Saturday, July 2, 2011

नदीकाठच्या वाळवंटात...


आम्हाला कुठल्यातरी अशा ठिकाणी जायचं होतं जिथे फारसं कोणी जात नाही. तिथे असं काहीतरी पाहिजे जे आधी फारसं कोणीच पाहिलेलं नाही. शिवाय १० ते २५ जून अशा तारखाच आम्हाला शक्य असल्याने या तारखांना हवामानही चांगले असणे ही आमची अट होती. एवढेच नव्हे तर संपूर्ण खर्च प्रत्येकी १५-१६ हजारांच्या आत व्हायला हवा होता. एवढ्या सगळ्या अटी पूर्ण करणारी एक जागा आम्हाला सापडली....!! स्पिती...!!! 


पाच मुलं, तीन मुली, एक ड्रायव्हर आणि एक गाडी- तवेरा..! शिमल्याहून सुरुवात झाली. पूर्व दिशेने आम्ही शिमल्याच्या बाहेर पडलो आणि राष्ट्रीय महामार्ग नं.२२ ला लागलो. आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून तिबेट मध्ये जात नाही तरीही या महामार्गाला तिबेट महामार्ग म्हणतात. किन्नौर जिल्ह्यात आम्ही शिरलो. इथले सौंदर्य मी पाहिलेल्या इतर हिमाचल च्या सौंदर्यापेक्षा थोडेफार वेगळे होते. हिमालयात एरवी आढळणारी डोंगरातली हिरवी मैदाने दिसत नव्हती. इथे उंचच उंच शिखरं. सरळ सोट कडे, आणि खळाळत वाहणारी सतलज नदी...
का कुणास ठाऊक सतलज नदी मला उगीचच ओळखीची वाटते. "एखाद्या माणसाची आणि आपली वेव्हलेन्थ का जमावी आणि का जमू नये, याला काही उत्तर नाही. पंधरा वीस वर्षे परिचय असणारी माणसे असतात पण शिष्टाचाराची घडी मोडण्यापलीकडे त्यांचा आणि आपला संबंध जात नाही. भेटी झाल्या तरी मनाच्या गाठी पडत नाहीत. आणि काही माणसं क्षणभरात जन्मांतरीचं नातं असल्यासारखे दुवा साधून जातात. सूत जमून जातं आणि गाठी पक्क्या बसतात.", पुलंच्या रावसाहेब मधल्या या ओळी मला आठवल्या. माणसांप्रमाणेच नदीलाही ही गोष्ट लागू होते हे मला माहित नव्हतं. जन्मापासून पाहत असल्यामुळे पुण्याच्या मुळा मुठा नद्या (?) आपल्या वाटतात असं वाटायचं... पण सतलजला पाहताच ती 'आपली' वाटून गेली...! मी २ वर्षांपूर्वी जेव्हा गंगा पहिली तेव्हा या नदीचा रंग निळा नसून भगवा आहे असा भास झाला होता. आणि गंगेबद्दल आदर वाटूनही आपलेपणा वाटला नाही. या आधी तीन वेळा बियासचं बघूनही ती कधी आपली वाटली नव्हती. याउलट महाराष्ट्रातल्या कृष्णेबद्दल मात्र जिव्हाळा वाटतो. एकूणच मला नद्यांचे विलक्षण आकर्षण आहे. विशेषतः डोंगरांमधून उगम पावून सपाट प्रदेशात येईपर्यंतचा त्यांचा प्रवास अतिशय मोहक असतो. पुढे मग घनदाट मानवी वस्ती सुरु होते आणि नदी घाण करायची यंत्रणा रात्रंदिवस राबते...

आमचा सगळा रस्ता सतलजला लागूनच होता. कधी आम्ही जरा उंचीवर जायचो खाली दरीत सतलज वाहताना दिसायची. कधी आम्ही अगदी नदीच्या किनाऱ्याच्या उंचीवर यायचो. ज्यूरी नावाच्या गावी आम्ही महामार्ग सोडला. आणि उजवीकडे वळून सरळ उंच चढण चढायला सुरुवात केली याच रस्त्यावर 'इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलीस' चे प्रशिक्षण केंद्र आहे. त्याच्या शेजारीच एक वीज निर्मिती केंद्र आहे. त्याच रस्त्याने अजून चढण चढत आम्ही सराहन नावाच्या गावी पोचलो.
किन्नौर भागाच्या राजाची राजधानी म्हणजे सराहन. शेकडो वर्षे इथले राजे निर्धोकपणे राज्य करत होते. उरलेल्या भारतात सुलतान झाले, बादशाह झाले, छत्रपती आणि पेशवे झाले, मधेच अफगाणी अब्दाली येऊन गेला, तरी इथले राज्य अबाधित राहिले. मग ब्रिटीश आले. ब्रिटीशांच्या अंमलाखाली संस्थानिक म्हणून इथे राजे होतेच. १९४७ साली देशातील इतर शेकडो संस्थानिकांप्रमाणेच सराहनचे संस्थानही बरखास्त झाले. इथे एक सुंदर राजमहाल आणि अप्रतिम भिमकली मंदिर आहे.
बस्पा नदी (सांगला खोरे)
दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा तिबेट महामार्गावरून आम्ही सतलजच्या प्रवाहाच्या उलट्या दिशेने आमचा प्रवास सुरु केला. सराहन पासून सत्तर एक कि.मी. वर महामार्गावरच्या करछम नावाच्या गावी एक छोटे धरण बांधण्यात आले आहे. तिथेच बस्पा नदी येऊन सतलज ला मिळते. आम्ही करछम ला उजवीकडे वळून बस्पा नदीच्या काठाने निघालो. बस्पा च्या आजूबाजूला उंचच उंच डोंगर असले तरी त्यांचे कडे सरळ सोट नव्हते. नदीकाठच्या दोन्ही डोंगरांमध्ये अंतर होते. त्यामुळे एकूणच सर्व प्रदेश मोठा वाटत होता. बस्पा चे पात्रही उथळ पण रुंद होते. सांगला गाव मागे टाकून आम्ही रकछम गावी राहिलो. याच रस्त्यावर पुढे गाडी जाऊ शकणारे भारतातले शेवटचे गाव- चीटकुल होते. रकछामच्या रात्री बस्पाच्या काठावर आम्ही समोर खळाळणारे नदीचे पात्र, आणि आमचा नाच गाण्याचा दंगा...!!! अविस्मरणीय...!!

संपूर्ण पंधरा दिवसांमधला सर्वात सुंदर प्रवास आम्ही पुढच्या दिवशी केला. पुन्हा एकदा आम्ही तिबेट महामार्गाला लागलो आणि उत्तर-पूर्व दिशेने सतलजच्या डाव्या काठाने प्रवास सुरु केला. आत्तापर्यंतचे सतलज चे खोरे हिरवेगार होते. पाईन - देवदार ची झाडे होते. एकूणच डोंगरांवर जागा मिळेल तिथे झाडे होती, असंख्य ठिकाणी पिवळी जांभळी फुले होती. पण करछम चे धरण सोडले आणि अवघ्या काही मिनिटातच दृश्य पालटू लागले. उंच झाडे दिसेनाशी झाली. खुरट्या काटेरी झुडुपांची संख्या वाढली. डोंगरांचा रंग हिरवा होता तो हळू हळू करडा तपकिरी होऊ लागला. जिकडे तिकडे मातीच माती... नुसती कोरडी माती... मोठमोठाले दगड. अतिशय तीव्र उतार. त्यावर लांबून वाळू वाटेल असे छोट्या आकारांचे असंख्य दगड. एखाद्या Construction site किंवा स्टोन क्रशर च्या जागी असल्यासारखे वाटत होते. नदीचा रंग हिरवा निळा आणि फेसाळता पांढरा होता तो करडा तपकिरी झाला. डोंगरांना वेगळे करत, कापत वेगाने वाहणारी सतलज... आणि तिच्या आजूबाजूला सगळे उघडे बोडके कोरडे डोंगर....!

महामार्गावरच खाब/काह नावाचे गाव लागले. सतलज आणि स्पिती नदीचा संगम...! पूर्वेकडून येणारी सतलज आणि उत्तरेतून येणारी स्पिती... सतलज स्पितीच्या मोठ्या बहिणीसारखी दिसते... याच ठिकाणी आमचा आणि सतलजचा संबंध संपला... सतलजला उजवीकडे मागे टाकून आम्ही उत्तरेला निघालो. स्पितीच्या काठावरून. सतलज मध्ये जसा आम्ही बदल पहिला तसा स्पितीमध्ये दिसला नाही. स्पिती सतलज च्या संगमापासूनच करडी तपकिरी होती... आणि जसजसे आम्ही तिच्या उगमाकडे जात गेलो तसतसा तिचा रंग अधिक अधिक फिका होत गेला. नंतर आम्ही काझा गावी गेलो तेव्हा तर नदीचे काठ पांढरट होते आणि नदी अतिशय फिक्या तपकिरी रंगाची...! काह पासून थोड्याच अंतरावर आम्ही महामार्ग सोडला आणि पुन्हा एकदा उजवीकडे वळण घेत चढण चढू लागलो. रस्ता वेडीवाकडी वळणे घेत नदी पात्रापासून खूपच उंचावर गेला. नंतर नदी दिसेनाशी झाली. एक दोन टेकाडे ओलांडत आम्ही "मलिंग" नावाच्या गावी जाऊन पोचलो. इथेच होता नाको तलाव. नाको तलाव अतिशय स्वच्छ निळ्या पाण्याचा. त्याचे काठ अतिशय नीट बांधून काढलेले. तलावाच्या आजूबाजूलाही विलक्षण स्वच्छता. गावात शिरल्या शिरल्याच ग्राम पंचायतीच्या वतीने लावलेला बोर्ड दिसतो- "सार्वजनिक जागी धूम्रपान, मद्यपान आणि अश्लील वर्तणूक करण्यास बंदी". इथे येणारे भरपूर फिरंगी टूरीस्ट पाहून हा बोर्ड लावलेला असण्याची शक्यता आहे. पण अर्थातच या बोर्डकडे दुर्लक्ष केले जात असणार. कारण धूम्रपान तर सर्रास चालू होते...! असो... नाको तलवाजवळच बौद्ध माठ आहे. कित्येक वर्षांपूर्वी बांधलेला. सराहन नंतर या भागात सर्वत्र बौद्ध- तिबेटीयन झेंडे फडकताना दिसतात. याच मठाच्या आवारात एक बुद्ध मुर्तीही आहे.

दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा आम्ही एक डोंगर उतरून महामार्गाला लागलो. स्पिती बरोबर आमचा प्रवास उत्तर दिशेला सुरु राहिला. दर थोड्या अंतराला आजूबाजूचे रूप पालटत होते. नदीमध्ये आम्हाला सदैव दोन प्रवाह जाणवत होते. विशेषतः वळणांवर दोन impact points दिसत होते. एकाच नदीमध्ये दोन प्रवाह कसे असू शकतात? सदैव नदीबरोबरच आमचा प्रवास असल्याने सातत्याने निरीक्षण चालू होते. चांगो नावाच्या गावी रस्त्याने स्पिती चा उजवा काठ सोडला आणि एका वेळी एकाच वाहन जाऊ शकेल अशा पुलावरून आम्ही स्पितीच्या डाव्या काठावर आलो. सूमदो गावी तिबेट महामार्ग संपला. इथून एक रस्ता उजवीकडे तिबेट च्या दिशेने जातो, दुसरा स्पितीच्या उजव्या काठावरून उगमाच्या दिशेने. या गावी बेकायदेशीरपणे वेगवेगळ्या प्रकारच्या मालाची आवक जावक होते. इथे बार्टर सिस्टिमच चालते. अन्नधान्य चीनी हद्दीतल्या लोकांना दिले की ते उत्तम दर्जाचे स्वस्तातले स्वेटर्स आपल्या लोकांना देतात. इकडचे दुकानदार हेच स्वेटर्स टूरिस्ट लोकांना विकून भरपूर नफा कमावतात. अर्थात एकूणच लोकसंख्या कमी असणे, हा भाग अतिशय दुर्गम असणे आणि भारतीय लष्कराचे इथले अस्तित्व यामुळे या स्मगलिंग चे प्रमाण कमी आहे. ही सगळी माहिती आम्हाला पुढे काझा मधल्या एका दुकानदार बाईने सांगितली..!

सूमदो वरून डावीकडे वळण घेऊन आम्ही काझाच्या दिशेने निघालो. नदीमध्ये अजूनही दोन स्वतंत्र प्रवाह जाणवत होते. एखादा थोडा उंचवट्याचा भाग आला की दोन प्रवाह वेगळे होऊन मध्ये एक खंजिरीच्या आकाराचे बेट तयार झालेले दिसे. अशी असंख्य बेटे नदी पत्रात दिसत होती... अखेर शिच्लिंग नावाच्या गावी आम्हाला दोन प्रवाहांचा उलगडा झाला. इथे पिन नावाची नदी येऊन स्पितीला मिळत होती. दोन्ही नद्यांचा रंग वेगळा होता. पिन नदीच्या उगमाच्या दिशेने गेले की राष्ट्रीय अभयारण्य आहे जिकडे हिमालयीन चित्ते आढळतात. आम्ही स्पिती बरोबरच उत्तरेला जात राहिलो. आणि अखेर काझा नावाच्या गावी पोचलो. लाहौल स्पिती जिल्ह्यातले हे दोन नंबरचे सर्वात महत्वाचे ठिकाण. सराहन- नाको रस्त्यावर पुह नावाचे गाव आहे. पुह ते काझा या भागात येण्यासाठी परदेशी नागरिकांसाठी विशेष परवाना काढणे बंधनकारक असते.

पिन नदी आणि स्पितीचा संगम सोडल्यापासून आश्चर्यकारक रित्या स्पितीचे पात्र उगमाच्या दिशेने मोठे मोठे होत गेले. काझाला स्पितीचे पात्र मुठा नदीच्या जवळ जवळ पाच ते सहापट मोठे होते. नदी अजिबात खोल नव्हती. शिवाय एकसलग पण नव्हती. पण विस्तीर्ण पत्रातच असंख्य ओहोळ तयार झालेले. मध्ये मध्ये वाळूची बेटे. पांढरी वाळू. नदीच्या आजूबाजूचे डोंगर मात्र आधीसारखेचसारखेच करडे तपकिरी... संपूर्ण खोऱ्यात वाऱ्यामुळे किंवा डोंगरांवरून वाहत येणाऱ्या पाण्यामुळे विलक्षण आकार तयार झालेले. कुठे प्रचंड आकाराचे वारूळ असावे असे डोंगर तर कुठे अगदी आखीव रेखीव बांधलेल्या किल्ल्याप्रमाणे आकार.. अगदी बुरुजांसकट!! आणि हे सगळे प्रचंड आकाराचे. मधेच एके ठिकाणी पांढऱ्या वाळूमध्ये प्रचंड आकाराचे काळे उंचवटे.. कसे तयार झाले माहित नाही...! सारेच विलक्षण... निसर्गाची किमया...!

"की" च्या बौद्ध मठातील धर्मगुरू.
दुसऱ्या दिवशी काझातून आम्ही "की" नावाच्या ठिकाणी एक हजार वर्षे जुना बौद्ध मठ पाहायला गेलो. दुरून हा मठ विलक्षण विलोभनीय दिसतो. आणि या उंचावरच्या मठावरून खाली स्पिती नदी, त्याच्या काठी असणारी हिरवीगार शेते दिसतात. आणि या सगळ्याच्या मागे मातकट डोंगर उतार आणि त्यावर शुभ्र पांढरा बर्फ...!!! मठात आत गेल्यावर एका बौद्ध धर्मगुरूने आमचे स्वागत केले. मी पाहिलेल्या माणसांमध्ये हा मनुष्य सर्वात निर्मळ आणि स्वच्छ होता...आणि कदाचित तितकाच गूढही...! जवळजवळ टक्कल, चष्मा, बारीक मिशी, आणि ओठांवर सदैव एक स्मितहास्य. सुमारे २० वर्षांपूर्वी खोटं बोलून नेपाळमधल्या आपल्या घरून पळून तो इथे आला होता. त्याने आम्हाला सर्वांना बिनदुधाचा अप्रतिम चहा दिला. मग आम्ही एका शांत खोलीत गेलो. तिथे काही दिवे जळत होते. दलाई लामांचे फोटो होते. भिंतीवर चित्र काढलेली होती. एके ठिकाणी कित्येक वर्ष जुनी असलेली हस्तलिखिते नीट मांडून ठेवली होती. एकूणच त्या खोलीत धीर गंभीर आणि अध्यात्मिक वातावरण होते. "और भी मंदिर है यहाँ पे, लेकिन मेरे ख्याल से दो ही देखो लेकिन दिल से देखो.." धर्मगुरूचे हे म्हणणे आम्हाला पटले आणि आम्ही त्याचा निरोप घेऊन बाहेर पडलो.
इथून पुढचा टप्पा होता जगातील सर्वात उंचावरचे वसलेले गाव- किब्बर...!
मोहेंजोदारोची आठवण करून देणारे स्पिती खोऱ्यात दूरवर वसलेले एक गाव
किब्बर कडे दूरवरून पाहिल्यावर मोहेंजोदारोच्या घरांची आठवण होते... बैठी धाब्याची घरं... एका घराच्या गच्चीत आम्ही चढून बसलो होतो. तुफान वारा आणि त्यामुळे थंडी...! कदाचित "की" च्या बौद्ध मठाचा परिणाम असेल पण किब्बर मध्ये आम्ही सगळेच खूप शांत आणि विचारमग्न झालो होतो. 

ज्या घराच्या गच्चीत बसलो होतो त्या घराच्या मालकिणीने आम्हाला चहासाठी घरात बोलावले. अतिशय साधे सुटसुटीत पण मोठे घर. एका खोलीच्या मध्यभागी चूल, हेच त्यांचे किचन, डायनिंग आणि हॉल. मध्यभागी चूल असल्याचा फायदा असा होतो की संपूर्ण खोली उबदार होते. भिंतीला लागून भारतीय बैठक पसरलेली.. त्याच्या पुढ्यात टेबलासारखा लाकडी ओटा. अप्रतिम वाफाळता चहा...!!!  "आप हमारे मेहमान हो... आप किसी भी घर में जाओ, सब चाय पिलायेंगे लेकिन कोई भी पैसे नहीं लेगा.", त्या चहा देणाऱ्या बाईने आम्ही देऊ केलेले पैसे नाकारले. किब्बर काय श्रीमंत गाव नाही. पण तरीही येणाऱ्या लोकांना पाहुणे मानत आपल्या परिस्थितीनुसार त्यांचे स्वागत करायची पद्धत तिथे आहे.

काहीतरी विलक्षण वेगळ्या भावना, विचार सगळ्यांच्या डोक्यात होत्या. जणू आम्ही नेहमीच्या जगात नव्हतोच. कारण आम्ही समोर पाहत होतो ते वेगळेच काहीतरी होते. इथली माणसं, त्यांचा निर्मळपणा, इथलं खडतर जीवन, या थंड वाळवंटात शेती करणारे लोक, निसर्गाचे रौद्र भीषण रूप... सारेच विलक्षण...
दुसऱ्या दिवशी लोसर नावाच्या गावी राहून आम्ही रोहतांग मार्गे मनालीमध्ये आलो... काझा ते लोसर सगळा प्रवास आम्ही स्पिती च्या डाव्या काठावरून केला. काझा नंतर स्पिती हळू हळू छोटी होत गेली. जसजसे उगमाकडे जाऊ लागलो तसा तिच्या पात्राचा आकार छोटा झाला. "कुन्झुम पास" या ठिकाणी आम्ही पोचलो आणि आमचा आणि स्पिती चा संबंध संपला. अवघी एखाद दुसरी टेकडी सोडून स्पिती चा उगम होता. स्पितीच्या उगमापासून ते स्पिती सतलजला मिळेपर्यंतचा सर्व प्रवास आम्ही पाहिला... स्पितीच्या उगमापासून शेवटापर्यंतचा हा प्रवास कमालीचा सुंदर आहे. आजूबाजूला सदैव वाळवंट... विविध प्रकारचे खडक, माती, प्रचंड वेगवेगळ्या रंगाचे दगड... आणि हिमालयाच्या पर्वतराजीला कापत पुढे जाणारी स्पिती....!!
 स्पिती...! 
"की" चा बौद्ध मठ
स्पितीचा अनुभव अभूतपूर्व होता. काहीतरी मौल्यवान असे आम्हाला या सगळ्या प्रवासात मिळाले... जे शब्दात सांगणे अशक्य आहे...

No comments:

Post a Comment