आमच्या शासनव्यवस्थेत
राजकारणी आणि अधिकारी वर्ग यांच्यात साटंलोटं आहे ही गोष्ट आपल्यातल्या प्रत्येकाला
ठाऊक आहे. एका नगरसेवकानेच मला एकदा सांगितले होते की नवीन नवीन निवडून आलेल्या
नगरसेवकांना भ्रष्टाचार कसा करावा याचे एक प्रकारे प्रशिक्षणच देण्यात महापालिकेचा
अधिकारी वर्ग पुढे असतो. आपल्या पक्षातले ज्येष्ठ डोक्याशी आणि मुरलेले अधिकारी
हाताशी असल्यावर हा हा म्हणता नवखा नगरसेवक पैसे खाण्याच्या कलेत पारंगत होऊन जातो
अशी चर्चा आम्ही ऐकली आहे. अशा ऐकीव माहितीवर विसंबून नव्हे तर कित्येकदा
कित्येकांनी अनुभवलेल्या गोष्टींच्या आधारेच नागरिकांना आज राजकारणी-नोकरशाही
यांच्यातल्या मधुर संबंधांचीच पुरती जाणीव आहे. विशेषतः जेव्हा गोष्टी अंगावर
उलटतात, भ्रष्टाचार उघडकीस येतात तेव्हा हे संबंध नागड्या वागड्या स्वरुपात समोर
येतात याचीही आज आमच्यासारख्या सामान्य जनतेला सवय झाली आहे.
काल एका दिवसातच दोन दोन केंद्रीय मंत्र्यांच्या विकेट्स उडाल्या. (खरे
तर मराठी वर्तमानपत्रांप्रमाणेच शुद्ध मराठीत ‘बळी गेले’ असे म्हणणार होतो. पण माजी
केंद्रीय रेल्वे मंत्री बन्सल यांनी आपली खुर्ची वाचवण्यासाठी बोकडाचा बळी
दिल्याची चर्चा काल दिवसभर ऐकल्याने ‘बळी’ हा शब्द आम्ही टाळला!) तर अशा दोन विकेट्स
उडण्याचे मुख्य कारण भ्रष्टाचार आहे हे सांगावयास नकोच. त्यातही कोळसा हा तसा
अनेकदा भ्रष्टाचाराबाबत चर्चा झालेला मुद्दा आहे. पण रेल्वे मधला भ्रष्टाचार हे
नव्यानेच समोर आलेली बाब. (याचा अर्थ नुकत्याच घडलेल्या घटनेच्या आधी रेल्वे मध्ये
भ्रष्टाचार नव्हता असे नव्हे. उलट रेल्वे मध्ये सर्वाधिक भ्रष्टाचार असल्याची
तक्रार आहे. गेल्या वर्षभरात केंद्रीय दक्षता आयोगाकडे भ्रष्टाचाराच्या ८८०५
तक्रारी दाखल झाल्या आहेत. यावरून काय समजायचे ते समजावे!) असो. तर घडले असे की, एका
वरिष्ठ अधिकाऱ्याने आपली नेमणूक रेल्वेच्या संचालक पदी व्हावी म्हणून १० कोटी
रुपयांची लाच देण्याचे मान्य केले आणि त्याचा पहिला हप्ता म्हणून ९० लाख रुपये
देताना सदर अधिकाऱ्याला आणि केंद्रीय रेल्वेमंत्र्यांच्या भाच्याला रंगेहाथ
पकडण्यात आले.
या संबंधात प्रमुख तीन प्रश्न आमच्याच नव्हे तर तमाम जनतेच्या
नजरेसमोर आले. एक म्हणजे या अधिकाऱ्याकडे लाच देण्यासाठी १० कोटी रुपये आले कोठून?
दुसरा- १० कोटी रुपये इन्व्हेस्ट करावेत, इथेही एकूण घटनेतील गुंता
लक्षात घेता शुद्ध मराठीतील ‘गुंतवणूक’ हा शब्द टाळतो आहे, असो. तर, एवढे पैसे
इन्व्हेस्ट करावेत याचाच अर्थ त्यातून परतावा मिळण्याची त्यांना हमी असणार. आता
त्या पदासाठी असलेला पगार पाहता १० कोटी रुपये परत मिळणे अशक्यच आहे. मग एवढी
इन्व्हेस्टमेंट कशासाठी? साहजिकच पगाराव्यतिरिक्त इतर मार्गांनी पैसे कमावून आपली
इन्व्हेस्टमेंट फायदेशीर करण्याची खात्री असल्याशिवाय सदर अधिकारी १० कोटी रुपये
असेच इन्व्हेस्ट करणार नाही एवढा विश्वास संबंधित अधिकाऱ्याच्या बुद्धीवर आपण
ठेवावयास हरकत नाही.
आमच्या मनातील तिसरा प्रश्न- खुद्द रेल्वे मंत्र्याचा भाचा चक्क
रंगेहाथ पकडला कसा काय गेला? वास्तविक पाहता एखादा अधिकारी पकडला जाणे, भ्रष्टाचार
झाल्याचे नंतर उघडकीस येणे अशा घटना ऐकत असतोच पण खुद्द मंत्र्याचा भाचा रंगेहाथ पकडला
जाणे अशा घटना फारशा ऐकिवात नाहीत! असे घडलेच कसे याची गुप्तपणे का होईना पण सखोल
चौकशी होईलच अशी आम्ही अपेक्षा बाळगून आहोत!
नोकरशाहीमधील मंडळी आपल्या व्यक्तिगत स्वार्थासाठी राजकारणी मंडळींना
धरून राहतात आणि त्यातून रोकड रकमेसोबतच इतरही फायदे उपटतात. (‘आदर्श’ मध्ये
कोणाकोणाला घरे मिळाली!?) पण याचीच दुसरी काळी बाजू म्हणजे प्रसंग येताच संबंधित
राजकारणी मंडळी याच अधिकाऱ्यांचा बळीचा बकरा करण्यासही मागेपुढे बघत नाहीत. आजवर भ्रष्टाचाराची
प्रकरणे उघडकीस आल्यावर शिक्षा झालेल्या राजकारणी मंडळींची संख्या आणि शिक्षा झालेल्या
अधिकाऱ्यांची संख्या बघितली तर अधिकाऱ्यांची संख्या कित्येक पटींनी अधिक निघेल.
पैसे खाऊन स्वतः नामानिराळे राहण्याची आमच्या राजकारण्यांची कला किती अफलातून आहे
याची या आकडेवारीतून कल्पना यावी. थोडक्यात भ्रष्टाचार करताना अधिकारी-राजकारणी या
दोघांनी एकत्रितपणे करावा. आणि काही विपरीत घडल्यास अधिकाऱ्यांचा बळी देऊन आपण
मोकळे व्हावे असा हा खेळ गेली कित्येक दशके आपल्या भूमीवर सुरु आहे.
आता आमच्या डोक्यात राहून राहून प्रश्न उपस्थित होतो की आपलाच बळी
जाणार आहे हे अधिकाऱ्यांना काय कळत नाही आजूबाजूला बघून? पण तरीही ते भ्रष्टाचार
करण्यात पुढे का बरे येतात? याची दोन कारणे संभवतात- एक म्हणजे कित्येक वेळा
भ्रष्टाचारात पकडल्या गेल्यावरही राजकीय मंडळींकडून अभय मिळू शकते अशी कित्येक
उदाहरणे या हुशार अधिकाऱ्यांच्या डोळ्यासमोर असणार. साहजिकच पकडले गेलो तरी आपला
बळी जाईलच असे नाही. उलट वाट्टेल त्या चौकशी समित्यांतून आपण निर्दोष सुटणार असा
विश्वास त्यांना असणार. किंवा दुसरे कारण म्हणजे राजकीय शक्तीपुढे अधिकारी हतबल
होत असावेत. आणि नाखुशीनेच या सगळ्या भ्रष्टाचारांत सामील होतात. कारण काहीही असो,
राजकारणी आणि नोकरशाही यांच्यातलं साटंलोटं फार गंभीर थराला आता गेलं आहे. या
सगळ्या प्रकारांतून लाचारी, अगतिकता, हतबलता, भय अशा विविध गोष्टी नोकरशाहीमध्ये
शिरल्या आहेत. आणि खरेतर एकूणच यंत्रणेतून थेट नागरिकांपर्यंत ही मानसिकता पोहचली
आहे. नोकरशाहीत राहूनही कणखरपणा दाखवणारे अधिकारी आहेत. भ्रष्टाचार न करणारे आणि
राजकारण्यांच्या बेकायदेशीर दमदाटीला भिक न घालणारे अधिकारी आहेत. पण ते अत्यल्प
आहेत. अवाढव्य नोकरशाहीच्या तुलनेत त्यांचे अस्तित्व नगण्य आहे. पराभूत, लाचार आणि
हतबल मानसिकता आहे म्हणूनच आजूबाजूला सारे स्पष्टपणे दिसत असूनही आमचे माथे फिरून
जात नाही. हे सगळे बदलावे, एक चांगला समाज, चांगला देश उभारावा असे आमच्या
नागरिकांना वाटत नाही, चहा पिताना पोकळ भंपक बडबड करण्याच्या पलीकडे आमची मजल जात
नाही आणि कोणी काही चांगलं करू इच्छित असेल तर त्याला खाली खेचायची एकही संधी
सोडावी वाटत नाही.
बदल करायचा तर राजकारणात करावा लागेल. अधिकाऱ्यांना अक्षरशः कुत्रे
बनवणारे राजकारणी घरी बसवावे लागतील. भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या
राजकारण्यांना हाकलून द्यावे लागेल. थोडक्यात सांगायचे तर साफसफाई करावी लागेल.
त्यासाठी तुम्ही आणि आम्हीच पुढे यायला पाहिजे. अशावेळी साफसफाई करताना थोडीफार घाण
आपल्या अंगाला लागेल, किंवा दमछाक होईल म्हणून हात झटकून चालणार नाही. आपल्यातल्या
चांगल्या लोकांनी पुढे येऊन राजकारणात गेले पाहिजे. या सफाई मोहिमेचे नेतृत्व केले
पाहिजे. कारण अधिक व्यापक विचार केला तर हेच लक्षात येतं की, खरेतर भ्रष्टाचारातल्या या
साट्यालोट्याचे बळी ना राजकारणी असणारेत ना नोकरशाही... या साट्यालोट्याचे बळी
असणार आहोत तुम्ही आणि मी... आणि आपल्यासारखे इतर १२० कोटी..
No comments:
Post a Comment