Friday, July 6, 2018

द पनामा पेपर्स

एका शांत रात्री १० वाजता जर्मनीतल्या बास्टीयन ओबेरमायर या पत्रकाराला एका अनामिक व्यक्तीकडून ऑनलाईन संपर्क साधला गेला. जॉन डो असं त्याने स्वतःचं टोपणनाव सांगितलं. कर चुकवणाऱ्या आणि काळा पैसा लपवणाऱ्या लोकांची माहिती दिली जाईल असं त्या व्यक्तीने सांगितलं. बास्टीयन ओबेरमायरने आपल्या सहकाऱ्याला- फ्रेडरिक ओबेरमायरला सोबत घेतले. आणि मग माहिती यायला सुरुवात झाली. किंबहुना माहितीचा प्रचंड धबधबाच कोसळू लागला. तब्बल २.६ टेराबाईट एवढा प्रचंड डेटा टप्प्याटप्प्याने पत्रकारांपर्यंत पोचला. माहिती फुटली होती- डेटा लीक झाला होता! जगात अनेक ठिकाणी उलथापालथ घडवून आणण्याची क्षमता असणारी माहिती...
The Panama Papers

पनामा देशात असणाऱ्या मोझाक-फॉन्सेका नावाच्या लॉ फर्म मधली ही सगळी माहिती होती. एकूण परदेशांत थाटल्या गेलेल्या २,१४,००० कंपन्यांचे (Offshore companies) व्यवहार, त्याबाबतचे ई-मेल्स, त्यांचे अनेक करार अशी सगळी मिळून एक कोटीपेक्षा जास्त कागदपत्रे यात होती. एवढी प्रचंड माहिती बघायची तर आपण अपुरे पडू हे जाणवून दोघा जर्मन पत्रकारांनी संपर्क साधला International Consortium of Investigative Journalists (ICIJ) या शोधपत्रकारांच्या बहुप्रतिष्ठित संस्थेला. त्यांच्या अपेक्षेप्रमाणे, जेरार्ड राईल या पत्रकाराच्या नेतृत्वाखाली कार्यरत असणाऱ्या ICIJ ने हा त्यांचा स्वतःचा प्रकल्प म्हणून हातात घ्यायचं ठरवलं आणि सुरु झाला एक थक्क करणारा प्रवास. जवळपास ८० देशांतली १०७ प्रसिद्धी माध्यमे आणि त्यातल्या ४०० पेक्षा जास्त शोधपत्रकारांनी वर्षभरापेक्षा जास्त काळ या कागदपत्रांचा अभ्यास केला. आपापल्या देशातले काळा पैसा लपवणारे, गैरव्यवहार करणारे अशा मंडळींची माहिती अक्षरशः खणून काढली. आणि हे सगळं जगभर, एकत्र एकाच वेळी उघड केलं गेलं ३ एप्रिल २०१६ या दिवशी. ICIJ ने या प्रकल्पाला नाव दिलं होतं- पनामा पेपर्स!

असंख्य देशांतले राजकीय नेते, राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान, त्यांचे नातेवाईक, मोठमोठे उद्योगपती, खेळाडू, फिल्मस्टार्स, माफिया, ड्रग लॉर्ड्स, अशा काही हजार मंडळींची नावं या कागदपत्रांमध्ये आहेत. अक्षरशः शेकडो कोटी डॉलर्सचे व्यवहार यात आहेत. जवळपास पाचशे वेगवेगळ्या बँकांनी १५ हजारपेक्षा जास्त बनावट कंपन्या (shell companies) तयार करण्यात कसा हातभार लावला हेही या पनामा पेपर्समध्ये उघड झालं. तब्बल बारा देशांचे आजी किंवा माजी प्रमुख या कागदपत्रांत आहेत. ६० पेक्षा जास्त अशा व्यक्ती आहेत ज्या, राष्ट्रप्रमुखांचे नातेवाईक, मित्र वगैरे आहेत. पनामा पेपर्स उघड झाल्यापासून पाकिस्तानच्या नवाझ शरीफ याच्यासह इतर देशांच्या कित्येक पंतप्रधान, मंत्री, प्रमुख राजकीय नेते यांना आपापली पदं सोडावी लागली आहेत. जागतिक फुटबॉल संघटनेचा प्रचंड भ्रष्टाचार उघड झाला आहे. असंख्य देशांमध्ये चौकश्या बसल्या, आर्थिक गुन्ह्यांचा शोध घेणं सुरु झालं. ज्यांच्याकडे ही सगळी फुटलेली माहिती येत गेली त्या दोघा ओबेरमायर पत्रकारांनी ही थरारक कहाणी पुस्तक रूपाने लिहिली आहे.

इतकी प्रचंड माहिती फुटण्याचं हे जगातलं आजवरचं एकमेव उदाहरण. आंतरराष्ट्रीय स्तरावर पत्रकारांचं इतक्या मोठ्या प्रमाणात परस्पर सहकार्य तयार होत जगभरातला गैरकारभार उघड करण्याचंही हे एकमेव उदाहरण. आणि म्हणूनच ही सगळी घडामोड खुद्द दोघा ओबेरमायर यांच्या शब्दात वाचायला मिळणं हा एक भन्नाट अनुभव आहे. सुरुवातीलाच आडनावं सारखी असली तरी आम्ही दोघे भाऊ नाही असं ते पुस्तकात सांगतात. पुस्तक लिहिताना ते वर्तमानकाळातलं कथन असल्यासारखं लिहिलंय. या शैलीने मजा येते. जणू हे दोघे तुम्हाला पुन्हा त्या सगळ्या प्रक्रियेत नेतात. सामान्यतः आर्थिक घोटाळे क्लिष्ट स्वरूपाचे असतात. बनावट कंपन्यांच्या मार्फत पैसा परदेशात साठवणे या स्वरूपाचा घोटाळा असतो तेव्हा तर हे सगळं समजून घेणं अधिकच कठीण. मुळात कुठल्यातरी गैरमार्गाने कमावलेला पैसा लपवणे यासाठीच बनावट कंपन्यांचा उपयोग केला जात असल्याने मुद्दाम कष्ट आणि काळजी घेत लपवलेली गोष्ट खणून काढणं हे काम सोपं नाही. पैसा लपवण्यासाठी आणि बनावट कंपन्या उभारण्यासाठी मदत करणारी मोझाक-फॉन्सेका ही लॉ फर्म पनामा देशात असल्याने अनेक कागदपत्र स्पॅनिश भाषेत होती. बरं अगदी थोडी कागदपत्र असती तर तितकंसं क्लिष्ट झालं नसतं. पण जेव्हा तुमच्यासमोर एक कोटी कागदपत्र असतात तेव्हा मती गुंग न झाली तरच नवल.

पण ICIJ ने एकदा प्रकल्प हातात घेतल्यावर काही गोष्टी थोड्याफार सोप्या होऊ लागल्या हे लेखक आपल्याला सांगतात. मरीना वॉकर यांना या प्रकल्पाच्या प्रमुख समन्वयक म्हणून ICIJ ने नेमलं. मिळणारी ही सगळी माहिती कशी शोधावी हे सांगायला एक डेटा एक्स्पर्ट नेमला गेला- दक्षिण अमेरिकी मार्ल काबरा. त्याबरोबरच हेही आव्हान होतं की एकाच वेळी जगभरातले पत्रकार एवढा प्रचंड डेटा बघतील कसा? म्हणजे मग सगळ्यांसाठी एक सुरक्षित ऑनलाईन सिस्टीम बनवावी लागणार आणि त्यातच माहिती आणि प्रत्येकाने शोधलेल्या गोष्टीही टाकल्या जातील असं ठरलं. तशी सिस्टीम उभारली गेली. इतक्या सगळ्या कागदपत्रांना वाचायला गेलं की नेहमीचे वापरातले कॉम्प्युटर्स बंद पडत होते. तेव्हा मग ओबेरमायर आणि त्यांच्या टीमसाठी त्यांच्या वर्तमानपत्राच्या संपादक मंडळाने नवीन सुपर कंप्युटर घेण्याची परवानगी दिली. पुढे तर तोही कमी पडू लागल्यावर तब्बल १७,५०० डॉलर्स किंमतीचा अजूनच ताकदवान सुपर कंप्युटर घ्यावा लागला. एकूणच एवढी प्रचंड माहिती शोधायची तर अधिक चांगल्या सिस्टीमची- सॉफ्टवेअरची गरज होती. न्युइक्स नावाची ऑस्ट्रेलियन कंपनी अशा प्रकारची प्रणाली बनवते. पण न्युइक्स इन्व्हेस्टिगेटर प्रचंड महाग गोष्ट आहे. सहसा देशांची पोलीस खाती, गुप्तहेर यंत्रणा, शेअरबाजारावर देखरेख ठेवणाऱ्या यंत्रणा या न्युइक्स वपरतात. पण इथे ICIJ चा संचालक- जेरार्ड राईल कामी आला. तो स्वतः ऑस्ट्रेलियन असल्याने न्युइक्सशी संपर्क साधून त्यांना या प्रकल्पासाठी मदत करण्याची विंनती केली. ICIJ च्या या टीमला न्युइक्स इन्व्हेस्टिगेटर मोफत वापरायला मिळाला! चांगल्या कामासाठी कशा पद्धतीने लोक आपापला खारीचा वाटा उचलतात याचं एक उदाहरण.

आपल्या तशी ओळखीतली नावं मोझाक-फॉन्सेकाच्या फुटलेल्या माहितीत दिसू लागल्यावर आपला पुस्तकातला उत्साह वाढत जातो. रशियाचा सर्वेसर्वा व्लादिमिर पुतीन, चीनचे झी जिनपिंग, सिरीयाचा असाद, लिबियाचा गदाफी, पाकिस्तानचा नवाझ शरीफ असे राजकारणी, त्यांचे नातेवाईक किंवा इतर सहकारी, त्यांच्याशी संबंधित उद्योगपती या नावांबरोबर प्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी, युनायटेड नेशन्सचे माजी जनरल सेक्रेटरी कोफी अन्नान यांचा मुलगा कोजो अन्नान अशी नावं आपल्याला धक्का देऊन जातात.

ओबेरमायर ज्या ज्या घोटाळ्यांच्या शोधात स्वतः गुंतले होते त्याचीच मुख्यत्वे यात थोडी सविस्तर माहिती आहे. बाकीच्यांचे नुसते उल्लेख आहेत. भारतातील इंडियन एक्स्प्रेस ग्रुप या संशोधनात सहभागी होता. पुस्तकात याचा उल्लेख आहे. परंतु तपशील नाहीत. आणि ते स्वाभाविकच म्हणावं लागेल, कारण प्रत्येक घोटाळा तपशीलांत लिहायचं तर पुस्तकाच्या साडेतीनशे पानांत ते कधीच मावलं नसतं. इंडियन एक्स्प्रेसने पनामा पेपर्सचा अभ्यास करून त्यात पाचशेपेक्षा जास्त भारतीय असल्याचं उघड केलंय. अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय, डीएलएफ कंपनीचे केपी सिंग आणि त्यांचे काही नातेवाईक, इंडिया बुल्सचे समीर गेहलोत आणि या बरोबरच आपल्या पंतप्रधानांच्या जवळचे मानले जाणारे गौतम अदानी यांचे बंधू विनोद अदानी; यांची नावं या यादीत आहेत. २०१३ मध्येच मृत पावलेला, कुख्यात डॉन दाउद इब्राहीमचा साथीदार, इक्बाल मिरची याचंही नाव या यादीत झळकलंय.

ज्याला काहीतरी लपवायचे आहे, तोच परदेशात बनावट कंपन्या स्थापन करतो असं हे लेखक ठासून सांगतात. केवळ कर चुकवून बाहेर नेलेला पैसा एवढं आणि इतकं साधं हे नाही हे सांगण्यासाठी दोघा ओबेरमायरने अनेक उदाहरणं दिली आहेत. सिरीयामध्ये चालू असणाऱ्या यादवी युद्धाच्या दृष्टीने महत्त्वाच्या व्यक्तींचा पैसा फिरवला गेला आहे. तिथे हजारो निष्पाप मंडळींचं शिरकाण चालू आहे आणि एक प्रकारे बनावट कंपन्यांच्या माध्यमातून या सगळ्याला मदतच केली जात आहे. लोकशाही देशांत काळा पैसा निवडणुकीत ओतून पुन्हा आपली सत्ता स्थिर करण्यासाठी वापरला जातो हेही हे लेखक सूचित करतात. आफ्रिकन देशांची त्यांच्याच हुकुमशहा आणि नेत्यांनी कशी आणि केवढ्या प्रचंड प्रमाणात लूटमार केली आहे, बघता बघता आईसलँडसारख्या एका श्रीमंत देशाचं दिवाळं कसं वाजतं या सगळ्याचं तपशिलांसह वर्णन या पुस्तकात आहे. ड्रग माफियांचा पैसा जेव्हा बनावट कंपन्यांच्या मार्फत परदेशात नेला जातो, तेव्हा ती फक्त कर चुकवेगिरी नसते, किंवा तो नुसताच आर्थिक घोटाळा नसतो, हे या लेखकांचं म्हणणं पटल्याशिवाय राहात नाही. आर्थिक घोटाळे तसे समजायला कठीण वाटू शकतात. ते असतातही तसे गुंतागुंतीचे. म्हणूनच काही तांत्रिक शब्द आणि त्याचे नेमके अर्थ असे पुस्तकाच्या शेवटी एका यादीत दिले आहेत. त्या यादीची मदत होते. पुस्तकाची भाषा सोपी, सुटसुटीत आणि प्रवाही आहे. एकूण पैशाचे आकडे, समोर येत जाणारी नावं, कशा पद्धतीने बनावट कंपन्यांच्या सहाय्याने परदेशी पैसा नेला जातो, या सगळ्याचा पुस्तक वाचून अंदाज येईल.

शोधपत्रकारांवर येणाऱ्या दबावाचा उल्लेख पुस्तकात वारंवार येतो. दोघे लेखक हे जर्मनीचे रहिवासी असल्याने स्वतःला सुदैवी मानतात. परंतु इतर देशांमध्ये भयानक स्थिती असल्याचंही निदर्शनाला आणून देतात. पनामा पेपर्स प्रसिद्ध करून काही शोधपत्रकार अक्षरशः जीवाची बाजी लावत आहेत. या टीममधल्या रशियामधल्या दोघा पत्रकारांचे फोटो देशद्रोही आणि अमेरिकेचे एजंट असं म्हणत टीव्हीवर दाखवले गेले. पनामा पेपर्सबाबतचे एक कार्टून प्रसारित करणाऱ्या चीनी वकिलाला अटक झाली. हॉंगकॉंगमधल्या एका वर्तमानपत्राच्या मुख्य संपादकाला काढून टाकण्यात आलं, व्हेनेझुएला मधल्या पत्रकाराला नोकरीवरून कमी केलं गेलं, ट्युनिशियामधल्या पनामा पेपर्सची बातमी देणाऱ्या ऑनलाईन मासिकाची वेबसाईट हॅक केली गेली. खुद्द पनामामध्ये ३ एप्रिलचं वर्तमानपत्र हिंसाचार होईल या भीतीने वेगळ्या गुप्त ठिकाणी छापावं लागलं. पण जगभर या पनामा पेपर्सने उलथापालथ घडवली. आणि अजूनही घडतेच आहे. त्या कागदपत्रांच्या आधारे, नवीन चौकश्यांच्या आधारे रोज नवनवीन गोष्टी सातत्याने समोर येत आहेत. आणि हे सगळं घडलं फक्त एका- मोझाक फॉन्सेका या केवळ एका लॉ फर्मच्या कागदपत्रांच्या आधारे. अशा बनावट कंपन्या स्थापन करून देणाऱ्या इतर असंख्य संस्था जगभर सर्वत्र आहेत. म्हणजे काळा पैसा देशाबाहेर नेण्याची यंत्रणा केवढी प्रचंड मोठी आणि व्यापक असेल याचा अंदाज सुद्धा करवत नाही.

ज्या अनामिक व्यक्तीने ही सगळी माहिती फोडली, त्या जॉन डोने सगळी माहिती देऊन झाल्यावर सगळ्यात शेवटी जगासाठी एक संदेश देखील पाठवला. जगात वाढत जाणारी आर्थिक विषमता यामुळे अस्वस्थ होत त्याने हे कृत्य केल्याचं म्हणलंय. त्या आधीच्या प्रकरणांत लेखक काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित करतात. आधुनिक लोकशाही समाजातसुद्धा पैशाच्या जोरावर देशांचे कायदे-नियम धाब्यावर बसवणाऱ्या एक टक्के लोकांमुळे कायद्याचं इमाने इतबारे पालन करणाऱ्या ९९ टक्के सामान्य जनतेवर अन्याय होत असतो हे या पनामा पेपर्समधल्या माहितीमुळे उघड्या नागड्या रुपात समोर येतं. हे पुस्तक एकदा हातात घेतलं की ठेववतच नाही. अर्थकारण-समाजकारण-राजकारण यात रस असणाऱ्याने अगदी आवर्जून वाचावं आणि समजून घ्यावं असं हे पुस्तक- द पनामा पेपर्स.

पुस्तकाचं नाव - द पनामा पेपर्स- ब्रेकिंग द स्टोरी ऑफ हाऊ द रिच अँड पावरफुल हाईड देअर मनी.

लेखक- बास्टीयन ओबेरमायर आणि फ्रेडरिक ओबेरमायर

प्रकाशक – वन वर्ल्ड पब्लिशर

किंमत – रु. ४९९/-


(दि. ६ जुलै २०१८ रोजी प्रकाशित झालेल्या लोकप्रभा या साप्ताहिकात प्रसिद्ध.)

1 comment: