Thursday, August 22, 2013

माझा उपवासाचा प्रयोग

डॉ दाभोळकर यांच्या हत्येनंतर काहीतरी करायला पाहिजे अशी तीव्र इच्छा सगळ्यांच्या मनात निर्माण झाली आणि त्याच सगळयांमधला मी एक. मोर्चात वगैरे सहभागी होईनच मी हे माहित होतं. पण त्याने काही फरक पडेल? लगेच मनातून उत्तर आलं होय पडेल. माझा निषेध मी नोंदविणे गरजेचे आहे. निषेध? कोणाचा? मारेकऱ्यांचा? की मारेकऱ्यांना सुपारी देणाऱ्यांचा? की सुपारी देणाऱ्यांच्या विचारांचा? खरे तर ‘माझे ज्याच्याशी पटत नाही अशा प्रत्येकाला मी गप्प केले पाहिजे, तरीही आवाज चढवल्यास ठेचले पाहिजे. मी म्हणतो ते सर्वांनी ऐकले पाहिजे’ या वृत्तीचा निषेध केला पाहिजे. बरं.. शब्दांनी किंवा मोर्च्याने निषेध व्यक्त झाला... पुढे काय? ही गोष्ट ज्या समजत घडली आहे त्या समाजाचा भाग म्हणून माझ्यावर घडल्या घटनेची काही जबाबदारी येते की नाही? एका मनाकडून उत्तर आलं मुळीच नाही. तू या समाजाच्या भल्याचा तुझ्या परीने प्रयत्न करतो आहेस तर तू या घटनेला बिलकुल जबाबदार नाही. पण दुसऱ्या मनाकडून उत्तरं आलं की हा विचार म्हणजे अहंकार झाला. समाजाची म्हणून एक जबाबदारी असते आणि ती स्वीकारायलाच हवी. खरंय की, मी काही गोळी मारणारा नव्हतो. खरंय की, मी गोळी मारावी अशा वृत्तीचा नव्हतो. हेही खरंय की कोणीच गोळी मारणारा असू नये या मताचा मी आहे. पण तरीही मी गोळी मारणाऱ्या, गोळी मारण्याचं समर्थन करणाऱ्या आणि गोळी मारणारे असावेत असे मत बाळगणाऱ्या मंडळींचं अस्तित्व असलेल्या समाजाचा भाग आहे. या मंडळींशी माझं पटत नाही हे खरं. पण हे माझ्याच समाजाचा भाग आहेत हे वास्तव नाकारून मला चालणार नाही. आणि म्हणूनच एक समाज म्हणून या आणि अशा हत्येची असलेली जबाबदारी आपल्यातल्या कोणालाही झटकता येणार नाही.
गांधीजी म्हणायचे उपवास हा निषेध व्यक्त करायचा सर्वात शुद्ध प्रकार आहे. ‘मी एक दिवस उपवास करून कोणाला काय फरक पडणार आहे?’ माझ्या मनात विचार चमकून गेला. गांधीजी आत्मशुद्धी वगैरे शब्द वापरायचे. ते मला समजत नाहीत आणि म्हणून मला ते वापरायचेही नाहीत. पण उपवास केल्याने काहीही फरक पडणार नाही असे मनाचे स्पष्ट उत्तरं येऊनही उपवास करण्याची कल्पना माझ्या डोक्यातून जाईना. उपवास करावा की न करावा असा विचार करताना पुन्हा गांधीजींचेचं शब्द मनात आले- “करके देखो”. मग म्हणलं करून बघू तरी उपवास. ठरलं- २४ तासासाठी अन्न घ्यायचं नाही. फक्त पाणी प्यायचं. आणि या प्रयोगाची एक त्रयस्थ म्हणून स्वतःच्या मनावर शरीरावर होणाऱ्या परिणामांची चिकित्सा करायची.
उपवास करणं फार काही अवघड नव्हतं. दिवसभर भूक लागत होती पण खायचं नाही हा निर्धार आठवायचा. मग आठवायची ती दाभोलकरांची हत्या. मग जाणवायचं की आपला समाज अजूनही आजारी आहे. मानसिक रुग्णच. हे सगळं एखाद्या सेकंदात डोक्यात येऊन जायचं. आणि पुढच्याच क्षणी मी माझ्या कामात गुंग व्हायचो. असं कितीतरी वेळा झालं दिवसभरात. आणि कदाचित याच प्रक्रियेत माझा मतभेदाचे आवाज दाबण्याच्या वृत्तीबद्दलचा निषेध माझ्या मनातच अधिक तीव्र झाला. सकाळी मी नुसताच दुःखात होतो. संताप होता.. पण संध्याकाळी माझ्या विचारांत एक ठामपणा होता. ही जी समाजातल्या विविध स्तरात असलेली वृत्ती आहे तिच्याशी कधीच तडजोड केली नाही पाहिजे असा ठामपणा. हा त्या उपवासाचा परिणाम होता? मला खरंच माहित नाही. पण मला ‘प्रत्येकाला मतस्वातंत्र्य आहे आणि त्याला तो मांडण्याचा पूर्ण हक्क आहे. कोणाचेही मत दाबले नाही पाहिजे’ या माझ्या विचारांशी माझी असलेली कमिटमेंट अधिक गहिरी झाल्यासारखे वाटले एवढे निश्चित.
माणूस जिथे स्वतःचे काहीतरी देतो, पैसा-वेळ-श्रम, तिथे त्यांची बांधिलकी वाढते. अगदी साहजिकच आहे हे, नाही का? मला वाटतं उपवास हे स्वतःची चांगल्या गोष्टींप्रती असणारी बांधिलकी वाढवण्याचंच माध्यम आहे कदाचित. एक दिवस मुद्दामून कोणत्यातरी कारणास्तव उपाशी राहावे यामधून जे आपण सहन करतो त्यातून ही बांधिलकी वाढत असणार. कमिटमेंट या इंग्लिश शब्दासाठी ‘बांधिलकी’ हा फार छान मराठी शब्द आहे. बांधिलकी मध्ये बंधन असले तरी आपुलकीचा भास आहे! त्यामुळेच त्या बंधनाचा जाच होत नाही कदाचित. आणि म्हणूनच उपाशी राहिलो तरी हे काय करून बसलो असं मला एकदाही वाटलं नाही!
एकुणात हा उपवासाचा प्रयोग मला आवडला. कोणीतरी सांगतंय म्हणून तिथी किंवा वार पाहून उपवास करण्यापेक्षा एखादी विशिष्ट गोष्ट, किंवा विचार मनात ठेवून त्यासाठी उपवास पाळण्यात स्वतःहून ठरवून करण्याचा भाग येत असल्याने त्याचं महत्व मला जास्त वाटतं. आधी ठरवले नसतानाही नेहमीपेक्षा जास्त गांभीर्याने मी बऱ्याच गोष्टींचा विचार केला हा भाग या प्रयोगातला फार महत्वाचा आहे. ‘लोक सारासार विचारच करत नाहीत, जरा सखोल विचार करायला शिकलं पाहिजे’ वगैरे गोष्टी वाचनात येत असतात. सविस्तर शांतपणे विचार करायची वृत्ती उपवासासारख्या प्रयोगांतून निर्माण होईल? माहित नाही... पण प्रयोग करून बघायला काय हरकत आहे!

असे कितीतरी प्रयोग करून बघायला हवेत... स्वतःवर...!

No comments:

Post a Comment