Tuesday, May 5, 2015

थंडावलेली चळवळ आणि हुकलेली संधी

२६ नोव्हेंबर २०१२ या दिवशी एका अभूतपूर्व प्रयोगाची सुरुवात झाली. आम आदमी पार्टीची दिल्लीत स्थापना झाली. पर्यायी राजकारणाचे असंख्य प्रयत्न त्या आधी झाले असले तरी अनेक अर्थांनी आम आदमी पार्टीचा प्रयोग वेगळा होता. निव्वळ प्रस्थापित राजकीय मंडळी एकत्र येत वेगळा पर्याय द्यायचा प्रयत्न केला असं हे घडलं नव्हतं. केवळ चळवळी-आंदोलनं करणारे इथे एकत्र आले होते असंही हे नव्हतं. किंवा फक्त एखाद्या भागातच लोकांना याबद्दल माहिती आहे असंही आम आदमी पार्टीच्या बाबतीत घडलं नाही. हा देशव्यापी प्रयोग होता. आंदोलनं करणारे, एनजीओ चालवणारे, कधीच यापैकी काहीही न केलेले, राजकारणाशी फटकून राहणारे, डावे-उजवे असे वेगवेगळे लोक राजकारण बदलण्यासाठी, व्यवस्था परिवर्तनासाठी आम आदमी पार्टीचा झाडू हातात घेत एकत्र आले होते. अशा पद्धतीने सुरु झालेली ही एक अफलातून राजकीय चळवळ होती. सगळ्या चढ उतारातून, धक्क्यातून सावरत, चुका करत, पण स्वतःत सुधारणा करत आम आदमी पार्टी एक चळवळ म्हणून सुरु राहिली. आणि त्याचाच परिपाक म्हणजे आम आदमी पार्टी ७० पैकी ६७ जागा जिंकत दिल्लीत पुन्हा सत्तेत आली!

आर्थिक व्यवहारांसह सर्व बाबतीत पारदर्शकता आणि ‘स्वराज’ म्हणजेच विकेंद्रीकरण आणि पक्षांतर्गत लोकशाही या दोन तत्त्वांना समोर ठेवत, व्यवस्था परिवर्तनाचे ध्येय बाळगत हा पक्ष राजकीय आखाड्यात उतरला होता. नुकतेच पक्षाने योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांसह अजून दोन जणांना पक्षातून काढून टाकले. आणि हे करत असताना पक्षाच्या गाजावाजा केलेल्या पारदर्शकता आणि पक्षांतर्गत लोकशाही या तत्त्वांचा पार चुराडा झाला. पक्षाच्या राष्ट्रीय परिषदेच्या बैठकीत तर हाणामाऱ्या झाल्या. यावरून अनेकांनी आरोप प्रत्यारोप देखील केले. पण कोणाचे आरोप खरे, कोणाचे खोटे हे कळावे म्हणून त्या बैठकीचा काटछाट न केलेला व्हिडीओ प्रसिद्ध करण्याची मागणीही पक्षाकडून धुडकावून लावण्यात आली. कालपर्यंत जे योगेंद्र आणि प्रशांत भूषण हे पक्षाचे राष्ट्रीय नेते होते त्यांना कार्यकर्त्यांच्या नजरेत ‘गद्दार’ ठरवण्यासाठी कित्येकांनी भूमिका बजावली. काही आठवड्यांपूर्वीपर्यंत तारतम्य सोडलेल्या मोदी-भक्तांवर आम्ही टीका करत होतो. पण मोदीभक्तांना लाजवेल अशी अरविंदभक्ती या दरम्यान आम्हाला बघायला मिळाली. या सगळ्या भांडणात नेमके कोण बरोबर, कोण चूक याचा फैसला करणं कार्यकर्त्याला अशक्य बनलं होतं. कारण पक्षाकडून कसलाच अधिकृत खुलासा कधी आलाच नाही. हे घडत असतानाच पक्षाच्या वेबसाईटवरून ‘स्वराज’ म्हणजेच अंतर्गत लोकशाही बद्दल उल्लेख असणारा संपूर्ण परिच्छेदच गुपचूप वगळण्यात आला आहे. जनलोकपाल आंदोलनातून हा पक्ष जन्माला आला, पक्षाने चुकीच्या मार्गाला लागू नये म्हणून अंतर्गत लोकपाल नेमण्याची तरतूद केली. पूर्वी एखादा सदस्य थेट या लोकपालकडे आपली तक्रार दाखल करू शकत असे. आता मात्र त्याला लोकपालकडे तक्रार देण्यासाठी पक्षसचिवाकडे तक्रार द्यावी लागते. हे परस्पर, गुपचूपपणे केले जाणारे बदल पक्षावारचा विश्वास कमी करणारे आहेत यात शंका नाही. कार्यकर्त्यांना इतकं गृहीत धरणं हे “आम्ही वेगळे” म्हणणाऱ्या आम आदमी पार्टीला तरी शोभणारे नाही.

दिल्ली तर दूर आहे. पण महाराष्ट्रातल्या पदाधिकारी नेत्यांनी तरी काही ठोस भूमिका घेऊन कार्यकर्त्यांना विश्वासात घ्यावे असेही घडलेले नाही. यामागे आपली पक्षातली खुर्ची वाचवण्याची धडपड असावी किंवा खरोखरच कार्यकर्ते संभ्रमात आहेत याची तसूभरही चिंता त्यांना वाटत नसावी कारण राष्ट्रीय परिषदेच्या बैठकीनंतर जवळपास एक महिना पक्षाचे राज्याचे नेतृत्व अज्ञातवासात जाऊन बसले होते आणि कार्यकर्त्यांना प्रत्यक्ष भेटण्याचे टाळत होते. सध्याही राज्य नेत्यांनी घेतलेली भूमिका ही इतकी मिळमिळीत आणि कणाहीन आहे की गांधी परिवारासमोर लाचार होणाऱ्या कॉंग्रेसच्या तथाकथित बड्या नेत्यांची आठवण व्हावी. कणखर भूमिका घेणे म्हणजे पक्ष तोडणे नव्हे हे आम्हाला समजते. पण लाचारी स्वीकारत खुर्च्या उबवण्याचेच राजकारण करायचे होते तर जुनेच राजकीय पर्याय काय वाईट होते? याच ढिसाळ नेतृत्वाचा परिणाम म्हणजे काल पक्षाच्या ३७५ कार्यकर्त्यांनी सामुहिकपणे पक्षसदस्यत्वाचा राजीनामा दिला.

जेव्हा एखादा नवा पर्याय प्रस्थापित व्यवस्थेत येतो तेव्हा तो जुन्या सर्वांपेक्षा नुसता चांगला असून भागत नाही तर तो सर्वांपेक्षा खूपच जास्त चांगला असावा लागतो. बाजारातही नवीन गोष्ट जुन्या सर्वांपेक्षा खूपच चांगली असावी लागते. तरच ती विकली जाते. हे अरविंद केजरीवालला माहित असल्याने, वर उल्लेख केलेल्या तत्त्वांसह पर्यायी राजकारणात आम आदमी पार्टीने उडी मारली. आता ही तत्त्वे इतर कोणी पाळत नसल्याने आम आदमी पक्ष हा दिसायला सर्वांपेक्षा वेगळा आणि खूपच चांगला पक्ष बनला. पण आता जेव्हा पक्षातच या तत्त्वांना सरळ सरळ हरताळ फासला जात आहे तेव्हा हा पक्ष इतर पक्षांपेक्षा चांगला आहे हे आम्ही कोणत्या तोंडाने सांगावे? पक्षांतर्गत विरोधकांना इतकी लोकशाहीविरोधी वागणूक देणारे हे नेतृत्व उद्या देशात सत्तेत आल्यावरही हिटलर-स्टालिनच्या मार्गाला लागणार नाही याची खात्री कोणी कशी द्यावी? मला अनेक जाणकार मित्र मंडळींनी सांगितलं की ‘राजकारण असंच असतं. शेवटी एक हुकुमशहा माणूस पक्ष चालवतो. लोकशाही वगैरे दिखावा आहे.’ अरे बापरे! ‘चलता है / असंच असतं’ या वृत्तीवर मात करत तर सहा वर्षांपूर्वी आम्ही परिवर्तनच्या कामाला सुरुवात केली होती. आपणही त्याच वृत्तीचे आता शिकार होऊ लागलो आहोत की काय? तत्वांबाबत ‘चलता है’ स्वीकारून कसं चालेल? ज्याबाबत तडजोड होणार नाही ती तत्त्व. ‘विकेंद्रीकरण’, ‘अंतर्गत लोकशाही’ वगैरे शब्दांची जी मुक्त उधळण आमच्या नेत्यांनी आजवर केली ती निव्वळ सोय म्हणून केली असं मानावे काय? हा पक्ष आता उर्वरित राजकीय पक्षांच्याच माळेतला बनू लागला आहे असं म्हणावे काय? जसं सगळ्या राजकीय पक्षात काही हुशार, चांगले आणि निष्ठावान लोक असतात तसे याही पक्षात आहेत आणि पुढेही राहतील. जसं एखाद्या पक्षाचा एखादा मुख्यमंत्री उत्तम काम करून दाखवतो तसा केजरीवाल देखील दिल्लीमध्ये अप्रतिम काम करेल याबद्दल माझ्या मनात तसूभरही शंका नाही.

पण ज्या राजकीय विकेंद्रीकरणासाठी, आर्थिक पारदर्शकतेसाठी, राजकीय व्यवस्था परिवर्तनासाठी ही चळवळ सुरु झाली होती ती आता थंडावली आहे. चळवळ थंडावली, आता उरला तो केवळ राजकीय पक्ष. डावे आणि कॉंग्रेस रसातळाला आहेत, भाजप उन्मत्त अवस्थेत आहे आणि निव्वळ सत्ता हेच ध्येय मानणाऱ्या नव्या जनता परिवाराचा उदय झाला आहे. या परिस्थितीत चांगल्या राजकारणाची जी प्रचंड मोठी पोकळी आज भारतात निर्माण झाली आहे ती वेगाने भरून काढण्याची संधी, क्षमता असूनही, आज आम आदमी पार्टीने गमावली आहे. योग्य दिशेने प्रयत्न केले, अहंकार कमी केला आणि कार्यकर्त्यांना विश्वासात घेत कणखर न्याय्य नेतृत्व दिलं गेलं तर हे थंडावलेलं राजकीय परिवर्तनाच्या चळवळीचं यज्ञकुंड पुन्हा धडधडू लागेल, पण आत्ता हुकलेली संधी परत कधी येईल कुणास ठाऊक?!


*(माझ्या या लेखनावरून काहींचा गैरसमज होण्याची शक्यता आहे की मी पक्षातून बाहेर पडलो. मी पक्ष सोडलेला नाही. तसा आततायीपणा करण्याची माझी इच्छाही नाही. आम आदमी पार्टीच्या संविधानातील कलम VI(A)(a)(iv) नुसार प्राथमिक पक्षसदस्य पक्षावर खुली टीका करू शकतात. त्यामुळे हे लेखन शिस्तभंग मानले जाणार नाही असा आशावाद मी बाळगून आहे. मी आजही आम आदमी पार्टीचा प्राथमिक सदस्य आहे. हा पक्ष अजूनही सुधारू शकतो यावर माझा विश्वास आहे. त्यासाठी भरकटलेल्या या पक्षाला ताळ्यावर आणण्याचा प्रयत्न माझ्यासारख्या समविचारी कार्यकर्त्यांना करावा लागेल. निष्काम भावनेने सुरु केलेल्या आपल्या या प्रयोगाला वाया जाऊ न देण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायलाच हवा!)

4 comments:

 1. तुम्हाला लिहिता येतं म्हणून लिहित सुटता, पण लोकभावना भडकवन्याचेच काम करता. लोक लिहील ते वाचतात आणि आपल्या भावना प्रकट करत असतात. पण तुमच्यासारख्या थोड्या फार जाणकार व्यक्तींनी तरी लगेच भावना व्यक्त करणे चांगले नव्हे. हे जन आंदोलन कसे पूर्ण झाले आणि त्याचा उत्तरार्ध काय आहे ते सगळ्यांना माहित आहे. माझ्या ज्ञानानुसार "आप" स्थापन झाल्यापासून कोणत्याही राजकीय पक्षावर जेवढी नजर ठेवली असेल आणि जेवढे लिहिले असेल तेवढे आताच्या प्रस्थापित पक्ष्यावरही लिहिले नसेल. तुम्ही थोडा विचार करा आणि त्यांनाही थोडा वेळ द्या. दया करा!!!! एक जन आंदोलन आपण खूप शहाणे आहोत हे दाखवण्याच्या मिजाशीने खच्ची करत आहे असे तुम्हाला वाटत नाही का.
  अजूनही माझ्यासारखी लोक ह्या सगळ्या लोक्कांकडे खूप आशेने बघत आहे. सतत टेलीविजन आणि बातमी पत्रात नकारार्थी वाचून फारच वाईट वाटते . हे आता सत्य वाटू लागले आहे कि "हुशार लोक विश्व निर्मित करू शकतात पण एकत्र येवून विश्व चालवू शकत नाहीत". आता तरी डोळे उघडा.
  अजून सांगायचे झाले तर, "आप" दिल्लीतील पहिल्या विजयानंतर स्वतःचे काम साध्य करून घेण्यास अनेक जन कसे पटापट पक्षात आले आणि नंतरच्या काळात कसे बाहेर पडले हेही आपण पाहिले पाहिजे. आता तर आपले काहीच होणार नाही, स्वच्छ प्रतिमेशिवाय इथे थारा नाही " तेव्हा कोल्ह्याला द्राक्ष आंबट फार" अशी तयार झालेली भावना, त्यातून घडवलेले नाट्य हे कसे तुमच्यासारख्या शहाण्यासुर्त्यांनी असे वेगळ्या प्रकारे लोक्कापुढे दाखवले आहे हे दिसतेच. आणि काय सांगावे. इथे सगळ्यांना मोठे व्यायाचेय, पण "Staying at the back, giving "POWER & SUPPORT" to those who are in from and still being ego less, is what we should learn from the digit ZERO".

  ReplyDelete
  Replies
  1. anonymous म्हणून लिहिल्याने नेमके कोणी लिहिले आहे हे समजले नाही. त्यामुळे तुम्हाला नेमकी किती पार्श्वभूमी माहित आहे आणि किती नाही याचा मला अंदाज नाही. तेव्हा तुम्हाला फारसे माहित नाही असे गृहीत धरून लिहितो. चुकल्यास क्षमस्व. आपण एकेक करत तुमच्या आक्षेपांचा विचार करू.
   'लगेच भावना व्यक्त करणे चांगले नव्हे' असे आपण म्हणता.
   पण मी आपल्याला आठवण करून देऊ इच्छितो की ४ मार्चला राजकीय व्यवहार समितीतून योगेंद्र-प्रशांत यांची हकालपट्टी झाली. २८ मार्चला राष्ट्रीय परिषदेच्या बैठकीत तमाशा झाला. लेखाची तारीख आहे ५ मे. याचाच अर्थ एक महिन्यापेक्षा जास्त काळ मी याविषयी जाहीरपणे एक शब्दही बोललेलो नाही. तेव्हा लगेच भावना व्यक्त केल्या या तुमच्या आरोपात तथ्य नाही.
   'जनआंदोलन आपण खूप शहाणे आहोत हे दाखवण्याच्या मिजाशीने खच्ची करत आहे'.
   एवढे प्रचंड जनआंदोलन खच्ची करण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे असं मला मुळीच वाटत नाही. उलट एक अतिसामान्य कार्यकर्ता या नात्याने हे आंदोलन कसं आपापसात मारामाऱ्या करत आमच्या नेत्यांनी खच्ची केलं आहे याची व्यथा मी मांडली आहे. आणि जनआंदोलनाला खच्ची होण्यापासून रोखू शकणारे आमचे महाराष्ट्रातले नेते मौनीबाबा बनून बसून राहिले हे खरे दुर्दैव. हे आंदोलन जसे आम्ही एकट्याने कोणी उभारले नाही, तसे हे खच्ची करण्याची क्षमताही आमच्यासारख्या सामान्य वकुबाच्या कार्यकर्त्यामध्ये नाही.
   'कोल्ह्याला द्राक्षे आंबट'
   असे आमचे असते तर पक्ष सोडून इतरत्र अनेक ठिकाणी आजही बोलावतात तिथे द्राक्षे खात बसण्याचा धूर्तपणा आम्ही करू शकलो असतो. परंतु आजही आम्ही पक्षातच पाय रोवून उभे आहोत हे आपण विसरलेला दिसता. उलट पक्षात राहूनच पक्षाला पुन्हा एकदा मूळ तत्त्वांच्या मार्गावर आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. पक्षनेतृत्वावर टीका म्हणजे पक्षद्रोह अशी फॅसिस्ट मनोवृत्ती आमची तरी नाही आणि पक्षाचीही असू नये अशी इच्छा आहे.
   'त्यातून घडवलेले नाट्य...'
   नाट्य घडवण्याचाच उद्देश असता तर गेले महिनाभर कुठेही जाहीर वाच्यता न करता शांतपणे पक्षांतर्गत चर्चा करण्याचे कष्ट आम्ही घेतले नसते. पक्षनेतृत्व कमकुवत आणि दुबळे आहे हे समजल्याबरोबर पदाला चिकटून राहण्यापेक्षा पदाचा राजीनामा देत सामान्य कार्यकर्ता म्हणून मते मांडण्याचा पर्याय आम्हाला स्वीकारावा लागला. आता यात आमचीच चूक आहे असे आपले म्हणणे असल्यास "झोपलेल्याला जागं करता येतं, सोंग घेणाऱ्याला नव्हे" असे म्हणून आम्ही सोडून देऊ...

   Delete
  2. मला इथे कोणालाही आणि कोणत्याही गोष्टीसाठी दोष द्यायचा नहिये.
   उलट मीच एक सामान्य कार्यकर्ता असल्यामुळे माझ्या दृष्टीकोनातून सर्व गोष्टी तुमच्यासारख्या जाणकार व्यक्तीस सांगण्याचा प्रयन्त केला आहे. इथे मी जे काही आरोप केले आहेत एकाबद्दल तर नाहीच नाही उलट ते आरोप नाहीच. आजकाल मिडिया आणि वृत्तपत्रामध्ये "आप" बद्दल फक्त आणि फक्त नकारात्मक पसरविण्याचा प्रकार चालू आहे त्याबद्दल आहे. शेवटी काय काही थोड्या नकारात्मक गोष्टी जेव्हा हजारो वेळा सतत ओरडून ओरडून जेव्हा सांगितल्या जातात तेव्हा मोठा जन समूह त्याच गोष्टी सत्य आहे हे मानतो. ही कदाचित आपल्या देश्यातल्या लोक्कांची मानसिकता आहे आणि हे सर्व राजकारणी आणि स्वार्थी लोक जाणून आहेत.
   तुमच्यासारख्या जाणकाराने तर नकारात्मक गोष्टीचा पाठपुरावा करावाच पण लगेच तो प्रकट करून नये हा माझा लिहिण्याचा उद्देश होता आणि सकारात्मक गोष्टी सुद्धा इथे लिहाव्यात म्हणजे कदाचित एकच पारडे जड होणार नाही. ह्या गोष्टीची तर "आप" कार्यकर्त्याने तर फारच काळजी घेतली पहिजे कारण इतर फक्त मोठ्या माणसांचे अनुकरण करत असतात.
   पक्ष सोडून कित्येक गेले असतील आणि जाणारही असतील हे मी अगोदरच लिहिले आहे. योगेंद्र-प्रशांत यांच्याबद्दल तर मी कधीच बोलणार नाही आणि जाणूननही घ्यायची इच्छा नाही, ती माझी सध्या झेप नाही. जो पर्यंत मला वाटते कि अजूनही "आप" लोक्कांची अपेक्षा पूर्ण करू शकते आणि माझ्या मनात जोपर्यंत पदाची इच्छा जागृत होत नाही तोपर्यंत कदाचित मला "आप" मध्ये मोठा दोष दिसून येणार नाही.
   मला परत म्हणायचे आहे कि "Staying at the back, giving "POWER & SUPPORT" to those who are in FRONT and still being ego less, is what we should learn from the digit ZERO". माझ्या विचारांती, कदाचित ह्याच गोष्टीच्या अभावामुळे इंग्रजांनी आपल्या देशावर इतकी वर्ष राज्य केले असे मला वाटते. (कदाचित आताही काळे इंग्रज करत आहेत) :) .

   Delete
  3. मी आजवर अनेकदा पक्षाची बाजू उचलून धरली आहे. तसे लेखनही केले आहे. पण तुम्ही म्हणता तसे बाकी कसला विचार न करता काम करत राहण्यास माझे मन तयार नाही. कारण तत्त्वे पायदळी तुडवली जात असताना, पक्ष चुकीच्या दिशेने जात असताना त्याकडे दुर्लक्ष करणे हेही कोणत्याही प्रस्थापित राजकीय पक्षाचा कार्यकर्ता करत असतोच. मग प्रस्थापित राजकीय पक्ष आणि आम आदमी पार्टी यात फरक काय राहिला? मला किंवा माझ्या अनेक सहकाऱ्यांनाही पदाची अभिलाषा नाही. पण ज्या विचारांनी तुम्ही-आम्ही या लढाईत सामील होण्याचे ठरवले त्या विचारांना आज जर पक्ष सोडचिठ्ठी देत असेल तर पक्षाला ताळ्यावर आणण्याचे कामही आपल्यालाच करावे लागेल. त्या विचारांची अभिलाषा आम्हाला आहे हे मी स्पष्टच कबूल करतो. तुम्ही 'लगेच' प्रकट करू नये असे म्हणले आहे. पण मी तब्बल महिनाभर राज्य नेतृत्वाशी याबाबत चर्चा करतोय. तिकडून अत्यंत कणाहीन प्रतिसाद मिळाल्यावरच मला हे लेखन करण्याचे पाउल उचलावे लागले ही गोष्ट तुम्ही समजून घ्या. तुम्ही म्हणता तसे शून्याकडून मागे राहणे शिकावे हे चांगले आहे. पण पुढे १ ते ९ हे वेगवेगळ्या क्षमतेचे आकडे आहेत म्हणून शून्याने मागे राहणे परवडू शकते. आमचे सध्याचे नेते म्हणजे शून्याच्याही खाली ऋण संख्येचे असल्याने त्यांचे नेतृत्व म्हणजे पक्षात आहे नाही तेही गमावणारे आहे. अशावेळी शून्याला पुढाकार घेत काही गोष्टी कराव्या लागतात. परिस्थिती बघून जो वागत नाही त्याचा एकतर दुसरे वापर करून घेतात किंवा तो संपून जातो. आत्ताची परिस्थिती आहे पक्षाला खंबीर मजबूत नेतृत्व देण्याची. आणि तसे नेतृत्व नसेल तर तोफ डागलीच पाहिजे. स्वतःचे पद वाचवण्यासाठी निर्णयहीनता पत्करणारे आणि दिल्लीसमोर लाचार होणारे नेतृत्व मला मंजूर नाही.

   Delete