Sunday, February 15, 2015

द कर्टन कॉल !

“नमस्कार, मैं महाराष्ट्र के पुणेसे बात कर रहा हूँ. क्या आपसे दो मिनिट बात कर सकता हूँ?” अशी सुरुवात करून बोलायला सुरुवात व्हायची. फोन उचलणारा दिल्लीचा तो मतदार आपल्याशी महाराष्ट्रातून कोणीतरी बोलू इच्छित आहे, या विचाराने एक सेकंद थबकून लक्षपूर्वक ऐकायचा. महाराष्ट्रातून फोन करणारा आवाज त्याला नम्र भाषेत आम आदमी पार्टीलाच मत द्या अशी विनंती करायचा. या विनंतीमुळे काही दिल्लीकर एकदम आश्चर्यचकित होत. दिल्लीच्या भल्यासाठी महाराष्ट्रातले लोकही आपल्या परीने प्रयत्न करत आहेत हे बघून त्यांना छान वाटायचं. काहीजण त्याक्षणी म्हणायचे की ‘हो, मी आणि माझे कुटुंबीय आम आदमी पार्टीलाच मत देणार आहोत.’ काहीजण चर्चा करत. पक्षावर झालेल्या वेगवेगळ्या आरोपांविषयी प्रश्न विचारतात. दुसऱ्या बाजूने बोलणारे महाराष्ट्रातले कार्यकर्ते त्यांना सर्व उत्तरं देत. बहुतांश वेळा ही चर्चा झाल्यावर दिल्लीकर सकारात्मक प्रतिसाद देत होते. आधी अगदी ठाम विरोधक असणारे लोकही ‘आम्ही आम आदमी पार्टीचा विचार करू. तुमच्यामुळे आम्हाला बऱ्याच गोष्टी नव्याने समजल्या’ असं म्हणायचे. फोन बंद झाला की, एक रेकॉर्डेड आवाज फोन करणाऱ्या कार्यकर्त्याला प्रश्न विचारायचा की तुम्ही बोललात तो मतदार कोणाला मत देईल असं म्हणाला. त्याची नोंद घेतली जात होत होती. त्यावरून एकूण कल कुठे आहे याचा अंदाज येत होता. हेच दिल्ली निवडणुकीत आम आदमी पार्टीसाठी महत्वपूर्ण भूमिका बजावलेले ‘कॉलिंग कॅंपेन’!
दिल्लीकर कार्यकर्त्यांबरोबर देशभरातून गेलेले कार्यकर्ते दिल्लीच्या मोहल्ल्यांमध्ये, रस्त्यांवर दिवसरात्र परिश्रम घेत होते तेव्हा त्यांना देशभरातल्याच नव्हे तर देशाबाहेरच्यादेखील हजारो कार्यकर्त्यांनी कॉलिंग कॅंपेन मध्ये सहभागी होत साथ दिली. सुरुवाती सुरुवातीला दिवसभरात एक-दोन हजारांच्या आसपास असणारी कॉल्सची संख्या शेवटी शेवटी दिवसाला पंच्याहत्तर हजारांवर गेली. महाराष्ट्राच्या प्रत्येक भागातून रोज हजारोंच्या संख्येने दिल्लीकरांना फोन गेले. शेवटपर्यंत महाराष्ट्रातून केल्या गेलेल्या कॉल्सची संख्या इतर कोणत्याही राज्यापेक्षा अधिक होती. या सगळ्या कॅंपेनमध्ये कार्यकर्त्यांनी अधिकाधिक सहभागी व्हावं यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले होते. शनिवार रविवार सुट्टी म्हणून तर कित्येकांनी दिवसभर घरात बसून फक्त एकच काम केलं आणि ते म्हणजे दिल्लीकरांना फोनवरून आम आदमी पार्टीला मतदान करण्याचं आवाहन करणं. पार्टीने कार्यकर्त्यांना केलेल्या आवाहनाला न भूतो न भविष्यति असा प्रतिसाद दिला. नुसती आकडेवारी बघितली तरी कॅंपेनच्या यशाबद्दल अंदाज येईल. एकूण दहा लाख बावीस हजारपेक्षा जास्त कॉल्स केले गेले. याचा अर्थ जवळपास दहा लाख कुटुंबांशी संवाद साधला गेला. यापैकी २१% महाराष्ट्रातून करण्यात आले होते. आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी तीस हजारपेक्षाही जास्त हे कॉल्स केले. शेवटच्या दोन आठवड्यातली आकडेवारी बघितली तर जवळपास ९५% दिल्लीकर कॉल करणाऱ्यांना सांगत होते की ते आम आदमी पार्टीलाच मत देणार आहेत. आणि अंतिम निकाल बघितले तर आपल्या लक्षात येईल की कॉलिंग कॅंपेनबरोबरीनेच होणारं हे सर्वेक्षण किती अचूक होत गेलं!
हे सगळं वाटतं तितकं साधं नाही. ही यंत्रणा उभी करणं, ती प्रचंड संख्येने येणाऱ्या कॉल्स समोरही कोसळू न देणं आणि या उठाठेवितून अपेक्षित उद्दिष्ट साध्य करणं हे कमालीचं अवघड काम होतं. ही सगळी यंत्रणा चालली कशी, यशस्वी कशी झाली याची ओळख करून घेऊया. मुळात तीन प्रकारच्या यंत्रणा वापरण्यात आल्या. त्यातली एक अरविंद केजरीवाल यांचे आयआयटीतील सहकारी प्रसोनजीत पट्टी यांनी स्मार्ट फोनसाठी उभारली होती. दुसरी यंत्रणा मोहनराज थिरूमलई यांनी बनवून दिली होती. ती साध्या कंप्युटर-इंटरनेटच्या सहाय्याने वापरायची होती. पण या दोन्ही यंत्रणा अपुऱ्या पडल्यावर टोल फ्री सर्व्हर घेऊन इथल्या कार्यकर्त्यांनी तिसरी यंत्रणा उभारली. सोशल मिडिया मार्केटिंग, प्रमोशन, रेकग्निशन आणि रिपोर्टिंग या चार कामांसाठी एक टिम होती ज्याचे नेतृत्व करत होते शशांक मल्होत्रा (दिल्ली), कार्तिकेय महेश्वरी (फिलाडेल्फिया- अमेरिका), गोपाल कृष्णा (पाटणा) हे तिघे. सोशल मिडियावर कॉलिंग कॅंपेनचा प्रचार करण्याची जबाबदारी होती श्रीकान्थ कोचारलाकोटा या अमेरिकेतील कार्यकर्त्यावर. कॉल करणाऱ्या कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देणारी एक टिम, जिचे समन्वयक होते अमिताभ गुप्ता (रुरकी) आणि अलका हरके (दिल्ली). याशिवाय कॉल्सवर देखरेख ठेवण्यासाठी जी टिम होती ती होती आकाश जैन या कार्यकर्त्याच्या देखरेखीखाली. कार्यकर्त्यांसाठी एक हेल्पलाईन उभारण्यात आली होती ज्याचं नियंत्रण अलका हरके (दिल्ली) हिच्या नेतृत्वाखाली नवी मुंबई, बडोदा, आणंद, अलीगड, हरियाणा, पंजाब इथले कार्यकर्ते मिळून करत होते. सगळ्यांचा एकमेकांशी नीट संपर्क राहिला पाहिजे. ठरलेल्या गोष्टी शेवटपर्यंत पोहोचल्या पाहिजेत या दृष्टीने कम्युनिकेशन्स टिम देखील तयार करण्यात आली होती ज्याच्या समन्वयाचं काम चिंचवड मधून महेश केदारी करत होता. एकूण २५ राज्यांमधून कॉलिंग कॅंपेन झालं त्यामुळे प्रत्येक राज्यात एकेक समन्वयक नेमण्यात आला होता. महाराष्ट्रात सुरुवातीला अमित खंडेलवाल आणि नंतर अजिंक्य शिंदे यांनी ही जबाबदारी पार पडली. या सगळ्या समन्वयकांचा समन्वय साधण्याचे काम करत होते विकास शुक्ला (बेंगळूरू), आशिष जैन (चंडीगड) हे दोघे. आणि या सगळ्या टीम्सचं नियंत्रण करत होता पुण्याचा गोपाल शर्मा. भास्कर सिंग हा दिल्लीतील कार्यकर्ता गोपाल शर्मा आणि पक्षाची मुख्य कार्यकारिणी यांच्यात समन्वयाचं काम करत होता. हे सर्व कार्यकर्ते २५ ते ३५ या वयोगटातले आहेत. बहुतेक सर्वजण आय.टी. क्षेत्रातली आपली नोकरी करता करता हे काम करत होते. यातले बहुतांशजण देशभर विखुरलेले असल्याने कधीही एकमेकांना भेटलेले देखील नाहीत. केवळ रोज होणारा आपापसातला कॉन्फरन्स कॉल आणि दिल्ली जिंकायचं ध्येय या आधारावर ते एकमेकांना घट्ट बांधले गेले आहेत.
या सगळ्या कॅंपेनमध्ये एक मोठी भीती होती ती म्हणजे एवढे कष्ट घेऊन उभारलेल्या या यंत्रणेचा वापर करून विरोधी पक्षाचे लोक स्वतःचाच प्रचार करतील. याचं कारण असं की, २०१३ मध्ये झालेल्या दिल्ली निवडणुकीत ३३% कॉल्स असे होते ज्यांनी थेट आम आदमी पार्टीची यंत्रणा वापरून भाजपचा प्रचार अथवा आम आदमी पार्टीचा अपप्रचार केला होता. यावेळी ही चूक सुधारायचं ठरलं. देखरेखीसाठी स्वतंत्र टिम बसवण्यात आली. प्रत्येक कॉल रेकॉर्ड केला गेला. त्यावर नजर ठेवली गेली. अडीचशेपेक्षा जास्त कार्यकर्ते हे कॉल्स ऐकत होते. एखादा कॉल करणारा मनुष्य विरोधी काम करतो आहे असं वाटल्यास ताबडतोब त्याला ब्लॉक केलं जाई. अनेकदा तर नवीन कॉल प्रथम पक्ष कार्यकर्त्याकडेच गेला. या सगळ्या यंत्रणेचा फायदा घेऊन कोणी वेगळ्याच पक्षाचा तर प्रचार करत नाहीये ना, कोणी पक्षाला बदनाम करणारी भाषा तर वापरत नाहीये ना यावर अशी कडक नजर ठेवण्यात आली होती. आणि असे शेकडो लोक या टिमने प्रत्यक्ष मतदारांपर्यंत पोहचायच्या आधीच पकडले. त्यामुळे यावेळी पक्षाच्या यंत्रणेचा वापर करून पक्षविरोधी प्रचार करण्याचं प्रमाण आलं अवघ्या ०.००००१ पेक्षाही कमी टक्क्यांवर!!
सगळा मिळून या कॅंपेनसाठी खर्च आला जेमतेम १०-११ लाख. जो काही खर्च आला तोही तांत्रिक गोष्टींसाठी. सोशल मिडीयावर या सगळ्याचा प्रचार करायला आलेला खर्च म्हणजे शून्य रुपये! आम आदमी पार्टीचे हे कॉलिंग कॅंपेन आधुनिक काळातला राजकीय प्रचाराचा एक क्रांतिकारक मार्ग म्हणायला हवा. ज्या शिस्तबद्ध पद्धतीने हे राबवलं गेलं, ज्या पद्धतीने पक्षावर निष्ठा असणाऱ्या हजारो लोकांनी यात थेट सहभाग नोंदवला आणि दिल्ली मध्ये पक्षाचा विजय व्हावा यासाठी प्रयत्न केले, ते बघता अंतिम निकाल हा स्वाभाविक मानला पाहिजे. महत्वाची गोष्ट म्हणजे हे सगळे कोणी टेलीकॉलर्स नव्हते. हे सामान्य कार्यकर्ते होते, पण असामान्य जिद्द असणारे. असे कार्यकर्ते, जे असह्य तळमळीने पेटलेले होते ज्यांना काहीतरी बदल व्हावा ही इच्छा आहे, ज्यांचा या बदलाची सुरुवात आम आदमी पार्टी दिल्ली निवडणुकीपासून करू शकते यावर विश्वास होता असे सामान्य कार्यकर्ते निरपेक्षपणे यात सहभागी झाले होते. ‘दिल्लीचे काम आहे तर मी कशाला करू’ असाही भावकोणी बाळगला नाही. गुलबर्गाचा जगदीश बेल्लारी हा कार्यकर्ता असाच. दुर्दैवाने व्हीलचेअर हाच आधार असणारा कार्यकर्ता. दिल्लीला जाता येत नाही म्हणून कॉलिंग करायला बसला आणि सलग ८ तास कॉल करत होता! इतकंच नव्हे तर सगळ्या कर्नाटकचं कॉलिंगचं नियंत्रण त्यांनीच केलं! नवी मुंबईचे राकेश द्विवेदी असेच भन्नाट कार्यकर्ता. ते एकाच वेळी तीन तीन मोबाईल वरून तीन वेगवेगळ्या दिल्लीकारांशी बोलायला सुरुवात करून गटचर्चाच करत आणि सगळ्यांना आम आदमी पार्टीला मत देण्यासाठी पटवत. त्यांनी तर एक दिवस कमालच केली. एका दिवसात ८२६ कॉल्स केले! या कॅंपेनमध्ये नांदेडच्या संजीव जिंदाल यांनी सर्वाधिक म्हणजे तब्बल ९०११ दिल्लीकारांशी संवाद साधला!! पक्षाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी दिवसरात्र मेहनत घेतल्यानेच हे सगळं घडू शकलं यात काही शंकाच नाही. प्रामाणिक राजकारणासाठी इतक्या मोठ्या संख्येने लोक आपापल्या गावी राहून साथ देतात, झोकून देऊन काम करतात ही गोष्ट निश्चितच आश्वासक आहे. प्रांत-धर्म-भाषेच्या सीमा केव्हाच ओलांडून कार्यकर्त्यांनी हे कॅंपेन यशस्वी केलं. दिल्लीतल्या दहा लाख बावीस हजार कुटुंबांना देशाच्या कुठल्यातरी कोपऱ्यातून आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्याने फोन करून दिल्लीची राजकीय संस्कृती बदलण्याचं आवाहन केलं... आणि दिल्लीकरांनी ७० पैकी ६७ जागा निवडत त्या आवाहनाला भरभरून प्रतिसाद दिला !

नाटकाचा जेव्हा पडदा उघडतो किंवा संपताना पडदा पडतो तेव्हा त्यानंतर सगळे कलाकार स्टेजवर येतात आणि लोकांची मानवंदना स्वीकारतात. याला म्हणतात कर्टन कॉल. दिल्ली कॉलिंग कॅंपेनने जुन्या राजकीय संस्कृतीवर पडदा टाकला आणि दुसरा पडदा उघडून एका नवीन राजकीय संस्कृतीचं पदार्पण राष्ट्रीय राजकारणाच्या मंचावर घडवून आणलं... कॉलिंग कॅंपेनमध्ये सहभागी देशभरातल्या या कार्यकर्त्यांना माझा सलाम!

(दि. १५ फेब्रुवारी २०१५ रोजी दै महाराष्ट्र टाईम्समध्ये प्रसिद्ध http://epapermt.timesofindia.com/Article.aspx?eid=31835&articlexml=15022015011023)

1 comment:

  1. जबरदस्त! 'माध्यम क्रांती' आणि 'कम्युनिकेशन ब्रिंग्ज वर्ल्ड क्लोजर' वगैरे संकल्पना नुसत्याच पुस्तकी नाहीत हे आम आदमी पार्टीनं दाखवून दिलं. अभिनंदन!

    ReplyDelete