जगतातल्या घराणेशाहीची उदाहरणं सांगितली जातात. पण लेखकांची घराणेशाही हा प्रकार तसा विरळाच. माझ्या खापर पणजोबांनी प्रल्हाद कानिटकर यांनी पुस्तक लिहिलं होतं असं ऐकून आहे. माझे पणजोबा राजाराम प्रल्हाद उर्फ रा.प्र. कानिटकर यांची कित्येक पुस्तकं आजही विकली जातात. प्रसिद्ध संपादक, कथाकार आणि कादंबरीकार माधव कानिटकर म्हणजे माझे आजोबा. तर माझे आई-बाबा म्हणजे महेंद्र आणि डॉ गौरी कानिटकर यांनीही अनेक पुस्तकं लिहिली आहेत. अशा प्रकारे लेखनाचा समृद्ध वारसा मला घरातूनच मिळाला. माझं वाचन भरपूर आणि चौफेर असावं, मी लेखन करावं यासाठी आई-बाबा, आजोबा यांनी बढावा दिला.
कॉलेजमध्ये असतानाच आम्ही मित्रांनी एकत्र येत शासनव्यवस्था सुधारण्याच्या उद्देशाने परिवर्तन संस्था सुरू केली. परिवर्तनचे एकेक प्रकल्प सुरू झाले, अनेक आंदोलने केली, चळवळीत सहभागी झालो; त्याबरोबर राजकीय नेत्यांशी, सरकारी अधिकाऱ्यांशी संपर्क येत गेला. अनेकांना मध्यमवर्गीयांना वाटतो तसा राजकारणाविषयी तिटकारा मला कधीच नव्हता. आणि आता तर उलट राजकीय दुनियेविषयी विलक्षण आस्था आणि कुतूहल तयार होत गेलं, वाढत गेलं. परिवर्तनच्या कामामुळे बहुतांश सामाजिक-राजकीय विषय हे क्लिष्ट असतात याची जाणीव झाली. राजकारणाकडे एकरेषीय पद्धतीने बघून चालणार नाही हेही लक्षात आलं. सामाजिक-राजकीय प्रश्नांना अनेक गुंतागुंतीचे कंगोरे असतात, आणि ही क्लिष्टता मला बेहद्द आकर्षक वाटली. चित्रपट, वेबसिरीज, कादंबऱ्या यात बहुतांशवेळा राज्य किंवा देश पातळीवरच्या राजकारणाचं चित्रण केलं जातं. किंवा स्थानिक पातळीवर कोणी लिखाण केलं तरी ते ग्रामीण भागातलं असतं. जागतिकीकरणाच्या तीन दशकांत शहरांचा आकार आणि तोंडावळा बदलला आहे. आता शहरं विकासाची दिशा ठरवतात. पुढच्या दशकात भारतातली बहुसंख्य लोकसंख्या शहरी भागातच राहणार आहे. हजारो कोटी रुपयांचे अर्थसंकल्प या एकेका शहराचे आहेत. अशावेळी शहराचं राजकारण सुटसुटीत, सोपं आणि सरळ असेल हे शक्यच नाही. शहरांच्या राजकारणाच्या या क्लिष्टतेचा वेध घेणारं लेखन करावं असं माझ्या मनाने घेतलं. एका बाजूला माझा लेखनाचा समृद्ध वारसा आणि दुसऱ्या बाजूला माझ्या सामाजिक-राजकीय कामाचा अनुभव. ‘आठवं घर’ ही माझी कादंबरी दोन्हीचा मिलाफ आहे.
एखादं कथानक डोक्यात येणं आणि त्या कथानकाची कलाकृती तयार होणं हा प्रवास मोठा रंजक असतो. कलाकृती कोणत्या प्रकारची आहे त्यानुसार लागणारा वेळ, त्यात गुंतणाऱ्या माणसांची संख्या अशा गोष्टी बदलत जातात. उदाहरणार्थ कथा लिहायला कदाचित तुलनेने कमी वेळ लागेल आणि खुद्द लेखक फक्त गुंतलेला असणार. पण कथानकाचं रूपांतर एखाद्या चित्रपटात करायचं असेल तर त्यात शेकडोच काय हजारो हात लागतात! कथानकाचं रूपांतर कथा, चित्रपट, नाटक, कादंबरी अशा कोणत्या कलाकृतीमध्ये करायचं हा निर्णय कथानकाची क्षमता, लेखकाची आवड आणि कौशल्य, इतरांना त्यात आर्थिक गुंतवणूक करावी वाटण्याइतकं ते आकर्षक वाटणं अशा इतर अनेक गोष्टींवर अवलंबून असतो. ‘आठवं घर’ ही कादंबरी मी लिहायला घेतली तोपर्यंत मी केवळ कथा लिहिल्या होत्या. त्यामुळे आपल्या ठरलेल्या, वहिवाटेवरूनच जावं असा विचार स्वाभाविकपणे माझ्या मनात होता. पण लिहायला सुरुवात केल्या केल्याच मला जाणवलं की राजकारणातल्या क्लिष्टतेबद्दल लिहायचं असेल तर ‘विषयांचं सुलभीकरण करून, सोप्या प्रश्नांवर सोपे उपाय आणि प्रश्न सुटला!’ या जाळ्यात अडकून चालणार नाही. आणि राजकारणाची गुंतागुंत मांडायची तर कथेच्याच काय पण दीर्घकथेच्या परिघातही ते बसणारं नाही. त्यामुळे अखेर ‘कादंबरी’ लिहायचं मी ठरवलं.
कथानक राजकीय असल्याने दोन-तीन आव्हानं माझ्यासमोर होती. सगळ्यात पहिलं म्हणजे कथानक घडतं ते शहर. कोणत्या शहराचं राजकारण मला सांगायचं आहे? आपल्या देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य नावालाच आहे. परदेशात एखाद्या राजकारण्याला, इतिहासातली एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीला तुमच्या कथेचं/चित्रपटाचं पात्र खुलेआम शिव्या घालू शकतं. खऱ्या राजकीय पक्षांची नावं घेता येतात. भारतात यातलं काहीही करणाऱ्याला अनेक वकिलांची फौज तर तैनात ठेवावी लागेलच पण सोबत मारहाण, तोडफोड, जाळपोळ यालाही सामोरं जावं लागेल. एवीतेवी मी सांगणार ती कथा काल्पनिकच आहे, तर संपूर्ण शहरच का काल्पनिक असू नये हा विचार माझ्या मनात आला. आणि त्यातून सर्जेपूर हे काल्पनिक शहर उभं राहिलं! मग शहराचा इतिहास आला, भूगोल आला, तिथे वस्त्या आल्या, शहराचा म्हणून स्वतःचा एक स्वभावही आला. त्यापाठोपाठ राजकीय पक्ष आले- तेही काल्पनिक नावं घेऊन. एवढं सगळं काल्पनिक असलं तरी मला राजकारण अस्सल लिहायचं होतं, त्यामुळे सर्जेपूरची ही काल्पनिक दुनिया आपल्या खऱ्या दुनियेचाच भाग आहे. २०१० ते २०१५ या पाच वर्षांत सर्जेपूर शहरात काय काय घडतंय याची ही कहाणी आहे. आणि याच कालखंडात देश आणि जगभर झालेल्या उलथापालथीचा परिणाम सर्जेपूरच्या काल्पनिक दुनियेवर दिसून येतो. दुसरं आव्हान होतं ते कादंबरीच्या आकाराचं. सर्व विषयांचा संबंध राजकारणाशी येतो आणि सर्व विषयात राजकारण घुसतं. एकच व्यक्ती सर्व काही करते ही गोष्ट सिनेमात बघायची सवय असली तरी प्रत्यक्षात प्रत्येक टप्प्यावर आणि पातळ्यांवर असंख्य माणसं गुंतलेली असतात. आणि ते चित्रण अस्सल ठेवायचं तर तेवढी पात्रं कादंबरीमध्ये येणं आवश्यकच. पात्रं आली की प्रसंगही आले, आणि त्याबरोबर कादंबरीचा आकारही वाढत गेला. ६०० पानांची कादंबरी, विषय राजकीय, त्यात लेखक नवीन; कोण वाचणार? अशी शंका माझ्या मनात येऊन गेली हे मान्य करायला हवं. पण सुदैवाने कादंबरीच्या प्रकाशिकेला- देशमुख आणि कंपनीच्या मुक्ता गोडबोलेला ही शंका आली नाही, आणि आली असली तरी तिने हे धाडस करायचं ठरवलं हे विशेष!
आजच्या ध्रुवीकरणाच्या जगात आपण एकमेकांवर शिक्के मारायला आतुर झालो आहोत. ‘हा डावा, हा उजवा’, ‘हा अमुक हा तमुक’. पण माणसं केवळ ‘नायक-खलनायक’ किंवा ‘काळे-पांढरे’ या दोन गटांत मोडत नाहीत. कोणतीही व्यक्ती कायमस्वरूपी आणि सर्वकाळ नायक वा खलनायक असते यावर माझा विश्वास नाही. त्यात राजकारणात गुंतलेल्या व्यक्तींना ज्या क्लिष्ट आणि गुंतागुंतीच्या गोष्टी हाताळाव्या लागतात त्यानंतर त्यांचं रूप काळं किंवा पांढरं राहूच शकत नाही. या दोन्हीच्या मधल्या राखाडी छटांमध्येच राजकीय व्यक्ती सापडत राहतात. बुद्धीबळाच्या पटावरच्या सोंगट्या काळ्या-पांढऱ्या असल्या तरी राजकारणातलं प्यादं एकेक पाउल टाकत आठव्या घरात जाऊन वजीर बनतं तेव्हा त्याचा मूळ रंग जाऊन ते राखाडी बनलेलं असतं. ‘आठवं घर’ ही सर्जेपूरची कहाणी अशाच बुद्धिबळाच्या पटाची आहे.
आजच्या जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने माझ्या पुस्तकाची ही कहाणी सविनय सादर!
(दि. १८ एप्रिल २०२६ रोजी प्रकाशित साप्ताहिक सकाळमध्ये प्रसिद्ध.)
पुस्तक विकत घेण्यासाठी इथे क्लिक करा !

No comments:
Post a Comment