Friday, June 18, 2010

बेस्ट ऑफ फाईव्ह!!!!

११ वी मध्ये प्रवेश देताना दहावीतल्या एकूण ७ विषयांपैकी सर्वात जास्त गुण असलेले ५ विषयच विचारात घ्यावे असा निर्णय सरकारने घेतला आहे.
बेस्ट ऑफ फाईव्ह चा निर्णय क्रांतिकारी आहे असे माझे मत आहे. आजपर्यंतच्या पद्धतीमुळे एखाद्या विषयात पैकीच्या पैकी गुण मिळवणारा विद्यार्थी दुसऱ्या एखाद्या विषयात मागे राहिल्यास त्याची एकूण टक्केवारी खालावत असे. एकूणच सरकारनेच विषय ठरवून द्यायचे आणि विद्यार्थ्यांवर त्याचा बोजा टाकायचा अशा प्रकारचे ही पद्धत होती. परंतु आता विद्यार्थ्यांवर कमी दबाव असेल. एखाद्या विषयात गुण कमी पडले तरी त्यामुळे चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळणार नाही ही भीती कमी होईल.  अर्थात या योजनेचा फायदा सर्वच विद्यार्थ्यांना होणार असल्यामुळे महाविद्यालयांचे 'कट ऑफ' सुद्धा अजूनच वरती जातील यात शंका नाही आणि 'बेस्ट ऑफ फाईव्हचा प्रत्यक्ष फायदा फारसा मिळेलच याची शाश्वती नाही. मात्र या योजनेमुळे मानसिक दृष्ट्या विद्यार्थ्यांना आधार मिळेल त्याचं काय? आज एखाद दुसऱ्या विषयामुळे टक्केवारीवर होणारा परिणाम, एकूणच 'प्रोफाईल' वर होणारा परिणाम या विचाराने विद्यार्थी आणि त्याहून जास्त विद्यार्थ्यांचे पालक हताश होताना दिसतात... स्पर्धेच्या या दुनियेत आता आपले/ आपल्या पाल्याचे कसे होणार या विचाराने हतबल होताना दिसतात. त्यांना या योजनेमुळे मानसिक आधार मिळेल. आणि तो सध्याच्या परिस्थितीत महत्वाचा आहे.

सध्या जो महत्वाचा आक्षेप या योजनेवर घेण्यात येत आहे तो म्हणजे ज्या क्षेत्रात विद्यार्थी प्रवेश घेऊ इच्छितो त्या क्षेत्रातले त्याला पुरेसे ज्ञान नसेल तर गुणवत्ता खालावेल... म्हणजे बेस्ट ऑफ फाईव्ह मध्ये सायन्स विषय नसलेल्या विद्यार्थ्यालाही एकूण टक्केवारीच्या जोरावर सायन्स साईड ला प्रवेश का द्यावा? प्रश्न अतिशय योग्य आहे, हे कोणीच अमान्य करणार नाही. पण सध्याच्या परिस्थितीत तरी हे कुठे लागू होते आहे?
उदा.  "अ" या विद्यार्थ्याला सायन्स मध्ये ६० गुण आहेत पण त्याची टक्केवारी संस्कृत या विषयातील पैकीच्या पैकी गुणांमुळे झाली आहे ८०. दुसऱ्या बाजूला "ब" या विद्यार्थ्याला सायन्स मध्ये गुण आहेत ९० पण त्याची टक्केवारी इतिहास या विषयातील कमी गुणांमुळे आहे ७९. अशा परिस्थितीत सध्या ८० टक्के असलेल्या "अ" मुलाला सायन्स ला प्रवेश दिला जातो.  याच जागी "ब" हा विद्यार्थी सायन्स साईड साठी अधिक योग्य असूनही असे घडते...

सध्याच्या योजनेमुळे यामध्ये काही फार फरक पडणार नाही. पण तोटाही होणार नाहीये. लगेच काही क्रांतिकारी बदल घडून येईल अशी अपेक्षाच करणं चूक आहे. पण क्रांतिकारी बदलाची ही योजना म्हणजे पहिली पायरी आहे. १४ लाख विद्यार्थी बोर्डाची परीक्षा देतात, त्यामुळे बेस्ट ऑफ फाईव्ह करून प्रवेश प्रक्रिया नीट होत आहेना हे पाहणे आवश्यक असल्यामुळे पुढची पायरी याच वर्षी घेणे इष्ट नाही. या वर्षी सर्व काही सुरळीत झाले की पुढच्या वर्षी या वर्षीच्या चुका टाळून पुढची पायरी घेता येऊ शकते. 
आणि याच्या पुढची पायरी असेल ज्या साईड ला विद्यार्थ्याला जायचे आहे त्या साईडचे काही विषय सक्तीचे करणे आणि 'बेस्ट ऑफ फाईव्ह' विषय विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जावर ठरवण्याचा अधिकार!
सायन्स साईड ला जाण्यासाठी बेस्ट ऑफ फाईव्ह मध्ये सायन्स आणि गणित हे विषय असलेच पाहिजेत अशाप्रकारचे नियम. प्रवेश अर्ज भरताना विद्यार्थी आपले ५ बेस्ट विषय अर्जात लिहून देतील. यामुळे एकूणच विद्यार्थ्यांसाठी लवचिकता राहील आणि तरीही गुणवत्ता मात्र खालावणार नाही.

उदा. "अ" या विद्यार्थ्याला सायन्ससाठी प्रवेश हवा आहे. त्यासाठी त्याने अर्ज भरून दिला. अर्ज देताना सक्तीच्या सायन्स आणि गणित या विषयांचे गुण त्याने अर्जात भरावे, उरलेले ३ विषय कोणते लिहावेत हे मात्र त्याचे त्याने ठरवावे. अर्थातच ज्या विषयात सर्वात जास्त गुण आहेत तेच विषय तो लिहील यात शंका नाही. मात्र साईड प्रमाणे बदल करायचे असल्यास एकूण प्रक्रियेत लवचिकता राहील. म्हणजे याच "अ" विद्यार्थ्याला वाणिज्य शाखेसाठीही अर्ज करायचा आहे, तर समजा गणित हा विषय त्यासाठी सक्तीचा असेल तर तो प्रवेश अर्जात भरल्यावर उरलेले ४ विषय कोणते निवडावे हे स्वातंत्र्य राहील. कदाचित त्यामध्ये तो सायन्स घेणारही नाही. त्यामुळे त्याचे 'बेस्ट ऑफ फाईव्ह' चे विषय सायन्स अर्जासाठी आणि वाणिज्य अर्जासाठी वेगळे असतील. आणि हीच लवचिकता अपेक्षित आहे.

अशा प्रकारच्या व्यवस्थेमुळे आज जे सर्वांना एकाच पारड्यात तोलण्याचे काम प्रवेश प्रक्रियेद्वारे होते आहे ते बंद होईल आणि विद्यार्थ्यांचे मूल्यमापन सरसकट न होता त्यांच्या त्यांच्या साईडच्या निवडीनुसार होईल जे विद्यार्थ्यांसाठी खूपच सुसह्य असेल. कारण पालक, समाज आणि एकूणच व्यवस्थेकडून होणारी त्यांची तुलना सगळ्या विद्यार्थ्यांशी न होता, एकूण विद्यार्थी संख्येच्या १/३च विद्यार्थ्यांशी होईल....!!!

निश्चितच ही योजना आशादायी आहे. आता या सर्व योजनेची कार्यवाही कशी होते आहे हे पहायला हवे... ....

2 comments:

  1. अखेर न्यायालयाने सरकार चा बेस्ट ऑफ फाईव्ह चा निर्णय रद्दबातल ठरवला.... सरकारने घेतलेल्या एका चांगल्या पावलाची विल्हेवाट लावण्यात आली आहे... एकूणच प्रकरणात, सरकार, विरोधी मते नोंदवणारे लोक आणि आणि न्यायालय यांनी दूरचा फायदा बघितला नाही असे मला वाटते. आय सी एस ई बोर्ड आणि सी बी एस ई बोर्डाच्या विद्यार्थ्यांवर या निर्णयामुळे अन्याय होतो आहे असा आक्षेप विरोधक घेतात. मात्र वर्षानुवर्षे ६ विषयांची परीक्षा देणारे ५ विषयांची परीक्षा देणाऱ्या या केंद्रीय बोर्डाच्या विद्यार्थ्यांचे वर्चस्व सहन करतंच होते. शिवाय अनेक अनेक शाळा आजकाल केंद्रीय बोर्ड घेणे पसंत करतात याचे मुख्य कारण त्यांचा दर्जा अधिक असणे हे नसून शाळेत शिकवायला एक विषय कमी हा आहे. या शाळांमध्ये प्रांतिक भाषा (महाराष्ट्रात मराठी) शिकवलीच जात नाही. अशा शाळांकडे जाणारा विद्यार्थ्यांचा लोंढा रोखायचा की वाढवायचा? (मनसे ने अजून हा मुद्दा उपस्थित कसा केला नाही काय माहित...!!) शिवाय बेस्ट ऑफ फाईव्ह ला जो काही विरोध होतो आहे तो शहरी उच्च मध्यमवर्गीय लोकांकडून होतो आहे. याचे कारण त्यांची मुले महाराष्ट्र बोर्डाच्या शाळेत नसून केंद्रीय बोर्डाचे विद्यार्थी आहेत. (न्यायालयाच्या निकालपत्रात म्हणल्यानुसार 'शहरी भागात केंद्रीय बोर्डांच्या शाळा वाढत आहेत.') त्यामुळे हा निर्णय रद्द करताना न्यायालयाने एकूण सर्व परिस्थितीचा विचार न करता...किंवा बहुसंख्य अशा महाराष्ट्र बोर्डाच्या विद्यार्थ्यांचा विचार न करता शहरी लोकांचा तेवढा विचार केला आहे असे माझे मत आहे. बेस्ट ऑफ फाईव्ह ने अनेक हजार लोकांना दिलासा मिळाला असताना अशा प्रकारे निर्णय देऊन न्यायालयाने लोकांमध्ये आणि प्रशासनामध्ये गोंधळ उडवून दिला आहे. शिवाय आता ११ वी च्या प्रवेशाचे भिजत घोंगडे आणखी किती दिवस पडणार असा प्रश्न आहे....

    ReplyDelete
  2. बेस्ट ऑफ फाईव बद्दल आज माझ्या हि मनात प्रश्न निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे मी 2005 चा 750 पैकी 462 गुण घेणारा विध्यार्थी. आत्ता सध्या पोस्टाची जाहिरात निघाली आहे, मी या गोष्टीने परेशान आहे की आत्ता नेमके आमचे काय.

    ReplyDelete