
ओळखीचा वाटला प्रसंग? तुम्ही स्वतः कधी या प्रसंगाचा भाग असाल किंवा किमान साक्षीदार राहिला असाल. गेल्या दीड दशकात लाखो काय कोट्यवधी लोकांनी हे अनुभवलं असेल, बघितलं असेल. राजकीय मतं एकमेकांना बोचतील इतकी टोकदार होणारा हा कालखंड. राजकीय मतभेदांमुळे नाती बिघडण्याची, मैत्रीत कटुता येण्याची असंख्य उदाहरणे आजूबाजूला आहेत जी कोणत्याही विचारी माणसाला अस्वस्थ करतील. माझ्या अनुरूप विवाहसंस्था या व्यवसायाच्या निमित्ताने अनेक मुलामुलींशी बोलायची मला संधी मिळते. गेल्या काही वर्षात लग्न जमवताना सातत्याने राजकीय विचारधारा जुळते का हे बघण्याकडे कल आहे असं मला जाणवतं. एखाद्या व्यक्तीची पूर्ण ओळख त्या व्यक्तीच्या राजकीय विचारधारेने होऊ शकते का? माणसापेक्षा राजकीय पक्ष वा विचारधारेच्या दावणीला आपण का बांधले गेलो आहोत?
कोSहम्?
कोSहम् म्हणजे ‘मी कोण आहे’, ‘माझी ओळख काय’ हा प्रश्न हजारो वर्षं माणसाच्या मनात घर करून आहे. माझी समाजातली ओळख ही माझ्या आत्मसन्मानाशी जोडलेली आहे. आपली ओळख कशी निर्माण होते? तर सुरुवात कुटुंबापासून होते, मग आपला मित्रपरिवार, आपले शिक्षण, आपले काम, आपले छंद, आपलं रोजचं वागणं, आपण लोकासमोर व्यक्त केलेली मतं या सगळ्यातून आपण आपल्या ओळखीचे वेगवेगळे पैलू पाडत असतो. आपली हि ओळख जपण्याचा, ती पुसली जाणार नाही याचा आपण कळत नकळतपणे जीवापाड प्रयत्न करत असतो. पूर्वी राजेबादशाह मंडळी शिलालेख कोरत, मंदिरं उभारत आपली ओळख निर्माण करायचा प्रयत्न करायचे. त्याकाळची ही त्यांची प्रसिद्धी माध्यमे होती. पण तरी या मूठभर लोकांसाठी उपलब्ध. आधुनिक प्रसिद्धीमाध्यमांच्या म्हणजे वर्तमानपत्र, रेडीओ, दूरदर्शन यांच्या उदयानंतर प्रत्यक्ष ओळख नसतानाही ओळख करण्याचा पाया व्यापक झाला. केवळ राजे नव्हे तर अनेक सामन्यांच्या असामान्य गोष्टी समाजात पोहचू लागल्या, त्यातून त्यांची ओळख तयार झाली. यात प्रचंड बदल झाला तो समाजमाध्यमांच्या उदयानंतर. कारण माध्यम आता प्रत्येकाच्या अगदी हातात आलं!
आज जवळपास सर्वजण समाज माध्यमावर आहेत. माझ्या आधीच्या पिढीतले फेसबुकवर जास्त असतात, तर माझ्या नंतरचे म्हणजे जेन झी मुख्यतः इन्स्टाग्रामवर. माझ्या मिलेनियल पिढीतले अनेकजण या दोन्ही मंचावर आहेत. आणि जवळपास सगळेच व्हॉट्सअॅप वर आहेत. तिथल्या ग्रुप्स करायच्या सोयीमुळे तेही एक समाजमाध्यमच बनले आहे.
समाजमाध्यमांनी आपल्याला व्यक्त होण्याचा मंच उपलब्ध करून दिला आणि साहजिकच अनेक विषयांवर आपण व्यक्त होऊ लागलो. क्रिकेट असो किंवा आपले छंद, सिनेमावरचं मत असो किंवा आपलीच एखादी कविता, राजकारण असो वा एखादी रंजक माहिती; आपण खुलेपणाने इथे व्यक्त होऊ लागलो. त्यावर पाच-पन्नास लोक लाईक ठोकू लागले. त्यापेक्षा किमान तिप्पट चौपट लोकांनी आपलं व्यक्त होणं बघितलं आहे हेही ‘नंबर ऑफ व्ह्यूज’ मधून आपल्याला कळू लागलं. यातले बहुसंख्य तर असे की जे आपल्याला रोज न भेटणारे, किंवा कधीकधी तर कधीच न भेटणारे. त्यांना आपण रोज कसे असतो, दिसतो याची आपण दाखवतो तेवढीच माहिती असते. त्यांच्यासाठी समाजमाध्यमावरचे आपण हीच आपली ओळख. झपाट्याने आपली माध्यमं आणि त्यावरचं व्यक्त होणं बदललं तरी आपली ओळख जपण्याची मूलभूत वृत्ती कुठे बदलली? आपल्याला अनेक गोष्टींबद्दल तीव्रतेने वाटत असतं. हातात माध्यम आल्यावर आपण ते व्यक्तही झालो त्यातून आपली ओळख झाली. आता आपण ज्या विषयात व्यक्त झालो होतो त्याविषयाशी निगडीत कोणी विपरीत मत व्यक्त केलं तर नकळतपणे आपण त्याकडे आपल्या ओळखीवर झालेला हल्ला या नजरेने बघतो. आपल्या ओळखीवर हल्ला म्हणजे अस्तित्वावर हल्ला, आत्मसन्मानावर हल्ला. मग साहजिकच आपली प्रतिक्रिया ही आक्रमकपणे मांडली जाते. आपण व्यक्त केलेली आपली भूमिका जपली पाहिजे, तिचं संरक्षण केलं पाहिजे या उर्मीबरोबर आता ती भूमिका बदलली तर आपली जी काही ओळख निर्माण झाली आहे त्यावरच प्रश्नचिन्ह येईल ही भीती देखील वाटते. त्यामुळे एकेकाळी आपण काही व्यक्त झालो असू आणि त्यापेक्षा वेगळं काही आपल्याला आता म्हणायचं आहे तर अजूनच अवघड जागचं दुखणं बनतं. भूमिका बदलली तर आपली ओळख एक दुटप्पी व्यक्ती म्हणून होईल की काय अशी चिंता आपल्याला वाटते. यासंदर्भात मला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचं उदाहरण वाचल्याचं आठवतं. भूमिका बदलल्यावर कोणीतरी टोकल्यावर बाबसाहेब म्हणाले “सातत्य हा गाढवाचा गुण आहे!”. याचा अर्थ असा की नवीन माहिती, नवीन ज्ञान, अनुभव मिळाल्यावरही केवळ सातत्याच्या नावाखाली जुन्या मतांना चिकटून राहणं हा शुद्ध गाढवपणा झाला!
या ओळखीच्या चक्रव्यूहाव्यतिरिक्त समाजमाध्यमांचा अजून एक परिणाम होतो. तो म्हणजे एकोचेंबर इफेक्ट. सोशल मिडिया तुम्हाला तुमच्या वापराच्या प्राधान्यानुसार माहिती दाखवतं. तुमच्या आवडीच्या गोष्टी जास्त दाखवतं. इन्स्टाग्रामचं उदाहरण बघूया. इन्स्टाग्रामवर समजा तुमच्या मित्रयादीत एक हजार लोक असतील तर बारकाईने निरीक्षण करा या सर्व एक हजार लोकांनी इन्स्टाग्रामवर काय लिहिलं आहे, काय फोटो टाकले आहेत हे सगळं दिसतं का? सर्वच्या सर्व एक हजार लोकांचं? नाही. आपलेच मित्र यादीतले लोक असले तरी आपल्याला सगळ्याच्या सगळ्या लोकांच्या आयुष्यात किंवा त्यांनी शेअर केलेल्या गोष्टींत रस असतो असं नाही. त्यामुळे आपण अशा लोकांच्या पोस्ट्स ‘लाईक’ करत नाही. त्यावर ‘कमेंट’ करत नाही. इन्स्टाग्राम याची नोंद घेतं. तुम्हाला पसंत नसणाऱ्या गोष्टी तुम्हाला इन्स्टाग्रामवर वारंवार दिसत राहिल्या तर तुमचं इन्स्टाग्राम वापरणं कमी होईल आणि इन्स्टाग्रामला जाहिरातीतून मिळणारे पैसे कमी होतील! म्हणून तुमची ‘एंगेजमेंट’ वाढावी, तुमचा इन्स्टाग्रामचा वापर सतत वाढता राहावा यासाठी हळूहळू तुम्ही लाईक करत नाही, फारसा संवाद ठेवत नाही अशा तुमच्या मित्र यादीतल्या लोकांच्या किंवा तुम्हाला नावडत्या विषयांच्या पोस्ट्स तुम्हाला दिसणार नाहीत अशी व्यवस्था इन्स्टाग्राम करतं. म्हणजे शक्यतो आवडतील अशा गोष्टीच तुम्हाला सोशल मिडियावर दिसत राहतात. हे फक्त इन्स्टाग्राम करतं असं नाही तर प्रत्येकच डिजिटल कंपनी हे करू बघते. म्हणजे केवळ आपल्याशी सहमती दर्शवणारे, आपल्याला आवडणारे हेच प्राधान्याने आपल्या वर्तुळात राहतात. व्हॉट्सअॅप वर तर आधीच आवडीनिवडीनुसार किंवा समविचारी मंडळींचे ग्रुप्स बनलेले असतात. प्रत्यक्षात आपण ज्याप्रमाणे बहुतांशवेळा आपल्याच विचारांच्या, आपल्यासारखीच पार्श्वभूमी असणाऱ्या, समजुती-मान्यता-रूढी-परंपरा असणाऱ्यांचा गोतावळा करून जगतो; तसलाच गोतावळा तंत्रज्ञानाच्या माध्यमातूनही आपल्या भोवती उभा झाला आहे. साहजिकच वेगळ्या मताला, वेगळ्या विचारांना, वेगळ्या पार्श्वभूमीच्या मान्यता-समजुती-रूढींना पुरेसा अवकाशच या आपल्या गोतावळ्यात नाही. एकमेकांचं कौतुक आणि एकमेकांना अनुमोदन यापलीकडे आपल्या मेंदूपर्यंत फारसं काही पोहचणार नाही अशी ही सगळी तजवीज झाली आहे. या स्थितीला इंग्रजीत ‘एको चेंबर’ म्हणतात. एको म्हणजे मराठीत प्रतिध्वनी. चेंबर म्हणजे खोली. प्रतिध्वनी ऐकवणारी खोली. आपलेच विचार, आपलाच आवाज पुन्हा पुन्हा आपल्याला ऐकवणारी खोली. पुन्हा पुन्हा ऐकल्याने समजुती, मान्यता, विचार घट्ट करण्याचा प्रकार ही प्रतिध्वनी ऐकवणारी खोली करते. त्यात हा डावा, हा उजवा, हा पुरोगामी, हा प्रतिगामी, हा हिंदुत्ववादी, हा सेक्युलर, हा मुस्लीमधार्जिणा, हा संघी, हा काँग्रेसी वगैरे वगैरे असंख्य लेबलं आपण माणसांना लावली असल्यामुळे, आपण जणू आधीच ठरवलं आहे की अमुक अमुक व्यक्ती असं म्हणते आहे म्हणजे त्यामागे अमका अमकाच हेतू असला पाहिजे. एकदा हे ठरवून ठेवलं की, एको चेंबरच्या बाहेरचा कोणताही आवाज चुकून कानावर पडला तरी मेंदूपर्यंत पोहचतच नाही. माहिती मिळवण्याचं, बातम्या कळण्याचं सगळ्यात मोठं माध्यम हे आता आपला मोबाईल बनलं असताना, (खरी-खोटी) माहिती पुरवणारे आपले व्हॉट्सअॅप ग्रुप्स, आपली सोशल मिडिया वॉल ही प्रचंड मोठी एको चेम्बर्स बनली आहेत. जगाशी सर्वार्थाने सहजपणे जोडलं जाऊनही डबक्यातलं बेडूक बनण्याचा हा प्रकार. सोशल मिडियाच्या उदयानंतर, संपर्क तंत्रज्ञान क्रांतीनंतर आपापसातला लोकांचा संवाद वाढून, एकमेकांच्या भिन्न विचारांचा आदर करत लोकशाही दृढ होईल असा आशावाद अनेकांना होता. भिन्न विचारांच्या व्यक्तींनी खुल्या मनाने एकत्र चर्चा करून, मंथन करत मार्ग काढावा, प्रश्नांची उत्तरं शोधावीत असं आधुनिक लोकशाहीत अपेक्षित असतं. पण काय घडलं? आपापले झेंडे मिरवणारी, लोकशाहीलाच धोका निर्माण करणारी एको चेम्बर्स उभी राहिली. वेगवेगळ्या बेटांसारखी. आपलेच आवाज आणि त्याचे उमटत राहणारे प्रतिध्वनी परत परत ऐकून आपलीच मतं अधिकाधिक दृढ झाली, पुढे कट्टर बनू लागली. यात भिन्न आवाजाला स्थानच उरलं नाही. आणि भिन्न आवाज अस्तित्वात असण्याची सवय जणू गेल्याने ‘भिन्न आवाज म्हणजे धोका’ अशी जाणीव आपल्याही नकळत घर करू लागली. धोका दिसल्यावर एकतर पळ काढायचा किंवा लढायचं ही आदिम वृत्ती डोकं वर काढते. गरज नसतानाही आपण आक्रमक होतो. आपले वैचारिकदृष्ट्या आरामदायी (कम्फर्ट झोन्स) असणारे एको चेम्बर्स आपले आधार बनतात. पुन्हा तेच सगळं चक्र. काय भयानक चक्रव्यूह आहे हा! एक प्रकारची वैचारिक जातव्यवस्थाच ही. एखाद्या चांगल्या राजाने जसं आपल्या भोवती नुसते आपले भाट आणि खुशमस्करे बाळगू नयेत असं म्हणलं जायचं; तसंच लोकशाहीत, जनताच राजा असल्याने, राजा झालेल्या सामान्य नागरिकानेही करता कामा नये.
भेद चक्रव्यूहाचा

हे भेदायचं असेल तर काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला समाज म्हणून ठरवून अंमलात आणाव्या लागतील. आपल्या अनुभवविश्वाच्या पलीकडे जग आहे आणि ते जाणून घेण्याचं कुतूहल आपल्यात असायला हवं हे स्वतःला बजावणे गरजेचे आहे. प्रश्न विचारणे (केवळ जाब विचारणे या अर्थी नव्हे तर जाणून घेणे या अर्थी) हे आपले मूलभूत कर्तव्य संविधानाच्या कलम ५१-अ मध्येही दिलं आहे. कुतूहल नसेल तर शिकणं संपलं, शिक्षण संपलं की प्रगती खुंटली. आणि कुतूहल जिवंत ठेवायचं तर सतत निकालखोर (म्हणजे जजमेंटल) भूमिकेतून बाहेर येण्याला पर्याय नाही. मित्रयादीत किंवा आपण ज्यांना फॉलो करतो त्या यादीत वेगवेगळ्या राजकीय विचारधारांचे, वेगळ्या वाटा निवडणारे, वेगळा विचार करणारे लोक असतील आणि त्यांचं व्यक्त होणं आपल्यापर्यंत पोहचत राहील याची काळजी घ्यायला हवी. वेगवेगळ्या विचारांच्या आवाजांमध्ये समतोल, साधायला हवा. एकाच प्रकारच्या आवाजाच्या गोंगाटात दुसरे आवाज दबले जाणार नाहीत याची काळजी घेऊया. व्हॉट्सअॅप सारख्या माध्यमाचा तर फारच जबाबदारीने वापर करायला हवा. शहानिशा न करता आलेली माहिती पुढे पाठवण्याचा गाढवपणा टाळायला हवा. आपण अशाही व्हॉट्सअॅप ग्रुपचा भाग बनायचा प्रयत्न करायला हवा जिथे भिन्न मतप्रवाह आपल्याला ऐकायला मिळतील. त्या मतांकडे तटस्थपणे आणि विश्लेषक दृष्टीने बघण्याची सवय लावून घ्यायला हवी. ‘प्रत्युत्तरासाठी नव्हे तर समजून घेण्यासाठी ऐकणे’ हे तत्त्व अंमलात आणायला लागेल. हे केलं तर वेगवेगळ्या बेटांवर गेलेल्या लोकांमध्ये संवादाचे पूल उभे राहतील.
माझा माणसांतल्या मूलभूत चांगुलपणावर विश्वास आहे, त्याशिवाय आठशे कोटी लोक या पृथ्वीतलावर आज आहे एवढ्याही शांत आणि सुरक्षित अवस्थेत राहूच शकले नसते. आपल्यापेक्षा वेगळ्या विचारांचे लोक वाईटच आहेत आणि ते जगाचं वाईटच करू बघतात या भयगंडापासून दूर राहणे श्रेयस्कर. पण आपल्या वर्तुळातल्या माणसांना दूर ढकलणारे, किंवा नात्यांत कटुता येईल असे आपले वर्तन आपल्याही नकळत आपल्याकडून होत नाही ना ही काळजी घ्यायला हवी. वर्षानुवर्षाची मैत्री आहे, कौटुंबिक नातेसंबंध आहेत, ते भेदांच्या पलीकडे जायला हवेत. संवादाचे पूल समोरच्याची (आणि आपलीही) कट्टरता कमी करण्यात मदत करतात. दोन्ही बाजू अधिक उदारमतवादी आणि सहिष्णू होण्याची शक्यता वाढते. म्हणून लांब पल्ल्याच्या सामाजिक हितासाठी व्यक्तिगत पातळीवर अस्वस्थ करणारे विचार मांडणारे लोकही दूर न सारण्याचा शहाणपणा किमान विचारी लोकांनी दाखवायला हवा. मला या सगळ्याविषयी विचार करताना नेहमी संत ज्ञानेश्वरांचे पसायदान आठवते.
जे खळांची व्यंकटी सांडो । तयां सत्कर्मी रती वाढो भूतां परस्परें पडो । मैत्र जीवाचें।
जे वाईट आहेत त्या माणसांवर पूर्ण फुली मारण्याविषयी ते बोलत नाहीत. ते म्हणतात त्यांच्यातली व्यंकटी सांडून जाऊ देत. सत्कर्माविषयी प्रेम वाढू देत आणि अशा प्रकारे सगळ्या जीवांमध्ये मैत्र असावे. आज एआय च्या जमान्यात जगभर माणसामाणसांतला संवाद संपून भयाण एकटेपणा माणसाचं मानसिक संतुलन बिघडवेळ की काय अशी भीती आहे. या पार्श्वभूमीवर माणसं जपूया, नाती जपूया. आपापसांतल्या वेगळेपणाला सुरक्षित अवकाश निर्माण करूया. म्हणजे मग ‘ही दोस्ती तुटायची नाय’ हे खात्रीने म्हणता येईल!
(नोव्हेंबर २०२६ च्या साप्ताहिक सकाळ मध्ये प्रसिद्ध)
No comments:
Post a Comment