Sunday, March 31, 2013

सरकारी कार्यालयांचा बागुलबुवा


रकारी कार्यालय म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर येतं - एखाद्या जुन्या पिवळट रंग असलेली उदासवाणी इमारत, आतमध्ये ठेवलेले अगदी सरकारी दिसणारे फाइल्सचे ढीग, त्या ढिगाच्या आड लपलेला एखादा उदासवाणा चेहरा करून बसलेला कर्मचारी, आपण जाताच त्या कर्मचाऱ्याच्या कपाळावर ‘काय ही नवी ब्याद’ अशा अर्थाचे आठ्यांचे जाळे पसरणार आणि आपण काहीही बोलायच्याही आतच त्यांच्या डोक्यात “साहेब आज नाहीएत, उद्या या” ठराविक उत्तराची ‘टेम्प्लेट’ मनात तयार होऊन ते त्यांच्या चेहऱ्यावर उमटणार! हे काल्पनिक चित्र आपल्या डोक्यात इतके पक्के बसलेले असते की यापेक्षा वेगळे काही अनुभवाला आले तर ते सरकारी कार्यालय नव्हेच अशी ठाम समजूत करून घेणारेही सापडतील!

परवा एक मैत्रीण आपल्या पुण्यातील एका क्षेत्रीय कार्यालयात गेली होती. (काय करणार, जन्म दाखल्याचं काहीतरी काम आल्याने जावंच लागलं!), त्यावेळी तिथे किमान एक अख्खा दिवस जाईल, अशा मानसिक तयारीने ती गेली होती आणि काम होऊन अवघ्या १० मिनिटात बाहेर पडल्यावर तिला इतकं आश्चर्य वाटलं की भेटेल त्याला सरकारी कार्यालयातली ही ‘जादू’ सांगत होती!!
असो, तर सांगायचा मुद्दा असा की, जर आपल्याला पुरेशी माहिती नसेल तर अनेकदा केवळ कल्पनेनेच आपण निष्कर्षाला पोहचतो. आणि या चुकीच्या निष्कर्षाला जाण्याच्या सवयीचा सर्वाधिक फटका माझ्यामते सरकारी कार्यालयांना बसला असेल! काही लोक स्वतःला अगदी वेगळे आणि क्रिएटीव्ह वगैरे समजत असतील पण प्रत्येक सामान्य माणसाच्या मनातल्या या काल्पनिक भीतीवरून सर्वच जण भरपूर क्रिएटीव्ह असतात हे अगदी स्पष्ट आहे!

वर वर्णन केल्याप्रमाणे अनेक सरकारी कार्यालये अशी उदासवाणी दिसतात यात शंकाच नाही. पण कर्मचाऱ्यांबाबत मात्र आपली कल्पना सपशेल चुकते. ‘परिवर्तन’ या संस्थेच्या माध्यमातून काम करत असताना मी अक्षरशः किमान शे-दीडशे शासकीय कर्मचाऱ्यांना भेटलो असेन. पण त्यातले जेमतेम चार-पाच वगळता बाकी सर्वांचा प्रतिसाद अतिशय चांगला होता. अनेकांनी आमच्या कामाला प्रोत्साहन दिले, कौतुक केले, सल्ले दिले, मदत केली. शासकीय कर्मचारी हे शेवटी याच समाजाचा भाग आहेत. तुम्हाला आणि मला जसा बदल व्हावा असं मनापासून वाटतं, तसं ते त्यांनाही वाटत असतंच. अशावेळी व्यवस्था सुधारण्याची जिद्द बाळगत २०-२५ वर्षांचे तरुण धडपड करताना त्यांना दिसतात तेव्हा त्यांच्यातही एक जोम येतो आणि अतिशय उत्साहात येत ते मदत करतात. आणि हाच अनुभव बहुतांशवेळा आमच्यातल्या प्रत्येकाने घेतला आहे.

वाईट अनुभवही आलेच. पण त्याहीवेळी आपण शांत राहणे हिताचे. त्यावेळी आवाज चढवणे, कटकट करणे या गोष्टींनी आधीच वाईट वागणारा कर्मचारी अजूनच तिरसट वागतो. महापालिकेत सध्या आवश्यकतेपेक्षा कमी कर्मचारी आहेत. साहजिकच सध्याच्या कर्मचाऱ्यांवर जास्तीचा भार असतो. त्याशिवाय निवडणूक, आधार कार्ड, जनगणना अशी जास्तीची कामं त्यांच्यावर येतंच असतात. वर राजकारणी मंडळींचा दबाव. हे सगळे असूनही त्यांनी त्यांचे काम उत्तम पद्धतीने करणेच अपेक्षित आहे यात शंका नाही, पण कायम लढाई मारायला निघालेल्या सैनिकासारखे जाण्यापेक्षा समजुतीने घेत काम केल्याने त्यांच्याही डोक्याला ताप होत नाही आणि आपल्याही... शिवाय कामही होते. अर्थात त्यांचा कामचुकारपणा दिसल्यास नागरिक म्हणून आपले हक्कांचे आणि अधिकारांचे शस्त्र उगारायला मुळीच हरकत नाही.(त्यासाठी आधी आपले अधिकार आणि हक्क नेमके माहित करून घ्यायला हवेत!). पण ती वेळ क्वचित येते असा माझा अनुभव आहे!
तुम्ही माहिती अधिकारात माहिती मागायला गेल्यावर बहुतांश कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर काय ही ब्याद हेच उमटते हे खरे आहे. पण अगदी ब्रिटीश काळापासून रुजलेल्या बंदिस्त नोकरशाहीला ७-८ वर्षांपूर्वी आलेला माहितीचा अधिकार कायदा एकदम कसे बदलवेल? आपल्याला थोडी वाट पहावी लागेल. नव्या बदलांना पटकन जुळवून घेण्याची कला शासकीय यंत्रणेत अभावानेच आढळते. यंत्रणेचा अवाढव्य पसारा हे जसे कारण आहे तसेच लोक आणि यंत्रणा यांच्यातला परस्पर अविश्वास हेही यामागे कारण आहे. परस्पर सामंजस्य, विश्वास आणि शिस्त यातून सरकारी कार्यालयांचा कारभार सुधारू शकतो. पण यासाठी लोकांचा सक्रीय सहभाग असेल तर आणि तरच हे घडेल याबद्दल मला तिळमात्र शंका नाही. त्यामुळे एक नागरिक म्हणून आपले कर्तव्य आहे की व्यवस्था परिवर्तनाच्या कार्यात आपण सामील झाले पाहिजे. सरकारी कार्यालये ही कधी न जाण्याची नव्हे आपल्या नित्य येण्या-जाण्याची ठिकाणे बनायला हवीत. आणि हे सगळे करत असताना धीर धरणे, संयम राखणे आणि तरीही नेटाने काम करणे याला महत्व आहे. शंभर वर्षे घट्ट रुजलेल्या नोकरशाहीत परिवर्तन घडवायचे तर ते चार-दोन दिवसांत थोडीच होणार आहे? बदल हळू हळूच होईल, पण जो होईल तो दीर्घकालीन असेल!
मग करायची न सुरुवात?!

(दि ३० मार्च २०१३ रोजी महाराष्ट्र टाईम्स मध्ये प्रसिद्ध)

2 comments:

  1. चांगला लेख. आवडला. यापुढे सरकारी कार्यालयात जाण्याआधी इथे दिलेल्या गोष्टी ध्यानात ठेवीन. धन्यवाद.

    ReplyDelete
  2. Thank you and all the best! :)

    ReplyDelete