Desire is the root cause of all evil"- Gautam Buddha

प्रजनन करणे, पुढच्या पिढ्यांसाठी काहीतरी करून ठेवणे, पुढे अनेक वर्ष आपले नाव या पृथ्वीवर कायम स्वरूपी रहावे, माणूस प्राणी या जगात जिवंत ठेवावा या एका विलक्षण नैसर्गिक इच्छेपोटी माणसामाणसातील हेवेदावे वाद वाढीस लागतात. देशांमध्ये युद्ध होतात. एका गटाकडून दुसऱ्याचे शोषण होते. आणि जग कितीही बदलले तरी साधारण स्वरूप तेच राहते. रोमन साम्राज्यवाद होता.. त्यानंतर युरोपीय लोकांनी वसाहतवादातून साम्राज्यवाद सुरु केला. मग रशिया अमेरिकेचा जगवारच्या वर्चस्वाचा वाद सुरु झाला. आणि आज ची अमेरिका वर्चस्व गाजवण्याच्या आणि टिकवण्याच्या प्रयत्नात आहेत. धर्मावरून युद्ध पूर्वीही होत असत, आता तशा युद्धाचा गंभीर धोका जगातल्या प्रत्येक देशाला आहे. अणूयुद्धामुळे जग नष्ट होण्याचा धोका सतत मानवाच्या डोक्यावर आहे. अल कायदाच्या हाती अण्वस्त्रे, इराणकडे संहारक अस्त्रे, भारताचा अण्वस्त्रप्रसारबंदी करारावर सही करण्यास नकार, चीनची अणुचाचणी, ग्लोबल वॉर्मिंग, समुद्राची पातळी वाढणार, मुंबई समुद्रात जाणार, २०१२ मध्ये जगबुडी होणार अशा बातम्या आल्या की जगातल्या शेकडो देशांच्या प्रमुखांची झोप उडते. मग त्या देशातल्या प्रसारमाध्यमांची...आणि मग त्या त्या देशातल्या लोकांची... 
काय आहे हे? नष्ट होण्याची भीती? 
मानव वंश जिवंत ठेवण्याचा आणि पुढच्या पिढ्यांना काहीतरी चांगले (जे स्वतःला चांगले वाटते ते) देण्याचा माणसाचा प्रयत्न असतो. आणि म्हणूनच आपला वंश टिकवणे त्याला महत्वाचे वाटते. पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये मुलगा होणे चांगले मानले जात असे ते यामुळे (वंशाचा दिवा वगैरे...!) आपल्या मुलांसाठी गडगंज संपत्ती साठवून ठेवावी, आपले नाव इतिहासात अजरामर व्हावे, पुढच्या पिढ्यांनी आपले नाव लक्षात ठेवावे अश काही इच्छा माणसाच्या मनात घर करून राहतात. आज मी जर अमुक गोष्ट केली तर माझ्या पुढच्या पिढ्या सुखाने राहतील हे विचार वाढले. 
एका विशिष्ट वेळी, एका विशिष्ट क्षणी एका पूर्ण संस्कृतीने, मानव समूहाने भले मग तो कितीक प्रगल्भ असेना पुढच्या पिढ्यांचा विचार सोडला तर? पुढच्या पिढ्यांचा विचार, म्हणजे पुढच्या पिढीच्या निर्मितीचाही विचार, सोडून दिला तर? तो मानव समूह/ ती संस्कृती नष्ट होऊन जाईल. पण आपण केव्हा नष्ट होणार हे नेमके त्या लोकांना माहित असेल. म्हणजे उद्या समजा एका मनुष्य समूहाने ठरवले की यापुढे एकही मूल जन्माला येणार नाही. काल जन्माला आलेले शेवटचे मूल. याचाच अर्थ त्या समूहाला माहित असेल की तो पुढच्या जास्तीत जास्त शंभर वर्षाच्या कालावधीत संपुष्टात येणार आहे. ही शेवटची शंभर वर्षे ते लोक आनंदात घालवतील की दुःखात? म्हणूनच मी सुरुवातीला एक हजार वर्षांपूर्वी काय झालं ते सांगितलं. जग नष्ट होणार असं कळल्याबरोबर सगळे लोक आनंदात जगू लागले. पुढच्या पिढीसाठी काही ठेवायचेच नाही...कारण पुढची पिढीच नसणार आहे...! 
विचार करा, ग्लोबल वॉर्मिंग वगैरे ची भीती सोडून सर्व लोक बिनधास्त ए.सी. लावत आहेत. जगातले पेट्रोल अजून २०० वर्षात संपणार आहे, म्हणून जपून वापरायची गरज नाही. मी आज ५०० कोटी जमवून उपयोग नाही, कारण ते खर्चच करता येणार नाही... असे काही घडले तर? पृथ्वीवरची माणसाची निदान शेवटची पिढी तरी आनंदात जगेल, समाधानाने जगेल...!!! एक न एक दिवस नष्ट तर व्हायचेच आहे...अणू युद्धात किंवा असह्य तापमान वाढून नष्ट होण्यापेक्षा... समाधानाने आनंदात नष्ट होण्यात मजा आहे...! 

जगातील सर्व मोठ्या संस्कृती अशाच नष्ट झाल्या असतील?? 

Monday, January 10, 2011

समृद्ध वारसा..

भारतातील जातीव्यवस्था ही जगभरातल्या समाजशास्त्रज्ञांना बुचकळ्यात पडणारी गोष्ट आहे. अशा प्रकारची समाज रचना जगात कुठेही नाही. वर्गभेद आहे, धर्मभेद आहे, वंशभेद आहे, वर्णभेदही आहे पण जातीभेद जगात कुठेही नाही. जातीची नेमकी व्याख्या करणे अतिशय अवघड आहे. काही इतिहासकार म्हणतात याचे मूळ भारतीय चातुर्वर्ण्य व्यवस्थेत आहे. काही संशोधक मात्र जातीव्यवस्थेला चातुर्वर्ण्य व्यवस्थेपासून वेगळे मानतात.

जगात सर्वत्र उच्च नीचता आहे. असा एकही देश/प्रांत नाही जिथे उच्च नीचता नाही. कुठे वर्गयुद्ध आहे, कुठे पंथांमध्ये बेबनाव आहे. आणि अशा या भेदांच्या भिंती पार करूनच प्रगती साधता येऊ शकते यात काही शंकाच नाही.
पण विचार करा, समजा उद्या भेदांच्या सर्व भिंती कोसळून पडल्या सगळे समान झाले तर? सगळ्यांचा धर्म एक, वर्ण एक, जात एक, पंथ एक... आणि याचा परिणाम म्हणजे सगळ्यांचा एक आहार, एक विचार, एक मूल्ये, एक वेशभूषा, एकंच धार्मिक स्थळ.... बाप रे... असे जग किती भयानक असेल....सगळेच सारखे झाले तर माणसाच्या आणि मुंग्यांच्या जीवनात काय फरक राहिला?? 

भेद नष्टच झाले तर जग निरस आणि कंटाळवाणे होऊन जाईल. अशा जगात राहणे माणूस प्राण्याला अशक्य होऊन जाईल. आयुष्यातली रंजकता टिकवून ठेवण्यासाठी भेद आवश्यक आहेत.
सर्वजण समान आहेत यासारखे दुसरे भंपक वाक्य नाही. सर्वजण समान असे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा निसर्गाचा सरळ सरळ अपमान करतो. निसर्गाने कोणत्याही दोन गोष्टी एकसारख्या ठेवल्या नाहीत. दोन व्यक्ती तर सोडाच पण पर्वत, नद्या, पाणी, झाडे, फुले, पाने सगळे काही वेगळे आहे. एक गुलाबाचे फूल आणि दुसरे गुलाबाचे फूल यामध्ये तंतोतंत साम्य कधीच सापडणार नाही. निसर्गाने प्रत्येकाला exclusive बनवले आहे. exclusive ला मला चांगला मराठी पर्यायी शब्द सापडला नाही. खरोखरच हाच शब्द योग्य आहे. एखाद्यात जे रसायन आहे ते दुसऱ्यात कधीच सापडत नाही. या नैसर्गिक वैविध्याचा अपमान करून सर्वजण समान आहेत असं उगीचच बोलण्यात काय अर्थ आहे? भेद ही अत्यंत नैसर्गिक गोष्ट आहे आणि त्याचा आदरच केला पाहिजे.

"समानता" जर कुठे आवश्यक असेल तर ती आहे संधी मध्ये. "समान संधी" हा एखाद्या विचारधारेचा पाया असू शकतो. धर्म स्वीकारण्याची, आपला व्यवसाय निवडण्याची, आपला जोडीदार निवडण्याची, आपला राजा निवडण्याची,रोजगाराची, शिकण्याची सर्वांना समान संधी असावी.  

भारतीय व्यवस्थेमध्ये प्रचंड जाती आहेत. आता जाती जातींमधील उच्च नीचता काढून टाकूया, मग काय दिसते? एक वैविध्याने नटलेला समृद्ध समाज. असंख्य रिती रिवाज असलेला..असंख्य वेगवेगळ्या पद्धतींनी नटलेला..इतकेच काय पण एकाच पदार्थ बनवण्याच्या शेकडो तऱ्हा असणारा अतिशय समृद्ध समाज. "आमचे ते सर्वोत्तम" हा दुराग्रह सोडला तर या वैविध्याचा आनंद लुटणे मुळीच अवघड नाही. एखाद्याच्या घरातला चिकन रस्सा अप्रतिम तर एखाद्याच्या घरात पुरणपोळी... कोणाकडे साधा मिरचीचा ठेचा सुद्धा वेगळा... गणपतीची आरास करायची प्रत्येकाची धाटणी वेगळी. मूर्तीच्या आकारात सुद्धा वैविध्य!

भारतीय जातीव्यवस्थेतून "आमचे ते सर्वोत्तम" आणि "आम्हीच दुसऱ्यावर वर्चस्व गाजवणार" या दोन प्रवृत्ती वजा केल्या तर हीच व्यवस्था समान संधींच्या पायावर उभी राहिल्यावर सर्वात जास्त समृद्ध आणि खऱ्या अर्थाने श्रीमंत ठरेल...!!! पण त्यासाठी आपल्या समाजातील  वैविध्याने नटलेल्या जातिव्यवस्थेच्या या समृद्ध वारश्यावर हजारो वर्षे हा साचलेला गंज साफ केला पाहिजे.
कदाचित या वैविध्यातूनच, हा समृद्ध वारसा टिकवण्याच्या जिद्दीतून खराखुरा एकोपा निर्माण होईल...व्हायला पाहिजे....!!!