Saturday, June 16, 2018

थांबा, पहा आणि मग पुढे जा!

मध्यंतरी एक मुलगा मला भेटला. सोयीपुरतं त्याला रोहन म्हणूया. तर हा रोहन सांगत होता की त्याने एका विवाहसंस्थेच्या वेबसाईटवरच्या तब्बल दोनशे मुलींच्या प्रोफाईल्स बघून त्यांना नापसंत केलंय. तो मोठा चिंतेत दिसत होता. अजून थोडी चर्चा केल्यावर माझ्या लक्षात आलं की खरंतर त्याने ज्या अपेक्षा लिहिल्या होत्या त्यानुसारच शोधलेल्या या सगळ्या मुली होत्या. आणि हा सगळा नापसंतीचा पराक्रम त्याने जेमतेम आठवड्याभरातच केला होता. एकुणात माझ्या लक्षात आलं की, सोशल मिडियावर न्यायाधीशाचा हातोडा घेऊन निवाडे देण्याचा जो आजार फोफावलाय त्याचीच लागण आता विवाहसंस्थेच्या वेबसाईटपर्यंत झाली आहे. गेल्या दहा-पंधरा वर्षात झालेल्या सोशल मिडियाच्या उदयाने माहितीची मुक्त देवाणघेवाण व्हायला लागली, अनेक जण व्यक्त होऊ लागले, चर्चा होऊ लागली वगैरे वगैरे गोष्टी घडल्याच. या सगळ्या छान छान गोष्टींबरोबर अजून एक गोष्ट घडली ती म्हणजे सोशल मिडिया हे एक न्यायाधीश बनवण्याचा कारखानाच बनला जणू. आपली मतं किती पटकन तयार होऊ लागली. एखाद्या व्यक्तीला, किंवा घटनेलाही पटकन काहीतरी लेबल चिकटवून मोकळं होऊ लागलो. याचा वेग दिवसेंदिवस वाढवतच गेलोय आपण. काय घडतंय नेमकं?

काही उदाहरणं देतो. 
(१) बऱ्याच वर्षांपूर्वी फेसबुकवर नोट्स नावाचा एक प्रकार आला होता. सुरुवातीला वापरलाही अनेकांनी. पण तो कधीच फार प्रसिद्ध झाला नाही. हळूहळू त्याचं अस्तित्व जवळजवळ संपलंच. असं का झालं? कारण नोट्स मध्ये लिहिला जाणारा मजकूर हा बहुतेक वेळा बराच जास्त असायचा. (कमी मजकूर लिहायला स्वतःची वॉल होतीच की!) आणि मोठ्या मजकुराचा खप कमी झाला आणि त्याबरोबर नोट्सचा सुद्धा! 
(२) फेसबुकवरच एखाद्या फोटोला मिळणारा प्रतिसाद आणि एखाद्या लिखित गोष्टीला मिळणारा प्रतिसाद याची तुलना करून बघितलं तर लक्षात येतं की फोटोला तुडुंब प्रतिसाद मिळतो. वाचत बसण्यापेक्षा फोटो बघणं सोपं आणि पटकन होणारं आहे ना! 
(३) इन शॉर्ट्स नावाचं एक मोबाईल अॅप आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या बातम्यांचा अगदी थोडक्यात सारांश दिला जातो. या अॅपची लोकप्रियता जबरदस्त आहे. कारण पूर्ण बातमी वाचायला वेळ आहेच कोणाकडे? हेडलाईन आणि त्या अनुषंगाने दोन-तीन शब्द, संज्ञा कळल्या म्हणजे झालं.

या उदाहरणांमधून एक गोष्ट स्पष्ट होते आणि ती म्हणजे, आपला लक्ष देण्याचा कालावधी म्हणजेच ज्याला इंग्रजीत अटेन्शन स्पॅन म्हणलं जातं तो कमी झाला आहे. आणि त्याचवेळी अजून एक गोष्ट घडली ती म्हणजे मला शक्यतो प्रत्येक गोष्टीवर मत व्यक्त केलं पाहिजे, नाहीतर मी मागे पडेन ही भीती. इंग्रजीत ज्याला फिअर ऑफ मिसिंग आउट किंवा फोमो (FoMO) असं म्हणतात, तशातलाच हा प्रकार. सगळेजण काही ना काही व्यक्त होत आहेत तेव्हा, ‘आपणही व्यक्त व्हायलाच पाहिजे, निकाल द्यायला पाहिजे ही स्वतःकडून असणारी मागणी आणि व्यक्त होण्यासाठी, निकाल देण्यासाठी जो विचार करावा लागेल, जो अभ्यास करावा लागेल त्यासाठी आवश्यक कालावधी देण्याची मात्र तयारी नाही अशा दोन्ही गोष्टी एकाच वेळी घडल्याने फारच गंमत झालीये आपली सगळ्यांची. मी याला झटपट निकाल वागणूक म्हणतो. अगदी सुरुवातीला दिलेल्या प्रसंगातल्या रोहनचं हेच झालं होतं. आपण काहीतरी निकाल द्यायचाच आहे आणि तोही तत्काळ अशी त्याची स्वतःकडून मागणी आहे. त्यामुळे त्याने बघितलेल्या दोनशे प्रोफाईल्सपैकी बहुतांश प्रोफाईल्स त्याने नीट न वाचता, नीट विचार न करता थेट नापसंत करून टाकल्या होत्या. काहीतरी निकाल द्यायचाच आहे तर केवळ नापसंती कशी काय व्यक्त केली असा प्रश्न कदाचित मनात येऊ शकतो. तत्काळ निकाल द्यायचा तर एखादीला होकार देऊन मोकळा का बरं नाही झाला? याचं उत्तर आहे ते म्हणजे या प्रसंगात होकार किंवा पसंती यापेक्षा नापसंती अधिक सोयीस्कर आहे. नापसंती व्यक्त केली की विषय संपतो. होकार मात्र विषय वाढवतो. आणि विषय वाढला म्हणजे प्रत्येक टप्प्यावर स्वतःकडून आपण तत्काळ निकालाची अपेक्षा करणार याची कुठेतरी आपल्याला जाणीव असते. त्यापेक्षा नापसंत करा आणि पुढे व्हा असा सोपा विचार आपण करतो.

या आत्तापर्यंतच्या चर्चेनंतर पटकन “ही आजकालची पिढी...”, असं म्हणत, लेबल चिकटवण्याच्या मोहाने सरसावू बघाल पण थोडे थांबा. याचं कारण असं की हा जो गोंधळ चालू आहे तो फक्त आमच्या पिढीचा आहे असं नाही. आमच्या पालकांची पिढीसुद्धा ज्या पद्धतीने सोशल मिडिया आणि त्यातही विशेषतः व्हॉट्सअॅप मध्ये अडकली आहे ते बघता, हा अगदी सार्वत्रिक गोंधळ आहे असं म्हणायला हरकत नाही. आमच्या नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात एका पालकांनी प्रश्न केला की, मुलंमुली सतत मोबाईलमध्ये असतात त्यांच्याशी संवाद कसा होणार?’ त्यावर वक्ते म्हणून उपस्थित असणाऱ्या ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ डॉ आनंद नाडकर्णी यांनी सभागृहातल्या सगळ्याच पालकांना प्रश्न केला, “किती पालक इथे आहेत जे व्हॉट्सअॅप वापरत नाहीत?”. एकही हात वर आला नाही. एक हशा तेवढा पिकला! कुठलाही मागचा पुढचा विचार न करता, कसलीही शहानिशा न करता आलेले मेसेजेस पुढे धाडून देण्याचं प्रमाण सर्वच वयोगटातल्या मंडळींमध्ये प्रचंड आहे. आणि म्हणूनच ते लग्न ठरवण्याच्या प्रक्रियेत असणाऱ्या पालकांमध्ये देखील दिसतं. अर्थातच या प्रक्रियेत पालकांची ही झटपट निकाल वागणूकथोडी कमी प्रमाणात दिसते हे खरं आहे कारण तिथे काळजीचं प्राबल्य आहे अजून. पण ते मुला-मुलींपेक्षा फार कमी नाही, हेही वास्तव आहे. 

मग यावर उपाय काय? सोशल मिडिया आणि आजूबाजूला एकुणात होत जाणारे बदल ही काय आपल्या हातातली गोष्ट नाही. आपण करू शकतो अशी गोष्ट म्हणजे एक पॉझ म्हणजेच स्वल्पविराम घेण्याची. समोर येणाऱ्या गोष्टी बघणे, निरखणे, त्यावर सर्वांगाने विचार करणे, त्यावर आपले विवेकनिष्ठ, तर्कशुद्ध मत बनवणे आणि या सगळ्यासाठी काही काळ थांबत स्वतःला वेळ देऊन मगच पुढे जाणे, म्हणजे हा स्वल्पविराम. एवढी सवलत आपण स्वतःला द्यायला शिकलं पाहिजे. आपण यातून अनावश्यक घाई गडबडीने चुकीचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता कमी करू शकतो. कधीकधी चौकात सिग्नल नसेल तर एक फलक लावलेला असतो- थांबा, पहा आणि मग पुढे जा. सामान्यतः प्रगत देशांत फार जास्त काटेकोरपणे पाळल्या जाणाऱ्या या पाटीला आपल्या देशात खुद्द वाहतूक पोलीसही गांभीर्याने घेत नाहीत आणि मग टाळता येण्यासारखेही असंख्य अपघात घडतात. नातेसंबंध, लग्न, जोडीदार निवड हे आणि यासारखे प्रत्येक महत्त्वाचे निर्णय घेताना थांबा, पहा आणि मग पुढे जा अशी एक अदृश्य पाटी लावलेली आहे हे लक्षात ठेवलं तर बरेच अपघात टाळता येईल हे नक्की.


(दि. १६ जून २०१८ रोजी प्रकाशित झालेल्या महाराष्ट्र टाईम्सच्या मैफल या पुरवणीत प्रसिद्ध)

No comments:

Post a Comment